Thursday, 23 March 2023

माझ्या घरी मी पाहुणी

 

मनीषा, एक ३६-३७ वयाची महिला! साधारण सहा महिन्यापूर्वी आमच्या कार्यालयात आली. कष्ट करून आयुष्य जगणारी. बेताची परिस्थिती असावी. अंगावर नेसलेली साडी जुनी, वापरून जुनी झालेली होती, पण तिच्या कडे जे काही होतं त्यात ती व्यवस्थित रहाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की एरवी ताठ मानेनी जगणारी, जगाला टक्कर देण्याची हिम्मत असलेली आज कशानी तरी खचल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे की काय? ती ऑफिसमधे आली ती थेट आमच्या समोर येऊन बसत म्हणाली, “ताई, मी मनीषा. माझे वडील मला माझ्या घराबाहेर निघ म्हणतात. मी काय करू? कुठे जाऊ? ताई, मी माझ्या मुलांना सोडून कशी जगू? तुम्ही प्लीज मला मदत करा.”

“मनीषा, तू आधी शांत हो. काय आणि कस घडलं ते शांतपणे, सविस्तर सांग. तुला तुझे वडील घराबाहेर निघ म्हणतायत, तर तू मुलांना घेऊन माहेरी, त्यांच्या घरात राहातीयेस का? तुझा नवरा कुठे आहे? त्याचं ह्या बद्दल काय म्हणणं आहे? नीट सगळं सांग.”

“ताई, माझे आई-वडील कामाच्या शोधात नाशिकला आले आणि इथेच राहिले. वडील कंपनीत नोकरी करायचे. आई चार घरची धुणी-भांडी करायची. दोघं दिवसभर कामानिमित्त बाहेर रहायचे. माझं १०वि पर्यंतच शिक्षण वस्तीतल्या शाळेत झालं. मला पुढे शिकायचं होतं. माझा हट्ट होता म्हणून वडिलांनी त्यांना परवडत नसताना माझी कॉलेजमध्ये अडमिशन केली. ११वि च शिक्षण मजेत झाल. माझं वय वाढत होतं. वस्तीतल्या मुलांच्या नजरा, त्याचं वागणं बदलत होत. हे आई-वडिलांना कळल तर काय होईल? ते माझं शिक्षण बंद करतील का? ह्या भीतीने मी आई-वडिलांकडे ह्या संदर्भात काहीच बोलले नाही. पण त्यांच्या कानावर गोष्टी येत होत्या. त्यांच्या मनात भीती होती, ‘त्यांना माझ्या बद्दल खात्री होती पण एकाच गोष्टीची काळजी वाटत होती की, आपल्या अपरोक्ष आपली मुलगी सुरक्षित राहील का?’

दोघांनी बराच विचार केला. दोघांपैकी कोणीही काम सोडून घरी बसणं परवडणार नव्हतं. मग काय? त्यांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. २५ वर्षांचा महेश, वडिलांच्या कंपनीत नोकरी करत होता. तो अनाथ होता, निर्व्यसनी होता, कष्टाळू होता! कुणाशी कधी वाद नाही की भांडण नाही. तो बरा आणि त्याचं आयुष्य बर! मागील ५-७ वर्ष वडिलांच्या बरोबर काम करत होता, परिचयाचा होता. ह्यापेक्षा स्थळाकडून जास्त, माझ्या आई-वडिलांच्या, अपेक्षा पण नव्हत्या. एक दिवस वडिलांनी महेशला घरी जेवायला बोलावलं. (तसं वडील त्याला अधून-मधून सणासुदीला जेवायला घरी बोलवत असत.) जेवणं झाल्यावर वडिलांनी सरळच मनातला विषय मांडला. महेश साठी ते थोडं अनपेक्षित होतं. तो थोडा गोंधळला पण स्वतःला सावरत म्हणाला, “दादा, मनीषा बरोबर लग्न करून तुमच्याशी इतकं जवळचं नातं जोडलं गेलं तर मला आनंदच होईल. पण माझी एक अडचण आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी अनाथ आहे. माझ्या बाजूनी लग्नाची बोलणी करायला, लग्नानंतर मनीषाच कौतुक करायला कोणी नाही. शिवाय लग्नाचा खर्च मला झेपेल का? हा पण एक प्रश्नच आहे.”

मोहनचा लग्नाला होकार आहे हे समजल्यावर मनीषाच्या वडिलांना पण बर वाटलं. लग्न घरच्या-घरी, साधेपणानी करायचं ठरलं. सर्वांच्या सोईचा दिवस मुहूर्त म्हणून निश्चित केला. वडिलांच्या कंपनीतील ७-८ जण आणि आम्ही घरातील व शेजारी मिळून ८-१० जण. असं २० एक लोकांच्या साक्षीने माझं लग्न झालं. एका महिन्यापूर्वी १२वि नंतर काय शिकायचं ह्याची स्वप्नं बघणारी मी, अचानक मोहनची बायको झाले, त्याच्या घरी आले आणि संसाराला लागले.

मोहनचा स्वभाव चांगला होता. निर्व्यसनी, समजूतदार. कामात व इतर गोष्टीत मदत करायला तैयार! त्याचं जे उत्पन्न होतं त्यात जमेल तशी माझी हौस भागवायचा. सुरवातीला वडिलांनी, ‘मनीषा आमची एकुलती एक मुलगी. आम्ही इकडे दोघंच असतो व तुम्ही पण दोघंच. त्यात मनीषाला घरकामाची फारशी सवय नाही. तुम्हाला सोयीचं असेल आणि तुमची हरकत नसेल तर तुम्ही दोघं आमच्या घरात शिफ्ट व्हा’, असं सुचवून पाहिलं.

पण मोहनला हे मान्य नव्हतं. त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही तो रहात होता त्याच खोलीत रहायला लागलो. दिवस मजेत चालले होते. काटकसर आणि कष्ट माझ्यासाठी काय आणि महेश साठी पण काही नवे नव्हते. स्वतःच, दोन खोल्यांचं का होईना पण आपलं हक्काच एक घर असावं, असं त्याचं आयुष्याचं स्वप्नं होतं. त्यांनी पैसे साठवायला सुरुवात केलीच होती. दोघांनी त्यासाठी मेहेनत करायची ठरवली. लग्नाला २-४ महिने झाले आणि मी पण चार घरची काम करायला लागले. चार पैसे बाजूला पडू लागले. लहान मुलं गुल्लक मधील जमा जशी शंभर वेळा मोजतात, तसं आम्ही पण दर १५ दिवसांनी पैसे मोजायला लागलो.

लग्ना नंतर दीड एक वर्षात माधवचा जन्म झाला आणि त्यानंतर साधारण वर्षाभरांनी माधुरीचा! माधवच्या पाचव्या वाढदिवसाला आम्ही, काही साठवलेले पैसे भरून व बाकीचं बँकेकडून कर्ज घेऊन, एक रो-हाउस बूक केलं. ३-३.५ वर्षात आम्हाला त्याचा ताबा मिळाल्यावर आम्ही तिथे शिफ्ट झालो. अखेरीस स्वतःच घर झालं. खूप आनंद झाला. आमचं कौतुक करायला आई-वडील भेटायला व आठ दिवस रहायला आले.

आमच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली बहुतेक. पुढे वर्षभरात माझ्या आईचं निधन झालं. आई गेल्याने माझे वडील अगदी पार खचून गेले. त्यांनी कामावर जाण बंद केलं. दिवसच्या दिवस एकटे घरात बसून रहायला लागले. रोज त्यांना जेवणाचा डबा पाठवणं आणि त्यांची विचारपूस करणं जिकिरीच होत होतं. आम्ही त्यांना, ‘तिकडे एकटे राहू नका’ असं म्हणायचाच अवकाश होता. ते लगेचच आमच्या कडे रहायला आले. सर्व सुरळीत चाललं होतं. मोहनच्या नोकरीतून आणि माझ्या कामातून आमचं जेमतेम भागत होतं. मुलांचं शिक्षण, पाहुणे, रोजचा पाच जणांचा खर्च, बँकेचे हप्ते, सगळं मिळून ओढाताण होत होती. मुलानापण ते बहुदा समजत असाव. त्यांनी कधी कशासाठी हट्ट केला नाही. किंवा कधी वायफळ खर्च केला नाही. जमा-खर्चाचा ताळमेळ बसावा म्हणून मोहनने कारखान्यातील असेम्ब्ली च काम घरी आणायला सुरुवात केली. पुढे वर्ष-दोन वर्ष बरी गेली. एक दिवस मोहनला झोपेतच attack आला!

मोहनच्या निधनानंतर मात्र मी पार खचून, गोंधळून गेले. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर आली होती. हि मी कशी पेलणार होते? मुलाचं शिक्षण व त्यावरील वाढता खर्च, आमच्या जगण्यावर, जेवण्या खाण्यावर होणारा खर्च मी कशातून भागवणार होते? हे घर, हा डोलारा मी एकटी, माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात कसा सांभाळणार होते? घरात दुखः करत, रडत बसून भागणार नव्हतं. मी माझी सर्व दुखः बाजूला सारून कंपनीतील साहेबाना जाऊन भेटले आणि ‘मला काहीतरी काम द्या’ अशी विनंती केली. त्यांचा ८ दिवसात होकारार्थी निरोप आला. मोहनला जाऊन दोन महिने पूर्ण होण्या आधीच मी कंपनीत कामाला लागले. चार घरची काम करून महिन्याला मिळणार्या पगारापेक्षा कंपनीत मिळणारा पगार खूप जास्त होता. त्यानी आमची आर्थिक गणितं सुटायला लागली. हे जरी खरं असलं तरी माझी खूप धावपळ होऊ लागली. घरकामाला वेळेची मर्यादा नसते. १० मिनिटं उशीर झाला म्हणून कामवाल्या बायकांनी कधी कटकट केली नाही. किंवा पगार कापला नाही. कंपनीत तसं नव्हतं. एक मिनिट पण उशीर झालेला चालत नसे. घरातील काम, स्वैपाक, बसचा प्रवास व त्यासाठी बस-स्टोप पर्यंत करावी लागणारी पायपीट, आणि कंपनीतील कष्टाची काम! सगळ्यांनी जीव दमून जायचा.

