सकाळचे १०.३० वाजले असतील. ११
वाजता कॅलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग. पटपट आवरून मिटींगला जायची माझी गडबड चालू
होती. तेवढ्यात मंजूचा फोन आला. मंजू, माझी चांगली मैत्रीण! तिचा फोन म्हणजे
अर्ध्या तासाची निश्चिंती. आणि आत्ता मला खरं म्हणजे कशालाच वेळ नव्हता. मी तिला
"मंजू, मी तुला थोड्या वेळानी फोन करते." असं म्हणत कटवायचा प्रयत्न
केला, पण ती काही फोन ठेवायला तयार नव्हती. मग नाईलाजानी मी तिच्याशी बोलले.
"अग, हेमा. माझी
लांबची बहीण आहे. तिचा मुलगा अनिकेत डिप्रेशन मधे आहे. तू काही मदत करू शकशील
का?"
"मंजू, त्याला
सायकोलोजीस्ट कडे घेऊन जा. मी नवरा-बायकोची भांडणं सोडवली आहेत, त्यांना
कौन्सिलिंग केलं आहे. पण डिप्रेशनच्या व्यक्तीला कधी कौन्सिलिंग नाही केलं."
"मला वाटतं हेमा तू त्याला
एकदातरी भेटावस आणि त्याच्याशी बोलावस. प्लीज, माझ्यासाठी."
माझा नाईलाज होता. मी तिला दुपारी २ वाजता संस्थेच्या कार्यालयात यायला सांगितलं. (येतांना अनिकेत आणि त्याच्या आईला पण यायला सांगितलं.) आणि धावत पळत ११ वाजता मीटिंगला पोहोचले. साहेब येऊन मीटिंग सुरु व्हायला ११.४५-१२ वाजले आणि मग ती १.३० पर्यंत चालली.( महिला व मुलांच्या प्रश्नाशी निगडीत विविध ७ कमिटीच्या बैठका, एकाच दिवशी, एका नंतर एक अशा होत्या.) मीटिंग मध्ये फारसं काही घडलं नाही, पण आम्ही उपस्थित राहणं गरजेचं होतं.
ऑफिसला पोहोचायला जवळ जवळ २
वाजले. मंजू, अनिकेत आणि त्याची आई शारदा, माझी वाटच बघत होते. बसताना मंजू म्हणाली, "अग काय करू हेमा? शारदा काही ऐकायलाच
तयार नव्हती. अनिकेतची अवस्था पण बघवत नाहीये."
१२ वी पास, २३ वर्षांचा अनिकेत
दिसायला चांगला होता. देखणा नाही म्हणता येणार पण स्मार्ट होता. व्यायाम करून
कमावलेलं शरीर दिसत होतं. डोळे मात्र उदास आणि नजर हरवलेली होती. तो कसलातरी विचार
करत होता. स्वतःशीच काहीतरी बडबडत होता. मी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला
विचारलं, "अनिकेत, तू आमच्या ऑफिसला का आला आहेस?"
नो रिअक्शन. अनिकेतला जणू
माझं बोलणं ऐकूच आल नव्हतं. एखाद्याला झोपेतून जाग करावं, तसं थोडं हलवून मंजुनी
त्याला परत विचारलं, "अनिकेत, ताई काय विचारतायत? आपण इथे का आलोय?"
ह्यावर अनिकेतनी त्याच्या
आईला विचारलं, "आपण कुठे आलोय? पण ती कुठे आहे? आणि ती असं का वागली? माझं
काय चुकलं? आई, तू मला सोडून जाणार नाहीस ना?" अनिकेत खूप अस्वस्थ झाला आणि
शारदाचा हात घट्ट पकडून तो लहान मुलासारखा रडायला लागला. त्याची नजर कोणाला तरी
शोधात होती. त्याची अवस्था बघून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आल. स्वतःला सावरत
तीने आपल्या लेकाची समजूत काढली. एखाद्या
लहान मुलाची काढावी तशी. "हे बघ अनिकेत, बाळा, घाबरू नकोस. तुला तुझी आई कधीच
सोडून जाणार नाही. हे बघ, मी तुझ्या जवळच आहे ना. आणि आई अनिकेतचा हात घट्ट पकडून
बसणार आहे. आता ठीक आहे ना? बर वाटतंय का तुला?"
