Tuesday, 8 September 2020

लग्नाची बैठक

महिला हक्क संरक्षण समितीचं काम करताना अनुभवातून खूप शिकले, समाजाबद्दल त्यातील मान्यता आणि रूढी ह्या बद्दल. मानापमानाच्या कल्पना, लग्नाच्या बैठका, बस्ता बांधणे, देणे घेणे, अश्या अनेक गोष्टी! मी ज्या घरात लहानाची मोठी झाले(माझ्या माहेरी) आणि लग्न करून ज्या घरी आले(माझ्या सासरी) त्या दोन्ही घरात ह्या बद्दल कधी कुठल्याच प्रकारे काही ऐकायला मिळालं नसतं. लग्नाची बैठक म्हणजे काय असं विचारल्यावर ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यांनी पाहिलं. खर म्हणजे त्यांच्या चेहेर्यावरचा भाव अविश्वासाचा होता, कारण अश्या बैठकी शिवाय माझं लग्न कस झालं हा त्यांना पडलेला प्रश्न. माझ्या आयुष्यात हा विषय आला तो आर्या आणि अश्विन मुळे.

एक दिवस दोन तरुण मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, ऑफिसमधे आले. बराच वेळ दारातच घुटमळत उभे होते. ऑफिसमधील थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यातील मुलगा हिम्मत करून पुढे आला आणि म्हणाला," आम्हाला अध्यक्षांना भेटायचं आहे."

"अध्यक्ष आज येणार नाहीत. तुझं काय काम आहे ते आम्हाला सांग. बघूया, आम्ही तुला काही मदत करू शकतो का ते" असं म्हणत मी त्याला माझ्या समोरील रिकाम्या खुर्चीत बसायला खुणावलं. खुर्चीत बसतांना त्यांनी त्याच्या सोबत आलेल्या मुलीला येऊन बसायला खुणावलं. दोघं बसल्यावर मुलांनी बोलण्यास सुरुवात केली.

"ताई, मी अश्विन आणि हि आर्या! आम्ही जुन्या नाशकात रहातो. आमची घरं शेजारी शेजारी आहेत. आर्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आणि मी फायनल इयरला आहे. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. ताई, आम्हाला मदत करा."

मी विचार केला, ज्या अर्थी मुलं संस्थेची मदत मागतायत त्या अर्थी एक तर त्यांच्या लग्नाला घरातून विरोध तरी असेल किंवा त्यांच वय बघता त्यांनी घरी विचारलंच नसेल. अश्या वेळेस काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं असत. कायद्याच्या परिभाषेत ते सज्ञान आहेत का? मुलाचं वय २१ पूर्ण आणि मुलीचं वय १८ पूर्ण आहे का? मग पुढचे प्रश्न. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक इ. त्याबद्दलचे मी त्यांना काही प्रश्न विचारले:

घरी आईवडिलांशी किंवा घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी ह्या बाबतीत बोलायचा प्रयत्न केला आहे का? त्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं कि तुम्हाला वाटतंय?

तुम्ही लग्न केल्यावर राहणार कुठे, खाणार का? उत्पन्नाचं काही साधन आहे का?

एकमेका व्यतिरिक्त तुम्हाला इतर लोकांची गरज भासेल-बोलायला,शेयर करायला, अडचणीत मदत मागायला. आपल्या लक्ष्यात येत नाही पण आपण खूप लोकांवर अवलंबून असतो. दोघांनीच जगणं सोपं नाहीये. तुम्ही ह्याचा विचार केला आहे ना?

माझ्या प्रश्नांना उत्तर म्हणून अश्विन बाहेर गेला आणि एका पन्नाशीतल्या गृहस्थाना घेऊन आला.

"ताई, हे आर्याचे मामा आहेत. त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो. ते मंदिरात आमचं लग्न लाऊन देणार आहेत. व नंतर सुरतला त्यांच्या मित्राकडे राहायची सोय करणार आहेत."