त्या काळात संजय मला देवासारखा भेटला. एक दिवस मी बसची वाट बघत उभी होते तेंव्हा तो मोटर-सायकल वरून आला आणि म्हणाला, “म्याडम, तुम्हाला घरी सोडू का? मी तुमच्या घरापाशीच रहातो. तुमच्या पुढच्या कंपनीत कामाला आहे. मी तुम्हाला रोज बघतो.”

हो-नाही म्हणत मी त्याच्या मागे त्याच्या गाडीवर बसून घरी आले. त्यांनी मला घराच्या कोपर्यावर सोडलं. रोजच्या पेक्षा अर्धा तास मी लवकर घरी पोहोचले. घरात शिरतानाच वडिलांनी विचारलं,” काय ग मनीषा, बस लवकर मिळाली वाटतं?” मी होकारार्थी मान हलवली आणि कामाला लागले.

हे असं वरचेवर घडू लागलं. मला पण संजयच्या येण्याची, त्याला भेटण्याची, त्याच्याशी चार गोष्टी बोलण्याची सवय व्हायला लागली. बर वाटत होतं. समवयस्क पुरुषाशी बोलण्याचा, काही गोष्टीत त्याचा सल्ला घेण्याचा अनुभव नवीन होता, पण सुखद पण होता. आपली जबाबदारी कोणीतरी वाटून घेताय असं वाटायला लागलं. माझं हे असं रुटीन बर चालल होतं. एक दिवस माधव घरी आला आणि मला जाब विचारल्याच्या आवाजात म्हणाला, “आई तू रोज कामावरून घरी कोणा बरोबर येतेस? कोण आहे तो माणूस? आणि आता नाही म्हणून खोटं बोलू नकोस. माझ्या मित्रांनी तुला पाहिलं आहे, त्या माणसाच्या गाडीवरून उतरताना!”

माधवनी अचानक विचारलेल्या प्रश्नानी मी थोडी गोंधळून गेले. मी पहिलं जे मनात आल ते सांगितलं. “त्याचं नाव संजय आहे. तो माझ्या कंपनीतल्या मैत्रिणीचा भाऊ आहे. आणि आजच मला सोडायला आला होता. रोज काही येत नाही.” “आणि काय रे माधव, तू आईला जाब विचारण्या इतका मोठा कधी झालास?”

इतका वेळ शांत बसलेले वडील माधवची बाजू घेत म्हणाले, “हे बघ मनीषा, माधवनी विचारलेला प्रश्न चुकीचा नाहीये. मागच्याच आठवड्यात कोपर्यावरचा वाणी मला देखील विचारत होता, ‘काका तुमच्या मनीषाला हल्ली खूप वेळा कोणाच्यातरी गाडीवर बसून येताना बघितलं. आता ह्या वयात तिचं दुसरं लग्न लाऊन द्यायचा विचार-बिचार नाही ना? मी आपलं सहज विचारलं. असलाच विचार तर आम्हाला बोलवायला विसरू नका.’ असं म्हणत तो कुचेष्टेनी हसला.”

माधव लगेच म्हणाला, “आई, म्हणजे माझे मित्र म्हणत होते ते खरं आहे तर. माझे मित्र मला त्यावरून हसतात. आजपासून तू त्या माणसा बरोबर यायचं नाही. आणि यायचं असेल तर ह्या घरात राहायचं नाही. तुझं हे असं वागणं चालणार नाही.”

त्या दिवशी सगळेच खूप चिडलेले होते, म्हणून मी काहीच बोलले नाही. पण हे अलीकडे वरचेवर होतंय. आज तर माधवनी सगळ्याची परिसीमाच गाठली, “त्यांनी मला जवळ जवळ हाताला धरून घराच्या बाहेर काढलं.”

मनीषा बोलायची थांबली. थोडं पाणी प्यायली आणि म्हणाली, “ताई, मी काय करू? कुठे जाऊ? कशी राहू? मला काही समजत नाहीये. मला प्लीज मदत करा.”

तिच्याशी बोलताना असं समजलं की ते रहात असलेलं घर तिच्या आणि मोहनच्या नावावर होतं. ह्याचा अर्थ तिचा त्या घरावर मालकी हक्क आहे. मोहनच्या निधनानंतर मुलांचा पण त्या घरावर हक्क आहे. तिने आमच्याकडे लेखी तक्रार दिली. त्याच्या आधारे आम्ही तिच्या वडिलांना आणि माधवला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं, आणि त्यांना कल्पना दिली की, “मनीषाला घराबाहेर काढायचा त्यांना अधिकार नाही. त्या दोघांनी तसं करू नये.”

ठरल्याप्रमाणे ८ दिवसांनी माधव त्याच्या आजोबाना घेऊन आला. मनीषा थोडी उशिरा आली. ती कंपनीतून परस्पर आली होती. तिच्या बरोबर संजय पण होता, पण तो बाहेर थांबला होता. माधवनी बोलायला सुरुवात केली,”म्याडम, मला, माझ्या आई-वडिलांनी आमच्या साठी काय केलाय, किती कष्ट उपसले आहेत, ह्याची चांगलीच कल्पना आहे. मी माझ्या आईला देवा समान मानतो. पण तिने ह्या माणसा बरोबर गाडीवर बसून घरी येणं थांबवावं. गल्लीतले लोक तिच्या बद्दल खूप विचित्र बोलतात. ते ऐकवत नाही. माझे मित्र माझी चेष्टा करतात. माधुरीला काय ऐकावं लागत असेल, तिचं तिलाच ठाऊक. तिने ह्याबद्दल कधी एक अवाक्षर पण काढल नाही. पण तिच्या समोर काहीतरी बोललं जातच असेल. ताई आम्हाला ह्या गोष्टींचा त्रास होतो. आमचं बाकी काही म्हणणं नाही. आईनी बाहेर जावं, नोकरी करावी, चार पैसे कमवावेत आणि तिचं आयुष्य सुखात जगावं. पण हि व्यक्ती तिच्या आयुष्यातून जायला हवी. त्याचं नाव आमच्या आईशी जोडलेलं चालणार नाही. त्या व्यक्तीला सोडून आई यायला तयार असेल तर तिला आम्ही आज पण घरात घ्यायला तयार आहोत.”

“माधव, तुझा थोडा गैरसमज होतो आहे. तू तुझ्या आईला त्या घरात राहण्याची परवानगी देणारा कोण? घर आईच्या आणि तुझ्या वडिलांच्या नावावर आहे. मनीषाने त्या व्यक्तीसोबत यावं की नाही, तिच्या अश्या वागण्याने तुम्हाला होणारा मानसिक त्रास, तुमची होणारी बदनामी हे मी समजू शकते. ह्याबद्दल चर्चा करायलाच तुम्हाला बोलावलं आहे. मला सांग, तुझ्या आईनी काम करून चार पैसे कमवण्याची तुमची गरज आहे. घरातली सगळी काम, प्रवासाची दगदग, कंपनीत करावं लागणारं कष्टाचं काम, ह्या सगळ्यांनी ती दमून जाते. ह्या सगळ्यात तू तिची काय व कशी मदत करू शकशील? असा विचार करूया. घर कामात मदत करशील का? घरातील स्वच्छता, कपडे धुवायचे, भांडी घासायची, अशी मदत? तू आणि तुझी बहिण, दोघं मिळून घर सांभाळा आणि ती नोकरी करेल. चालेल का? गाडीवर बसून येणं हि तिची चैन नसून, लफडं नसून, एक गरज असू शकेल का? वेळ आणि दगदग वाचवण्यासाठी?”

ह्यावर माधव पटकन म्हणाला,”ताई, माधुरी यंदा १२ वीत आहे. तिने अभ्यासच करायला हवा. तुम्ही म्हणता तशी मी जर घरातील काम केली तर माझे मित्र माझ्यावर हसतील. माझी चेष्टा करतील. खिल्ली उडवतील. मला जगू देणार नाहीत. मी घरात काम करायचा काही संबंधच नाही. मी पण नोकरी शोधतोय. मिळाली की लावीन घरखर्चात हातभार! आम्ही काम केलं किंवा नाही केलं तरी तिला असं जगायचा काय अधिकार? आणि हा तिला कोणी दिला? महत्वाचं म्हणजे तिने त्याच्या सोबत येणं बंद करावं.”

इतका वेळ सगळं शांतपणे मनीषा ऐकत होती. ती म्हणाली, “ठीक आहे. आज पासून मी नाही येणार त्याच्या सोबत. पण घरातील काम मला जेवढ आणि जसं जमेल तसं मी करीन. मलाही हे एकटीने रेटण बास झालाय.”

त्यानंतर जवळ जवळ ३-४ महिने सगळं शांत होतं. एक दिवस अचानक माधवचा फोन आला,” ताई, माझ्या आईला काहीतरी समजावून सांगा ना. ती अजून त्या माणसा बरोबर फिरते. त्याचा माझ्या आईशी काय संबंध? त्या दोघांनी ह्याचा खुलासा करावा. त्या दिवसानंतर तिचं घरातील वागणंच बदललाय. घरात फारसं लक्ष देत नाही. घरी वेळेवर येत नाही. आणि फारसं कोणाशी बोलत देखील नाही.”

आम्ही फोन करून मनीषा आणि संजयला भेटायला बोलावलं. कंपनीतून ते दुसर्या दिवशी आले. मनीषाच्या बोलण्यातून हे जाणवत होतं की ‘संजय सोबत लग्न करायची तिची तयारी आहे. तयारी पेक्षा इत्छा आहे. ह्यावर संजय उडवा-उडवीची उत्तरं द्यायला लागला. त्याच्या मते मनीषा सोबत लग्न करण्याचा त्याने कधी विचार पण केला नव्हता. तो तिला कंपनीत जाताना-येताना लिफ्ट द्यायचा, तिला फिरायला घेऊन जायचा, हे सर्व तिला बर वाटत होतं, तिला आवडत होतं म्हणून. “एकट्या बाईसाठी आपली थोडी समाजसेवा.”

ह्यावर मनीषानी त्याला आठवण करून दिली की आठच दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी लग्न करायच वचन दिलं होतं. मग ते काय होतं?

संजय स्पष्ट काहीच बोलत नव्हता. तो लग्नाला नकार पण देत नव्हता किंवा मोकळ्या मनाने मनीषा बद्दलच्या त्याच्या भावना मान्य पण करत नव्हता.

