Tuesday 17 January 2023

संशयात्मा विनश्यति

 

राधा, स्मार्ट, चुणचुणीत महिला! महिला कसली, मुलगीच म्हणायला हवे. तिचे अंदाजे वय २२-२३ असावे. काळी सावळी, किरकोळ अंगयष्टी. शिक्षण बेताचे पण चेहेर्यावर एक वेगळाच आत्मविश्वास! त्या दिवशी ती आली ती तक्रार नोंदवायला, मदत मागायला, तिच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून-त्यांचे  वडील घरात परत यावेत म्हणून. तिच्या बरोबर एक ६ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी होती. तिचं एकच म्हणणं होतं, “ताई, माझ्या नवर्यानी, ह्या मुलांच्या बापाने घरी यायला नको का? जे काही भांडण आहे ते आमच्या मधे आहे. त्यात ह्या लेकरांची काय चूक? त्यांनी घरी यायला हवं, घरचं खर्चापानी बघायला हवं, मुलांना काय हवं-नको ह्याची चौकशी करायला हवी. नुसता बाप झाला की सगळं झालं का? त्याची काही जबाबदारी नाही का? हि पोरं काय माझी एकटीची जबाबदारी आहेत का? ताई, तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता बोलवा आणि चांगल खडसावून विचारा.”

राधा सारख्या कावलेल्या अवस्थेत जेंव्हा एखादी महिला येते तेंव्हा तिला थोडं रीलेक्स व्हायला वेळ दिलेला बरा असतो. तिच्या समोर एका ग्लास मधे पाणी ठेऊन आम्ही तिने सांगायची वाट बघत बसलो. तिने एक घोट पाणी प्यायल, ५ मिनिटं डोळे मिटून बसली आणि मग १० मिनिटं ती एकटीच बोलत होती. “ताई, माझी ७वी ची परीक्षा झाली. मार्क पण चांगले मिळाले होते. मला पुढे शिकायचं होतं. गावात शाळा नव्हती. माझं माहेर त्र्यंबक जवळच्या खेडेगावातील. पुढील शिक्षणासाठी जवळची शाळा त्र्यंबकला होती. मुलीला एकटीला इतकं लांब पाठवणं वडिलांना मान्य नव्हतं. म्हणून वडिलांनी असं जाहीर केलं आणि आईला सांगितलं की ‘आता राधाचं शिक्षण बंद. तिला स्वैपाक, घरकाम शिकवा आणि चांगलं स्थळ आल की उजवून टाकू.’

“झालं! माझ्या स्वप्नांवर वडिलांनी त्यांच्या कळत नकळत एक बोळा फिरवला आणि माझ्या आयुष्याचं सगळं गणितच विस्कटल. माझं वय जेम-तेम १५-१६ असेल. आमच्या गावातील केशवचे स्थळ सांगून आले. आमच्या सारखी त्यांची परिस्थिती पण बेताचीच होती. हातावर पोट! रोज मोलमजुरी करायची, जे पैसे मिळतील त्याचा शिधा आणायचा, दोन घास खायचे आणि आजचा दिवस चांगला पार पडला म्हणून देवाचे उपकार म्हणत झोपायचे. केशव माझ्या पेक्षा ८ वर्षांनी मोठा होता, पण त्यांनी काही कोणाला फरक पडणार नव्हता. तो १०वी नापास होता, निर्व्यसनी होता, मोठ्यांचा आदर करणारा होता आणि मुख्य म्हणजे कष्ट करायची तयारी होती. मुलीचं लग्न लावायला अजून काही बघण्याची आवश्यकता नव्हती.

“स्थळ सांगून आल्यापासून चार महिन्यात माझं लग्न उरकलं आणि माझी सासरी पाठवणी झाली. जेमतेम १५ वर्षांची मी संसाराला लागले. मी अठरा वर्षांची झाले तेंव्हा माझ्या पदरी दोन मुलांची जबाबदारी आणि रोजची ओढाताण आणि काटकसरीचा संसार मागे लागला होता.

