Thursday 5 August 2021

प्लॅन...

 

त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये जे काही घडलं त्यानंतर रसिका आणि तिचा प्रोब्लेम कोणीच विसरू शकलो नव्हतो. इतर केसेस प्रमाणे रसिका तिची तक्रार नोंदवायला आली होती. तिच्या बरोबर तिची दोन मुलं होती. मोठा असेल तीन वर्षांचा आणि धाकटा कडेवर. चार चोघीन सारखीच तिची कथा होती. १२वि पर्यंत शिकलेल्या रसिकाच ५ वर्षां पूर्वी रोहनशी, रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं. रोहन सरकारी नोकरीत होता. पगार चांगला होता. रसिकाची सासू विचित्र होती. तिच्या मते रसिका हि घरातील सर्व काम करायला, घरातल्यांची मर्जी सांभाळायला आणलेली एक व्यक्ती! सासूची मरजी सांभाळली, तिची सेवा केली, तिला काय हवं नको ते पाहिलं कि ती कमी त्रास द्यायची. कमी शिव्या घालायची. नवर्याचा स्वभाव लहरी होता. कधी खूप प्रेम करायचा, लाड करायचा. तर कधी अपमान करायचा. एक-दोन वेळा तर हात पण उचलला होता. हे सर्व रसिका सहन करत होती. कारण वैवाहिक आयुष्य म्हणजे बाईसाठी अशी तारेवरची कसरत असतेच, हा तिचा समाज होता. तिची मुख्य तक्रार होती ती रोहनच्या अनैतिक संबंधान बद्दल. तिला खात्री होती कि रोहनची एक नाही अनेक लफडी आहेत. रात्री उशिरापर्यंत त्याचं कोणाशी तरी फोनवर चालणारं चेटिंग, ते फोनमधले ' आय लव यु' चे मेसेजेस, आणि ह्याबद्दल विचारायला गेलं कि वाद, भांडण आणि कधीतरी एखादा फटका, हे नित्याचं झालं होतं. ह्याला कंटाळूनच ती सल्ला घ्यायला आणि गरज पडली तर तक्रार नोंदवायला आली होती.

पण तिच्याशी आमचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी तिचे आई-वडील आले. तिच्या आईंनी ऑफिसमध्ये खूप गोंधळ केला. तिला आपल्या जावयाच (रोहनच) बाहेर लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत हे मान्यच नव्हतं. रोहनसारखा जावई मिळायला भाग्य लागतं असा तिचा समज होता. तिने रसिकाला सांगितलं, " हे तुझ्या मनातला वहेम आहे. चांगली देवमाणसं मिळाली आहेत. नाती टिकवायला शीक. तुला जरका असं वाटत असेल कि नवऱ्याच घर सोडून तू दोन पोरं घेऊन माहेरी येशील आणि आम्ही तुला घरात राहू देऊ, तर तो तुझा गैरसमज आहे. चार दिवस माहेरी म्हणून यायचं आणि सासरी निघून जायचं."

रसिका काही म्हणणार तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ रोहन ऑफिसमध्ये हजर झाला. त्यांनी आल्या-आल्या तिच्या हातातून मुलाला स्वतःच्या कडेवर उचलून घेतलं. सोबत आणलेली साडी तिला देत म्हणाला, "रसिका, मला आज डिफरंसचे पैसे मिळाले म्हणून तुझ्यासाठी साडी घेऊन घरी गेलो तर तू घरी नव्हतीस. तुझ्या वडिलांना फोन केला तर समजलं तू इथे आली आहेस. रसिका, तू अशी का वागतेस? माझा तुझ्यावर आणि मुलांवर किती जीव आहे. तू अशी न सांगता जात नको जाऊस." असं म्हणत तिचा हात धरून रडायला लागला. आम्ही त्यांचा फमिली ड्रामा बघत होतो. मध्ये काही बोलणार तेवड्यात रसिकाच्या आईंनी रसिकाचा हात घट्ट पकडला आणि तिला रोहन समोर आणून उभं करत म्हणाली, "रसिका, बास झाली आता तुझी नाटकं. जावई घ्यायला आलेत तेंव्हा मुकाट्यानी त्यांच्या बरोबर घरी जा."

रसिकांनी आपला हात सोडवत म्हणाली, "आई, जो पर्यंत माझ्या नवऱ्याच्या फोन मधले मेसेजेस कुणाचे आणि त्या मुली कोण, हे मला कळत नाही तोवर मी कुठे पण जाणार नाही."

"रसिका, तू माझ्यावर का संशय घेतेस? अग माझी, तुझ्या व्यतिरिक्त कोणी मैत्रीण नाही. इतर कोणाबरोबर ओळख वाढविण्याचा पण मी विचार करू शकत नाही, अग संबंध लफडं ह्या शब्दांनी पण मला त्रास होतो. तुला माझा विश्वास वाटत नाहीये ना. हा माझा मोबईल मी इथे टेबलवर ठेवतो. आई-बाबा, तुम्ही चेक करा. ताई तुम्ही चेक करा. रसिका तू बघून घे. जर का त्यात काही सापडलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे."

तिच्या आई-वडिलांचा तर जावयावर मुलीपेक्षा पण जास्त विश्वास होता. त्यांना फोन बघायची गरज वाटली नाही. रसिकांनी फोन मध्ये फोटो मेसेजेस शोधायचा खूप प्रतत्न केला, पण काही सापडलं नाही. ' पण मी पाहिलेले फोटो, मेसेजेस कुठे गेले ' असं ती पुटपुटली.

"रसिका, आतातर तुझी खात्री पटली ना? आता चल घरी. आई-बाबा, तुम्ही पण चला. सगळे गैरसमज दूर झाले आहेत. इस खुशिमे साथमे खाना खायेंगे."

असं त्या दिवशी रसिका आली आणि तिच्या आई-वडील आणि नवर्याबरोबर निघून गेली. वेगळ्याच केसच्या बरोबर आलेला एक विशीतला मुलगा सहज हसत म्हणाला, "ताई नवरा स्मार्ट आहे. त्यांनी काही डाटा लपवलेला असू शकतो. हे असं करणं सहज शक्य आहे."

तो हे वाक्य सहज बोलून गेला, पण आमच्या मनाला रुखरुख लागली.

रसिका, आज जवळ जवळ साडेतीन वर्षांनी आमच्या ऑफिसमध्ये आली होती. पहिली दोन मुलं होती. ह्या वेळेला तिसर्या मुलाची भर पडली. तिच्या सोबत तिचे आई-वडील पण होते. तिची आई म्हणाली' "ताई, आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. रसिका काय झालं ते ताईना सांग."

रसिका सांगत होती, "ताई त्या दिवशी मी काहीच सिद्ध करू शकले नाही म्हणून त्याच्या सोबत गेले. पण मला संशय होताच. काही दिवस मी शांत राहिले. मग आई-वडील आणि नवऱ्याला पटवून कंपनीत नोकरी करायला लागले. तिथे मला महेश भेटला. त्यांनी मला मोबईलचा पासवर्ड क्रेक करायला आणि लपवलेला डाटा शोधायला शिकवलं. दरम्यानच्या काळात सुहासचा जन्म झाला. मी काही दिवस शांत राहिले. मला हवी ती सगळी माहिती गोळा केली. मग एक दिवस आई-वडिलांना जेवायला घरी बोलावलं, आणि सगळ्यांसमोर हा विषय काढला. माझ्या हातात पुरावे होते. त्याचं खरं रूप सर्वांसमोर आल्यावर तो खूप चिडला आणि माझ्या आई-वडिलांसमोर मला मारलं. आईला माझं म्हणणं पटलं. आई मला आणि मुलांना घेऊन घरी आली. ८-१० दिवसांत रोहन 'मुलांची खूप आठवण येते आहे म्हणून त्यांना भेटायला आला. मुलांना खाऊ घेऊन देतो असं सांगून घेऊन गेला तो परत आलाच नाही. मग पोलिसांत तक्रार केली आणि त्याला मुलं आणून सोडावी लागली.

त्या दिवसानंतर तो खूप वेळा माझ्या माहेरी आला. कधी विनवण्या करायचा तर कधी दारू पिऊन यायचा आणि खूप तमाशा करायचा. एक दोन वेळा त्यानी घरात येऊन मुलांना घेऊन जायचा प्रयत्न केला. दोन तीन वेळा मला मारहाण केली. माझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन तमाशा करतो. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा."

रसिकांनी रीतसर तक्रार नोंदवली. रोहनला ऑफिसात बोलावलं. तो पहिला निरोप मिळाल्याबरोबर ऑफिस मध्ये आला. त्यानी, रसिकाचा कसा गैरसमज झाला आहे, आणि त्याचं तिच्यावर आणि मुलांवर किती प्रेम आहे, हि टेप परत एकदा वाजवली. तो समझोता करायला तयार होता. एकत्र मीटिंगची तारीख ठरली.

रसिकांनी एकच मुद्दा लाऊन धरला. "ताई, मी रोहन कडे जायला एका अटीवर तयार आहे. त्यांनी रंजना, माधुरी आणि शोभाला, इथे तुमच्या समोर बोलवावं आणि त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं सांगावं. ह्या तिघी मला ठाऊक आहेत. इतर असतील तर त्यांना पण बोलावू दे. एकाच दिवशी सगळे समाज गैरसमज दूर होतील."

रोहन म्हणाला, "रसिका, तो भूतकाळ आहे. तू तेच किती दिवस उगाळत बसणार आहेस? तुला आपला संसार, आपली मुलं, त्याचं भविष्य असा काहीच विषय बोलायला नाहीये का? तुला मी कसं समजाऊ माझा तुम्हा सगळ्यांवर किती जीव आहे'. आजपर्यंत मी तुमच्यासाठी कमी केलं का? तुम्हाला कधी काही कमी पडू दिलं का? माझ्या कर्तव्यात कुठे कमी पडलो का? नाही ना? मग तू अशी का वागतेस? प्लीज मला सोडून जाऊ नकोस." असं म्हणत रोहन अक्षरशः तिच्या पाया पडला.

"रोहन, हे ऑफिस आहे. आपलं घर नाही. इथे तमाशा करू नकोस. तुझा आमच्यावर जीव आहे हे मला ठाऊक आहे. पण तुझी बाहेर लफडी आहेत हे पण तितकच खरं आहे. मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो. तुझ्या जागी मी असते आणि असे मित्र असते तर तुला ते चाललं असत का?" रसिकाच्या ह्या प्रश्नाला रोहनकडे काहीच उत्तर नव्हतं.

त्या दिवशी समझोता होऊ शकला नाही.

पण समझोता झालाच नाही असं नाही. तो आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या समोर लिखापढी करून झाला नाही. त्या दोघांमध्ये परस्पर समझोता झाला. त्याला कारण देखील तसच होतं. रोहन खूप वेळा तिच्या घरी गेला, तिची माफी मागितली, तिच्या आई-वडिलांच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली. समाजातील चार माणसांसमोर, चार नातेवाईकांसमोर सर्व गोष्टी कबूल केल्या. पुन्हा चुकणार नाही. रसिका म्हणेल तसं वागण्याचा शब्द दिला. शेवटी रसिका आणि तिच्या आई-वडिलांचं नाईलाज झाला. ते रसिकाला पाठवायला तयार झाले, पण एका अटीवर- इथून पुढे रसिका आणि रोहनच्या आयुष्यात जे काही घडेल त्याला सर्वस्वी ते दोघे जबाबदार असतील. सुख-दुख्खाला दोघांनी यावं, त्यांचं स्वागतच होईल. पण भांडण झाल्यामुळे रसिका माहेरी आली तर तिला आम्ही घरात घेणार नाही. रसिकाची द्विधा मनस्थिती होती. पण शेवटी समाजातील चार प्रतिष्ठित लोकांनी आणि नातेवाईकांनी भरीस घातलं म्हणून ती 'हा शेवटचा चान्स' असं मनाची समजूत घालून जायला तयार झाली.

