Monday, 29 March 2021

प्रेम???

 

सकाळी ६ वाजताच मोबाईलच्या रिंगनी जागी झाले. कोणाचा फोन असेल? असा विचार करत झोपेतच, 'हेलो' म्हणाले, तर समोरून रोहिणी ताईचा आवाज! थोडा वैतागलेला, थोडा टेन्शन असल्यासारखा. (एका शैक्षणिक संस्थेत बरोबर काम करत असल्याने माझी आणि रोहिणीची ओळख. तोंड देखलीच! अलीकडच्या काळात त्यांची मुलगी, रेवती मुळे अधून-मधून त्यांचा फोन यायचा. पण आज जवळ-जवळ चार महिन्यांनी त्यांनी संपर्क साधला होता.)

"बाई, रेवती आज पहाटे २.३० वाजता घरी आली. तिची अवस्था बघवत नव्हती. अंगा-खांद्यावर एक दागिना नाही कि पायात चपला नाहीत. बहुतेक मार खावून आली आहे. उपाशीपण होती. चहा-बिस्कीट दिले आणि रमेशला (रेवतीचा भाऊ) सांगितलं, 'सकाळ झाली कि तिला संस्थेत नेऊन सोड.' तो तिला घेऊन गेला आणि मी तुम्हाला फोन लावला. काय करावं ह्या मुलीचं काही कळत नाहीये. मागील १३ वर्षात कमी वेळा का मी तिला समजावलं असेल? अगदी जयेश बरोबर लग्न करायचं ठरवलं तेंव्हापासून! अलीकडे तो तिला देत असलेली नोकरासारखी वागणूक, पदोपदी करत असलेला अपमान, सर्व गोष्टी मला खटकतात. आता तर मार-हाण करतो. तिला खूप वेळा समजावलं 'त्याला सोड. तू त्याला सोडलस तर तुझ्यासाठी काहीतरी करता येईल.' तिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, त्याला काय करू? तुम्ही पण कमी वेळा तिला समाजावलत का? पण ती कोणाचं ऐकतच नाहीये. मी हात टेकले ह्या मुलीपुढे. मी तिला माझ्या घरात ठेवून घेऊ शकत नाही."

"अहो रोहिणीताई, असं म्हणून कसं चालेल. तुम्ही तिला समजून घेतलं नाही तर कोण घेणार? अशा प्रसंगातच मुलींना आई-वडिलांच्या आधाराची जास्त गरज असते. तुम्ही तिला असं संस्थेत नका ठेऊ. तिच्याशी बोला, तिला समजून सांगा."

मला समजत होतं कि माझा एकही शब्द त्या ऐकत नव्हत्या, त्यांना ऐकूच जात नव्हता. त्या रेवतीवर, तिच्या वागण्यावर इतक्या चिडल्या होत्या, वैतागल्या होत्या कि त्यांनी एका वाक्यात रेवतीचा विषय संपवला. "बाई, रेवतीला आणि तिच्या विचित्र स्वभावाच्या नवऱ्याला (जयेशला) समजून घ्यायची आणि माफ करायची माझी ताकत संपली. मी तिला भेटणार नाही आणि तिच्याशी बोलणार नाही."

रोहिणीताई साठी रेवतीचा विषय संपला होता.

 रेवती, गोरी,नाजूक, दिसायला सुरेख! कुण्या एके काळी हसरा चेहेरा आणि खेळकर स्वभाव होता.आज जयेशच्या कृपेनी ते सर्व भूतकाळात जमा झालं होतं. रेवती आणि जयेशचा प्रेम विवाह! १३ वर्षांपूर्वी आई-वडील, नातेवाईक ह्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन झालेला. ह्या जोडप्याचा स्वीकार करायला घरच्यांना तब्बल २ वर्षं लागली. ते सुद्धा समाजाच्या कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात भेटल्यावर तोंडदेखली विचारपूस करण्याइतपत. सासरी जयेश आणि त्याचे नातेवाईक जी वागणूक देत होते ती रेवतीने स्वीकारली होती. १३ वर्षात माहेरी एखाद दोन वेळेस येणं झालं असेल तेवढंच. एक वर्षापासून रेवतीच्या आयुष्यात प्रोब्लम वाढले. वाढले म्हणजे मला समजले. तोपर्यंत तिने जे काही सहन केलं होतं ते मला नंतर समजणार होतं.

