Thursday, 17 December 2020

(पुन्हा एकदा) शून्यातून संसार...

कोरोना आणि त्या मुळे निर्माण झालेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. स्थलांतरित मजूर आणि त्यांचे होणारे हाल, ह्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आपण रोज बातम्या वाचल्याच आहेत.ह्या मजुरांचा नाईलाज म्हणून ते गावी परत गेले. तिथे गेल्यावर घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं का आणि केल तर कस केलं ह्या बद्दल खूप काही माहिती मिळाली नाही. पण ३५ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असं जोडपं आल, जे घरची आणि गावाकडच्या लोकांची खूप आठवण आली म्हणून नाशिक सोडून उत्तर प्रदेशला गेले. गावी गेल्यावरचे त्यांचे अनुभव फारच गंमतशीर होते.

१९८८-८९ ची घटना आहे. माझी मुलगी लहान होती आणि संस्थेचं काम नव्यानं सुरु झालं होतं. माझी खूप धावपळ होत होती. घरात मदतीला म्हणून एक मदतनीस आणायची ठरलं. त्या दिवसांत आधाराश्रमात गरीब, निराधार मुली व महिलांना आधार देऊन, त्यांची रहाण्याची सोय केली जायची. त्या वेळी नाना उपाध्ये आणि सुधाताई फडके हे दोघं आश्रमाच बहुतांशी काम बघायचे. (दोघे आमच्या चांगल्या परिचयाचे होते. अगदी घरच्या सारखे संबंध होते) त्यानी शोभाला आमच्या घरी पाठवून दिलं. १८-१९ वर्षांची शोभा चुणचुणीत होती. सर्व कामांमध्ये उत्साहानी मदत करायची. माझ्या लेकीसोबत तर तिची चांगलीच गट्टी जमली होती. बघता बघता शोभा आमच्या घरातील एक सदस्य बनली. मी पण नकळत तिच्यावर खूप अवलंबून राहू  लागले. माझ्याकडे येऊन तिला चारेक वर्ष झाली असतील. एक दिवस अचानक ती लाजत लाजत म्हणाली, "ताई, मला लग्न करावस वाटतंय.मला वाटतंय माझा पण नवरा असावा (भाऊ सारखा, समजूतदार). आमचं घर असेल, मुलं असतील. ताई, होईल का ग माझं लग्न? कोण माझ्यासाठी स्थळ बघेल, कोण माझ्यासाठी बोलणी करेल. माझा बाप असं वागला नसता तर, आज माझी आई जिवंत असती." नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. 'ताई मी तुला आई म्हणू का?' असं विचारत लहान मुलासारखी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडायला लागली. बराच वेळ ती रडत होती आणि मी तिला थोपटत होते. जेंव्हा ती शांत झाली तेंव्हा आमच्यातलं नातं बदललेलं होतं. मला एक २२ वर्षाची मुलगी मिळाली होती. प्रेमळ, जीव लावणारी आणि नातं जपणारी. आम्ही पुढाकार घेऊन, आश्रमातील लोकांच्या मदतीने तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.

शोभाच ते वाक्य 'तर माझी आई जिवंत असती' मला अस्वस्थ करत होतं. शोभाच्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी सुधाताईना विचारायचं ठरवलं. कारण समजल्यावर त्या माहिती सांगायला तयार झाल्या. शोभाचा भूतकाळ ऐकून मन सुन्न झालं. तिच्यासाठी फार वाईट वाटलं. 'शोभा ६-७ वर्षांची असतांना तिच्या वडिलांनी शोभाच्या आईचा चाकूने भोसकून खून केला. ह्या साठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कोणीच नातेवाईक शोभाचा स्वीकार करायला तयार होईनात म्हणून तिला संस्थेत दाखल केलं. तुरुंगात असतांना शोभाचे वडील पण मेले. ना कोणी तिचा स्वीकार केला ना कोणी तिला कधी संस्थेत भेटायला आल. आता तर शोभा अगदीच एकटी झाली. सगळ्यानाच ती नकोशी होती. माझ्याकडे येईपर्यंत ती अशीच एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत शिफ्ट केली जात होती.