“माझ्या बरोबर शाळेत शिकणारा प्रकाश, एक दिवस अचानक मला बाजारात भेटला. माझी अवस्था बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं. माझं लग्न झालाय आणि मला दोन मुलं आहेत ह्याच्यावर त्याचा विश्वासच बसेना. “अग राधा, काय हि तुझी अवस्था? हे सगळं कधी आणि कसं झालं? मला कोणी काहीच बोललं नाही. म्हणा मागील ५-७ वर्षांपासून मी पण गावात आलो नाही. ७वी नंतर माझ्या आई-वडिलांनी माझी रवानगी, शिक्षणासाठी, नाशिकला काकांकडे केली. अग, कसलं भारी आहे नाशिक! मोठे रस्ते, मोठी घरं, मोठ्या शाळा, खूप सगळ्या गाड्या. खूप मजा आहे. सुरवातीला काही दिवस मी खूप भांबावून गेलो होतो, पण आता तेच भारी वाटतंय. आता गावी परत यायची इत्छाच होत नाही. आता वडिलांना बर वाटत नाही म्हणून आलोय. मी आहे ८-१५ दिवस. जमलं तर भेटूया.”

“मी त्याच्याशी बोलत बसले आणि घरी पोहोचायला बराच उशीर झाला. घरात पाय ठेवला आणि सासूबाईनी ‘उशीर का झाला?’ असं विचारलं. मी काही बोलणार तेवढ्यात केशवचे माधवकाका म्हणाले, “तिला काय विचारतेस? पाटीलांच्या प्रकाशसोबत बाजारात गप्पा मारत उभी होती. अक्खा गाव बघत होता. पण हिला कशाशी काही घेणं नव्हतं.” मग काय माझ्या सासू-सासर्यांनी माझी अक्कल, माझी लाज, माझे संस्कार असा सगळ्यांचा उद्धार केला. मी काहीच बोलले नाही. म्हटलं तर चूक माझी होती. मी निमूटपणे स्वैपाक केला आणि सर्वांना जेवायला वाढलं. त्या रात्री मी जेवलेच नाही, पण त्याने कोणाला काहीच फरक पडला नाही. उलट सासुच  म्हणणं होतं, ‘त्या पोरासंग गुलूगुलू गप्पा मारून महाराणीच पोट भरलं असेल.’

दुसर्या दिवशी आमच्या घरी, माझ्या सासरी एक बैठक बोलावली. त्यात माझ्या माहेरची माणस, माझे सासू-सासरे, केशव, माधवकाका आणि त्यांचा नाशिकला कंपनीत नोकरी करणारा मुलगा-रमेश, असे सर्व हजर होते. अपेक्षे प्रमाणे विषय ‘मीच’ होते. मी अक्षम्य गुन्हा केल्या सारखी एका कोपर्यात गप्प उभी होते आणि बाकीची मंडळी माझ्या बेताल, बेजबाबदार वागण्यावर काय तोडगा काढता येईल ह्याचा विचार करत होते. बहुतेकांच असं मत होतं की केशवने मोकळं व्हावं. झालेल्या प्रकाराची गावात इतकी चर्चा होईल की गावात राहणं अवघड होईल. माझे आई-वडील गयावाया करत होते. केशवच्या पाया पडून विनवणी करत होते, ‘ह्या बारीला आमच्या पोरीला माफ करा. पुन्हा ती अशी चूक करणार नाही.’ आईने उठून माझ्या पाठीत एक धपाटा घातला आणि म्हणाली, ‘ए राधे, सगळ्यांची माफी माग. आणि म्हण की तू पुन्हा अशी चूक करणार नाही.’ माराच्या भीतीने मी सर्वांची त्या दिवशी माफी मागितली खरी, पण आज पर्यंत ‘आपल्या शाळेत सोबत शिकणाऱ्या एका मुलासोबत थोडा वेळ बोलणं हा गुन्हा कसा असू शकतो?’ हे मला समजले नाही.

केशवच्या घरच्या लोकांना फारकत हाच योग्य मार्ग आहे असं वाटत होतं. पण माधवकाकांच वेगळंच म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘हिला केशवने मोकळं केलं तर मग तर ती तिच्या मर्जी प्रमाणे वागेल. अजून लफडी करायला मोकळी. फारकत बिरकत काही नाही. रमेश, तू ह्या दोघांना नाशिकला घेऊन जा आणि तुझ्या ओळखीने केशवला कुठेतरी काम मिळवून दे.”

