Monday 1 March 2021

 पती परमेश्वर!

आज सुदैवानी ऑफिसमध्ये गर्दी नव्हती. बरेच दिवसांनी आम्ही थोड्या निवांत बसलो होतो. तेवढ्यात ३ माणस, दोन बाया आणि एक बाप्या ऑफिसमध्ये आले. आत आल्या आल्या त्या गृहस्थांनी माझ्या समोरच्या खुर्चीत 'बसू का' विचारलं आणि मी होकाराथी मान हलवल्यावर, बसत स्वतःची ओळख करून दिली," ताई, मी केशव! मला आमच्या गावच्या पाटील साहेबांनी तुम्हास्नी भेटाया सांगितलं."

  "हो का? पण कुठून आलात? म्हणजे कुठल्या गावचे?" मी जरा त्यांच्या सारखं बोलण्याचा प्रयत्न करत विचारलं.

  केशव नामक गृहस्तांच्या चेहेऱ्यावर आश्चर्य होतं. "अहो ताई, मी म्हणजे आम्ही पाटलांच्या गावचे. हि माझी लेक-सुमन आणि हि माझी बायको."

  "केशवराव आता मला सांगा तुम्ही दोघं कुणच्या गावचे?"

  माझा हा प्रश्न ऐकल्यावर केशवराव मस्त मोकळ हसले आणि म्हणाले, "ते सांगितलंच नाही. आम्ही ताहाराबादचे. मी आणि ह्या दोघी पाटील साहेबांच्या भावाच्या शेतात मजुरी करतो. सुमनच्या लगीनाची थोडी भानगड झाली. साहेब म्हणल ताईना भेट. म्हणून आलो."

  केशव, एक मध्यम चणीचा माणूस. अंगात मळलेल धोतर आणि फाटका सदरा. डोक्यावर टोपी. उन्हातान्हात काम करून रापलेल शरीर. आर्थिक परिस्थिती बेताची असावी.आयुष्यभर कष्टाच काम केलंय हे वेगल्यांनी सांगायची गरजच नव्हती. ५०च्या आसपास वय असाव. त्यांची पत्नी सिंधू! अंगावर जूनी, मळकट ९ वारी साडी. केस विस्कटलेले, हाताने कसेतरी मागे सारलेले. डोक्यावर पदर. (जो एक क्षणपण ती खाली पडू देत नव्हती.) अंगानी बारीक, थकलेला चेहेरा. त्या उलट त्यांची मुलगी सुमन! १९-२० वर्षांची चुणचुणीत मुलगी. गावाकडच्या शाळेत १० वीपर्यंत शिकलेली.दिसायला सावळी, पण शिक्षण आणि लहान वयात चार पैसे कमवायला लागल्यामुळे येणारा एक आत्मविश्वास. चेहेरा हसरा आणि स्वभाव मोकळा.

  दोघींना बसायला सांगितलं आणि सुमनला उद्देशून विचारलं, "सुमन, काय प्रोब्लेम आहे. मला नीट सांग. आपण त्यातून काही तरी मार्ग काढू."

  सुमननी वडिलांकडे बघितलं. त्यांनी होकार दिल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.

