Sunday, 15 July 2012

"स्त्रीभ्रूण हत्येवर खुनाचाच गुन्हा" अशी कायद्यात तरतूद केल्याने काय होईल?

"स्त्रीभ्रूण हत्येवर खुनाचाच गुन्हा" अश्या मथाल्याची बातमी ११ जुलाई २०१२ रोजीच्या बहुतांश वर्तमान पत्रांच्या फ्रंट पेजवर झळकली. स्त्रीभ्रूण हत्या व मुलींचे घटते प्रमाण हि खरच चिंतेची बाब आहे. "PCPNDT ह्या कायद्यानुसार गर्भलिंग चाचणीसाठी मदत किवा त्यासाठी आईवडिलांना प्रोत्साहित करण्याचा आरोप सिद्ध झाल्यास डॉक्टर किवा संबंधित रेडीओलोजिस्तला पाच वर्षे कारावास आणि ५००००/- रुपये दंडाची तरतूद आहे!" शिक्षा बरीच आहे,गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे,कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं अपेक्षित आहे व ते गरजेचे आहे. कायदा १४ फेब्रुवारी २००३ मध्ये संमत झाला, पण आज देखील गर्भलिंग निदान चाचणी केली जाते, गर्भपात केले जातात, स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, पण फारसं कुणीच पुढे येऊन संबंधित व्यक्ती बदल तक्रार करत नाहीये! का? आता राज्य सरकार," स्त्रीभ्रूण हत्या करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्ति किवा प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध भादवी च्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद करावी" अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे.
अशी कायद्यात तरतूद केल्याने काय होईल? आपल्या कडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पुरुष प्रधान संस्कृतीचे समाजातील अनेक घटकांवर परिणाम झालेले आहेत. आजही आपल्या समाजात ९०% हून अधिक महिला (जन्माला आल्यापासून मरेपर्यंत) पुरुषांवर अवलंबून आहेत. मग ते मानसिक आधारासाठी असेल, भावनिक आधारासाठी असेल किवा कौटुंबिक व आर्थिक बाबीं बद्दल असेल. अशी महिला आपल्या नवऱ्या विरुद्ध सासरच्या मंडळीं विरुद्ध तक्रार करेल का? आणि समजा काही महिलांनी अशी तक्रार केलीच तर तिचा त्या नंतर संसार टिकेल का? माहेरी किवा सासरी तिला कुणी आसरा देईल का? भादवी कलम ४९८अ नुसार तिने सासरी होणाऱ्या शारीरिक किवा मानसिक त्रासाबद्दल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली तर तिच्या आयुष्यात पाहिलं काय घडतं- तर सासरचे दरवाजे बंद होतात! तिचं नशीब चांगलं असेल तर माहेरची मानसं साथ देतात. लग्न मोडतं! तिच्या उरलेल्या आयुष्याची सोय व्हावी म्हणून नवऱ्याकडून मिळालेली (जर मिळाली तर) रक्कम माहेरची मानसं हक्कानी काढून घेतात. लग्नात झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून! उरलेलं आयुष्या ती माहेरी आश्रिता सारखं जगते!
समाजाची मानसिकता, महिलांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन, घरातून मुलींवर होणारे संस्कार, अडचणीत सापडलेल्या महिला व मुलींसाठी शासना तर्फे चालविली जाणारी निवारा केंद्रे( ज्यांची फारशी माहिती कुणाला नाही आणि त्यांची संख्या देखील पुरेशी नाही)- ह्या सर्व बाबी लक्षात घेता मला असं वाटतं कि महिलांसाठीच्या कायद्यात वाढ करण्याबरोबर व सुधारणा करण्याबरोबरच प्रत्येक मुलीला व महिलेला सक्षम बनवणं गरजेचं आहे निर्भय होण्यासाठी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता अंगी येण्या साठी, स्वताच स्वाभिमान जपण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी!  

Sunday, 17 June 2012

आमची चार धाम यात्रा

आमच्या बद्दल थोडक्यात!
महिला हक्क संरक्षण समिती हि एक सामाजिक संस्था आहे. ती १९८२ साला पासून नाशिक जिल्ह्यात कौटुंबिक प्रश्नांवर काम करते. संस्था अनेक उपक्रम राबविते. त्यातील एक उपक्रम म्हणजे उद्योगकेंद्र! उद्योगकेंद्रात काम करणाऱ्या महिलांना, त्यांच्या दैनंदिन कष्टाच्या आयुष्यातून एक दिवस तरी मुक्ती मिळावी ह्या विचारांनी आम्ही एक दिवसाची सहल इथून सुरुवात केली. कधीही एकटी घराबाहेर, गावाबाहेर न पडलेली आमची कार्यकर्ती!  हळूहळू एक दिवस, दोन दिवस, चार दिवस करीत १५ दिवसांच्या सहलीत सहभागी होऊ लागली. आज पर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे, व गोवा ,दिल्ली, आग्रा,मथुरा,हरिद्वार, अमृतसर,श्रीनगर,बंगलोर, अशी अनेक ठिकाणं बघितली आहेत. ह्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. महत्वाचं त्या सक्षम होतात.
दिवाळी संपली,ऑफिस सुरू झालं आणि सर्वांनी सहलीचाच विषय लावून धरला- ताई, यंदाच्या वर्षी सहल काढायची ना? कुठे?कधी? खर्च किती?.....आमच्या कडे एक बरं असतं. हे सर्व प्रश्न एक औपचारिकता म्हणून मला विचारण्यात येतात.हा विषय चर्चेला घेण्यापूर्वीच यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बायकांनी  आधीच शोधून ठेवलेली असतात. माझ्याकडून फक्त होकाराची अपेक्षा असते. ह्या वेळेस देखील असंच झालं. मंदाताई नी सुरुवात केली,"ताई,ह्या वेळेस सर्व बायका चार धामला जाऊया असं म्हणतात. मिनाक्षीनी सर्व माहिती मिळविली आहे. १५ एप्रिल ते १५ जून हे यात्रा करायला सोयीचे व योग्य दिवस आहेत.आपण मे महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात जाऊया. १२ ते १५ हजाराच्या आसपास खर्च होईल........"