साधारण एका वर्षा पूर्वी रेवती आणि तिचा प्रोब्लम माझ्या आयुष्यात आले. तेंव्हा जयेशनी येऊन रोहिणीच्या घरासमोर गोंधळ घातला होता. रस्त्यावर उभं राहून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या होत्या आणि धमक्या दिल्या होत्या. तेंव्हा रोहिणीने  पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हाचं कारण कमाल होतं. जयेशला कोणी तरी सांगितलं, 'रेवती खूप मुलांना आवडायची.लग्नाआधी खूप मुलं तिच्यावर लाईन मारायचे'. जयेशच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं. तो सारखा रेवतीला एकच प्रश्न विचारत होता. 'लग्ना आधी तुझं कोणाबरोबर लफडं होतं? तू मला खरं काय ते सांग.' रेवती नाही म्हणाली कि मारायचा. ती कबूल होत नाही म्हणून त्याने तिला माहेरी आणून सोडली. रोहिणीने ज्या दिवशी तक्रार केली त्या दिवशी तो अचानक तिला (रेवतीला) घ्यायला आला आणि म्हणाला, 'रेवती तुझी मजा करून झाली असेल तर चला. का अजून कोणी बाकी आहे. नवऱ्याची तर आठवण नाहीच आहे पण तुझ्या मुलांना पण विसरलीस का? मी ३ मोजायच्या आत खाली ये आणि गाडीत बैस. घरी गेल्यावर तुझ्याकडे बघतोच'. त्याचा अवतार बघून रेवती इतकी घाबरली होती कि अजून तमाशा नको म्हणून तिची आई नको म्हणत असतांना पण ती जयेश बरोबर जायला निघाली.

त्या दिवशी ती गेली ती परत-परत अपमानित होऊन, मार खाऊन माहेरी धाडली जाण्यासाठीच, जणूकाही. मागील एक वर्षात जयेशनी कमीत कमी चार वेळा हा तमाशा केला असेल. (मला ठाऊक असलेलं चार वेळा!) पहिले दोन वेळा जयेश, रेवतीला माहेरी हाकलून द्यायचा. तिला माहेरी येऊन दोन दिवस होत नाहीत, जरा घरातले तिला समजावत नाहीत तो जयेशचा फोन यायचा. जयेशनी फोन केला कि रेवती मागचापुढचा विचार न करता त्याच्या सोबत गाडीत बसून निघून जायची. दर वेळेस, रोहिणी वैतागून आणि काळजीने मला फोन करायची. आणि प्रत्येक वेळेस मी तिला म्हणायचे, 'रोहिणी, रेवती आली कि मला कळव. गेल्यावर सांगून काय उपयोग?' तिसर्यांदा जेंव्हा रेवती मार खाऊन, जयेशनी हाकलून दिलं म्हणून माहेरी आली तेंव्हा रोहिणी तिला घेऊन तडक माझ्याकडे आली. आम्ही रेवतीची रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि रोहिणीचा आग्रह होता म्हणून रेवतीला संस्थेत राहायला पाठवली. तिच्या बरोबर दोन वेळा सिटिंग झाली. प्रत्येक वेळेस तिचं एकच म्हणणं होतं, "बाई, जयेशला आणि मुलांना माझी खूप गरज आहे. तो माझ्या शिवाय राहू शकत नाही म्हणूनच मला घ्यायला येतो. माझंच काहीतरी चुकलं असेल. म्हणून तर जयेश असं वागतोय. प्रेमात खूप ताकद असते. माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मी माझ्या प्रेमानी जयेशला परत मिळवीन."

रेवती सगळ्याला हो म्हणत होती. पण तिच्या मनात काय चाललं आहे ह्याचा अंदाज येत नव्हता. तिला विचारून, तिच्याशी बोलून जयेश आणि तिची एकत्र बैठकीची तारीख ठरवली. तिला बजावून सांगितलं कि, 'लिखापढी केल्याशिवाय जयेश बरोबर जायचं नाही. लिहून घेतलं कि त्याच्यावर पण त्याचं थोड दडपण राहील, आमचं पण लक्ष राहील आणि तो इथून पुढे नीट वागेल.'

जयेशला फोन द्वारे एकत्र बैठकीची तारीख कळवली. बैठकीच्या आदल्या दिवशी त्याचा रेवतीला फोन आला आणि संस्थेतील कार्यकर्त्या 'जाऊ नकोस. ताईना भेटल्याशिवाय, लिखापढी केल्याशिवाय जाऊ नको,' असं सांगत असतानापण ती जयेश सोबत गेली. इतक्या घाईत कि स्वतःच सामान पण घ्यायला थांबली नाही.

