Monday, 22 February 2021

 

बदला

त्या दिवशी ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. मीच सोनावणेना एक वाजताची वेळ दिली होती ते साफ विसरून गेले. माझ्या समोर बसलेल्या जोडप्यातील नवरा जळगावला एका बँकेत मेनेजर होता. महामुश्कीलीने त्याला आज एकत्र बैठकी साठी येता आल होतं. (आमच्याकडे एका पार्टीने तक्रार नोंदवल्यावर, आम्ही प्रत्येक केसमध्ये दोघांचं म्हणणं ऐकून घेतो. नंतर दोन्ही पार्टीस ना एकत्र बोलावतो. ह्यातून बरेच वेळा दोघांमधील गैरसमज दूर होतात आणि समझोता होण्याची शक्यता वाढते.) दोघांमध्ये समझोता झाला होता. फक्त दोघांकडून लिहून घेणं बाकी होतं. (समझोता झाला तर आम्ही दोघांकडून लेखी घेतो, 'ज्या कारणांनी वाद आणि भांडण झालं त्या चुका आम्ही पुन्हा करणार नाही. नीट संसार करू........) तेवढ्यात ऑफिसच्या बाहेरून जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकू आला. 'काय झालं?' असं विचारणार तेवढ्यात एक गृहस्थ, "कुठे आहेत हेमाताई? त्यांनी मला एकची वेळ दिली होती. आता दीड वाजत आला, आणि ह्या बाई सांगतायत 'थोडा वेळ थांबा. ताईच्या समोर एक केस आहे. त्यांचं झालं कि बोलतील त्या तुमच्याशी.' आम्ही असं किती वेळ थांबून राहायचं?"

"अहो सोनावणे. मी हेमा. मी तुम्हाला विनंती करते, पाच मिनिटं थांबा. ह्यांचा समझोता झाला आहे. त्यांच्याकडून लिहून घेते आणि बोलते तुमच्याशी."

माझ्या विनंतीचा उपयोग झाला.

दहा मिनिटांनी माझ्या समोर खुर्चीत बसत सोनावणेनी मुलीला सांगितलं," मंगल, जे झालं, जसं झालं, ते सगळं ताईना सविस्तर सांग. त्याच ह्यातून काहीतरी मार्ग सुचवतील. गोविंद काकांच्या मुलाचा प्रोब्लेम पण ह्यांनीच सोडवला."

माझ्या कडे बघत म्हणाले, "ताई, मी इथे थांबलो तर चालेल ना? का बाहेर थांबू? पण मी जवळ असलो तर तिला थोडा आधार वाटेल आणि ती काही सांगायची विसरली तर मी तिला मदत करू शकेन."

मी त्यांना बसण्यासाठी खुणावलं. दोघं बाप-लेक बसले.

मंगलनी अडखळत तिचा प्रोब्लेम मांडायला सुरुवात केली.

"ताई, मी माहेरची मंगल सोनावणे, नाशिकची, आणि सासरचं नाव मंगल जाधव. (सासर पुण्याचं) तीन महिन्यांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी शरद जाधव यांच्या सोबत माझं लग्न लाऊन दिलं. ताई इतकं थाटात लग्न झालं कि आमचं अक्ख गाव आणि नातेवाईक अवाक झाले. २५०० माणस पंक्तीला जेवले. लग्नात समोरून जे मागितलं ते तर दिलंच पण त्याहूनही जास्त दिलं. टीव्ही, फ्रीज, ४ कपाट, डबल बेड, १० तोळे सोनं, सगळा संसार, मला २० साड्या आणि त्याला मचिंग सर्व वस्तू. महागड्या कार्यालयात लग्न लागलं. नवरदेवाला मिरवायला घोडा. बेंड, सासरच्या सर्व मंडळींचा यथोचीत मानपान. हे बाबांना कमी वाटलं म्हणून कि काय शरद रावांच्या मागणीचा मान (नवरदेव फेरे घेताना हटून बसला) म्हणून मोटरसायकल पण द्यायचं कबूल केलं. ताई, मला कळत नाही बाबांनी त्या स्थळात नेमकं काय पाहिलं. कर्ज काढून, जमीन गहाण ठेवून लग्न लावलं. कशासाठी? १० दिवस पण संसार झाला नाही." हे सांगताना मंगलचा संताप संताप होत होता.