ह्याला पण सुमारे पाच-सहा महिने झाले असतील. एक दिवस रसिका पुन्हा आमच्या ऑफिसमध्ये आली. ती स्वताहून आली नव्हतीच. तिला तिची मावशी (वत्सलाबाई) घेऊन आली होती. (तिच्या सोबत तिचा नवरा पण होता) ते सुद्धा असं सांगायला कि, "ताई ह्या मुलीची कुठे तरी सोय करा. ती माझ्या घरात नको. तिच्यामुळे माझ्या घरात खूप प्रोब्लेम्स झाले आहेत. स्वताचा नवरा सांभाळू शकली नाही, लग्न टिकवता आल नाही, आता माझ्या मुलाच्या मागे लागली आहे. चांगलंच फसवलं आहे त्याला. माझा दीपक आहे भोळा. ती जे सांगेल ते त्याला खरंच वाटतं. ती त्याला तिच्या जाळ्यात अडकवतीये. आतातर माझा दीपक म्हणतोय, 'आई मी हिच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही माझं हिच्याशी लग्न लाऊन दिलं नाहीत तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बर वाईट करून घेईन.' हिच्यामुळे घरातील शांतता बिघडून गेली आहे."

"पण हि तुमच्या घरात का आणि कधी आली? आणि मागील दिडेक महिन्यात काय घडलं?"

"महिना झाला असेल. त्यांच्यात (रसिका आणि रोहन मध्ये) खूप कडाक्याचा वाद आणि भांडण झालं. हे त्यांचं नेहेमीचच झालं होतं. रसिका धाकट्याला घेऊन तिच्या माहेरी गेली, पण तिच्या आई-वडीलानी  तिला घरात घेतलं नाही. मला तिची दया येऊन मी तिला घरात घेतलं, तर केलेल्या उपकाराची चांगलीच परतफेड करतीये."

आणि रसिकाला उद्देशून म्हणाली, "रसिका, तुला मी ऑफिसात आणून सोडली आहे. इथून तू तुझ्या मुलाला घेऊन कुठे पण जा. पण आमच्या घरी परत येऊ नकोस."

ह्यावर रसिका काहीच बोलली नाही. ती शांतपणे तिच्या दोन वर्षांच्या सुहासला बिस्कीट भरवत होती.

आमच्या ऑफिसमधल्या भारतीताई म्हणाल्या, "अग रसिका, तुझं लक्ष कुठे आहे? ताई काय विचारतायत?"

"ताई, मला माहित आहे रोहनचा माझ्यावर आणि माझ्या मुलांवर खूप जीव आहे. पण म्हणून मी हि अशी लफडी सहन करू शकत नव्हते. मी घर सोडून जाऊ नये म्हणून त्यानी खूप प्रयत्न केले. "रोहन, तुझ्या ह्या वागण्याचा मला खूप मानसिक त्रास होतोय. हा त्रास काय असतो ते तुला कधी तरी कळेल." असं सांगून मी त्याच्या जवळ मोठी दोन्ही मुलं ठेवली, आणि सुहासला सोबत घेऊन रडतच घरातून निघाले. मी माहेरी गेले. पण आईंनी मला घरात घेतलं नाही. मी सुहासला घेऊन तिच्या दारातच रडत बसले. काय करावं, कुठे जावं काही सुचत नव्हतं. त्या दिवशी मावशी आईला सहजच भेटायला आली होती. माझ्या आयुष्यात काय घडलंय हे समजल्यावर ती मला तिच्या घरी घेऊन आली . तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि मावशीचे माझ्यावर खूप उपकार आहेत. एक दिवस सकाळी मी कामावर जायला निघाले तेंव्हा मावशी म्हणाली, 'रसिका, इथे रहायचं असेल तर महिन्याच्या खर्चाचे पैसे द्यावे लागतील.' मला ते मान्यच होतं. मी माझा संपूर्ण पगार मावशीला दिला. ते मला परत नको आहेत. आज ती मला घरातून बाहेर जायला सांगतीये. मी चार दिवसांपूर्वी काकांना १०००० रुपये दिले होते ते त्यांनी मला द्यावेत. मी लगेच घर सोडायला तयार आहे."

"आणि मावशीची तुझ्या बद्दल तक्रार आहे, त्याचं काय? ती म्हणतीये तू दीपकला नादी लावलंस. हा काय प्रकार आहे."

"ताई, दीपक माझ्या पेक्षा लहान आहे. त्याला फिरायला, हॉटेलात जायला आवडतं. त्याच्या आई वडिलां कडे त्याला द्यायला पैसे नाहीत. म्हणून मी त्याची हौस पुरी करते. एवढंच.

"काकांनी माझे १०००० द्यावेत मी त्याचं घर लगेच सोडते."

काकांनी ताबडतोप खिशातून चेक काढला आणि लिहायला सुरुवात केली. तेवढ्यात रसिका म्हणाली, "काका, बँकेत पैसे आहेत का? काल आपलं किराणा बील मी भरलं म्हणून विचारते."

"दोन दिवसांत पैशांची सोय करतो. पण हिने आमच्या मुलाचा नाद सोडावा." असं काकांनी कबूल केलं.

दोन दिवसांनी वत्सलाबाईचा फोन आला. सांगायला, "ताई, माझा दीपक घर सोडून गेला. दोन दिवसांपासून गायब आहे. मी आत्ताचा मिसिंग कम्प्लेंट करून आले"

"आणि रसिका?"

"रसिका त्या दिवशी आमच्या बरोबर आली नाही. ती तिच्या आईकडे गेली असेल. मला ठाऊक नाही."

थोड्यावेळानी रसिकाच्या आईने कळवले, "ताई, दोन दिवसांपूर्वी रसिका घरी आली होती, तिचे कपडे न्यायला. मुलांची आठवण येतीये. रोहनकडे जाते म्हणाली. आज सकाळी त्याला विचारलं तेंव्हा समजलं ती त्याच्या घरी गेलीच नाही. ताई, मला खूप काळजी वाटते आहे. कुठे गेली असेल रसिका?"

दीपक आणि रसिकाच्या पालकांनी आणि रोहननी वेग-वेगळ्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार नोंदवली.

ह्या घटनेला १० दिवस झाले असतील. एक दिवस रोहनचा असं कळवायला फोन आला की, 'रसिका घरी सुखरूप पोहोचली.'

८ दिवसांनी रसिकाचा खुशाली कळवायला फोन आला. तेंव्हा सर्व गोष्टींचा खुलासा झाला. तिने सांगितलं, "ताई, दीपक आणि मी, आम्ही दोघं मावस भावंडं आहोत. आमच्यात चांगलं मैत्रीचं नातं आहे. ते आम्ही नेहेमीच जपलं. एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून मी त्याच्याशी माझा प्रोब्लेम बद्दल बोलले. रोहनला धडा शिकवण्यासाठी मला हे रिस्क घेणं गरजेचं वाटलं. दिपकनी मला चांगली साथ दिली. हॉटेलच्या दोन खोल्यांचं भाडं आणि बाहेर जेवणावर झालेला खर्च आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त झाला. ८ दिवसातच जवळचे पैसे संपले. मग दिपकनी त्याच्या आईला फोन करून कळवलं. तिने रोहनला कळवलं. रोहननी मला घरी आणायला स्पेश्यल गाडी पाठवली. मी घरी आल्या पासून रोहन इज अ चेंज्ड पर्सन. मोबईल चा पासवर्ड, लॉक सगळ गेलं. मेसेजेस आणि रात्री उशिरा पर्यंतचे फोनवरचं चेतिंग बंद झाल......

ती अजून काही सांगणार तेवढ्यात रोहनने फोन घेतला. म्हणाला, "ताई, मागील १५ दिवसांत रसिकांनी माझं जगच बदलून टाकलं. तिच्यावर माझा खूप विश्वास आहे. पण ती कोणाबरोबर तरी निघून गेली आहे. कुठे आहे काही कळत नव्हतं. कशी आहे? काळजीने बेजार झालो. तेंव्हा मला ती मला इतके वर्षं काय सांगायचा प्रयत्न करत होती ते समजलं. ताई, मी तुम्हाला शब्द देतो, मी आयुष्यात कधीच असं चुकीचं, तिला त्रास होईल असं वागणार नाही." 

 

Saturday 17 July 2021

पण ती कुठे आहे?

सकाळचे १०.३० वाजले असतील. ११ वाजता कॅलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग. पटपट आवरून मिटींगला जायची माझी गडबड चालू होती. तेवढ्यात मंजूचा फोन आला. मंजू, माझी चांगली मैत्रीण! तिचा फोन म्हणजे अर्ध्या तासाची निश्चिंती. आणि आत्ता मला खरं म्हणजे कशालाच वेळ नव्हता. मी तिला "मंजू, मी तुला थोड्या वेळानी फोन करते." असं म्हणत कटवायचा प्रयत्न केला, पण ती काही फोन ठेवायला तयार नव्हती. मग नाईलाजानी मी तिच्याशी बोलले.

"अग, हेमा. माझी लांबची बहीण आहे. तिचा मुलगा अनिकेत डिप्रेशन मधे आहे. तू काही मदत करू शकशील का?"

"मंजू, त्याला सायकोलोजीस्ट कडे घेऊन जा. मी नवरा-बायकोची भांडणं सोडवली आहेत, त्यांना कौन्सिलिंग केलं आहे. पण डिप्रेशनच्या व्यक्तीला कधी कौन्सिलिंग नाही केलं."

"मला वाटतं हेमा तू त्याला एकदातरी भेटावस आणि त्याच्याशी बोलावस. प्लीज, माझ्यासाठी."

माझा नाईलाज होता. मी तिला दुपारी २ वाजता संस्थेच्या कार्यालयात यायला सांगितलं. (येतांना अनिकेत आणि त्याच्या आईला पण यायला सांगितलं.) आणि धावत पळत ११ वाजता मीटिंगला पोहोचले. साहेब येऊन मीटिंग सुरु व्हायला ११.४५-१२ वाजले आणि मग ती १.३० पर्यंत चालली.( महिला व मुलांच्या प्रश्नाशी निगडीत विविध ७ कमिटीच्या बैठका, एकाच दिवशी, एका नंतर एक अशा होत्या.) मीटिंग मध्ये फारसं काही घडलं नाही, पण आम्ही उपस्थित राहणं गरजेचं होतं.

ऑफिसला पोहोचायला जवळ जवळ २ वाजले. मंजू, अनिकेत आणि त्याची आई शारदा, माझी वाटच बघत होते. बसताना मंजू म्हणाली, "अग काय करू हेमा? शारदा काही ऐकायलाच तयार नव्हती. अनिकेतची अवस्था पण बघवत नाहीये."

१२ वी पास, २३ वर्षांचा अनिकेत दिसायला चांगला होता. देखणा नाही म्हणता येणार पण स्मार्ट होता. व्यायाम करून कमावलेलं शरीर दिसत होतं. डोळे मात्र उदास आणि नजर हरवलेली होती. तो कसलातरी विचार करत होता. स्वतःशीच काहीतरी बडबडत होता. मी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला विचारलं, "अनिकेत, तू आमच्या ऑफिसला का आला आहेस?"

नो रिअक्शन. अनिकेतला जणू माझं बोलणं ऐकूच आल नव्हतं. एखाद्याला झोपेतून जाग करावं, तसं थोडं हलवून मंजुनी त्याला परत विचारलं, "अनिकेत, ताई काय विचारतायत? आपण इथे का आलोय?"

ह्यावर अनिकेतनी त्याच्या आईला विचारलं, "आपण कुठे आलोय? पण ती कुठे आहे? आणि ती असं का वागली? माझं काय चुकलं? आई, तू मला सोडून जाणार नाहीस ना?" अनिकेत खूप अस्वस्थ झाला आणि शारदाचा हात घट्ट पकडून तो लहान मुलासारखा रडायला लागला. त्याची नजर कोणाला तरी शोधात होती. त्याची अवस्था बघून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आल. स्वतःला सावरत तीने  आपल्या लेकाची समजूत काढली. एखाद्या लहान मुलाची काढावी तशी. "हे बघ अनिकेत, बाळा, घाबरू नकोस. तुला तुझी आई कधीच सोडून जाणार नाही. हे बघ, मी तुझ्या जवळच आहे ना. आणि आई अनिकेतचा हात घट्ट पकडून बसणार आहे. आता ठीक आहे ना? बर वाटतंय का तुला?"