झालं! सामान बांधून, म्हणजे आमचे आणि पोरांचे चार कपडे पिशवीत भरून आम्ही दुपारच्या बसने नाशिकला आलो. बरोबर सासूने काहीच घेऊ दिले नाही-ना पैसे, ना धान्य, ना भांडी कुंडी, ना अंथरून, ना पांघरून. आम्ही रमेशदादांच्या भरोश्यावर आणि चांगुलपणावर अवलंबून, इथून पुढे सर्व ठीक होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करत नाशिकला आलो. गाव सोडल्यावर जवळ-जवळ पहिला महिना रामेशदादांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे उपकार मी जिंदगीभर नाही विसरायची. नाशकात आल्यावर १५ दिवसात केशवला कंपनीत काम मिळालं. १५ दिवसांनी पगाराचे पहिले पैसे मिळाले. आम्हाला दोघांना खूप भारी वाटलं.

गावापेक्षा शहरात पैसे जास्त व नियमित मिळत होते. काट-कसरीची सवय होतीच. हळूहळू आम्ही नाशिकमध्ये स्थिरावलो. भाड्याची खोली घेतली, संसाराला लागणारी चार भांडीकुंडी घेतली. गावाकडील घटना विसरून नव्यानी संसाराला लागलो. मुलगा ५ वर्षांचा झाला आणि त्याला जवळच्या शाळेत दाखल करायचं ठरलं. आम्ही दोघं मुलांना घेऊन शाळेत गेलो. प्रवेश अर्जासोबत काही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता होती. केशव सर्व गोष्टींची पूर्तता करत होता. मी मुलांना घेऊन शाळेच्या आवारात बसले होते. केशव एडमिशनचं काम उरकून आला. दोघे आनंदात घरी जायला आम्ही निघणार तेवढ्यात प्रकाशनी आवाज दिला,” राधा, इथे कुठे?” त्याच्या चेहेर्यावर आश्चर्य होतं.

आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं, पण माझ्या चेहेर्यावर आश्चर्य होतं आणि केशवच्या चेहेर्यावर नाराजी आणि राग होता. त्यांनी रागातच माझा हात घट्ट पकडला आणि एक शब्दही न बोलता मला घरी घेऊन गेला. आता विचार करतीये तर लक्षात येतंय की त्या दिवसापासून केशवच वागणंच बदललं. ताई, तुम्ही त्याला बोलावून घ्या.”

त्या दिवशी प्रकाश आमच्या मागे मला हाका मारत आला. त्याच्या जवळ एक पुस्तक होतं ते त्याला माझ्या मुलांना द्यायचं होतं. (खरं तर त्याने ते पुस्तक त्याच्या भाच्या साठी घेतलं होतं, पण माझा मुलगा पहिल्यांदाच शाळेत जाणार होता म्हणून कौतुकाने द्यायचं असेल.) पण केशवने काही ऐकूनच घेतलं नाही. आम्ही तिथून तडक घरी आलो. पुढचे ८-१० दिवस घरात केशवने अबोला धरला. तो जेवायला आणि मोकळा वेळ रमेशदादा कडेच राहू लागला. एवढंच नाही तर कधी-कधी तिकडेच २-२ दिवस मुक्कामी थांबायचा. दोन मुलांना घेऊन एकटीने राहायची मला भीती वाटत होती. केशवशी काही बोलायला गेलं की तो चिडायचा. एकदा तर त्याने मला मारायला हात पण उचलला होता. पुढे तर त्याने खर्चायला पैसे देणं पण बंद केलं.घरात भरलेला शिधा ८-१५ दिवस पुरला. पुढे काय करायचं? घर कसं चालवायचं? म्हणून मी मुलांना घेऊन रमेशदादाच्या घरी गेले. तिथे सगळे आनंदात गप्पा मारत जेवत होते. सकाळ पासून मुलं उपाशी होती. ती धावत केशव कडे गेली आणि त्याच्या ताटातून जेवायला लागली. हे बघून केशव खूप चिडला आणि मला आणि मुलांना ओढतच घरी घेऊन आला. “राधा, तुझ्या मुलांना काही संस्कार नाहीत. जेवण बघितल्यावर भिकार्यासारखी जेवायला बसली.” (माझी मुलं! त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही का? त्यांनी मुलांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी, खर्चाला थोडे पैसे दिले असते तर आमची मुलं पण ‘भिकार्यासारखी’ वागली नसती. खरंच भूक सहन करणं एक वेळ आपल्याला जमेल पण ह्या लेकरांना ते अवघड आहे. एवढं पण त्यांच्या बापाला समजू नये. मजेत जेवत होता ....)

