महिला हक्क संरक्षण समितीत आजपर्यंत विविध काम केली. अनेक जबाबदार्या स्वीकारल्या. त्यातील एक उद्योगकेंद्राची! सातपूर व अंबड येथील कंपन्यांमध्ये जाऊन, तेथील साहेबांना भेटून कामे मिळवणे. त्यामागील प्रेरणा आणि विचार १९८८-८९ पर्यंत सोडविलेल्या केसेस मधून पुढे आला. आमच्या अस लक्षात आलं कि सासरी त्रास होतो, नवरा मारहाण करतो, सांभाळत नाही, वेळी अवेळी मारहाण करून मुला बालांसकट घरातून हाकलून देतो तेंव्हा नाईलाजाने ती महिला माहेरी मदत मागायला येते. ३-४ मुलांना घेऊन माहेरी आलेली मुलगी ही पालकांसाठी व त्यांच्या भावांसाठी एक नकोशी जवाबदारी असते. (काही नशीबवान मुलींचे पालक त्यांचा स्वीकार करतात) पण बहुतेक वेळा तिचं आणि तिच्या मुलांच ओझं वाटतं. काही वेळा कुटुंब मोठं आणि कमावणारी व्यकी एक, त्याच्या उत्पन्नात भागत नाही म्हणून देखील चिडचिड होते. आणखीन एक कारण म्हणजे तिच्या लग्नात दिलेला हुंडा! काही केसेसमध्ये भाऊ बोलून दाखवतात कि तुझ्या लग्नात तुझं जे काही होतं ते देऊन झालं आहे. आता ते घर तुझं आहे. आल्या सारखी चार दिवस माहेरी रहा आणि आपल्या घरी जा. आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे अनेक कुटुंबात नवऱ्याच्या उत्पन्नात घरखर्च भागत नाही. बाईनी चार पैसे कमावले तर ती कुटुंबाला हातभार लाऊ शकेल आणि वेळप्रसंगी तिचे उत्पन्न तिला जगायला मदतरूप ठरेल.
बघता बघता ३ मोठ्या कंपन्यांची कामे आम्हाला
मिळाली. आम्ही ६५-७० महिलांना रोजगार देऊ लागलो. अगदी फेक्टरी सारख काम सुरु झालं.
सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यन्त काम चालायचं. काम चोख अगदी मागणी प्रमाणे पुरवठा करत
होतो. साहेबलोक पण खूष होते. बघता बघता सिडकोतील लोकांना माहित झालं कि गरीब व
गरजू महिलांना संस्था काम देते. आमच्या उद्योगकेंद्राच्या आणखीन दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे काम
घराच्या जवळ होतं, दुसरं महिलांची संस्था आणि तिसरं वेळेवर मिळणारा मोबदला. बायका
खूष, आम्ही खूष आणि कंपनीतले साहेब खूश!
त्या दिवशी मला सिडकोतील ऑफिसला जायला उशीर
झाला. जवळ जवळ १२ वाजले. केलेल्या कामाची बिल करायचं काम काल अर्धवट झालं होतं ते
पूर्ण करायला सुरुवात करणार तेवढ्यात अलकाताई एका बाईला, रोशनला घेऊन आल्या. रोशन
मला भेटण्यासाठी सकाळी १०पसुन थांबली आहे असं त्या म्हणाल्या.
अलकाताईनी रोशनला उद्देशून सांगितलं,
"हेमाताईसे बात करले. आमच्या कडे जागा नाहीये. गरजेप्रमाणे बाया घेऊन झाल्या
आहेत. मी तुला सकाळपासून हेच समजावायचा प्रयत्न करतीये. ताई काही जादू करणार आहेत
का? जागाच नाही तर त्या तुला काम कुठून देतील?"
"ताई मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकतच
नाहीये. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असंच आल्यापासून घोकतीये.
मी काही म्हणायच्या आत रोशनने माझा हात तिच्या
हातात घट्ट धरला आणि म्हणाली,"ताई, नही मत कहो. बहुत उम्मीद लेकर तुम्हारे
पास आई हु. घरमे बच्चे कलसे भूखे है. मैने तो दो दिनसे कुचभी नही खाया. ताई कुचभी
काम दो. मै झाडू मारूंगी, टोईलेट साफ करूंगी, जो बोलोगे वो करूंगी. मगर ताई मेरेको
ऐसेही वापीस मत भेजो." इतक बोलून ती रडायला लागली. काय बोलावं, काय करावं,
मला काही सुचत नव्हतं.