त्यानंतर रेवती परत आली तेव्हा जयेशनी तिला एका कामगिरीवर पाठवली होती. यावेळी त्याने मुलं स्वतःकडे ठेऊन घेऊन रेवतीला एकटीला पाठवली होती. रेवतीच्या आईंनी आणि नातेवाईकांनी त्याच्या केलेल्या फसवणुकीबद्दल आणि अपमानाबद्दल (रेवतीच लग्नाआधी लफडं होतं असं त्याचं म्हणणं होतं, ते तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी ते लपवलं असंही त्याचं म्हणणं होतं. आणि जयेशनी केलेल्या तमाशाबद्दल रोहिणीनी केलेली पोलीस कम्प्लेंट!) त्यांनी जयेशचे पाय धरून माफी मागावी. जर का तिच्या नातेवाईकांनी जयेशच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली तर तो रेवतीला घरात घ्यायचं कि नाही ह्याचा विचार करेल. हे कोणालाच मान्य होण्यासारखं नव्हतं, पण माहेरच्या लोकांनी माफी मागितली तर आपला संसार वाचेल, ह्या वेड्या आशेवर रेवती तेपण करायला तयार झाली. ती रोज सकाळी संस्थेच्या कार्यालयातून परवानगी काढून बाहेर जायची आणि संध्याकाळी दमलेली, हरलेली परत यायची. एकटीच रडत बसायची. तिच्याशी बोलायचा, तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. रोहिणी तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलायला तयार नव्हती. तिच्यासाठी जणू, रेवती आणि तिच्या आयुष्याशी रोहिणीला काही देणघेण नव्हतं.

रेवतीला येऊन एक आठवडा झाला असेल. एक दिवस संस्थेतून रेवती सकाळी नेहेमी प्रमाणे गेली ती परत आलीच नाही. एक दिवस वाट बघितली, तिच्या आई-वडिलांकडे, नातेवाईकांकडे चौकशी केली. शेवटी पोलिसांत रीतसर मिसिंग दाखल केली. आणि दुसऱ्या दिवशी उशिरा रेवती माझ्या घरी आली. रेवतीला बघून बरं वाटलं पण तिचा हरलेला, उदास चेहेरा बघून तिची खूप काळजी वाटली. भकास चेहेर्यानी ती माझ्याकडे बघत म्हणाली, "बाई, सगळं संपलं. कोणीच जयेशची माफी मागायला तयार नाहीये. त्यांचं पण बरोबर आहे. ते तरी कशाला मागतील. संसार माझा मोडणार आहे. त्यांना कशानी काहीच फरक पडत नाही. मी जयेश आणि मुलांशिवाय नाही जगू शकत. मी माझं आयुष्य संपवायचं ठरवलं आहे. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणून भेटायला आले." मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. माझ्या आजपर्यंतच्या कामात किंवा आयुष्यात असं कधी घडलं नव्हतं कि 'आत्महत्या करायला निघालेली व्यक्ती जाण्यापूर्वी  भेटायला आली असेल'. हि परिस्थिती कशी हाताळायची मला काही सुचत नव्हतं. मनात पहिला जो विचार आला ते करून मी मोकळी झाले. मी तिला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवत वेड्यासारखी म्हणत राहिले, "रेवती, काही संपलं नाहीये. मी आहे ना. तू माझ्याकडे आली आहेस ना, आपण ह्याच्यातून मार्ग काढू. सगळं ठीक होईल. तू शांत हो, बैस, थोडं पाणी घे. दमली आहेस. दोन घास खा आणि आराम कर. आपण उद्या सकाळी बोलू."

"बाई आता मेल्यावर आरामच आराम आहे. मी मेल्यानी कोणाला काहीच फरक पडणार नाही. आई-वडील, भाऊ, नातेवाईक, सगळ्यांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. जयेश माझं तोंड बघायला तयार नाही. मला माझी मुलं भेटत नाहीत. कोणी मला घरात ये पण म्हणत नाहीत. कोणासाठी जगू?"

"माझ्यासाठी" ह्या माझ्याकडून आलेल्या उत्तरांनी ती थोडी गोंधळली, काही क्षण माझ्याकडे बघत बसली आणि अचानक मला "मावशी" म्हणत गळ्यात पडून खूप रडली. थोड्या वेळानी शांत झाली. तिच्या समोर पुढचा प्रश्न होता ती रहाणार कुठे? हा प्रश्नच माझ्या मनात आला नव्हता. कुठे म्हणजे काय माझ्या घरी! (घरातून मी करत असलेल्या कामाबद्दल माझा अभिमान तर होताच पण पूर्ण सपोर्ट होता. मुख्यतः माझ्या नवर्याचा! तो नसता तर मी एवढा मोठा निर्णय एका फटक्यात घेऊच शकले नसते. त्याचा माझ्या कामाला पूर्ण पाठींबा आहे म्हणून मी हे काम आज पर्यंत करू शकले.)

