Tuesday, 18 August 2020

सामाजिक कामाची सुरुवात

 

मला आजपर्यंत खूप वेळा खूप लोकांनी हाच प्रश्न विचारला आहे, "तुम्हाला सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड आहे का? कश्यामुळे हे काम करावसं वाटलं? ह्याची सुरुवात कधी व कशी झाली? ईत्यादि ...

खरं सांगायचं तर मी एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली आणि सुखवस्तू सासर मिळालेली मुलगी! स्त्री-पुरुष असमानता, मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक, महिलेवर होणारा अन्याय, सासरी होणारा छळ, ह्या सर्व गोष्टी मी कधी ऐकल्यापण नव्हत्या. त्या अनुभवण्याचा तर प्रश्नच नव्हता.

मी लग्न करून नाशिकला आले. घरात सर्व कामांना नोकर! मग वेळ घालवण्यासाठी शिवणक्लास लावला. एका शाळेत मुलांना इंग्रजी शिकवायला जाऊ लागले. व्यायाम, पुस्तकं वाचणे असं करत दिवस मजेत जात होते. कशाचं टेन्शन नाही कशाची कमी नाही. कधी कधी कंटाळा पण यायचा.

आप्पा(माझे सासरे) मला नेहेमी म्हणत,'हेमा, तुला काय आवडेल ते कर. तुला नोकरी करावीशी वाटली तर नोकरी कर, शेजारी तुझ्या वयाच्या काही लेकी-सूना आहेत त्यांचाशी ओळख करून घे. स्त्री मंडळात जा.' भास्कर (माझा नवरा) च्या शेजारीच राहणाऱ्या मित्राच्या बायकोशी (रत्नाशी) ओळख वाढवायचं मी ठरवलं. एक-दोन वेळा आमची रस्त्यात भेट झाली. मग दोघींनी एक मेकीना घरी येण्याबद्दल आग्रहाचं आमंत्रण दिलं. मी एक दिवस रत्नाच्या घरी गेले. ६०-७० पायऱ्या चढून तिच्या घरी गेले तर समजलं कि ती बाजारात गेली आहे. मला तिच्या वागण्याचा अर्थच कळेना. त्या दिवशी तिने बोलावलं म्हणून मी गेले आणि ती चक्क बाजारात गेली! हे असं ३-४ वेळा झालं. दर वेळेस ती घरी नसायचीच. तिची सासू भेटायची. तिचीपण सुनेबद्दल अशीच तक्रार होती,'रत्ना बेजबाबदार आहे. तिला माणसांची किंमत नाही. मैत्रीणीना घरी बोलवायचं आणि आपण गायब व्हायचं. माझी फार विचित्र अवस्था होते. आता तुझ्या सारख्यांना मी काय उत्तर देऊ?'

मी पुढे रत्नाच्या घरी जाण बंद केलं. ह्या घटनेला पण वर्षं दीड वर्षं उलटलं असेल. मी हळू हळू माझ्या रुटीन मध्ये रमत होते. एक दिवस सकाळी ६ वाजता दारावरची  बेल वाजली. आपल्याला भास झाला असं वाटून मी झोपणार तो परत बेल वाजली. वैतागूनच उठत दार उघडलं, तर दारात रत्ना! हातात बौग! माझ्या चेहेऱ्यावर आश्चर्य होतं. ती शांतपणे म्हणाली,'हेमा, तू खूप दिवसांपासून मला बोलावत होतीस ना. घे मी तुझ्या घरी राहायला आले, कायमची!' क्षणभर काय बोलावं, मला काही सुचेचना. भानावर येत मी तिला घरात घेतलं, बसायला सांगत पाणी दिलं. थोड्या वेळात घरातील सगळे उठले. रत्नाला बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सकाळचा चहा, ब्रेकफास्ट झाल्यावर, रत्ना थोडी सेटल झाल्यावर मी तिला,'रत्ना, नेमकं काय झालं?' एवढं विचारता क्षणी ती भडा भडा बोलू लागली.