“ताई, त्या दिवशी मला खूप राग आला. मी पण मग खूप बोलले. आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. केशवने मला मारलं. मुलं भुकेनी आणि घाबरून रडत केंव्हातरी झोपली. मला झालेली मारहाण, माझा झालेला अपमान ह्याच्यामुळे मला झोप लागत नव्हती. माझ्या मनात एकच विचार येत होता, हा गुंता सोडवायचा कसा? गावी जायची सोय नाही, इथे कोणाशी ओळख नाही. काय करावं? काही सुचत नव्हतं. नाही म्हणायला प्रकाश होता ओळखीचा. पण त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता. आणि त्याच्याशी बोलल्यामुळेच तर हे सगळं रामायण आणि महाभारत आपल्या आयुष्यात घडत होतं.

मी केशवशी बोलायचा खूप प्रयत्न केला. पण त्याने माझ्याशी संबंध तोडल्यासारखेच तो वागत होता. शेवटी मी लोकांची धुणंभांडी करायचं ठरवलं. त्यांनी वेगळाच प्रोब्लेम झाला. त्याला वाटतंय मी प्रकाशलाच भेटायला जाते, कामाचा बहाणा करून. ताई, काय करू? मला काही समजत नाहीये. त्याच्या मनाला संशयानी इतकं ग्रासलं आहे की मी काही पण केलं, कितीही समजावलं तरी त्याला समजावून सांगू शकणार नाही.”    

राधाला गावी परत जायची भीती वाटत होती. नाशिकमध्ये रमेशदादा आणि केशवच्या व्यतिरिक्त कोणी तिच्या ओळखीचं नव्हतं. तिची आणि तिच्या मुलांची आधारगृहात सोय केली. राधानी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही केशवला बोलावल्यावर तो पहिल्यांदा यायला तयारच नव्हता. रमेशनी समजावल्यावर तो जवळ जवळ एका महिन्यानी आमच्या ऑफिसमध्ये आला.

कंपनीच्या जेवणाच्या सुट्टीत केशव आला होता, त्यामुळे त्याच्याकडे फार वेळ नव्हता. त्यांनी तशी विनंती केली आणि बोलायला सुरुवात केली. किरकोळ शरीर, दिसायला सामान्य, मळकट कपडे, थकलेला चेहेरा, चेहेर्यावर थोडा राग, थोडा अविश्वास आणि बरचसं टेन्शन! “ताई, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. लग्न करून राधा आमच्या घरात आली तेंव्हा चांगली होती. तिच्या बद्दल कोणाची काही एक तक्रार नव्हती. पण प्रकाश सोबत तिचं लफडं आहे असं काकांनी सांगितल्यापासून माझं सगळ आयुष्यच पालटून गेलं. गावातील बदनामी टाळायला तिला घेऊन मी नाशिकला आलो. रमेशदादानी खूप मदत केली.शून्यातून संसार उभा केला. काही महिने सुखात गेले. आणि एक दिवस आमच्या आयुष्यात पुन्हा तो आला, आमच्या सुखी संसाराची वाट लावायला. राधाला मी खूप सांगायचा प्रयत्न केला, पण ती माझं काही ऐकत नाही. आता तिने इतकी लाज सोडली आहे की दिवसा ढवळ्या, मी कामावर गेलो की ती त्याला भेटायला जाते. ना मी सुखानी जगू शकत, ना चार क्षण आनंदात घालवू शकत. आजपर्यंत माझ्या कामाबद्दल कंपनीत कोणाची तक्रार नव्हती. आजकाल कामात पण चुका होतात. तुम्हीच सांगा मी काय करू? मला तर तिचं तोंड बघायची पण इत्छा नाहीये.”

आम्ही त्याला खूप समजावलं तेंव्हा तो एकत्र बैठकीसाठी यायला तयार झाला, तो पण एका अटीवर. ‘त्याचे आई-वडील आणि तिचे आई-वडील पण तेंव्हा हजर हवेत. जो निर्णय होईल तो सर्वांच्या मर्जीनुसार होईल.’

