मनीषा, एक ३६-३७ वयाची महिला! साधारण सहा
महिन्यापूर्वी आमच्या कार्यालयात आली. कष्ट करून आयुष्य जगणारी. बेताची परिस्थिती असावी.
अंगावर नेसलेली साडी जुनी, वापरून जुनी झालेली होती, पण तिच्या कडे जे काही होतं
त्यात ती व्यवस्थित रहाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की एरवी
ताठ मानेनी जगणारी, जगाला टक्कर देण्याची हिम्मत असलेली आज कशानी तरी खचल्यासारखी,
गोंधळल्यासारखी झाली आहे की काय? ती ऑफिसमधे आली ती थेट आमच्या समोर येऊन बसत
म्हणाली, “ताई, मी मनीषा. माझे वडील मला माझ्या घराबाहेर निघ म्हणतात. मी काय करू?
कुठे जाऊ? ताई, मी माझ्या मुलांना सोडून कशी जगू? तुम्ही प्लीज मला मदत करा.”
“मनीषा, तू आधी शांत हो. काय आणि कस घडलं ते
शांतपणे, सविस्तर सांग. तुला तुझे वडील घराबाहेर निघ म्हणतायत, तर तू मुलांना घेऊन
माहेरी, त्यांच्या घरात राहातीयेस का? तुझा नवरा कुठे आहे? त्याचं ह्या बद्दल काय
म्हणणं आहे? नीट सगळं सांग.”
“ताई, माझे आई-वडील कामाच्या शोधात नाशिकला आले
आणि इथेच राहिले. वडील कंपनीत नोकरी करायचे. आई चार घरची धुणी-भांडी करायची. दोघं
दिवसभर कामानिमित्त बाहेर रहायचे. माझं १०वि पर्यंतच शिक्षण वस्तीतल्या शाळेत
झालं. मला पुढे शिकायचं होतं. माझा हट्ट होता म्हणून वडिलांनी त्यांना परवडत
नसताना माझी कॉलेजमध्ये अडमिशन केली. ११वि च शिक्षण मजेत झाल. माझं वय वाढत होतं.
वस्तीतल्या मुलांच्या नजरा, त्याचं वागणं बदलत होत. हे आई-वडिलांना कळल तर काय
होईल? ते माझं शिक्षण बंद करतील का? ह्या भीतीने मी आई-वडिलांकडे ह्या संदर्भात
काहीच बोलले नाही. पण त्यांच्या कानावर गोष्टी येत होत्या. त्यांच्या मनात भीती
होती, ‘त्यांना माझ्या बद्दल खात्री होती पण एकाच गोष्टीची काळजी वाटत होती की, आपल्या
अपरोक्ष आपली मुलगी सुरक्षित राहील का?’
दोघांनी बराच विचार केला. दोघांपैकी कोणीही काम
सोडून घरी बसणं परवडणार नव्हतं. मग काय? त्यांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. २५
वर्षांचा महेश, वडिलांच्या कंपनीत नोकरी करत होता. तो अनाथ होता, निर्व्यसनी होता,
कष्टाळू होता! कुणाशी कधी वाद नाही की भांडण नाही. तो बरा आणि त्याचं आयुष्य बर!
मागील ५-७ वर्ष वडिलांच्या बरोबर काम करत होता, परिचयाचा होता. ह्यापेक्षा
स्थळाकडून जास्त, माझ्या आई-वडिलांच्या, अपेक्षा पण नव्हत्या. एक दिवस वडिलांनी
महेशला घरी जेवायला बोलावलं. (तसं वडील त्याला अधून-मधून सणासुदीला जेवायला घरी
बोलवत असत.) जेवणं झाल्यावर वडिलांनी सरळच मनातला विषय मांडला. महेश साठी ते थोडं
अनपेक्षित होतं. तो थोडा गोंधळला पण स्वतःला सावरत म्हणाला, “दादा, मनीषा बरोबर
लग्न करून तुमच्याशी इतकं जवळचं नातं जोडलं गेलं तर मला आनंदच होईल. पण माझी एक अडचण
आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी अनाथ आहे. माझ्या बाजूनी लग्नाची बोलणी करायला,
लग्नानंतर मनीषाच कौतुक करायला कोणी नाही. शिवाय लग्नाचा खर्च मला झेपेल का? हा पण
एक प्रश्नच आहे.”