 

"हेमा, तू माझ्यावर रागावली आहेस ना? मी अगदी समजू शकते. तुझ्या जागी मी असते तर मला पण असंच वाटलं असत. पण मी तरी काय करू? खरं सांगू का, माझ्या लग्नाला ५ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. मला कोणाकडे जायला, कोणाशी बोलायला परवानगी नाहीये. तू जेव्हा भेटलीस आणि  घरी यायला तयार झालीस तेंव्हा मला इतका आनंद झाला होता, मी काय सांगू? मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायला घेतलं होतं. त्यावरून माझ्या सासूला घरी कोणीतरी येणार आहे ह्याचा अंदाज आला होता. तू जिना चढत होतीस तेंव्हा तिने मला खोलीत कोंडलं. आणि हे असं दर वेळेस तू यायचीस तेंव्हा ती करायची. मी तुझ्याशी घरातल्या गोष्टी सांगेन अशी भीती वाटत असेल बहुतेक. आमचं घर खूप मोठं आहे. ते दिवसातून तीन वेळा पुसायचं. खूप भांडी घासायला काढायची. मी सारखी काम करत राहावं असं तिला वाटते. दुपारी झोपायचं नाही, नवऱ्याशी फार बोलायचं नाही. जाऊ दे. खूप त्रास काढला.पण आता सहन होत नाही. माझे आई वडील २-४ दिवस माहेरी घेऊन जातात आणि परत आणून सोडतात. मला कळत नाही मी काय करू? तू पण मला त्यांच्याकडेच सोडलस तर.... तिच्या डोळ्यात पाणी आलं. ही सिच्युएशन कशी हाताळावी मला काहीच समजत नव्हतं. तिला जा म्हणायची इच्छा नव्हती आणि घरातल्या मोठ्यांशी बोलल्याशिवाय तिला थांबवून तरी कशी घेणार? मी, कुसुमताई (माझ्या सासूबाई) आणि अप्पांशी बोलायचं ठरवलं. त्यांना पण सर्व ऐकून आश्चर्य वाटलं. दोघांनी सांगितलं कि रत्ना इथेच राहील. जो पर्यंत तिला घ्यायला कोणी येत नाही तोपर्यंत ती इथेच राहील. त्यानंतर आईंनी रत्नाच्या (सासरी) निरोप पाठववून रत्ना आमच्या घरी आहे असं कळवलं. ह्याची त्यांनी दखल घेतली नाही. काही दिवसांनी रत्नाचे वडील येऊन तिला घेऊन गेले.

 

ह्या घटने नंतर, का कोण जाणे, पण हुंडाबळीच्या वर्तमानपत्रातील बातम्या नजरेस पडू लागल्या. बातम्या वाढल्या पण होत्या आणि आम्हाला जाणवू पण लागल्या होत्या. सर्वच जण अस्वस्थ होतो. कुसुमताईनी समाजवादी महिला सभा आणि राष्ट्र सेवा दल ह्यातील काही महिला कार्यकर्त्यांची घरी मीटिंग बोलवली. त्यात अक्का ठाकूर, शकुंतला मुरुगकर, विजयाताई मालुसरे, वसुंधरा केसकर, सुशीला म्हत्रे आणि अफकोर्स मी! (मी घरातील सदस्य, माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ झाले होते, आणि नवीन काहीतरी ऐकायला, शिकायला मिळेल म्हणून बसले होते.) ह्या प्रश्नाच्या संदर्भात काम सुरु करण्याबद्दल ठरलं.काम कसं आणि कुठून सुरु करावं? ह्याची गरज किती आहे? मदत मागणारे आपल्यापर्यंत कसे येणार? त्यांना आपण कशी मदत करणार? कशाचा काही अंदाज नव्हता. ह्या विषयात काम करायची गरज आहे, हे सर्वाना पटलेलं होतं.त्या वर्षीच्या गणेश उत्सवात पोस्टर प्रदर्शन लाऊन ह्या प्रश्नाचं गांभीर्य आणि गरज समजून घेऊया असं ठरलं. त्या वर्षी कुसुमताई, रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ह्या पदावरून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या सामाजिक कामामुळे व शाळेमुळे त्यांच्या खूप ओळखी होत्या. त्यांनी नावाजलेले चित्रकार श्री. धनंजय गोवर्धने व श्री. ज्ञानेश सोनार, ह्यांना, ह्या विषया संदर्भातील पोस्टर्स काढून देण्यासाठी विनंती केली. आम्ही पण हुंडाबळी संदर्भातील वर्तमानपत्रातील कात्रणं जमा करू लागलो. बघता बघता आमच्या कडे ५० हून अधिक पोस्टर्स तयार झाली.