अनिकेत शांत झाल्यावर शारदानी काय नेमकं घडलं ते सांगायला सुरुवात केली.

"हेमाताई, अनिकेतचे वडील (वसंतराव) आणि शिवानीचे वडील (मोहनराव) (शिवानी आमची सून होणार होती) हे शाळेपासूनचे चांगले मित्र. दोघांमध्ये पक्की मैत्री! सख्या भावांपेक्षा पण सख्खे. अनिकेत पाच वर्षांचा असेल, तेंव्हा शिवानीचा जन्म झाला. आम्ही तिला आमची शिवानी म्हणायचो आणि मोहनराव अनिकेतला आपला मुलगा मानायचे. मुलं थोडी मोठी झाली आणि एक दिवस मालतीताई (शिवानीची आई) सहज म्हणाल्या, "दोन्ही मुलांच्या वडिलांची एवढी चांगली मैत्री आहे. ह्या मैत्रीचं नात्यात रुपांतर झालं तर......."

झालं! माझ्या नवऱ्याला ही कल्पना फारच आवडली. एक दिवस त्यांनी मोहनराव आणि त्यांच्या फेमिलीला घरी जेवायला बोलावलं आणि सांगून टाकलं, आजपासून शिवानी आमच्या घरची सून! मुलं मोठी झाली की त्यांचं थाटामाटात लग्न लाऊ. आणि अशा प्रकारे ८ वर्षांचा अनिकेत आणि ३ वर्षांची शिवानीच लग्न ठरलं.

ताई, शिवानी खूप गोड मुलगी आहे. स्मार्ट आहे, हुशार आहे. दिसायला पण सुंदर आहे. मी तर मनोमन स्वतःला नशीबवान समजत होते, कि शिवानी सारखी गुणी मुलगी माझ्या अनिकेतच्या आयुष्याची जोडीदार होणार होती. खरं सांगायचं तर आमच्या अनिकेतच अभ्यासात कधी फारसं डोकं चाललंच नाही. कसातरी १२ वी झाला. त्याला आयुष्यात खरतर दोनच गोष्टींची आवड, एक व्यायाम आणि दुसरं आमच्या घरचा बिझिनेस! तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि घराची, बिझीनेसची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली. तुम्हाला सांगते ताई, माझा मुलगा लाखात एक आहे. त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही. का शिवानी असं वागली मला काही समजत नाही."

शिवानीच नाव ऐकल्यावर अनिकेत कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघत, 'आली का शिवानी? आली का शिवानी? शिवानी मला सोडून जाऊ नकोस" असं म्हणत ऑफिसच्या बाहेर गेला. त्याची आई त्याच्या मागे धावत गेली आणि मंजू "नंतर बोलते तुझ्याशी" असं म्हणत घाईतच त्यांच्या मागे गेली.

पुढचे ८-१० दिवस अनिकेतची काही खबरबात नाही. मंजूचा पण काही फोन आला नाही. मी पण कामाच्या व्यापात फोन करायचं विसरले. खरं सांगायचं तर अनिकेतची केस आमच्याकडे नोंदवण्यासारखी नव्हती. संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची होती.

एक दिवस अचानक मंजूचा फोन आला, "हेमा, अनिकेतच्या संदर्भात तू काही विचार केलास का? त्याला तुझ्याकडे कधी घेऊन येऊ?"

मी जेंव्हा तिला कल्पना दिली कि संस्था म्हणून आम्ही ह्या केसमध्ये फारसं काही करू शकणार नाही तेंव्हा तिने विनंती केली, "हेमा,माझी मैत्रीण म्हणून त्याच्याशी बोलशील का? शारदाला बर वाटेल." आणि अश्या तर्ह्रेनी मी अनिकेतची केस, दोस्तीखातर, एक चेलेंज म्हणून स्वीकारली. १५ दिवसातून किंवा महिन्यातून एकदा गरजेप्रमाणे अनिकेतला त्याच्या घरी कौन्सेलिंग करायचं ठरवलं.

पहिले तीन महिने अनिकेत गप्पच होता. शारदा माहिती सांगत होती आणि तो ऐकत होता. (शिवानीचा उल्लेख आला कि अस्वस्थ व्हायचा) ती म्हणाली, "बरीच वर्षं मुलांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की, आम्ही मोठ्यांनी त्यांचं लग्न लाऊन द्यायचं ठरवलं आहे. शिवानी आमच्या घरी यायची आणि अनिकेत त्यांच्या घरी जायचा. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. अनिकेतच अभ्यासात डोकं चालत नव्हतं. तो जेमतेम १२ वी पर्यंत शिकला. शिक्षण चालू असतानाच वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागला. शिवानी हुशार होती. (आहे) आम्हाला तिच्या हुशारीचं खूप कौतुक होतं. १० वी १२ वीत वर्गात पहिली आली. अनिकेतनी तिला हॉटेलात पार्टी दिली. मी तिच्यासाठी कौतुकानी भारीतला ड्रेस आणला आणि देत म्हणाले, 'शिवानी आम्हाला तुझा अभिमान आहे. मालतीताई बघितलत का आमची सून कशी हुशार आहे! लाखात एक आहे.' हे ऐकल्यावर शिवानी थोडी गोंधळली आणि आश्चर्यानी माझ्याकडे बघत राहिली. तेंव्हा मालतीताई म्हणाल्या, "अग वेडाबाई, तू १८चि झालीस कि तुझं आणि अनिकेतच लग्न लावायचं आम्ही ठरवलं आहे. तेंव्हा आतापासूनच शारदाताईना आई म्हणून हाक मारायची सवय कर."

त्या दिवशी शिवानी काहीच बोलली नाही. तिने आई समोर मला वाकून नमस्कार केला. तिथून पुढे आधीसारखी आमच्या घरी येत राहिली. आमच्या घरातील कार्यक्रमात सहभागी व्हायची, मला कामात मदत करू लागायची. अनिकेत बरोबर खरेदी करायला, फिरायला जात होती. असं वाटत होतं दोघं खुश आहेत. एवढंच नाही तर त्या काळात माझा पाय मुरगळला तर ८ दिवस आमच्या घरी जेऊन स्वैपाक केला, माझी सेवा केली.

आमचं दोन मजली घर आहे. मी विचार केला, लग्नानंतर अनिकेत आणि शिवानी वरती रहातील. मला त्यांची सोबत पण होईल आणि त्यांना त्यांची प्रायवसी पण मिळेल. लग्नाची तारीख निश्चित केल्यावर मी वरच्या मजल्याच काम करून घेतलं. खोल्यांच्या रंगापासून ते कुठल्या खोलीत काय कुठे असावं ह्या सगळ्यात शिवानिनी उत्साहानी भाग घेतला. लग्नाची पत्रिका, त्याचा मजकूर ठरवायला, लग्नाची खरेदी करायला ती पूर्ण वेळ माझ्या आणि अनिकेतच्या बरोबर होती. कार्यालय ठरवायला आणि लग्नाच्या पत्रिका वाटायला ती आमच्या सोबत होती.

उद्यावर लग्न आलेलं. घरात अनिकेतचे मित्र आणि नातेवाईकांची गर्दी. सगळ्याचं आवरून झोपायला जायला दोन वाजले. झोप लागते न लागते तो मालतीताईचा फोन आला. घड्याळात पाहिलं तर पहाटेचे ५.३० वाजले होते. मनात आल 'मालतीताईना मुलीच्या लग्नाची माझ्यापेक्षा जास्त घाई झालेली दिसतीये.' मी काही बोलणार तो तिकडून मालतीताई रडवेल्या आवाजात सांगत होत्या, "शारदाताई, शिवानी घर सोडून पळून गेली आहे. तिला उठवायला गेले तर अंथरुणात शिवानी नाही. पलंगावर एक चिट्ठी होती. त्यात लिहिलाय, 'आई-बाबा, मी आज १८ वर्षांची झाले आहे. मी कायमची घर सोडून जात आहे. मी आणि राहुल, आम्ही लग्न करणार आहोत. राहुल आणि मी एक-मेकांना दोन वर्षांपासून ओळखतो. अनिकेत चांगला मुलगा आहे. बट नॉट माय टाईप! काकु पण खूप जीव लावतात. मी अशी अचानक निघून गेल्यानी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होईल. मला कळतंय. पण मी काय करू? माझा नाईलाज आहे. अनिकेतशी लग्न करून आयुष्यभर दुखी होण्यापेक्षा मी हा मार्ग स्वीकारला. जमलं तर मला माफ करा."

अनिकेत आमच्यात चाललेलं बोलणं ऐकत होता. "पण माझं काय चुकलं? शिवानी माझ्याशी असं का वागली? दर वेळेला आम्ही बाहेर जायचो तेंव्हा मी सगळं तिच्या मनासारखं वागायचो. ती म्हणेल तसं. ती म्हणाली हॉटेलात जाऊया तर तसं, कशाला नाही म्हणाली तर तसं. आता आठवतंय आम्ही नेहेमी एकाच बागेत किंवा हॉटेलात जायचो. एक दोनदा आम्हाला राहुल भेटला होता. तिने त्याची ओळख, 'माझ्या कॉलेज मधला बेस्ट फ्रेंड' अशी करून दिली होती. माझ्या मनात कधीच शंका आली नाही. मनात शंका येण्याचं काही कारण पण नव्हतं. तिच्या वागण्या-बोलण्यातून ती खुश आहे असं मला वाटत होतं. तिला मी आवडतच नव्हतो तर तिने मला तसं का नाही सांगितलं? ते पचवणं सोपं गेलं असत. पण माझ्या आयुष्याचा हा असा खेळ करायला नको होता. मी पुन्हा कोणावर...."

बोलता-बोलता तो अचानक लहान मुलासारखा रडायला लागला. आम्ही आमचं बोलणं थांबवलं. आता मला नेमकं काय घडलं ह्याचा अंदाज आला होता. एक-दोनदा मी त्याला सांगायचा प्रयत्न केला कि 'शिवानी वागली ते चुकीचच आहे. पण हे सगळं सांगायची तिची हिम्मत झाली नसेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लग्नानंतर ती सोडून गेली असती तर त्याचा त्रास जास्त झाला असता.' एक गोष्ट मला जाणवत होती. अनिकेतला हे कळत होतं पण मन मान्य करायला तयार नव्हतं.

त्या दिवसानंतर मी अनिकेतला बरेच वेळा भेटले पण दर वेळेस शिवानीचा विषय कटाक्षाने टाळला. त्याच्या आवडीच्या विषयावर- खेळ, बिझिनेस इ. बोलायचो. त्यांनी खेळात मिळवलेल्या मेडल्स बद्दल बोलताना तो खुश व्हायचा. तेंव्हाचे अनुभव सांगतांना रमून जायचा. त्याच्या आयुष्यात शिवानीच्या व्यतिरिक्त इतर विषयांना पण स्थान मिळू लागलं. त्याचं हरवलेपण कमी झालं. डिप्रेशन मधून तो हळू-हळू बाहेर येत होता. तरीपण तो अधून-मधून शिवानीचा विषय काढायचा, पण तिच्या बद्दल बोलताना, तिच्या बद्दलचा  राग, तिच्या वागण्यातून झालेल्या वेदना ह्याची तीव्रता कमी होत होती. हे मला आणि त्याच्या आईला जाणवत होतं. तो हळूहळू नॉर्मल होत होता. ह्या सगळ्या प्रोसेसला एक वर्षं लागलं.