न रहावल्याने सोनावणेनी मधेच बोलायला सुरुवात केली. "ताई, मी तुम्हाला सांगतो, ह्या स्थळाची माहितीच अशी आमच्यापर्यंत आली कि, ती ऐकल्यावर मी लागलीच ठरवलं 'हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही. नाही म्हणायला मंगल आणि रोहिणी (माझी बायको) मला 'स्थळाची नीट चौकशी करा' असं वारंवार सांगत होत्या. 'ती माणस इतकी लग्नाची घाई का करतायत' असं पण म्हणत होत्या. पण ताई तुम्हीच सांगा माझ्या बहिणीच्या नणंदेच्या माहितीतलं स्थळ आहे म्हंटल्यावर चौकशी मी करण ठीक दिसलं असत का? माझी मंगल एम ए, बी एड, झाली आहे. घरातील सगळी काम करते. कधी कोणाला उलटून उत्तर देणार नाही. कॉलेज आणि घर, ह्या पलीकडच जग तिला माहिती नाही. तिचा नवरा पण तिला साजेसा, तिला समजून घेईल, तिला सुखात ठेवेल असाच हवा होता. जाधव कुटुंब अगदी तसच होतं. घरात इनमिन तीन माणस. माझी मंगल,शरदराव आणि त्यांची आई. शरदराव कंपनीत नोकरीला. पाच आकडी पगार. मोठा भाऊ सैन्यात. आणि बहीण सासरी. गावाकडे ५-७ एकर शेत जमीन, मोठ्ठा बंगला, दारासमोर दोन महागड्या गाड्या आणि १५ खोल्यांची चाळ (ज्याचं भाडच काही हजार रुपये येत होतं.) आता एखाद्या बापाला आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी आणि तिच्या सुखासाठी अजून काय हवं? मागचा पुढचा विचार न करता मी स्थळाला होकार कळवला. लग्नात नाही म्हणायला थोडी घाईच झाली. लग्नाच्या तयारीला जेमतेम २ महिन्यांचा वेळ मिळाला."

त्यांच म्हणणं मधेच तोडत मंगल म्हणाली, "ताई बर झालं. वेळ कमी मिळाला. माझ्या आयुष्याचं तर वाट्टोळ झालंच आहे, पण डोक्यावरील कर्जाचा डोंगर पण वाढला असता."

"मंगल नेमकं काय झालं?"

"ताई, लग्न करून मी सासरी गेले, मोठ्या बंगल्यात जायची स्वप्नं बघत. (त्यांचे नातेवाईक आणि सगेसोयरे कार्यालयातूनच आपापल्या घरी गेले.) त्यांनी दाखविलेल्या बंगल्यात न जाता आम्ही एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात गेलो. हा काय प्रकार आहे? काही तरी गडबड आहे. 'आपण बहुतेक इथे कोणाला तरी भेटून पुढे जाणार असू,' असा विचार करत होते. तेवढ्यात माझी नणंद मला उद्देशून म्हणाली," वेलकम होम, वहिनी. अग घरात ये ना. अशी दारात काय उभी आहेस?"

'आणि तो आम्हाला दाखवलेला बंगला?'मी बिचकतच विचारलं.

'अग वेडाबाई, तो बंगला तर दादाच्या मित्राचा आहे! आमच्या घरातील प्रत्येकाच लग्न जुळवताना आम्ही तोच दाखवला आहे. त्याची दोन कारणं आहेत. हवं तर हेतू म्हण. पहिलं आलेली पार्टी इम्प्रेस होते व पुढील बोलणी आम्हाला हवी तशी होतात.(जसं तुझ्या बाबतीत झालं) आणि दुसरं 'आपलं पण असं घर असावं' हे समस्त जाधव कुटुंबियांच स्वप्नं आहे. आणि त्यासाठी आमच्याशी नातेसंबंध जोडले गेलेल्या प्रत्येक व्यक्तींनी मेहेनत करायची आहे. तेंव्हा वहिनी बाई, तूर्तास स्वैपाकघरात चला आणि कामाला लागा.'