त्या दिवशी काहीच ठरलं नाही. १ महिन्यानी पुन्हा भेटायचं ठरलं. ह्या वेळेस मात्र संजयने त्याचं म्हणणं स्पष्टच मांडल. तो म्हणाला, “माझी लग्न करायची तयारी आहे, पण लग्न करून आपण रहाणार कुठे? रस्त्यावर? माझ्या खोलीचं आधीच दोन महिन्याचं भाडं थकलाय. ते मी देऊ शकलो नाही तर ह्या महिना अखेरीस मला माझी रूम खाली करावी लागेल. मी तुला आधीच सांगितलं होतं की लग्नानंतर तुझ्या घरात राहू. खरं तर घर तुझ्या नावावर आहे. तुझे वडील आणि मुलं तिथे अजून किती दिवस रहाणार आहेत? एक तर त्यांनी बाहेर जावं नाहीतर आपण सगळे तिथेच एकत्र राहू.”

 

“हे कसं शक्य आहे? माधवला तर तू माझ्याशी बोललेपण आवडत नाही. माझे वडील तुला घरात राहू देणार नाहीत. वडिलांची तब्येत आज-काल ठीक नसते. त्यांच्या अश्या अवस्थेत मी त्यांना घरातून जा नाही म्हणू शकणार. माधुरीचं शिक्षण पूर्ण व्हायला ६ महिने शिल्लक आहेत. ते झालं की तिचं लग्न लाऊन तिची सासरी पाठवणी केली की मग आपण माधवशी हे बोलूया. आपण तुझ्या खोलीचं भाडं भरून तिथे राहू शकतो ना? तू तसा विचार करून बघ ना?” असं मनीषाने बारीक आवाजात सुचवून पाहिलं.

“हे बघ मनीषा, आपण लग्न केलं तर तुझ्याच घरात राहू. ते कसं मेनेज करायचं ते तू बघ. त्या घरावर तुझाच तर हक्क आहे. मग प्रोब्लेम कुठे आहे?” असं म्हणत संजय जायला उठला.

त्या दिवशी त्याला आम्ही सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला की त्या घरावर मनीषाचा जितका हक्क आहे तितकाच तिच्या मुलांचा पण आहे. आणि वडिलांना संभाळण तिची जबाबदारी आहे. तेंव्हा ती त्यांना घराबाहेर काढू शकत नाही.

“म्याडम, मनीषा नी काय करायचं हे तिने ठरवावं. मी माझी अडचण सांगितली. अजून एक मार्ग निघू शकतो, घर विकून आपापल्या हिश्याचे पैसे घेऊन मोकळे होऊ दे.”

पुन्हा काही निर्णय होऊ शकला नाही. पण ह्या वेळेस मात्र मनीषा म्हणाली, “ताई मलाच ह्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, हे माझ्या लक्षात येतंय. मी सगळ्यांशी मोकळी चर्चा करते आणि काय ठरतंय ते ८ दिवसात कळवते.

८ दिवसाचा महिना होऊन गेला तरी मनीषा चा काही निरोप आला नाही म्हणून चौकशी केली तर समजलं की तिच्या वडिलांचं १५ दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

पुढे एका महिन्यानी मनीषा आणि माधव ऑफिस मधे आले. मनीषा संजय सोबत लग्न करणार हे माधवला समजलं होतं. आता प्रश्न घराचा होता. तो कसा सोडवायचा ह्यासाठी दोघं ऑफिसमधे आले होते. दोघं आपापल्या मतांवर, मुद्द्यांवर ठाम होते. माधवच स्पष्ट म्हणणं होतं की, हे त्याच्या आईचं आयुष्य आहे. तिला कसं जगायचं ते तिचं तिने ठरवावं. पण संजयशी लग्न केल्यावर तिने त्यांच्या बरोबर रहाता काम नये. संजय त्या घरात आलेला चालणार नाही. आणि दुसरं, संजयशी लग्न केलं तर तिचा आमच्याशी काहीही संबंध रहाणार नाही. माधुरीचं लग्न लावायची जबाबदारी एक भाऊ ह्या नात्याने तो, माधव घेणार. सर्वात महत्वाचं, कुठल्याच परिस्थितीत घर विकायचं नाही. ह्यावर मनीषा म्हणाली, “मी आणि संजय लग्न करणार आहोत. माधुरीची जबाबदारी तिचे पालक ह्या नात्याने आम्ही घेऊ. घर विकून आपापला हिस्सा घेणं माधवला मान्य नसेल तर नाईलाजाने आम्हाला त्या घरात राहावं लागेल. त्या संदर्भात जे काही लिहून घ्यायचं ते लिहून घ्या.”

हि सगळी चर्चा संजय ऑफिसच्या दारात उभा राहून ऐकत होता.

  ऑफिसमधील चर्चा जसजशी तापायला लागली तसा तो ऑफिसमधे आला आणि म्हणाला, “मला काय वाटतं म्याडम, एवढा वाद घालण्यापेक्षा, दोघांना सांगा, घर विकून मोकळं व्हा आणि आपापली आयुष्य सुखानी जगा.  त्याला बघितल्यावर माधव आईला उद्देशून चिडून म्हणाला, “हा माणूस इथे काय करतोय? आई, हा तुझा यार असेल, लफडं असेल. तुमच्या दोघांमधलं नातं काय आहे हे समजून घेण्याची माझी इत्छा नाही. तो तुला पुढे करून, तुझ्या भावनांशी खेळून स्वतःचा फायदा करून घेतोय. हे तुला समजत कसं नाहीये? पण जाऊ दे. ते बोलायची वेळ निघून गेली आहे. घर विकायचं नाही आणि हि व्यक्ती आमच्या घरात नको, हे फायनल!”

“घर विकायचं नसेल तर लग्नानंतर मी आणि संजय त्याच घरात रहाणार हे माझं पण ठरलाय.”

दोघांना समजवायचा खूप प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. हा प्रश्न सोडवण्याचे दोनच मार्ग आहेत. समजुतीने एकत्र रहा. किंवा समजुतीने घराची वाटणी करा. नाहीतर कोर्टात जाऊन केस दाखल करून आपला हाच हक्क कायद्याच्या मदतीने मिळवा.

त्या दिवशी सगळे निघून गेले. त्यानंतर मनीषा आणि संजयनी, ठरल्या प्रमाणे लग्न केलं आणि ते मनीषाच्या घरी रहायला गेले. अपेक्षेप्रमाणे माधव आणि संजय मधे खूप बाचाबाची आणि मारामारी झाली. दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशन मधे तक्रार केली. पोलिसांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही दिला तोच सल्ला दिला. त्यांना तो मान्य नव्हता. माधव आणि संजय मधे भांडणं होतंच राहिली. कालांतरानी पोलिसांनी पण दखल घेणं सोडून दिलं. आज दोघांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. कोर्टातल्या चकरा आणि वकिलाचा खर्च ह्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काहीच फरक  पडला नाहीये.

आजच्या घडीला एकच सुधारणा झाली आहे की आई आणि मुलगा यांच्यात ते घर विकून येणारे पैसे वाटून घ्यावेत असं ठरलंय.आता पुढचा वादाचा मुद्दा आहे कोणाला किती हिस्सा मिळणार हा!

एकूण काय मोहननी कष्टानी घर बांधलं खरं, पण ना त्याला त्याचा फार काळ उपभोग घेता आला नाही. ना त्याच्या कुटुंबाला ते सांभाळता आल ना उपभोगता! मनिषाने स्वतः कष्ट करून बांधलेल्या घराचं काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी तिच्या आयुष्यातले दोन पुरुष एकमेकांशी भांडत होते. कारण बाईला कमावण्याचा अधिकार जरी मिळालेला असला तरी खर्च करण्याचा अधिकार मात्र अजूनही फार दूर आहे.

Tuesday, 17 January 2023

संशयात्मा विनश्यति

 

राधा, स्मार्ट, चुणचुणीत महिला! महिला कसली, मुलगीच म्हणायला हवे. तिचे अंदाजे वय २२-२३ असावे. काळी सावळी, किरकोळ अंगयष्टी. शिक्षण बेताचे पण चेहेर्यावर एक वेगळाच आत्मविश्वास! त्या दिवशी ती आली ती तक्रार नोंदवायला, मदत मागायला, तिच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून-त्यांचे  वडील घरात परत यावेत म्हणून. तिच्या बरोबर एक ६ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी होती. तिचं एकच म्हणणं होतं, “ताई, माझ्या नवर्यानी, ह्या मुलांच्या बापाने घरी यायला नको का? जे काही भांडण आहे ते आमच्या मधे आहे. त्यात ह्या लेकरांची काय चूक? त्यांनी घरी यायला हवं, घरचं खर्चापानी बघायला हवं, मुलांना काय हवं-नको ह्याची चौकशी करायला हवी. नुसता बाप झाला की सगळं झालं का? त्याची काही जबाबदारी नाही का? हि पोरं काय माझी एकटीची जबाबदारी आहेत का? ताई, तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता बोलवा आणि चांगल खडसावून विचारा.”

राधा सारख्या कावलेल्या अवस्थेत जेंव्हा एखादी महिला येते तेंव्हा तिला थोडं रीलेक्स व्हायला वेळ दिलेला बरा असतो. तिच्या समोर एका ग्लास मधे पाणी ठेऊन आम्ही तिने सांगायची वाट बघत बसलो. तिने एक घोट पाणी प्यायल, ५ मिनिटं डोळे मिटून बसली आणि मग १० मिनिटं ती एकटीच बोलत होती. “ताई, माझी ७वी ची परीक्षा झाली. मार्क पण चांगले मिळाले होते. मला पुढे शिकायचं होतं. गावात शाळा नव्हती. माझं माहेर त्र्यंबक जवळच्या खेडेगावातील. पुढील शिक्षणासाठी जवळची शाळा त्र्यंबकला होती. मुलीला एकटीला इतकं लांब पाठवणं वडिलांना मान्य नव्हतं. म्हणून वडिलांनी असं जाहीर केलं आणि आईला सांगितलं की ‘आता राधाचं शिक्षण बंद. तिला स्वैपाक, घरकाम शिकवा आणि चांगलं स्थळ आल की उजवून टाकू.’