लग्न ज्या प्रकारे मोडलं त्याच्या धक्क्यातून तो पूर्णपणे सावरला आणि स्वतःच आयुष्य पूर्ववत जगायला लागला. तो आणि शारदा, सारिकाला घेऊन, साधारण दिडेक वर्षांनी मला घरी भेटायला आले. अनिकेतच सारीकाशी लग्न झाल्याची बातमी मला मंजुकडून समजलीच होती. मी लग्नाला जाऊ शकले नाही म्हणून आवर्जून भेटायला आले होते. सगळ्यांचे आनंदी चेहेरे बघून खूप समाधान वाटलं!

 

 

 

 

Tuesday 29 June 2021

तो म्हणेल ती पूर्व दिशा

 

संपत, एका सुखवस्तू शेतकरी  कुटुंबातील सदस्य. सात भावंडानमधील एक. पण त्याचं घरी, दारी, नातेवाईकांमध्ये, गावांमध्ये सगळ्यांना खूप कौतुक होतं. तो चुणचुणीत आणि हुशार होता. गावातील इतर मुलांच्या तुलनेत तो खूप शिकला. बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात ५०वा, तर तालुक्यात १५वा आला होता. अर्थात गावात सर्व विषयात प्रथम क्रमांक त्यानेच पटकावला होता. गावच्या सरपंचानी त्याचा सत्कार केला. पुढे शिकून तो सरकारी नोकरीत लागला. गावातल्या सगळ्यांना त्याचा खूप अभिमान होता. सर्व त्याला 'साहेब, साहेब' म्हणून संबोधायला लागले. तो म्हणेल ती पूर्व दिशा असंच काहीसं होत गेलं. त्याच्या मनात स्वतःबद्दल एक वेगळीच भावना झाली होती. 'मी चुकूच शकत नाही. मला कोणाची गरज नाही. मी मनात आणीन ते मिळवू शकतो.'

कालांतरानी त्याचं लग्न पंचक्रोशीतल्या एका सुखवस्तू कुटुंबातील हिरा नावाच्या मुलीशी झालं. हिरा, मुळातच हुशार, पण कधी शिक्षणाची संधी मिळाली नाही. तिच्या आई-वडिलांना मुलींनी शिक्षण घेणं मान्य नव्हतं. तिची हुशारी तिला गप्प बसू देत नव्हती. एखादी गोष्ट खटकली, कोणाचं वागणं पटलं नाही कि सुरुवातीला तिने वाद घालायचा, आपलं मत पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण घरातल्या मोठ्या माणसांच्या मते हि हुशारी नव्हती. तो आगाऊपणा होता. मुलीच्या जातीला तोंड वर करून बोलणं शोभत नाही. 'दुसऱ्यांच ऐकून घ्यायला शिक. एखाद वेळेस समोरच्याचं म्हणणं, वागणं पटलं नाही तरी ऐकून घ्यावं. त्यांनी काही अंगाला भोकं पडणार नाहीत. अशीच वागत राहिलीस तर उद्या सासरी जाऊन आमचं चांगलच नाव काढशील. वेळीच शहाणी हो.' घरातून मिळालेल्या ह्या शिकवणी मुळे, तिने स्वतःच्या स्वभावाला मुरड घातली. ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकली! मन मारून जगायला शिकली! अपमान सहन करायला शिकली. सासरी आणि समाजात, एक आदर्श मुलगी, आदर्श सून असं नाव कमावल. आई-वडिलांचं, तिच्या खानदानाच नाव मोठं झालं.

हिराच संपतशी लग्न झालं तेंव्हा ती जेमतेम १९ वर्षांची होती आणि संपत २४ वर्षांचा. हिरानी बघता-बघता घरातील अनेक जबाबदार्या स्वीकारल्या, कष्टाच्या! स्वतःची चार मुलं, (दोन मुलं आणि दोन मुली) आणि भांडून माहेरी गेलेल्या जावेची दोन मुलं अश्या सहा मुलांना, घरातील इतर मोठ्यांना काय हवं नको ते बघत होती. घरातली काम,  स्वैपाक-पाणी, आला-गेला, नातेवाईक अस सगळ सांभाळून शेतात कष्ट करायची. कधी कशाची अपेक्षा नाही. कि कशा बद्दल तक्रार नाही. अशी सर्वगुणसंपन्न सून सगळ्यांची लाडकी होती. पण संपतरावांच काय? त्याला त्याची बायको बिनडोक, अडाणी वाटायची. तो पदोपदी तिचा अपमान करायचा. रात्री जरी हक्कांनी जवळ घेत असला तरी दिवसा त्याला ती नजरे समोर नको असायची. त्याची मर्जी सांभाळण्यासाठी सासूबाईनी एक फतवा काढला, "संपातला आवडत नाही तर तो घरात असतांना हिरा स्वैपाकघरातून बाहेर येणार नाही." हिरानीपण निमुटपणे ते मान्य केलं. सर्व काही सुरळीत चाललं होतं. एकदा ती मुलांना जेवणासाठी बोलवायला बाहेर आली आणि तिच्या दुर्दैवाने संपत ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तिला बघताच त्याचं पित्त खवळल. कोणाच्या काही लक्षात यायच्या आत त्यांनी रागाच्या भरात हिराच्या कानफटात लगावली. झालेल्या अपमानाने आणि वेदनेने हिराच्या डोळ्यात पाणी आल. घरातील सगळ्यांनी काय घडलं ते बघितलं. पण संपतला काही सांगायची, बोलायची कोणाची हिम्मत झाली नाही. उलट सासू हिरालाच म्हणाली, "हीरा, तुला सांगितलं होतं ना, तू बाहेर येऊ नकोस म्हणून? माझं थोड ऐकना ग पोरी. तुझ्या अश्या वागण्यामुळे त्रास होतो ग सगळ्यांना." त्या दिवसानंतर बायकोवर हात उचलायला, संपतला कुठलं पण कारण पुरेसं होतं. संपतच्या तिरसट आणि मगरूर स्वभावाला हिराचा सोशिकपणा पोषकच ठरला.

अश्या प्रकारे हिरानी आपला संसार टिकवला. मुलं मोठी झाली. मुली लग्न करून सासरी गेल्या. मोठा मुलगा बायकोला घेऊन गावातच वेगळा राहू लागला. धाकट्या मुलानी (महेश) लग्नच केलं नाही. त्याला आईची काळजी वाटत होती, आणि वडिलांचा राग येत होता. वडिलांच्या विचित्र वागण्यामुळे त्याला खात्री होती कि, 'आपला संसार सुखी व्हायला हवा असेल तर, बायकोला घेऊन, वेगळ राहण्याला पर्याय नाही.' आणि आईनी वडिलांसोबत एकटीने रहावं हे त्याला सुरक्षित वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी लग्नाचा विचारच करायचा नाही असं ठरवलं. महेशला नोकरी लागली तेंव्हा त्यांनी आपल्या आईला समजावलं, "आई, आता हे सहन करण थांबव. मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आपण दोघं, दादा आणि वहिनी सारखं वेगळीकडे खोली घेऊन राहू. वडिलांचं तुझ्याशी वागणं हे असंच चालू राहिलं तर एखाद दिवशी माझ्या हातून काहीतरी अघटीत घडेल." पण हिरानी घर सोडण्यास नकार दिला. महेशचा पण नाईलाज झाला.

अखेर एक दिवस हिराच्या सहनशक्तीचा अंत झाला. घरात काहीतरी कार्यक्रमासाठी मुलं, सूना, लेकी, जावई, नातवंड, असे सगळे जमले होते. घरात गडबड होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. मुलं मस्ती करण्यात खेळण्यात मग्न होती. तेवढ्यात कोणाचातरी धक्का लागला आणि हिराच्या हातून पाण्याचा ग्लास, संपतच्या अंगावर पडला. मागचापुढचा विचार न करता (जो त्यांनी आजपर्यंत कधीच केला नाही) संपतनी हीराच्या धोबडीत मारलं आणि अर्वाच्य शिव्या दिल्या. एरवीची गोष्टं वेगळी होती. पण आज लेकी,सूना, जावई, ह्यांच्या समोर झालेला अपमान तिला सहन झाला नाही. त्या घटनेनंतर हिरानी ठरवलं, "आता बास! आता ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे."

तिने कुठूनतरी आमच्या संस्थेची माहिती मिळवली आणि येऊन नवर्याविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. स्वतःची माहिती तिने अगदी शांतपणे सांगितली. कशाही बद्दल त्रागा नाही, कोणासाठी तिने अपशब्द वापरला नाही. तिने कशाबद्दल कोणाला पण दोष दिला नाही. तिचं एकच म्हणणं होतं, "आज ४५ वर्षाच्या संसारा नंतर मला कळून चुकलाय कि मी ह्या माणसासोबत एकाच छताखाली आता नाही राहू शकत. ताई, मी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला सांगा."

नेहेमीप्रमाणे आमच्या मनात अनेक प्रश्न होते. "हिराताई, तुम्ही रहाणार कुठे? तुमच्या सुरक्षिततेच काय?............

"मी कुठे रहाणार म्हणजे? तिथेच! मी आणि महेश! संपतरावांच्या मालकीची दोन घरं आहेत, शेती आहे, त्याचं उत्पन्न आहे, त्यांना मिळणारं पेन्शन आहे, बँकेत ठेवलेला रगड पैसा आहे. आहे सगळं. पण द्यायची दानत नाही. पैसा पण नाही आणि कोणाला सुख पण नाही. ते जाऊ दे.

"माझ्या सुरक्षिततेची काळजी नाही. त्याला मला मारून टाकण्यात इंटरेस्ट नाही, त्रास देण्यात आहे. माझा अपमान करण्यात आहे. नाहीतर ४५ वर्षात मला कधीच संपवली असती.

"मी तुमच्याकडे आले आहे. आता तुम्ही सांगाल ते आणि तसं मी वागेन. आज मी माझ्या मुलीकडे जाणार आहे. तसं मुलगी आणि जावई बरेच दिवसांपासून बोलावतायत. काही दिवस राहीन. न अपमान करून घेता, न शिव्या खाता जगायची सवय करायला हवी. तसं जगता येतं हेच विसरत चालले आहे." हिराताईच्या डोळ्यात पाणी आल. ऑफिसमध्ये आल्यापासून पहिल्यांदा तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

संपतराव आमचं पाहिलं पत्र मिळाल्याबरोबर आम्हाला भेटायला आले. त्यांच्या मनात हिराताई बद्दलचा  राग, तिरस्कार त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. त्यांच्या मते त्याचं काहीच चुकत नव्हतं. ते म्हणाले, "तिच्या लायकी प्रमाणे तिला वागणूक मिळत होती. उलट तिची लायकी नसतांना मी तिला इतके वर्षं सहन केलं, घरात राहू दिलं, जगू दिलं, ह्याचे आभार मानायचे सोडून तुमच्याकडे तक्रार करते. समजते काय ती स्वतःला? सध्या तर कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. कुठे गेली आहे? कधी येणार? माहित नाही. तिची बेफिकिरी किती? इकडे आपला नवरा जगाला कि मेला? तो जेवला का? रात्रीची त्याची काय सोय होत असेल? त्याची सेवा कोण करत असेल? हिला कशाचं काही नाही. तिला ठाऊक आहे रात्री झोपायच्या आधी माझ्या डोक्याला तिने तेल लाऊन दिलं नाही, माझे पाय चेपून दिले नाहीत तर मला झोप लागत नाही. मी आयुष्यभर केलेल्या उपकाराची हि चांगलीच परतफेड करतीये. हे सर्व करण्यासाठी, असं वागण्यासाठी महेशचीच फूस असणार. ह्यात काही शंका नाही. नाहीतर तिला एवढं डोकं नाहीये. तिला जर असं वाटत असेल कि एवढं तारतम्य सोडून वागल्यावर पण मी तिला घरात घेईन, तर तो तिचा गैरसमज आहे. बघू कुठे जाते आणि कोण सांभाळताय ते. चार दिवस उपाशी राहिली कि सर्व डोकं ठिकाणावर येईल."