असं झालं माझं जाधवांच्या घरात स्वागत! स्वागता पेक्षा भयानक पुढचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध लागला कि माझा नवरा काहीच कामधंदा करत नाही. दीर सैन्यात वगेरे काही नव्हता. तो आमच्या बरोबर राहातच नव्हता. पलीकडच्या गल्लीत रहाणारी माझी नणंद आणि नंदोई २४ तास आमच्या घरातच असायचे. नणंदेच्या नवऱ्याची (शेखरची) नजर, त्याचं बघणं, माझ्याकडे बघून ओठावरून जीभ फिरवणं, अंगलट येणं, सगळंच किळसवाण होतं. त्याला बघता क्षणीच मला त्याची भीती वाटली. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ' सगळेच घरी असतात तर मग कोण कमावत? आणि हा शेखर इथेच राहणार का?' मी नवऱ्याला विचारलं तर तो म्हणाला,'अग मंगल, तो आहे म्हणून आपलं घर चालतंय. घर खर्च भागतोय. तोच तर नियमितपणे ताई आणि आई साठी काम आणतो. त्याला अजिबात दुखवू नकोस. त्याला ह्या भागात खूप मानतात. तो आपल्या घरचा जावई आहे हे कळल्यापासून वस्तीत आपला वट वाढला आहे. केबल फुकट, पैशांसाठी वाणी किंवा भाजीवाला तकादा लावत नाही. वीजेच तर बिलच येत नाही. असं समज तोच आपल्या घरातील करता आहे. त्याची मर्जी सांभाळायची. तो सांगेल ते काम करायचं.तो खुश तर आपण सगळे खुश!'

ताई, तुम्हाला सांगते, विचार करून माझं डोकं फुटायची पाळी आली. हा माणूस मला काय काम सांगेल? तो माझ्याकडून कोणत्या कामाची, सेवेची अपेक्षा करेल? तो माझ्याशी वेडवाकड वागला तर घरातले सगळे काय करतील? नवरा काय म्हणेल? शेखर ह्या दोघींसाठी काम आणतो म्हणजे काय करतो? ताई मनात प्रश्नांचा गोंधळ होता आणि सगळ्याची भीती पण वाटत होती. विचार करून डोकं बधीर झालं होतं. मी खाली मान घालून सांगतील ती घरातील सगळी काम करत होते.

मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला आठ दिवसातच मिळाली. घरात भाजीला काही नव्हतं म्हणून मी बाजारात गेले. घरी यायला थोडा उशीर झाला. घरी आले तर समजलं शेखरचा मित्र आला आहे. सासूबाईनी सांगितलं, 'मंगल, स्वैपाक झाला कि आलेल्या पाहुण्यांसाठी चहा-पोहे कर.' मी गेले तेंव्हा आम्ही घरात तिघीच होतो. परत आले तेंव्हा नणंद आणि तो मित्र कुठे दिसत नव्हते. पण मी स्वतःला समजावलं 'मंगल तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही. चहा-पोहे कर आणि गप्प बस.'

पोहे तयार झाल्यावर सासूबाईनी जोरात हाका मारत सांगितलं, 'उषा, चहा तयार आहे ग'. आवाज ऐकून नणंद आणि तो मित्र शेजारच्या खोलीतून बाहेर आले. त्यांचे विस्कटलेले केस आणि कपडे (तो मित्र शर्टाची बटण लावत होता आणि नणंद साडीचा पदर ठीक करत होती) बघून दाराच्या मागे काय घडलं असेल हे न कळण्या इतकी मी लहान किंवा बावळट नक्कीच नव्हते. ह्याचा अर्थ सासू आणि नणंद करत होते ते हे काम होतं तर. आणि मी पण आज ना उद्या हेच किंवा असंच काम करून संसाराला हातभार लावावा अशी माझ्या कडून अपेक्षा होती. शी.... किती किळसवाणी गोष्ट होती. मला सगळ्यांचीच भीती वाटायला लागली. कमाई चांगली झाली म्हणून घरातील सगळे खुशीत होते. माझ्या मनातलं टेन्शन किंवा गोंधळ कोणाला जाणवला पण नाही. त्या दिवशी रात्री जेवताना शेखर आणि शरद यांचं प्लानिंग सुरु झालं. शेखर म्हणत होता,' शरद, मंगलला लवकर मोकळी कर. तुझी सुहागरात वगेरे काही बाकी असेल तर उरकून घे. तिच्या साठी आपल्याकडे लई गिराईक आहेत.' आणि ह्या वाक्यावर दोघांनी एक-मेकांना टाळी दिली. ताई, मी त्या रात्री झोपूच शकले नाही."