ठरल्याप्रमाणे १५ दिवसांनी राधा-केशव आणि त्यांचे नातेवाईक मीटिंग साठी आले. अपेक्षेप्रमाणे खूप वादावादी, बाचा-बाची झाली. सुरुवातीला कोणालाच राधाचं म्हणणं मान्य नव्हतं. ती सांगायचा प्रयत्न करत होती की, प्रकाश आणि ती एका शाळेत ७वि पर्यंत एकत्र शिकत होतो. एवढीच आमची ओळख आहे. तुम्हाला वाटतंय तसं आमच्यात काही नाही. उलट केशवच नको नको ते विचार करून स्वता दुखी होतोय आणि आमचं जगणं अवघड करतोय. कोणी तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. राधा एकीकडे आणि जमलेली मंडळी एकीकडे, असं चित्र होतं.

सर्वांच्या समक्ष आम्ही राधा आणि केशवला बसवलं आणि काय घडलं, कसं घडलं, ह्या संदर्भात प्रश्न विचारले. दोघांच्या उत्तरांवरून सर्वांच्या लक्ष्यात आल की राधाची काहीच चूक नाहीये. केशवने करून घेतलेल्या गैरसमजुतीचा हा परिणाम आहे. जमलेल्या सगळ्यांनी केशवला समजावून सांगितलं. थोडे आढे-वेढे घेत तो तयार झाला. राधाच्या आईने राधा आणि मुलांना ८ दिवसांसाठी गावी नेण्याची इत्छा बोलून दाखवली. त्यावर केशव म्हणाला, “मामी ८ काय? चांगले १५-२० दिवस घेऊन जा. तिला आणि मुलांना थोडा बदल.”

समझोता झाला. लिखापडी झाली. राधा तिच्या माहेरी गेली. ठरल्याप्रमाणे ३ आठवड्याने राधा, मुलांना घेऊन नाशिकला परत आली. आम्ही आमच्या नियमाप्रमाणे गृहभेट करून आलो. केशवच वागणं थोड तुटक-तुटक वाटलं. पण त्या व्यतिरिक्त सर्व ठीक आहे असं जाणवलं. केशव घरखर्चाला नियमितपणे पैसे देत होता आणि म्हणून राधानी पण बाहेरची कामे सोडून दिली. आम्ही ३-४ गृहभेटी केल्या, ते पण अधून मधून खुशाली सांगायला ऑफिसमधे येत होते. एकूण सर्व ठीक चाललं होतं.

केशव-राधाचा समझोता होऊन साधारण दीड वर्ष झालं असेल. ह्या दीड वर्षाच्या कालावधीत खूप गोष्टी घडून गेल्या. आम्हाला वाटत होतं तसं सर्व ठीक नव्हतं. एक दिवस केशव अचानक ऑफिसमधे आला आणि म्हणाला, “ताई, काहीतरी करा. राधा ८ दिवसापासून घर सोडून निघून गेली आहे. जाताना मुलांना पण सोबत घेऊन गेली आहे. घरात थोडे फार पैसे होते ते पण कपाटात दिसत नाहीयेत. ताई, मी हि नोकरी, हे कष्ट कोणासाठी करतोय? ती कशी पण असली तरी मला ती आणि मुलं हवे आहेत.”

“ती कशी पण म्हणजे काय? आणि सध्या ती कुठे आहे?”

“ती कुठे असणार? गावी! तिच्या भावानी तिला घरात घेतली असेल. आता काय त्याचंच राज्य आणि त्याचीच सत्ता आहे. मागच्या वर्षी राधाच्या आई-वडिलांचं कोरोनाच्या काळात निधन झालं.

‘ताई, तिचं वागणं फार बेताल होत चाललं आहे. प्रकाश वेळी-अवेळी, मी नसताना घरी येतो, काही वेळ घरात असतो. हे बघून माझा संताप झाला आणि मी तिला खूप हाणली. मी काही चुकलोय असं मला अजिबात वाटत नाही. तुमच्या कार्यालयातून समझोता करून तिला नेली तेंव्हाच मी घरात केमेरा बसवून घेतला होता. मला तिचा भरोसाच वाटत नव्हता.