अनिकेत शांत झाल्यावर
शारदानी काय नेमकं घडलं ते सांगायला सुरुवात केली.
"हेमाताई, अनिकेतचे
वडील (वसंतराव) आणि शिवानीचे वडील (मोहनराव) (शिवानी आमची सून होणार होती) हे
शाळेपासूनचे चांगले मित्र. दोघांमध्ये पक्की मैत्री! सख्या भावांपेक्षा पण सख्खे.
अनिकेत पाच वर्षांचा असेल, तेंव्हा शिवानीचा जन्म झाला. आम्ही तिला आमची शिवानी
म्हणायचो आणि मोहनराव अनिकेतला आपला मुलगा मानायचे. मुलं थोडी मोठी झाली आणि एक
दिवस मालतीताई (शिवानीची आई) सहज म्हणाल्या, "दोन्ही मुलांच्या वडिलांची एवढी
चांगली मैत्री आहे. ह्या मैत्रीचं नात्यात रुपांतर झालं तर......."
झालं! माझ्या नवऱ्याला ही
कल्पना फारच आवडली. एक दिवस त्यांनी मोहनराव आणि त्यांच्या फेमिलीला घरी जेवायला
बोलावलं आणि सांगून टाकलं, आजपासून शिवानी आमच्या घरची सून! मुलं मोठी झाली की
त्यांचं थाटामाटात लग्न लाऊ. आणि अशा प्रकारे ८ वर्षांचा अनिकेत आणि ३ वर्षांची
शिवानीच लग्न ठरलं.
ताई, शिवानी खूप गोड मुलगी
आहे. स्मार्ट आहे, हुशार आहे. दिसायला पण सुंदर आहे. मी तर मनोमन स्वतःला नशीबवान
समजत होते, कि शिवानी सारखी गुणी मुलगी माझ्या अनिकेतच्या आयुष्याची जोडीदार होणार
होती. खरं सांगायचं तर आमच्या अनिकेतच अभ्यासात कधी फारसं डोकं चाललंच नाही.
कसातरी १२ वी झाला. त्याला आयुष्यात खरतर दोनच गोष्टींची आवड, एक व्यायाम आणि
दुसरं आमच्या घरचा बिझिनेस! तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं
आणि घराची, बिझीनेसची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली. तुम्हाला सांगते ताई,
माझा मुलगा लाखात एक आहे. त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही. का शिवानी असं
वागली मला काही समजत नाही."
शिवानीच नाव ऐकल्यावर
अनिकेत कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघत, 'आली का शिवानी? आली का शिवानी? शिवानी
मला सोडून जाऊ नकोस" असं म्हणत ऑफिसच्या बाहेर गेला. त्याची आई त्याच्या मागे
धावत गेली आणि मंजू "नंतर बोलते तुझ्याशी" असं म्हणत घाईतच त्यांच्या
मागे गेली.
पुढचे ८-१० दिवस अनिकेतची
काही खबरबात नाही. मंजूचा पण काही फोन आला नाही. मी पण कामाच्या व्यापात फोन
करायचं विसरले. खरं सांगायचं तर अनिकेतची केस आमच्याकडे नोंदवण्यासारखी नव्हती.
संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची होती.
एक दिवस अचानक मंजूचा फोन
आला, "हेमा, अनिकेतच्या संदर्भात तू काही विचार केलास का? त्याला तुझ्याकडे
कधी घेऊन येऊ?"
मी जेंव्हा तिला कल्पना
दिली कि संस्था म्हणून आम्ही ह्या केसमध्ये फारसं काही करू शकणार नाही तेंव्हा
तिने विनंती केली, "हेमा,माझी मैत्रीण म्हणून त्याच्याशी बोलशील का? शारदाला
बर वाटेल." आणि अश्या तर्ह्रेनी मी अनिकेतची केस, दोस्तीखातर, एक चेलेंज
म्हणून स्वीकारली. १५ दिवसातून किंवा महिन्यातून एकदा गरजेप्रमाणे अनिकेतला
त्याच्या घरी कौन्सेलिंग करायचं ठरवलं.