सांगता सांगता मंगल रडायला लागली. तिच्या चेहेऱ्यावर भीती, किळस, तिला त्या दिवशी वाटलेली असहायता असे सगळे भाव दिसत होते. सोनावणेनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजुतीच्या स्वरात म्हणाले, "मंगल, बेटा. मला माफ कर. ते आता सगळं संपलं आहे. आपण हेमाताई कडे आलोय ना. त्या सगळं ठीक करतील." (मला कळत नव्हतं असा अनुभव घेऊन आलेल्या मुलीच्या आयुष्यात मी काय आणि कस ठीक करू शकणार होते?)

थोड्यावेळानी मंगल थोडी शांत झाली आणि पुढे सांगायला लागली. "दुसऱ्या दिवशी  बाहेरून काहीतरी आणायच्या निमित्तांनी मी घरातून बाहेर पडले. घरात सगळे कालच्या कमाईमुळे खुशीत होते. काहीही चौकशी न करता सासुनी २० रुपये दिले. मी घरातून बाहेर पडले आणि बाबांना फोन करून सांगितलं 'ताबडतोब घ्यायला या. मी बस स्टेन्ड पाशी आहे. मी जास्त काहीच सांगू शकत नाही. तुम्ही नाही आलात तर...."

तिथून पुढे सोनावणे बोलायला लागले,"आणि ताई, ती लहान मुलीसारखी ढसाढसा रडत होती. काय झालं असेल? ती बरी तर असेल ना? एक गोष्ट जाणवत होती कि जे काही चाललं आहे ते नक्कीच ठीक नाहीये. (हे रोहिणीला आई म्हणून जाणवलं असेल का? दोन दिवसांपासून तिचं एकच म्हणणं होतं,'मंगलला खूप भेटावसं वाटतंय. मी एकदा तिला भेटून येते. मला खूप अस्वस्थ वाटतंय. ती कशी असेल? तिची खूप काळजी वाटतीये.' असं म्हणत ती त्याच दिवशी सकाळच्या बसने पुण्याला जायला निघाली होती.)' ती आता पोहोचतच असेल' ह्या विचारांनी माझं मन थोड शांत झालं. आणि मी मंगलला म्हणालो,"मंगल बेटा, रडू नकोस. आई आजच सकाळच्या बसनी निघाली आहे. ती पोहोचतच असेल."

मंगलचा फोन ठेवला आणि लगेच रोहिणीचा फोन आला. 'मी मंगलला घेऊन घरी परत येत आहे. आल्यावर बोलू.' तुम्हाला सांगतो ताई, आमचं नशीब चांगलं, म्हणून आम्हाला आमची मुलगी सुखरूप मिळाली.

ताई, ह्या सर्वातून सावरायला तिला अडीच महिने लागले.पण आता त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या कडून पैनपई वसूल करायची आहे. आमच्या मुलीचं आयुष्य उध्वस्त केलं. काय समजतात काय स्वतःला? लग्नाला भरपूर १२ लाखांच्या वर खर्च झाला असेल. आता ते वसूल कस करायचं ते तुम्ही सांगा. आपल्याला आपली मुलगी त्या घरात पाठवायचीच नाहीये. पण फारकत फुकटात पण द्यायची नाही."

मंगलच आयुष्य उध्वस्त झालं होतं. 'ती इथून पुढे कोणत्याच मुलावर विश्वास ठेऊ शकेल का किंवा लग्नाचा विचार आयुष्यात करू शकेल का?' हा प्रश्न मला भेडसावत होता आणि सोनावणेना फक्त बदला घेण्यात इंटरेस्ट होता. त्यांना मंगलच्या भावना समजत तरी होत्या का? ती मुलगी मानसिक दृष्ट्या उध्वस्त झाली होती, आणि तिच्या वडिलांच्या डोक्यात फक्त त्यांना धडा शिकवण्या पलीकडे काही येत नव्हतं. मला त्यांचा रागच आला होता. मी म्हणाले," सोनावणे, तुमच्या मुलीच आयुष्य उध्वस्त करण्यात काही अंशी तुम्ही पण जबाबदार आहात. का नाही केलीत चौकशी? अहो, बाजारातून एखादी वस्तू घ्यायची असेल तरी आपण चार ठिकाणी चौकशी करतो. इथे तर तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता."

माझं बोलणं न ऐकल्यासारखं करत सोनावणेनी विचारलं," ताई, पुढचं कस करायचं ते सांगा."