“ताई, तुम्ही तिला बोलावून घ्या. माझी पोरं माझ्या पाशी हवीत आणि माझी बायको माझी भाकर करायला हवी. मी कष्ट करणार आणि ती मजा करणार, हे मला मान्य नाही.”

केशवकडून सागरचा (राधाचा थोरला भाऊ) फोन नंबर घेतला आणि त्याला फोन केला. आम्ही कोण बोलतोय आणि कशा साठी फोन केलाय हे समजल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया होती, “राधा तिकडे येणार नाही. केशवला माझा निरोप सांगा राधा मेली आणि त्यांची मुलं पण मेली. राधाला त्याचं तोंड बघायची पण इत्छा नाही. सॉरी ताई, मी असं बोलायला नको होतं. पण काय करू ह्या माणसानी माझ्या बहिणीचं जगणं मुश्कील करून टाकलाय. एखाद्या माणसाच्या मनात इतका टोकाचा संशय कसा असू शकतो? ८-९ वर्ष झाली तिच्या लग्नाला, पण एक दिवस सुखाचा आला नाही तिच्या नशिबी. मी तिला आता पाठवणार नाही, त्याच्याकडे. मी माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना सांभाळायला समर्थ आहे.”

सागरला खूप समजावून सांगितलं तेंव्हा कुठे तो एकदा राधाला ऑफिसला पाठवायला तयार झाला. तो देखील एका अटीवर, “ती एकटी येणार नाही. मी पण तिच्या सोबत येणार. आणखीन एक, मुलांना आणणार नाही.”

कबूल केल्याप्रमाणे सागर आणि राधा ८ दिवसांनी ऑफिसमधे आले. केशव आणि रमेश पण आले. बोलणी सुरु करणार तेवढ्यात केशवचे आई-वडील आणि काका हजर झाले. त्या सगळ्यांना बघून सागर वैतागून म्हणाला, “राधा चल. आपण घरी जाऊया.” आणि दोघं जायला उठले. केशवच्या नातेवाईकांना बाहेर थांबण्यास विंनती केली. महामुश्कीलीने त्या दोघांना थांबवलं. केशव आणि राधा, दोघांमध्ये बोलणी अशी काही झालीच नाहीत. केशव, राधावर उपकार केल्याच्या भाषेत सारखं म्हणत होता,”ताई, राधानी अक्षम्य चुका केल्या आहेत. खर म्हणजे मला तिचं तोंड बघायची पण इत्छा नाही. पण मला दुसऱ्यांदा लग्न करण्याची इत्छा नाही. दुसरं म्हणजे मला माझी मुलं हवी आहेत. आणि त्या मुलांच्या देख-भाली साठी मी तिला घेऊन जायला तयार आहे. मी सांगेन तसं राहायचं. सांगितल्याशिवाय, विचारल्याशिवाय, घराच्या बाहेर पडायचं नाही. मोबाईल वापरायचा नाही. सागरने येण्या पूर्वी मला फोन करून सांगायला हवं. ह्याचं कारण तिला कधीपण विचारलं की, ‘आज कोण आल होतं?’ तर तिचं उत्तर ठरलेलं असायचं, ‘सागर दादा आला होता.’ मला खोटं बोलण्याचा आणि वागण्याचा खूप राग येतो. मला खोटं सहन होत नाही.”

तो बोलत होता. अधून मधून राधा कडे बघत होता. पण तिच्या चेहेऱ्यावर कोणताच भाव नव्हता. सागरच मधे चिडून म्हणाला, ‘अरे केशव, माझ्या बहिणीवर इतके घाणेरडे आरोप करण्यापूर्वी एकदा तर माझ्याशी बोलून खात्री करून घ्यायचीस की खरं काय घडलंय. अरे मूर्ख माणसा, तुझ्या ह्या विचित्र वागण्याबद्दल ती माझ्याकडे एक चकार शब्द पण बोललेली नाही. मला रमेशचा फोन आला, म्हणून मी तिला आणि मुलांना भेटायला आलो. त्यांची अवस्था माझ्याच्यानी बघवली नाही. म्हणून मीच वरचेवर मला वेळ मिळेल तसं तिला भेटायला येत होतो. मला जेंव्हा येणं शक्य नव्हतं तेंव्हा जाधवांचा गणपत आणि प्रकाशच्या हाती त्यांच्यासाठी खाऊ, काही गरजेच्या वस्तू पाठवत होतो. पण तू कधी माझ्याशी किंवा रमेशशी बोलायचा, विचारायचा, समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाहीस.”