रेवती थोडी रीलेक्स झाली. ती माझ्या घरी रहायला लागली, माझ्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून. (ती माझ्या कडे आहे हे पोलिसांत कळवलं, तसच रोहिणीताईला पण कळवलं. अजून त्यांच्या मनातली नाराजी कमी झाली नव्हती. रेवती सुखरूप आहे ह्यांनी त्यांना निश्चितच बर वाटलं पण त्यांनी येऊन तिला भेटायचं टाळल.) ती आमच्या घरात छान रमली. पण जयेशचा त्रास काही कमी होत नव्हता. तो रोज दिवसातून ३-४ वेळा फोन करून तिला घाणेरड्या शिव्या द्यायचा, धमकावायचा. ती घाबरून रडत बसायची. 'रेवती त्याचा फोन घेऊ नकोस. नाहीतर त्याला खडसून जाब विचार. त्याचा फोन आला कि माझ्या कडे दे, मी बोलते.' ह्यातलं ती काहीच ऐकायला किंवा करायला तयार नव्हती. तिचं एकच म्हणणं होतं, "मावशी, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तो असा वागतोय."

शेवटी एक दिवस माझा पेशन्स संपला. मी तिला विचारलं,"रेवती, तुला कशा मुळे अशी खात्री वाटते कि त्याचं तुझ्यावर प्रेम आहे? प्रेम करणारी माणस, आपली माणस किंवा जोडीदाराला त्रास होईल असं वागत नाहीत. त्यांना मुलांचं भांडवल करून emotional blackmail करत नाही. त्याचा अपमान करत नाहीत. त्याला इजा किंवा मार-हाण करत नाहीत."

त्यावर ती म्हणाली, "आपलं ज्याच्यावर प्रेम असत त्याच्यावरच माणूस अधिकार गाजवतो. तो चुकला कि त्याला सजा देतो. आणि लाड पण तितकेच करतो. जयेश कडे मी दोन नवीन साड्या मागितल्या कि तो चार आणून द्यायचा. मला लागणाऱ्या सर्व वस्तू जयेश आणून द्यायचा. मला beauty parlour  ला सोडायला आणि घ्यायला यायचा. तो नेहेमी म्हणायचा, 'रेवती मी आहे तर तुला मैत्रिणींची आणि नातेवाईकांची गरजच काय? माझ्या प्रेमात काही खोट आहे का? तुला हवं तिथे मी घेऊन जातो. तू एकटीने कुठे जाऊ नकोस.' (नवीन साडी नेसून रेवतीला एकटीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. कधीच, कुठेच ती एकटी बाहेर जाऊ शकत नव्हती. तिला एकटीला माहेरी जायला परवानगी नव्हती. ती तिच्या आवडी प्रमाणे आणि गरजे प्रमाणे खरेदी करू शकत नव्हती. हे वागणं चुकीचं आहे असं तिला कधी वाटलं नाही.) मला आणि मुलांना, त्याचा मूड असेल तेंव्हा रात्रीची जेवणं झाल्यावर आम्हाला गाडीतून आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. (रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर, काळ्या काचा चढवून, बंद गाडीतून चक्कर!) मावशी मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची. मी केलेली घरातली सफाई, (६ खोल्यांचा मोठा बंगला होता. त्याची दिवसातून दोन वेळा) लादी पुसणं, सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं,  मी केलेला स्वैपाक, त्याच्या आई-वडिलांची सेवा, मुलांच्या मागे उठबस, त्याला तिन्हीत्रिकाळ त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवून देणं. मावशी माझ्या घरी मुलांपासून ते मोठ्यान पर्यंत प्रत्येकाची आवड वेगळी. प्रत्येक जेवणाला ३-३ भाज्या, चपाती, भाकरी असा स्वैपाक करायचा. (माझ्या शिवाय कोणाच्या हातच काहीच माझ्या घरातल्यांना आवडायचं नाही. म्हणून आमचं लग्न झाल्यावर सहा महिन्यातच घरातल्या नोकरांना सुट्टी देऊन टाकली.) घरातल्या कामात दिवस कुठे निघून जायचा कळायचंच नाही. आणि त्याचं इतकं प्रेम होतं कि रोज रात्री मी जवळ लागायचेच. (हे सांगताना ती छानशी लाजली.) मग काळजीने म्हणाली आता जयेशच कस होत असेल? तो अगदी एकटा पडला."

