Tuesday 25 August 2020

आंटीचा डबा

 

माझ्या सारखी सुखवस्तू कुटुंबातील मुलगी वस्त्यांमध्ये जाऊन काम करते, ते पण सामाजिक काम, हे बघून खूप लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले. काही जणांनी ते विचारून दाखवले. उदाहरणार्थ,"ताई, तुम्हाला समाजकार्याची पहिल्या पासून आवड होती का इकडे आल्यावर (सासरी) आवड निर्माण झाली?तुम्हाला हे काम करताना काही अडचण आली का?" माझ्यासाठी हा अवघड प्रश्न आहे. ह्या कामाची गरज आहे हे पहिल्यापासून समजत होत, पण संधी इथे आल्यावर मिळाली. इतरांच्या उपजोगी पडण्याचे संस्कार लहानपणा पासूनचेच आहेत. पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपल्यापरीने शक्य असेल तेव्हढे करायला हवे हे लहानपणीच्या एका प्रसंगातून शिकले.

मेरी डिसौझा, माझी बालवाडीपासून ची मैत्रीण! आमची घरं आमने सामने होती, त्यामुळे दिवसातला बराच काळ एकमेकीन कडे पडे रहो असायचो. मेरीला ३ भाऊ आणि १ बहीण. तिचे वडील टेक्स्टाईल मिल मध्ये कामाला होते. घरखर्चासाठी त्यांची फारशी मदत होत नव्हती. मग ऑन्टी(मेरीची आई) विविध प्रकारची काम करून कसातरी खर्च भागवायची. त्यांच्या घरी कोंबड्या, बकर्या, कुत्री, पोपट,मैना असे विविध प्राणी आणि पक्षी असायचे. ऑन्टी कागदी फुलं बनवून विकायची. केकच्या ऑर्डर घ्यायची. त्यांच्या घरी काही ना काही घडत असायचं. नाताळ आणि न्यू इयरला तर तिच्या केकला इतकी मागणी असायची की तो आठवडा रोज जागरण असायचंच. मी पण त्यांना सर्व कामात मदत करायचे.

एक वर्षं, (मी बहुदा ७वीत असेन) ऑन्टीला १०० अंड्याचा एक, अश्या २ केकची जम्बो ओर्डर मिळाली. खूप मेहेनत घेतली, दोन रात्री तीन वाजेपर्यंत काम केलं आणि ती ओर्डर पूर्ण करून दिली. आम्ही सगळे खूप खुश होतो. २-३ दिवसांनी ऑन्टीला पैसे मिळाले. तिने मला त्यातील काही रक्कम देऊ केली. मी घेणार नाही म्हणाल्यावर नाराज झाली. एव्हाना मी तिच्यासाठी तिची एक मुलगी असल्यासारखच ती वागत होती. त्याच अधिकारांनी मी तिला सांगितलं,"ऑन्टी,माझे पैसे पण तुमच्या डब्यात टाका."

आंटीचा डबा हा एक त्यांच्या घरातील नाजूक विषय होता. ती त्याच्या बद्दल खूपच सेन्सिटिव्ह होती. मी खूप दिवस बघत होते कि कुठल्याही कामाचे पैसे मिळाले कि त्यातली काही रक्कम ऑन्टी ह्या डब्यात टाकायची. एक दिवस अंकल दारू पिवून आले. येतांना चिकन कबाब आणले होते. ते खायला बसले. जुडास, मेरीचा सगळ्यात धाकटा भाऊ, वय ४ वर्ष! त्यांनी वडिलांकडे कबाब मागितले. ह्या कारणावरून अंकलनी त्याला खूप मारलं. त्याचा एक दात पडला. जुडास चिकनसाठी हटून बसला. दिवसभर काम करून दमलेल्या ऑन्टीने जोरात ओरडून सांगितलं,"चिकन आणायला माझ्याकडे दमड्या नाहीत. आज मुगाची खिचडी करणार आहे. जेवायचं असेल तर जेवा नाहीतर पाणी पिवून झोपा. माझ डोकं फिरवू नका." (घरातली काम, ५ मुलं, त्यांच्या मागील उठबस, बारा महिन्यांची पैशांची चणचण, घरखर्च भागवण्या साठी करावे लागणारे कष्ट, त्यात नवऱ्याचा विचित्र स्वभाव, त्याची लफडी, वेळप्रसंगी होणारी मारहाण, ह्या सगळ्यामुळे ती कावलेली असायची. तेंव्हा हि कारण समजत नव्हती, पण माताजींशी पंगे घ्यायचे नाहीत, एव्हढं आम्हाला समजत होतं!)

फळीवरच्या डब्यात पैसे आहेत हे मला काय, सर्वांनाच ठाऊक होतं. मी हिम्मत करून विचारलं,"ऑन्टी, आपण त्या डब्यातल्या पैश्यातून चिकन अनुया का?"

त्यावर 'नाही. ते आपले पैसे नाहीत'. ह्या उत्तरांनी विषय कट करून टाकला.