सुधाताई आणि उपाध्ये काकांनी पुढाकार घेऊन शोभा साठी दोन स्थळ बघितली. लग्नानंतर नाशिक सोडावं लागेल ह्या भीतीने तिने संगमनेरच्या स्थळाला नकार दिला. दुसर स्थळ होतं रामशरणचं. रामशरण यु पी कडील भैया होता. कामासाठी नाशिक मध्ये आला होता. भाड्याच्या गाड्यावर दारोदार भाजीपाला विकायचा. कमाई बरी होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि आश्रमातील कर्मचारी, संस्थेतील मुलं व आमचा काही मित्र परिवाराच्या साक्षीने शोभा आणि रामशरण चा विवाह संपन्न झाला. दोघांचा संसार आनंदात सुरु झाला. अधून मधून दोघं भेटायला यायचे. पहिल्या तीन वर्षात शोभला दोन मुलं झाली, मोठी मुलगी आणि नंतरचा मुलगा. मुलगा, कालीचरण, सहा महिन्याचा असेल. एक दिवस दोघं मुलांना घेऊन भेटायला आले होते, तेंव्हा रामशरण नी ते गावी जात असल्याचं सांगितलं. तो म्हणाला," माताजी हम शोभा और बच्चोको लेकर गाव जा रहे है. यहा का सब बेचके जा रहे है. मांका बहोत बार फोन आये. कालीचरणको देखनेका उनका बहुत मन करता है. हम भी २० सालसे यही पर है. हमेभी गावकी, खेतोंकी बहुत याद आती है. अब कब मिलना होगा पता नाही. तुम लोगोंकी बहुत याद आएगी."

मुलांच्या हातात खाऊ, शोभाला साडी आणि रामशरण कडे थोडे पैसे देऊन पाठवणी केली. दोघंही अशिक्षित असल्यामुळे पुढे काही त्यांची खबरबात कळलीच नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, 'नो न्यू इज गुड न्यूज'.

शोभाला जाऊन चार महिने पण झाले नव्हते. एक दिवस पहाटे साडे चार वाजता दारावरील बेल वाजली. दार उघडलं तर समोर शोभा आणि रामशरण, हातात सामान आणि दोन्ही मुलांना घेऊन उभे. मी काही विचारायच्या आत शोभा गळ्यात पडून रडायला लागली. मला बघून रामशरणच्या पण चेहेरयावरील ताण कमी झाला. सगळ्यांना भूक लागली होती आणि प्रवासानी दमले पण होते. थोडाफार खाऊन सगळे झोपले.

उठल्यावर शोभा लगबगीने कामाला लागली. सकाळची सगळी काम आवरून झाल्यावर गावी काय झालं ते तिने सविस्तर सांगितलं.

"आई, इथून आम्ही गावी पोहोचलो. आम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंना रामचरण आणि नातवंड भेटल्यामुळे त्या खुश होत्या. मला भाषेची थोडी अडचण होत होती. पण हळू हळू त्यांना माझं आणि मला त्यांचं म्हणणं समजू लागलं होतं. पहिले दोन महिने मजेत गेले. सगळ्यांनी आमचे आणि मुलांचे खूप लाड केले. लवकरच रामचरण त्यांच्या भावा बरोबर शेतात जाऊ लागले. रामशरणनी  मी नाही म्हणत असतांना इथून नेलेले सर्व पैसे वडिलांच्या कडे देऊन टाकले. त्यामुळे ते पण खुश होते. आम्हाला जाऊन तीन महिने झाले. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सासूबाईनी विषय काढला. 'आपको आके बहोत दिन हो गये. वापस जाना है ना? कबकी टिकट निकालनेको बोले?'

हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. रामशरणनी आईला विचारलं,"अम्मा, कहा जाये? हम तो वहाका सब बेचके गाव आये है. आप लोगोंके साथ रेहेने. बच्चे यही इस्कुलमें पधेंगे. वहा नासिकमें अब हमारा कुछभी नही है."

"तुम आनेसे पहले हमसे पूछा क्या, आये क्या करके. यहा हम आपको, आपके परिवारको क्यों सम्हाले? मुफ्तकी रोटी कोन और क्यू खिलावेगा?"

"मुफ्तकी काहे. शोभा घरके काममे हात बटावे है, हम खेतोमे काम करत है. और पूछना क्या है? घर हमारा, गाव हमारा, जमीन हमारी, आप सब हमारे. मन हुंवा हम आ गये."

