संपत, एका सुखवस्तू शेतकरी कुटुंबातील सदस्य. सात भावंडानमधील एक. पण
त्याचं घरी, दारी, नातेवाईकांमध्ये, गावांमध्ये सगळ्यांना खूप कौतुक होतं. तो
चुणचुणीत आणि हुशार होता. गावातील इतर मुलांच्या तुलनेत तो खूप शिकला. बोर्डाच्या
परीक्षेत जिल्ह्यात ५०वा, तर तालुक्यात १५वा आला होता. अर्थात गावात सर्व विषयात
प्रथम क्रमांक त्यानेच पटकावला होता. गावच्या सरपंचानी त्याचा सत्कार केला. पुढे
शिकून तो सरकारी नोकरीत लागला. गावातल्या सगळ्यांना त्याचा खूप अभिमान होता. सर्व
त्याला 'साहेब, साहेब' म्हणून संबोधायला लागले. तो म्हणेल ती पूर्व दिशा असंच
काहीसं होत गेलं. त्याच्या मनात स्वतःबद्दल एक वेगळीच भावना झाली होती. 'मी चुकूच
शकत नाही. मला कोणाची गरज नाही. मी मनात आणीन ते मिळवू शकतो.'
कालांतरानी त्याचं लग्न
पंचक्रोशीतल्या एका सुखवस्तू कुटुंबातील हिरा नावाच्या मुलीशी झालं. हिरा, मुळातच
हुशार, पण कधी शिक्षणाची संधी मिळाली नाही. तिच्या आई-वडिलांना मुलींनी शिक्षण
घेणं मान्य नव्हतं. तिची हुशारी तिला गप्प बसू देत नव्हती. एखादी गोष्ट खटकली,
कोणाचं वागणं पटलं नाही कि सुरुवातीला तिने वाद घालायचा, आपलं मत पटवून द्यायचा
प्रयत्न केला. पण घरातल्या मोठ्या माणसांच्या मते हि हुशारी नव्हती. तो आगाऊपणा होता.
मुलीच्या जातीला तोंड वर करून बोलणं शोभत नाही. 'दुसऱ्यांच ऐकून घ्यायला शिक. एखाद
वेळेस समोरच्याचं म्हणणं, वागणं पटलं नाही तरी ऐकून घ्यावं. त्यांनी काही अंगाला
भोकं पडणार नाहीत. अशीच वागत राहिलीस तर उद्या सासरी जाऊन आमचं चांगलच नाव काढशील.
वेळीच शहाणी हो.' घरातून मिळालेल्या ह्या शिकवणी मुळे, तिने स्वतःच्या स्वभावाला
मुरड घातली. ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकली! मन मारून जगायला शिकली! अपमान
सहन करायला शिकली. सासरी आणि समाजात, एक आदर्श मुलगी, आदर्श सून असं नाव कमावल. आई-वडिलांचं,
तिच्या खानदानाच नाव मोठं झालं.
हिराच संपतशी लग्न झालं
तेंव्हा ती जेमतेम १९ वर्षांची होती आणि संपत २४ वर्षांचा. हिरानी बघता-बघता
घरातील अनेक जबाबदार्या स्वीकारल्या, कष्टाच्या! स्वतःची चार मुलं, (दोन मुलं आणि
दोन मुली) आणि भांडून माहेरी गेलेल्या जावेची दोन मुलं अश्या सहा मुलांना, घरातील
इतर मोठ्यांना काय हवं नको ते बघत होती. घरातली काम, स्वैपाक-पाणी, आला-गेला, नातेवाईक अस सगळ
सांभाळून शेतात कष्ट करायची. कधी कशाची अपेक्षा नाही. कि कशा बद्दल तक्रार नाही.
अशी सर्वगुणसंपन्न सून सगळ्यांची लाडकी होती. पण संपतरावांच काय? त्याला त्याची
बायको बिनडोक, अडाणी वाटायची. तो पदोपदी तिचा अपमान करायचा. रात्री जरी हक्कांनी
जवळ घेत असला तरी दिवसा त्याला ती नजरे समोर नको असायची. त्याची मर्जी
सांभाळण्यासाठी सासूबाईनी एक फतवा काढला, "संपातला आवडत नाही तर तो घरात असतांना
हिरा स्वैपाकघरातून बाहेर येणार नाही." हिरानीपण निमुटपणे ते मान्य केलं. सर्व
काही सुरळीत चाललं होतं. एकदा ती मुलांना जेवणासाठी बोलवायला बाहेर आली आणि तिच्या
दुर्दैवाने संपत ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तिला बघताच त्याचं पित्त खवळल.