केशव मधेच वैतागून म्हणाला, “सागर, तू का बोलतोयस? तुला कोणी विचारलं आहे का? का आपल्या बहिणीच्या चुकांवर पांघरून घालतोस. आपल्या बहिणीचं प्रकाश बरोबर लफडं आहे, मान्य कर! हिने आयुष्यात माफ न करण्यासारख्या चुका केल्या आहेत. पण मी तिचे सगळे अपराध विसरून तिला घेऊन जायला तयार आहे ना? ताई, काय लिहून घ्यायचं ते घ्या. मला कामावर जायला उशीर होतोय. आणि माझी मुलं कुठे आहेत? ती दिसत नाहीत.”

‘मुलं’ हा शब्द राधाच्या कानावर पडला आणि तिने एकच प्रश्न विचारला, “कुठली मुलं? भिकाऱ्याची मुलं? जी दोन दिवस त्यांच्या बापाच्या कृपेने उपाशी होती आणि जी भुकेनी त्यांच्या बापाच्या पानातून दोन घास आशेनी खायला बसली? ती मुलं त्यांच्या मामाच्या घरी सुखात आहेत. ताई, मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत, मला त्याच्याकडे परत जायचं नाहीये. मला फारकत हवी आहे. त्यांना त्यांची मुलं हवी असतील तर मी ती द्यायला तयार आहे. मुलं काही दिवस त्यांच्या कडे, काही दिवस माझ्याकडे, हे मला मान्य नाही. त्यांना मुलं हवी असतील तर त्यांनी खुशाल न्यावीत. फारकतीचा खर्च किती होईल त्याचा अंदाज द्या. मी किती करायला हवा त्याची कल्पना द्या. माझा दादा माझ्यासाठी खूप करतोय, पण मला जे शक्य आहे ते मी करीन.

‘ताई, माझ्या आयुष्यात प्रकाशचं काही स्थान नव्हतं. तो केवळ माझ्या शाळेतला एक चांगला मित्र आहे. लग्न झाल्यावर मित्र असणं काही गुन्हा आहे का? पण केशवने ते कधी समजून घेतलच नाही. नुसता संशय, भांडणं, मारहाण, अपमान, ह्यापलीकडे काही दिलंच नाही. मी खूप वैतागले आहे. आज असं वाटतंय की प्रकाश सारखा कोणी जोडीदार मिळाला, जो मला समजून घेईल, माझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलेल, तर किती बर होईल. काही दिवस सुखानी जगता जेईल.  

“ताई, मी तुमची खूप आभारी आहे. माझा समझोता होऊन मी केशवकडे गेले, आणि नंतर त्याच्या बरोबर जो काळ त्याच्या सोबत घालवला, त्यात मला एक गोष्ट जाणवली- मी ह्या माणसा बराबर राहू शकत नाही. माझ्यात आणि त्याचात, म्हणजे आमच्या स्वभावात, आमच्या आवडी-निवडीत काहीच साम्य नाही. ताई, खरंच तुम्ही माझ्यासाठी जे केलत त्या साठी मी तुमचे पुन्हा आभार मानते.”  

आम्हाला पण हे जाणवत होतं की, राधा हि केशव पेक्षा जास्त हुशार आणि स्मार्ट आहे. तिला शिकायची संधी मिळाली असती तर, आज तिचं आयुष्य काहीतरी वेगळ असत? तिने तिच्या बाजूनी खूप समजून घ्यायचा, समजवायचा प्रयत्न केला. लग्न, कुटुंब सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला. पण हाती यश आल नाही. केशवच्या विचित्र वागण्याने राधा त्याच्यापासून लांब गेली.

एव्हाना केशवच्या हे लक्षात आल होतं की राधा त्याच्या आयुष्यात कुठल्याच कारणांनी परत येणार नाही. आता फारकतीचा एक मुद्दा होता, जिथे तो शेवटचा प्रयत्न करत होता, राधाला परत आणण्याचा! आम्ही केशवच्या नातेवाईकांना आत बोलावलं आणि काय बोलणी झाली ती सांगितली.