"तुम यहा नही रेह सकते. जल्दीसे अपना सामान उठावो और निकलो."

"हम भी देखते है हमें कौन निकालता है."

आणि मग काय त्या रात्रीनंतर सगळं चित्रच पालटल. रोज वाद आणि भांडणं व्हायला लागली. घरात कोणी कशाला हात लाऊ देईना. आम्ही जमिनीत हिस्सा मागणार अशी त्यांना भीती वाटत होती. रोज दिवसातून चार चार वेळा सासू विचारायची,'कधी जाताय, केंव्हा जाणार?'

रामशरणनी एक दिवस वडिलांकडून 'दिलेले पैसे परत मागितले.' तो म्हणाला," मैने आपको दिये थे वो पैसे मुझे दे दो. मै, मेरे परिवारको लेकर चला जाऊंगा. मेरे पास जो भी था वो मैने आपको दे दिया. अब मेरे पास कुच्छभी नही है."

हे ऐकल्यावर सासरे खूप संतापले. आम्हाला खूप शिव्या दिल्या. रामशरण ला मारायला धावले. घरातील वातावरण अजूनच बिघडलं. आम्हाला पोटभर जेवण पण देणं बंद केलं. उपाशीपोटी मुलं रडत झोपायची. मी रामशरणला म्हणाले, 'आपण नाशिकला आईकडे जाऊया. ती आपल्याला मदत करेल.'

ट्रेनची तिकीट काढायला पण पैसे नव्हते. मुलांची अवस्था बघवत नव्हती. मला काय करावं कळेना. मला आई तुझी फार आठवण आली. त्या दिवशी मी खूप रडले. तू कालीचरणला दिलेली चौघडी काढायला बेग उघडली आणि माझी परतीच्या प्रवासाची सोय झाली. मला तू लग्नात दिलेले चांदीचे पैंजण दिसले. मी लागलीच रामशरणला ते दिले. त्यांनी त्या पैशातून तिकीट काढली. म्हणून आम्ही तुझ्या कडे सुखरूप येऊ शकलो. (जेंव्हा सासूला समजलं कि माझ्या कडे चांदीचे पैंजण आहेत तेंव्हा तिने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. अजून मी काय लपवलं आहे हे पाहण्या साठी बेगेतून सामान बाहेर काढलं. जेंव्हा काहीच मिळालं नाही तेंव्हा चिडून तिने माझी एक साडी फाडली. एवढंच नाही तर दोन चांगल्या साड्या स्वताच्या कपाटात ठेऊन दिल्या.) माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये. तिथले शेवटचे दिवस आठवले तरी अंगावर काटायेतो.

आई, आता आम्ही तुझ्याकडे आलोय. रामशरण म्हणतोय आपण आपला भाजी विकायचा धंदा सुरु करू. त्याला जोडीला फळ पण ठेऊ. आई तू आम्हाला थोडी मदत करशील का?"

२-४ दिवस ते सगळे माझ्या कडे राहिले.मी त्यांना आर्थिक मदत करायची ठरवलं. रामशरणच्या आधीच्या ओळखी होत्याच. त्याला काम सुरु करायला आणि भाड्याची खोली मिळवायला वेळ लागला नाही.

 दोघांनी दोन लेकरांसह शून्यातून संसार सुरु केला. रामशरणनी खूप मेहनत केली. शोभानी पण चांगली साथ दिली. (गावाकडून कामानिमित्त आलेल्या लोकांना ती जेवणाचे डबे द्यायला लागली. पुढे राहत्या घराच्या शेजारची खोली घेऊन ह्या लोकांना पोटभाडेकरू म्हणून ठेऊन चार पैसे कमवायला लागली. रहात घर विकत घेतलं, (कर्ज काढून.) मला शेवट भेटली त्याला पण १५ वर्षं झाली. तेंव्हा तिची मुलं शिकत होती. तीन खोल्यांचं घर त्यांच्या नावावर होतं. दोघं मजेत संसार करत होते.