"ताई,आपण चार धामला जाणार असलो तर आपल्या बरोबर आमचे नातेवाईक आले तर चालतील का? जो खर्च होणार असेल तो ते देतील. माझी आई,मावशी व सासूबाई अशा तिघींना यायचं  आहे.त्यांना ही यात्रा करायचीच आहे." इति छाया.
मग काय!प्रत्येकाच्या घरातून कुणालानी  कुणाला यावसं वाटत होतं. कुणाची बहीण मेहुणे, कुणाची जाऊ,कुणाची मैत्रीण असं करत जवळचे लांबचे नातेवाईक असे करत ५० जणांच्या नावांची यादी झाली.त्यात संस्थेच्या १५ जणी, बाकी सर्व मेम्बर बाहेरचे! खरं सांगायचं तर मला आलं होतं  टेन्शन! डोंगराळ भाग,अवघड रस्ते,बर्फाळ  प्रदेश,अनोळखी ठिकाण आणि ५० जीवांची जबाबदारी!आपल्याचानी ही जबाबदारी व्यवस्थित पार पडेल का? मी आपलं बायकांचं मन वळवायचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाले,"आपण मागच्या  खेपेलापण हिमालयात गेलो होतो तर ह्या वेळेस राजस्थान हैदराबाद असं काहीतरी ठरवूया ." पण बायकांनी आधीच ठरवलं असल्या कारणाने मे २०१२ मध्ये चार धामला जायचं फायनल झालं आणि सर्व जणी आपापल्या परीने कामाला लागल्या. सहलीचा आराखडा तयार झाला. साधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ट्रीप निघेल. प्रत्येकी १५०००/- पर्यंत खर्च येईल . दोन्ही बाजूचा ए.सी. नेच प्रवास करायचा! (हा माझा आग्रह होता कि बायकांचा  प्रवास सुखाचा व्हायला हवा.)
ठरल्या प्रमाणे जानेवारीत सर्व कार्यकर्त्यांनी तिकिटाचे पैसे व येणाऱ्या नातेवाईकांची नावे ऑफिसमध्ये जमा केली. एकूण ४० जण येण्यास तयार होते. फेब्रुवारीत जाण्याचं व परतीचं रेल्वे reservation  करायचं ठरलं. एका फॉर्मवर ६ व्यक्तीचं तिकीट  मिळतं. ह्या प्रमाणे ७ जणी सकाळी ६ वाजताच तिकिटे काढायला पोहोचलो. जातानाचं काम व्यवस्थित झालं, पण परतीच्या तिकिटांचा गोंधळ झाला. आमचा रांगेत दुसरा तिसरा नंबर होता पण रीझेर्वेसोन क्लार्कनी डायरेक्ट ट्रेनची तिकीटा शिल्लक नाहीत असं सांगितलं. झालं! आता काय करायचं! नेलाजानी हरिद्वार-दिल्ली व दिल्ली नाशिक अशी तिकिटे काढली. तिकिटे हातात आली म्हणजे आपण नक्की जाणार. आता कार्यकर्त्यांचे प्लानिंग जोरात सुरु झालें सोबत न्यावयाच्या सामानाची यादी करणे, सामानाची जमवा जमव, नवीन कपडे शिवायला टाकणे, चाकांवाली ब्याग मिळविणे, तिथे लागणाऱ्या पैशांची जमवा जमव इ. गोष्टी सुरु झाल्या.  
बघता बघता ३ महिने भुर्रकन सरले. ज्या दिवसाची सर्व आतुरतेने वाट बघत होते तो दिवस १० मे २०१२ उजाडला! सकाळी ११.२७ ची ट्रेनची वेळ होती. सगळ्यांना स्टेशनवर १० लाच बोलावलं होतं. ५-१० मिनिटाच्या फरकानी सगळे पोहोचले. मोजकं सामान घ्या, स्वताच सामान स्वताला उचलायचा आहे हे लक्षात ठेऊन सामान घ्या, अशा सूचना देऊन सुद्धा काही उपयोग झालं नाही. ४० जण आणि लहान मोठे धरून १५० डाक! व सोडायला आलेले ४० नातेवाईक! त्यात मंगल नाशिकच्या बाहेर इतक्या लांब प्रवासाला एकटी जाणार, म्हणून तिचे मिस्टर तिला सोडायला आले. निरोप देण्या घेण्यात इतका वेळ गेला कि गाडी सुटली आणि मंगलचा नवरा उतरूच शकला नाही! मग काय आरडा ओरड. आता गाडी कुठे थांबणार माहित नाही. सगळे हवालदिल झालें. तेवढ्यात ओढा स्टेशन पाशी सिग्नल साठी गाडी थांबली. ते सद्गृहास्त उतरायला गेले. त्यांचा दुर्दैवानी तेथे टी.सि होता. तो त्यांना उतरू देत नव्हता. मग बायकांनी थोडा गोंधळ, थोडा आरडाओरड केली. ह्याचा फायदा घेऊन मंगलचा नवरा उतरला! पण टी.सि ला समजावण्यात अर्धा तास गेला. अशी प्रवासाला इव्हेन्त्फुल सुरुवात झाली!
४० बायका होतो पण रेल्वेच्या कृपेने चार डब्यात विभागले गेलो. आम्हाला कल्याण कोट्यातून reservation मिळालं होतं. आमच्या सोबत इस्कॉन ग्रुपची मानसं व बायका होत्या. दुपारी ३.३०-४.०० पर्यंत सर्व ठीक चाललं होतं. चारच्या सुमारास त्यांनी भजनं म्हणायला सुरुवात केली. एकजात सर्व बेसूर गात होते. त्यांच्या भावना व त्यांच्या श्रद्धेचा आदर करून आम्ही काही बोललो नाही. थोड्या वेळानी त्याचे बाबाजी आले. बाबाजी हन्डी माईक घेऊन आले. त्या मूळे आमच्या बोगितली इतर भक्त आले. भोवताली जमलेले भक्त बघून बाबाजी खुश झालें व त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. त्यांचा प्रवचन बंगाली भाषेतून चालू होतं आणी आमचातला संयमी मराठी माणूस आपला गप्प होतं. हे असं ८ वाजेपर्यंत सहन केलं.८ वाजता त्यांनी भजनं म्हणायला सुरुवात केल्यावर आमचा दम उखडला. कम्पल्सरी भक्ती व तुमच्या भावनांचं प्रदर्शन बास करा, देव दुसर्यांना डोकेदुखी देऊन वाजतगाजत भक्ती करा असं सांगत नाही असं म्हटल्यावर वाद, भांडणं सुरु झाली. हे सर्व हरिद्वार ला उतरे पर्यंत चाललं. वेगळाच देव व वेगळ्याच विचारांचं दर्शन झालं.
दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता हरिद्वारला पोहोचलो. रमण, आमचा टूर गाईड आम्हाला घ्यायला आला होता. आत्ता खर्या अर्थानी यात्रेला सुरुवात झाली! हरिद्वार येथील जम्मू यात्री हॉटेलमध्ये सामान टाकून, थोडं फ्रेश होऊन आम्ही सर्व निघालो हरिद्वारच्या घाटावर- गंगामैयाच दर्शन करायला, गंगास्नान व सायंकाळच्या आरतीसाठी! खूप माणसं, प्रचंड गर्दी, पण घाट खूप मोठा असल्या मूळे गर्दी फारशी जाणवली नाही. सर्व उरकून हॉटेलवर पोहोचायला ८.३० वाजले. आमचा टूर गाईड नी (रमण नी) जेवण तैयार ठेवलं होतं. जेवताना त्यांनी सूचना दिली," कल सुबह ३.३० हम उठेंगे, ५ बजे निकलना है! शाम तक बारकोट पहुचेंगे, लंबा सफर है."
ठरल्या प्रमाणे सकाळी ५ वाजता "गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या" गजरात बारकोट च्या दिशेनी प्रवास सुरु झाला. डोंगराळ प्रदेश, वळणा वळणाचे  रस्ते, भोवताली अवर्णनीय निसर्ग सौंदर्य! बहुतेक सगळ्यांना कसार्याचा घाट माहित होता, पण इथे तर घाटच घाट. ६००० ते १०००० फुट उंचीचे डोंगर पार करत, निसर्गाची मजा लुटत, आम्ही सायंकाळी सहा वाजता बराकोटला पोहोचलो. रात्री ८.०० वा. जेवण व जेवताना उद्याच्या कार्याक्रमाबाद्द्दल सूचना,"कल सुबह ५ बजे निकलेंगे, यमुनोत्री जाना है! जितना जल्दी पहुचेंगे उतनी बस आगे खडी कर सकेंगे. यामुनोत्रिकी चढान ५ कि.मी. कि है, आप घोडा कर सकते हो या फिर पैदल जा सकते हो. चढान थोडी मुश्कील है, मेरे हिसाबसे घोडा कर लो तो अच्छा रहेगा, आगे तुम्हारी मर्जी!" 
दुसर्या दिवशी सकाळी ९-९.१५ ला आम्ही यामुनोत्रीला पोहोचलो. नास्ता करून आम्ही सगळे यमुनोत्री दर्शनाला निघालो. काही घोड्यावर तर काही पायी! रमण नी दिलेल्या कल्पनेपेक्षा रस्ता जरा जास्तच अवघड होता. अरुंद रस्ता, प्रचंड गर्दी-पायी चालणाऱ्यांची,घोडेवाल्यांची, डोली वाल्यांची व पाठुन्गली मानसं नेणाऱ्यांची! त्यात चहाचे स्टोल्स! चढता रस्ता-बहुतांश पायर्यांचा. पायर्यांची उंची ९ इंच ते १५ इंच! ठिकठिकाणी गर्दी कन्ट्रोल करण्यासाठी पोलीस व स्वयंसेवक होते. परिस्थिती हाताबाहेर जातीये असं वाटलं कि ते एका बाजूची वाहतूक बंद करायचे. मग ट्राफिक जम! एका जागी इतक्या गर्दीत घोडे शांतपणे उभे राहू शकत नव्हते. मग एखादा घोडा उधळायचा किंवा एखादा घोडा अस्वस्थ होऊन लाथा मारायचा. त्यातून उद्भवणार भांडणं, मारामार्या. पायी चालणारे घोडेवाल्यांना शिव्या द्यायचे, घोडेवाले डोलीवाल्याना, नुसती गोंधळाची परिस्थिती होती! त्यात घोडेवाल्यांचा चाप्टर पणा. निघताना ७००/- घोडा नक्की केला, थोड्या अंतरावर घोडा थांबवून १००/- मागितले. कशासाठी- तर रसीद कटावणी है. थोडं पुढे गेल्यावर," मादाम, घोडा थक गया है. थोडा समय रुकेंगे. आपको अगर लेना है तो चाय नास्ता ले लो. आयुष्यात पहिल्यांदाच घोड्यावर बसले होते,  नाही म्हणायला मला देखील उतरवसा वाटत होतं. आम्ही चौघी जणी चहा घ्यायला उतरलो. चौघींनी चहा घेतला, त्याचा बिल झालं २२५/- कारण चारी घोडेवाल्यांनी पोटभर नास्ता पण केला होता. मुकाट्यानी पैसे दिले कारण हि सर्विस त्यांनी गृहीतच धरली होती. अजून पुढे गेल्यावर तर बिपीन (माझा घोडेवाला) नी कमालच केली! त्याचं म्हणणं होतं, " बहेनजी घोडेको प्यास लगी है थोडा फ्रुटी पिलाडो." मी ऐकून न ऐकल्यासारखा केलं. माझ्या नशिबी आलेला  घोडा कष्टानी पायर्या चढत होता. तो मधेच दमून बसून घ्यायचा. परतीच्या मार्गावर तर त्याचे पाय सारखे सटकत होते. बिपीन नी सांगितलं त्याच्या  पायांना नाला ठोकल्या नाहीत म्हणून तो नीट चालत नाहीये. मग काय, घोड्याच्या सोयीसाठी आणि माझा जीव मला प्रिय असल्याने , त्यातील अवघड चढाव मी पायीच आले. म्हणजे जवळपास ३ कि.मी. बिपीनशी झालेल्या गप्पांमधून मला बऱ्याच गोष्टी  समजल्या. एक म्हणजे मी ज्या घोड्यावर बसले होते तो बिपिनच्या मालकीचा नव्हताच! मालक वेगळाच होता. बिपीन त्याचं भाडं देत होता. शहरात रिक्षा भाड्यानी घेतात तसा!