मोहनचा लग्नाला होकार आहे हे समजल्यावर
मनीषाच्या वडिलांना पण बर वाटलं. लग्न घरच्या-घरी, साधेपणानी करायचं ठरलं.
सर्वांच्या सोईचा दिवस मुहूर्त म्हणून निश्चित केला. वडिलांच्या कंपनीतील ७-८ जण आणि
आम्ही घरातील व शेजारी मिळून ८-१० जण. असं २० एक लोकांच्या साक्षीने माझं लग्न
झालं. एका महिन्यापूर्वी १२वि नंतर काय शिकायचं ह्याची स्वप्नं बघणारी मी, अचानक
मोहनची बायको झाले, त्याच्या घरी आले आणि संसाराला लागले.
मोहनचा स्वभाव चांगला होता. निर्व्यसनी,
समजूतदार. कामात व इतर गोष्टीत मदत करायला तैयार! त्याचं जे उत्पन्न होतं त्यात
जमेल तशी माझी हौस भागवायचा. सुरवातीला वडिलांनी, ‘मनीषा आमची एकुलती एक मुलगी.
आम्ही इकडे दोघंच असतो व तुम्ही पण दोघंच. त्यात मनीषाला घरकामाची फारशी सवय नाही.
तुम्हाला सोयीचं असेल आणि तुमची हरकत नसेल तर तुम्ही दोघं आमच्या घरात शिफ्ट व्हा’,
असं सुचवून पाहिलं.
पण मोहनला हे मान्य नव्हतं. त्यांनी
ठरवल्याप्रमाणे आम्ही तो रहात होता त्याच खोलीत रहायला लागलो. दिवस मजेत चालले
होते. काटकसर आणि कष्ट माझ्यासाठी काय आणि महेश साठी पण काही नवे नव्हते. स्वतःच,
दोन खोल्यांचं का होईना पण आपलं हक्काच एक घर असावं, असं त्याचं आयुष्याचं स्वप्नं
होतं. त्यांनी पैसे साठवायला सुरुवात केलीच होती. दोघांनी त्यासाठी मेहेनत करायची
ठरवली. लग्नाला २-४ महिने झाले आणि मी पण चार घरची काम करायला लागले. चार पैसे
बाजूला पडू लागले. लहान मुलं गुल्लक मधील जमा जशी शंभर वेळा मोजतात, तसं आम्ही पण
दर १५ दिवसांनी पैसे मोजायला लागलो.
लग्ना नंतर दीड एक वर्षात माधवचा जन्म झाला आणि
त्यानंतर साधारण वर्षाभरांनी माधुरीचा! माधवच्या पाचव्या वाढदिवसाला आम्ही, काही
साठवलेले पैसे भरून व बाकीचं बँकेकडून कर्ज घेऊन, एक रो-हाउस बूक केलं. ३-३.५ वर्षात आम्हाला त्याचा ताबा मिळाल्यावर आम्ही तिथे शिफ्ट
झालो. अखेरीस स्वतःच घर झालं. खूप आनंद झाला. आमचं कौतुक करायला आई-वडील भेटायला व
आठ दिवस रहायला आले.
आमच्या सुखाला
कोणाची तरी नजर लागली बहुतेक. पुढे वर्षभरात माझ्या आईचं निधन झालं. आई गेल्याने माझे वडील अगदी पार खचून गेले.
त्यांनी कामावर जाण बंद केलं. दिवसच्या दिवस एकटे घरात बसून रहायला लागले. रोज
त्यांना जेवणाचा डबा पाठवणं आणि त्यांची विचारपूस करणं जिकिरीच होत होतं. आम्ही
त्यांना, ‘तिकडे एकटे राहू नका’ असं म्हणायचाच अवकाश होता. ते लगेचच आमच्या कडे
रहायला आले. सर्व सुरळीत चाललं होतं. मोहनच्या नोकरीतून आणि माझ्या कामातून आमचं
जेमतेम भागत होतं. मुलांचं शिक्षण, पाहुणे, रोजचा पाच जणांचा खर्च, बँकेचे हप्ते,
सगळं मिळून ओढाताण होत होती. मुलानापण ते बहुदा समजत असाव. त्यांनी कधी कशासाठी
हट्ट केला नाही. किंवा कधी वायफळ खर्च केला नाही. जमा-खर्चाचा ताळमेळ बसावा म्हणून
मोहनने कारखान्यातील असेम्ब्ली च काम घरी आणायला सुरुवात केली. पुढे वर्ष-दोन वर्ष
बरी गेली. एक दिवस मोहनला झोपेतच attack आला!