Tuesday, 1 December 2020

उलथापालथ

२२-२३ वर्षांचा संतोष अभ्यासात फार काही हुशार नव्हता. पण कधी नापास पण नाही झाला. कळायला लागल्यापासून तो आजपर्यंत त्याला न आवडणारं काम करत होता. ते म्हणजे अभ्यास! पण आता त्याला ह्या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. तो graduate झाला होता. तो आयुष्यातील एक कठीण टप्पा पार करून मुक्त आयुष्याची स्वप्नं बघत होता. तो स्वप्नं बघण्याचा अधिकार त्याला देणारा कागद त्याच्या हातात होता. आज सर्व मित्रांनी एकमतानी ठरवलं कि आता नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि काही वर्षं ऐश करायची. काही वर्षं स्वच्छंदी आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवत संतोष घरी आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा निकाल ऐकून सगळ्यांना आनंद झाला. आईंनी त्याच्या आवडीचा दोन दिवस स्वैपाक केला. बघता-बघता महिना निघून गेला.

एक दिवस त्याला वडिलांनी विचारलं,"आता पुढे काय करायचं ठरवलाय?"

संतोषकडे ह्याचं उत्तर तयार होतं. तो दोन दिवसांपूर्वीच एका ऑफिसमध्ये मुलाखत देऊन आला होता आणि तिथे नोकरी मिळण्याची पक्की खात्री होती. त्यांनी तसं वडिलांना सांगितलं. अपेक्षेप्रमाणे संतोषला नोकरी मिळाली. पगार फार नव्हता, १५०००/- महिना! पण ठीक होतं . एकट्या जीवाला किती लागणार? वडिलांची सरकारी नोकरी आणि गावाकडे बागायती शेती! संतोषच्या पगारावर कोणाचं काहीच अवलंबून नव्हतं. सगळंसुरळीत चाललं होतं. दोन महिने मजेत गेले.

रात्रीची जेवणं झाल्यावर एक दिवस आईंनी अचानक विषय काढला. "संतोष, तुझं शिक्षण झालं, नोकरी लागली, आता तुझ्या लग्नाचा विचार करूया असं मला वाटतं. तुझ्या काही अपेक्षा असतील तर सांग. म्हणजे तुझ्या पसंतीची मुलगी शोधायला बर."

"लग्न! आणि माझं! एवढ्यात? आई,मला एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. काही दिवस नोकरी करतो, चार पैसे कमावतो, मजा करतो. जरा आरामात जगतो." त्यांनी लाडात येऊन आईला सांगितलं,' मा शादी तो बरबादी है, खो जाती आझादी है!'

पण त्याच्या आईला ह्यात काही गमतीचं वाटलं नाही. तिने सेरीअसली त्याला विचारलं,"लग्नाला नाही म्हणतोयस. बाहेरच्या बाहेर एखादी बघितली नाहीस ना? तसं असेल तर सांग."

संतोष साठी हा अप्रिय विषय असल्याने त्यांनी काहीच उत्तर किंवा प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या साठी तो विषय संपला होता पण त्याच्या आईसाठी तो एक काळजीचा विषय झाला. तिला का कोण जाणे पण असा संशय येत होता कि संतोषला कोणीतरी मुलगी भेटली आहे. तो तिच्या प्रेमात तर पडला नसेल ना? त्यांनी जितका लग्नाचा विषय टाळला तेव्हढी आईला खात्री वाटायला लागली. तिने तिच्या भावाची (अण्णा मामाची) मदत घ्यायची ठरवले.

एक दिवस संतोष जेंव्हा ऑफिसमधून घरी आला तेंव्हा अण्णा मामाला बघून त्याला आश्चर्य वाटलं." मामा, what a sweet surprise! आज अचानक कसं काय येणं केलंस?"

त्यावर मामा म्हणाला,' अरे तुझ्यासाठीच आलोय. ताईनी बोलावलं म्हणून आलो.'

"माझ्या साठी?"

"अरे गम्मत केली. ते जाऊ दे. तू सांग तुझं कसं चाललं आहे. नोकरी? मित्र मंडळी सगळं मजेत ना?"

तेंव्हा संतोषला कळल नाही कि त्याचा मामा खरंच त्याच्या साठीच आला होता. आणि त्याच्या येण्यानी संतोषच्या  आयुष्याची वाट लागणार होती.

त्या दिवसानंतर मामाचं येणं वाढलं. सासरी असणार्या मीनाताईचं पण येणं वाढलं. हि सर्व जवळची माणस अनपेक्षितपणे भेटायला येतात ह्याची संतोषला गम्मत वाटली पण कारण जाणून घ्यायची गरज वाटली नाही. त्याला कुठे ठाऊक होतं कि ह्यांच्या येण्यानी त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार होती ते!