घोड्यावर बसण्याचा आयुष्यातील पहिला अनुभव, दिवसभर झालेली पायपीट, प्रचंड उकाडा, जागरण ह्या सर्वांमुळे सायंकाळी हॉटेलवर पोहोचलो तेव्हा सगळ्यांची अवस्था बघण्या  सारखी झाली होती.कंबर, पाठ, पोट, पाय, सर्व अंग दुखत होतं. त्यात दिलासा देणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे गरमा गरम तयार जेवण आणि रमण चं वाक्य, "कल सुबह हम आरामसे ७.३० बजे चलेंगे!" 
दुसऱ्या दिवशी बारकोट ते उतरकाशी अंदाजे १२ तास बसचा प्रवास होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास नास्ता करून निघालो. साधारण १०-१०.३० च्या सुमारास बस थांबवत रमण नी सांगितलं," यहा शिवाजीका प्राचीन मंदिर है. आज सोमवार है, जाओ जाके दर्शन कर लो." २०० मी. मंदिराची उंची आणि अवघड चढ, त्यात कालचा कॅरी फोरवर्ड झालेला थकवा! आमच्या पैकी काही जणांनी बसून घेतल व काही जण दर्शनासाठी वर गेलो. वर गेलो तर वरती ६०-७० लोकांची लाईन. लाईन हळू हळू पुढे सरकत होती, कारण मंदिरात एका वेळेस ६-७ जणांनाच पाठवीत होते. एक ग्रुप आत गेला कि १० मिनिटांनी बाहेर यायचा. त्या नंतर पुढचा ग्रुप! रांगेत उभं राहून सगळे टेकीस आलो होतो. समजून घेणं, माणुसकी हे असे शब्द कधी ऐकलेच नाहीत असे सगळे वागत होतो. एवढी रांग बघून नवीन आलेली व्यक्ती रांगेत घुसायचा प्रयत्न करायची. कुणी आजारी असण्याचा बहाणा करीत तर कुणी, मी एक तासा पासून लायनितच आहे असं सांगत. मग काय कशाचीही शहानिशा न करता घुसखोरांना घुसू न देणे, त्यांना त्यांच्या जागेवर पाठविणे, ते परत रांग तोडत नाही ना ह्यावर  लक्ष ठेवणे, असं करत पुढे सरकत होतो. वाद घालत, भांडण करत आम्ही पुढे सरकत अखेरीस, तब्बल १.३० तासांनी  मंदिराच्या प्रवेश द्वारा पाशी पोहोचलो. गुहेतलं मंदिर! आत मध्ये अंधार. आत जाण्याचा अरुंद मार्ग. आतमध्ये काही अंतर रांगत सरपटत जावं लागलं. मग १-१.५ फुट उंचीच्या ७ पायर्या उतरून गेलो.शेवटची पायरी उतरलो ते फुटभर पाण्यातच! तिथे दिवा तेवत होता. तिथल्या प्रकाशाशी नजर सरावल्यावर समोर जे दिसलं ते अदभूत होतं. समोर पंचमुखी, दगडी, स्वयंभू शिवलिंग! खाली जिवंत झरा आणि वरतील खडकातून होणारा अखंड अभिषेक! मंदिर खरच अदभूत होतं. ह्या डोंगराळ भागात प्रत्येक ठिकाणची एक कथा असते. तशीच ह्या मंदिराबद्दल पण सांगण्यात आली. हजारेक वर्षांपूर्वी हे मंदिर सापडलं. जवळच्या गावात दुष्काळ पडला होतं. गावकरी अन्नाच्या व  पाण्याच्या शोधात वण वण फिरत होते. त्यांचातील एक गावकरी फिरत फिरत  ह्या भागात आला. अंधार पडला, त्याला परतीचा रस्ता सापडेना. ना इलाजनी तो रानातच झोपला. रात्री त्याला जमिनीतून चित्र विचित्र आवाज ऐकू आले. सकाळी त्यांनी गावकर्यांना हे सांगितलं. सगळे त्याच्या बरोबर निघाले. त्यांना ती जागा काही केल्या सापडेना. रात्री त्या माणसाला दृष्टांत झाला. शंकरांनी त्याला मार्ग दाखवला. दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी त्याच्या बरोबर आले व त्यांनी सांगितलेल्या जागेवर खोदल, तर तिथे एक गुहा होती. त्यात पाणी होतं व पाण्याच्या मध्यभागी शंकराच्या पिंडीसारखा दगड होता. लोकांनी त्याची पूजा केली. त्या दिवसा पासून आज पर्यंत ह्या गावात पुन्हा दुष्काळ पडला नाही. आता हि कथा खरी कि खोटी हे तो देवच जाणो, पण मंदिर, त्याचं लोकेशन हटके होता ह्याबद्दल काही शंका नाही. मी असं मंदिर आज पर्यंत पाहिलं नाही!
उत्तरकाशी ते गंगोत्रीचे अंतर आहे फक्त १०० कि.मी, पण रस्ता इतका बेकार आहे कि एवढ अंतर जायला आम्हाला तब्बल ५.५० तास लागले. सकाळी पाचला निघालो ते १०.३० वाजता गंगोत्रीला पोहोचलो. आजचा दिवस कमी दमवणारा होता. गांगोत्रीपासून अवघ्या तीन कि.मी.वर बसमधून उतरलो. शहरात हे अंतर एखादवेळेस खूप वाटलं असतं, मी पटकन रिक्षा केली असती, पण हिमालयात ३ कि.मी. हे अंतर काहीच नाही, हे कळून चुकल होता. हा साक्षात्कार होण्या मागे अजून एक कारण आहे, तिथे पायी जाण्याला पर्याय नाही. एक तर तुम्ही जा नाहीतर नका जाऊ! आम्ही बसमधून उतरलो आणि चालायला लागलो. काही अंतरापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूना प्रसाद, खेळणी, माळा, ब्रेसलेट्स, पाण्याचे कॅन्स इ. विकणारी दुकाने होती. तसेच चहाच्या टपऱ्या व खाद्यपदार्थांचे स्टोल्स! ह्या सगळ्यातून जी काही अरुंद वाट होती, त्यावर दाटी वाटी नी  चालणारी असंख्य माणस. मंदिरापासून साधारण एक कि.मी अंतरावर होतो, तेथून चित्र बदललं. दाटी वाटी नी चालणारी माणस, अचानक रांगेत चालू लागली. ह्याचं कारण पुढे पोलीस हवालदार उभे होते व ते ट्राफिक कंट्रोल करत होते. अश्या तऱ्हेने तास-दीडतास रांगेत उभं राहिल्यावर गंगामैयाच दर्शन झालं! दर्शनाचा अवधी ३० सेकंद. गंगोत्री हे गंगेचं उगम स्थान आहे असा माझा समज होता, पण तिथे गेल्यावर समजलं कि गोमुख हे गंगेचं उगम स्थान आहे आणि ते गांगोत्रीपासून १८ कि.मी.वर आहे. 