  "ताई, माझं मागच्या वर्षी रमेश संग लगीन झालं. ते लोक मांगी-तुंगीकडचे. मालेगावमध्ये ते  (रमेश) एका ऑफिसात काम करतात. लग्न साधेपणानी झालं. माझ्या बा कडे द्यायला काहीपण नाही, ह्याची त्यास्नी कल्पना होती. बा नी मला कष्ट करून शिकवलं. मी पण कळाया लागल्यापासून त्यांच्या संग शेतात कामाला जाते. रमेश च्या बा च पण काहीबी मागणं नव्हतं. लगीन झालं आणि मी रमेश संग गेले. तिथे मी १०-१५ दीस राहिले आणि रमेश कामासाठी बाहेरगावी गेला. दोन दिसात येतो अस सांगून गेला. पण एक महिना झाला तरी आलाच नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. घरातील शिधा संपत आला. मला काळजी वाटायला लागली. कोणाला आणि कसं कळवू. किराणा दुकानाच्या मालकाकडे फोन होता. पण माझ्या बा कडे नव्हता. (खरं सांगायचं तर लग्ना आधी घर आणि शाळा, आणि नंतर घर आणि शेत ह्या पलीकडे जगच माहिती नव्हतं. बा सांगेल तसं वागायचं. कधी का विचारलं नाही. माझी १० विची परीक्षा झाली आणि मी पूर्ण वेळ मजुरीला जायला लागले. ८-१० महिने झाले असतील. शेतातले इतर मजूर बा ला सांगाया लागले,'केशवा, तुझी पोर मोठी झाली. आता तिचं लगीन कराया हवं. गावातील समदी माणस बरी आहेत पण कोणाच्या मनात कवा काय येईल काय सांगावं.' मग माझ्या बा नी चार लोकांच्या, नातेवाईकांच्या मदतीने स्थलं शोधायला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी माझं लगीन झालं.)

  काय करू? काही समजत नव्हतं. अचानक एक दिवस गावाकडे आमच्या शेजारी रहाणारा गणपत मला भेटला. मी त्याच्या हाती गावी निरोप धाडला. माझा बा गावातली दोन-चार शहाणी माणस घेऊन माझ्या सासरी गेला. (माझे सासू-सासरे मांगी-तुंगीला रहातात). तिथे त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानी घातला. सासर्यांनी फोनवर रमेश संग बोलणं केलं आणि तो दोन दिवसांत घरी आला. 'मी अशा पद्धतीने चार लोकांना सांगितल्या मुळे त्याची बदनामी झाली' ह्या कारणांनी तो माझ्यावर नाराज झाला. आधीच तुटकपणे वागत होता. आता तर संबंध आणखीनच बिघडले. कामापुरतं बोलायचा, आता ते पण बंद झालं. घरी फारसा थांबेनासा झाला. माझ्यावर कधी हात उचलला नाही, कधी भांडण नाही. एवढंच नाही तर कधी आवाज चढवून बोलला पण नाही. त्या दिवसा नंतर मला कधी काही कमी पडू दिल नाही. पण हा असा संसार काय कामाचा? माझं लगीन झालं तवा माझी माय मला म्हणली होती,"पोरी लगीन करून सासरी चालली आहेस. माणस, नाती सांभाळ. पती हा देव मानून सेवा कर".

  "ताई, मी ते पण केलं असत. पण तो देव माझ्यापाशी थांबाया तयार नाही. मी तरी त्याला हुडकत कुठे फिरू? तरी मी त्यांची वाट बघत तिथेच सहा महिने राहिले. एक दिस बा ला कोणीतरी सांगितलं, 'केशवा, तुझा जावई वेगळ्याच मुली संग म्या पाहिला. बजारात.'

परत माझा बा हातातलं काम सोडून माझ्या सासरी गेला. रमेशच्या बा नी त्याला फोन लावला. एकदा म्हणला 'लागत नाही, मग म्हणला उचलत नाही.' बा नी त्यास्नी इचारलं, 'जावई कुठे आहेत? सा महिने झालं माझी पोर तिकडे एकलीच रहाते.'

ह्यावर रमेशच बा म्हणालं,"केशवा, माझा पोरगा नोकरी करतो. त्याला कामावर जावं लागतं. घरला बसून कसं चालेल? सूनबाईला काही कमी पडत नाही ना? शिधा, कपडा समद देतो ना?'

"त्यांनी काय? हे समद तर माझ्या घरला पण होतं. रमेशनी तिच्या संग रहाया नको का? दादला हाय नव तिचा?" माझ्या बा च्या ह्या सवालावर त्यांच्या कडे काहीबी सांगाया नव्हत. बा तिथून माझ्या कडे आला आणि मला त्याच्या संग घरला घेऊन आला. मी माझ्या मायला विचारलं,"आय, लगीन करून मिळालेला देव दुसर्याच भक्ताकडे गेला, का आणखीन कुठे काही कळे ना. तर म्या काय करायचं?"