मी रोशानला सांगितलं, "आधी घरी जा आणि
तुझ्या मुलांना घेऊन ये. तुझ्या कामाचं काय करायचं ते नंतर बघू. रोशन गेल्यानंतर
मी अलकाताई आणि मंदाताईना बोलावलं. आत येताना दोघींनी एकाच सुरात सांगितलं,
"ताई, आपल्याकडे अजिबात व्हेकन्सी नाहीये. कालच आपण तिन्ही विभागात प्रत्येकी
दोन बायका घेतल्या आहेत. त्या छान काम करतायत. तुम्ही त्याच्यात काही प्लीज बदलू
नका.' सेक्शन सुपरवायसर म्हणून त्यांचं दुख मी समजू शकत होते. त्यांच्या युनिट
मध्ये बदल होणार नाही असं आश्वासन दिलं, तेंव्हा कुठे आमचं बोलणं पुढे सरकलं. मी
त्यांना समजावला कि तिला आज कामाची, मिळणाऱ्या पैशांची खूप गरज आहे. तिला काय काम
द्यायचं, तिचा पगार कशातून द्यायचा हे मी बघीन. तुम्ही फक्त तिला सांभाळून घ्या. आणखीन एक, आपण
आपल्या बरोबर तिला व तिच्या मुलांना जेवायला बोलवूया.
रोशन तिच्या मुलांना घेऊन आली. ती येईपर्यंत एक
वाजून गेला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जेवणाची सुट्टी केली. जेवायला बसतांना आम्ही
रोशनला व तिच्या मुलांना आग्रहानी जेवायला बसवलं. मुलं पोटभर जेवली. रोशननी पण नको
नको म्हणत चार घास खाल्ले.जेवण झाल्यावर सर्वजणी आपल्या सेक्शनमध्ये गेल्या.
रोशनची मुलं बाहेर अंगणात गेली. रोशानला सांगितलं आता तुझी काय अडचण आहे ती
सविस्तर सांग.
रोशनच्या सांगण्यातून मला जे समजलं ते,
तिचे लग्न १० वर्षापूर्वी अब्दुलशी झालं होतं. अब्दुल गवंडीकाम करायचा. राहायला
झोपडी व मर्यादित उत्पन्न. त्याला तीन शोक होते- दारू,जुगार आणि बाई! सर्व कमाई
त्यात खर्च व्हायची. पैसे कमी पडले कि तो राग रोशनवर निघायचा. उपासमार व मारहाण हि
नित्याचीच होती. त्याच्या मर्जीप्रमाणे वेळी अवेळी शरीरसुखाची अपेक्षा पूर्ण करावी
लागत होती. तिची ३ मुलं आज जिवंत आहेत व तिची ३ मुले वेळेवर उपचार न झाल्यामुळे
मरण पावली. आईवडील व भाऊ कशातच लक्ष घालत नव्हते. त्रास असह्य झाला की लेकरांना
घेऊन माहेरी आशेनी जायची. पण एकदापण त्यांनी कधी जावयाला समजावलं नाही का हिला
एखादी रात्र ठेऊन घेतलं नाही. खरं सांगायचं तर तिच्या माहेरची परिस्थिती पण
बेताचीच होती. वडिलांचं इस्त्रीच दुकान. भाऊ पण वडिलांसोबत त्याच दुकानात काम करत
होता. ८ वर्षांपूर्वी भावाचं लग्न झाल होतं. त्यांला पण तीन लेकरं होती. राहायला झोपडी.
तो तरी काय आणि कशी मदत करणार. चार महिन्यांपूर्वी तिच्या नवर्यानी तीला बेदम
मारहाण करून माहेरी आणून सोडलं. "परत पाठवू नका. मी तिला घरात घेणार नाही."
असं म्हणाला. तिचे वडील काही समजवायला गेले तर अब्दुल म्हणाला, "मै तुम्हारी
रोशनको तलाक़ देता हुं." त्या नंतर ३ वेळा तलाक़ म्हणून तो निघून गेला. आता
रोशन कुठेच जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाईलाजाने तिला घरात रहायला
परवानगी दिली. आपण इथे सगळ्यांना नकोसे आहोत हे कळत होतं पण तिचा नाईलाज होता.