पहिले तीन महिने अनिकेत
गप्पच होता. शारदा माहिती सांगत होती आणि तो ऐकत होता. (शिवानीचा उल्लेख आला कि
अस्वस्थ व्हायचा) ती म्हणाली, "बरीच वर्षं मुलांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती
की, आम्ही मोठ्यांनी त्यांचं लग्न लाऊन द्यायचं ठरवलं आहे. शिवानी आमच्या घरी
यायची आणि अनिकेत त्यांच्या घरी जायचा. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. अनिकेतच
अभ्यासात डोकं चालत नव्हतं. तो जेमतेम १२ वी पर्यंत शिकला. शिक्षण चालू असतानाच
वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागला. शिवानी हुशार होती. (आहे) आम्हाला तिच्या
हुशारीचं खूप कौतुक होतं. १० वी १२ वीत वर्गात पहिली आली. अनिकेतनी तिला हॉटेलात
पार्टी दिली. मी तिच्यासाठी कौतुकानी भारीतला ड्रेस आणला आणि देत म्हणाले, 'शिवानी
आम्हाला तुझा अभिमान आहे. मालतीताई बघितलत का आमची सून कशी हुशार आहे! लाखात एक
आहे.' हे ऐकल्यावर शिवानी थोडी गोंधळली आणि आश्चर्यानी माझ्याकडे बघत राहिली.
तेंव्हा मालतीताई म्हणाल्या, "अग वेडाबाई, तू १८चि झालीस कि तुझं आणि अनिकेतच
लग्न लावायचं आम्ही ठरवलं आहे. तेंव्हा आतापासूनच शारदाताईना आई म्हणून हाक
मारायची सवय कर."
त्या दिवशी शिवानी काहीच
बोलली नाही. तिने आई समोर मला वाकून नमस्कार केला. तिथून पुढे आधीसारखी आमच्या घरी
येत राहिली. आमच्या घरातील कार्यक्रमात सहभागी व्हायची, मला कामात मदत करू
लागायची. अनिकेत बरोबर खरेदी करायला, फिरायला जात होती. असं वाटत होतं दोघं खुश
आहेत. एवढंच नाही तर त्या काळात माझा पाय मुरगळला तर ८ दिवस आमच्या घरी जेऊन
स्वैपाक केला, माझी सेवा केली.
आमचं दोन मजली घर आहे. मी
विचार केला, लग्नानंतर अनिकेत आणि शिवानी वरती रहातील. मला त्यांची सोबत पण होईल
आणि त्यांना त्यांची प्रायवसी पण मिळेल. लग्नाची तारीख निश्चित केल्यावर मी वरच्या
मजल्याच काम करून घेतलं. खोल्यांच्या रंगापासून ते कुठल्या खोलीत काय कुठे असावं
ह्या सगळ्यात शिवानिनी उत्साहानी भाग घेतला. लग्नाची पत्रिका, त्याचा मजकूर
ठरवायला, लग्नाची खरेदी करायला ती पूर्ण वेळ माझ्या आणि अनिकेतच्या बरोबर होती.
कार्यालय ठरवायला आणि लग्नाच्या पत्रिका वाटायला ती आमच्या सोबत होती.
उद्यावर लग्न आलेलं. घरात
अनिकेतचे मित्र आणि नातेवाईकांची गर्दी. सगळ्याचं आवरून झोपायला जायला दोन वाजले.
झोप लागते न लागते तो मालतीताईचा फोन आला. घड्याळात पाहिलं तर पहाटेचे ५.३० वाजले
होते. मनात आल 'मालतीताईना मुलीच्या लग्नाची माझ्यापेक्षा जास्त घाई झालेली
दिसतीये.' मी काही बोलणार तो तिकडून मालतीताई रडवेल्या आवाजात सांगत होत्या, "शारदाताई,
शिवानी घर सोडून पळून गेली आहे. तिला उठवायला गेले तर अंथरुणात शिवानी नाही.
पलंगावर एक चिट्ठी होती. त्यात लिहिलाय, 'आई-बाबा, मी आज १८ वर्षांची झाले आहे. मी
कायमची घर सोडून जात आहे. मी आणि राहुल, आम्ही लग्न करणार आहोत. राहुल आणि मी
एक-मेकांना दोन वर्षांपासून ओळखतो. अनिकेत चांगला मुलगा आहे. बट नॉट माय टाईप!