 तो डब्बा आणि त्यातील पैसे! त्या डब्यातील पैशांचं ती काय करणार होती? मला जाणून घ्यायचच होतं. आज पर्यंत मी मुलांसाठी काही पण करायची तयारी असणाऱ्या खूप आया पाहिल्या होत्या. पण हि माता आणि तिचं वागणं मला समजत नव्हतं. ४ वर्षाच्या लेकराला रागावली, त्याचावर चिडली, तो उपाशी झोपला तरी तिला चालणार होतं. इतकंच काय त्या दिवशी जुडासनी तिचं ऐकलं नसतं तर त्यांनी मार पण खाल्ला असता. त्या दिवसापासून तो डबा आणि त्यातील पैसे ह्याच्या बद्दलचं उत्तर शोधण्यासाठी मी वेगवेगळे प्रयत्न केले. केकच्या निमित्तांनी मला त्याचं उत्तर मिळेल अशी आशा होती. आणि तसच झालं. दोन दिवसांनी क्रिसमस इवच्या (नाताळच्या आधीचा दिवस) दिवशी मला ऑन्टीनी बोलावला आणि म्हणाली," हेमा, तुमको डब्बेके बारेमे जानना था ना? आज मेरे साथ चलो. हम चर्चमे येशू का प्रेयर बोलेगा, फादरसे ब्लेसिंग लेगा और फिर जाएगा. तुम्हारी मम्मिको बोलके रखना देर होएंगा. तुम हमारे साथ है."

घरून आम्ही दोघी निघालो. आधी चर्च मध्ये गेलो. तिथे येशूची प्रार्थना केली. धर्मगुरूला भेटलो, त्याचा आशीर्वाद घेतला. मग बाजारात गेलो. ऑन्टी ला हव्या असलेल्या वस्तू घेतल्या. एवढं करेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता. आम्ही चालत चालत एका वस्तीपाशी आलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वस्तीत (झोपडपट्टीत) जात होते. सर्वकाही माझ्या समजण्या पलीकडच होतं. मी आयुष्यात इतकी दाटीवाटीनी राहणारी माणस पाहिली नव्हती. इतकी गरिबी, इतका रोज लागणाऱ्या गोष्टींचा अभाव. हे माझ्या शहरात,माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या पाई चालत जाण्याच्या अंतरावर असून मला ह्याची कधीच जाणीव झाली नाही? त्या नंतर आम्ही जिथे गेलो ती झोपडी, तिथलं दारिद्र्य, ते कुटुंब आणि त्यांची जगण्यासाठीची धडपड मी आजपर्यंत विसरू शकले नाही. आम्ही आणखीन पुढे गेलो. गल्ल्या अंधाऱ्या व अरुंद होत्या. अखेरीस आम्ही एका झोपडी पाशी येऊन थांबलो. आतमध्ये किर्र अंधार. लहान मुलं भुकेनी कळवळून रडण्याचा आवाज येत होता. किती मुलं असावीत ह्याचा मी अंदाज लावत होते. दोन असावीत असा माझा अंदाज होता. एक क्षीण आवाज त्यांची समजूत काढत होता. हातातील सामान खाली ठेवत ऑन्टीने त्यातून मेणबत्ती काढून पेटवली. झोपडीतल दृश्य भयानक होतं. आतमध्ये एक बाई होती. तिच्या मांडीत एक बाळ व भोवती तीन मुलं होती. सगळी नागडी. त्यातील एकाला ग्लानी आली असावी. दोघं रडत होती आणि चौथ्याच्या तोंडातून आवाजच येत नव्हता. त्या बाईची अवस्था बघवत नव्हती. अंगभर कपडा नाही. जे फडकं होतं त्यानेच अंग झाकायचा प्रयत्न करत होती. पोट खपाटी गेलेलं. अंगावर मुठभर पण मास नव्हतं. हतबल आणि केविलवाण्या नजरेने ती त्या लेकरांना बघत होती आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

ऑन्टी नी पिशवीतून सोबत आणलेलं सामान काढलं. बाईसाठी साडी आणि गाऊन. मुलांसाठी अंदाजानी आणलेले कपडे दिले. त्यांच्यासाठी आणलेला केक, खाऊ,फळ आणि थोडा शिधा दिला. त्या बाई नी ती साडी आधी स्वतःभोवती गुंडाळून घेतली. ऑन्टी तिच्या पद्धती प्रमाणे म्हणाली,"मेरी क्रिसमस." मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद होता. त्या माउलीच्या चेहेर्यावरचे भाव खूप काही सांगत होते. तिने हात जोडले. तिने काही सांगण्याची गरजच नव्हती.

आम्ही बाहेर पडलो. मी माझ्या विचारात मग्न होते. हे जग, हि माणस,ते जगत असलेलं आयुष्य. सगळंच माझ्यासाठी नवीन आणि मला व माझ्या विचारांना हलवून टाकणारं होतं.

"अग, हेमा. कुठे हरवलीस? आयुष्य हे असं आहे. आपल्याला देव जे देतो त्यातील काही हिस्सा हा आपला नसतो. तो त्या माउली, तिची मुलं आणि तिच्यासारख्या अनेक लोकांसाठी असतो." ऑन्टी च्या वाक्यांनी मी भानावर आले .


7 comments:

  1. फारच मन हेलावून टाकणारा अनुभव!धन्य ती माऊली.आपल्या कपड्यांना ठिगळ लावून इतरांची लाज राखत होती. त्रिवार सलाम!👍

    ReplyDelete
  2. I remember Desouza household and her fruits made of Marzipan which we kids used to love and I remember was the main motivation in going to their house at Xmas but did not know this background.
    Pratibha

    ReplyDelete
  3. Atya....खूप खूप मनापासून लिहिलेला आहे....मला भरून आलं...i can see all the scenes though i am not eye witness... 👌👌👌

    ReplyDelete
  4. Really touching story and Mrs.Mary waa a brave lady with golden heart.
    Mam hats off to you and your work

    ReplyDelete