रोशननी घरातली सर्व काम करायची असं ठरलं. घरातील ११ माणसांचा स्वैपाक, कपडे धुणे,
भांडी घासणे व इतर लहान मोठी पडतील ती कामे ती मुकाट्यानी करत होती. वहिनी काढून
देईल तेवढच जेवण बनवायचं. सर्वांच्या शेवट
जे उरेल ते रोशनला मिळायचं. काही दिवसांनी तिच्या मुलांना पण मोजकच जेवण द्यायचं
ठरलं. परवा भावाच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनी शाळेत जाण्यासाठी हट्ट केला.
तेंव्हा त्यांची मामी म्हणाली,"मेरा अकेला मरद क्या क्या करेगा? ११ लोगोंको
खिलावो, उनको सम्हालो, और अब इनको पढने भेजो. इत्ता बेठके खाते हो. थोडा काम करो
और कमाई करो."
तर अशी हि रोशन! दुसर्या दिवसापासून आमच्या
उद्योगकेंद्रात येऊ लागली. तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. ती मन लाऊन
काम करत होती. पहिला महिना तिला नेमकं काय काम सांगावं, हि थोडी अडचण होती. दुसरं
म्हणजे तिला पगार कश्यातून द्यावा हे समजत नव्हतं. मी आमच्या अध्यक्षा
मा.कुसुमताईना विचारून माझं त्या महिन्याचं मानधन तिला द्यायचं ठरवलं. संस्थेत
येणारं काम वाढतच होतं. पुढील महिन्यापासून तिला एका विभागात (सेक्सन) रुजू करून
घेतलं. बघता बघता रोशनची आर्थिक परिस्थिती सुधारली. ती घरात भावाच्या बरोबरीने
पैसे देऊ लागली. महिला हक्क संरक्षण समिती तर्फे उद्योग केंद्रातील महिलांसाठी एक
उपक्रम राबवला जायचा. त्यांना वर्षाला लागणारं धान्य भरायला आर्थिक मदत करणे. त्याचा
रोशन व तिच्या कुटुंबाला खूप उपयोग झाला.
आज बरेच दिवसांनी मला रोशन भेटली. (१९९४ मध्ये
बंगलोर येथे "बाल हक्क परिषद, ९५ साली बेईजिंग, चीन, येथे झालेली
अंतर-राष्ट्रीय महिला परिषद आणि महिला हक्क संरक्षण समिती च्या कामाच्या संदर्भात
झालेला १९९७चा कॅनडा दौरा, त्याची पूर्वतयारी व नंतरचं अनुभव कथन, रिपोर्टिंग
ह्यात ३ वर्षं खूप गड-बडित गेली. ह्या संदर्भातील बंगलोर, अमदाबाद, पुणे, दिल्ली,
उदैपूर अश्या वेग-वेगळ्या शहरांमध्ये झालेल्या मिटींग्स ह्या सगळ्यामुळे बाकी
कशालाच वेळ मिळाला नाही) भेटल्यावर मी तिची विचारपूस केली, "घरी सर्व ठीक आहे
न? मुलं शिकतायत ना?" असं विचारल्यावर ती पटकन म्हणाली," ताई अब घरमे
मेरीही चलती है. घरका खर्चा चलाती हुं. यहा कामपे लगी. पहेले दो महिनेका पगार
बच्चोपे खर्च करी. सबको एक जोडी नये कपडे लिये. अम्मी अब्बू भाई भौजाई सबके वास्ते
कुछतो लाई. घरमे सब खुश थे. फिर मैने भाई और अब्बू को समझाया ऐसे कित्ते दिन बच्चोको
लेकर झोपडेमे रहेंगे. वन रूम किचन भाडेसे लेकर उसमे रहेंगे. अच्चे लोग आपके पास
आएंगे. उससे अपनीही आमदानी बढेगी. पहेले मेरी बात कबूल करना उनके लिये थोडा
मुश्कील था. मगर बादमे मान गये. अब हम सब दो रूम किचन वाले मकानमे रहेते है. अब सब
अछेसे चल रहा है. आपने बोले वैसे मेरे बच्चोके साथ भाईके बच्चे भी सिखाती हुं.
सबके साथ अच्छेसे रेहेती हुं. ताई, बहोत बार सोचती हुं, अगर आप मुझे नही मिलती तो
मेरा और मेरे परीवारका क्या होता"?
असे अनुभव आले की दर वेळी वाटतं, की अजून खूप काम करायचं बाकी आहे. महिला हक्क संरक्षण समिती आपल्या परीने शक्य ते काम करतेच आहे. आजवर त्यात अनेक हितचिंतकांची साथ लाभली आहे. अशीच साथ यापुढेही लाभू दे, म्हणजे गरजू महिलांपर्यंत आपल्याला मदत पोचविता येईल.