मोहनच्या निधनानंतर
मात्र मी पार खचून, गोंधळून गेले. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर आली
होती. हि मी कशी पेलणार होते? मुलाचं शिक्षण व त्यावरील वाढता खर्च, आमच्या
जगण्यावर, जेवण्या खाण्यावर होणारा खर्च मी कशातून भागवणार होते? हे घर, हा डोलारा
मी एकटी, माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात कसा सांभाळणार होते? घरात दुखः करत, रडत
बसून भागणार नव्हतं. मी माझी सर्व दुखः बाजूला सारून कंपनीतील साहेबाना जाऊन भेटले
आणि ‘मला काहीतरी काम द्या’ अशी विनंती केली. त्यांचा ८ दिवसात होकारार्थी निरोप
आला. मोहनला जाऊन दोन महिने पूर्ण होण्या आधीच मी कंपनीत कामाला लागले. चार घरची
काम करून महिन्याला मिळणार्या पगारापेक्षा कंपनीत मिळणारा पगार खूप जास्त होता.
त्यानी आमची आर्थिक गणितं सुटायला लागली. हे जरी खरं असलं तरी माझी खूप धावपळ होऊ लागली. घरकामाला वेळेची मर्यादा
नसते. १० मिनिटं उशीर झाला म्हणून कामवाल्या बायकांनी कधी कटकट केली नाही. किंवा
पगार कापला नाही. कंपनीत तसं नव्हतं. एक मिनिट पण उशीर झालेला चालत नसे. घरातील
काम, स्वैपाक, बसचा प्रवास व त्यासाठी बस-स्टोप पर्यंत करावी लागणारी पायपीट, आणि
कंपनीतील कष्टाची काम! सगळ्यांनी जीव दमून जायचा.
त्या काळात संजय मला
देवासारखा भेटला. एक दिवस मी बसची वाट बघत उभी होते तेंव्हा तो मोटर-सायकल वरून
आला आणि म्हणाला, “म्याडम, तुम्हाला घरी सोडू का? मी तुमच्या घरापाशीच रहातो.
तुमच्या पुढच्या कंपनीत कामाला आहे. मी तुम्हाला रोज बघतो.”
हो-नाही म्हणत मी
त्याच्या मागे त्याच्या गाडीवर बसून घरी आले. त्यांनी मला घराच्या कोपर्यावर
सोडलं. रोजच्या पेक्षा अर्धा तास मी लवकर घरी पोहोचले. घरात शिरतानाच वडिलांनी
विचारलं,” काय ग मनीषा, बस लवकर मिळाली वाटतं?” मी होकारार्थी मान हलवली आणि
कामाला लागले.
हे असं वरचेवर घडू
लागलं. मला पण संजयच्या येण्याची, त्याला भेटण्याची, त्याच्याशी चार गोष्टी
बोलण्याची सवय व्हायला लागली. बर वाटत होतं. समवयस्क पुरुषाशी बोलण्याचा, काही
गोष्टीत त्याचा सल्ला घेण्याचा अनुभव नवीन होता, पण सुखद पण होता. आपली जबाबदारी
कोणीतरी वाटून घेताय असं वाटायला लागलं. माझं हे असं रुटीन बर चालल होतं. एक दिवस
माधव घरी आला आणि मला जाब विचारल्याच्या आवाजात म्हणाला, “आई तू रोज कामावरून घरी
कोणा बरोबर येतेस? कोण आहे तो माणूस? आणि आता नाही म्हणून खोटं बोलू नकोस. माझ्या
मित्रांनी तुला पाहिलं आहे, त्या माणसाच्या गाडीवरून उतरताना!”