संपतराव बोलायचं थांबले. जेंव्हा आम्ही त्यांना सांगितलं, 'त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हिराताईनी त्यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय.'

हे त्यांच्यासाठी फारच अनपेक्षित होतं. क्षणभर काय बोलावं त्यांना काही सुचेचना. 'हिरा येणार नाही, ह्याचा अर्थ काय? सेवा करणारी, अपमान सहन करून, वेळप्रसंगी होणारी मारहाण सहन करून मुकाट्यानी जगणारी हिरा नाही मग आयुष्यात काही मजाच नाही.'

संपतराव म्हणाले, "ताई, तुम्ही सांगितलं ते मी ऐकलं आणि मला समजलं. पण जो पर्यंत हिरा हे माझ्या समोर सांगत नाही तोवर मी हे मान्य करायला तयार नाही."

त्यांच्या आग्रहाखातर लगेच पुढील आठवड्यातील तारीख, एकत्र मीटिंग साठी ठरली. मीटिंग मध्ये संपतरावांच्या समोर हिराताई म्हणाल्या, "ताई, मी तुम्हाला जे सांगितलं तेच माझं आजपण म्हणणं आहे. मी ह्या माणसाबरोबर एका छताखाली नाही राहू शकत."

हिराताईचा बदललेला अवतार, तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास, हे सगळं संपतरावांसाठी नवीन होतं. हिरा नाही तर आपली जगण्याची फारच पंचाईत होईल, हे संपतरावांच्या लक्षात आल होतं. अनिच्छेने का होईना पण त्या दिवशी आम्हा सर्वांसमोर त्यांनी मान्य केलं कि कधी कधी त्याचं हिराशी वागणं चुकलं. 'आता माझी मला चूक कळली आहे तर मी ती सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करीन. हिरानी मला एक संधी द्यावी.'

त्यांनी बरीच गळ घातली, आग्रह केला म्हणून हिराताई संपतरावांच्या बरोबर जायला तयार झाली. तिने घातलेल्या काही अटी पण त्यांनी मान्य केल्या. (अटी अगदीच सध्या होत्या- महेश तिच्या बरोबर त्याचं घरात राहील. नवर्यानी तिचा अपमान करू नये. तिच्यावर हात उचलू नये. तिला शिव्या देऊ नयेत.) अश्या तर्हेनी ७० वर्षांचे संपतराव आणि ६४ वर्षांची हिराताई ह्यांच्यात समझोता झाला. आम्हालाच खूप बरं वाटलं. (संपतरावांना त्यांची चूक समजली, आणि त्यांनी नीट वागायचं कबूल केलं म्हणून.)

पण आमचं हा आनंद खूप काळ टिकणार नव्हता. समझोता होऊन आठ दिवसांच्या आत हिराताई पुन्हा ऑफिसला आल्या. खुशाली सांगायला नाही तर नवर्यानी केलेली नवीन नाटकं सांगायला. ह्या आठ दिवसांत त्यांनी कबूल केल्याप्रमाणे तो वागला. पण ह्या वेळेस त्यांनी त्रासाचा प्रकार बदलला. हिराताई सांगत होती, "ताई, एक दिवस तो सकाळी लवकर उठला आणि स्वैपाकघराला कुलूप लाऊन मुलाकडे खुशाल निघून गेला. मी आणि महेश, दिवसभर उपाशी राहिलो. त्या दिवसापासून आम्ही रात्री शांत झोपू शकलो नाही, कारण ह्या माणसाची काही खात्रीच वाटत नाही. मध्ये एकदा मी संद्याकाळी भाजीबाजारात गेले आणि महेश कामावरून आला नव्हता. तर हा बाबा घराला कुलूप लाऊन कुठेतरी निघून गेला. रात्रभर आम्ही दोघं उपाशी दाराशी ह्याची वाट बघत बसून राहिलो. ताई, मी ह्या माणसाबरोबर नाही राहू शकत."

आम्ही फोन करून संपतरावांना बोलावून घेतलं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सांगितलं, "ताई, मला अजून पण वाटतंय हिने माझ्या सोबत रहावं. मी हे असं वागलो कारण मला महेश माझ्या घरात नको आहे. त्याच्यामुळेच ती शेफारात चालली आहे. त्याउप्पर पण तिला राहायचं नसेल तर ती कुठेही जाऊ शकते. माझा मोठा मुलगा आणि सून माझ्या बरोबर रहातील."

संपतरावांच हे म्हणणं कोणालाच मान्य नव्हतं. खूप प्रकारे समजावून सांगितल्यावर ते त्यांच्या रहात्या घरात हिराताई साठी एक खोली द्यायला तयार झाले. हिराताई तिच्या म्हणण्यावर ठाम होती. ती कोणत्याही कारणांनी नवर्या बरोबर रहायला तयार नव्हती. तिने तिची मागणी परत मांडली, 'शेतातलं दोन खोल्यांचं घर त्यांनी मोकळं करून द्यावं, जिथे ती आणि महेश रहातील.'

हो नाही करत संपतराव हे करायला कबूल झाले. आता प्रश्न आला घरातील भांडीकुंडी आणि महिन्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांचा. आधी तर त्यांना हे मान्यच नव्हतं. मग महा मुश्किलीने ते ५०००/- महिना आणि वर्षाला एक पोतं धान्य द्यायला कबूल झाले. पण संपतराव भांडी सोडायला तयार नव्हते. लहान मुलांसारख त्यांना नको असलेल्या वस्तू: तुटकी-फुटकी भांडी, मोडकळीस आलेलं कपाट, अडगळीतले डबे द्यायला तयार झाले.

आम्ही काही म्हणणार तर हिराताई म्हणाल्या, "ताई, मला एवढं बास झालं. महेशपण आता कमावतोय. आम्ही आम्हाला लागणाऱ्या वस्तू हळूहळू गोळा करू."

८ दिवसांत संपतरावानी शेतातल्या घराची डागडुजी करून घ्यायचं कबूल केलं. तोवर हिराताई त्यांच्या मुलीकडे रहातील हे पण सर्वाना मान्य झालं. ठरल्याप्रमाणे ८-१० दिवसांत हिराताई आणि महेश त्यांच्या नवीन घरात राहायला गेले. आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही होम विझिटला गेलो. हिराताईनी आमचं छान स्वागत केलं. दोन खोल्या आणि स्वैपाघर असं छोटंसं घर होतं. पण हिराताई आणि महेशसाठी ते पुरेसं होतं. आम्ही गेलो तेंव्हा महेश कामानिमित्त बाहेर गेला होता. हिराताई आम्हाला आग्रहाने तिच्या स्वैपाघरात घेऊन गेल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा घरात खूपच सामान होतं,मुख्यता स्वैपाकघरात! घरात लागणारी सर्व भांडी होती आणि ती पण सुस्थितीत! आमच्या चेहेर्यावरचे भाव ओळखत, मिस्कील हसत हिराताई म्हणाल्या, "तुम्ही काय म्हणता ना ते केलं. भांडी स्मगल केली. नवरा बाहेर गेला कि रोज दोन चार भांडी मुलाकडे आणून ठेवली. त्याला काही कळणार नाही. अहो त्याला काल काय खाल्लं आणि कोणते कपडे घातले होते ते आठवत नाही. त्याला घरातून कमी झालेली भांडी मरेपर्यंत आठवणार नाहीत."

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. हिराताईनी स्वताहून विषय काढला. 

"ताई, तुम्ही सगळ्या मला देवासारख्या भेटलात. तुम्ही मदत केलीत म्हणून आज मी हे सुखाचे दिवस अनुभवतीये. कानाला शिव्या ऐकायची आणि मनाला धाकात राहायची इतकी सवय झाली होती, कि सुरवातीला खूप चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. पण मला वाटलं त्या पेक्षा लवकर ह्याची सवय झाली आणि आता हेच भारी वाटतंय."

"हिराताई, संपतराव काय म्हणतायत? मोठ्या मुलाकडे मजेत का? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, तेंव्हा मुलगा आणि सून चांगली सेवा करत असतील."

"ताई, संपतरावांची सर्व गुर्मी उतरली आहे. मोठा मुलगा आणि त्याच्या बायकोने त्यांचं काही करणं तर लांबच. साध भेटायला पण जात नाहीत. मला विचारलं होतं, 'तुझ्याकडे जेवायला आलो तर चालेल का?' मी काही सांगायच्या आधी महेशनी त्यांना निक्षून 'जमणार नाही' असे सांगितले आणि विषय संपवला. कुठून तरी  जेवणाचा डबा मागवतात असं ऐकलं."

आम्ही पुढे काही म्हणणार तेवढ्यात एक मुलगा जेवणाचा डबा घ्यायला आला. "हा कोणासाठी?" असं न रहावल्यामुळे आम्ही विचारलं. आलेल्या मुलाच्या हातात डबा देत हिराबाई म्हणाली, "संपतरावांना कोरोना झाला आहे. मोठा मुलगा आणि सून त्याची काळजी घेत नाहीत. माणुसकी म्हणून मी सकाळ संध्याकाळ जेवण पाठवते!"   

Sunday 13 June 2021

माझं कधीच काही चुकत नाही

माझं कधीच काही चुकत नाही

आज मी जरा ठरवूनच ऑफिसला उशिरा गेले. खरं म्हणजे मी एखादवेळेस येणार नाही, असाच निरोप दिला होता. पण इतक्या वर्षांची ऑफिसला जाण्याची, सर्वाना भेटण्याची, अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत करण्याची सवय मला काही घरात स्वस्थ बसू देईना. ऑफिसला पोहोचले तर नवीन नोंदणी करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी होती. पण खुशाली सांगायला आलेल्या हीना आणि परेशची चौकशी करण्यात, आणि त्यांच्या जुळ्या मुलांचं कौतुक करण्यात सर्वजणी मग्न होत्या. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होतं. खरं म्हणजे हि केसपण वेगळीच होती.

मागील ३-४ वर्षातील केस असेल. हीना आणि परेश दोघं उच्च शिक्षित! दोघपण इंजिनीअर! सुशिक्षित, सधन कुटुंबातील! मुलगी नाशिकची आणि मुलगा सुरतचा. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला. २-२.५ लाख महिना पगार. परेशच्या घरी चारच माणस. तो, त्याचे आई-वडील आणि धाकटी बहीण दिप्ती. दिप्तीच शिक्षण संपलं कि ती पण लग्न करून सासरीच जाणार. म्हणजे २-३ वर्षात राजा-राणीचा संसार! एवढं चांगलं स्थळ. हिनाच्या आई-वडिलांनी १५-२० लाख खर्च करून थाटात लग्न लाऊन दिलं.

लग्न करून हीना सासरी आली. पहिले ८-१५ दिवस बरे गेले. मग लहान-सहान कारणांवरून कुरबुरी सुरु झाल्या. हिनानी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तुलना तिच्या सासू (सरलाबेन) बरोबर होऊ लागली. अगदी चहा करण्यापासून. तिने केलेली घरातील साफसफाई, स्वैपाक, काही पण कोणाच्या मनास येत नव्हतं. तिची प्रत्येक गोष्ट जणू चुकत होती. जाता-येता प्रत्येक जण टोमणे मारत होता. तिचा अपमान करत होता आणि माहेरच्या लोकांचा उद्धार! एक दिवस सरलाबेन नी फतवा काढला आणि घरातील नोकरांना काढून टाकलं. असं केल्यानी घरातील सर्व काम करायला एकच नोकर उरला, हीना! हिनाच्या शिक्षणाचं, तिच्या इतर कौशल्याचं (जसं तिला वाचनाची खूप आवड होती. तिला विविध विषयांची खूप माहिती होती. ती एक चांगली कलाकार होती. नृत्य आणि रंगभूमीवर विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने अनेक बक्षिसं मिळवली होती.) कोणाला काही कौतुक नव्हतं. तिला नोकरी करायची होती, पण त्यासाठी  परवानगी मागायचं तिने धाडसच केलं नाही. एक दिवस सर्वांच्या खुशालीची चौकशी करायला हिनाच्या आईंनी फोन केला. तेंव्हा सरलाबेन चिडून म्हणाल्या," कशी बिनडोक मुलगी आमच्या गळ्यात बांधली आहे. ना स्वैपाक येत, ना साफ-सफाई करता येत. शिक्षणाचं काय कौतुक सांगताय? मुलीच्या जातीला घर, संसार आणि पतीच सुख महत्वाचं. तिला स्वैपाक यायला पाहिजे, स्वच्छता करता आली पाहिजे, घरातील मोठ्यांची मर्जी सांभाळता आली पाहिजे."

