Wednesday, 25 November 2020

बचत तो बस एक बहाना है!

महिला हक्क संरक्षण समितिनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. सगळेच गरजेचे होते. त्यातील एक होता बचत गट! बचत गट सुरु करण्यापूर्वी आम्ही बचत खात ह्या नावानी काम करत होतो. त्या विभागाची जबाबदारी औटेबाई बघत होत्या.

बचत खात्यात गरीब, कष्टकरी कुटुंबातल्या महिला त्यांना जमेल तशी बचत करायच्या. २ रुपये रोज,२५/- रुपये आठवडा, १००/- रुपये महिना अशी जिला जशी जमेल तशी ती बचत करायची.तिला गरज पडेल तेंव्हा ह्या बचतीवर कर्ज घ्यायची, कर्जाचे हप्ते नियमित पणे परत पण करायची.ह्या सर्व पैश्यांचा हिशोब ठेवणं बरंच जिकिरीच तर होतंच, पण रोजचं कलेक्शन करणं अवघड होत होतं. दोन वर्षं सातत्यानी हे चालवल्याने महिलांना बचतीची सवय लागली खरी, पण आमच्या असं लक्षात आल कि ह्यांनी महिलांना बँकेचे व्यवहार समजत नाहीयेत आणि त्यांची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढत नाहीये. 'एकीच्या बळाची ताकत' त्यांच्या लक्षात येत नाहीये. ह्यातूनच १२-१५ महिलांचा बचत गट सुरु करण्याचा विचार पक्का झाला. (२००० च्या सुरुवातीला संस्थेचे एकूण ४५ गट कार्यरत होते.) बचत गटाची रचना निश्चित केली. एका गटात कमीत कमी १०-१२ महिला असाव्यात. व जास्तीतजास्त २० ची संख्या असावी. ह्या महिलांमधुनच तिघींची गट प्रमुख म्हणून निवड करतील. गटाच्या नावांनी बँकेत खात उघडून, त्याचे सर्व व्यवहार गटप्रमुख बघतील. बचतीची रक्कम जमा करणे, त्याचा हिशोब ठेवणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे, दर महिन्याला सभासदांची मीटिंग घेऊन त्यांना गटाचे हिशोब सांगणे, कर्जासाठी आलेल्या अर्जांवर सर्वानुमते निर्णय घेणे, व्याजाचा दर ठरविणे, कर्ज वसूल करणे आणि सर्वात महत्वाचे गटासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे. हि व अशी गटाशी संबंधित सर्व काम गटातील महिला व गट प्रमुखांवर सोपविली. त्यांना गरज भासेल तिथे संस्थेची मदत त्यांनी घ्यावी असे ठरले. बघता-बघता बचत गट व गटातील महिला सक्षम झाल्या. अडी-अडचणीत एक-मेकीना साथ देऊ लागल्या, गरज पडली तर सर्व जणी पिडीतेला आधार देऊ लागल्या. ह्या सक्षम महिलांचा एक अनुभव (किस्सा) शेअर करते.

नाशिकमध्ये गंजमाळ भागाच्या परिसरात जास्त करून कष्टकरी लोकांची वस्ती आहे (होती). छोटी-छोटी घरं! त्यातील काही नशीबवान लोकांच्या घराच्या पक्क्या भिंती होत्या. बहुतांशी घरांना लाकडी फळ्यांच्या भिंती होत्या. घरात हौसेनी, काटकसर करून जमवलेल्या काही वस्तू. मोल-मजुरी करणारा पुरुष वर्ग. कष्ट करून, छोटी मोठी काम करून चार पैसे कमवून संसाराला हात-भार लाऊ पाहणाऱ्या महिला. महिला मुलांना शिकविण्यासाठी धडपड करत होत्या. मोजक्या नशीबवान बायकांना त्यांच्या नवऱ्याची साथ मिळायची. पण बहुतेक घरांमध्ये आर्थिक ओढाताण, पुरुषांना असलेली व्यसनं( त्यात प्रामुख्यांनी दारू, जुगार, मटका आणि बायांची लफडी ) व त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ह्यामुळे नवरा-बायको मधे खूप भांडणं व्हायची. शाब्दिक बाचा-बाची, शिवीगाळ हे तर नित्याचच होतं पण अधून मधून मारहाण पण व्हायची. त्या वस्तीतल्या आमच्या गटात सुरेखा होती. तिचा नवरा फारसं कमवायचा नाही, रोज दारू प्यायचा आणि दारूसाठी पैसे कमी पडले कि सुरेखाला मारहाण करून तिच्याकडून पैसे हिसकून घ्यायचा. सुरेखा आणि सुरेशचा हा तमाशा रोजचाच होता. काही लोक बिचारी सुरेखा असं म्हणायचे आणि त्यांचं भांडण ऐकून न ऐकल्यासारखं वागायचे. तर काही लोक तिची बाजू घेऊन सुरेशला समजवायला जायचे, तर हा बहाद्दर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि आलेल्या लोकांना आया-बहिणीवरून शिव्या द्यायचा. सुरेखानी २-३ वेळा नवर्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार पण दिली. पण घरेलू मामला आहे, नवरा-बायकोचं भांडण आहे, असं म्हणत पोलिसांनी त्याला समज दिली, सुरेखाला समजून सांगितलं आणि घरी पाठवून दिलं. मध्यंतरी एका साहेबांनी त्याला एक दिवस पोलीस चौकीत बसवून ठेवलं. त्या दिवसानंतर काही दिवस सगळं शांत होतं. पोलीस दखल घेतील, शेजारी तक्रार करतील, मुलं पण थोडी मोठी झाल्यामुळे ती पण थोडा प्रतिकार करतील, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला कि मारहाण कमी झाली. म्हणजे मारण्याचं स्वरूप बदललं. ती कोणाला दाखवू शकणार नाही अश्या जागी इजा करायचा आणि 'पैसे दिले नाहीस तर घर पेटवून देईन' म्हणायचा नाहीतर ५ लिटरचा केरोसीनचा डब्बा घ्यायचा आणि आत्महत्येची धमकी द्यायाचा. (आपली बायको बचत गटातून कर्ज घेऊ शकते आणि ते फेडायला पैसे बाजूला टाकते, हे त्याला माहित होतं) 'आपलं लाकडी फळ्यांचं घर. नवर्यानी खरंच पेटवून घेतलं तर आपलं आणि इतरांचं खूप नुकसान होईल', असा विचार करून आणि माराला घाबरून सुरेखा त्याला पैसे देत होती. ह्याचा परिणाम तिच्या बचत गटातील व्यवहारावर झाला. कशीतरी बचतीची रक्कम ठरलेल्या तारखेला ती देउ शकायची. पण कर्जाचे हप्ते द्यायला टाळाटाळ करू लागली. गटाच्या मिटींगला पण गैरहजर राहू लागली. 'काही अडचण आहे का?  सर्व ठीक चाललं आहे ना?' असं विचारल्यावर उडवा-उडवीची उत्तर द्यायची. एक दिवस ती लंगडत मिटींगला आली. 'काय झालं?' विचारल्यावर ती रडायला लागली. तिने साडी व  परकर वर करून दाखवलं. तिच्या मांडीवर वळ होते, पट्ट्यांनी मारल्यासारखे! काही ठिकाणी सिगारेटचे चटके दिल्यासारख्या खुणा होत्या.

'काय झालं? कस झालं? कोणी केलं? हे असं कधीपासून चालू आहे? तू कधी कोणापाशी काहीच बोलली का नाहीस? आणि तू हे का सहन केलंस?' गटातील सर्व बायकांनी प्रश्नांचा भडीमार केला. तेंव्हा सुरेखानी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सगळ्यांना सांगितलं. पैशांसाठी नवऱ्याकडून होणारा त्रास आणि आत्महत्येची त्यांनी वारंवार दिलेली धमकी. कसं गटातील हप्ते भरण्यासाठी वाचवलेले पैसे तो घेऊन जातो आणि म्हणून ती गटाचे हप्ते वेळेवर भरू शकत नाही. तिनी सगळ्यांना विनंती केली कि," माझा नवरा सुधरणार नाही. माझा आजपर्यंत जो हिशोब झाला असेल तो बघून काही शिल्लक रहात असेल तर मला द्या. मी हेच सांगायला आले होते. माझ्यामुळे तुमचं नुकसान नको."

गटप्रमुख काशीबाई म्हणाली," सुरेखा, तू बचत गट सोडणार नाहीस. तुझ्या प्रश्नावर आपण गट म्हणून उत्तर शोधू शकलो नाही तर आपल्याला गट चालवायचा अधिकार नाही. आपण सगळ्या मिळून तुझ्या नवऱ्याला अद्दल घडवू. तू त्याला पैसे देऊ नकोस. तो तमाशा करेल. त्यांनी तमाशा केला कि शालिनी, तुझ्या शेजारीच रहाते, आम्हाला निरोप देईल. पुढे काय करायचं ते तू आमच्यावर सोड."

काशीबाईच्या शब्दांनी सुरेखाला धीर आला. गटातील बायका आपल्याला ह्याच्यातून वाचवतील अशी खात्री तिला वाटू लागली. ती घरी गेल्यावर काशीबाईनी गटाची मीटिंग घेतली आणि काय करायचं, कस करायचं ह्याची रूपरेषा ठरवली.

संध्याकाळ झाली. अंधार पडला. अपेक्षे प्रमाणे सुरेश झिंगलेल्या अवस्थेत,सुरेखाला शिव्या देत घरी आला. आत आल्या आल्या त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. ठरल्याप्रमाणे सुरेखानी नकार दिला. आता तो मारणार ह्या भीतीनी सुरेखा दाराच्या दिशेनी पळाली. त्यांनी तिला आत ढकललं, आणि मुश्कीलिनी तोल सावरत, तिला अर्वाच्य शिव्या देत तो केरोसिनचा डब्बा उचलायला गेला. 'आता मी स्वतःला पेटवून घेतो आणि आयुष्य संपवतो. तू तर माझ्या मरण्याची वाटच बघतीयेस ना? म्हणजे तू लफडी करायला मोकळी. पण मी तुला घेऊन मरणार. मला जगायचा कंटाळा आला आहे. साली, मनासारखी, शांतपणे दारू पेऊ देत नाहीस? आता बघतोच तुझ्याकडे' असं म्हणून तो तिला फटका मरणार, तेवढ्यात काशीबाई गटातील बायकांना घेऊन घरात शिरल्या. "अरे मुडद्या! तू कशाला टेन्शन घेतोस? ५ लिटर मध्ये तू पूर्ण जळणार नाहीस आणि तुझी आत्महत्येची इच्छा अपूर्ण राहील. आम्ही सर्वजणी ५-५ लिटर घेऊन आलोय. पण तुला इथे नाही, चौकात पेटवणार. तू तर मरून जाशील पण आमची आगीत उधवस्त झालेली घरं कोण बांधून देईल. तेंव्हा चला ग बायानो ह्याला चौकात घेऊन चला. आणि त्याला वाजत गाजत घेऊन जाऊ म्हणजे वस्तीतले बाकीचे सुरेश पण शहाणे होतील."