एक दिवस ऑफिसमधून संतोष घरी लवकर आला. घरी काही अनोळखी माणस, मामा आणि ताई आले होते. अनोळखी लोकांमध्ये एक १९-२० वर्षांची मुलगी होती. त्याला आलेला बघून आई थोडी गोंधळली. स्वतःला सावरत तिने ओळख करून दिली, 'हा आमचा संतोष. संतोष, हि अस्मिता आणि हे तिचे आई-वडील.' रिती प्रमाणे त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि तो स्वताच्या खोलीत निघून गेला. ह्या घटने नंतर काही दिवसांनी घरात गड-बड सुरु झाली. पत्रिकांचे नमुने, कापड खरेदी, सोनाराच्या दुकानाच्या चकरा असा सगळा घरातला माहोल बदलून गेला. घरात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं. न राहावल्याने त्यांनी बहिणीला विचारलं, तेंव्हा त्याला कळल कि घरातली धावपळ, लगबग, उत्साह, ह्याच्या मागे तो होता. त्या दिवशी घरी आलेली अस्मिता आणि तिचे आईवडील हे लग्नाची बोलणी करायला आले होते. त्यांना माझं स्थळ पसंत होतं. आईंनी 'देण्या घेण्याच्या काहीच अपेक्षा नाहीत' असं सांगितल्यावर तर मुलीकडील लोकांनी तेव्हाच होकार दिला होता. अस्मिताच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यात अस्मिता धरून चार मुली. अस्मिता १२वी पर्यंत शिकलेली. शिकलेला, पदवीधर मुलगा, त्यात कमवता. शिवाय घरची श्रीमंती! ह्याच्या पेक्षा चांगलं स्थळ शोधून मिळालं नसतं.

"अरे संतोष आहेस कुठे? तुझं लग्न ठरलंय. तुला हवं म्हणून साधेपणानी करायच ठरलं आहे. दोन महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. तू माझ्या कडे असं बघतोयस जसं तुला ह्यातलं काहीच ठाऊक नाहीये."

"अग ताई, मला खरंच कशाची काहीच कल्पना नाहीये. मला खरं म्हणजे इतक्यात लग्नच करायचं नाहीये. मी तसं आईशी बोललो पण होतो.घाई करू नकोस. वर्षं दोन वर्षांनी बघू, असं पण म्हणालो होतो. बाबा पण होते तेंव्हा. पण बाबांचा काही उपयोग नाही. त्याचं आईच्या आणि मामाच्या पुढे काहीच चालत नाही. मी आत्ताच्या आत्ता आईशी जाऊन बोलतो आणि तिला सांगतो मला सध्या लग्न करायचं नाहीये. हे सगळं थांबव."

तेंव्हा मीनाताई म्हणाली, "आता काही उपयोग नाही. तू पहिल्यापासून ज्या प्रकारे उडवा-उडवीची उत्तरं देत होतास त्यातून आईचा पक्का समज झाला आहे कि 'तुझं बाहेर लफडं आहे.' 'पर जातीची मुलगी ह्या घरात माझी सून म्हणून आलेली मला चालणार नाही.' हे तिचं पक्का मत आहे. म्हणून तर तिने मला आणि मामाला घाईने बोलावून घेतलं. स्थलं शोधायला! तिचा म्हणणं मामाला पण पटलंय. तेंव्हा मला नाही वाटत तुझी कोणी मदत करू शकेल. तू म्हणतोयस तर आईशी बोलून बघ. पण उपयोग होईल असं मला वाटत नाही."

संतोषनी आईशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आई आणि मामा आपल्याला बोहोल्यावर उभं केल्याशिवाय थांबणार नाहीत, ह्याची खात्री पटल्यावर संतोषनी घरातून पळून जायचं ठरवलं. दुसर्या दिवशी सकाळी तो नेहेमी प्रमाणे ऑफिसला जायला निघाला. आईंनी मोडता घातला. हे अपेक्षित होतं. संतोषनी ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देऊन येतो आणि गोड बातमी देऊन येतो असं सांगितल्यावर मामाला पटलं. आईंनी नाखुशिनीच जाऊ दिलं.

घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला न जाता संतोष त्याच्या मित्राकडे गेला. मित्र (अनिल) भाड्याच्या खोलीत रहात होता. संतोषचा प्रोब्लम ऐकल्यावर त्यांनी संतोषला आपल्या खोलीत ठेऊन घेतलं. लग्न टाळता येण्याची शक्यता कमीच होती पण मामाला किंवा बेस्ट म्हणजे मामीला पटवून बघावं. 'मामीचा तर मी खूप लाडका आहे. ती नक्की माझ्यासाठी घरात इतरांना समजावेल. अशा खात्रीने संतोशनी मामीला फोन केला. 'तिने पण बोलून बघते' असं आश्वासन दिलं.दोघांना वाटलं काही दिवसांचा प्रश्न आहे. ह्या गोष्टीला पण आठवडा होऊन गेला. मामीचा काही फोन नाही कि निरोप नाही. काय करावं काही सुचेना. घरात बसून कंटाळा आला. एक दिवस रात्रीचं जेवण झाल्यावर दोघं उशिरा बाहेर पडले. रात्रीचे १०.३० वाजले होते. सगळीकडे साम-सुम होतं. दोघं गप्पा मारत चालले होते. अचानक कोणीतरी संतोषला मागून पकडलं आणि काही कलायच्या आत मारायला सुरुवात केली. मामा एकी कडे शिव्या देत होता आणि वेड लागल्या सारखं मारत होता. मारत मारत तो संतोषला घरी घेऊन आला आणि संतोषला खोलीत कोंडलं. जाताना मामानी दटावलं, "परत काही मूर्खपणा करू नकोस. पळून जाण्याचा तर विचार पण मनात आणू नकोस. तू तुझ्या मामीला फोन केलास, त्याचदिवशी आम्ही ठरवलं कि 'आता थांबायचं नाही. सापडलास कि बार उडवून द्यायचा. पुढच्या २-३ दिवसातली तारीख निश्चित करतो.'

त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांना व लताला खूप वाईट वाटलं. पण आई आणि मामाच्या समोर बोलायची दोघांची हिम्मत नव्हती. झोपण्या आधी आई भेटायला आली. डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "अरे का असं वागतोस? आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? तुझ्या भल्यासाठीच करतोय ना सगळं.? कुठली कोण जातीची ना पातीची मुलगी घरात आणायला निघाला होतास. तिने काय संसार केला असता का? मिर्या वाटल्या अस्त्यान आपल्या डोक्यावर. माहितीतली, जातीच्या मुलीसंग लग्न झालेलं बर. त्यात गरिबा घरची, चार इयत्ता कमी शिकलेली असली तर जास्त बर. खाली मान घालून निमुटपणे ऐकेल सगळं. खूप दुखतय का रे?" आईच्या डोळ्यात पाणी आल.

संतोषनी आईचा गैरसमज दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण काही उपयोग झालं नाही.

मरण्या आधी माणूस जगण्याची केविलवाणी धडपड करतो तसा संतोष करू पहात होता. घरात निजानीज झाल्यावर त्यांनी परत पळून जायचा प्रयत्न केला. पकडला गेला. मामानी बेदम मारलं. पुढचे दोन दिवस तो उठूच शकला नाही. तिसर्या दिवशी सकाळी घरातल्या घरात लग्नाचे विधी उरकले. स्वतःच्या लग्नात संतोष, वडील आणि मामा, ह्यांच्या आधारानी उभा होता. सगळंच चमत्कारिक होतं. पण अस्मिताच्या आई-वडिलांनी विचारल्यावर 'तब्येत ठीक नाही आहे. पोट बिघडलं आहे.' अशी उडवा उडवीची उत्तर दिलं. अश्या प्रकारे आणि अश्या परिस्थितीत संतोषचं लग्न झालं.

ह्या घटनेला ६-८ महिने झाले असतील. एक दिवस अस्मिता, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिची थोडक्यात तक्रार होती," ताई, माझं लग्न झाल्या पासून माझ्या नवर्यानी मला बायको सारखी वागणूक दिलीच नाही. तो घरी थांबत नाही कि चार शब्द माझ्याशी बोलत नाही. आजपर्यंत जवळ येणं तर लांबच, मला हात सुद्धा लावला नाही. माझ्या हातचं पाणी पण प्यायले नाहीत. ताई, माझा नवरा घरीच येत नाही. मला सासू-सासर्यान कडे सोडून माझा नवरा कामाच्या गावी निघून गेला आहे. मला काळात नाहीये मी काय करू? ते असं का वागतात?"