माधवनी अचानक
विचारलेल्या प्रश्नानी मी थोडी गोंधळून
गेले. मी पहिलं जे मनात आल ते सांगितलं. “त्याचं नाव संजय आहे. तो माझ्या
कंपनीतल्या मैत्रिणीचा भाऊ आहे. आणि आजच मला सोडायला आला होता. रोज काही येत नाही.”
“आणि काय रे माधव, तू आईला जाब विचारण्या इतका मोठा कधी झालास?”
इतका वेळ शांत
बसलेले वडील माधवची बाजू घेत म्हणाले, “हे बघ मनीषा, माधवनी विचारलेला प्रश्न
चुकीचा नाहीये. मागच्याच आठवड्यात कोपर्यावरचा वाणी मला देखील विचारत होता, ‘काका तुमच्या
मनीषाला हल्ली खूप वेळा कोणाच्यातरी गाडीवर बसून येताना बघितलं. आता ह्या वयात
तिचं दुसरं लग्न लाऊन द्यायचा विचार-बिचार नाही ना? मी आपलं सहज विचारलं. असलाच
विचार तर आम्हाला बोलवायला विसरू नका.’ असं म्हणत तो कुचेष्टेनी हसला.”
माधव लगेच म्हणाला,
“आई, म्हणजे माझे मित्र म्हणत होते ते खरं आहे तर. माझे मित्र मला त्यावरून हसतात.
आजपासून तू त्या माणसा बरोबर यायचं नाही. आणि यायचं असेल तर ह्या घरात राहायचं
नाही. तुझं हे असं वागणं चालणार नाही.”
त्या दिवशी सगळेच
खूप चिडलेले होते, म्हणून मी काहीच बोलले नाही. पण हे अलीकडे वरचेवर होतंय. आज तर
माधवनी सगळ्याची परिसीमाच गाठली, “त्यांनी मला जवळ जवळ हाताला धरून घराच्या बाहेर
काढलं.”
मनीषा बोलायची
थांबली. थोडं पाणी प्यायली आणि म्हणाली, “ताई, मी काय करू? कुठे जाऊ? कशी राहू?
मला काही समजत नाहीये. मला प्लीज मदत करा.”
तिच्याशी बोलताना
असं समजलं की ते रहात असलेलं घर तिच्या आणि मोहनच्या नावावर होतं. ह्याचा अर्थ
तिचा त्या घरावर मालकी हक्क आहे. मोहनच्या निधनानंतर मुलांचा पण त्या घरावर हक्क
आहे. तिने आमच्याकडे लेखी तक्रार दिली. त्याच्या आधारे आम्ही तिच्या वडिलांना आणि
माधवला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं, आणि त्यांना कल्पना दिली की, “मनीषाला घराबाहेर
काढायचा त्यांना अधिकार नाही. त्या दोघांनी तसं करू नये.”
ठरल्याप्रमाणे ८
दिवसांनी माधव त्याच्या आजोबाना घेऊन आला. मनीषा थोडी उशिरा आली. ती कंपनीतून
परस्पर आली होती. तिच्या बरोबर संजय पण होता, पण तो बाहेर थांबला होता. माधवनी
बोलायला सुरुवात केली,”म्याडम, मला, माझ्या आई-वडिलांनी आमच्या साठी काय केलाय,
किती कष्ट उपसले आहेत, ह्याची चांगलीच कल्पना आहे. मी माझ्या आईला देवा समान
मानतो. पण तिने ह्या माणसा बरोबर गाडीवर बसून घरी येणं थांबवावं. गल्लीतले लोक
तिच्या बद्दल खूप विचित्र बोलतात. ते ऐकवत नाही. माझे मित्र माझी चेष्टा करतात.
माधुरीला काय ऐकावं लागत असेल, तिचं तिलाच ठाऊक. तिने ह्याबद्दल कधी एक अवाक्षर पण
काढल नाही. पण तिच्या समोर काहीतरी बोललं जातच असेल. ताई आम्हाला ह्या गोष्टींचा
त्रास होतो. आमचं बाकी काही म्हणणं नाही. आईनी बाहेर जावं, नोकरी करावी, चार पैसे
कमवावेत आणि तिचं आयुष्य सुखात जगावं. पण हि व्यक्ती तिच्या आयुष्यातून जायला हवी.