सर्व बायकांनी त्याला मारत-मारत चौकात आणलं. तिथे असलेल्या खांबाला त्याला बांधून ठेवलं. रात्री उशिरापर्यंत सुरेश तिथेच होता. त्याची नशा, हौस, गुर्मी सर्व जिरली. 'बायकोला आणि मुलांना त्रास देणार नाही, दारू पीऊन तमाशा करणार नाही, चार पैसे कमवीन आणि कुटुंबाची काळजी घेईन' अशी ग्वाही दिली तेंव्हा त्याला सोडलं. ह्यामुळे त्याच्यासकट वस्तीतले बरेच सुरेश बरेच दिवस शुद्धीत होते आणि नीट वागत होते.

बचतगटाची ताकद अशा अनेक केसेसमधून सातत्याने आमच्या समोर येते. त्यामुळेच आता बचतगट हे नाव बदलून सगळीकडे त्याला स्वयंसहाय्यता गट म्हंटल जातं. कारण इथे बायका एकमेकींसाठी उभ्या राहतात, बचत तो बस एक बहाना है!

Wednesday, 18 November 2020

जगात खरच भूत असत का?

जगात भूतं असतात असं मला खूप दिवस वाटत होतं. आम्ही लहान असतांना आमच्या घरी माझ्या वडिलांचे मित्र, पाटणकर काका यायचे. ते पहिल्यांदा जेव्हा कोकणातून आले तेंव्हा काही दिवस आमच्या घरी होते. पाटणकर काका खूप भारी होते. रात्रीचं जेवण झालं कि ते रोज आम्हाला गोष्ट सांगायचे. त्यांच्या बहुतेक गोष्टी भुताच्या असायच्या. मी तेंव्हा ७ वीत होते. त्या गोष्टी ऐकायला भारी वाटायच्या आणि भीती पण खूप वाटायची. आम्ही त्यांना विचारायचो, 'काका, भूत कशी असतात? ती कुठे रहातात? ती कुठून येतात?'

  काका सांगायचे,'जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल आणि ती मिळायच्या आधीच ती व्यक्ती मेली कि तिचं भूत होतं.'

  आम्हाला ते खरं वाटायचं.आम्ही भावंडं एक-मेकांना भूत होण्याची भीती घालून काम करून घ्यायचो.

  जगात खरच भूत असत का? ह्या प्रश्नाच उत्तर मला 'असू शकेल' असं वाटायचं. अगदी कांताची केस आणि कांता माझ्या आयुष्यात येई पर्यंत.

  ८६-८७ मध्ये नाशिकला एस.पी ऑफिस होतं. आमच्या कडील केसेस संदर्भात आमची एस.पी साहेबां बरोबर नियमित पणे बैठका व्हायच्या. अशाच एका मीटिंगमध्ये चर्चे नंतर असं ठरलं कि 'हुंडाबळीसारख्या केस मध्ये जळीत महिलेची मृत्युपूर्व जबानी घेताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी (शक्य असेल तर) तिथे हजर रहावं. कुसुमताईनी होकार कळवला. दोन दिवसातच संध्याकाळी ७-७.१५ च्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून दूरध्वनीवरून सांगितलं,'ताई, एक ९२% जळीत महिला दाखल झाली आहे. तिचा जबाब घ्यायचा आहे. कोणाला तरी पाठवा.'

  आमचं ऑफिस तर ५.३० वाजता बंद झालं होतं. घरात पाहुणे आले होते. कुसुमताई जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी मला जायला सांगितलं. नाही म्हणायची खूप इत्छा होती, पण हिम्मत होत नव्हती. जायची पण हिम्मत नव्हती. दिवसा ऑफिसमध्ये बसून समझोते करणं, तक्रार ऐकून घेणं, नोंदवून घेणं वेगळ आणि रात्री ८ वाजता एक जळालेल्या महिलेचं स्टेटमेंट घेणं वेगळ. काहीही झालं तरी मलाच जावं लागणार होतं. अनिछेनीच, पण गेले.

  आयुष्यात पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात होते आणि ते पण जळीत वार्डात! ते पण ९२% जळालेल्या महिलेचा जबाब नोंदवायला. मला सगळ्याचच खूप दडपण आल होतं. सिव्हील मध्ये सगळे वाटच बघत होते. आम्ही लगेचच कामाला लागलो. माझ्याबरोबर एक डॉक्टर, जुदिशिअल magistrate, आणि एक पोलीस खात्यातली व्यक्ती होती. मुलीचे आईवडील आणि इतर नातेवाईकांना बाहेर जाण्यास विनंती केली. त्या वार्डात आम्ही गेलो. ८ जळीत पेशंट होते. कमी जास्त प्रमाणात भाजलेले. वेदनेनी कण्हत होते. त्या खोलीत एक विचित्र दर्प होता. त्यांनी मला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. खूप निग्रहाने आणि हिंमतीने मी उभी होते. पहिल्या नोंदी झाल्या-नाव,वय, इत्यादी माहिती घेऊन झाली. कांताला प्रश्न विचारत होते आणि ती जुजबी उत्तरं  देत होती.

  तिथे उभ्या एका नर्सनी तिला सांगितलं,'कांता, ह्या ताई आल्या आहेत. त्या महिलांना न्याय मिळवून द्यायचं काम करतात. तुला त्यांना काही सांगायचं आहे का?'

  डॉक्टरच्या मते जबाब नोंदवायचं काम झालं होतं. पण हि नवी माहिती मिळाल्यावर कांताला काहीतरी सांगायचं होतं. तिच्यात एक वेगळच बळ आल होतं. तिच्यात अजिबात शक्ती नव्हती. तिने 'ताई' अशी हाक मारली ती आम्ही ऐकली. तिचा आवाज खूप बारीक होता. आम्ही सगळे तिचं म्हणणं ऐकायला पुढे वाकलो. तो पर्यंत मी कांताला पाहिलंच नव्हतं. तिचा पूर्ण शरीर एका जाळीने झाकलेल होतं. त्या जाळीवर एक पांढरी चादर होती. आम्ही वाकल्यावर मला जे दिसलं ते भयानक होतं. भरीताच वांग भाजल्यावर त्याची जशी साल निघते तसं कांताच्या शरीरावरच कातडं निघालं होतं. मला चक्कर आली आणि उलटी होईल असं वाटलं. डॉक्टरनी मला धरलं म्हणून बर झालं.

  कांतानी जे सांगितलं ते भयानक होतं. तिचं एक वर्षापूर्वी दशरथ बरोबर लग्न झालं होतं. कांता १२वि पर्यंत शिकलेली, दशरथ एका पायानी थोडा अधू आणि ८ वी पास होता, पण कांताच्या बापाची गरीब परिस्थिती म्हणून हे लग्न झालं. पहिल्या दिवसापासून दशरथनी कांताचा कधी बायको म्हणून स्वीकार केलाच नाही. मनात येईल तेंव्हा जवळ जायचं, बाकीच्या वेळेला अपमान करायचा आणि तुच्छ वागणूक द्यायचा. दशरथची स्वतःची शेती होती आणि कांताच्या वडिलां पेक्षा परिस्थिती चांगली होती. काही दिवसा पूर्वी त्याची संगीताशी ओळख झाली. स्थळ तोलामोलाचं. तिच्या वडीलांची ती एकुलती एक मुलगी. त्यातून ते हुंडा द्यायला तयार होते. संगीता शिकलेली नव्हती आणि दिसायला पण बरीच होती, पण त्यांनी दशरथला काही फरक पडत नव्हता. त्याला संगीता बरोबर लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला कांता कडून फारकत हवी होती. तो कांता कडे फारकत मागत होता आणि ती द्यायला तयार नव्हती. आधीच आपलेपणा नाही त्यात हा नवीन प्रॉब्लेम. त्याची दिवसेंदिवस चीड-चीड वाढत होती. तो कांताला उपाशी ठेऊ लागला, मारहाण करू लागला. पण कांता फारकतीच्या कागदांवर सही करेना. त्या दिवशी, दोन मित्रां बरोबर दशरथ दारू प्यायला. दारू बऱ्यापैकी चढली होती. त्यांनी कांताला जेवण वाढायला सांगितलं. ती जेवणाचं ताट घेऊन आली आणि दशरथनी पुन्हा फारकतीचा विषय काढला. कांता नी नकार दिल्यावर त्याला खूप राग आला. त्यात एक मित्र म्हणाला,"साली काय माजली आहे. दशरथ, तुला उलटून बोलते? मी तर तिला तुडवलीच असती."

  आधीच दारू चढलेली, त्यात मित्रांच्या समोर अपमान झाला. दशरथनी मारणं कांता साठी नवीन नव्हतं. पण आज त्याचा अवतार भीतीदायक होता. अर्वाच्य शिव्या देत त्यांनी कोपर्यातली काठी उचलली आणि मारायला (बडवायला) सुरुवात केली. तो मारत होता आणि वेड लागल्या सारखं 'फारकत दे, फारकत दे,' म्हणत होता. मी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेंव्हा समजलं कि तिला खांबाला बांधलं आहे. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. तिला दुरून कोणाचा तरी आवाज आला. "अरे ही तर मरून गेली. आता काय करायचं?" तेवढ्यात अंगावर काही तरी गार शिंपडल्या सारखं वाटलं. वाटलं आपण स्टोव्ह मध्ये रौकेल भरतोय. वास येतोय. तेवढ्यात अंगाची लाही-लाही झाली. ताई, मला न्याय हवा आहे."

  कांताचा आवाज क्षीण होत होता. ती श्वास घेण्यासाठी तडफडत होती. डॉक्टरनी आम्हाला बाहेर जाण्यासाठी हाताने खुणावलं. मी इतकी सुन्न झाले होते कि पुढची १० मिनिटे काय झालं मला काही समजलंच नाही. डोळे उघडले तेंव्हा जवळ एक नर्स होती. तिच्या हातात पाणी होतं आणि ती विचारत होती,'ताई, कस वाटतंय? बऱ्या आहात का? थोडं पाणी घेता का?' मी त्यांना विचारलं,'कांता?' त्यांनी खुणावून सांगितलं,'ती गेली'. मला खूप वाईट वाटलं. माझा आणि तिचा काही संबंध नव्हता कि ओळख. पण मला खूप वाईट वाटलं. अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी मी खूप रडले.

  माझी अवस्था बघून पोलिसांनी मला घरी सोडलं. घरी सगळे वाटच बघत होते. काय पाहिलं काय ऐकलं हे कथन करताना मी माझ्या नकळत खूप रडले. मी पुढचे २-३ दिवस न धड झोपू शकले कि जेऊ शकले. दुसर्या दिवशी मी आदल्या दिवशी जे ऐकलं, पाहिलं ते लिहून स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवलं.(हे कुसुमताई च्या सांगण्यावरून).

  मनात एक विचार आला, आता कांताचं भूत होईल का? झालं तर ती त्याला चांगली अद्दल घडवेल. कांता आणि तिचं भूत जे करायचं ते करतील. पण आपण आपल्या बाजूनी जे शक्य आहे ते करून कांताला न्याय मिळवून द्यायला मदत करायची, असं मी ठरवलं. मला by this time, कळल होतं कि भूत वगेरे काही नसतं, पण कोणत्याही मार्गांनी दशरथला शिक्षा व्हावी हि तीव्र इत्छा होती. म्हणून बहुतेक विचारांत भुताचा आधार घेतला. (इतक्या नव-विवाहित मुली हुंडाबळी होतायत, सुखी संसाराची स्वप्नं बघत लग्न करून सासरी जातात आणि अतोनात छळ सहन करून माहेरी येतात, किंवा आत्महत्या करतात, त्यांची कधी भूतं झाल्याचे ऐकले नाही)

पुढे दशरथ विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वर्षभरात केस बोर्डावर आली, चालली आणि दशरथला जन्मठेप झाली.