  बा नी माहिती खरी का खोटी हे बघितलं आणि मग जावयाला भेटाया गेला. (त्याचा, रमेशचा आत्ताचा पत्ता माझ्या सासर्याला माहित होता.) रमेशनी उडवा-उडवीची उत्तरं दिली. त्याच्या संग एक बाई रहाते आहे पण तो कबूल करत नाही कि ती त्याची बायको आहे. तो सांगतो घरातली बाई त्याची आतेबहीण आहे. ताई, ह्या अशा जगण्याला काय अर्थ आहे. हा असा कधी संसार असतो का? मी रमेशची बायको म्हणून नाही जगू शकत. मला मोकळ व्हायचं आहे."

  मी केशव कडे बघितलं. त्यांनी पण होकारार्थी मान हलवत सांगितलं, "ताई, आम्हास्नी आमची पोर मोकळी करायाची हाये."

  सुमन कडून तक्रार अर्ज लिहून घेतला आणि रीतसर कारवाई सुरु केली. अपेक्षेप्रमाणे रमेशनी आमच्या पत्रांची किंवा निरोपांची दखल घेतली नाही. पोलीस मिटींगला तो काहीतरी कारणाने गैरहजर राहिला. (बहुतेक वेळा आमचं पत्र मिळालं कि किंवा फोनवर निरोप मिळाला की, समोरची पार्टी त्यांचं  म्हणणं मांडायला आमच्या ऑफिसला येतात. पण काही केसेस मधे ते येत नाहीत. अशा लोकांना आम्ही पोलीस मिटींगला बोलावतो. दर महिन्याला पोलिसांच्या सहकार्यांनी अशी मीटिंग बोलावली जाते.) शेवटी सुमनला कोर्टात फारकतीचा दावा दाखल करायला सांगितलं.

  वकिलांनी नेहेमीचे प्रश्न विचारले. "फारकत का हवी आहे? नवरा मारहाण करतो का? पैशांची मागणी करतो का? उपाशी ठेवणं? सासुरवास असा काही प्रोब्लेम आहे का?"

  ह्या सगळ्याला सुमन कडून नकारार्थी उत्तर आल्यावर वकिलाचे पुढचे प्रश्न सुरु झाले. "तो शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही किंवा असमर्थ आहे का? त्याचं इतर कुठल्या बाई सोबत विवाह बाह्य संबंध आहेत का?"

  सुमन लगेच म्हणाली, "त्याचं एका बाई सोबत लफडं आहे."

  वकील पुढे म्हणाले, "मग ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला, म्हणजे तुला पुरावे गोळा करावे लागतील. त्यांना ह्या संबंधातून मुल-बाळ झालं असेल तर त्याचा जन्माचा दाखला. किंवा त्यांचा एक-मेकांना माळा घालतानाचा फोटो, असा काहीतरी ठोस पुरावा हवा."

  सुमन म्हणाली, "मुल-बाळ असण्याची शक्यता नाही पण त्याचं लगीन झालं आहे ह्याचं काही सापडतं का ते मी बघते."

  ("कोर्टात दावा दाखल वकील करतो. पण त्याला लागणारे कागदपत्र, पुरावे हे आपण गोळा करून द्यावे लागतात. तो ह्यातलं काहीपण करणार नाही." ह्याची सुमनला कल्पना दिली होती.)