"सोनावणे, जेवणावळ, कार्यालय, मानपान अशा गोष्टींवर केलेला खर्च परत मिळणार नाही. लग्न सोहोळ्यात कायद्याला असा खर्च अपेक्षित नाही/मान्य नाही. मंगलला लग्नात दिलेल्या वस्तू (ज्याच्या खरेदी पावत्या आहेत अश्या) आणि तिला घातलेलं सोनं आणि दिलेले कपडे व इतर चीजवस्तू (जे कायद्यांनी स्त्रीधन आहे) तिला परत मागता येतील. फारकत घ्यायची असेल तर कोर्टात केस ...."

झालेला खर्च वसूल करण्यात संस्था मदत करू शकणार नाही हे लक्ष्यात आल्यावर त्यांचा माझ्याशी बोलण्यातला इंटरेस्ट संपला. त्यांनी संस्थेत तक्रार नोंदवायची नाही असं ठरवलं. ते उठून जायला लागले.जाताना ते एक वाक्य म्हणाले, "ताई, मी त्यांना सुखासुखी सोडणार नाही. मी त्यांना माझ्या पद्धतीने धडा शिकवीनच."

ह्या घटनेला दोन एक वर्षं झाली असतील. मी एक दिवस नेहेमी सारखी ऑफिसला आले तर माझ्या टेबलावर एक पेढ्याचा बॉक्स होता आणि एक पत्र.

"ताई, नमस्कार,

मंगलची फारकत झाली. तिचा दुसरा विवाह झाला. ह्या वेळेस स्थळाची कसून चौकशी केली होती. सासरी ती मजेत आहे.

जाधवांना मी त्यांना समजेल अश्या भाषेत धडा शिकवला आहे.

तुम्ही केलेल्या मदती बद्दल तुमचे मनापासून आभार.

धन्यवाद,

एम.सोनावणे.

(सोनवणेनी त्यांच्या मुलीची केस आमच्या कडे नोंदवली नाही. त्यामुळे त्यांनी कश्या पद्धतीने शरद व इतर लोकांना धडा शिकवला हे समजू शकलं नाही. कधीतरी मंगलची आठवण येते आणि तिची काळजी वाटते.)

 

 

 

Tuesday, 16 February 2021

 

 अद्दल

"ताई, येऊ का?" असं विचारायची औपचारिकता करत जोशी काकू एका तिशीच्या आतल्या महिलेला सोबत घेऊन ऑफिसमध्ये आल्या. मालतीताई जोशी, आमच्या साठी जोशी काकू (आम्हा कार्यकर्त्यांपेक्षा २० एक वर्षांनी तरी मोठ्या असतील). ह्या आमच्या संस्थेच्या (महिला हक्क संरक्षण समिती) स्वयं घोषित कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या बघण्यात एखादी पिडीत महिला किंवा अडचणीत सापडलेली महिला आली कि त्या तिला आमच्या ऑफिसला घेऊन यायच्या. ह्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता. कधी कधी तर रिक्षा साठी पदरचे पैसे पण खर्च करायच्या आणि वर म्हणायच्या, 'तेवढीच समाज सेवा".

माझ्या समोरच्या खुर्चित बसत म्हणाल्या, "ताई, हि संध्या. आज भाजीबाजारात  भेटली. साधारण ओळखीची आहे. म्हणजे बाजारातीलच ओळख. सासरची माणस जरा विचित्र आहेत. दाखवण्या सारखा त्रास नाही, म्हणजे मारहाण वगेरे. सासू कधी ह्यांच्यात असते तर कधी नाशिकरोडला, लेकीकडे. लेकीचं लग्न झालाय. तिच्या नवऱ्याचा टुरिंगचा जॉब आहे. त्यामुळे अधून मधून तिला सोबत महणून सासू तिच्या घरी तर कधी लेक आपल्या आईकडे. मीच काय सांगत बसले आहे. मला बरीच काम आहेत. ताई, मी जाऊ? संध्या, तुला जे सांगावसं वाटेल, बोलावसं वाटेल ते मोकळेपणाने सांग. ताई ह्याच्यातून काहीतरी मार्ग नक्की काढतील."

असं म्हणत जोशी काकू उठल्या आणि त्यांची काम करायला गेल्या. जाताना संध्याला सांगून गेल्या, 'इथेच थांब. माझी काम झाली कि मी तुला न्यायला येते.'