“झालं! माझ्या स्वप्नांवर वडिलांनी त्यांच्या कळत नकळत एक बोळा फिरवला आणि माझ्या आयुष्याचं सगळं गणितच विस्कटल. माझं वय जेम-तेम १५-१६ असेल. आमच्या गावातील केशवचे स्थळ सांगून आले. आमच्या सारखी त्यांची परिस्थिती पण बेताचीच होती. हातावर पोट! रोज मोलमजुरी करायची, जे पैसे मिळतील त्याचा शिधा आणायचा, दोन घास खायचे आणि आजचा दिवस चांगला पार पडला म्हणून देवाचे उपकार म्हणत झोपायचे. केशव माझ्या पेक्षा ८ वर्षांनी मोठा होता, पण त्यांनी काही कोणाला फरक पडणार नव्हता. तो १०वी नापास होता, निर्व्यसनी होता, मोठ्यांचा आदर करणारा होता आणि मुख्य म्हणजे कष्ट करायची तयारी होती. मुलीचं लग्न लावायला अजून काही बघण्याची आवश्यकता नव्हती.

“स्थळ सांगून आल्यापासून चार महिन्यात माझं लग्न उरकलं आणि माझी सासरी पाठवणी झाली. जेमतेम १५ वर्षांची मी संसाराला लागले. मी अठरा वर्षांची झाले तेंव्हा माझ्या पदरी दोन मुलांची जबाबदारी आणि रोजची ओढाताण आणि काटकसरीचा संसार मागे लागला होता.

“माझ्या बरोबर शाळेत शिकणारा प्रकाश, एक दिवस अचानक मला बाजारात भेटला. माझी अवस्था बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं. माझं लग्न झालाय आणि मला दोन मुलं आहेत ह्याच्यावर त्याचा विश्वासच बसेना. “अग राधा, काय हि तुझी अवस्था? हे सगळं कधी आणि कसं झालं? मला कोणी काहीच बोललं नाही. म्हणा मागील ५-७ वर्षांपासून मी पण गावात आलो नाही. ७वी नंतर माझ्या आई-वडिलांनी माझी रवानगी, शिक्षणासाठी, नाशिकला काकांकडे केली. अग, कसलं भारी आहे नाशिक! मोठे रस्ते, मोठी घरं, मोठ्या शाळा, खूप सगळ्या गाड्या. खूप मजा आहे. सुरवातीला काही दिवस मी खूप भांबावून गेलो होतो, पण आता तेच भारी वाटतंय. आता गावी परत यायची इत्छाच होत नाही. आता वडिलांना बर वाटत नाही म्हणून आलोय. मी आहे ८-१५ दिवस. जमलं तर भेटूया.”

“मी त्याच्याशी बोलत बसले आणि घरी पोहोचायला बराच उशीर झाला. घरात पाय ठेवला आणि सासूबाईनी ‘उशीर का झाला?’ असं विचारलं. मी काही बोलणार तेवढ्यात केशवचे माधवकाका म्हणाले, “तिला काय विचारतेस? पाटीलांच्या प्रकाशसोबत बाजारात गप्पा मारत उभी होती. अक्खा गाव बघत होता. पण हिला कशाशी काही घेणं नव्हतं.” मग काय माझ्या सासू-सासर्यांनी माझी अक्कल, माझी लाज, माझे संस्कार असा सगळ्यांचा उद्धार केला. मी काहीच बोलले नाही. म्हटलं तर चूक माझी होती. मी निमूटपणे स्वैपाक केला आणि सर्वांना जेवायला वाढलं. त्या रात्री मी जेवलेच नाही, पण त्याने कोणाला काहीच फरक पडला नाही. उलट सासुच  म्हणणं होतं, ‘त्या पोरासंग गुलूगुलू गप्पा मारून महाराणीच पोट भरलं असेल.’

दुसर्या दिवशी आमच्या घरी, माझ्या सासरी एक बैठक बोलावली. त्यात माझ्या माहेरची माणस, माझे सासू-सासरे, केशव, माधवकाका आणि त्यांचा नाशिकला कंपनीत नोकरी करणारा मुलगा-रमेश, असे सर्व हजर होते. अपेक्षे प्रमाणे विषय ‘मीच’ होते. मी अक्षम्य गुन्हा केल्या सारखी एका कोपर्यात गप्प उभी होते आणि बाकीची मंडळी माझ्या बेताल, बेजबाबदार वागण्यावर काय तोडगा काढता येईल ह्याचा विचार करत होते. बहुतेकांच असं मत होतं की केशवने मोकळं व्हावं. झालेल्या प्रकाराची गावात इतकी चर्चा होईल की गावात राहणं अवघड होईल. माझे आई-वडील गयावाया करत होते. केशवच्या पाया पडून विनवणी करत होते, ‘ह्या बारीला आमच्या पोरीला माफ करा. पुन्हा ती अशी चूक करणार नाही.’ आईने उठून माझ्या पाठीत एक धपाटा घातला आणि म्हणाली, ‘ए राधे, सगळ्यांची माफी माग. आणि म्हण की तू पुन्हा अशी चूक करणार नाही.’ माराच्या भीतीने मी सर्वांची त्या दिवशी माफी मागितली खरी, पण आज पर्यंत ‘आपल्या शाळेत सोबत शिकणाऱ्या एका मुलासोबत थोडा वेळ बोलणं हा गुन्हा कसा असू शकतो?’ हे मला समजले नाही.

केशवच्या घरच्या लोकांना फारकत हाच योग्य मार्ग आहे असं वाटत होतं. पण माधवकाकांच वेगळंच म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘हिला केशवने मोकळं केलं तर मग तर ती तिच्या मर्जी प्रमाणे वागेल. अजून लफडी करायला मोकळी. फारकत बिरकत काही नाही. रमेश, तू ह्या दोघांना नाशिकला घेऊन जा आणि तुझ्या ओळखीने केशवला कुठेतरी काम मिळवून दे.”

झालं! सामान बांधून, म्हणजे आमचे आणि पोरांचे चार कपडे पिशवीत भरून आम्ही दुपारच्या बसने नाशिकला आलो. बरोबर सासूने काहीच घेऊ दिले नाही-ना पैसे, ना धान्य, ना भांडी कुंडी, ना अंथरून, ना पांघरून. आम्ही रमेशदादांच्या भरोश्यावर आणि चांगुलपणावर अवलंबून, इथून पुढे सर्व ठीक होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करत नाशिकला आलो. गाव सोडल्यावर जवळ-जवळ पहिला महिना रामेशदादांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे उपकार मी जिंदगीभर नाही विसरायची. नाशकात आल्यावर १५ दिवसात केशवला कंपनीत काम मिळालं. १५ दिवसांनी पगाराचे पहिले पैसे मिळाले. आम्हाला दोघांना खूप भारी वाटलं.

गावापेक्षा शहरात पैसे जास्त व नियमित मिळत होते. काट-कसरीची सवय होतीच. हळूहळू आम्ही नाशिकमध्ये स्थिरावलो. भाड्याची खोली घेतली, संसाराला लागणारी चार भांडीकुंडी घेतली. गावाकडील घटना विसरून नव्यानी संसाराला लागलो. मुलगा ५ वर्षांचा झाला आणि त्याला जवळच्या शाळेत दाखल करायचं ठरलं. आम्ही दोघं मुलांना घेऊन शाळेत गेलो. प्रवेश अर्जासोबत काही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता होती. केशव सर्व गोष्टींची पूर्तता करत होता. मी मुलांना घेऊन शाळेच्या आवारात बसले होते. केशव एडमिशनचं काम उरकून आला. दोघे आनंदात घरी जायला आम्ही निघणार तेवढ्यात प्रकाशनी आवाज दिला,” राधा, इथे कुठे?” त्याच्या चेहेर्यावर आश्चर्य होतं.

आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं, पण माझ्या चेहेर्यावर आश्चर्य होतं आणि केशवच्या चेहेर्यावर नाराजी आणि राग होता. त्यांनी रागातच माझा हात घट्ट पकडला आणि एक शब्दही न बोलता मला घरी घेऊन गेला. आता विचार करतीये तर लक्षात येतंय की त्या दिवसापासून केशवच वागणंच बदललं. ताई, तुम्ही त्याला बोलावून घ्या.”

त्या दिवशी प्रकाश आमच्या मागे मला हाका मारत आला. त्याच्या जवळ एक पुस्तक होतं ते त्याला माझ्या मुलांना द्यायचं होतं. (खरं तर त्याने ते पुस्तक त्याच्या भाच्या साठी घेतलं होतं, पण माझा मुलगा पहिल्यांदाच शाळेत जाणार होता म्हणून कौतुकाने द्यायचं असेल.) पण केशवने काही ऐकूनच घेतलं नाही. आम्ही तिथून तडक घरी आलो. पुढचे ८-१० दिवस घरात केशवने अबोला धरला. तो जेवायला आणि मोकळा वेळ रमेशदादा कडेच राहू लागला. एवढंच नाही तर कधी-कधी तिकडेच २-२ दिवस मुक्कामी थांबायचा. दोन मुलांना घेऊन एकटीने राहायची मला भीती वाटत होती. केशवशी काही बोलायला गेलं की तो चिडायचा. एकदा तर त्याने मला मारायला हात पण उचलला होता. पुढे तर त्याने खर्चायला पैसे देणं पण बंद केलं.घरात भरलेला शिधा ८-१५ दिवस पुरला. पुढे काय करायचं? घर कसं चालवायचं? म्हणून मी मुलांना घेऊन रमेशदादाच्या घरी गेले. तिथे सगळे आनंदात गप्पा मारत जेवत होते. सकाळ पासून मुलं उपाशी होती. ती धावत केशव कडे गेली आणि त्याच्या ताटातून जेवायला लागली. हे बघून केशव खूप चिडला आणि मला आणि मुलांना ओढतच घरी घेऊन आला. “राधा, तुझ्या मुलांना काही संस्कार नाहीत. जेवण बघितल्यावर भिकार्यासारखी जेवायला बसली.” (माझी मुलं! त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही का? त्यांनी मुलांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी, खर्चाला थोडे पैसे दिले असते तर आमची मुलं पण ‘भिकार्यासारखी’ वागली नसती. खरंच भूक सहन करणं एक वेळ आपल्याला जमेल पण ह्या लेकरांना ते अवघड आहे. एवढं पण त्यांच्या बापाला समजू नये. मजेत जेवत होता ....)