Wednesday, 11 November 2020

पट्ट्याची भाषा आणि ताकत

एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आली. साधारण ३२-३५ वय असेल. शिडशिडीत बांधा. ९ वारी साडी नेसलेली, तिच्या डोक्यावर एक रिकामी टोपली होती. तिच्या सांगण्यावरून समजलं कि ती  दारोदार जाऊन फळ विकायची, मुख्यता केळी. ऑफिसमध्ये आल्यावर डोक्यावरची रिकामी टोपली खाली ठेवली आणि खाली बसत म्हणाली," ताई, मला मदत करा. मी विधवा आहे. मला एक १४ वर्षांची मुलगी आहे. आम्ही दोघी एका झोपडीवजा घरात रहातो. घरखर्च भागवण्यासाठी मला काम करावंच लागतं. मी फळ विकायला बाहेर जाते, तेंव्हा ती घरात एकटीच असते. आमच्या घराच्या जवळ राहणारा एक माणूस घरी येऊन तिला त्रास देतो. दारावर थाप मारतो, जोरजोरात हाका मारतो. ती खूप घाबरून जाते. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा. मला आणि माझ्या मुलीला वाचवा!"

आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि,'तिला आम्ही मदत नाही करू शकणार. तिने पोलिसांची मदत घ्यायला हवी. हे काम पोलिसांच आहे'.

त्यावर 'पोलीस काहीच मदत करत नाहीत. मी साहेबांना भेटून आले' असं तिनं सांगितलं.

झालं! कुसुमताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ जणी तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. संध्याकाळचे ५-५.३० वाजले होते. साहेब चौकीत होते. आम्ही आमची ओळख करून दिली आणि त्या महिलेची अडचण थोडक्यात सांगितली.

पोलीस इन्स्पेक्टरला काय घडलं असेल हे लक्षात यायला एक क्षण पण लागला नाही. त्यांचं ते रोजचच काम होतं. आम्हीच नवखे होतो. आमचं योग्य पद्धतीने (बसायला खुर्ची आणि पाणी) स्वागत करून त्यांनी त्या बाईची हजेरी घ्यायला सुरुवात केली."बाई, हा कोण माणूस? तो तुला कस ओळखतो? तुमची आधीची काही ओळख, काही व्यवहार, काही संबंध आहे का? असं आपल्याकडे कोणी कोणाला त्रास देत नाही. काय असेल ते खरं खरं सांग."

केलीवाल्या बाईनी तिची त्या माणसाशी काहीच ओळख नाही असे निक्षून सांगितल्यावर साहेबांनी प्रश्न विचारायची पद्धत बदलली. त्यांनी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि हवालदाराला सांगितलं,'माझा पट्टा आण. खूप दिवसापासून त्याला पोलिश करायचं होतं. राहून गेलं.'

हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती बाई इन्स्पेक्टरच्या पाया पडून,' साहेब माझं चुकलं. मला आता आठवलं, माझी मंजू ५ वर्षांची होती तेंव्हा सोमनाथ मला भेटला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि माझा धनी मेला होता. आमच्या कडे बघणारं, कमावणार कोणी नव्हतं आणि त्याला भाकर खाऊ घालणारं! आम्ही संगती रहायला लागलो. ७-८ वर्षं छान मजेत गेली. ६-८ महिन्यांपासून तो दारू पिऊ लागला आणि सगळी घडी विस्कटली. मी त्याला घरातून हाकलून दिला. तेंव्हा पासून तो आम्हाला त्रास देतोय.'  

"म्हणजे, तुला आणि तुझ्या मुलीला तो आधार देत होता, तुम्हाला दोन वेळेचं खाऊ घालत होता, तेंव्हा तो तुझ्या घरी आलेला तुला चालत होता. आणि आता तुझे बरे दिवस आले आहेत आणि दारूच्या आहारी जातोय म्हणून तू त्याच्या बद्दल खोटी तक्रार नोंदवायला आली आहेस? तो नक्की काय त्रास देतो? देतो का नाही देत हे तू ह्या संस्थेतल्या बायकांना खरं काय ते सांग."

" तो फुकटची भाकर खायला येतो ते मला चालणार नाही. मी एकटी तरी कोणा कोणाला आणि कशी पुरी पडणार? त्यांनी चार कष्ट करावेत, चार पैसे कमवावेत. मग तो आला तरी चालेल."

"पण त्याचावर हि वेळ कशामुळे आली? तो काय काम करत होता? ते काम कशामुळे सुटलं?"

ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळण्यासाठी ती उठत, आम्हाला उद्देशून म्हणाली," ताई, तुमचे आणि साहेबांचे लई उपकार झाले. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांनी वेळ काढून माझं म्हणणं ऐकून घेतलत. लई उपकार साहेब." असं म्हणत ती चौकीच्या बाहेर जाणार तोच इन्स्पेक्टर साहेबांनी फक्त 'उत्तर' एव्हडाच शब्द उच्चारला आणि ती मटकन खालीच बसली. त्यांच्या आवाजात झालेला बदल, आवाजातील जरबच अशी होती कि तीच काय आमची पण खुर्चीतून उठायची हिम्मत झाली नसती.

"साहेब, सोमनाथ गवंडी काम करायचा. चांगला रोज कमवत होता. आम्हाला वाटलं आमच्या दोघांच्या कमाईत, त्यात थोडं कर्ज काढून आपल्या मालकीचं एक झोपडी घेता येईल. त्याच्या मालकाकडून आणि दोन मित्रांकडून त्यांनी उसने पैसे आणले. आमचा किमतीचा अंदाज चुकला. त्यांनी व्याजानी पैसे आणले. त्याची परतफेड आम्ही करू शकलो नाही. कर्जाचे हप्ते वसूल करायला माणस घरी यायला लागली. त्याला धमक्या द्यायला लागली. तो घाबरून पळून गेला. काय करावं मला काही समजले नाही. रोज दारी घेणेकरी येत होते, शिव्या देत होते, अचकट विचकट बोलत होते. त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सुचला. मी ती झोपडी विकली, सगळ्यांची देणी फेडली आणि ती वस्ती सोडून मुलीला घेऊन दुसरी कडे राहायला लागले. त्याचा काही पत्ताच नाही. तो जिवंत आहे कि नाही काही कळायला मार्ग नाही. तो एक वर्षभरानंतर आला. तो पण खूप दारू पिऊन. त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. तो जबरदस्ती घरात शिरत होतं, मी आरडा ओरडा केला. शेजारी आले आणि त्यांनी त्याला मारून हाकलून दिलं. मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही कारण मला तो माझ्या घरात अश्या अवस्थेत नको होता."      

तिच्या डोळ्यात पाणी आल. ती विनंती करत म्हणाली," साहेब, ताई, सोमनाथ वाईट नाहीये. तुम्ही त्याला समजून सांगा. तो तुमचं ऐकेल."

सोमनाथला बोलावून, त्याला समजणाऱ्या भाषेत त्याला सांगायची, समजवायची जबाबदारी साहेबांनी घेतली. त्यांनी दोघांमध्ये समझोता करून दिला.

एक दिवस केळीवाली, सोमनाथला घेऊन ऑफिस मध्ये भेटायला येऊन गेले.

आम्ही सगळे अवाक! ही बाई आपल्याशी खोटं का बर बोलली असेल? तिने आपल्याला अर्धवट माहिती का सांगितली? असं करण्यामागे तिचा काय हेतू असेल? पण जशी वर्षं उलटत गेली, आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो कि तक्रार नोंदवायला आलेली व्यक्ती क़्वचितच पूर्ण खरं बोलते. ते पूर्ण खोटं पण नसतं. ते अर्धसत्य असत.

पट्टा घेरे जरा, ह्यातून त्या बाईला काय समजलं? त्याचा अर्थ काय? त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले नसते तर माझ्या ज्ञानात भर पडली नसती. पोलिसांची लोकांकडून खरं वदवून घेण्याची कला भारी होती. मला पट्ट्याची भाषा आणि ताकत, नाहीतर कशी कळली असती?

Wednesday, 4 November 2020

आर्थिक स्वावलंबनाने महिला सक्षमीकरण होतं का?

 मला बरेच दिवस अशी खात्री होती कि आर्थिक स्वावलंबन हा एक महिला सक्षमीकरण साधण्याचा हुकमी मार्ग आहे. बाई कमवायला लागली कि तिला कुटुंबात समाजात प्रतिष्ठा व स्थान प्राप्त होतं. तिच्या विचारांना व मतांना महत्व प्राप्त होतं. तिच्या भावनांची घरातले कदर करतील. पण हा माझा भ्रम होता.

आमच्या उद्योगकेंद्रात तीन कंपन्यांमधून काम यायचं. व्ही.आंय.पी, जी.पी.इलेक्ट्रॉनिक, आणि फीनोतेक्स! सगळ्या मिळून ७० बायका काम करायच्या. सर्वजणी वेळेवर यायच्या. सकाळी ९ वाजता काम सुरु करायचो. दुपारी १ वाजता जेवणाची सुट्टी आणि संद्याकाळी ६ वाजता दिवस संपायचा. अर्जंट मटेरियल द्यायचं असलं तरच उशिरापर्यंत महिला थांबायच्या. बहुतेक महिला सिडको परिसरातील असल्याने ज्यांना हवं त्या जेवणाच्या सुट्टीत घरी जायच्या. व्ही.आय.पी. विभागात काम करणारी सीमा पण रोज जेवणाच्या सुट्टीत घरी जायची व घरून वेळेवर यायची.

संस्थेत काम करणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी आम्ही करायचो. त्यांना ई.एस.आय.सी. ह्या शासकीय योजनेचा लाभ मिळावून देण्यासाठी त्यांच्या नावाची त्या कार्यालयात नोंद केली. ह्या योजनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. वर्षभर लागणारं धान्य भरण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत होतो. त्यांचे बचत गट सुरु केले होते. ह्या गटांच्या माद्यमातून त्या त्यांच्या कौटुंबिक गरजेप्रमाणे कर्ज काढत व ते सुलभ हपत्यात फेडत होत्या. ह्यातून त्यांना आर्थिक व्यवहार व बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली होती. एकूण संस्थेत येऊ लागल्या पासून त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.