त्याचं नाव आमच्या आईशी जोडलेलं चालणार नाही. त्या व्यक्तीला सोडून आई यायला तयार
असेल तर तिला आम्ही आज पण घरात घ्यायला तयार आहोत.”
“माधव, तुझा थोडा
गैरसमज होतो आहे. तू तुझ्या आईला त्या घरात राहण्याची परवानगी देणारा कोण? घर
आईच्या आणि तुझ्या वडिलांच्या नावावर आहे. मनीषाने त्या व्यक्तीसोबत यावं की नाही,
तिच्या अश्या वागण्याने तुम्हाला होणारा मानसिक त्रास, तुमची होणारी बदनामी हे मी
समजू शकते. ह्याबद्दल चर्चा करायलाच तुम्हाला बोलावलं आहे. मला सांग, तुझ्या आईनी
काम करून चार पैसे कमवण्याची तुमची गरज आहे. घरातली सगळी काम, प्रवासाची दगदग,
कंपनीत करावं लागणारं कष्टाचं काम, ह्या सगळ्यांनी ती दमून जाते. ह्या सगळ्यात तू
तिची काय व कशी मदत करू शकशील? असा विचार करूया. घर कामात मदत करशील का? घरातील
स्वच्छता, कपडे धुवायचे, भांडी घासायची, अशी मदत? तू आणि तुझी बहिण, दोघं मिळून घर
सांभाळा आणि ती नोकरी करेल. चालेल का? गाडीवर बसून येणं हि तिची चैन नसून, लफडं
नसून, एक गरज असू शकेल का? वेळ आणि दगदग वाचवण्यासाठी?”
ह्यावर माधव पटकन
म्हणाला,”ताई, माधुरी यंदा १२ वीत आहे. तिने अभ्यासच करायला हवा. तुम्ही म्हणता
तशी मी जर घरातील काम केली तर माझे मित्र माझ्यावर हसतील. माझी चेष्टा करतील.
खिल्ली उडवतील. मला जगू देणार नाहीत. मी घरात काम करायचा काही संबंधच नाही. मी पण
नोकरी शोधतोय. मिळाली की लावीन घरखर्चात हातभार! आम्ही काम केलं किंवा नाही केलं
तरी तिला असं जगायचा काय अधिकार? आणि हा तिला कोणी दिला? महत्वाचं म्हणजे तिने
त्याच्या सोबत येणं बंद करावं.”
इतका वेळ सगळं
शांतपणे मनीषा ऐकत होती. ती म्हणाली, “ठीक आहे. आज पासून मी नाही येणार त्याच्या
सोबत. पण घरातील काम मला जेवढ आणि जसं जमेल तसं मी करीन. मलाही हे एकटीने रेटण बास
झालाय.”
त्यानंतर जवळ जवळ ३-४
महिने सगळं शांत होतं. एक दिवस अचानक माधवचा फोन आला,” ताई, माझ्या आईला काहीतरी
समजावून सांगा ना. ती अजून त्या माणसा बरोबर फिरते. त्याचा माझ्या आईशी काय संबंध?
त्या दोघांनी ह्याचा खुलासा करावा. त्या दिवसानंतर तिचं घरातील वागणंच बदललाय. घरात
फारसं लक्ष देत नाही. घरी वेळेवर येत नाही. आणि फारसं कोणाशी बोलत देखील नाही.”
आम्ही फोन करून
मनीषा आणि संजयला भेटायला बोलावलं. कंपनीतून ते दुसर्या दिवशी आले. मनीषाच्या
बोलण्यातून हे जाणवत होतं की ‘संजय सोबत लग्न करायची तिची तयारी आहे. तयारी पेक्षा
इत्छा आहे. ह्यावर संजय उडवा-उडवीची उत्तरं द्यायला लागला. त्याच्या मते मनीषा
सोबत लग्न करण्याचा त्याने कधी विचार पण केला नव्हता. तो तिला कंपनीत
जाताना-येताना लिफ्ट द्यायचा, तिला फिरायला घेऊन जायचा, हे सर्व तिला बर वाटत होतं,
तिला आवडत होतं म्हणून. “एकट्या बाईसाठी आपली थोडी समाजसेवा.”