“ताई, त्या दिवशी मला खूप राग आला. मी पण मग खूप बोलले. आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. केशवने मला मारलं. मुलं भुकेनी आणि घाबरून रडत केंव्हातरी झोपली. मला झालेली मारहाण, माझा झालेला अपमान ह्याच्यामुळे मला झोप लागत नव्हती. माझ्या मनात एकच विचार येत होता, हा गुंता सोडवायचा कसा? गावी जायची सोय नाही, इथे कोणाशी ओळख नाही. काय करावं? काही सुचत नव्हतं. नाही म्हणायला प्रकाश होता ओळखीचा. पण त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता. आणि त्याच्याशी बोलल्यामुळेच तर हे सगळं रामायण आणि महाभारत आपल्या आयुष्यात घडत होतं.

मी केशवशी बोलायचा खूप प्रयत्न केला. पण त्याने माझ्याशी संबंध तोडल्यासारखेच तो वागत होता. शेवटी मी लोकांची धुणंभांडी करायचं ठरवलं. त्यांनी वेगळाच प्रोब्लेम झाला. त्याला वाटतंय मी प्रकाशलाच भेटायला जाते, कामाचा बहाणा करून. ताई, काय करू? मला काही समजत नाहीये. त्याच्या मनाला संशयानी इतकं ग्रासलं आहे की मी काही पण केलं, कितीही समजावलं तरी त्याला समजावून सांगू शकणार नाही.”    

राधाला गावी परत जायची भीती वाटत होती. नाशिकमध्ये रमेशदादा आणि केशवच्या व्यतिरिक्त कोणी तिच्या ओळखीचं नव्हतं. तिची आणि तिच्या मुलांची आधारगृहात सोय केली. राधानी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही केशवला बोलावल्यावर तो पहिल्यांदा यायला तयारच नव्हता. रमेशनी समजावल्यावर तो जवळ जवळ एका महिन्यानी आमच्या ऑफिसमध्ये आला.

कंपनीच्या जेवणाच्या सुट्टीत केशव आला होता, त्यामुळे त्याच्याकडे फार वेळ नव्हता. त्यांनी तशी विनंती केली आणि बोलायला सुरुवात केली. किरकोळ शरीर, दिसायला सामान्य, मळकट कपडे, थकलेला चेहेरा, चेहेर्यावर थोडा राग, थोडा अविश्वास आणि बरचसं टेन्शन! “ताई, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. लग्न करून राधा आमच्या घरात आली तेंव्हा चांगली होती. तिच्या बद्दल कोणाची काही एक तक्रार नव्हती. पण प्रकाश सोबत तिचं लफडं आहे असं काकांनी सांगितल्यापासून माझं सगळ आयुष्यच पालटून गेलं. गावातील बदनामी टाळायला तिला घेऊन मी नाशिकला आलो. रमेशदादानी खूप मदत केली.शून्यातून संसार उभा केला. काही महिने सुखात गेले. आणि एक दिवस आमच्या आयुष्यात पुन्हा तो आला, आमच्या सुखी संसाराची वाट लावायला. राधाला मी खूप सांगायचा प्रयत्न केला, पण ती माझं काही ऐकत नाही. आता तिने इतकी लाज सोडली आहे की दिवसा ढवळ्या, मी कामावर गेलो की ती त्याला भेटायला जाते. ना मी सुखानी जगू शकत, ना चार क्षण आनंदात घालवू शकत. आजपर्यंत माझ्या कामाबद्दल कंपनीत कोणाची तक्रार नव्हती. आजकाल कामात पण चुका होतात. तुम्हीच सांगा मी काय करू? मला तर तिचं तोंड बघायची पण इत्छा नाहीये.”

आम्ही त्याला खूप समजावलं तेंव्हा तो एकत्र बैठकीसाठी यायला तयार झाला, तो पण एका अटीवर. ‘त्याचे आई-वडील आणि तिचे आई-वडील पण तेंव्हा हजर हवेत. जो निर्णय होईल तो सर्वांच्या मर्जीनुसार होईल.’

ठरल्याप्रमाणे १५ दिवसांनी राधा-केशव आणि त्यांचे नातेवाईक मीटिंग साठी आले. अपेक्षेप्रमाणे खूप वादावादी, बाचा-बाची झाली. सुरुवातीला कोणालाच राधाचं म्हणणं मान्य नव्हतं. ती सांगायचा प्रयत्न करत होती की, प्रकाश आणि ती एका शाळेत ७वि पर्यंत एकत्र शिकत होतो. एवढीच आमची ओळख आहे. तुम्हाला वाटतंय तसं आमच्यात काही नाही. उलट केशवच नको नको ते विचार करून स्वता दुखी होतोय आणि आमचं जगणं अवघड करतोय. कोणी तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. राधा एकीकडे आणि जमलेली मंडळी एकीकडे, असं चित्र होतं.

सर्वांच्या समक्ष आम्ही राधा आणि केशवला बसवलं आणि काय घडलं, कसं घडलं, ह्या संदर्भात प्रश्न विचारले. दोघांच्या उत्तरांवरून सर्वांच्या लक्ष्यात आल की राधाची काहीच चूक नाहीये. केशवने करून घेतलेल्या गैरसमजुतीचा हा परिणाम आहे. जमलेल्या सगळ्यांनी केशवला समजावून सांगितलं. थोडे आढे-वेढे घेत तो तयार झाला. राधाच्या आईने राधा आणि मुलांना ८ दिवसांसाठी गावी नेण्याची इत्छा बोलून दाखवली. त्यावर केशव म्हणाला, “मामी ८ काय? चांगले १५-२० दिवस घेऊन जा. तिला आणि मुलांना थोडा बदल.”

समझोता झाला. लिखापडी झाली. राधा तिच्या माहेरी गेली. ठरल्याप्रमाणे ३ आठवड्याने राधा, मुलांना घेऊन नाशिकला परत आली. आम्ही आमच्या नियमाप्रमाणे गृहभेट करून आलो. केशवच वागणं थोड तुटक-तुटक वाटलं. पण त्या व्यतिरिक्त सर्व ठीक आहे असं जाणवलं. केशव घरखर्चाला नियमितपणे पैसे देत होता आणि म्हणून राधानी पण बाहेरची कामे सोडून दिली. आम्ही ३-४ गृहभेटी केल्या, ते पण अधून मधून खुशाली सांगायला ऑफिसमधे येत होते. एकूण सर्व ठीक चाललं होतं.

केशव-राधाचा समझोता होऊन साधारण दीड वर्ष झालं असेल. ह्या दीड वर्षाच्या कालावधीत खूप गोष्टी घडून गेल्या. आम्हाला वाटत होतं तसं सर्व ठीक नव्हतं. एक दिवस केशव अचानक ऑफिसमधे आला आणि म्हणाला, “ताई, काहीतरी करा. राधा ८ दिवसापासून घर सोडून निघून गेली आहे. जाताना मुलांना पण सोबत घेऊन गेली आहे. घरात थोडे फार पैसे होते ते पण कपाटात दिसत नाहीयेत. ताई, मी हि नोकरी, हे कष्ट कोणासाठी करतोय? ती कशी पण असली तरी मला ती आणि मुलं हवे आहेत.”

“ती कशी पण म्हणजे काय? आणि सध्या ती कुठे आहे?”

“ती कुठे असणार? गावी! तिच्या भावानी तिला घरात घेतली असेल. आता काय त्याचंच राज्य आणि त्याचीच सत्ता आहे. मागच्या वर्षी राधाच्या आई-वडिलांचं कोरोनाच्या काळात निधन झालं.

‘ताई, तिचं वागणं फार बेताल होत चाललं आहे. प्रकाश वेळी-अवेळी, मी नसताना घरी येतो, काही वेळ घरात असतो. हे बघून माझा संताप झाला आणि मी तिला खूप हाणली. मी काही चुकलोय असं मला अजिबात वाटत नाही. तुमच्या कार्यालयातून समझोता करून तिला नेली तेंव्हाच मी घरात केमेरा बसवून घेतला होता. मला तिचा भरोसाच वाटत नव्हता.

“ताई, तुम्ही तिला बोलावून घ्या. माझी पोरं माझ्या पाशी हवीत आणि माझी बायको माझी भाकर करायला हवी. मी कष्ट करणार आणि ती मजा करणार, हे मला मान्य नाही.”

केशवकडून सागरचा (राधाचा थोरला भाऊ) फोन नंबर घेतला आणि त्याला फोन केला. आम्ही कोण बोलतोय आणि कशा साठी फोन केलाय हे समजल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया होती, “राधा तिकडे येणार नाही. केशवला माझा निरोप सांगा राधा मेली आणि त्यांची मुलं पण मेली. राधाला त्याचं तोंड बघायची पण इत्छा नाही. सॉरी ताई, मी असं बोलायला नको होतं. पण काय करू ह्या माणसानी माझ्या बहिणीचं जगणं मुश्कील करून टाकलाय. एखाद्या माणसाच्या मनात इतका टोकाचा संशय कसा असू शकतो? ८-९ वर्ष झाली तिच्या लग्नाला, पण एक दिवस सुखाचा आला नाही तिच्या नशिबी. मी तिला आता पाठवणार नाही, त्याच्याकडे. मी माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना सांभाळायला समर्थ आहे.”

सागरला खूप समजावून सांगितलं तेंव्हा कुठे तो एकदा राधाला ऑफिसला पाठवायला तयार झाला. तो देखील एका अटीवर, “ती एकटी येणार नाही. मी पण तिच्या सोबत येणार. आणखीन एक, मुलांना आणणार नाही.”