कोणाच्या काही लक्षात यायच्या आत त्यांनी रागाच्या भरात हिराच्या कानफटात लगावली.
झालेल्या अपमानाने आणि वेदनेने हिराच्या डोळ्यात पाणी आल. घरातील सगळ्यांनी काय
घडलं ते बघितलं. पण संपतला काही सांगायची, बोलायची कोणाची हिम्मत झाली नाही. उलट
सासू हिरालाच म्हणाली, "हीरा, तुला सांगितलं होतं ना, तू बाहेर येऊ नकोस
म्हणून? माझं थोड ऐकना ग पोरी. तुझ्या अश्या वागण्यामुळे त्रास होतो ग
सगळ्यांना." त्या दिवसानंतर बायकोवर हात उचलायला, संपतला कुठलं पण कारण
पुरेसं होतं. संपतच्या तिरसट आणि मगरूर स्वभावाला हिराचा सोशिकपणा पोषकच ठरला.
अश्या प्रकारे हिरानी आपला
संसार टिकवला. मुलं मोठी झाली. मुली लग्न करून सासरी गेल्या. मोठा मुलगा बायकोला
घेऊन गावातच वेगळा राहू लागला. धाकट्या मुलानी (महेश) लग्नच केलं नाही. त्याला
आईची काळजी वाटत होती, आणि वडिलांचा राग येत होता. वडिलांच्या विचित्र वागण्यामुळे
त्याला खात्री होती कि, 'आपला संसार सुखी व्हायला हवा असेल तर, बायकोला घेऊन, वेगळ
राहण्याला पर्याय नाही.' आणि आईनी वडिलांसोबत एकटीने रहावं हे त्याला सुरक्षित
वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी लग्नाचा विचारच करायचा नाही असं ठरवलं. महेशला नोकरी
लागली तेंव्हा त्यांनी आपल्या आईला समजावलं, "आई, आता हे सहन करण थांबव. मला
ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आपण दोघं, दादा आणि वहिनी सारखं वेगळीकडे खोली
घेऊन राहू. वडिलांचं तुझ्याशी वागणं हे असंच चालू राहिलं तर एखाद दिवशी माझ्या
हातून काहीतरी अघटीत घडेल." पण हिरानी घर सोडण्यास नकार दिला. महेशचा पण
नाईलाज झाला.
अखेर एक दिवस हिराच्या
सहनशक्तीचा अंत झाला. घरात काहीतरी कार्यक्रमासाठी मुलं, सूना, लेकी, जावई,
नातवंड, असे सगळे जमले होते. घरात गडबड होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. मुलं
मस्ती करण्यात खेळण्यात मग्न होती. तेवढ्यात कोणाचातरी धक्का लागला आणि हिराच्या
हातून पाण्याचा ग्लास, संपतच्या अंगावर पडला. मागचापुढचा विचार न करता (जो त्यांनी
आजपर्यंत कधीच केला नाही) संपतनी हीराच्या धोबडीत मारलं आणि अर्वाच्य शिव्या दिल्या. एरवीची
गोष्टं वेगळी होती. पण आज लेकी,सूना, जावई, ह्यांच्या समोर झालेला अपमान तिला सहन
झाला नाही. त्या घटनेनंतर हिरानी ठरवलं, "आता बास! आता ह्या सगळ्याचा
सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे."
तिने कुठूनतरी आमच्या
संस्थेची माहिती मिळवली आणि येऊन नवर्याविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. स्वतःची
माहिती तिने अगदी शांतपणे सांगितली. कशाही बद्दल त्रागा नाही, कोणासाठी तिने
अपशब्द वापरला नाही. तिने कशाबद्दल कोणाला पण दोष दिला नाही. तिचं एकच म्हणणं
होतं, "आज ४५ वर्षाच्या संसारा नंतर मला कळून चुकलाय कि मी ह्या माणसासोबत
एकाच छताखाली आता नाही राहू शकत. ताई, मी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला
सांगा."