चार धाम पूर्ण होईपर्यंत आमचं रोजचं वेळापत्रक थोड्याफार फरकानी सारखच होतं. रोज सकाळी ३-३.३० वाजता उठायचं, पाच वाजता पुढील प्रवासाला सुरुवात करायची. एक तर १३-१४ कि.मी.प्रवास करून पुढील मुक्कामी पोहोचायचं किंवा ३-४ तास प्रवास करून तास-दीडतास रांगेत उभं राहून देव दर्शन करायचं! ह्यात उकाडा आणि गर्दी हा सगळीकडचा कॉमन फेक्टर. आजचा आमचा प्रवास होता- उत्तरकाशी ते गुप्तकाशी! अंतर २७५ कि.मी. सुमार रस्ता, असह्य उकाडा, वळणा वळणाचे रस्ते, बाहेर बोडके डोंगर! ना कुठे सावलीची सोय ना दिलासा द्यायला वाऱ्याची झुळूक! हा असा प्रवास टिहरी धरणापर्यंत झालं. वाटेत जेवायला थांबलो. आमच्या सोबत असलेल्या महाराजांनी तासाभरात पानं वाढली. प्रवासातला मेनू एकच! खिचडी! फारच आरडा-ओरड केली तर कधी पाणीदार दह्यातली कोशिंबीर आणि रमण खूपच खुश असेल तर एखादा पापड! अन्नदाता सुखी भव! असं म्हणत पुढच्या प्रवासाला निघालो. पुढील २-४ कि.मी मध्ये जादू केल्यासारखं बाहेरील वातावरण बदललं. चहूकडे हिरवी झाडी व हिरवे डोंगर दिसू लागले, अचानक ढग आले, हवा सुटली आणि पुढील प्रवास आल्हाददायक झाला. हे असं होण्यामागच मुख्य कारण होता- समुद्रसपाटी पासूनची आमची उंची! कधी आम्ही १०००-१२०० फुटावर होतो तर कधी ११००० फुटावर!
गुप्तकाशिहून दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो केदारनाथच्या दर्शनासाठी. गुप्तकाशी ते गौरीकुंड अंतर आहे ३६ कि.मी.व तेथून केदारानाथाच मंदिर आहे १४ कि.मी.अंतरावर. भल्या पहाटे निघून सुद्धा ट्राफिक जॅममूळे आम्हाला गौरीकुंड पासून चार कि.मी.अलीकडेच बसमधून उतरावं लागलं. मग काय ४-५ किमी पायपीट करून गौरीकुंड गाठलं. गौरीकुंड हे एक गरम पाण्याचं कुंड आहे. ह्या सर्व देवस्थानानपाशी गरम पाण्याचे कुंड आहेत. जसं यमुनोत्रीपाशी सूरजकुंड, केदारनाथला गौरीकुंड व बद्रीनाथला तप्तकुंड. ह्या कुंडात स्नान करूनच देव दर्शनाला जावे अशी मान्यता आहे. ह्या सर्व कुंडांमध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी अंघोळीची वेग वेगळी सोय केलेली आहे. पण तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड आहे कि सरकारने केलेली सर्व सोय अपुरी पडते. बायका पुरुष बाहेर उघड्यावर अंघोळी करतात कपडे बदलतात, ह्यात कुणाला काही गैर वाटत नाही. गौरीकुंडपासून ५०० मी अंतरावर केदारनाथला जाण्यासाठीचे घोडे मिळतात. येथे एक बरं आहे उत्तराखंड सरकारनी घोड्यांचा दर निश्चित केलं आहे. रु.१९००/-, पैकी रु.१८००/- घोडेवाल्याला आणि रु.१००/- सरकार दप्तरी जमा. यामुनोत्रीचा थकवा अजून गेला नव्हता, त्यात खडतर रस्ता, प्रचंड गर्दी आणि उकाडा! एक एक करून सगळ्यांनी घोड्यावर बसून वर जायचं ठरवलं. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची तसेच दर्शनासाठीची गर्दी, व त्या साठी लागणारा वेळ लक्षात घेता, दर्शनासाठी जाणारे सर्व जण रात्री मुक्कामी तेथील धर्मशालेतच राहतात. तेथे राहण्याची सोय चांगली आहे. एका खोलीत ७-८ जणांची निवासाची व्यवस्था करण्यात येते. येथे अंथरून, पांघरून व जेवण योग्य दरात मिळते. एवढी माहिती घेऊन आमच्यापैकी ३० जणी दर्शनासाठी गेल्या. व आम्ही १० जण रूमवर परत आलो. गौरीकुंड ते बस stand येत असताना वाटेत एक वेगळाच अनुभव आला. ह्या आधी खूप वेळा वाचलं होतं कि अशी यात्रा हि आयुष्यातील शेवटची यात्रा असं समजून म्हातारे कोतारे ह्या यात्रेला निघतात. मरण आलं तर बरं! देवाच्या दारी मरण आलं. ह्याच्या पेक्षा आयुष्याकडून काहीच अपेक्षा नसते. हे वाचायला व ऐकायला ठीक आहे पण तिथे १०००० फुटावर जेव्हा कुणी स्वयंसेवक तुमच्या समोरून एक नव्हे दोन प्रेते घेऊन जातात  तेव्हाची परिस्थिती वेगळी असते. त्यात अजून भर म्हणजे त्या मृत व्याकिंबरोबर ना कुणी नातेवाईक ना कुणी अश्रू ढाळणारा! हे हि नसे थोडके कि काय, त्या स्वयंसेवकांनी त्या प्रेतांना डाग दिला व ती प्रेते नदीच्या पात्रांत सोडून दिली. हे बघून आम्ही सगळे चांगलेच हबकलो. खरं सांगते भोवताली इतकी माणसा होती पण जगात आपण एकटे आहोत हे स्ट्रोन्ग फिलिंग होतं. तुम्ही मला भित्री म्हणालात तरी हरकत नाही, पण खरं सांगते हॉटेलच्या रूमवर आल्यावर खूप बरं वाटलं.