खुर्चीत बसत संध्यानी सांगायला सुरुवात केली,"ताई, मी संध्या. माझं महेशबरोबर ६ वर्षांपूर्वी लग्न झालं. माझं माहेर नागपूर कडच. सासर इगतपुरी येथील. महेश रेल्वेत चांगल्या पोस्टवर आहे. पगार चांगला आहे. घरात सासू (हौसाबाई), नणंद (सरोज), महेश आणि मी. सुरुवातीची तीन वर्षं बरी गेली. छोट्या मोठ्या कुरबुरी होत होत्या. लग्नातील देणघेण, मानपान अशा नेहेमींच्या विषयावरून सासूबाई व इतर सर्वांची कुरकुर असायची. लागोपाठ झालेली दोन बाळंतपण आणि पहिल्या वर्षातील सणवार, ह्या मुळे त्या काळात माहेरहून कोणी ना कोणीतरी भेटायला येत होतं. (तेंव्हा गरज पण होती). येतांना काहीना काहीतरी सासरच्या लोकांसाठी आणत होते. पुढे माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्याचं येणं कमी झालं. खरं सांगायचं तर दोन्ही कडील माणस आणि त्यांच्या न संपणाऱ्या मागण्या पुरविण माझ्या वडिलांना जड जात होतं.

 पुढे सरोजचं लग्न झालं. कर्ज काढून थाटामाटात लग्न केलं. (तेंव्हा माझ्या माहेरच्यांनी मदत करावी अशी अपेक्षा होती. तसं सासूबाईनी बोलून पण दाखवलं. माझ्या वडिलांनी मदत करण्यास असमर्थ आहोत असं कळवल्यावर तो विषय तेवढ्यापुरता थांबला. पण त्याचे व्हायचे ते परिणाम झालेच.)तिचं सासर नाशिकच! तिच्या नवऱ्याची फिरतीची नोकरी. सर्वांच्या सोईसाठी आम्ही इगतपुरीहून नाशकात आलो. महेश रोज अप डाऊन करायचा. त्याच घराकडे आधीच लक्ष कमी होतं, त्यात रोजची धावपळ सुरु झाल्यावर तर बघायलाच नको. त्याचा त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता. खरं तर श्रद्धाच होती. 'ती म्हणेल ती पूर्व दिशा.'तो नेहेमी म्हणायचा, 'माझी आई आहे तोपर्यंत मला कशाचच टेन्शन नाही. बाबा गेल्यानंतर तिनेच तर आम्हाला मोठं केलं. घर संभाळल, आम्हाला शिकवलं. शी इज अ स्त्रोंग अंड ग्रेट वूमन.'

सरोजच्या लग्नानंतर घरातील वातावरण बदललं. खरं तर बिघडत गेलं. संध्याकाळी महेश घरी आला कि त्या (सासूबाई) वाकडं तोंड करून बसायच्या. माझ्याबद्दल उलटसुलट तकरारी करायच्या. अपेक्षे प्रमाणे महेश माझ्यावर वैतागायचा, मग रागवारागवी, वाद, भांडणं असा आमच्या नात्यात तणाव वाढत गेला. इतके की अलीकडे तर मारहाण पण करतो.

पहिल्या पासूनच घरात येणारा प्रत्येक पैसा सासूबाईंना द्यायचा, मग त्यांच्या परवानगीने खर्च करायचा. हि प्रथाच होती. एक दिवस रात्रीच्या जेवणात महेशच्या पानात सासुनी दोडक्याची भाजी  वाढली.(त्याला दोडकी अजिबात आवडत नाहीत, हे माहित होतं तरी.) महेश वैतागला. चिडून म्हणाला, 'इथे मी दिवसभर मरमर मरायचं, कमवायचं, आणि घरी आल्यावर व्यवस्थित जेवण पण नसावं? संध्या, आता तुला साधा माझ्या आवडीचा स्वैपाक पण जमत नाही कि काय?'

मी सांगायला सुरुवात केली, 'आईनी सांगितलं म्हणून......'

तेवढ्यात सासुनी आवाज वाढवत सांगितलं, "हीचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. मी तिला करू नको म्हणाले कि मुद्दाम करते. दोडकी आणू नको असं सांगितलं होतं. विचार तिलाच आणि जरा खडसून विचार. हि दिवसभर पुस्तकं वाचत लोळत पडते. एक काम करत नाही. कि सांगितलेलं ऐकत नाही. सगळी काम करून मी थकून जाते. आता बाजारात जाऊन भाजीपाला पण मीच आणायचा असेल तर ते पण करते. मंदिरात सुधाताई भेटल्या त्या म्हणतच होत्या ह्या शिकलेल्या मुली नवर्यांना आपलंसं करतात आणि सगळी सत्ता ताब्यात घेतात. हे बघ महेश, तू म्हणत असलास तर उद्यापासून तुझी महाराणी म्हणेल तसं."