कबूल केल्याप्रमाणे सागर आणि राधा ८ दिवसांनी ऑफिसमधे आले. केशव आणि रमेश पण आले. बोलणी सुरु करणार तेवढ्यात केशवचे आई-वडील आणि काका हजर झाले. त्या सगळ्यांना बघून सागर वैतागून म्हणाला, “राधा चल. आपण घरी जाऊया.” आणि दोघं जायला उठले. केशवच्या नातेवाईकांना बाहेर थांबण्यास विंनती केली. महामुश्कीलीने त्या दोघांना थांबवलं. केशव आणि राधा, दोघांमध्ये बोलणी अशी काही झालीच नाहीत. केशव, राधावर उपकार केल्याच्या भाषेत सारखं म्हणत होता,”ताई, राधानी अक्षम्य चुका केल्या आहेत. खर म्हणजे मला तिचं तोंड बघायची पण इत्छा नाही. पण मला दुसऱ्यांदा लग्न करण्याची इत्छा नाही. दुसरं म्हणजे मला माझी मुलं हवी आहेत. आणि त्या मुलांच्या देख-भाली साठी मी तिला घेऊन जायला तयार आहे. मी सांगेन तसं राहायचं. सांगितल्याशिवाय, विचारल्याशिवाय, घराच्या बाहेर पडायचं नाही. मोबाईल वापरायचा नाही. सागरने येण्या पूर्वी मला फोन करून सांगायला हवं. ह्याचं कारण तिला कधीपण विचारलं की, ‘आज कोण आल होतं?’ तर तिचं उत्तर ठरलेलं असायचं, ‘सागर दादा आला होता.’ मला खोटं बोलण्याचा आणि वागण्याचा खूप राग येतो. मला खोटं सहन होत नाही.”

तो बोलत होता. अधून मधून राधा कडे बघत होता. पण तिच्या चेहेऱ्यावर कोणताच भाव नव्हता. सागरच मधे चिडून म्हणाला, ‘अरे केशव, माझ्या बहिणीवर इतके घाणेरडे आरोप करण्यापूर्वी एकदा तर माझ्याशी बोलून खात्री करून घ्यायचीस की खरं काय घडलंय. अरे मूर्ख माणसा, तुझ्या ह्या विचित्र वागण्याबद्दल ती माझ्याकडे एक चकार शब्द पण बोललेली नाही. मला रमेशचा फोन आला, म्हणून मी तिला आणि मुलांना भेटायला आलो. त्यांची अवस्था माझ्याच्यानी बघवली नाही. म्हणून मीच वरचेवर मला वेळ मिळेल तसं तिला भेटायला येत होतो. मला जेंव्हा येणं शक्य नव्हतं तेंव्हा जाधवांचा गणपत आणि प्रकाशच्या हाती त्यांच्यासाठी खाऊ, काही गरजेच्या वस्तू पाठवत होतो. पण तू कधी माझ्याशी किंवा रमेशशी बोलायचा, विचारायचा, समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाहीस.”

केशव मधेच वैतागून म्हणाला, “सागर, तू का बोलतोयस? तुला कोणी विचारलं आहे का? का आपल्या बहिणीच्या चुकांवर पांघरून घालतोस. आपल्या बहिणीचं प्रकाश बरोबर लफडं आहे, मान्य कर! हिने आयुष्यात माफ न करण्यासारख्या चुका केल्या आहेत. पण मी तिचे सगळे अपराध विसरून तिला घेऊन जायला तयार आहे ना? ताई, काय लिहून घ्यायचं ते घ्या. मला कामावर जायला उशीर होतोय. आणि माझी मुलं कुठे आहेत? ती दिसत नाहीत.”

‘मुलं’ हा शब्द राधाच्या कानावर पडला आणि तिने एकच प्रश्न विचारला, “कुठली मुलं? भिकाऱ्याची मुलं? जी दोन दिवस त्यांच्या बापाच्या कृपेने उपाशी होती आणि जी भुकेनी त्यांच्या बापाच्या पानातून दोन घास आशेनी खायला बसली? ती मुलं त्यांच्या मामाच्या घरी सुखात आहेत. ताई, मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत, मला त्याच्याकडे परत जायचं नाहीये. मला फारकत हवी आहे. त्यांना त्यांची मुलं हवी असतील तर मी ती द्यायला तयार आहे. मुलं काही दिवस त्यांच्या कडे, काही दिवस माझ्याकडे, हे मला मान्य नाही. त्यांना मुलं हवी असतील तर त्यांनी खुशाल न्यावीत. फारकतीचा खर्च किती होईल त्याचा अंदाज द्या. मी किती करायला हवा त्याची कल्पना द्या. माझा दादा माझ्यासाठी खूप करतोय, पण मला जे शक्य आहे ते मी करीन.

‘ताई, माझ्या आयुष्यात प्रकाशचं काही स्थान नव्हतं. तो केवळ माझ्या शाळेतला एक चांगला मित्र आहे. लग्न झाल्यावर मित्र असणं काही गुन्हा आहे का? पण केशवने ते कधी समजून घेतलच नाही. नुसता संशय, भांडणं, मारहाण, अपमान, ह्यापलीकडे काही दिलंच नाही. मी खूप वैतागले आहे. आज असं वाटतंय की प्रकाश सारखा कोणी जोडीदार मिळाला, जो मला समजून घेईल, माझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलेल, तर किती बर होईल. काही दिवस सुखानी जगता जेईल.  

“ताई, मी तुमची खूप आभारी आहे. माझा समझोता होऊन मी केशवकडे गेले, आणि नंतर त्याच्या बरोबर जो काळ त्याच्या सोबत घालवला, त्यात मला एक गोष्ट जाणवली- मी ह्या माणसा बराबर राहू शकत नाही. माझ्यात आणि त्याचात, म्हणजे आमच्या स्वभावात, आमच्या आवडी-निवडीत काहीच साम्य नाही. ताई, खरंच तुम्ही माझ्यासाठी जे केलत त्या साठी मी तुमचे पुन्हा आभार मानते.”  

आम्हाला पण हे जाणवत होतं की, राधा हि केशव पेक्षा जास्त हुशार आणि स्मार्ट आहे. तिला शिकायची संधी मिळाली असती तर, आज तिचं आयुष्य काहीतरी वेगळ असत? तिने तिच्या बाजूनी खूप समजून घ्यायचा, समजवायचा प्रयत्न केला. लग्न, कुटुंब सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला. पण हाती यश आल नाही. केशवच्या विचित्र वागण्याने राधा त्याच्यापासून लांब गेली.

एव्हाना केशवच्या हे लक्षात आल होतं की राधा त्याच्या आयुष्यात कुठल्याच कारणांनी परत येणार नाही. आता फारकतीचा एक मुद्दा होता, जिथे तो शेवटचा प्रयत्न करत होता, राधाला परत आणण्याचा! आम्ही केशवच्या नातेवाईकांना आत बोलावलं आणि काय बोलणी झाली ती सांगितली.

दोन प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी होती- पाहिलं म्हणजे मुलं कोणाकडे रहाणार? आणि दुसरं, फारकत कशी घ्यायची? केशावणी त्याचं मत मांडलं, “मुलं माझ्याकडेच राहतील. हिचा काही भरोसा नाही. ती आत्ताच म्हणाली की, प्रकाश सारखा नवरा आवडेल. मी जिवंत आहे, अजून आमची फारकत झाली नाही तेंव्हा हि बाई अशी वाक्य उघडपणे बोलते. फारकत झाल्यावर काय करेल, त्याचा विचार न केलेलाच बरा. दुसरं म्हणजे, मी तिला काही देणार नाही. न खावटी, ना रहायला जागा.”

त्यावर राधाने शांतपणे सांगितलं, “मला काही नको. मी काम करीन, कमवीन आणि माझं घर चालवीन. केशवला मुलं हवी असतील तर ती त्यांनी ठेऊन घ्यावीत. पण ६ महिन्यानी माझ्या दारी आणून सोडलेली चालणार नाही. तसं केल तर पुन्हा त्याला मुलांना भेटता येणार नाही. मुलांच्या भावनांशी मी त्याला खेळू देणार नाही.

फारकतीच्या कागदांवर केंव्हा सही करायला यायचं ते सांगा.”

सर्वांसमोरच वकिलांना फोन करून दोन दिवसा नंतरची तारीख नक्की केली. ठरल्याप्रमाणे वकिलांनी समजुतीने फारकतीचा मसुदा तयार केला. दोघांच्या सह्या झाल्या. अपेक्षेप्रमाणे केशवने शेवटच्या क्षणी मुलं नकोत असं सांगून स्वतःची सोडवणूक करून घेतली.

सहा महिन्यानी नियमाप्रमाणे त्यांची कायदेशीर फारकत झाली.

ह्या गोष्टीला एक वर्ष उलटलं असेल. एक दिवस राधा एका माणसाबरोबर ऑफिसमध्ये आली. तिने लाजत लाजत आमची ओळख करून दिली, “ताई, हा प्रकाश! आम्ही दोघांनी सहा महिन्यापूर्वी लग्न केलं. मी खूप खुश आहे. बाहेरून दहावी देते आहे. नंतर मुक्त विद्यापीठातून बीए करणार आहे. ताई, आशीर्वाद द्या.”

इतकं सगळं झाल्यावर राधाने प्रकाशशी लग्न केलं. म्हणजे केशव म्हणाला तसं तिचं खरंच आधीपासून त्याच्याबरोबर ‘लफडं’ असेल का? का केशवच्या सतत त्रास देण्यामुळे राधा प्रकाशकडे ओढली गेली असेल? कारण पहिल्यांदा केशवच्या काकांनी तिच्याबद्दल केशवला सांगितलं तेव्हा तर ती प्रकाशला शाळेत आपल्या बरोबर शिकणारा मुलगा म्हणूनच ओळखत होती. हा सगळा प्रकार झाला यात नेमकी चूक कोणाची? बायको कायम आपल्या मनाप्रमाणे वागली पाहिजे असं समजणाऱ्या आणि सतत संशय घेणाऱ्या केशवची? कशात काही नसतांना ‘राधाचं लफडं आहे’ असं सांगणाऱ्या केशवच्या काकांची? राधाला तिच्यापेक्षा कमी कुवत असलेला नवरा करून देणाऱ्या राधाच्या आईवडिलांची? का तिच्या गावात शाळा न देणाऱ्या सरकारची?

चूक कोणाचीही असली तरी राधा, केशव आणि त्यांची दोन मुलं यांची आठ दहा वर्षं फरफट व्हायची ती झालीच. पण तरीही मी असं म्हणेन की ही राधा नशीबवान होती. तिचा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहिला. केशवचा भाऊदेखील तिच्या पाठीशी उभा राहिला. तिला प्रकाश भेटला. ती स्वतः खमकी होती. नाही तर अश्या कित्येक राधा आयुष्यभर नवऱ्याचा आणि सासरच्यांचा जाच सहन करत राहिलेल्या आम्ही बघतो. मग चूक कोणाचीही असू दे!