नेहेमीप्रमाणे आमच्या मनात
अनेक प्रश्न होते. "हिराताई, तुम्ही रहाणार कुठे? तुमच्या सुरक्षिततेच
काय?............
"मी कुठे रहाणार
म्हणजे? तिथेच! मी आणि महेश! संपतरावांच्या मालकीची दोन घरं आहेत, शेती आहे, त्याचं
उत्पन्न आहे, त्यांना मिळणारं पेन्शन आहे, बँकेत ठेवलेला रगड पैसा आहे. आहे सगळं.
पण द्यायची दानत नाही. पैसा पण नाही आणि कोणाला सुख पण नाही. ते जाऊ दे.
"माझ्या सुरक्षिततेची
काळजी नाही. त्याला मला मारून टाकण्यात इंटरेस्ट नाही, त्रास देण्यात आहे. माझा
अपमान करण्यात आहे. नाहीतर ४५ वर्षात मला कधीच संपवली असती.
"मी तुमच्याकडे आले
आहे. आता तुम्ही सांगाल ते आणि तसं मी वागेन. आज मी माझ्या मुलीकडे जाणार आहे. तसं
मुलगी आणि जावई बरेच दिवसांपासून बोलावतायत. काही दिवस राहीन. न अपमान करून घेता,
न शिव्या खाता जगायची सवय करायला हवी. तसं जगता येतं हेच विसरत चालले आहे." हिराताईच्या
डोळ्यात पाणी आल. ऑफिसमध्ये आल्यापासून पहिल्यांदा तिने तिच्या भावनांना वाट मोकळी
करून दिली.
संपतराव आमचं पाहिलं पत्र
मिळाल्याबरोबर आम्हाला भेटायला आले. त्यांच्या मनात हिराताई बद्दलचा राग, तिरस्कार त्यांच्या बोलण्यातून जाणवत
होता. त्यांच्या मते त्याचं काहीच चुकत नव्हतं. ते म्हणाले, "तिच्या लायकी
प्रमाणे तिला वागणूक मिळत होती. उलट तिची लायकी नसतांना मी तिला इतके वर्षं सहन
केलं, घरात राहू दिलं, जगू दिलं, ह्याचे आभार मानायचे सोडून तुमच्याकडे तक्रार
करते. समजते काय ती स्वतःला? सध्या तर कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली
आहे. कुठे गेली आहे? कधी येणार? माहित नाही. तिची बेफिकिरी किती? इकडे आपला नवरा
जगाला कि मेला? तो जेवला का? रात्रीची त्याची काय सोय होत असेल? त्याची सेवा कोण
करत असेल? हिला कशाचं काही नाही. तिला ठाऊक आहे रात्री झोपायच्या आधी माझ्या
डोक्याला तिने तेल लाऊन दिलं नाही, माझे पाय चेपून दिले नाहीत तर मला झोप लागत
नाही. मी आयुष्यभर केलेल्या उपकाराची हि चांगलीच परतफेड करतीये. हे सर्व
करण्यासाठी, असं वागण्यासाठी महेशचीच फूस असणार. ह्यात काही शंका नाही. नाहीतर
तिला एवढं डोकं नाहीये. तिला जर असं वाटत असेल कि एवढं तारतम्य सोडून वागल्यावर पण
मी तिला घरात घेईन, तर तो तिचा गैरसमज आहे. बघू कुठे जाते आणि कोण सांभाळताय ते.
चार दिवस उपाशी राहिली कि सर्व डोकं ठिकाणावर येईल."
संपतराव बोलायचं थांबले.
जेंव्हा आम्ही त्यांना सांगितलं, 'त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हिराताईनी
त्यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय.'
हे त्यांच्यासाठी फारच
अनपेक्षित होतं. क्षणभर काय बोलावं त्यांना काही सुचेचना. 'हिरा येणार नाही,
ह्याचा अर्थ काय? सेवा करणारी, अपमान सहन करून, वेळप्रसंगी होणारी मारहाण सहन करून
मुकाट्यानी जगणारी हिरा नाही मग आयुष्यात काही मजाच नाही.'
संपतराव म्हणाले,
"ताई, तुम्ही सांगितलं ते मी ऐकलं आणि मला समजलं. पण जो पर्यंत हिरा हे
माझ्या समोर सांगत नाही तोवर मी हे मान्य करायला तयार नाही."