बोलता-बोलता ती विचारात तिच्या जयेश कडे पोहोचली होती. ह्या सगळ्या संभाषणातून माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती कि ह्या सगळ्यातून रेवतीला बाहेर काढणं गरजेचं होतं पण काम अवघड  होतं. तिच्या अंगात खूप कला होती. ती सुंदर चित्र काढू शकत होती. डिप्लोमा पर्यंत शिक्षण झालं होतं. ह्या सगळ्याचा तिने आयुष्यात उपयोग करून घ्यायला हवा होता. पण जयेशची मनात इतकी भीती होती आणि त्याने निर्माण केलेला प्रेमाबद्दलचा खोटा पगडा होता कि ती घराबाहेर एकटी जायला घाबरायची. आज गरज होती तिच्यातला आत्मविश्वास तिला परत मिळवून देण्याची.

मग काय? रोज माझ्या बरोबर तिला घेऊन गेले. महिला हक्कचं ऑफिस असो कि शाळेचं काम असो. ह्यामुळे तिच्या नवीन ओळखी झाल्या, थोडा मोकळा विचार करायला लागली. तिचं तिलाच समजलं कि घाबरून घरात राहायची आवश्यकता नाही. (महिला हक्क संरक्षण समितीच्या ऑफिसला आल्याने तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिच्या सारख्या किंबहुना तिच्या पेक्षा वाईट परिस्थितीतून बायकांनी मार्ग काढला आहे आणि आज त्या स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगतायत. शाळेतल्या मुलांमुळे तिला तिच्या मुलांपासून लांब राहणं,अवघड असलं तरी जमू लागलं.) 

खाली मान घालून, सोशिकपणे जगणारी रेवती हळू-हळू बदलत होती. माझ्या देखत, तिच्या नकळत. एक दिवस तिने अचानक विचारलं, "मावशी, फारकत घ्यायला काय करावं लागेल?" 

"रेवती कोणाला , कोणापासून फारकत घ्यायची आहे?"

"मावशी, मीच विचार करतीये. जयेश बरोबरच्या माझ्या नात्याला काही अर्थ नाही. त्याच्यापासून फारकत घेतली कि रोजचं टेन्शन तरी कमी होईल. तो कुठे भेटेल का? मला त्रास देईल का? माझ्यावर नवरा म्हणून हक्क गाजवेल का?"

"रेवती, नुसती फारकत घेऊन हे साध्य होणार नाही. तुला मनातून खंबीर व्हायला हवं. तो समोर आला तरी न घाबरता आत्मविश्वासानी त्याला सामोर जायची तयारी हवी. आपण खूप वेळा बोलावलं, पण तो एकदा पण भेटायला आला नाही. तो सुखासुखी फारकत देईल असं मला वाटत नाही. तुला त्यासाठी वकिलामार्फत कोर्टात दावा दाखल करावा लागेल. दुसरी गोष्ट. तुझं चांगलं शिक्षण झालं आहे. कुठे तरी नोकरी शोध आणि स्वतःच्या पायावर उभी हो, स्वावलंबी हो."

ह्याचा उपयोग असा झाला कि पुढील काही दिवसांत तिने तिच्या डिप्लोमाच certificate शोधलं, मला विचारून दोन ठिकाणी अर्ज केला, आणि स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवली. कोर्टात वकिलांना भेटून फारकतीचा दावा दाखल केला.

अपेक्षेप्रमाणे जयेशनी कोर्टाच्या एकाही नोटीसला उत्तर पाठवलं नाही, किंवा तो कोर्टासमोर हजार झाला नाही. शेवटी वर्ष-दीडवर्ष नोकरी सांभाळून कोर्टात खेटे घातल्यावर (कायदेशीररीत्या दोन वर्षांपासून नवर्यापासून विभक्त असल्याच्या युक्तिवादावर) एकतर्फी फारकत मिळाली. फारकतीचा विषय काढला तेंव्हा मनानी आणि फारकत मिळाल्यावर कायदेशीररीत्या रेवती, जयेश पासून मुक्त झाली. स्वतंत्र झाली.

आज रेवती, तिच्या आई बरोबर रहाते. नोकरी करते. आणि मजेत आहे.

 

 

 

 

No comments:

Post a Comment