त्यांना मधेच थांबवत सरोजबेनने (हिनाची आई) सांगण्याचा प्रयत्न केला, "सरलाबेन, मुलगी शिकायला होस्टेलमध्ये होती. शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच लग्न करून तुमच्या घरी आली. तुम्ही तिला तुमच्या पद्धतीने शिकवा, तयार करा. तिला समजून घ्या. तिला तुमच्या घरात रुळायला वेळ द्या. तुम्ही तिला फोन देता का? मी तिच्याशी बोलते, तिला समजून सांगते."

"तुम्हाला माहिती होतं ना, कि तुमच्या मुलीला घरकामातील काहीच येत नाही. तर मग लग्न लाऊन द्यायची घाई का केलीत? मी काय कुकिंग क्लास सुरु केलाय. सगळं आम्हीच शिकवायचं तर तुम्ही इतकी वर्षं काय केलत? एक वेळेस हे पण समजून घेतलं असत. पण हीना घरात आल्यापासून कोणालाच कुठल्याच प्रकारचं सुख नाही. ना मुलगा खुश आहे ना आम्ही! आमची काय जगावेगळी अपेक्षा होती. घर सांभाळावं आणि दोन चार नातवंड असावीत. पण ते पण सुख आमच्या नशिबात नाहीये असंच वाटतंय."

"अहो सरलाबेन, मुलांच्या लग्नाला सहा महिने होतायत. अहो निसर्गाचे काही नियम आहेत. सगळ्या गोष्टी घाईने नाही मिळवता येत. ती थोडी रुळली, त्यांची मन जुळली की होईल सगळं ठीक......"

सरोजबेन पुढे काही बोलणार तर सरलाबेननी फोन कट केला.

फोनवरील संभाषणाने सरोजबेन अस्वस्थ झाली. पुढील आठवड्यात काहीतरी कारण काढून ती सुरतला लेकीला भेटायला गेली.' (घरी गेल्यावर तिला समजलं की हिनाला शक्तिवर्धक इंजक्शन (जबरदस्तीने) दिलं त्याची रिअक्शन आली, म्हणून दवाखान्यात एडमित केलं होतं.) दार उघडायला हीना आली ती पदराला हात पुसत. हिनाची अवस्था आणि अवतार  बघून सरोजच्या डोळ्यात पाणी आल. चेहेरा ओढलेला, डोळे निस्तेज, डोळ्याखाली काळी वर्तुळ, तब्येत खूपच खराब झाली होती. केस विस्कटलेले आणि साडी इतकी अजागळपणे नेसली होती की क्षणभर त्या माउलीला प्रश्न पडला की 'माझी टीप-टोप रहाणारी, गोड दिसणारी आणि मोकळं हसणारी हीना गेली कुठे? ह्या लोकांनी हीच हे काय करून टाकलाय?'  आईला बघितल्यावर हीना आईच्या गळ्यात पडून लहान मुली सारखी रडायला लागली. तिच्या डोळ्यात एकच आशा होती 'आता आई आली आहे ती सगळं ठीक करेल.'

ती आईला काही सांगणार तेवढ्यात सरलाबेननी सांगायला सुरुवात केली, "केवढी नाटकी आहे ही. आम्ही हिला 'दिवस का रहात नाहीत' म्हणून तपासायला घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले विकनेस आहे, मी टोनिक लिहून देतो. तिला पटकन बर वाटावं म्हणून परेशनी सुचवलं म्हणून डॉक्टरनी बि१२ चं इंजक्शन दिलं. तुमच्या मुलीनी केवढा तमाशा केला. इतकी लाज वाटली त्या दिवशी. (खरतर हिनाला तो डोस सूट नाही झाला. त्याची रिअकशन आली. आणि तिला दवाखान्यात एडमिट करावं लागलं. आदल्या दिवशीच तिला घरी आणलं होतं.) ती आता नजरेसमोर पण नको असं वाटतय. आपले संबंध जुळल्यापासून आज पहिल्यांदा तुम्ही काहीतरी शहाणपणा दाखवला. वेळेवर आलात. जाताना तुमची लाडकी लेक बरोबर घेऊन जा."

सरोजबेनचा झालेला अपमान, हिनाची अवस्था, सरलाबेनच वागणं, ह्या सगळ्यामुळे सरोज आल्या पावली आपल्या मुलीला नाशिकला घेऊन आली.

ह्या घटनेला जवळ-जवळ तीन वर्षं झाली. ह्या तीन वर्षात हिनानी परेशला फोन करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिचा फोन घेणं टाळल. समाजाच्या एका कार्यक्रमात भेटला तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, "हीना, तू मला सांगून, विचारून गेली नाहीस. मी घरात नसतांना तू तुझ्या आईसोबत निघून गेलीस. आता तुझं काय करायचं ते माझी आईच ठरवेल. ती म्हणेल तेच माझं पण म्हणणं असेल." हिनाच्या आई-वडिलांनी  सासरच्या लोकांपर्यंत नातेवाईकांच्या हाती खूप वेळा निरोप दिला. समजुतीने प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊया. एकदा भेटूया. मुलं अशी किती दिवस एक-मेकांपासून लांब ठेवायची आणि का? एकत्र आली तर त्यांची मन जुळतील आणि संसाराला लागतील.

पण सासरच्या लोकांकडून काहीच उत्तर आल नाही, आणि कोणीतरी सुचविलं म्हणून हीना, तिच्या आई बरोबर, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिचं म्हणणं ऐकल्यावर हिनाची सासरी झालेली घुसमट, अपमान आणि त्याचा तिच्या तब्येतीवर झालेला परिणाम कळत होता. तीन वर्षं विभक्त राहिल्यावर समझोता होणं अवघड होतं पण अशक्य नव्हतं. मागील तीन वर्षात परेशनी किंवा त्याच्या आई-वडिलांकडून फारकातीची मागणी आली नव्हती. एवढंच नाही तर तो विषय पण कधी त्यांनी उच्चारला नव्हता. हाच एक आशेचा धागा पकडून आम्ही पत्रव्यवहार सुरु केला. पहिल्या दोन पत्रांची परेशनी दखलच घेतली नाही. फोन केला तर उडवा-उडवीची उत्तरं दिली. नाईलाजाने पुढील पत्र त्याच्या ऑफिसच्या पत्यावर पाठवलं. ह्याचा उपयोग झाला. आठ दिवसांत त्याचा चिडून फोन आला. त्यांनी आमच्या ऑफिसात येण्यास स्पष्ट नकार दिला. नाशिकमध्ये राहणाऱ्या त्याच्या काकांनी समजावल्यावर, तो त्याच्या आई-वडिलांना घेऊनच आला. अपेक्षेप्रमाणे पहिल्या भेटीत तिघांनी पण हीना बद्दलच्या त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. परेशच्या बोलण्यात बायको 'न भेटता, बोलता माहेरी निघून गेल्यामुळे त्याचा झालेला अपमान आणि तिच्या ह्या अश्या वागण्यामुळे परेशनी करून घेतलेला गैरसमज की, हिनाच्या मनात आपली काही किंमत नाही' हे जाणवत होतं. सासऱ्यांच काहीच म्हणणं नव्हतं. सरलाबेनच्या मते त्यांचं वागणं चुकलेलच नव्हतं. त्यांचं अजूनपण असंच मत होतं की, सुनेला कामात, धाकात ठेवलं तरच ती घर आणि संसार नीट सांभाळते. (त्यांना त्यांच्या सासूकडून मिळालेल्या वागणुकी मुळे त्याचं असं मत झालं असावं) त्या बैठकीत एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली की, त्या दिवशी आमच्या समोर ना फारकत घेण्याबद्दल कोणी काही म्हणालं, ना समझोता करण्याबद्दल.

हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही दोघांना एकत्र मीटिंग साठी बोलावलं. परेशला खूप गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्या जबाबदारी बद्दल. हिनाला घरातून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकी बद्दल. तिचं शिक्षण, तिच्यातील कलागुण, तिच्या अपेक्षा, तिच्या भावनांची कदर करण गरजेचं आहे. त्या समजून घेणं हे कसं त्याच काम आणि कर्तव्य आहे. दोघांनी एक-मेकांना आणि त्यांच्या गरजा समजून घेणं, मित्रत्वाच नातं जपणं आणि जोपासण सुखी संसारासाठी खूप गरजेचं आहे. काही वेळ विचार केल्यावर  परेश म्हणाला की, पुढील एक वर्षं त्याला कंपनीच्या कामासाठी अहमदाबादला रहावं लागणार होतं. हिनाची तयारी असेल तर आणि त्याच्या काही अटी- तिने त्याच्या सोबत रहावं, घर नीट सांभाळावं आणि काहीही अडचण असेल तर मोकळं बोलावं. हे मान्य असेल तर समझोता करायची त्याची तयारी होती. हीनाने पण ती सासरी रहात असतांना सहा महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा होऊ नयेत ह्या साठी तो खबरदारी घेईल आणि जातीने लक्ष घालेल, अशी आशा व्यक्त केली. हिनाची पहिल्या दिवसापासून समझोता करून, नांदायला जायचीच इच्छा आणि तयारी होती. परेशच्या बोलण्यातून पण समझोता करायची तयारी जाणवली. एकत्र बैठकीत दोघांमध्ये समझोता झाला.

दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. वर्षभरात हिनाकडून अपेक्षित गोड बातमी आली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. आम्हाला वाटलं, आता सगळं छान होईल. पण तसं घडलं नाही. एक दिवस हिना भेटायला आली आणि म्हणाली, "ताई, मला कसं वागू तेच कळत नाहीये. मी माहेरी आल्यापासून आजपर्यंत परेश मला कधी भेटायला आला नाही. अजून त्यांनी मुलांना पण बघितलं नाही. तो फोन करून खुशाली विचारतो. मुलांचे फोटो मी पाठवते. इकडे भेटायला ये असं म्हणाले कि त्याचं एकच उत्तर असत, आईशी बोलतो आणि कळवतो. ताई, मला खात्री आहे त्याच्या आईने त्याला येऊ दिलं नसेल. तो त्याच्या आईचं इतकं का ऐकतो? तो स्वतःची बुद्धी का नाही वापरत? आमच्या दोघांमध्ये काहीच वाद नाहीत, कि भांडण नाही. त्याला समजत नाहीये का, कि त्याच्या अश्या वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय. ताई, प्लीज काहीतरी करा. माझा संसार वाचवा."

हिनाच्या समोर परेशला अभिनंदन करायला फोन केला आणि भेटायला बोलावलं. कबूल केल्याप्रमाणे तो आठ दिवसांत भेटायला आला. त्या वेळेस बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. परेशनी परस्पर समझोता केलेला त्याच्या आईला अजिबात आवडलं नव्हतं. त्या दिवसापासून तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. नातवंड झाल्याचं समजलं पण तिच्या वागण्यात फरक पडला नाही. आता ती माझ्याशी बोलते कारण मी तिला कबूल केलंय कि मी तिच्या परवानगीशिवाय माझ्या मुलांना भेटणार नाही. आणि बघायला जाणार नाही. "ताई, ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आईंनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेत. मला तिला सुखात ठेवायचं आहे. तिचं मन नको दुखवायला म्हणून मी हे सगळं करतोय. आज मी इथे आलोय हे तिला माहित नाहीये. कळल कि काय करेल सांगता येत नाही. पण मला माझ्या मुलांना आणि हिनाला भेटायची बघायची खूप इच्छा आहे. ताई, मी काय करू?"