मामा एक खुर्ची घेऊन अश्विनच्या शेजारी बसले. त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीतून आर्या आणि अश्विनचा जन्माचा दाखला काढला. मुलं कायद्यांनी सज्ञान आहेत हे त्यावरून निश्चित झालं. मामा म्हणाले,"ताई, आता काय सांगायचं? दोन्ही कुटुंबांची गेल्या २५ वर्षांची ओळख आहे. ह्या दोन्ही मुलांचे वडील एकाच कंपनीत गेली अनेक वर्षं एकत्र काम करतात. दोन्ही कुटुंबाचा खूप घरोबा आहे. मुलं एकत्र खेळली वाढली. आता वयात आल्यावर प्रेमात पडली. मीच त्यांना सांगितलं आधी शिक्षण पूर्ण करा, चार पैसे कमवायची अक्कल येऊ दे मग बघू लग्नाचं! घाई काय आहे?

मुलानीपण माझं ऐकलं. पण कुठून कोणास ठाऊक, आर्याच्या आईला कुठूनतरी ह्यांच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल. मग काय तिने घरात गोंधळ घातला. आर्याला विचारून ती खरं काय ते सांगत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिचा पवित्रा बदलला. तिने हे शैक्षणिक वर्षं संपल कि आर्याच लग्न उरकायचं ठरवलं. तिने मला विश्वासात घेऊन सांगितलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नाहीये. ताई, तिचा ह्या लग्नाला का विरोध आहे हेच कळत नाहीये. अश्विन पुढच्या वर्षी इंजिनिअर होईल. माझ्या इतक्या ओळखी आहेत. त्याला कुठेही काम मिळेल. २०-२५ वर्षांची ओळख आहे, आमची जात एक आहे. मला तर विरोध करण्यासाठी एक पण पटेल असं कारण दिसत नाहीये. मी मुलांना सर्व मदत करायला तयार आहे. मी सर्व तयारी केली आहे. फक्त लग्न तुमच्या सल्ल्यांनी आणि मदतीनी व्हावं असं मला वाटतं. मुलांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा."

आमच्या परिचयातल्या वकिलांच्या सल्ल्याने आर्या आणि अश्विनच लग्न, मामांच्या उपस्थितीत मंदिरात लागल. कोर्टात लग्नाची नोंदणी केली. ह्या सगळ्याची पोलीस स्टेशनला नोंद केली (कारण तरुण मुलगा आणि मुलगी घरातून गायब झाले कि त्यांचे पालक सर्वप्रथम त्यांची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. आज ना उद्या हि मुलं पोलिसांना सापडतात आणि मग ते त्यांना पालकांच्या ताब्यात देतात.) आणि मामांच्या मदतीने नवदाम्पत्य सूरतसाठी रवाना झालं.

ह्या गोष्टीला दिडेक महिना झाला असेल. रोजच्या केसेसच्या गडबडीत आम्ही आर्या,अश्विन आणि त्यांचं लग्न विसरलो होतो. एक दिवस अचानक आर्याच्या मामांचा कळवायला फोन आला कि 'मुलं एका आठवड्या पूर्वीच नाशिकला आली आहेत. दोघं आपापल्या घरी आहेत. आता दोघांचे आईवडील त्यांच्या लग्नाला मान्यता द्यायला तयार आहेत. पण दोन्ही कुटुंबांच म्हणणं आहे कि समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणे, देवा धर्माच्या साक्षीने हे लग्न व्हावं.'

मी विचारलं 'मुलं नवरा-बायको सारखे एकत्र राहून आलेत आणि आता हे लग्नाचं काय मधेच. पण एक गोष्ट चांगली आहे घरातील सगळ्यांना हे लग्न मान्य आहे. का...."

मामानी मला मधेच थांबवलं. 'ताई, अश्विनच्या वडिलांना रीतसर लग्नाची बोलणी करायची आहेत. देणं-घेणं, मान-पान, हुंडा किती देणार? बस्ता कुठे बांधायचा? असं सगळं ठरवायचं आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या घरी बैठक आहे. ताई, तुम्ही प्लीज या. नाहीतर काहीतरी राडा होईल. मी तुम्हाला घ्यायला येतो.'

मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन बंद केला. (त्या काळी फक्त लेंन्डलाईन फोन होते. माझ्या कडे मामांचा नंबर नव्हता.) मला अक्षरशः घाम फुटला! लग्नाची बोलणी करायला मी जाणार? ३२-३३ वर्षांची मी, माझं कोण ऐकणार. मी आज पर्यंत कधी असा कार्यक्रम बघितलेला नाही, अनुभवलेला नाही. मी तिथे जाऊन काय बोलणार? मला काही सुचेना. घशाला कोरड पडत होती. ते सगळ टाळण्यासाठी काही कारण पण सुचत नव्हतं. मी एरवी पेक्षा खूप जास्त पाणी पीत आहे आणि अस्वस्थ आहे हे शांताबाईंच्या (ऑफिसमधील मदतनीस) लक्षात आल. तिने हळू आवाजात विचारलं, 'ताई, काय होतय?' मी तिला थोडक्यात ५.३० वाजता येणाऱ्या संकटाची कल्पना दिली. तिने माझ्या सोबत येण्याची तयारी दर्शविली. त्या दिवशी मला तिचा खूप आधार वाटला.

ठरल्या प्रमाणे मामा आले आणि आम्ही सो काल्ड लग्नाची बोलणी करायला गेलो. आर्याची आई आणि मामा यांचं खूप काहीतरी म्हणणं होतं. आतल्या खोलीत नेऊन ते मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगत होते, 'ताई, काहीही झालं तरी हुंडा देऊ असं कबूल करू नका. मुलांनी आधीच लग्न केलंय. आता कशाचा हुंडा?' मी काही बोलणार तेवढ्यात पुढच्या खोलीतून कोणीतरी बोलवायला आला. 'ताई, बाहेर सगळे जमलेत. तुम्हाला बोलावलं आहे.'

बैठक बसली होती त्या खोलीत जाऊन पाहिलं आणि माझं टेन्शन अजूनच वाढलं. तिथे बहुतेक सगळे (बायका आणि पुरुष) माझ्यापेक्षा वयाने २०-२५ वर्षांनी तरी मोठे होते. धोतर-टोपी-सदरा घातलेले पुरुष आणि नऊवारी साड्या नेसलेल्या बायका! सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा जणूकाही विचारत होत्या, हि पोर हा प्रश्न सोडवणार?

मी सगळ्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं. त्यामुळे मला विचार करायला थोडा अवधी मिळाला. सर्व लग्नाची बोलणी हुंड्याच्या पाशी येऊन अडकली होती. मुलाचे वडील म्हणत होते कि, 'आर्याच्या वडिलांनी १५०००/- रुपये हुंड्यासाठी बाजूला ठेवले आहेत. (हि घटना १९८७-८८ सालची आहे).ते त्यांनी आम्हाला द्यावेत. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं होतं कि 'मुलांनी पळून जाऊन लग्न केलंय, तर आता देण्या-घेण्याचा विषय येतोच कुठे?'

मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वजण माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. मी जो निर्णय देईन तो सर्वाना मान्य असणार होता. त्या क्षणाला मला अचानक स्वतःबद्दल खात्री वाटायला लागली. कशानीतरी माझा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळे असेल, मी करत असलेल्या कामामुळे असेल, त्यांनी मला दिलेल्या महत्वामुळे असेल. मी थोडा विचार केला. मुलांसाठी हे लग्न होणं गरजेचं होतं.(त्याला मान्यता मिळणं). हुंड्याची प्रथा मला स्वतःला मान्य नव्हती. पण माझा अनुभव मला शिकवत होता कि कधी कधी पैशांनी नाती घट्ट होतात आणि टिकतात. आर्याच्या वडिलांकडे १५०००/- रुपये तिच्यासाठी ठेवलेले होते. जे नंतर तिलाच मिळतील ह्याची खात्री नव्हती. सर्व बाजूनी विचार करून मी सांगितलं,