रोजच्या सारखी त्या दिवशी दुपारी ३.३०  वाजता टी ब्रेंक झाला. अचानक व्ही. आय.पी विभागातून आरडा ओरडा ऐकू आला. जाऊन पाहिल तर समजलं सीमा चक्कर येऊन पडली आहे. थोड्या वेळानी ती शुद्धीत आल्यावर तिला दोघींसोबत घरी पाठवलं. तिची पाठवणी केल्यावर सीमा आणि तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. त्या विभागातील मंदाताईनी दिलेली माहिती चक्राऊन टाकणारी आणि राग आणणारी होती. सीमाच्या घरात एकूण ७ माणस! ती, तिचा नवरा, त्यांची ४ मुलं तिची सासू व नणंद. खाणारी सात तोंड आणि कमावणारी हि एकटी. घर म्हणजे १०*१५ ची खोली! घरातली सगळी काम ती एकटीच करायची. पहाटे ४-४.३० ला उठून, रात्रीची भांडी घासायची. सगळ्यांसाठी चहा नास्ता करायचा. सगळ्यांसाठी दुपारचंजेवण बनवायचं, केरवारे करून, धुणं धुऊन धावत उद्योगकेंद्र गाठायची. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. काही जेवण उरलं असेल तर खायची. नाहीतर भांडी घासून पाणी पिऊन कामावर यायची. इतकी स्वार्थी आणि नालायक माणस असू शकतात? माझा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या व्यक्ती मुळे घर चालत, त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत, त्या बाई साठी चार घास वगळावेत, तिला घरातल्या कामात मदत करावी असं घरातील एकालाही वाटू नये? माझ्या जीवाचा संताप होत होता. तिचं नशीब म्हणून सोडून देणं मला मान्य नव्हतं! माझ्यातील सत्सत्विवेकबुद्धी मला शांत बसू देत नव्हती. ऑफिसचं काम संपवून मी मंदाताई बरोबर तिच्या घरी गेले. घरातील दृश्य तर आणखीन संताप आणणारं होतं. नवरोजी शेषशाही भगवान झाले होते, सासू व नणंद गप्पा मारत होत्या, मुलं खेळत होती आणि सीमा, नुकताच संपलेल्या चहाचे कप धुवून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. मला दारात पाहिल्यावर तिने माझं स्वागत केलं आणि नवऱ्याला नीट उठून बसण्यासाठी खुणावलं. तो नाईलाजान उठून बसला. सीमाच्या तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मोर्चा सरळ तिच्या नवऱ्याच्या दिशेने वळवला.

"आपण शंकरराव ना? नमस्कार. मी हेमा पटवर्धन."

"काय ताई? मी ओळखतो तुम्हाला. खरं सांगायचं तर निम्मं सिडको तुम्हाला ओळखतं. तुम्ही सीमा सारख्या महिलांना काम देता, त्यांनी खूप लोकांची मदत होते. ताई तुम्ही उभ्या का? बसाना."

असं म्हणत त्यांनी पलंगावर जागा करून दिली.

"शंकरराव, तुम्ही सध्या काय काम करता? म्हणजे नोकरी कुठे करता?"

"मी सध्या घरीच आहे."

"कधीपासून?"

"वर्ष होऊन गेलं. ताई काही कामच मिळत नाही. म्हणून घरीच बसलोय."

"आणि तुमची आई आणि बहीण? त्यापण काही करत नाहीत का? घरीच असतात का?".

"हो"

"म्हणजे तुमच्या घरात कमावणारी एकच व्यक्ती आहे. सीमा! आणि तिची तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला सर्वाना ऐयत खायला मिळतंय पण तिला काही होतंय का, तिची तब्येत ठीक आहे ना, ह्याची काळजी  करण्याची तुम्हाला गरज वाटत नाहि. आज ती कामावर असतांना चक्कर येऊन पडली. त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही सगळे! तिच्या जवळची माणस! तुम्हाला तिच्या जीवाची काळजी नाही. ती जिवंत आहे का मेली ह्याची तरी खबर घ्याल कि नाही? अरे!  तिच्या मुळे तुम्हाला ऐतं बसून खायला प्यायला मिळतंय न? जी बाई आपल्यासाठी एव्हडी राबते तिच्यासाठी दोन घास वगळण्या इतकीपण माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही का? मला मान्य आहे कि हा तुमचा घरचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल 'तुमचा काय संबंध? तुम्ही ह्याचात मध्ये पडू नका.' पण मला हे मान्य नाही. मी मध्ये बोलायला नको. पण काय करू? तुम्हा सर्वांची लाज वाटते आणि चीड येते. काम करायची इच्छा असणार्याला काम मिळतच. ८ दिवसानंतर पुन्हा येते भेटायला. सीमा विश्रांती घे. बर वाटलं कि ये."

दुसर्या दिवशी, 'आता मी बरी आहे म्हणत सीमा कामावर रुजू झाली. तिच्या घरच्या लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडण्याची मला अजिबात आशा नव्हती. ऑफिसच्या जवळ रहाणार्या जाधवबाईना सांगून तिच्या दुपारच्या जेवणाची, एक महिन्यासाठीची सोय केली. ह्या सगळ्यामुळे सीमाच्या तब्येतीत फरक दिसू लागला.

हे सगळं झाल्यामुळे उद्योग्केंद्रातील बायका टेन्शनमध्ये! त्या मला सांगत होत्या,"ताई जरा सांभाळा. सीमाचा नवरा खूप डेंजर माणूस आहे. तुम्ही बसनी येता. त्यांनी वाटेत तुम्हाला काही केलं तर? नाहीतर तुम्ही ८-१० दिवस नका येऊ. आम्ही घेऊ सांभाळून.'

त्यांना माझ्या बद्दल वाटणाऱ्या भावना मी समजू शकत होते पण शंकररावला घाबरण्याच काही कारण नाही हे माझ म्हणणं त्यांना पटत नव्हतं आणि त्यांचं मला. शेवटी असं ठरलं कि सायंकाळी दोघीजणी माझ्या सोबत बस स्टेन्ड पर्यंत येतील. असं जवळ जवळ चार आठवडे चाललं. एक दिवस अचानक एका गल्लीतून शंकरराव,"ताई, ताई" अश्या हाका मारत सायकल चालवत आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. ते जवळ आले, सायकल बाजूला लावली आणि रस्त्यात माझ्या पाया पडले. मी व माझ्या सोबतच्या दोघी आश्चर्यचकित झालो. काय बोलावं आणि काय करावं क्षणभर काही सुचेना. भानावर येऊन म्हणाले,"शंकरराव, उठा! हे आता काय नवीन नाटक? असा तमाशा करू नका. आपण रस्त्यात आहोत ह्याचं भान ठेवा."

स्वतःला सावरत, शंकरराव उठून उभे राहिला. त्यांनी पिशवीतून एक पेढ्याचा बॉक्स काढला. तो माझ्या हातावर ठेवत म्हणाले," ताई, त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात. आम्हाला खूप बोललात. मी त्यावर विचार केला. मला तुमचं म्हणणं पटलं. मी काम शोधायला लागलो आणि आईला अनो ताईला घरातल्या कामात मदत करायला पण सांगितलं. ताई, मला नोकरी मिळाली. वाचमनची नोकरी आहे. आज पहिला पगार झाला. अजून घरी पण गेलो नाही. आधी तुम्हाला पेढे देण्यासाठी थांबलो होतो."

आपल्या कुठल्या वागण्याचा आणि बोलण्याचा कोणाला कसा उपयोग होईल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आपण सीमा च्या घरातील लोकांना बोललो ते बरंच झालं, माझा मन तरी शांत झालं. पण त्या दिवशी आपण थोडं जास्तच  बोललो असं एक क्षण वाटलं खरं. पण उपाशी राहणं काय असत हे मी २-३ वेळा अनुभवलंय.

आमच्या सहामाही परीक्षा चालू होत्या. ११-१ भूमितीचा पेपर होता. परीक्षेचा अभ्यास म्हणून धड नाश्ता केला नव्हता आणि २ पर्यंत जेवायला घरी पोहोचू म्हणून टिफिन घेतला नव्हता. १२.३० च्या सुमारास announcement झाली. 'शहरात दंगल झाली आहे. जे विद्यार्थी बसनी प्रवास करणार असतील किंवा लांब रहात असतील त्यांना घरी पोहोचवायची व्यवस्था शाळा करेल.' मला शाळेत बाईनी थांबवून ठेवलं. शाळेपासून घर ५.५० किमी दूर होतं. त्या दिवशी सगळीकडेच नुसता गोंधळ होता. आम्हाला घरी सोडायला संद्याकाळी ६ वाजता पोलीस व्हान आली. सर्वाना सोडून झाल्यावर माझा नंबर आला. मी रात्री ८.३० वाजता घरी पोहोचले. भुकेनी जीव कासावीस झालं होता.

बाकीच्या दोन्ही घटना कोलेज मधल्या. एफ.वाय. ला असतांना नाव-निर्माण आंदोलन झालं होतं. त्यात अडकलो होतो. आणि दुसरी घटना त्याच वर्षी जयप्रकाश नारायण याचं भाषण ऐकायला गेले होते, तेंव्हा. स्वप्नात विचार केला नसेल एव्हडी गर्दी जमली होती, त्यांचं भाषण ऐकायला. भाषण संपल्यावर घरी जायला वाहन मिले ना. शेवटी निघालो चालत. उपाशी-तापाशी, दमलेलो, ५ किमी चालून घरी पोहोचलो. त्या प्रसंगांपासून मनात उपाशी राहण्याची भीती आहे आणि उपाशी ठेवण्याची चीड आहे.

Thursday, 15 October 2020

रोशन की जिंदगी में रोशनी आयेगी?

महिला हक्क संरक्षण समितीत आजपर्यंत विविध काम केली. अनेक जबाबदार्या स्वीकारल्या. त्यातील एक उद्योगकेंद्राची! सातपूर व अंबड येथील कंपन्यांमध्ये जाऊन, तेथील साहेबांना भेटून कामे मिळवणे. त्यामागील प्रेरणा आणि विचार १९८८-८९ पर्यंत सोडविलेल्या केसेस मधून पुढे आला. आमच्या अस लक्षात आलं कि सासरी त्रास होतो, नवरा मारहाण करतो, सांभाळत नाही, वेळी अवेळी मारहाण करून मुला बालांसकट घरातून हाकलून देतो तेंव्हा नाईलाजाने ती महिला माहेरी मदत मागायला येते. ३-४ मुलांना घेऊन माहेरी आलेली मुलगी ही पालकांसाठी व त्यांच्या भावांसाठी एक नकोशी जवाबदारी असते. (काही नशीबवान मुलींचे पालक त्यांचा स्वीकार करतात) पण बहुतेक वेळा तिचं आणि तिच्या मुलांच ओझं वाटतं. काही वेळा कुटुंब मोठं आणि कमावणारी व्यकी एक, त्याच्या उत्पन्नात भागत नाही म्हणून देखील चिडचिड होते. आणखीन एक कारण म्हणजे तिच्या लग्नात दिलेला हुंडा! काही केसेसमध्ये भाऊ बोलून दाखवतात कि तुझ्या लग्नात तुझं जे काही होतं ते देऊन झालं आहे. आता ते घर तुझं आहे. आल्या सारखी चार दिवस माहेरी रहा आणि आपल्या घरी जा. आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे अनेक कुटुंबात नवऱ्याच्या उत्पन्नात घरखर्च भागत नाही. बाईनी चार पैसे कमावले तर ती कुटुंबाला  हातभार लाऊ शकेल आणि वेळप्रसंगी तिचे उत्पन्न तिला जगायला मदतरूप ठरेल.