पुढचे दोन दिवस आम्ही १० जणांनी खूप धमाल केली. मनसोक्त विश्रांती घेतली, गुप्तकाशीच्या मंदिरात जाऊन आलो, पत्ते खेळलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो, इ खूप मज्जा केली. ह्या दोन दिवसांच्या विश्रांतीमुळे पुढील प्रवासासाठी आम्ही जास्त ताजे तवाने होतो! गुप्तकाशी येथील मंदिरात दर्शनासाठी गेलो. जुन्या काळातील मंदिर. केदारानाथाची प्रतिकृती. आमच्यातील तिघींनी पूजेचं ताट घेतलं. त्यांच्या हातातील ताट बघून तेथील मंदिरातील पंडित आमच्याकडे आले. त्यातील एकानी त्या मंदिराची, त्याचाशी संबंधित कथा सांगायला सुरुवात केली. आमच्यातील दोघी जणी हे सगळं भाक्तीभावानेनी एकतायत हे लक्षात आल्यावर पंडितांनी त्यांना पुजेलाच बसवलं. मग पांडवांशी संबंधित त्यांनी एक दीर्घ कथा सांगितली. शमीच्या झाडाखाली पांडवानी ठेवलेली शस्त्र त्यांनी दाखवली. त्यात भीमाची गदा, अर्जुनानी मारलेला बाण, असं सर्वकाही होतं. हे सगळं तुम्हाला कसं समजलं असं मी विचारल्यावर पंडित माझ्यावर थोडा वैतागला. "बेहेनजी, भगवानके द्वारपर आये हो, मनमे श्रद्धा और दान करनेकी भावना होना बहुत जरुरी है," असा मोलाचा सल्ला देत पुढील पूजेच्या प्रोसेस मध्ये माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. २०-२५ मिनिटांनी पंडितजी त्यांच्या दृष्टीनी मुख्य मुद्याला पोहोचले,गुप्तदान! प्रत्येक पूजेच्या ताटात एक गोटा नारळ होता. त्या प्रत्येक नारळाचा  कौशल्यानी चौकोनी तुकडा काढत, एकीकडे ते आम्हाला गुप्तदानाचे महत्व सांगत होते. ह्या कामात त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे दोन सहकारी आले. पंडितजी सांगत होते, "पुराणोमे गुप्तदान का बहुतही महत्व बताया गया है. इससे बहुत पुण्य मिलता है. आप जितना दिलसे दान करोगी उतनी ज्यादा तुम्हारी और तुम्हारे घरावालोकी तरक्की होगी." हे ऐकून माझ्या बरोबरच्या बायकांनी आपापली पाकीट उघडली, दान करायला. पंडिताचे डोळे चमकायला लागले. त्याची नजर पाकिटावरून काही हटेना. हे बघून मी विचारलं, "पंडितजी, आप तो देख रहे है, तो इसे हम गुप्तदान कैसे कह सकते है." 
"सुनो माताजी, हमने आपसे पहली बारभी कहा था, कि ये विश्वास और श्रद्धाकी बात है. आपकी जितनी मर्जी आप दान कर सकती हो. इसमे कोई जबरदस्ती नाही है."
मी पाकीट उघडत नाही म्हटल्यावर पंडिताचा माझ्यातील उरलासुरला इंटरेस्ट पण नाहीसा झाला. आता त्याचं पूर्ण लक्ष माझ्या बरोबरच्या बायका पाकिटातून काढत असलेल्या रु.५००/- च्या नोटांकडे होतं. शोभानी विचारलं, " हेमाताई, तुम्ही  किती देणार आहात?" मी नकारार्थी मान हलवली. तिनी विचारलं, "ताई, तुमचा विश्वास नाही का?" मी ह्याचं काही उत्तर देणार तेवढ्यात मंदिराच्या आवारातील खोल्यांमधून एक बाई आली. पंडितजी कडे बघत म्हणाली, "अजी, सुनते हो, खाना तैयार है. काम निपटके आ जाना." आम्ही सगळ्यांनीच त्या बाई कडे पाहिलं. पंडितांनी वैतागून. आम्ही सहज! त्या बाईच्या अंगाखांद्यावर १५-२० तोळे सोनं होतं. मी आमच्या बायकान कडे सूचक पाहिलं. मला त्यांना काहीच सांगावं लागलं नाही. हे बघून शोभा पटकन म्हणाली, "ताई, आमच्या अंगावर गुंजभर सोनं नाही. आम्ही बहुतेक सर्व जणी कर्ज काढून ट्रीपला आलो. कर्जाचे हप्ते आम्ही कसे फेडतो आमचं आम्हालाच ठाऊक. मी तर काही ह्या पंडितला दान देणार नाही. बाकीच्यांनी आपापलं ठरवावं." मग काय सगळ्याच उठल्या. कोणी काहीच दिलं नाही. आयुष्यात हि महत्वाची गोष्ट शिकल्या बद्दल मला बायकांचं कौतुक वाटलं आणि ट्रीप सार्थकी लागल्याचा आनंद मिळाला.