"अश्विनचे वडील जे म्हणतात ते मला पटतंय. आर्याच्या वडिलांनी तिच्यासाठी बाजूला ठेवलेले १५०००/- रुपये द्यावेत." मी क्षणभर सर्वांच्या प्रतिक्रिया बघायला थांबले. मुलाकडील लोकात आनंदाचे वातावरण तर मुलीकडील लोकांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मामानी तर, 'ताई पण....' असं म्हणायला सुरुवात केली होती. मी त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं, "मग हे सर्वाना मान्य आहे?"

मुलाकडून एका सुरात होकार आला. सगळे उठून जायला लागले. मी सर्वाना बसायची विनंती केली.

"थोडं सांगायचं राहून गेलं. पैसे द्यायचे ठरले आहेत, पण हे पैसे आर्या आणि अश्विन च्या नावाने १० वर्षांसाठी बँकेत डीपोझीट करा."

अचानक खोलीतलं वातावरण बदललं, मला जाणवलं. काही काळ कोणीच काहीच बोलेना. मी जे काही सांगितलं त्याचा अर्थ लक्षात यायला बहुतेक वेळ लागला असेल. कोणी काहीच बोलत नाही म्हणून मी निघायची तयारी केली. मुलीच्या आईवडील व मामा ह्यांचा निरोप घ्यायला वळले. माझ्या बोलण्याचा अर्थ मामांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि 'आम्हाला मान्य आहे ' असं मोठ्याने म्हणाले.आता अश्विनच्या वडिलांची वेळ होती. सगळे त्यांच्या उत्तराची वाट बघतायत हे त्यांना जाणवलं. नाईलाजाने त्यांनी पण दुजोरा दिला. सर्व जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खोलीतील वातावरण आता आनंदी झालं. आता लग्नाची तारीख, जागा, इतर देणी-घेणी,नवरदेवा साठीचे कपडे, नवरीचा शालू, अश्या अनेक मुद्यांवर एकदम चर्चा सुरु झाली. आर्या आणि अश्विननी माझे आभार मानले. 'लग्नाला मला न विसरता बोलवा' आणि मुलांच्या नावानी केलेली एफ.डी.आर. मला ऑफिस मधे आणून दाखवा, असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले.

दोन दिवसांनी मुलीचे मामा आणि मुलाचे वडील मला लग्नाचं आमंत्रण द्यायला आणि पैसे बँकेत ठेवल्याची पावती दाखवायला आले. लग्न ठरल्या प्रमाणे पार पडलं. आर्या आणि अश्विन आशीर्वाद घ्यायला ऑफिसमध्ये येऊन गेले.

माझ्या आयुष्यातील पहिली आणि (बहुदा) शेवटची लग्नाची बैठक मला समृद्ध करून गेली.

Tuesday, 1 September 2020

सुखाची (रिकामी) ओंजळ

 आमची दुपारची जेवणाची सुट्टी झाली. रोजच्या सारखं आम्ही ऑफिसचे दार थोडं लोटून घेतलं. आम्ही जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात एक २०-२२ वर्षांची महिला/मुलगी ३ लेकरांना घेऊन आत आली. एक कडेवर आणि बाकीची दोघं असतील २ आणि ३ वर्षाची. अंगात मळकट, कळकट कपडे. कपडे म्हणण्या सारखं काही नव्हतं. खूप ठिकाणी फाटलेली साडी तिने कशीतरी स्वतःभोवती गुंडाळली (नेसली) होती. मुलं तर उघडी नागडी होती. त्या बाईची अवस्था बघवत नव्हती. शरीरावर खूप ठिकाणी मारल्याच्या जखमा, खुणा होत्या. कपाळावरची जखम ताजी होती. खोक पडली होती. त्यातून रक्त येत होतं. ती बाई इतकी बारीक, थकलेली आणि अशक्त होती, कि ती कशीतरी ऑफिसमध्ये आली आणि मटकन खाली बसली. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. आमच्या डब्यातून आधी तिला आणि तिच्या मुलांना खाऊ घातलं. चार घास पोटात गेल्यावर ती पण जरा सावरून बसली.