  बघता बघता ३ मोठ्या कंपन्यांची कामे आम्हाला मिळाली. आम्ही ६५-७० महिलांना रोजगार देऊ लागलो. अगदी फेक्टरी सारख काम सुरु झालं. सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यन्त काम चालायचं. काम चोख अगदी मागणी प्रमाणे पुरवठा करत होतो. साहेबलोक पण खूष होते. बघता बघता सिडकोतील लोकांना माहित झालं कि गरीब व गरजू महिलांना संस्था काम देते. आमच्या उद्योगकेंद्राच्या  आणखीन दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे काम घराच्या जवळ होतं, दुसरं महिलांची संस्था आणि तिसरं वेळेवर मिळणारा मोबदला. बायका खूष, आम्ही खूष आणि कंपनीतले साहेब खूश!

  त्या दिवशी मला सिडकोतील ऑफिसला जायला उशीर झाला. जवळ जवळ १२ वाजले. केलेल्या कामाची बिल करायचं काम काल अर्धवट झालं होतं ते पूर्ण करायला सुरुवात करणार तेवढ्यात अलकाताई एका बाईला, रोशनला घेऊन आल्या. रोशन मला भेटण्यासाठी सकाळी १०पसुन थांबली आहे असं त्या म्हणाल्या.

  अलकाताईनी रोशनला उद्देशून सांगितलं, "हेमाताईसे बात करले. आमच्या कडे जागा नाहीये. गरजेप्रमाणे बाया घेऊन झाल्या आहेत. मी तुला सकाळपासून हेच समजावायचा प्रयत्न करतीये. ताई काही जादू करणार आहेत का? जागाच नाही तर त्या तुला काम कुठून देतील?"

  "ताई मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकतच नाहीये. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असंच आल्यापासून घोकतीये.

  मी काही म्हणायच्या आत रोशनने माझा हात तिच्या हातात घट्ट धरला आणि म्हणाली,"ताई, नही मत कहो. बहुत उम्मीद लेकर तुम्हारे पास आई हु. घरमे बच्चे कलसे भूखे है. मैने तो दो दिनसे कुचभी नही खाया. ताई कुचभी काम दो. मै झाडू मारूंगी, टोईलेट साफ करूंगी, जो बोलोगे वो करूंगी. मगर ताई मेरेको ऐसेही वापीस मत भेजो." इतक बोलून ती रडायला लागली. काय बोलावं, काय करावं, मला काही सुचत नव्हतं.

  मी रोशानला सांगितलं, "आधी घरी जा आणि तुझ्या मुलांना घेऊन ये. तुझ्या कामाचं काय करायचं ते नंतर बघू. रोशन गेल्यानंतर मी अलकाताई आणि मंदाताईना बोलावलं. आत येताना दोघींनी एकाच सुरात सांगितलं, "ताई, आपल्याकडे अजिबात व्हेकन्सी नाहीये. कालच आपण तिन्ही विभागात प्रत्येकी दोन बायका घेतल्या आहेत. त्या छान काम करतायत. तुम्ही त्याच्यात काही प्लीज बदलू नका.' सेक्शन सुपरवायसर म्हणून त्यांचं दुख मी समजू शकत होते. त्यांच्या युनिट मध्ये बदल होणार नाही असं आश्वासन दिलं, तेंव्हा कुठे आमचं बोलणं पुढे सरकलं. मी त्यांना समजावला कि तिला आज कामाची, मिळणाऱ्या पैशांची खूप गरज आहे. तिला काय काम द्यायचं, तिचा पगार कशातून द्यायचा हे मी बघीन. तुम्ही फक्त तिला सांभाळून घ्या. आणखीन एक, आपण आपल्या बरोबर तिला व तिच्या मुलांना जेवायला बोलवूया.

  रोशन तिच्या मुलांना घेऊन आली. ती येईपर्यंत एक वाजून गेला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जेवणाची सुट्टी केली. जेवायला बसतांना आम्ही रोशनला व तिच्या मुलांना आग्रहानी जेवायला बसवलं. मुलं पोटभर जेवली. रोशननी पण नको नको म्हणत चार घास खाल्ले.जेवण झाल्यावर सर्वजणी आपल्या सेक्शनमध्ये गेल्या. रोशनची मुलं बाहेर अंगणात गेली. रोशानला सांगितलं आता तुझी काय अडचण आहे ती सविस्तर सांग.

 

  रोशनच्या सांगण्यातून मला जे समजलं ते,

  तिचे लग्न १० वर्षापूर्वी अब्दुलशी  झालं होतं. अब्दुल गवंडीकाम करायचा. राहायला झोपडी व मर्यादित उत्पन्न. त्याला तीन शोक होते- दारू,जुगार आणि बाई! सर्व कमाई त्यात खर्च व्हायची. पैसे कमी पडले कि तो राग रोशनवर निघायचा. उपासमार व मारहाण हि नित्याचीच होती. त्याच्या मर्जीप्रमाणे वेळी अवेळी शरीरसुखाची अपेक्षा पूर्ण करावी लागत होती. तिची ३ मुलं आज जिवंत आहेत व तिची ३ मुले वेळेवर उपचार न झाल्यामुळे मरण पावली. आईवडील व भाऊ कशातच लक्ष घालत नव्हते. त्रास असह्य झाला की लेकरांना घेऊन माहेरी आशेनी जायची. पण एकदापण त्यांनी कधी जावयाला समजावलं नाही का हिला एखादी रात्र ठेऊन घेतलं नाही. खरं सांगायचं तर तिच्या माहेरची परिस्थिती पण बेताचीच होती. वडिलांचं इस्त्रीच दुकान. भाऊ पण वडिलांसोबत त्याच दुकानात काम करत होता. ८ वर्षांपूर्वी भावाचं लग्न झाल होतं. त्यांला पण तीन लेकरं होती. राहायला झोपडी. तो तरी काय आणि कशी मदत करणार. चार महिन्यांपूर्वी तिच्या नवर्यानी तीला बेदम मारहाण करून माहेरी आणून सोडलं. "परत पाठवू नका. मी तिला घरात घेणार नाही." असं म्हणाला. तिचे वडील काही समजवायला गेले तर अब्दुल म्हणाला, "मै तुम्हारी रोशनको तलाक़ देता हुं." त्या नंतर ३ वेळा तलाक़ म्हणून तो निघून गेला. आता रोशन कुठेच जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाईलाजाने तिला घरात रहायला परवानगी दिली. आपण इथे सगळ्यांना नकोसे आहोत हे कळत होतं पण तिचा नाईलाज होता. रोशननी घरातली सर्व काम करायची असं ठरलं. घरातील ११ माणसांचा स्वैपाक, कपडे धुणे, भांडी घासणे व इतर लहान मोठी पडतील ती कामे ती मुकाट्यानी करत होती. वहिनी काढून देईल तेवढच  जेवण बनवायचं. सर्वांच्या शेवट जे उरेल ते रोशनला मिळायचं. काही दिवसांनी तिच्या मुलांना पण मोजकच जेवण द्यायचं ठरलं. परवा भावाच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनी शाळेत जाण्यासाठी हट्ट केला. तेंव्हा त्यांची मामी म्हणाली,"मेरा अकेला मरद क्या क्या करेगा? ११ लोगोंको खिलावो, उनको सम्हालो, और अब इनको पढने भेजो. इत्ता बेठके खाते हो. थोडा काम करो और कमाई करो."

  तर अशी हि रोशन! दुसर्या दिवसापासून आमच्या उद्योगकेंद्रात येऊ लागली. तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. ती मन लाऊन काम करत होती. पहिला महिना तिला नेमकं काय काम सांगावं, हि थोडी अडचण होती. दुसरं म्हणजे तिला पगार कश्यातून द्यावा हे समजत नव्हतं. मी आमच्या अध्यक्षा मा.कुसुमताईना विचारून माझं त्या महिन्याचं मानधन तिला द्यायचं ठरवलं. संस्थेत येणारं काम वाढतच होतं. पुढील महिन्यापासून तिला एका विभागात (सेक्सन) रुजू करून घेतलं. बघता बघता रोशनची आर्थिक परिस्थिती सुधारली. ती घरात भावाच्या बरोबरीने पैसे देऊ लागली. महिला हक्क संरक्षण समिती तर्फे उद्योग केंद्रातील महिलांसाठी एक उपक्रम राबवला जायचा. त्यांना वर्षाला लागणारं धान्य भरायला आर्थिक मदत करणे. त्याचा रोशन व तिच्या कुटुंबाला खूप उपयोग झाला.

  आज बरेच दिवसांनी मला रोशन भेटली. (१९९४ मध्ये बंगलोर येथे "बाल हक्क परिषद, ९५ साली बेईजिंग, चीन, येथे झालेली अंतर-राष्ट्रीय महिला परिषद आणि महिला हक्क संरक्षण समिती च्या कामाच्या संदर्भात झालेला १९९७चा कॅनडा दौरा, त्याची पूर्वतयारी व नंतरचं अनुभव कथन, रिपोर्टिंग ह्यात ३ वर्षं खूप गड-बडित गेली. ह्या संदर्भातील बंगलोर, अमदाबाद, पुणे, दिल्ली, उदैपूर अश्या वेग-वेगळ्या शहरांमध्ये झालेल्या मिटींग्स ह्या सगळ्यामुळे बाकी कशालाच वेळ मिळाला नाही) भेटल्यावर मी तिची विचारपूस केली, "घरी सर्व ठीक आहे न? मुलं शिकतायत ना?" असं विचारल्यावर ती पटकन म्हणाली," ताई अब घरमे मेरीही चलती है. घरका खर्चा चलाती हुं. यहा कामपे लगी. पहेले दो महिनेका पगार बच्चोपे खर्च करी. सबको एक जोडी नये कपडे लिये. अम्मी अब्बू भाई भौजाई सबके वास्ते कुछतो लाई. घरमे सब खुश थे. फिर मैने भाई और अब्बू को समझाया ऐसे कित्ते दिन बच्चोको लेकर झोपडेमे रहेंगे. वन रूम किचन भाडेसे लेकर उसमे रहेंगे. अच्चे लोग आपके पास आएंगे. उससे अपनीही आमदानी बढेगी. पहेले मेरी बात कबूल करना उनके लिये थोडा मुश्कील था. मगर बादमे मान गये. अब हम सब दो रूम किचन वाले मकानमे रहेते है. अब सब अछेसे चल रहा है. आपने बोले वैसे मेरे बच्चोके साथ भाईके बच्चे भी सिखाती हुं. सबके साथ अच्छेसे रेहेती हुं. ताई, बहोत बार सोचती हुं, अगर आप मुझे नही मिलती तो मेरा और मेरे परीवारका क्या होता"?

असे अनुभव आले की दर वेळी वाटतं, की अजून खूप काम करायचं बाकी आहे. महिला हक्क संरक्षण समिती आपल्या परीने शक्य ते काम करतेच आहे. आजवर त्यात अनेक हितचिंतकांची साथ लाभली आहे. अशीच साथ यापुढेही लाभू दे, म्हणजे गरजू महिलांपर्यंत आपल्याला मदत पोचविता येईल.