आमचा पुढचा टप्पा होता बद्रीनाथ! तब्बल १३ तासाच्या प्रवासा अंती आम्ही सायंकाळी ५.३० वाजता बद्रीनाथला पोहोचलो. केदारनाथ व बद्रीनाथ हि दोन्ही देवस्थानं बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत आहेत. दोघांची समुद्रसपाटी पासूनची उंची ११५०० फुटाच्या आसपास आहे. त्यामुळे दोन्हीकडे हुडहुडी भरेल अशी थंडी. ब्लानकेत, रजई घेऊन झोपलो तरी उबेचा पत्ता नाही. रूमवर सामान टाकून, थोडं फ्रेश होऊन साधारण ६.३० वाजता आम्ही देव दर्शनासाठी निघालो. हॉटेलपासून एखाद किमी अंतरावर मंदिर होतं. मंदिराच्या अलीकडे ५००-६००मि पासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं होती. दुकानात मुख्यता प्रसाद, खेळणी,माळा,मूर्ती,फोटो,केसेटस इ विकायला होते. ह्या व्यतिरिक्त हॉटेल्स व खाद्यपदार्थांचे stalls देखील होते. नेहमी प्रमाणे प्रचंड गर्दी आणि स्नान करायला तप्तकुंड. हे तप्तकुंड मंदिरापासून काही अंतरावर होतं. कुंडात हातपाय धुतले, जवळच्या दुकानदाराकडून प्रसाद घेतला व दुकानदाराच्या सांगण्यावरून दुकानात बूट चपला काढून ठेवल्या. कुंडातील पाण्याच्या उबेमुळे पहिली शे दोनशे पावलं काही जाणवलं नाही, पण मग हळूहळू पाय गारठायला लागले. खाली बर्फासारखी गार व ओली फरशी, शेजारून वाहणारी अलकनंदा! त्या मूळे वाहणाऱ्या वाऱ्यात एक प्रकारचा बोचरा गारठा. वळणं वळणं घेत निर्माण झालेल्या रांगेची लांबी सांगता येणार नाही, पण मंदिराच्या गाभार्या पर्यंत पोहोचायला आम्हाला तब्बल १.३० तास लागला. तोपर्यंत पायांची वाट लागली होती. पाय बधीर झालें होते. ह्या सगळ्याचा पुढे जाऊन बरेच दिवस त्रास सहन करावा लागेल ह्याची तेव्हा कल्पना नव्हती. एवढं करून दर्शनाचा कालावधी ३०-४० सेकंद! म्हणजे बद्रिनाथाच्या मूर्तीच वर्णन करायला सांगितलं कि आम्ही फेल. एकूण पण लाईनीत उभं राहणं, कुणाला मध्ये घुसू न देणं, घासाघीस घालून माळा व इतर वस्तूची खरेदी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळीच मजा आली.
दुसऱ्या दिवशी मात्र अगदी सुखाचा प्रवास होता. सकाळी आरामात नऊ वाजता निघालो. रमतगमत दुपारी दोन वाजता पिपलकोतीला पोहोचलो. आता अवघड पेपर संपले होते. परतीचा प्रवास सुरु झाला होता. रूमवर जाऊन पलंगावर आडवे झालो तेव्हा पहिल्यांदा आपण किती दमलोय ह्याची जाणीव झाली. हा शीण वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर येत होता. किरकोळ कारणांवरून वाद होत होते, समोरच्या वस्तुपण दिसत नव्हत्या. क्षुल्लक कारणांवरून भांडणं  व चिडचिड होत होती. एकूण काय इथून पुढचे तीन दिवस अवघड होते. दुसऱ्या दिवशी हरिद्वारला मुक्काम होता. वाटेत ऋषिकेशला थांबलो. लक्ष्मन मंदिर, राम झुला, लक्ष्मन झुला इ दाखवण्या साठी आमच्या गाईड नी आम्हाला ऋषिकेश मध्ये ५-६कि.मी उन्हात फिरवलं. त्याचा इतका राग आला होता पण चालणे सोडून काही इलाज नव्हता. कंटाळलेल्या, दमल्या भागलेल्या आम्ही सायंकाळी ७.३० वाजता हरिद्वारला पोहोचलो. तो दिवस सोमवार होता आणि त्या दिवशी सूर्यग्रहण लागून सुटलं होतं. झालं! आमच्या सर्व बायका कपडे घेऊन नदीकाठी अंघोळ करायला. ग्रहणाच्या दिवशी, गंगेत अंघोळ करायला मिळणार, म्हणजे अहो भाग्यं! अंघोळी करून सर्व जणी रात्री १० वाजता आल्या. त्याचा पुढे जेवण, शेवटच्या क्षणी केलेल्या खरेदीचं पकींग. सगळं उरकून झोपायला १२.३०!
सकाळी ४,३० ला रूम सोडली व हरिद्वार स्टेशन गाठलं. ट्रेन होती सहाची, पण आम्ही ४० जण,आमचं सामान, हे सगळा तीस सीटच्या गाडीत अद्जस्त करायचं होतं आणि स्टेशन गाठायचा होतं. अखेरीस आम्ही स्टेशनवर वेळेत पोहोचलो, गाडीत व्यवस्थित चढलो, आणि हरिद्वार-दिल्ली ए.सी. चैअर कारचा प्रवास सुरु झाला. सकाळी ११.३० वाजता दिल्ली स्टेशनच्या प्लेटफार्म न.१० वर उतरलो. पुढचं तिकीट होतं दादर-अमृतसर गाडीचं. गाडीची वेळ रात्री ८.४० ची. गाडी सुटणार होती प्लेटफार्म क्र.४ वरून. हातात वेळ पुष्कळ होता, पण तरी मला टेन्शन आलं होतं. ४० बायका, त्यांचे लहान मोठे मिळून २०० डाग, प्लेत्फोर्म क्र.१० वरून प्लेटफार्म क्र.४ वर नेणं काही सोपी गोष्ट नव्हती! आम्ही कुली करायचं ठरवलं. आमचं सामान, आमची गरज, दमलेले चेहेरे, हे बघून ५-६ कुली गोळा झालें. त्यांनी एकमेकां  कडे सूचक पाहिलं. मग त्यातला एक जण म्हणाला," कौनसी ट्रेन है?" दादर-अमृतसरच नाव ऐकल्यावर त्यांनी ,"३००० पडेगा" असं सांगून मोकळा झाला. ३००० चा आकडा ऐकून आमचे चेहेरे बघण्यासारखे झालें होते. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला कि, "रेल्वे स्टेशन वर ठिकठिकाणी कुलिला किती वजनासाठी किती पैसे द्यावेत ह्याचे दर फलक लावलेले आहेत. मग तुम्ही एवढे जास्त पैसे का बरं मागता?" त्यावर त्यांनी खांदे उडवत सांगितलं," ये हमारा रेट है. कामके हिसाबसेही पैसे मांगे है. दुसरी बात आप हमे बोगी न बतावो हम आपका सामान वहा तक ला देंगे.अगर आपको अपना सामान ट्रेन में राखवाना है तो उसके अलग पैसे पडेंगे." त्याची हि भाषा ऐकून सर्व बायका वैतागल्या. बहुतेक सर्व जणींच मत पडलं,आम्हाला कुली नको. आमचं सामान आम्ही हलवू. मग काय, ज्यांना हवा होता त्यांनी वैयक्तिक लेवलवर कुली ठरवला. अशा आम्ही ७-८ जणीच होतो. आमच सामान वाहून नेताना त्या कुलींनी मला विचारलं,"बेहेनजी,आप कहा कि हो? आपके साथ कि औरते काफी हिमतवाली है. हुमे क्या पता, हम हमारा रेट थोडा कम करते."