 

तिने स्वतःची माहिती सांगण्यास सुरुवात केली. "ताई, मी शांता. घोटीच्या जवळच्या एका पाड्यावर बालपण गेलं. घरची खूप गरिबी. आम्ही चार बहिणी, जिवंत. (गर्भापातात ३ भावंड दगावली आणि उपासमारी मुळे दोघे जण) मी सर्वात लहानी. एकबी दिस सुखाचा म्या पाहिला नाय. बाप मजुरीला जायाचा. चार पैके कमवायचा. त्यातील थोडे माझ्या मायला द्यायचा आणि काहीची पिवून यायचा. जे जमेल जसं जमेल तसं चार घास माय खाऊ घालायची. आज  पत्तूर अमी एक दिसबी पोटभर जेवलो नाय. मटण बनवलं नाय म्हणून बाप मायला लय हाणायचा! मग रातच्याला जवळ घ्यायाचा. ती लय वरडायची किंचाळायची. मग थोड्या टायमानी समद शांत व्हायाच. एक दिस माझी माय मरून गेली. बाप आमच्या संग वेगळंच वागू लागला. एक दिस शेजारील पाड्यावरचा महादू आला. बापानी त्याचा कडून पैका घेतलं आणि मोठीला पाठवलन त्याच्या संगती. असं मला पण त्यांनी पैका घेऊन सखाराम संगती लगीन लाऊन पाठवून दिलं. पैका देऊन आणल्यामुळे सखाराम माझ्या संगती हव तसं वागतो. खूप तरास देतो. दिवस रात जीव नकोसा करतो. लहान सहान कारणावरून हाणतो.

पोटभर जेवण नाही. पोर अंगावर पिते. दूध येत नाही. काल रातच्याला पोर भुकेने रडत होती आणि हा अंगाशी ..... मी नाही म्हणाले. त्यांनी हाणल." तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर भीती, घृणा, किळस असे सगळे भाव येऊन गेले. "मला जीव नकोसा झाला. तीन पोरं घेऊन जाऊ कुठे. बाप मागल्या शिम्ग्यातच खपला. जीत्तेपणी त्यांनी काही केलं नाही. आता तर मदत करायचा सवालच नाही. मला माझा नवरा समोर आला तरी घाण वाटते. तीन पोरं घेतली आणि बसले बसमध्ये. कुठे जायाच, काय करायचं, पोरांना कुठे ठेवायचं, मला काही बी ठाऊक नवतं. बस नाशिकला आली म्हणून आले नाशिकला. बसमधून उतरले आणि येड्यावानी इकडे तिकडे बघत होते. सखाराम आता तरास देणार न्हाय त्यांनी बर वाटलं पण जायाच कुठे ते ठाऊक नव्हतं. एक रिक्षावाला दादा म्हणाला,' कुठे जायचं?' म्या म्हणलं,'ठाऊक नाय.' तो म्हणाला,' बस रिक्षात. मी तुला बराबर सोडतो.' आणि त्यांनी तुमच्या पाशी आणून सोडलं."

 

शांता बोलायची थांबली. माझा मेंदू बधीर झाला होता. मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. काय ते आयुष्य, किती सहन करण. एक दिवस काय एक क्षण आनंदाचा नाही. मरत नाही म्हणून जगतोय म्हणायचं. मला शांता आणि तिच्या आईसाठी वाईट वाटत होतं. कसला हा बाप. पोरं जन्माला घालायची आणि ती पोसायची अक्कल नाही. बायको नामक बाईचा नुसत्या शरीर सुखासाठी आणि गुलामा सारखा वापर केला. लग्नाच्या नावाखाली आपल्या पोटच्या पोरी विकल्या. त्याचं आयुष्य उधवस्त केलं. त्यांना नरकात ढकलून आलेल्या पैशातून फक्त स्वार्थ पहिला, मजा केली. त्या क्षणाला तिच्या वडिलांबद्दल इतका तिरस्कार आणि राग मनात होता कि ते समोर असते तर माझ्या हातून काहीतरी विपरीत  घडल असत.