  सुमन कामाला लागली. पुरावा शोधणं एवढं एकच ध्येय तिच्या आयुष्याचं असल्या सारखी! हे काम सोपं नाही ह्याची तिला पण कल्पना होती. वडिलांकडून तिनी रमेशचा पत्ता घेतला. (शेत मजुरी करणारा, अशिक्षित होता केशव पण तो ज्या पद्धतीने सुमनला खंबीरपणे साथ देत होता ते बघून मला त्याचं खूप कौतुक वाटलं.) पत्ता विचारत-विचारत ती रमेश रहात होता त्या सोसायटीत पोहोचली. बाहेरून चौकशी केली तेंव्हा तिला माहिती मिळाली की, 'रमेशच लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव संगिता आहे.' आता कोर्टात लागणारा पुरावा कसा मिळवायचा, ह्या विवंचनेत ती होती. २-३ वेळा वेग-वेगळ्या वेळेला तिने त्या घराबाहेर चक्कर मारली. तिच्या लक्षात आल की रमेश सकाळी १०.३० वाजता ऑफिसला जातो तो संध्याकाळी ६ वाजता येतो. दुसऱ्या दिवशी ती दुपारी ४ वाजता रमेशच्या घरी गेली. दारावरची बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे संगीतानी दार उघडलं.

  संगीताला बघून सुमननी सुरुवात केली," तू संगीता ना? संगीता वहिनी? किती गोड दिसतीयेस. अग तू मला ओळखत नाहीस. मी रमेशची आतेबहीण, सीमा. तुमच्या लग्नाला मी येऊ शकले नाही. अग आत तरी बोलावशील की नाही."

  "सॉरी, मी पण कशी वेनधळी. या ना सीमाताई, आत या ना." असं म्हणत ती सुमनला आग्रहाने घरात घेऊन गेली. कौतुकानी लग्नाच्या फोटोचा अल्बम दाखवत ती म्हणाली,"तुम्ही फोटो बघा. मी चहा टाकते."

  संगीता आत गेली. फोटोचा अल्बम बघताना तिच्या मनात एक विचार आला. हे फोटो वकिलाना चालू शकतील का? पुरावा म्हणून? तिच्या हातात विचार करत बसायला फार वेळ नव्हता. तिने अल्बम मधले तिला हवे असलेले दोन फोटो काढून घेतले आणि पर्स मधे ठेवले. तेवढ्यात संगीता चहा घेऊन आली तेंव्हा सुमन कौतुकानी फोटो बघत होती. चहा घेतला. १०१/- रुपयांचा आहेर केला आणि सुमन निघाली.

  सुमननी आणलेले फोटो कोर्टात रमेशच दुसरं लग्न सिद्ध करायला उपयोगी पडले. वर्षभरात तिच्या केसचा निकाल लागला. रमेशला शिक्षा झाली. सुमनला फारकत मिळाली. सुमनला न्याय मिळाला. पण हसरी, मोकळा स्वभाव असलेली सुमन पार बदलून गेली. ती जेंव्हा हे सांगायला आली तेंव्हा तिच्या चेहेऱ्यावर कोणताच भाव नव्हता.

  मी तिला जेंव्हा विचारलं,"सुमन, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस?"

  तेंव्हा ती शांतपणे म्हणाली," माझ्या माय-बापानी माझं लग्न करून मला एका देवाची सेवा करायला पाठवलं. पण त्या देवाला वेगळ्याच भक्ताची भक्ती भावली. मागील २-२.५ वर्षात माझ्याकडे पाठ ना फिरवणारा देव मला सापडला आहे. मी त्याची सेवा करायचं ठरवलं आहे."

  सुमननी ज्या शिताफिनी संगीताच्या नकळत तिच्या घरातून तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध पुरावा मिळवला, त्यांनी सुमनच्या बुद्धीची चुणूक दिसली. तिला शिक्षणाची संधी मिळाली असती तर?

  काही दिवसांनी निरोप आला सुमन महानुभाव पंथात गेली.

 

 

 

1 comment:

  1. काकू खुप छान लिहीलात लेख. Married life मध्ये किती बारकावे असू शकतात ना? ह्या सगळ्याची कल्पनाच नव्हती.

    ReplyDelete