काकु पण खूप जीव लावतात. मी अशी अचानक निघून गेल्यानी तुम्हाला सगळ्यांना खूप
त्रास होईल. मला कळतंय. पण मी काय करू? माझा नाईलाज आहे. अनिकेतशी लग्न करून
आयुष्यभर दुखी होण्यापेक्षा मी हा मार्ग स्वीकारला. जमलं तर मला माफ करा."
अनिकेत आमच्यात चाललेलं
बोलणं ऐकत होता. "पण माझं काय चुकलं? शिवानी माझ्याशी असं का वागली? दर
वेळेला आम्ही बाहेर जायचो तेंव्हा मी सगळं तिच्या मनासारखं वागायचो. ती म्हणेल
तसं. ती म्हणाली हॉटेलात जाऊया तर तसं, कशाला नाही म्हणाली तर तसं. आता आठवतंय
आम्ही नेहेमी एकाच बागेत किंवा हॉटेलात जायचो. एक दोनदा आम्हाला राहुल भेटला होता.
तिने त्याची ओळख, 'माझ्या कॉलेज मधला बेस्ट फ्रेंड' अशी करून दिली होती. माझ्या
मनात कधीच शंका आली नाही. मनात शंका येण्याचं काही कारण पण नव्हतं. तिच्या
वागण्या-बोलण्यातून ती खुश आहे असं मला वाटत होतं. तिला मी आवडतच नव्हतो तर तिने
मला तसं का नाही सांगितलं? ते पचवणं सोपं गेलं असत. पण माझ्या आयुष्याचा हा असा
खेळ करायला नको होता. मी पुन्हा कोणावर...."
बोलता-बोलता तो अचानक लहान
मुलासारखा रडायला लागला. आम्ही आमचं बोलणं थांबवलं. आता मला नेमकं काय घडलं ह्याचा
अंदाज आला होता. एक-दोनदा मी त्याला सांगायचा प्रयत्न केला कि 'शिवानी वागली ते
चुकीचच आहे. पण हे सगळं सांगायची तिची हिम्मत झाली नसेल. आणि दुसरं महत्वाचं
म्हणजे लग्नानंतर ती सोडून गेली असती तर त्याचा त्रास जास्त झाला असता.' एक गोष्ट
मला जाणवत होती. अनिकेतला हे कळत होतं पण मन मान्य करायला तयार नव्हतं.
त्या दिवसानंतर मी अनिकेतला
बरेच वेळा भेटले पण दर वेळेस शिवानीचा विषय कटाक्षाने टाळला. त्याच्या आवडीच्या
विषयावर- खेळ, बिझिनेस इ. बोलायचो. त्यांनी खेळात मिळवलेल्या मेडल्स बद्दल बोलताना
तो खुश व्हायचा. तेंव्हाचे अनुभव सांगतांना रमून जायचा. त्याच्या आयुष्यात
शिवानीच्या व्यतिरिक्त इतर विषयांना पण स्थान मिळू लागलं. त्याचं हरवलेपण कमी
झालं. डिप्रेशन मधून तो हळू-हळू बाहेर येत होता. तरीपण तो अधून-मधून शिवानीचा विषय
काढायचा, पण तिच्या बद्दल बोलताना, तिच्या बद्दलचा राग, तिच्या वागण्यातून झालेल्या वेदना ह्याची
तीव्रता कमी होत होती. हे मला आणि त्याच्या आईला जाणवत होतं. तो हळूहळू नॉर्मल होत
होता. ह्या सगळ्या प्रोसेसला एक वर्षं लागलं.
लग्न ज्या प्रकारे मोडलं
त्याच्या धक्क्यातून तो पूर्णपणे सावरला आणि स्वतःच आयुष्य पूर्ववत जगायला लागला.
तो आणि शारदा, सारिकाला घेऊन, साधारण दिडेक वर्षांनी मला घरी भेटायला आले. अनिकेतच
सारीकाशी लग्न झाल्याची बातमी मला मंजुकडून समजलीच होती. मी लग्नाला जाऊ शकले नाही
म्हणून आवर्जून भेटायला आले होते. सगळ्यांचे आनंदी चेहेरे बघून खूप समाधान वाटलं!