Tuesday, 6 October 2020

शालिनी

शालिनी मला भेटली तेंव्हा २० वर्षांची होती. बारीक, मध्यम बांधा, सावळी आणि स्मार्ट अशी शालिनी १२ वी पर्यंत शिकलेली होती. वडिलांची दिंडोरी जवळ थोडीफार शेती होती. आई, वडील, २ भाऊ आणि ती स्वतः असं कुटुंब. शेतीच्या उत्पन्नात सर्व कुटुंब सुखानी जगात होते. शालिनीला १२ वी नंतर पुढे शिकवायच नाही, हे आई-वडिलांचं ठरलेलं होतं. वेळ घालवायला तिने २ वर्षाचा शिवण क्लास लावला. क्लासचं एक वर्षं जेमतेम झालं असेल आणि शालिनीला शेजारच्या गावातून लग्नासाठी मागणी आली. 'अजून तर महिन्या भारापुर्वीच तिला २० व वर्षं लागलाय. एवढी घाई कशाला करायची? शिवणाच्या क्लासची २ वर्षांची फी भरली आहे. अजून जवळ-जवळ एक वर्षं बाकी आहे. तो क्लास पूर्ण होऊ दे मग लग्नाचं बघू.' असं घरातील सगळ्यांचच मत होतं. पण दोन दिवसांत परत निरोप आला. त्यांना दोन महिन्यात लग्न उरकायचं होतं. स्थळ चांगलं होतं. मुलगा डॉक्टर होता. सरकारी दवाखान्यात नोकरीला होता. घरची शेती होती. मोठं घर होतं. त्याच्या पेक्षा मोठ्या दोन बहिणीचं लग्न झालं होतं. धाकटा भाऊ शिकत होता. मुलाची आई झेड.पी. च्या शाळेत शिक्षिका होती. शोधून पण असं स्थळ मिळालं नसतं. काय करावं? इतकं चांगलं चालून आलेल्या स्थळाला नकार देणं म्हणजे मूर्खपणाचंच ठरेल. बऱ्याच विचारा अंती, शालिनीच्या वडिलांनी होकार कळवला.

'देण्या-घेण्या ची बोलणी करायला कधी भेटायचं? साखरपुडा आधी करायचा का? कधी करूया?' असे विविध प्रश्न घेऊन माधवराव (शालिनीचे वडील) शंकररावांना (नवर्या मुलाचे वडील) भेटायला गेले. शंकररावांनी त्यांचं आगत-स्वागत केलं. 'अहो, कसलं देणं-घेणं आणि कसला साखरपुडा? सगळे विधी लग्नातच उरकूया. मुलगा शिकलेला आहे, कमावता आहे, देवाच्या कृपेनी आमच्या कडे गरजेपेक्षा जास्तच आहे. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. लग्नात फक्त मुलगी आणि नारळ द्या. लग्न साधेपणानी करू. तुमची २०-२५ माणस आमच्या कडची पण तेव्हढीच असतील. तुमच्या लोकांचे मन-पान तुम्ही सांभाळा आमचे नातेवाईक आम्ही सांभाळू!' असं म्हणत १० मिनिटात लग्नाची बोलणी उरकली. माधवरावांचा तर स्वतःच्या कानावर आणि नशिबावर विश्वासच बसत नव्हता. दोन महिन्या नंतरची तारीख ठरली. पंचक्रोशीतल स्थळ, समजूतदार आणि साधी माणस, त्यांना पैशाचा लोभ नाही. गावात शेजारी-पाजारी चौकशी केली तर सगळीकडून त्यांच्याबद्दल चांगलंच कानावर आल. शालिनी किती नशीबवान आहे असं सर्वाना वाटलं. आईंनी तर 'शालिनी, तू नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी पुण्य्याच काम केलं अशील म्हणून इतकं चांगलं स्थळ मिळालं.' असं म्हणत मागच्या जन्माला पण क्रेडीट देऊन टाकलं!

ठरल्याप्रमाणे लग्न साधेपणानी पार पडलं. (ह्या सगळ्या प्रकारात ना शालिनीच मत विचारलं किंवा नवर्या मुलाचं! मुलगातर डॉक्टर होता, कमवता होता पण लग्नाच्या निर्णयात मुलांना विचारायची गरज नाही. आमच्यात तशी पद्धत नाही, असं विधान केलं कि संपलं!) शालिनीची  वाजत-गाजत सासरी पाठवणी झाली. आठवड्याभरात पहिल्या मुळाला शालिनी माहेरी आली. ती थोडी गप्प-गप्पच होती. आईंनी (शांताबाईनी ) काळजीने विचारले,'काय ग सगळं ठीक ना? घरातले सगले कशे आहेत? सासू-सासरे सगळ्यांचा स्वभाव कसा आहे? आणि महत्वाचं, डॉक्टर काय म्हणतायत?'

शालिनीने तुटक उत्तर दिलं,'कोणी काही म्हणत नाहीये. सगळे मजेत. ह्यांचा स्वभाव माहित नाही. त्या घरी गेल्यापासून मला ते भेटले नाहीत कि बोलले नाहीत. खरं सांगायचं तर मला ते दिसलेच नाहीत.'

शांताबाई शालीनिकडे बघतच राहिली . त्यांना क्षणभर काय बोलावं काही सुचेना. त्यांच्या मनात एक भीती घर करू लागली. 'जावई असं का वागत असतील. नवीन लग्न झालं आहे आणि तो माझ्या मुलीच्या जवळ पण आला नाही. किंबहुना तिला टाळतोय कि काय असं वाटतंय. काही काळजीच कारण तर नसेल ना?' तिने मनात आलेले निगेटिव विचार बाजूला सारत शालिनीला विचारलं,'अग, लग्न घर आहे. घरात माणस, पाहुणे असतील. असं जवळ येणं, बर दिसत नाही असं विचार केला असेल, जावयांनी.'

शालिनी तुटकपणे 'असेल' असं म्हणाली आणि निघून गेली. पुढे दोन दिवसांच्या मुक्कामात तिने सासर, सासरची माणस, जावई, त्यांचं वागणं हे सर्व विषय टाळले. दोन दिवसांनी सासरहून घ्यायला कोणीच आल नाही. हे तिला आणि तिच्या आईला खटकलं, पण वडिलांनी 'जावईबापू गडबडीत असतील. रजा मिळाली नसेल' अशी कारण सांगून वेळ मरून नेली. शांताबाईनी पाठवणीची तयारी केली आणि माधवराव मुलीला सासरी सोडून आले.

८-१० दिवसांत दुसऱ्या मुळच्या निमित्ताने शालिनी माहेरी आली. ह्या वेळेस ती आधीपेक्षा पण गप्प होती. ती धड कोणाशी बोलत नव्हती कि जेवत नव्हती. तिची तब्येत पण खराब झाली होती. चेहेरा निस्तेज झाला होता, वजन उतरलं होतं. तिला कशात काहीच इंटरेस्ट नव्हता. दोन दिवसांनी सासरी जायची वेळ झाली. ह्या खेपेला पण कोणी घ्यायला आला नाही. वडील कर्तव्य म्हणून 'मी सोडायला जातो 'म्हणाले. ह्या वेळेस शांताबाई हिम्मत करून म्हणाल्या," काहीतरी चुकतंय. पंधरा दिवसांत मुलीचं आयुष्य पार बदलून गेलं. मला तर शालीनिकडे बघवत नाहीये. काय अवस्था झाली आहे तिची? कुठेतरी काहीतरी चुकतंय. बिनसलय. काय ते कळत नाहीये. ते जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली पोर त्या घरात कशी पाठवायची?"

त्या दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर माधवराव आणि शांताबाई त्यांच्या मुलीला घेऊन बसले. माधवरावांनी विचारलं," शालिनी, सासरी काही त्रास आहे का? कोणी काही तुला बोललं का? तू सासरी खुश नाहीयेस हे जाणवतंय. पण नेमकं काय झालाय हे तू बोलल्या शिवाय आम्हाला कस कळेल? तू बोल. सांग काहीतरी."

शालिनी आपली गप्प बसलेली. आई-वडिलांनी तिला बोलतं करायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशीची शालीनीची पाठवणी दोन दिवस पुढे ढकलली. २४ तास उलटले. शालिनी काहीच बोलेना. शेवटी शांताबाईनी त्यांचं हुकमी पान वापरायचं ठरवलं. 'इमोशनल ब्लाकमैल'. त्यांनी सकाळी उठल्यापासून सगळ्यांशी बोलणं बंद केलं. नाश्ता, जेवण बंद. त्याचा उपयोग झाला. शालीनिनी त्यांचापाशी लग्न झाल्यापासून काय-काय घडलं ते सांगितलं. 'लग्न करून शालिनी सासरी गेली. पहिले ३ दिवस घरात खूप पाहुणे होते. घरातील बायका एकीकडे आणि पुरुष दुसऱ्या खोलीत झोपत होते. चौथ्या दिवसापासून सचिनने (तिच्या नवऱ्याने) रात्रीची ड्युटी मागून घेतली. दिवसा मित्र, झोप आणि रात्री हॉस्पिटल. मला ह्या वागण्याचा त्रास होत होता. पण घरात बाकी कोणालाच हे चुकीचं आहे असं वाटत नव्हतं. मी सांगणार तरी कुणाला होते. तुम्ही इतक्या उत्साहानी माझं लग्न लावलंत. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्नं पाहिली आहेत. ह्याचं हे असं वागणं कळल असत तर तुम्हाला काय वाटलं असत?

मागच्या आठवड्यात मी गेले तेंव्हा सासूबाईंना मी हे सगळं सांगितलं. त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मी ह्यांच्या वडिलांशी पण बोलले. तेंव्हा ते म्हणाले, 'जे झालं त्यातून सावरायला त्याला थोडा वेळ लागेलच. सचिन मनाचा खूप हळवा आहे. सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धर आणि त्याला समजून घे.' मला ह्याचा अर्थ कळला नाही. मी इकडे येण्या आधी ह्यांना विचारलं,'नेमका काय प्रोब्लम आहे? तुम्हाला मी आवडत नाही का? तुमच्या इत्छेविरुद्ध लग्न झालं आहे का? काय असेल ते मला खरं-खरं सांगा. माझ्यापासून काही लपवू नका.' माझ्या ह्या बोलण्यानी ते आश्वस्त झाले. त्यांनी माझा हात हातात धरला आणि त्यांच्या मनातल्या भावना भरा-भर बोलू लागले.' शालिनी, मला माफ कर. माझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्याची बरबादी झाली आहे. आमच्या हॉस्पिटल मध्ये सुवर्णा (नर्स) काम करते. आमची चार वर्षांपासूनची ओळख आहे. आमचं प्रेम आहे, एक-मेकांवर. आम्ही मंदिरात माळा घालून लग्न केलं. चार महिन्यां पूर्वी माझ्या आई-वडिलांना ते कुठून तरी समजलं. त्यावरून घरात खूप भांडणं झाली. घरात सुवर्णाचा कोणीच स्वीकार करायला तयार नव्हतं. वडील म्हणाले प्रकरण हाताबाहेर जाण्या आधी सचिन साठी चांगली मुलगी बघून लग्न उरकून टाकू. मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, घरची परिस्थिती बेताची असली तरी चालेल. एकदा का लग्न झालं कि मग सगळं ठीक होईल. घरात माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं. कोणी माझ्याशी चार वाक्य बोलत नव्हते. तुझी माहिती घेऊन वडील जेव्हा घरी आले तेंव्हा मी लग्नाला विरोध केला होता. मी घरातल्यांना कल्पना दिली होती कि ह्या सर्व भानगडीत तुझं आयुष्य बरबाद होईल. माझं  कोणी काहीच ऐकलं नाही. उलट मला घरात कोंडून ठेवलं. मी काहीतरी करेन किंवा तुझ्या वडिलांना भेटून खर्या परिस्थितीचा अंदाज देईन ह्या भीतीने वडिलांनी आपलं लग्न साधेपणानी आणि घाईत उरकलं.