ह्यावर मनीषानी
त्याला आठवण करून दिली की आठच दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी लग्न करायच वचन दिलं
होतं. मग ते काय होतं?
संजय स्पष्ट काहीच
बोलत नव्हता. तो लग्नाला नकार पण देत नव्हता किंवा मोकळ्या मनाने मनीषा बद्दलच्या
त्याच्या भावना मान्य पण करत नव्हता.
त्या दिवशी काहीच
ठरलं नाही. १ महिन्यानी पुन्हा भेटायचं ठरलं. ह्या वेळेस मात्र संजयने त्याचं
म्हणणं स्पष्टच मांडल. तो म्हणाला, “माझी लग्न करायची तयारी आहे, पण लग्न करून आपण
रहाणार कुठे? रस्त्यावर? माझ्या खोलीचं आधीच दोन महिन्याचं भाडं थकलाय. ते मी देऊ
शकलो नाही तर ह्या महिना अखेरीस मला माझी रूम खाली करावी लागेल. मी तुला आधीच
सांगितलं होतं की लग्नानंतर तुझ्या घरात राहू. खरं तर घर तुझ्या नावावर आहे. तुझे
वडील आणि मुलं तिथे अजून किती दिवस रहाणार आहेत? एक तर त्यांनी बाहेर जावं नाहीतर
आपण सगळे तिथेच एकत्र राहू.”
“हे कसं शक्य आहे?
माधवला तर तू माझ्याशी बोललेपण आवडत नाही. माझे वडील तुला घरात राहू देणार नाहीत.
वडिलांची तब्येत आज-काल ठीक नसते. त्यांच्या अश्या अवस्थेत मी त्यांना घरातून जा
नाही म्हणू शकणार. माधुरीचं शिक्षण पूर्ण व्हायला ६ महिने शिल्लक आहेत. ते झालं की
तिचं लग्न लाऊन तिची सासरी पाठवणी केली की मग आपण माधवशी हे बोलूया. आपण तुझ्या
खोलीचं भाडं भरून तिथे राहू शकतो ना? तू तसा विचार करून बघ ना?” असं मनीषाने बारीक
आवाजात सुचवून पाहिलं.
“हे बघ मनीषा, आपण
लग्न केलं तर तुझ्याच घरात राहू. ते कसं मेनेज करायचं ते तू बघ. त्या घरावर तुझाच
तर हक्क आहे. मग प्रोब्लेम कुठे आहे?” असं म्हणत संजय जायला उठला.
त्या दिवशी त्याला
आम्ही सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला की त्या घरावर मनीषाचा जितका हक्क आहे
तितकाच तिच्या मुलांचा पण आहे. आणि वडिलांना संभाळण तिची जबाबदारी आहे. तेंव्हा ती
त्यांना घराबाहेर काढू शकत नाही.
“म्याडम, मनीषा नी
काय करायचं हे तिने ठरवावं. मी माझी अडचण सांगितली. अजून एक मार्ग निघू शकतो, घर
विकून आपापल्या हिश्याचे पैसे घेऊन मोकळे होऊ दे.”
पुन्हा काही निर्णय
होऊ शकला नाही. पण ह्या वेळेस मात्र मनीषा म्हणाली, “ताई मलाच ह्यातून काहीतरी
मार्ग काढावा लागेल, हे माझ्या लक्षात येतंय. मी सगळ्यांशी मोकळी चर्चा करते आणि
काय ठरतंय ते ८ दिवसात कळवते.
८ दिवसाचा महिना
होऊन गेला तरी मनीषा चा काही निरोप आला नाही म्हणून चौकशी केली तर समजलं की तिच्या
वडिलांचं १५ दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.
पुढे एका महिन्यानी
मनीषा आणि माधव ऑफिस मधे आले. मनीषा संजय सोबत लग्न करणार हे माधवला समजलं होतं.