"माझे सासू-सासरे चांगले आहेत. खूप प्रेमळ आहेत. घरी खायला प्यायला मुबलक आहे. कशाची कमतरता नाही. पण आपलानवराच घरात नसेल तर ह्या गोष्टींचा काय उपयोग?"

"लग्न कस ठरलं? लग्न संतोषच्या मर्जीनी झालं होतं ना? का त्याचा विरोध होता, लग्नाला?"

असं विचारल्यावर उत्तमराव (अस्मिताचे वडील) म्हणाले, "ताई, खरं सांगायचं तर आम्हाला काही कल्पना नाही. समोरून स्थळ सांगून आल, ते पण इतकं भारी. आम्ही फारशी चौकशीच केली नाही. लग्नाच्या आधी एकदाच संतोषला, ते सुधा निसटत पाहिलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा. त्यानंतर बघितला तो बोहोल्यावर त्या लोकांनी उभा केला तेंव्हाच!"

"बोहोल्यावर उभा केला म्हणजे?"

"त्या दिवशी त्याच्या मामानी आणि वडिलांनी त्याला दोन्ही बाजूनी आधार देत बोहोल्यावर उभं केलं आणि वरमाला घालायला पण मदत केली. आम्ही विचारलं तर त्याच्या आईंनी उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यामुळे नेमकं कारण मला पण नीट सांगता येणार नाही."

संतोषला जेंव्हा ऑफिसमध्ये बोलावलं तेंव्हा त्याने त्याची बाजू मांडली. त्याला जेंव्हा विचारलं, 'आता पुढे काय करायचं? ह्या सगळ्यात अस्मिताचा काय दोष? तिला ह्या सगळ्याची का बर शिक्षा?"

ह्यावर संतोष म्हणाला," ह्यात अस्मिता आणि तिच्या आई-वडिलांची काहीच चूक नाही. अस्मिता चांगली मुलगी आहे. तिच्या आयुष्याचं असं वाट्टोळ व्हायला नको होतं.माझ्या बाजूनी मी तिला त्रास होईल असं वागलो नाही. मी तिला हात पण लावला नाही. मला तिच्या साठी खूप वाईट वाटतं. पण ह्याचा अर्थ मी तिच्या सोबत संसार करीन असं समजू नका. आणखीन एक गोष्टं. मी तिला एक नवा पैसा पण नुकसानभरपाई म्हणून देणार नाही. तिच्या आयुष्याचं नुकसान माझ्या मुळे झालेलं नाही. हि माझ्या आईची हौस होती. तिच्या कडून नुकसान भरून घ्या आणि अस्मिताला मिळालं तर माझा पण नंबर लावून बघा. मिळाले तर तुमच्या संस्थेला देणगी देईन!"

मला परत बोलावू नका, मी येणार नाही, असं निक्षून सांगून संतोष त्या दिवशी निघून गेला तो परत आलाच नाही. संतोषच्या आईला आणि मामाला बोलावलं. त्यांच्या हातून झालेली चूक त्यांना कळली होती आणि मान्य पण होती. संतोषनी आपल्याशी आयुष्यासाठी नातं तोडलं ह्याची खंत आई आणि मामाला जाणवत होती. ह्याची जाणीव त्या दोघांच्या बोलण्यातून होत होती. अस्मिता अडून बसली होती. मला नुकसानभरपाई द्या, फारकत करून द्या, नाहीतर मी फसवणूकीची केस करीन. आईंनी अस्मिताला एक मोठी रक्कम दिली. खूप फोन करून विनंत्या केल्यावर संतोष फारकतीच्या कागदांवर सही करायला तयार झाला. ज्या दिवशी बोहोल्यावर चढला त्या दिवशी संतोशनी फारकतीच्या कागदांवर सही केली! समजुतीने फारकत घेण्यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. सहा महिन्यांनी पक्की फारकत झाली. आईचा हट्ट आणि गैरसमज सगळ्यांनाच खूप महाग पडला. अस्मिता आणि संतोषच्या आयुष्याचं न भरून निघणारं नुकसान झालं.