तू एक चांगली मुलगी आहेस. माझ्या आई-वडिलांच्या मूर्खपणाचा बळी झाली आहेस. मला तुझं आयुष्य आणखीन खराब करायचं नव्हतं. म्हणून मी तुझ्या पासून लांब रहात होतो.'

हे बोलायचे थांबले. मला समजत नव्हतं कि आपण हसावं कि रडावं? त्यांच्यावर चिडावं कि त्यांचे आभार मानावेत. आई मला सांग ना, नशिबानी माझ्याशी हा क्रूर खेळ खेळला आहे, ह्याचा दोष कुणाला देऊ? मी सासरी जाऊन पण काही साध्य होणार नाही आणि न गेल्यानी कोणाला फरक पडणार नाही. आई-बाबा आता तुम्हीच सांगा मी काय करू'? शालिनीच्या डोळ्यात पाणी होतं पण चेहेऱ्यावर काही भाव नव्हता!

दुसऱ्या दिवशी माधवराव, शंकररावांना भेटायला गेले. शंकरराव बोलले चांगलं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारे काही मदत करण्यात असमर्थता दर्शविली. त्यांनी मन मोठं करून सांगितलं कि,'हे शालीनिचच घर आहे. ती आमच्या घरची सून आहे. तिला तुम्ही केव्हाही पाठवून द्या. तिचं इथे स्वागतच आहे.'

शंकररावान साठी विषय संपला होता. पण हि माधव्ररावांसाठी चिंतेची बाब होती. घरी आल्यावर सगळ्यांनी बसून शालिनीला त्या घरी परत पाठवायची नाही हे एकमतानी ठरवलं.

माधवरावांना महिला हक्क संरक्षण समितीच्या कामाची माहिती होती. त्यांनी ८-१० दिवसांनी समितीच्या ऑफिस मध्ये रीतसर तक्रार नोंदवली. आम्ही आमच्या नियमानुसार डॉक्टर सचिन ह्यांना कार्यालयात बोलावलं. त्यांनी भेटायला येण्याचं कबूल केल्याप्रमाणे ते ८ दिवसांत येऊन भेटून गेले. त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांनी शालीनीवर अन्याय झाल्याचंपण कबूल केलं. 'ह्या सगळ्याबद्दल शालिनीला नुकसान भरपाई द्या आणि विषय संपवा (कारण माधवरावांना तेच हवं होतं) असं सुचवलं. त्या दिवशी डॉक्टरांनी 'विचार करून कळवतो' असं सांगितलं आणि नंतर आमच्याशी सर्व संपर्क थांबवला. ना भेटायला आले, ना आमच्या पत्राला लेखी उत्तर दिलं, नाही कोणाकडून निरोप पाठवला. शेवटी कोर्टात जाऊन न्याय मागायचं ठरलं.

शालीनिनी खावटीसाठी कोर्टात अर्ज केला. कोर्टाच्या कामाला वेळ लागतोच. त्याच प्रमाणे शालीनीची केस पण हळू-हळू पुढे सरकत होती. पहिली नोटीस, मग त्याच्या कडून नोटीसला उत्तर. मग त्याच्या उत्तरातील काही मजकूर आपल्याला मान्य नाही म्हणून परत नोटीस. हाच खेळ वर्षभर चालला. वर्षं सव्वा वर्षांनी केस बोर्डावर आली.(म्हणजे कोर्टातली पहिली तारीख मिळाली). त्यानंतर कधी त्याचा वकील गैरहजर तर कधी हिचा वकील गैरहजर. कधी डॉक्टरचा रजेचा अर्ज! सर्व हजर असले तर साहेब रजेवर.असं करत-करत साधारण अडीच वर्षांनी (केस दाखल केल्या दिवसापासून) साक्षी पुरावे, जाब-जबाब ह्याला सुरुवात झाली. अखेरीस शालिनीच्या साक्षी साठी एक तारीख ठरली. तारखेच्या आधी दोन दिवस वकिलांनी शालिनीला बोलवून घेतलं आणि एक कागद वाचायला दिला. त्यात लिहिलेला मजकूर वाचून शालिनीला काहीच अर्थबोध होईना. त्यावर वकिलांनी शांतपणे सांगितलं,'उद्या कोर्टात साक्षीच्या वेळेस तुला हे बोलायचं आहे.'

'अहो, वकीलसाहेब! असं काहीच घडलं नाही. माझा नवरा बाहेरख्याली नव्हता. लग्ना आधी त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्याला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाखाली त्याने लग्न केलं. त्यांनी मला कधी उपाशी ठेवलं नाही आणि मारहाण पण केली नाही'.

'अहो शालिनीताई, कोर्टात न्याय हवा असेल तर थोडा खोटं बोलावं लागतं. माधवराव, समजवा तुमच्या मुलीला.'

अपेक्षे प्रमाणे आई-वडिलांनी शालिनीला खूप समजावलं. 'त्यांनी तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं आहे. त्यांना अद्दल घडवायची आणि न्याय मिळवायची हि शेवटची संधी आहे. ती वाया घालवू नकोस.'

दुसऱ्या दिवशी कोर्तच कामकाज सुरु झालं. आज सर्व जण हजर होते. म्हणजे केस चालणार. आश्चर्य म्हणजे पहिला पुकारा शालिनीच्या केसचा झाला. शालिनी साक्ष द्यायला सांगितलेल्या जागी उभी राहिली. तिच्या वकिलांनी बोलायला सुरुवात केली. कालच्या कागदावर लिहिलेल्या बाबी तो कोर्टात मांडत होता. अधून मधून डॉक्टरचा वकील त्यातील काही मुद्दे अमान्य असल्याचे त्याच्या हावभावातून निदर्शनास आणत होता. शालिनीचा वकील तिला काही प्रश्न विचारत होता. तिचं त्याकडे लक्षच नव्हतं. शालीनिनी कोर्टात बसलेल्या लोकांकडे पाहिलं. समोर खाली मान घालून बसलेला डॉक्टर तिला दिसला. त्या क्षणी तिच्या लक्षात आल कि तिचं ह्या माणसाशी काहीच भांडण नाहीये. तिला त्याचा कडून एकच आश्वासन हवं होतं,' जो पर्यंत शालिनी स्वतःच्या पायावर उभी रहात नाही, काही कमवत नाही, तोपर्यंत त्याने तिला खावटी द्यावी.'

जज साहेबांनी 'तुम्हाला हे मान्य आहे का?' असा प्रश्न विचारला, ज्यांनी ती भानावर आली.

तिने हात जोडून तिचं म्हणणं मांडण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तिनी मांडलेले मुद्दे ऐकून सगळेच अवाक झाले. ती म्हणाली," साहेब, हे वकील साहेब म्हणतात तसं काहीपण झालं नाहीये. ह्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाला बळी पडून तो लग्नाला तयार झाला. ह्या नात्याचा त्यांनी कधीपण गैरफायदा घेतला नाही. तो बाहेरख्याली नाही. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. मला अशा परिस्थितीत त्याच्या सोबत राहण्याची इच्छा नाही. माझी, कोर्टाला एकच विनंती आहे. मी माझ्या वडिलांवर अवलंबून राहू इच्छित नाही. मी स्वताचा खर्च स्वतः भागवू शकत नाही तोपर्यंत त्यांनी मला खावटी द्यावी. मी चार पैसे कमवायला लागले कि खावटी बंद करायचा स्वतः अर्ज करीन."

शालिनीच्या केसचा साहेबांनी दोन दिवसांत निकाल दिला. तिला खावटी मंजूर झाली. महत्वाचं म्हणजे पुढे दीड वर्षात शालिनीला नोकरी मिळाली. तिने खावटी बंद करायचा अर्ज कोर्टात दिला.

Tuesday, 8 September 2020

लग्नाची बैठक

महिला हक्क संरक्षण समितीचं काम करताना अनुभवातून खूप शिकले, समाजाबद्दल त्यातील मान्यता आणि रूढी ह्या बद्दल. मानापमानाच्या कल्पना, लग्नाच्या बैठका, बस्ता बांधणे, देणे घेणे, अश्या अनेक गोष्टी! मी ज्या घरात लहानाची मोठी झाले(माझ्या माहेरी) आणि लग्न करून ज्या घरी आले(माझ्या सासरी) त्या दोन्ही घरात ह्या बद्दल कधी कुठल्याच प्रकारे काही ऐकायला मिळालं नसतं. लग्नाची बैठक म्हणजे काय असं विचारल्यावर ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यांनी पाहिलं. खर म्हणजे त्यांच्या चेहेर्यावरचा भाव अविश्वासाचा होता, कारण अश्या बैठकी शिवाय माझं लग्न कस झालं हा त्यांना पडलेला प्रश्न. माझ्या आयुष्यात हा विषय आला तो आर्या आणि अश्विन मुळे.

एक दिवस दोन तरुण मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, ऑफिसमधे आले. बराच वेळ दारातच घुटमळत उभे होते. ऑफिसमधील थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यातील मुलगा हिम्मत करून पुढे आला आणि म्हणाला," आम्हाला अध्यक्षांना भेटायचं आहे."

"अध्यक्ष आज येणार नाहीत. तुझं काय काम आहे ते आम्हाला सांग. बघूया, आम्ही तुला काही मदत करू शकतो का ते" असं म्हणत मी त्याला माझ्या समोरील रिकाम्या खुर्चीत बसायला खुणावलं. खुर्चीत बसतांना त्यांनी त्याच्या सोबत आलेल्या मुलीला येऊन बसायला खुणावलं. दोघं बसल्यावर मुलांनी बोलण्यास सुरुवात केली.

"ताई, मी अश्विन आणि हि आर्या! आम्ही जुन्या नाशकात रहातो. आमची घरं शेजारी शेजारी आहेत. आर्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आणि मी फायनल इयरला आहे. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. ताई, आम्हाला मदत करा."

मी विचार केला, ज्या अर्थी मुलं संस्थेची मदत मागतायत त्या अर्थी एक तर त्यांच्या लग्नाला घरातून विरोध तरी असेल किंवा त्यांच वय बघता त्यांनी घरी विचारलंच नसेल. अश्या वेळेस काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं असत. कायद्याच्या परिभाषेत ते सज्ञान आहेत का? मुलाचं वय २१ पूर्ण आणि मुलीचं वय १८ पूर्ण आहे का? मग पुढचे प्रश्न. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक इ. त्याबद्दलचे मी त्यांना काही प्रश्न विचारले:

घरी आईवडिलांशी किंवा घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी ह्या बाबतीत बोलायचा प्रयत्न केला आहे का? त्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं कि तुम्हाला वाटतंय?

तुम्ही लग्न केल्यावर राहणार कुठे, खाणार का? उत्पन्नाचं काही साधन आहे का?