आता प्रश्न घराचा होता. तो कसा सोडवायचा ह्यासाठी दोघं ऑफिसमधे आले होते. दोघं
आपापल्या मतांवर, मुद्द्यांवर ठाम होते. माधवच स्पष्ट म्हणणं होतं की, हे त्याच्या
आईचं आयुष्य आहे. तिला कसं जगायचं ते तिचं तिने ठरवावं. पण संजयशी लग्न केल्यावर
तिने त्यांच्या बरोबर रहाता काम नये. संजय त्या घरात आलेला चालणार नाही. आणि
दुसरं, संजयशी लग्न केलं तर तिचा आमच्याशी काहीही संबंध रहाणार नाही. माधुरीचं
लग्न लावायची जबाबदारी एक भाऊ ह्या नात्याने तो, माधव घेणार. सर्वात महत्वाचं,
कुठल्याच परिस्थितीत घर विकायचं नाही. ह्यावर मनीषा म्हणाली, “मी आणि संजय लग्न
करणार आहोत. माधुरीची जबाबदारी तिचे पालक ह्या नात्याने आम्ही घेऊ. घर विकून
आपापला हिस्सा घेणं माधवला मान्य नसेल तर नाईलाजाने आम्हाला त्या घरात राहावं
लागेल. त्या संदर्भात जे काही लिहून घ्यायचं ते लिहून घ्या.”
हि सगळी चर्चा संजय ऑफिसच्या
दारात उभा राहून ऐकत होता.
ऑफिसमधील
चर्चा जसजशी तापायला लागली तसा तो ऑफिसमधे आला आणि म्हणाला, “मला काय वाटतं
म्याडम, एवढा वाद घालण्यापेक्षा, दोघांना सांगा, घर विकून मोकळं व्हा आणि आपापली
आयुष्य सुखानी जगा. त्याला बघितल्यावर
माधव आईला उद्देशून चिडून म्हणाला, “हा माणूस इथे काय करतोय? आई, हा तुझा यार असेल,
लफडं असेल. तुमच्या दोघांमधलं नातं काय आहे हे समजून घेण्याची माझी इत्छा नाही. तो
तुला पुढे करून, तुझ्या भावनांशी खेळून स्वतःचा फायदा करून घेतोय. हे तुला समजत
कसं नाहीये? पण जाऊ दे. ते बोलायची वेळ निघून गेली आहे. घर विकायचं नाही आणि हि
व्यक्ती आमच्या घरात नको, हे फायनल!”
“घर विकायचं नसेल तर
लग्नानंतर मी आणि संजय त्याच घरात रहाणार हे माझं पण ठरलाय.”
दोघांना समजवायचा
खूप प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. हा प्रश्न सोडवण्याचे दोनच मार्ग
आहेत. समजुतीने एकत्र रहा. किंवा समजुतीने घराची वाटणी करा. नाहीतर कोर्टात जाऊन
केस दाखल करून आपला हाच हक्क कायद्याच्या मदतीने मिळवा.
त्या दिवशी सगळे निघून
गेले. त्यानंतर मनीषा आणि संजयनी, ठरल्या प्रमाणे लग्न केलं आणि ते मनीषाच्या घरी
रहायला गेले. अपेक्षेप्रमाणे माधव आणि संजय मधे खूप बाचाबाची आणि मारामारी झाली.
दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशन मधे तक्रार केली. पोलिसांनी दोघांना
समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही दिला तोच सल्ला दिला. त्यांना तो मान्य नव्हता.
माधव आणि संजय मधे भांडणं होतंच राहिली. कालांतरानी पोलिसांनी पण दखल घेणं सोडून
दिलं. आज दोघांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. कोर्टातल्या चकरा आणि वकिलाचा खर्च
ह्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडला नाहीये.
आजच्या घडीला एकच
सुधारणा झाली आहे की आई आणि मुलगा यांच्यात ते घर विकून येणारे पैसे वाटून घ्यावेत
असं ठरलंय.आता पुढचा वादाचा मुद्दा आहे कोणाला किती हिस्सा मिळणार हा!
एकूण काय मोहननी
कष्टानी घर बांधलं खरं, पण ना त्याला त्याचा फार काळ उपभोग घेता आला नाही. ना
त्याच्या कुटुंबाला ते सांभाळता आल ना उपभोगता! मनिषाने स्वतः कष्ट करून
बांधलेल्या घराचं काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी तिच्या आयुष्यातले दोन पुरुष
एकमेकांशी भांडत होते. कारण बाईला कमावण्याचा अधिकार जरी मिळालेला असला तरी खर्च
करण्याचा अधिकार मात्र अजूनही फार दूर आहे.