त्यांच्या आग्रहाखातर लगेच
पुढील आठवड्यातील तारीख, एकत्र मीटिंग साठी ठरली. मीटिंग मध्ये संपतरावांच्या समोर
हिराताई म्हणाल्या, "ताई, मी तुम्हाला जे सांगितलं तेच माझं आजपण म्हणणं आहे.
मी ह्या माणसाबरोबर एका छताखाली नाही राहू शकत."
हिराताईचा बदललेला अवतार,
तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास, हे सगळं संपतरावांसाठी नवीन होतं. हिरा नाही तर
आपली जगण्याची फारच पंचाईत होईल, हे संपतरावांच्या लक्षात आल होतं. अनिच्छेने का
होईना पण त्या दिवशी आम्हा सर्वांसमोर त्यांनी मान्य केलं कि कधी कधी त्याचं
हिराशी वागणं चुकलं. 'आता माझी मला चूक कळली आहे तर मी ती सुधारण्याचा मनापासून
प्रयत्न करीन. हिरानी मला एक संधी द्यावी.'
त्यांनी बरीच गळ घातली,
आग्रह केला म्हणून हिराताई संपतरावांच्या बरोबर जायला तयार झाली. तिने घातलेल्या
काही अटी पण त्यांनी मान्य केल्या. (अटी अगदीच सध्या होत्या- महेश तिच्या बरोबर
त्याचं घरात राहील. नवर्यानी तिचा अपमान करू नये. तिच्यावर हात उचलू नये. तिला
शिव्या देऊ नयेत.) अश्या तर्हेनी ७० वर्षांचे संपतराव आणि ६४ वर्षांची हिराताई
ह्यांच्यात समझोता झाला. आम्हालाच खूप बरं वाटलं. (संपतरावांना त्यांची चूक समजली,
आणि त्यांनी नीट वागायचं कबूल केलं म्हणून.)
पण आमचं हा आनंद खूप काळ
टिकणार नव्हता. समझोता होऊन आठ दिवसांच्या आत हिराताई पुन्हा ऑफिसला आल्या. खुशाली
सांगायला नाही तर नवर्यानी केलेली नवीन नाटकं सांगायला. ह्या आठ दिवसांत त्यांनी
कबूल केल्याप्रमाणे तो वागला. पण ह्या वेळेस त्यांनी त्रासाचा प्रकार बदलला.
हिराताई सांगत होती, "ताई, एक दिवस तो सकाळी लवकर उठला आणि स्वैपाकघराला
कुलूप लाऊन मुलाकडे खुशाल निघून गेला. मी आणि महेश, दिवसभर उपाशी राहिलो. त्या
दिवसापासून आम्ही रात्री शांत झोपू शकलो नाही, कारण ह्या माणसाची काही खात्रीच
वाटत नाही. मध्ये एकदा मी संद्याकाळी भाजीबाजारात गेले आणि महेश कामावरून आला
नव्हता. तर हा बाबा घराला कुलूप लाऊन कुठेतरी निघून गेला. रात्रभर आम्ही दोघं
उपाशी दाराशी ह्याची वाट बघत बसून राहिलो. ताई, मी ह्या माणसाबरोबर नाही राहू
शकत."
आम्ही फोन करून संपतरावांना
बोलावून घेतलं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सांगितलं, "ताई, मला अजून पण वाटतंय
हिने माझ्या सोबत रहावं. मी हे असं वागलो कारण मला महेश माझ्या घरात नको आहे.
त्याच्यामुळेच ती शेफारात चालली आहे. त्याउप्पर पण तिला राहायचं नसेल तर ती कुठेही
जाऊ शकते. माझा मोठा मुलगा आणि सून माझ्या बरोबर रहातील."
संपतरावांच हे म्हणणं
कोणालाच मान्य नव्हतं. खूप प्रकारे समजावून सांगितल्यावर ते त्यांच्या रहात्या
घरात हिराताई साठी एक खोली द्यायला तयार झाले. हिराताई तिच्या म्हणण्यावर ठाम
होती. ती कोणत्याही कारणांनी नवर्या बरोबर रहायला तयार नव्हती. तिने तिची मागणी
परत मांडली, 'शेतातलं दोन खोल्यांचं घर त्यांनी मोकळं करून द्यावं, जिथे ती आणि
महेश रहातील.'