 

१९८२ च्या गणेश उत्सवात ठरल्या प्रमाणे पोस्टर प्रदर्शन लावलं,नाशिकमधील एम.जी.रोड वरील झेड.पी.च्या गाळ्यात. (तेंव्हा त्या दुकानांचे बांधकाम चालू होते). लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या १० दिवसांत खूप लोकांनी प्रदर्शन पाहिलं आणि तिथे ठेवलेल्या नोंद वहीत त्यांची मत मांडली. नोंद वहीतल्या नोंदी व प्रतिक्रिया वाचून आम्ही अवाक/थक्क झालो. कोणाच्या मुलीचा सासरी हुंडा मिळाला नाही म्हणून छळ होत होता, तर कोणाच्या मावशीच्या आयुष्यात तर कोणाच्या मावस बहिणीच्या घरी सासरची माणस तिला त्रास देत होती. बहुतेक प्रतीक्रीयान मध्ये आशेनी एका गोष्टीची चौकशी प्रत्येक जण करत होता, 'ह्या साठी कोणी काम करताय का? असेल तर आम्हाला प्लीज त्यांचा पत्ता सांगा'. ह्या विषयावर काम करण्याची गरज किती आहे हे ह्यावरून लक्षात आल. कामाची गरज ओळखून आम्ही दर गुरुवारी दु.४-६ जमायचं ठरवलं. कुठे हा प्रश्नच नव्हता. ऑफिस आमच्या घरी, म्हणजेच कुसुमताईच्या घरी सुरु झालं.

 

बघता बघता तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. अडचणीत सापडलेल्या महिलेला, कुटुंबाला आमची फक्त सहानभूती नको होती. त्यांना सल्ला हवा होता, आम्ही काही मार्ग सुचवावा अश्या अपेक्षेने ते येत होते. आमच्या विनंतीचा मान राखण्यासाठी एक-दोन वकील येऊ लागले. मान राखण्यासाठी आलेले वकील कधी संस्थेचे सदस्य झाले, त्यांनापण कळले नाही. त्यांच्यासाठी पण हा विषय नवीन होता त्या काळात कोर्टाची पायरी चढणं वाईट समजायचे. त्यात हे नवरा-बायकोचे भांडण. त्यात समाजात बाईच्या जगण्या मरण्याला किंमत नव्हती. तिने सासरी मार खात जगावं किंवा मराव. एखादी नशीबवान असायची, जिचं म्हणणं माहेरची माणस ऐकायची आणि तिला समजून घेऊन मदत करायची. माझ्यासाठी तर हे सगळं इतकं नवीन आणि अनाकलनीय होतं कि मी रात्र रात्र विचार करायचे, हे असं का? वाजत गाजत, चार लोकांच्या, देवा धर्माच्या,नातेवाईकांच्या साक्षीने जी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आणली तिला इतकी वाईट वागणूक कोणी देऊच कस शकतं? आणि का? आणि ज्या व्यक्तीचा हात धरून ती त्या घरात प्रवेश करते तो हे सर्व घडत असताना काय करतो. गम्मत बघत बसतो का तो पण हतबल असतो? आजपर्यंत माझ्या आयुष्यात माझ्याशी कोणी आवाज चढवून बोललं नाही. अपमान आणि मारहाण तर माझ्या कल्पनेच्या पलीकडील गोष्टी आहेत.