एकमेका व्यतिरिक्त तुम्हाला इतर लोकांची गरज भासेल-बोलायला,शेयर करायला, अडचणीत मदत मागायला. आपल्या लक्ष्यात येत नाही पण आपण खूप लोकांवर अवलंबून असतो. दोघांनीच जगणं सोपं नाहीये. तुम्ही ह्याचा विचार केला आहे ना?

माझ्या प्रश्नांना उत्तर म्हणून अश्विन बाहेर गेला आणि एका पन्नाशीतल्या गृहस्थाना घेऊन आला.

"ताई, हे आर्याचे मामा आहेत. त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो. ते मंदिरात आमचं लग्न लाऊन देणार आहेत. व नंतर सुरतला त्यांच्या मित्राकडे राहायची सोय करणार आहेत."

मामा एक खुर्ची घेऊन अश्विनच्या शेजारी बसले. त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीतून आर्या आणि अश्विनचा जन्माचा दाखला काढला. मुलं कायद्यांनी सज्ञान आहेत हे त्यावरून निश्चित झालं. मामा म्हणाले,"ताई, आता काय सांगायचं? दोन्ही कुटुंबांची गेल्या २५ वर्षांची ओळख आहे. ह्या दोन्ही मुलांचे वडील एकाच कंपनीत गेली अनेक वर्षं एकत्र काम करतात. दोन्ही कुटुंबाचा खूप घरोबा आहे. मुलं एकत्र खेळली वाढली. आता वयात आल्यावर प्रेमात पडली. मीच त्यांना सांगितलं आधी शिक्षण पूर्ण करा, चार पैसे कमवायची अक्कल येऊ दे मग बघू लग्नाचं! घाई काय आहे?

मुलानीपण माझं ऐकलं. पण कुठून कोणास ठाऊक, आर्याच्या आईला कुठूनतरी ह्यांच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल. मग काय तिने घरात गोंधळ घातला. आर्याला विचारून ती खरं काय ते सांगत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिचा पवित्रा बदलला. तिने हे शैक्षणिक वर्षं संपल कि आर्याच लग्न उरकायचं ठरवलं. तिने मला विश्वासात घेऊन सांगितलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नाहीये. ताई, तिचा ह्या लग्नाला का विरोध आहे हेच कळत नाहीये. अश्विन पुढच्या वर्षी इंजिनिअर होईल. माझ्या इतक्या ओळखी आहेत. त्याला कुठेही काम मिळेल. २०-२५ वर्षांची ओळख आहे, आमची जात एक आहे. मला तर विरोध करण्यासाठी एक पण पटेल असं कारण दिसत नाहीये. मी मुलांना सर्व मदत करायला तयार आहे. मी सर्व तयारी केली आहे. फक्त लग्न तुमच्या सल्ल्यांनी आणि मदतीनी व्हावं असं मला वाटतं. मुलांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा."

आमच्या परिचयातल्या वकिलांच्या सल्ल्याने आर्या आणि अश्विनच लग्न, मामांच्या उपस्थितीत मंदिरात लागल. कोर्टात लग्नाची नोंदणी केली. ह्या सगळ्याची पोलीस स्टेशनला नोंद केली (कारण तरुण मुलगा आणि मुलगी घरातून गायब झाले कि त्यांचे पालक सर्वप्रथम त्यांची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. आज ना उद्या हि मुलं पोलिसांना सापडतात आणि मग ते त्यांना पालकांच्या ताब्यात देतात.) आणि मामांच्या मदतीने नवदाम्पत्य सूरतसाठी रवाना झालं.

ह्या गोष्टीला दिडेक महिना झाला असेल. रोजच्या केसेसच्या गडबडीत आम्ही आर्या,अश्विन आणि त्यांचं लग्न विसरलो होतो. एक दिवस अचानक आर्याच्या मामांचा कळवायला फोन आला कि 'मुलं एका आठवड्या पूर्वीच नाशिकला आली आहेत. दोघं आपापल्या घरी आहेत. आता दोघांचे आईवडील त्यांच्या लग्नाला मान्यता द्यायला तयार आहेत. पण दोन्ही कुटुंबांच म्हणणं आहे कि समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणे, देवा धर्माच्या साक्षीने हे लग्न व्हावं.'

मी विचारलं 'मुलं नवरा-बायको सारखे एकत्र राहून आलेत आणि आता हे लग्नाचं काय मधेच. पण एक गोष्ट चांगली आहे घरातील सगळ्यांना हे लग्न मान्य आहे. का...."

मामानी मला मधेच थांबवलं. 'ताई, अश्विनच्या वडिलांना रीतसर लग्नाची बोलणी करायची आहेत. देणं-घेणं, मान-पान, हुंडा किती देणार? बस्ता कुठे बांधायचा? असं सगळं ठरवायचं आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या घरी बैठक आहे. ताई, तुम्ही प्लीज या. नाहीतर काहीतरी राडा होईल. मी तुम्हाला घ्यायला येतो.'

मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन बंद केला. (त्या काळी फक्त लेंन्डलाईन फोन होते. माझ्या कडे मामांचा नंबर नव्हता.) मला अक्षरशः घाम फुटला! लग्नाची बोलणी करायला मी जाणार? ३२-३३ वर्षांची मी, माझं कोण ऐकणार. मी आज पर्यंत कधी असा कार्यक्रम बघितलेला नाही, अनुभवलेला नाही. मी तिथे जाऊन काय बोलणार? मला काही सुचेना. घशाला कोरड पडत होती. ते सगळ टाळण्यासाठी काही कारण पण सुचत नव्हतं. मी एरवी पेक्षा खूप जास्त पाणी पीत आहे आणि अस्वस्थ आहे हे शांताबाईंच्या (ऑफिसमधील मदतनीस) लक्षात आल. तिने हळू आवाजात विचारलं, 'ताई, काय होतय?' मी तिला थोडक्यात ५.३० वाजता येणाऱ्या संकटाची कल्पना दिली. तिने माझ्या सोबत येण्याची तयारी दर्शविली. त्या दिवशी मला तिचा खूप आधार वाटला.

ठरल्या प्रमाणे मामा आले आणि आम्ही सो काल्ड लग्नाची बोलणी करायला गेलो. आर्याची आई आणि मामा यांचं खूप काहीतरी म्हणणं होतं. आतल्या खोलीत नेऊन ते मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगत होते, 'ताई, काहीही झालं तरी हुंडा देऊ असं कबूल करू नका. मुलांनी आधीच लग्न केलंय. आता कशाचा हुंडा?' मी काही बोलणार तेवढ्यात पुढच्या खोलीतून कोणीतरी बोलवायला आला. 'ताई, बाहेर सगळे जमलेत. तुम्हाला बोलावलं आहे.'

बैठक बसली होती त्या खोलीत जाऊन पाहिलं आणि माझं टेन्शन अजूनच वाढलं. तिथे बहुतेक सगळे (बायका आणि पुरुष) माझ्यापेक्षा वयाने २०-२५ वर्षांनी तरी मोठे होते. धोतर-टोपी-सदरा घातलेले पुरुष आणि नऊवारी साड्या नेसलेल्या बायका! सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा जणूकाही विचारत होत्या, हि पोर हा प्रश्न सोडवणार?

मी सगळ्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं. त्यामुळे मला विचार करायला थोडा अवधी मिळाला. सर्व लग्नाची बोलणी हुंड्याच्या पाशी येऊन अडकली होती. मुलाचे वडील म्हणत होते कि, 'आर्याच्या वडिलांनी १५०००/- रुपये हुंड्यासाठी बाजूला ठेवले आहेत. (हि घटना १९८७-८८ सालची आहे).ते त्यांनी आम्हाला द्यावेत. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं होतं कि 'मुलांनी पळून जाऊन लग्न केलंय, तर आता देण्या-घेण्याचा विषय येतोच कुठे?'

मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वजण माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. मी जो निर्णय देईन तो सर्वाना मान्य असणार होता. त्या क्षणाला मला अचानक स्वतःबद्दल खात्री वाटायला लागली. कशानीतरी माझा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळे असेल, मी करत असलेल्या कामामुळे असेल, त्यांनी मला दिलेल्या महत्वामुळे असेल. मी थोडा विचार केला. मुलांसाठी हे लग्न होणं गरजेचं होतं.(त्याला मान्यता मिळणं). हुंड्याची प्रथा मला स्वतःला मान्य नव्हती. पण माझा अनुभव मला शिकवत होता कि कधी कधी पैशांनी नाती घट्ट होतात आणि टिकतात. आर्याच्या वडिलांकडे १५०००/- रुपये तिच्यासाठी ठेवलेले होते. जे नंतर तिलाच मिळतील ह्याची खात्री नव्हती. सर्व बाजूनी विचार करून मी सांगितलं,

"अश्विनचे वडील जे म्हणतात ते मला पटतंय. आर्याच्या वडिलांनी तिच्यासाठी बाजूला ठेवलेले १५०००/- रुपये द्यावेत." मी क्षणभर सर्वांच्या प्रतिक्रिया बघायला थांबले. मुलाकडील लोकात आनंदाचे वातावरण तर मुलीकडील लोकांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मामानी तर, 'ताई पण....' असं म्हणायला सुरुवात केली होती. मी त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं, "मग हे सर्वाना मान्य आहे?"

मुलाकडून एका सुरात होकार आला. सगळे उठून जायला लागले. मी सर्वाना बसायची विनंती केली.

"थोडं सांगायचं राहून गेलं. पैसे द्यायचे ठरले आहेत, पण हे पैसे आर्या आणि अश्विन च्या नावाने १० वर्षांसाठी बँकेत डीपोझीट करा."

अचानक खोलीतलं वातावरण बदललं, मला जाणवलं. काही काळ कोणीच काहीच बोलेना. मी जे काही सांगितलं त्याचा अर्थ लक्षात यायला बहुतेक वेळ लागला असेल. कोणी काहीच बोलत नाही म्हणून मी निघायची तयारी केली. मुलीच्या आईवडील व मामा ह्यांचा निरोप घ्यायला वळले. माझ्या बोलण्याचा अर्थ मामांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि 'आम्हाला मान्य आहे ' असं मोठ्याने म्हणाले.आता अश्विनच्या वडिलांची वेळ होती. सगळे त्यांच्या उत्तराची वाट बघतायत हे त्यांना जाणवलं. नाईलाजाने त्यांनी पण दुजोरा दिला. सर्व जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खोलीतील वातावरण आता आनंदी झालं. आता लग्नाची तारीख, जागा, इतर देणी-घेणी,नवरदेवा साठीचे कपडे, नवरीचा शालू, अश्या अनेक मुद्यांवर एकदम चर्चा सुरु झाली. आर्या आणि अश्विननी माझे आभार मानले. 'लग्नाला मला न विसरता बोलवा' आणि मुलांच्या नावानी केलेली एफ.डी.आर. मला ऑफिस मधे आणून दाखवा, असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले.

दोन दिवसांनी मुलीचे मामा आणि मुलाचे वडील मला लग्नाचं आमंत्रण द्यायला आणि पैसे बँकेत ठेवल्याची पावती दाखवायला आले. लग्न ठरल्या प्रमाणे पार पडलं. आर्या आणि अश्विन आशीर्वाद घ्यायला ऑफिसमध्ये येऊन गेले.

माझ्या आयुष्यातील पहिली आणि (बहुदा) शेवटची लग्नाची बैठक मला समृद्ध करून गेली.