हो नाही करत संपतराव हे
करायला कबूल झाले. आता प्रश्न आला घरातील भांडीकुंडी आणि महिन्याच्या खर्चासाठी
लागणाऱ्या पैशांचा. आधी तर त्यांना हे मान्यच नव्हतं. मग महा मुश्किलीने ते ५०००/-
महिना आणि वर्षाला एक पोतं धान्य द्यायला कबूल झाले. पण संपतराव भांडी सोडायला
तयार नव्हते. लहान मुलांसारख त्यांना नको असलेल्या वस्तू: तुटकी-फुटकी भांडी,
मोडकळीस आलेलं कपाट, अडगळीतले डबे द्यायला तयार झाले.
आम्ही काही म्हणणार तर
हिराताई म्हणाल्या, "ताई, मला एवढं बास झालं. महेशपण आता कमावतोय. आम्ही
आम्हाला लागणाऱ्या वस्तू हळूहळू गोळा करू."
८ दिवसांत संपतरावानी
शेतातल्या घराची डागडुजी करून घ्यायचं कबूल केलं. तोवर हिराताई त्यांच्या मुलीकडे
रहातील हे पण सर्वाना मान्य झालं. ठरल्याप्रमाणे ८-१० दिवसांत हिराताई आणि महेश
त्यांच्या नवीन घरात राहायला गेले. आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही होम विझिटला
गेलो. हिराताईनी आमचं छान स्वागत केलं. दोन खोल्या आणि स्वैपाघर असं छोटंसं घर होतं. पण हिराताई आणि महेशसाठी ते पुरेसं होतं. आम्ही गेलो तेंव्हा महेश कामानिमित्त बाहेर गेला होता. हिराताई आम्हाला आग्रहाने तिच्या स्वैपाघरात घेऊन गेल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा घरात खूपच सामान होतं,मुख्यता स्वैपाकघरात! घरात
लागणारी सर्व भांडी होती आणि ती पण सुस्थितीत! आमच्या चेहेर्यावरचे भाव ओळखत,
मिस्कील हसत हिराताई म्हणाल्या, "तुम्ही काय म्हणता ना ते केलं. भांडी स्मगल
केली. नवरा बाहेर गेला कि रोज दोन चार भांडी मुलाकडे आणून ठेवली. त्याला काही
कळणार नाही. अहो त्याला काल काय खाल्लं आणि कोणते कपडे घातले होते ते आठवत नाही.
त्याला घरातून कमी झालेली भांडी मरेपर्यंत आठवणार नाहीत."
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. हिराताईनी स्वताहून विषय काढला.
"ताई, तुम्ही सगळ्या मला देवासारख्या भेटलात. तुम्ही मदत केलीत म्हणून आज मी हे सुखाचे दिवस अनुभवतीये. कानाला शिव्या ऐकायची आणि मनाला धाकात राहायची इतकी सवय झाली होती, कि सुरवातीला खूप चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. पण मला वाटलं त्या पेक्षा लवकर ह्याची सवय झाली आणि आता हेच भारी वाटतंय."
"हिराताई, संपतराव काय म्हणतायत? मोठ्या मुलाकडे मजेत का? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, तेंव्हा मुलगा आणि सून चांगली सेवा करत असतील."
"ताई, संपतरावांची सर्व गुर्मी उतरली आहे. मोठा मुलगा आणि त्याच्या बायकोने त्यांचं काही करणं तर लांबच. साध भेटायला पण जात नाहीत. मला विचारलं होतं, 'तुझ्याकडे जेवायला आलो तर चालेल का?' मी काही सांगायच्या आधी महेशनी त्यांना निक्षून 'जमणार नाही' असे सांगितले आणि विषय संपवला. कुठून तरी जेवणाचा डबा मागवतात असं ऐकलं."
आम्ही पुढे काही म्हणणार तेवढ्यात एक मुलगा जेवणाचा डबा घ्यायला आला. "हा कोणासाठी?" असं न रहावल्यामुळे आम्ही विचारलं. आलेल्या मुलाच्या हातात डबा देत हिराबाई म्हणाली, "संपतरावांना कोरोना झाला आहे. मोठा मुलगा आणि सून त्याची काळजी घेत नाहीत. माणुसकी म्हणून मी सकाळ संध्याकाळ जेवण पाठवते!"