Thursday, 5 August 2021

प्लॅन...

 

त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये जे काही घडलं त्यानंतर रसिका आणि तिचा प्रोब्लेम कोणीच विसरू शकलो नव्हतो. इतर केसेस प्रमाणे रसिका तिची तक्रार नोंदवायला आली होती. तिच्या बरोबर तिची दोन मुलं होती. मोठा असेल तीन वर्षांचा आणि धाकटा कडेवर. चार चोघीन सारखीच तिची कथा होती. १२वि पर्यंत शिकलेल्या रसिकाच ५ वर्षां पूर्वी रोहनशी, रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं. रोहन सरकारी नोकरीत होता. पगार चांगला होता. रसिकाची सासू विचित्र होती. तिच्या मते रसिका हि घरातील सर्व काम करायला, घरातल्यांची मर्जी सांभाळायला आणलेली एक व्यक्ती! सासूची मरजी सांभाळली, तिची सेवा केली, तिला काय हवं नको ते पाहिलं कि ती कमी त्रास द्यायची. कमी शिव्या घालायची. नवर्याचा स्वभाव लहरी होता. कधी खूप प्रेम करायचा, लाड करायचा. तर कधी अपमान करायचा. एक-दोन वेळा तर हात पण उचलला होता. हे सर्व रसिका सहन करत होती. कारण वैवाहिक आयुष्य म्हणजे बाईसाठी अशी तारेवरची कसरत असतेच, हा तिचा समाज होता. तिची मुख्य तक्रार होती ती रोहनच्या अनैतिक संबंधान बद्दल. तिला खात्री होती कि रोहनची एक नाही अनेक लफडी आहेत. रात्री उशिरापर्यंत त्याचं कोणाशी तरी फोनवर चालणारं चेटिंग, ते फोनमधले ' आय लव यु' चे मेसेजेस, आणि ह्याबद्दल विचारायला गेलं कि वाद, भांडण आणि कधीतरी एखादा फटका, हे नित्याचं झालं होतं. ह्याला कंटाळूनच ती सल्ला घ्यायला आणि गरज पडली तर तक्रार नोंदवायला आली होती.

पण तिच्याशी आमचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी तिचे आई-वडील आले. तिच्या आईंनी ऑफिसमध्ये खूप गोंधळ केला. तिला आपल्या जावयाच (रोहनच) बाहेर लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत हे मान्यच नव्हतं. रोहनसारखा जावई मिळायला भाग्य लागतं असा तिचा समज होता. तिने रसिकाला सांगितलं, " हे तुझ्या मनातला वहेम आहे. चांगली देवमाणसं मिळाली आहेत. नाती टिकवायला शीक. तुला जरका असं वाटत असेल कि नवऱ्याच घर सोडून तू दोन पोरं घेऊन माहेरी येशील आणि आम्ही तुला घरात राहू देऊ, तर तो तुझा गैरसमज आहे. चार दिवस माहेरी म्हणून यायचं आणि सासरी निघून जायचं."

रसिका काही म्हणणार तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ रोहन ऑफिसमध्ये हजर झाला. त्यांनी आल्या-आल्या तिच्या हातातून मुलाला स्वतःच्या कडेवर उचलून घेतलं. सोबत आणलेली साडी तिला देत म्हणाला, "रसिका, मला आज डिफरंसचे पैसे मिळाले म्हणून तुझ्यासाठी साडी घेऊन घरी गेलो तर तू घरी नव्हतीस. तुझ्या वडिलांना फोन केला तर समजलं तू इथे आली आहेस. रसिका, तू अशी का वागतेस? माझा तुझ्यावर आणि मुलांवर किती जीव आहे. तू अशी न सांगता जात नको जाऊस." असं म्हणत तिचा हात धरून रडायला लागला. आम्ही त्यांचा फमिली ड्रामा बघत होतो. मध्ये काही बोलणार तेवड्यात रसिकाच्या आईंनी रसिकाचा हात घट्ट पकडला आणि तिला रोहन समोर आणून उभं करत म्हणाली, "रसिका, बास झाली आता तुझी नाटकं. जावई घ्यायला आलेत तेंव्हा मुकाट्यानी त्यांच्या बरोबर घरी जा."

रसिकांनी आपला हात सोडवत म्हणाली, "आई, जो पर्यंत माझ्या नवऱ्याच्या फोन मधले मेसेजेस कुणाचे आणि त्या मुली कोण, हे मला कळत नाही तोवर मी कुठे पण जाणार नाही."

"रसिका, तू माझ्यावर का संशय घेतेस? अग माझी, तुझ्या व्यतिरिक्त कोणी मैत्रीण नाही. इतर कोणाबरोबर ओळख वाढविण्याचा पण मी विचार करू शकत नाही, अग संबंध लफडं ह्या शब्दांनी पण मला त्रास होतो. तुला माझा विश्वास वाटत नाहीये ना. हा माझा मोबईल मी इथे टेबलवर ठेवतो. आई-बाबा, तुम्ही चेक करा. ताई तुम्ही चेक करा. रसिका तू बघून घे. जर का त्यात काही सापडलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे."

तिच्या आई-वडिलांचा तर जावयावर मुलीपेक्षा पण जास्त विश्वास होता. त्यांना फोन बघायची गरज वाटली नाही. रसिकांनी फोन मध्ये फोटो मेसेजेस शोधायचा खूप प्रतत्न केला, पण काही सापडलं नाही. ' पण मी पाहिलेले फोटो, मेसेजेस कुठे गेले ' असं ती पुटपुटली.

"रसिका, आतातर तुझी खात्री पटली ना? आता चल घरी. आई-बाबा, तुम्ही पण चला. सगळे गैरसमज दूर झाले आहेत. इस खुशिमे साथमे खाना खायेंगे."

असं त्या दिवशी रसिका आली आणि तिच्या आई-वडील आणि नवर्याबरोबर निघून गेली. वेगळ्याच केसच्या बरोबर आलेला एक विशीतला मुलगा सहज हसत म्हणाला, "ताई नवरा स्मार्ट आहे. त्यांनी काही डाटा लपवलेला असू शकतो. हे असं करणं सहज शक्य आहे."

तो हे वाक्य सहज बोलून गेला, पण आमच्या मनाला रुखरुख लागली.

रसिका, आज जवळ जवळ साडेतीन वर्षांनी आमच्या ऑफिसमध्ये आली होती. पहिली दोन मुलं होती. ह्या वेळेला तिसर्या मुलाची भर पडली. तिच्या सोबत तिचे आई-वडील पण होते. तिची आई म्हणाली' "ताई, आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. रसिका काय झालं ते ताईना सांग."

रसिका सांगत होती, "ताई त्या दिवशी मी काहीच सिद्ध करू शकले नाही म्हणून त्याच्या सोबत गेले. पण मला संशय होताच. काही दिवस मी शांत राहिले. मग आई-वडील आणि नवऱ्याला पटवून कंपनीत नोकरी करायला लागले. तिथे मला महेश भेटला. त्यांनी मला मोबईलचा पासवर्ड क्रेक करायला आणि लपवलेला डाटा शोधायला शिकवलं. दरम्यानच्या काळात सुहासचा जन्म झाला. मी काही दिवस शांत राहिले. मला हवी ती सगळी माहिती गोळा केली. मग एक दिवस आई-वडिलांना जेवायला घरी बोलावलं, आणि सगळ्यांसमोर हा विषय काढला. माझ्या हातात पुरावे होते. त्याचं खरं रूप सर्वांसमोर आल्यावर तो खूप चिडला आणि माझ्या आई-वडिलांसमोर मला मारलं. आईला माझं म्हणणं पटलं. आई मला आणि मुलांना घेऊन घरी आली. ८-१० दिवसांत रोहन 'मुलांची खूप आठवण येते आहे म्हणून त्यांना भेटायला आला. मुलांना खाऊ घेऊन देतो असं सांगून घेऊन गेला तो परत आलाच नाही. मग पोलिसांत तक्रार केली आणि त्याला मुलं आणून सोडावी लागली.

त्या दिवसानंतर तो खूप वेळा माझ्या माहेरी आला. कधी विनवण्या करायचा तर कधी दारू पिऊन यायचा आणि खूप तमाशा करायचा. एक दोन वेळा त्यानी घरात येऊन मुलांना घेऊन जायचा प्रयत्न केला. दोन तीन वेळा मला मारहाण केली. माझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन तमाशा करतो. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा."

रसिकांनी रीतसर तक्रार नोंदवली. रोहनला ऑफिसात बोलावलं. तो पहिला निरोप मिळाल्याबरोबर ऑफिस मध्ये आला. त्यानी, रसिकाचा कसा गैरसमज झाला आहे, आणि त्याचं तिच्यावर आणि मुलांवर किती प्रेम आहे, हि टेप परत एकदा वाजवली. तो समझोता करायला तयार होता. एकत्र मीटिंगची तारीख ठरली.

रसिकांनी एकच मुद्दा लाऊन धरला. "ताई, मी रोहन कडे जायला एका अटीवर तयार आहे. त्यांनी रंजना, माधुरी आणि शोभाला, इथे तुमच्या समोर बोलवावं आणि त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं सांगावं. ह्या तिघी मला ठाऊक आहेत. इतर असतील तर त्यांना पण बोलावू दे. एकाच दिवशी सगळे समाज गैरसमज दूर होतील."

रोहन म्हणाला, "रसिका, तो भूतकाळ आहे. तू तेच किती दिवस उगाळत बसणार आहेस? तुला आपला संसार, आपली मुलं, त्याचं भविष्य असा काहीच विषय बोलायला नाहीये का? तुला मी कसं समजाऊ माझा तुम्हा सगळ्यांवर किती जीव आहे'. आजपर्यंत मी तुमच्यासाठी कमी केलं का? तुम्हाला कधी काही कमी पडू दिलं का? माझ्या कर्तव्यात कुठे कमी पडलो का? नाही ना? मग तू अशी का वागतेस? प्लीज मला सोडून जाऊ नकोस." असं म्हणत रोहन अक्षरशः तिच्या पाया पडला.