 सर्व बायका आणि त्यांचं सामान चार नंबर वर पोहोचायला अर्धा तास लागला. मला पण माझ्या ग्रुपच खूप कौतुक वाटलं. त्यांनी जे केलं ते अवघड होतं, खास करून जेव्हा त्या इतक्या मरणाच्या दमल्या होत्या. प्लेतफोर्म वर सगळे सेटल झालें. आता पुढे काय? रात्रीच्या नऊ पर्यंतचा वेळ घालवायचा कसा. हळूहळू प्रत्येकांनी आपापला मार्ग शोधून काढला. कुणी स्टेशन बाहेर चक्कर मारायला गेलं, तर कुणी खरेदी करायला. कुणी उरलासुरला खाऊ संपवायच्या मागे लागलं, तर कुणी खायला काही मिळतंय का ह्याच्या शोधात निघालं. कुणी सामानाची उशी करून झोपून गेलं, तर कुणी जनाची नाही तरी मनाची लाज वाटल्यानी पेंगत बसून राहिलं! आम्ही पाच जणींनी मात्र पत्ते काढले आणि रमीचा डाव सुरु केला. आमच्या मूळे इतर प्रवाशांची गैरसोय होत होती, हे आम्हाला जाणवत होतं पण आम्ही त्या कडे दुर्लक्ष करून आमचा खेळ चालू ठेवला. थोड्या वेळानी एक फास्ट ट्रेन आली. ती पकडायला मानसं आंधळ्यासारखी धावत होती. कुणाचा आम्हाला पाय लागत होता तर कुणाचा चुकून आमच्यावर किंवा आमच्या सामानावर पाय पडत होता. हातातला डाव पूर्ण करून थांबूया असा विचार केला,पण तेवढ्यात शेजारील स्टोलवर पाणी व कोल्ड ड्रिंक ची डिलिवरी द्यायला गाडी आली. मग मात्र आमचा पेशंस संपला. आम्ही आमचा पत्यांचा डाव आवरला. आता काय करायचं. दिल्लीतील प्रचंड उकाड्यामुळे काही सुचत नव्हतं. पाणी पिऊन आणि कोल्ड ड्रिंक पिऊन नुसता कंटाळा आला होता. त्या वर इलाज म्हणून काहीतरी खाऊया असा विचार पुढे आला. कसलं होपलेस आहे हे दिल्ली स्टेशन. साधं खायला पण काही मिळत नाही. उकाड्यानी बेजार माणसाला मिळत होत्या तेलकट पुरी-भाजी, किंवा कुरकुरे, किंवा कोमट पाणी आणि नाही तर बेताचे गार कोल्ड ड्रिंक! नुसते हैराण झालो. जीवाची तगमग होत कसा तरी एकदाचा दिवस संपला. रात्र झाली. ८.३० वाजले. प्रवासातील शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली होती. सर्व जणी सामान गोळा करून ट्रेनची आतुरतेने वाट बघत होत्या. अखेरीस गाडी आली. s4 बोगीच्या बायका s1 पाशी उभ्या होत्या. मग काय एकच गोंधळ, मी माझ्या परीनी त्यांना सांगितलं, ट्रेन स्टेशनवर २० मिनिटं थांबते. सर्व डबे एकमेकांना आतून जोडलेले आहेत. कुठल्याही डब्यात चढलात तरी चालेल. गाडी सुटण्यापूर्वी एखाद दोन मिनिटच जेमतेम बायका गाडीत चढल्या. मग थोडा वेळ "तरी मी सांगत होते"च पुराण चालू होतं. एस३, एस४,एस५, व एस६ अशा चार बोगीसमध्ये आमच्या बायका होत्या. रात्री १० वाजता झोपण्या आधी सगळ्यांची खुशाली विचारायला गेले तर बहुतेक सगळ्या गाढ झोपल्या होत्या. रात्र मजेत गेली. सकाळी जाग आली ती मूळी उकाड्यानीच! ट्रेनमध्ये तर प्रचंड हाल झालें.
असह्य उकाडा. त्यात दादर-अमृतसर सारखी भिकारडी ट्रेन. कुठे थांबेल ह्याचा नेम नाही. बहुतेक वेळा स्टेशन नसेल अश्या ठिकाणी हि सिग्नलची वाट बघत थांबणार. स्टेशनवर थांबलीच तर असं भंगार स्टेशन होतं जिथे प्यायला पाणी पण मिळणार नाही. रडत खडत अखेरीस आम्ही गाडी नाशिक रोड स्टेशनवर रात्री ११.३० वाजता पोहोचलो. आता मला बायका, त्या कशा उतरतील,त्यांचं सामान कसं उतरवायचं अशी काही काळजी नव्हती. जितकी मानसं सोडायला आली होती, जवळपास तितकीच मानसं घ्यायला आली होती. त्यांनी बघताबघता सामान उतरवलं, बाहेर न्यायला मदत केली आणि पुढच्या दहा मिनिटात महिला हक्क संरक्षण समितीच्या बायका चार धाम यात्रा हि ट्रीप उरकून आनंदानी आपापल्या नातेवाईकां सोबत घराच्या दिशेनी गेल्या पण! एक महिन्याभरानी पुढच्या ट्रिपचे प्लानिंग करायला!