दोन प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी होती- पाहिलं म्हणजे मुलं कोणाकडे रहाणार? आणि दुसरं, फारकत कशी घ्यायची? केशावणी त्याचं मत मांडलं, “मुलं माझ्याकडेच राहतील. हिचा काही भरोसा नाही. ती आत्ताच म्हणाली की, प्रकाश सारखा नवरा आवडेल. मी जिवंत आहे, अजून आमची फारकत झाली नाही तेंव्हा हि बाई अशी वाक्य उघडपणे बोलते. फारकत झाल्यावर काय करेल, त्याचा विचार न केलेलाच बरा. दुसरं म्हणजे, मी तिला काही देणार नाही. न खावटी, ना रहायला जागा.”

त्यावर राधाने शांतपणे सांगितलं, “मला काही नको. मी काम करीन, कमवीन आणि माझं घर चालवीन. केशवला मुलं हवी असतील तर ती त्यांनी ठेऊन घ्यावीत. पण ६ महिन्यानी माझ्या दारी आणून सोडलेली चालणार नाही. तसं केल तर पुन्हा त्याला मुलांना भेटता येणार नाही. मुलांच्या भावनांशी मी त्याला खेळू देणार नाही.

फारकतीच्या कागदांवर केंव्हा सही करायला यायचं ते सांगा.”

सर्वांसमोरच वकिलांना फोन करून दोन दिवसा नंतरची तारीख नक्की केली. ठरल्याप्रमाणे वकिलांनी समजुतीने फारकतीचा मसुदा तयार केला. दोघांच्या सह्या झाल्या. अपेक्षेप्रमाणे केशवने शेवटच्या क्षणी मुलं नकोत असं सांगून स्वतःची सोडवणूक करून घेतली.

सहा महिन्यानी नियमाप्रमाणे त्यांची कायदेशीर फारकत झाली.

ह्या गोष्टीला एक वर्ष उलटलं असेल. एक दिवस राधा एका माणसाबरोबर ऑफिसमध्ये आली. तिने लाजत लाजत आमची ओळख करून दिली, “ताई, हा प्रकाश! आम्ही दोघांनी सहा महिन्यापूर्वी लग्न केलं. मी खूप खुश आहे. बाहेरून दहावी देते आहे. नंतर मुक्त विद्यापीठातून बीए करणार आहे. ताई, आशीर्वाद द्या.”

इतकं सगळं झाल्यावर राधाने प्रकाशशी लग्न केलं. म्हणजे केशव म्हणाला तसं तिचं खरंच आधीपासून त्याच्याबरोबर ‘लफडं’ असेल का? का केशवच्या सतत त्रास देण्यामुळे राधा प्रकाशकडे ओढली गेली असेल? कारण पहिल्यांदा केशवच्या काकांनी तिच्याबद्दल केशवला सांगितलं तेव्हा तर ती प्रकाशला शाळेत आपल्या बरोबर शिकणारा मुलगा म्हणूनच ओळखत होती. हा सगळा प्रकार झाला यात नेमकी चूक कोणाची? बायको कायम आपल्या मनाप्रमाणे वागली पाहिजे असं समजणाऱ्या आणि सतत संशय घेणाऱ्या केशवची? कशात काही नसतांना ‘राधाचं लफडं आहे’ असं सांगणाऱ्या केशवच्या काकांची? राधाला तिच्यापेक्षा कमी कुवत असलेला नवरा करून देणाऱ्या राधाच्या आईवडिलांची? का तिच्या गावात शाळा न देणाऱ्या सरकारची?

चूक कोणाचीही असली तरी राधा, केशव आणि त्यांची दोन मुलं यांची आठ दहा वर्षं फरफट व्हायची ती झालीच. पण तरीही मी असं म्हणेन की ही राधा नशीबवान होती. तिचा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहिला. केशवचा भाऊदेखील तिच्या पाठीशी उभा राहिला. तिला प्रकाश भेटला. ती स्वतः खमकी होती. नाही तर अश्या कित्येक राधा आयुष्यभर नवऱ्याचा आणि सासरच्यांचा जाच सहन करत राहिलेल्या आम्ही बघतो. मग चूक कोणाचीही असू दे!