"रोहन, हे ऑफिस आहे. आपलं घर नाही. इथे तमाशा करू नकोस. तुझा आमच्यावर जीव आहे हे मला ठाऊक आहे. पण तुझी बाहेर लफडी आहेत हे पण तितकच खरं आहे. मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो. तुझ्या जागी मी असते आणि असे मित्र असते तर तुला ते चाललं असत का?" रसिकाच्या ह्या प्रश्नाला रोहनकडे काहीच उत्तर नव्हतं.

त्या दिवशी समझोता होऊ शकला नाही.

पण समझोता झालाच नाही असं नाही. तो आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या समोर लिखापढी करून झाला नाही. त्या दोघांमध्ये परस्पर समझोता झाला. त्याला कारण देखील तसच होतं. रोहन खूप वेळा तिच्या घरी गेला, तिची माफी मागितली, तिच्या आई-वडिलांच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली. समाजातील चार माणसांसमोर, चार नातेवाईकांसमोर सर्व गोष्टी कबूल केल्या. पुन्हा चुकणार नाही. रसिका म्हणेल तसं वागण्याचा शब्द दिला. शेवटी रसिका आणि तिच्या आई-वडिलांचं नाईलाज झाला. ते रसिकाला पाठवायला तयार झाले, पण एका अटीवर- इथून पुढे रसिका आणि रोहनच्या आयुष्यात जे काही घडेल त्याला सर्वस्वी ते दोघे जबाबदार असतील. सुख-दुख्खाला दोघांनी यावं, त्यांचं स्वागतच होईल. पण भांडण झाल्यामुळे रसिका माहेरी आली तर तिला आम्ही घरात घेणार नाही. रसिकाची द्विधा मनस्थिती होती. पण शेवटी समाजातील चार प्रतिष्ठित लोकांनी आणि नातेवाईकांनी भरीस घातलं म्हणून ती 'हा शेवटचा चान्स' असं मनाची समजूत घालून जायला तयार झाली.

ह्याला पण सुमारे पाच-सहा महिने झाले असतील. एक दिवस रसिका पुन्हा आमच्या ऑफिसमध्ये आली. ती स्वताहून आली नव्हतीच. तिला तिची मावशी (वत्सलाबाई) घेऊन आली होती. (तिच्या सोबत तिचा नवरा पण होता) ते सुद्धा असं सांगायला कि, "ताई ह्या मुलीची कुठे तरी सोय करा. ती माझ्या घरात नको. तिच्यामुळे माझ्या घरात खूप प्रोब्लेम्स झाले आहेत. स्वताचा नवरा सांभाळू शकली नाही, लग्न टिकवता आल नाही, आता माझ्या मुलाच्या मागे लागली आहे. चांगलंच फसवलं आहे त्याला. माझा दीपक आहे भोळा. ती जे सांगेल ते त्याला खरंच वाटतं. ती त्याला तिच्या जाळ्यात अडकवतीये. आतातर माझा दीपक म्हणतोय, 'आई मी हिच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही माझं हिच्याशी लग्न लाऊन दिलं नाहीत तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बर वाईट करून घेईन.' हिच्यामुळे घरातील शांतता बिघडून गेली आहे."

"पण हि तुमच्या घरात का आणि कधी आली? आणि मागील दिडेक महिन्यात काय घडलं?"

"महिना झाला असेल. त्यांच्यात (रसिका आणि रोहन मध्ये) खूप कडाक्याचा वाद आणि भांडण झालं. हे त्यांचं नेहेमीचच झालं होतं. रसिका धाकट्याला घेऊन तिच्या माहेरी गेली, पण तिच्या आई-वडीलानी  तिला घरात घेतलं नाही. मला तिची दया येऊन मी तिला घरात घेतलं, तर केलेल्या उपकाराची चांगलीच परतफेड करतीये."

आणि रसिकाला उद्देशून म्हणाली, "रसिका, तुला मी ऑफिसात आणून सोडली आहे. इथून तू तुझ्या मुलाला घेऊन कुठे पण जा. पण आमच्या घरी परत येऊ नकोस."

ह्यावर रसिका काहीच बोलली नाही. ती शांतपणे तिच्या दोन वर्षांच्या सुहासला बिस्कीट भरवत होती.

आमच्या ऑफिसमधल्या भारतीताई म्हणाल्या, "अग रसिका, तुझं लक्ष कुठे आहे? ताई काय विचारतायत?"

"ताई, मला माहित आहे रोहनचा माझ्यावर आणि माझ्या मुलांवर खूप जीव आहे. पण म्हणून मी हि अशी लफडी सहन करू शकत नव्हते. मी घर सोडून जाऊ नये म्हणून त्यानी खूप प्रयत्न केले. "रोहन, तुझ्या ह्या वागण्याचा मला खूप मानसिक त्रास होतोय. हा त्रास काय असतो ते तुला कधी तरी कळेल." असं सांगून मी त्याच्या जवळ मोठी दोन्ही मुलं ठेवली, आणि सुहासला सोबत घेऊन रडतच घरातून निघाले. मी माहेरी गेले. पण आईंनी मला घरात घेतलं नाही. मी सुहासला घेऊन तिच्या दारातच रडत बसले. काय करावं, कुठे जावं काही सुचत नव्हतं. त्या दिवशी मावशी आईला सहजच भेटायला आली होती. माझ्या आयुष्यात काय घडलंय हे समजल्यावर ती मला तिच्या घरी घेऊन आली . तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि मावशीचे माझ्यावर खूप उपकार आहेत. एक दिवस सकाळी मी कामावर जायला निघाले तेंव्हा मावशी म्हणाली, 'रसिका, इथे रहायचं असेल तर महिन्याच्या खर्चाचे पैसे द्यावे लागतील.' मला ते मान्यच होतं. मी माझा संपूर्ण पगार मावशीला दिला. ते मला परत नको आहेत. आज ती मला घरातून बाहेर जायला सांगतीये. मी चार दिवसांपूर्वी काकांना १०००० रुपये दिले होते ते त्यांनी मला द्यावेत. मी लगेच घर सोडायला तयार आहे."

"आणि मावशीची तुझ्या बद्दल तक्रार आहे, त्याचं काय? ती म्हणतीये तू दीपकला नादी लावलंस. हा काय प्रकार आहे."

"ताई, दीपक माझ्या पेक्षा लहान आहे. त्याला फिरायला, हॉटेलात जायला आवडतं. त्याच्या आई वडिलां कडे त्याला द्यायला पैसे नाहीत. म्हणून मी त्याची हौस पुरी करते. एवढंच.

"काकांनी माझे १०००० द्यावेत मी त्याचं घर लगेच सोडते."

काकांनी ताबडतोप खिशातून चेक काढला आणि लिहायला सुरुवात केली. तेवढ्यात रसिका म्हणाली, "काका, बँकेत पैसे आहेत का? काल आपलं किराणा बील मी भरलं म्हणून विचारते."

"दोन दिवसांत पैशांची सोय करतो. पण हिने आमच्या मुलाचा नाद सोडावा." असं काकांनी कबूल केलं.

दोन दिवसांनी वत्सलाबाईचा फोन आला. सांगायला, "ताई, माझा दीपक घर सोडून गेला. दोन दिवसांपासून गायब आहे. मी आत्ताचा मिसिंग कम्प्लेंट करून आले"

"आणि रसिका?"

"रसिका त्या दिवशी आमच्या बरोबर आली नाही. ती तिच्या आईकडे गेली असेल. मला ठाऊक नाही."

थोड्यावेळानी रसिकाच्या आईने कळवले, "ताई, दोन दिवसांपूर्वी रसिका घरी आली होती, तिचे कपडे न्यायला. मुलांची आठवण येतीये. रोहनकडे जाते म्हणाली. आज सकाळी त्याला विचारलं तेंव्हा समजलं ती त्याच्या घरी गेलीच नाही. ताई, मला खूप काळजी वाटते आहे. कुठे गेली असेल रसिका?"

दीपक आणि रसिकाच्या पालकांनी आणि रोहननी वेग-वेगळ्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार नोंदवली.

ह्या घटनेला १० दिवस झाले असतील. एक दिवस रोहनचा असं कळवायला फोन आला की, 'रसिका घरी सुखरूप पोहोचली.'

८ दिवसांनी रसिकाचा खुशाली कळवायला फोन आला. तेंव्हा सर्व गोष्टींचा खुलासा झाला. तिने सांगितलं, "ताई, दीपक आणि मी, आम्ही दोघं मावस भावंडं आहोत. आमच्यात चांगलं मैत्रीचं नातं आहे. ते आम्ही नेहेमीच जपलं. एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून मी त्याच्याशी माझा प्रोब्लेम बद्दल बोलले. रोहनला धडा शिकवण्यासाठी मला हे रिस्क घेणं गरजेचं वाटलं. दिपकनी मला चांगली साथ दिली. हॉटेलच्या दोन खोल्यांचं भाडं आणि बाहेर जेवणावर झालेला खर्च आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त झाला. ८ दिवसातच जवळचे पैसे संपले. मग दिपकनी त्याच्या आईला फोन करून कळवलं. तिने रोहनला कळवलं. रोहननी मला घरी आणायला स्पेश्यल गाडी पाठवली. मी घरी आल्या पासून रोहन इज अ चेंज्ड पर्सन. मोबईल चा पासवर्ड, लॉक सगळ गेलं. मेसेजेस आणि रात्री उशिरा पर्यंतचे फोनवरचं चेतिंग बंद झाल......

ती अजून काही सांगणार तेवढ्यात रोहनने फोन घेतला. म्हणाला, "ताई, मागील १५ दिवसांत रसिकांनी माझं जगच बदलून टाकलं. तिच्यावर माझा खूप विश्वास आहे. पण ती कोणाबरोबर तरी निघून गेली आहे. कुठे आहे काही कळत नव्हतं. कशी आहे? काळजीने बेजार झालो. तेंव्हा मला ती मला इतके वर्षं काय सांगायचा प्रयत्न करत होती ते समजलं. ताई, मी तुम्हाला शब्द देतो, मी आयुष्यात कधीच असं चुकीचं, तिला त्रास होईल असं वागणार नाही."