 

येणाऱ्या केसेसचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आम्ही लवकरच पूर्ण वेळेचं ऑफिस सुरु केलं. हळू हळू केसेस वाढत होत्या, आम्ही पण सांत्वनाच्या पुढे जाऊन सल्ला देऊ लागलो. आज नाहीये असं नाही, पण त्या दिवसांत उत्साह खूप होता.(त्या काळात दर महा ६-७ केसेस येत होत्या. त्यांचं प्रमाण खूप वाढलाय. २०२० मध्ये आमच्या कडे ३५-४० केसेस दर महा नोंदविल्या जातात) समझोता झाला कि गृहभेट असायचीच. कोणी फोनवरून शेजारी होणाऱ्या मारहाणी बद्दल सांगितलं कि आम्ही समक्ष जाऊन त्या महिलेला भेटायचो. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये मी खूप शिकले. छोटे छोटे किस्से घडले ज्याच्यातून मी शिकत गेले आणि कार्यकर्ती म्हणून घडत गेले. काही अंगी असलेल्या गुणांची, शिक्षणाची, संस्कारांची व घरातून मिळणाऱ्या प्रोत्साहन व पाठिंब्याची जोड मिळाल्यामुळे मी समाजासाठी काहीतरी करू शकले.

 

शिकत गेले समृद्ध होत गेले: महिला हक्क संरक्षण समितीचं काम १९८२मध्ये सुरु झालं. त्या काळात मला कशाचीच माहिती नव्हती. न कायद्याची माहिती होती, ना सामाजिक प्रश्नांची ओळख होती. आजपर्यंतच्या आयुष्यात बाहेर च्या जगात एकट्यानी वावरायची कधी वेळच आली नव्हती. समाज, त्यातील माणस, त्यांचे प्रश्न, त्यांचातील लबाडी, त्यांच्या गरजा आणि त्या भागवण्यासाठी त्यांना आयुष्याशी करावा लागणारा समझोता! ह्या सगळ्या बद्दल फारशी माहिती नव्हती. संस्थेच्या कामातून मला हळू हळू समाज कळायला लागला. त्यातील माणस थोडी थोडी समजू लागली.

12 comments:

  1. मस्त हेमताई.खूप छान कल्पना आहे ही.

    ReplyDelete
  2. सुंदर कल्पना

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर मॅडम 👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान सुरवात केली आहे हेमा मॅडम रत्ना ची कथा वाचून तर खुप दुःख झालं आजही किती तरी महिलांना असा त्रास होत आहे पण अशा महिलांना त्यातून बाहेर आणून त्यांच्या पुनर्वसन साठी केलेली तुमची मदत लाख मोलाची ठरते मला आजही तुम्ही माझ्या वडिलांना सांगितले ले वाक्य आठवत आहे की आपण आपल्या मुलीना जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य तर दिले पण त्यांना तो कसा निवडायला हवा हे सांगायला कमी पडलो माझ्या घरी हे खूप पटलं कारण सर्व स्वातंत्र्य देऊन पण जोडीदार निवडी बाबत मी चुकले होते असो पण यातूनही सावरायला तुमच्या सारख्या अनेक हेमा ताई ची समाजाला नितांत आवश्यकता आहे.
    असो कल्पना खूपच छान आहे समाजातील प्रत्येक महिलांना यातून बळ निश्चित मिळेल परत एकदा अभिनंदन

    ReplyDelete
  5. You have been doing a great work, much needed. Wishing that this kind of behaviour in our society is eliminated, so such work is no longer necessary.

    ReplyDelete
  6. छान लिहिलंय , पुढे रत्नाच काय झालं?

    ReplyDelete
  7. हेमा, चांगले लिहीले आहेस.

    ReplyDelete
  8. hema blog vachun tuza khup abhiman vatala ashaprakarche samajik kam karayla khup dhadas lagate te tu sarva paryanta pochvtes khup chan vidya phatak

    ReplyDelete