फोनच्या आवाजानी मी भानावर आले. शांताची तक्रार नोंदवून घेतली. तिला झालेली मारहाण इतकी जबरदस्त होती कि सर्वप्रथम तिला औषोध-उपचाराची गरज होती. तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर, तिची-तिच्या मुलांसकट महिला आश्रमात (सुरक्षित ठिकाणी) पाठवणी केली.

शांताचा बाप तर मेल्यामुळे सुटला होता, पण सखारामला आम्ही इतक्या सहजी सोडणार नव्हतो. आम्हाला माहित होतं कि शांताचे वडील आणि सखाराम मध्ये झालेला व्यवहार सिद्ध करणं अवघड होतं. पण शांताला झालेली मारहाण, तिचा झालेला शारीरिक आणि लैंगिक छळ सिद्ध करता येणार होता. शांताला समझोता करून सखाराम कडे जायचं नाहीये ह्याची खात्री पटल्यावर, तिला झालेल्या मारहाणीबद्दल पोलिसांकडे तक्रार द्यायला सांगितलं. शांताची तक्रार आणि सिव्हील हॉस्पिटलचं सर्टीफिकेट, ह्याच्या आधारावर साखरामवर गुन्हा दाखल झाला. पुढे ती केस कोर्टात चालली, सखारामला शिक्षा झाली.

 

सखाराम विरुद्ध कोर्टात केस उभी राहायला खूप दिवस लागले आणि ती खूप दिवस चालली. कोर्टात सादर केलेले साक्षी-पुरावे (ह्यात माझी, त्या रिक्षा वाल्याची, बस चालकाची, डॉक्टरची, पोलीस आणि खुद्द शांताची साक्ष झाली.) (पुराव्यासाठी तिने त्या दिवशी नेसलेली फाटकी साडी, जिच्यावर रक्ताचे डाग होते, ती सादर करण्यात आली) आणि सिव्हीलची कागदपत्रे ह्यांच्या आधारवर तब्बल ५ वर्षांनी त्याला शिक्षा झाली. शांताच पुनर्वसन करणं पण सोपं नव्हतं. ती आमच्या कडे आली तेंव्हा इतकी अशक्त, परिस्थितीने गांजलेली, हरलेली आणि टेकीस आली होती कि तिच्याशी लगेच काही बोलण्यात अर्थच नव्हता. पहिले जवळ-जवळ दोन महिने तिला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरण्यात गेले. औषधोपचार, सकस आहार, विश्रांती आणि भयमुक्त वातावरण, ह्या सगळ्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा ती लवकर सावरली. संस्थेमार्फत चालविलेल्या पाळणाघरात तिच्या मुलांची सोय केली. थोडं बर वाटायला लागल्यावर तीला काहीतरी काम हवं होतं. स्वभाव प्रेमळ, खूप कष्ट करायची तयारी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इत्छा पण अशिक्षित आणि भोळसट. कोणाकडे पाठवायची तर काळजी आणि जबाबदारी वाटत होती. शेवटी माहितीतल्या आणि विश्वासाच्या घरातून तिला काम मिळवून दिली.

बापाने आणि नवऱ्याने शांताच्या आयुष्यात सुखाचा एक क्षणही कधी आणला नाही. मात्र कष्ट करण्याची आणि शिकण्याची तयारी असल्यामुळे शांताला काम मिळत गेली. हळूहळू ती आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायांवर उभी राहिली, आणि मग मात्र तिने जिद्दीने स्वतःची आणि मुलांचीही ओंजळ सुखाने भरली.