"परेश, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बरोबर तुझं वेगळ नातं आहे. त्याचं तुझ्या आयुष्यात वेगळ स्थान आहे. प्रत्येकाच्या प्रती वेगळी जबाबदारी आहे. कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाच्या भावना जपण्यासाठी कुठलं नातं तोडायचं हे तू ठरवायचं आहे. ह्या सगळ्यातून एक समतोल साधू शकलास तरच सुखी होशील. काय ठरवशील ते कळव."

दुसऱ्या दिवशी हिनाचा खुशखबर द्यायला फोन आला. परेश भेटायला आला होता आणि तो तिला त्याच्या बरोबर घेऊन जायला तयार होता.

दोघं ऑफिसमध्ये भेटायला आले. काल झालेल्या बोलण्याचा परेशनी गांभीर्याने विचार केला आणि विचारा अंतीच हा निर्णय घेतला होता. आईच्या प्रतिक्रियेबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "ताई, मला कळून चुकलंय, माझी आई आणि तिचा स्वभाव बदलणार नाही. ती हिनाला कधीच सुखात राहू देणार नाही. तिचे विचारच वेगळे आहेत. मी हीना आणि मुलांना घेऊन वेगळ्या घरात राहायचं ठरवलं आहे. मी वेगळ राहून पण माझ्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकीन. ताई, आमच्या कडून काही लिहून घ्यायचं असेल तर घ्या."

त्या दिवशी दोघं आमचं निरोप घेऊन गेले ते जवळ-जवळ चार महिन्यांनी भेटायला आले. मधल्या काळात फोनवरून त्यांची खुशाली नियमितपणे कळवत होते. आज त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद आणि समाधान बराच काही सांगत होतं. म्हणून आजचं त्याचं येणं आणि भेटणं आमच्यासाठी खास होतं!   

 

Monday 29 March 2021

प्रेम???

 

सकाळी ६ वाजताच मोबाईलच्या रिंगनी जागी झाले. कोणाचा फोन असेल? असा विचार करत झोपेतच, 'हेलो' म्हणाले, तर समोरून रोहिणी ताईचा आवाज! थोडा वैतागलेला, थोडा टेन्शन असल्यासारखा. (एका शैक्षणिक संस्थेत बरोबर काम करत असल्याने माझी आणि रोहिणीची ओळख. तोंड देखलीच! अलीकडच्या काळात त्यांची मुलगी, रेवती मुळे अधून-मधून त्यांचा फोन यायचा. पण आज जवळ-जवळ चार महिन्यांनी त्यांनी संपर्क साधला होता.)

"बाई, रेवती आज पहाटे २.३० वाजता घरी आली. तिची अवस्था बघवत नव्हती. अंगा-खांद्यावर एक दागिना नाही कि पायात चपला नाहीत. बहुतेक मार खावून आली आहे. उपाशीपण होती. चहा-बिस्कीट दिले आणि रमेशला (रेवतीचा भाऊ) सांगितलं, 'सकाळ झाली कि तिला संस्थेत नेऊन सोड.' तो तिला घेऊन गेला आणि मी तुम्हाला फोन लावला. काय करावं ह्या मुलीचं काही कळत नाहीये. मागील १३ वर्षात कमी वेळा का मी तिला समजावलं असेल? अगदी जयेश बरोबर लग्न करायचं ठरवलं तेंव्हापासून! अलीकडे तो तिला देत असलेली नोकरासारखी वागणूक, पदोपदी करत असलेला अपमान, सर्व गोष्टी मला खटकतात. आता तर मार-हाण करतो. तिला खूप वेळा समजावलं 'त्याला सोड. तू त्याला सोडलस तर तुझ्यासाठी काहीतरी करता येईल.' तिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, त्याला काय करू? तुम्ही पण कमी वेळा तिला समाजावलत का? पण ती कोणाचं ऐकतच नाहीये. मी हात टेकले ह्या मुलीपुढे. मी तिला माझ्या घरात ठेवून घेऊ शकत नाही."

"अहो रोहिणीताई, असं म्हणून कसं चालेल. तुम्ही तिला समजून घेतलं नाही तर कोण घेणार? अशा प्रसंगातच मुलींना आई-वडिलांच्या आधाराची जास्त गरज असते. तुम्ही तिला असं संस्थेत नका ठेऊ. तिच्याशी बोला, तिला समजून सांगा."

मला समजत होतं कि माझा एकही शब्द त्या ऐकत नव्हत्या, त्यांना ऐकूच जात नव्हता. त्या रेवतीवर, तिच्या वागण्यावर इतक्या चिडल्या होत्या, वैतागल्या होत्या कि त्यांनी एका वाक्यात रेवतीचा विषय संपवला. "बाई, रेवतीला आणि तिच्या विचित्र स्वभावाच्या नवऱ्याला (जयेशला) समजून घ्यायची आणि माफ करायची माझी ताकत संपली. मी तिला भेटणार नाही आणि तिच्याशी बोलणार नाही."

रोहिणीताई साठी रेवतीचा विषय संपला होता.

 रेवती, गोरी,नाजूक, दिसायला सुरेख! कुण्या एके काळी हसरा चेहेरा आणि खेळकर स्वभाव होता.आज जयेशच्या कृपेनी ते सर्व भूतकाळात जमा झालं होतं. रेवती आणि जयेशचा प्रेम विवाह! १३ वर्षांपूर्वी आई-वडील, नातेवाईक ह्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन झालेला. ह्या जोडप्याचा स्वीकार करायला घरच्यांना तब्बल २ वर्षं लागली. ते सुद्धा समाजाच्या कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात भेटल्यावर तोंडदेखली विचारपूस करण्याइतपत. सासरी जयेश आणि त्याचे नातेवाईक जी वागणूक देत होते ती रेवतीने स्वीकारली होती. १३ वर्षात माहेरी एखाद दोन वेळेस येणं झालं असेल तेवढंच. एक वर्षापासून रेवतीच्या आयुष्यात प्रोब्लम वाढले. वाढले म्हणजे मला समजले. तोपर्यंत तिने जे काही सहन केलं होतं ते मला नंतर समजणार होतं.

साधारण एका वर्षा पूर्वी रेवती आणि तिचा प्रोब्लम माझ्या आयुष्यात आले. तेंव्हा जयेशनी येऊन रोहिणीच्या घरासमोर गोंधळ घातला होता. रस्त्यावर उभं राहून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या होत्या आणि धमक्या दिल्या होत्या. तेंव्हा रोहिणीने  पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हाचं कारण कमाल होतं. जयेशला कोणी तरी सांगितलं, 'रेवती खूप मुलांना आवडायची.लग्नाआधी खूप मुलं तिच्यावर लाईन मारायचे'. जयेशच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं. तो सारखा रेवतीला एकच प्रश्न विचारत होता. 'लग्ना आधी तुझं कोणाबरोबर लफडं होतं? तू मला खरं काय ते सांग.' रेवती नाही म्हणाली कि मारायचा. ती कबूल होत नाही म्हणून त्याने तिला माहेरी आणून सोडली. रोहिणीने ज्या दिवशी तक्रार केली त्या दिवशी तो अचानक तिला (रेवतीला) घ्यायला आला आणि म्हणाला, 'रेवती तुझी मजा करून झाली असेल तर चला. का अजून कोणी बाकी आहे. नवऱ्याची तर आठवण नाहीच आहे पण तुझ्या मुलांना पण विसरलीस का? मी ३ मोजायच्या आत खाली ये आणि गाडीत बैस. घरी गेल्यावर तुझ्याकडे बघतोच'. त्याचा अवतार बघून रेवती इतकी घाबरली होती कि अजून तमाशा नको म्हणून तिची आई नको म्हणत असतांना पण ती जयेश बरोबर जायला निघाली.

त्या दिवशी ती गेली ती परत-परत अपमानित होऊन, मार खाऊन माहेरी धाडली जाण्यासाठीच, जणूकाही. मागील एक वर्षात जयेशनी कमीत कमी चार वेळा हा तमाशा केला असेल. (मला ठाऊक असलेलं चार वेळा!) पहिले दोन वेळा जयेश, रेवतीला माहेरी हाकलून द्यायचा. तिला माहेरी येऊन दोन दिवस होत नाहीत, जरा घरातले तिला समजावत नाहीत तो जयेशचा फोन यायचा. जयेशनी फोन केला कि रेवती मागचापुढचा विचार न करता त्याच्या सोबत गाडीत बसून निघून जायची. दर वेळेस, रोहिणी वैतागून आणि काळजीने मला फोन करायची. आणि प्रत्येक वेळेस मी तिला म्हणायचे, 'रोहिणी, रेवती आली कि मला कळव. गेल्यावर सांगून काय उपयोग?' तिसर्यांदा जेंव्हा रेवती मार खाऊन, जयेशनी हाकलून दिलं म्हणून माहेरी आली तेंव्हा रोहिणी तिला घेऊन तडक माझ्याकडे आली. आम्ही रेवतीची रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि रोहिणीचा आग्रह होता म्हणून रेवतीला संस्थेत राहायला पाठवली. तिच्या बरोबर दोन वेळा सिटिंग झाली. प्रत्येक वेळेस तिचं एकच म्हणणं होतं, "बाई, जयेशला आणि मुलांना माझी खूप गरज आहे. तो माझ्या शिवाय राहू शकत नाही म्हणूनच मला घ्यायला येतो. माझंच काहीतरी चुकलं असेल. म्हणून तर जयेश असं वागतोय. प्रेमात खूप ताकद असते. माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मी माझ्या प्रेमानी जयेशला परत मिळवीन."

रेवती सगळ्याला हो म्हणत होती. पण तिच्या मनात काय चाललं आहे ह्याचा अंदाज येत नव्हता. तिला विचारून, तिच्याशी बोलून जयेश आणि तिची एकत्र बैठकीची तारीख ठरवली. तिला बजावून सांगितलं कि, 'लिखापढी केल्याशिवाय जयेश बरोबर जायचं नाही. लिहून घेतलं कि त्याच्यावर पण त्याचं थोड दडपण राहील, आमचं पण लक्ष राहील आणि तो इथून पुढे नीट वागेल.'

जयेशला फोन द्वारे एकत्र बैठकीची तारीख कळवली. बैठकीच्या आदल्या दिवशी त्याचा रेवतीला फोन आला आणि संस्थेतील कार्यकर्त्या 'जाऊ नकोस. ताईना भेटल्याशिवाय, लिखापढी केल्याशिवाय जाऊ नको,' असं सांगत असतानापण ती जयेश सोबत गेली. इतक्या घाईत कि स्वतःच सामान पण घ्यायला थांबली नाही.

त्यानंतर रेवती परत आली तेव्हा जयेशनी तिला एका कामगिरीवर पाठवली होती. यावेळी त्याने मुलं स्वतःकडे ठेऊन घेऊन रेवतीला एकटीला पाठवली होती. रेवतीच्या आईंनी आणि नातेवाईकांनी त्याच्या केलेल्या फसवणुकीबद्दल आणि अपमानाबद्दल (रेवतीच लग्नाआधी लफडं होतं असं त्याचं म्हणणं होतं, ते तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी ते लपवलं असंही त्याचं म्हणणं होतं. आणि जयेशनी केलेल्या तमाशाबद्दल रोहिणीनी केलेली पोलीस कम्प्लेंट!) त्यांनी जयेशचे पाय धरून माफी मागावी. जर का तिच्या नातेवाईकांनी जयेशच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली तर तो रेवतीला घरात घ्यायचं कि नाही ह्याचा विचार करेल. हे कोणालाच मान्य होण्यासारखं नव्हतं, पण माहेरच्या लोकांनी माफी मागितली तर आपला संसार वाचेल, ह्या वेड्या आशेवर रेवती तेपण करायला तयार झाली. ती रोज सकाळी संस्थेच्या कार्यालयातून परवानगी काढून बाहेर जायची आणि संध्याकाळी दमलेली, हरलेली परत यायची. एकटीच रडत बसायची. तिच्याशी बोलायचा, तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. रोहिणी तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलायला तयार नव्हती. तिच्यासाठी जणू, रेवती आणि तिच्या आयुष्याशी रोहिणीला काही देणघेण नव्हतं.

रेवतीला येऊन एक आठवडा झाला असेल. एक दिवस संस्थेतून रेवती सकाळी नेहेमी प्रमाणे गेली ती परत आलीच नाही. एक दिवस वाट बघितली, तिच्या आई-वडिलांकडे, नातेवाईकांकडे चौकशी केली. शेवटी पोलिसांत रीतसर मिसिंग दाखल केली. आणि दुसऱ्या दिवशी उशिरा रेवती माझ्या घरी आली. रेवतीला बघून बरं वाटलं पण तिचा हरलेला, उदास चेहेरा बघून तिची खूप काळजी वाटली. भकास चेहेर्यानी ती माझ्याकडे बघत म्हणाली, "बाई, सगळं संपलं. कोणीच जयेशची माफी मागायला तयार नाहीये. त्यांचं पण बरोबर आहे. ते तरी कशाला मागतील. संसार माझा मोडणार आहे. त्यांना कशानी काहीच फरक पडत नाही. मी जयेश आणि मुलांशिवाय नाही जगू शकत. मी माझं आयुष्य संपवायचं ठरवलं आहे. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणून भेटायला आले." मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. माझ्या आजपर्यंतच्या कामात किंवा आयुष्यात असं कधी घडलं नव्हतं कि 'आत्महत्या करायला निघालेली व्यक्ती जाण्यापूर्वी  भेटायला आली असेल'. हि परिस्थिती कशी हाताळायची मला काही सुचत नव्हतं. मनात पहिला जो विचार आला ते करून मी मोकळी झाले. मी तिला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवत वेड्यासारखी म्हणत राहिले, "रेवती, काही संपलं नाहीये. मी आहे ना. तू माझ्याकडे आली आहेस ना, आपण ह्याच्यातून मार्ग काढू. सगळं ठीक होईल. तू शांत हो, बैस, थोडं पाणी घे. दमली आहेस. दोन घास खा आणि आराम कर. आपण उद्या सकाळी बोलू."

"बाई आता मेल्यावर आरामच आराम आहे. मी मेल्यानी कोणाला काहीच फरक पडणार नाही. आई-वडील, भाऊ, नातेवाईक, सगळ्यांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. जयेश माझं तोंड बघायला तयार नाही. मला माझी मुलं भेटत नाहीत. कोणी मला घरात ये पण म्हणत नाहीत. कोणासाठी जगू?"

"माझ्यासाठी" ह्या माझ्याकडून आलेल्या उत्तरांनी ती थोडी गोंधळली, काही क्षण माझ्याकडे बघत बसली आणि अचानक मला "मावशी" म्हणत गळ्यात पडून खूप रडली. थोड्या वेळानी शांत झाली. तिच्या समोर पुढचा प्रश्न होता ती रहाणार कुठे? हा प्रश्नच माझ्या मनात आला नव्हता. कुठे म्हणजे काय माझ्या घरी! (घरातून मी करत असलेल्या कामाबद्दल माझा अभिमान तर होताच पण पूर्ण सपोर्ट होता. मुख्यतः माझ्या नवर्याचा! तो नसता तर मी एवढा मोठा निर्णय एका फटक्यात घेऊच शकले नसते. त्याचा माझ्या कामाला पूर्ण पाठींबा आहे म्हणून मी हे काम आज पर्यंत करू शकले.)

रेवती थोडी रीलेक्स झाली. ती माझ्या घरी रहायला लागली, माझ्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून. (ती माझ्या कडे आहे हे पोलिसांत कळवलं, तसच रोहिणीताईला पण कळवलं. अजून त्यांच्या मनातली नाराजी कमी झाली नव्हती. रेवती सुखरूप आहे ह्यांनी त्यांना निश्चितच बर वाटलं पण त्यांनी येऊन तिला भेटायचं टाळल.) ती आमच्या घरात छान रमली. पण जयेशचा त्रास काही कमी होत नव्हता. तो रोज दिवसातून ३-४ वेळा फोन करून तिला घाणेरड्या शिव्या द्यायचा, धमकावायचा. ती घाबरून रडत बसायची. 'रेवती त्याचा फोन घेऊ नकोस. नाहीतर त्याला खडसून जाब विचार. त्याचा फोन आला कि माझ्या कडे दे, मी बोलते.' ह्यातलं ती काहीच ऐकायला किंवा करायला तयार नव्हती. तिचं एकच म्हणणं होतं, "मावशी, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तो असा वागतोय."

शेवटी एक दिवस माझा पेशन्स संपला. मी तिला विचारलं,"रेवती, तुला कशा मुळे अशी खात्री वाटते कि त्याचं तुझ्यावर प्रेम आहे? प्रेम करणारी माणस, आपली माणस किंवा जोडीदाराला त्रास होईल असं वागत नाहीत. त्यांना मुलांचं भांडवल करून emotional blackmail करत नाही. त्याचा अपमान करत नाहीत. त्याला इजा किंवा मार-हाण करत नाहीत."

त्यावर ती म्हणाली, "आपलं ज्याच्यावर प्रेम असत त्याच्यावरच माणूस अधिकार गाजवतो. तो चुकला कि त्याला सजा देतो. आणि लाड पण तितकेच करतो. जयेश कडे मी दोन नवीन साड्या मागितल्या कि तो चार आणून द्यायचा. मला लागणाऱ्या सर्व वस्तू जयेश आणून द्यायचा. मला beauty parlour  ला सोडायला आणि घ्यायला यायचा. तो नेहेमी म्हणायचा, 'रेवती मी आहे तर तुला मैत्रिणींची आणि नातेवाईकांची गरजच काय? माझ्या प्रेमात काही खोट आहे का? तुला हवं तिथे मी घेऊन जातो. तू एकटीने कुठे जाऊ नकोस.' (नवीन साडी नेसून रेवतीला एकटीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. कधीच, कुठेच ती एकटी बाहेर जाऊ शकत नव्हती. तिला एकटीला माहेरी जायला परवानगी नव्हती. ती तिच्या आवडी प्रमाणे आणि गरजे प्रमाणे खरेदी करू शकत नव्हती. हे वागणं चुकीचं आहे असं तिला कधी वाटलं नाही.) मला आणि मुलांना, त्याचा मूड असेल तेंव्हा रात्रीची जेवणं झाल्यावर आम्हाला गाडीतून आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. (रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर, काळ्या काचा चढवून, बंद गाडीतून चक्कर!) मावशी मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची. मी केलेली घरातली सफाई, (६ खोल्यांचा मोठा बंगला होता. त्याची दिवसातून दोन वेळा) लादी पुसणं, सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं,  मी केलेला स्वैपाक, त्याच्या आई-वडिलांची सेवा, मुलांच्या मागे उठबस, त्याला तिन्हीत्रिकाळ त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवून देणं. मावशी माझ्या घरी मुलांपासून ते मोठ्यान पर्यंत प्रत्येकाची आवड वेगळी. प्रत्येक जेवणाला ३-३ भाज्या, चपाती, भाकरी असा स्वैपाक करायचा. (माझ्या शिवाय कोणाच्या हातच काहीच माझ्या घरातल्यांना आवडायचं नाही. म्हणून आमचं लग्न झाल्यावर सहा महिन्यातच घरातल्या नोकरांना सुट्टी देऊन टाकली.) घरातल्या कामात दिवस कुठे निघून जायचा कळायचंच नाही. आणि त्याचं इतकं प्रेम होतं कि रोज रात्री मी जवळ लागायचेच. (हे सांगताना ती छानशी लाजली.) मग काळजीने म्हणाली आता जयेशच कस होत असेल? तो अगदी एकटा पडला."

बोलता-बोलता ती विचारात तिच्या जयेश कडे पोहोचली होती. ह्या सगळ्या संभाषणातून माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती कि ह्या सगळ्यातून रेवतीला बाहेर काढणं गरजेचं होतं पण काम अवघड  होतं. तिच्या अंगात खूप कला होती. ती सुंदर चित्र काढू शकत होती. डिप्लोमा पर्यंत शिक्षण झालं होतं. ह्या सगळ्याचा तिने आयुष्यात उपयोग करून घ्यायला हवा होता. पण जयेशची मनात इतकी भीती होती आणि त्याने निर्माण केलेला प्रेमाबद्दलचा खोटा पगडा होता कि ती घराबाहेर एकटी जायला घाबरायची. आज गरज होती तिच्यातला आत्मविश्वास तिला परत मिळवून देण्याची.

मग काय? रोज माझ्या बरोबर तिला घेऊन गेले. महिला हक्कचं ऑफिस असो कि शाळेचं काम असो. ह्यामुळे तिच्या नवीन ओळखी झाल्या, थोडा मोकळा विचार करायला लागली. तिचं तिलाच समजलं कि घाबरून घरात राहायची आवश्यकता नाही. (महिला हक्क संरक्षण समितीच्या ऑफिसला आल्याने तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिच्या सारख्या किंबहुना तिच्या पेक्षा वाईट परिस्थितीतून बायकांनी मार्ग काढला आहे आणि आज त्या स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगतायत. शाळेतल्या मुलांमुळे तिला तिच्या मुलांपासून लांब राहणं,अवघड असलं तरी जमू लागलं.) 

खाली मान घालून, सोशिकपणे जगणारी रेवती हळू-हळू बदलत होती. माझ्या देखत, तिच्या नकळत. एक दिवस तिने अचानक विचारलं, "मावशी, फारकत घ्यायला काय करावं लागेल?" 

"रेवती कोणाला , कोणापासून फारकत घ्यायची आहे?"

"मावशी, मीच विचार करतीये. जयेश बरोबरच्या माझ्या नात्याला काही अर्थ नाही. त्याच्यापासून फारकत घेतली कि रोजचं टेन्शन तरी कमी होईल. तो कुठे भेटेल का? मला त्रास देईल का? माझ्यावर नवरा म्हणून हक्क गाजवेल का?"

"रेवती, नुसती फारकत घेऊन हे साध्य होणार नाही. तुला मनातून खंबीर व्हायला हवं. तो समोर आला तरी न घाबरता आत्मविश्वासानी त्याला सामोर जायची तयारी हवी. आपण खूप वेळा बोलावलं, पण तो एकदा पण भेटायला आला नाही. तो सुखासुखी फारकत देईल असं मला वाटत नाही. तुला त्यासाठी वकिलामार्फत कोर्टात दावा दाखल करावा लागेल. दुसरी गोष्ट. तुझं चांगलं शिक्षण झालं आहे. कुठे तरी नोकरी शोध आणि स्वतःच्या पायावर उभी हो, स्वावलंबी हो."

ह्याचा उपयोग असा झाला कि पुढील काही दिवसांत तिने तिच्या डिप्लोमाच certificate शोधलं, मला विचारून दोन ठिकाणी अर्ज केला, आणि स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवली. कोर्टात वकिलांना भेटून फारकतीचा दावा दाखल केला.

अपेक्षेप्रमाणे जयेशनी कोर्टाच्या एकाही नोटीसला उत्तर पाठवलं नाही, किंवा तो कोर्टासमोर हजार झाला नाही. शेवटी वर्ष-दीडवर्ष नोकरी सांभाळून कोर्टात खेटे घातल्यावर (कायदेशीररीत्या दोन वर्षांपासून नवर्यापासून विभक्त असल्याच्या युक्तिवादावर) एकतर्फी फारकत मिळाली. फारकतीचा विषय काढला तेंव्हा मनानी आणि फारकत मिळाल्यावर कायदेशीररीत्या रेवती, जयेश पासून मुक्त झाली. स्वतंत्र झाली.

आज रेवती, तिच्या आई बरोबर रहाते. नोकरी करते. आणि मजेत आहे.