महेशचा पारा चढत होता आणि सासूबाई आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. त्या संध्याकाळी कोणीच जेवल नाही. सगळ्याचा परिणाम म्हणून आमच्यात खूप वाद झाला. 'आमच्या घरात राहायचं तर शिस्तीत राहायचं. तुझा फालतूपणा खपवून घेणार नाही'. ह्या वाक्यांनी दिवस संपला.

असे प्रसंग वरचेवर घडू लागले. सासूबाई रोज नवीन नाटक करायच्या. वाद आणि भांडण खूप वेळा होऊ लागलं. मी अगदी वैतागून गेले होते. कळत नव्हतं, काय करावं? कोणाशी बोलावं? आई-वडिलांना त्रास द्यायला नको वाटत होता. आणि त्यांना कळवण्याची काही सोय पण नव्हती. घरात एक मोबाईल! तो हि महेशकडे.

अचानक एक दिवस आईचा फोन आला, (तो पण बद्रीनाथहून! भरत मामानी त्यांना सरप्राईज दिलं होतं. ट्रिपचा खर्च, बुकिंग सर्व त्यांनी केलं होतं. आई-बाबा खुश होते.) पण माझ्याकडच वातावरण एकदम तापल. फोन ठेवल्या क्षणी सासूची बडबड सुरु झाली. "बघितलस महेश. सरोजच्या लग्नात मदत करा म्हणालो तर ह्यांच्या कडे पैसे नव्हते आणि ट्रीपला जायला बरे पैसे आहेत. संध्याला आपल्या गळ्यात बांधली, आता स्वतः मजा करायला मोकळे. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव आणि जाब विचार. नाहीतर एक काम कर. संध्याला बोलायला सांग. तिला मागु देत त्यांच्या कडे पैसे."

आईचं ऐकून महेश मला तसं करायला सांगणार, ह्याची मला खात्री होती. मी फोनवर बोलायला नकार दिला. दोघांचा खूप अपमान झाला. महेशनी चिडून माझ्यावर हात उगारला. मागून सासूचा आवाज आला,"दे दोन चार टोले. त्याशिवाय ती सुधरणार नाही." त्या दिवशी माझ्या नवर्यानी पहिल्यांदा मला मारलं. आणि तिथून मारहाणीला सुरुवात झाली.

मी बरेच दिवस आई-वडिलांना फोन करायचं टाळल. पण शेवटी रोजच्या मारहाणीला आणि भांडणाला कंटाळून, दोन दिवसांपूर्वी वडिलांना फोन लावला. वडिलांना सासरच्या लोकांच्या पैश्याच्या मागणी विषयी सांगितलं. तिकडून वडील विचारत होते,'सर्व ठीक आहे ना? तुझ्या आवाजाला काय झालाय? असा का येतोय?काही होताय का? घरचे सगळे कसे आहेत? महेशची नोकरी व्यवस्थित चालू आहे ना? मग ते सारखे पैसे का मागतायत? अग संध्या, आम्हाला पण आमचे खर्च आहेत. त्यांना तूच का नाही सांगितलस माझ्या वडिलांना जमणार नाही असं....ते बोलतच होते. मी 'हो, नाही मध्ये उत्तरं देत होते. (मी त्यांना सांगूच शकत नव्हते की आजचा फोन टाळण्यासाठी मी मागच्या दोन महिन्यात असंख्य वेळा मार खाल्ला आहे, अपमान सहन केला आहे, मुलांना माझ्या पासून लांब केल्यावर दयेची त्यांच्या कडे भिक मागितली आहे. आणि आजपण फोन ठेवल्यावर काय होईल, ते काय करतील ह्या कल्पनेनी मन सुन्न झाल आहे.)

महेशनी हातातला फोन हिसकून घेतला. सासू मुलांना घेऊन आतल्या खोलीत गेली. मुलं मला हाका मारून रडत होती. मला काही कळायच्या आत माझ्या पाठीत एक दणका बसला. महेशनी मला हाताला धरून घराबाहेर काढल. रात्रीचे १० वाजले होते. इतक्या उशिरा मी कुठे जाऊ? कशी जाऊ? मुलं आतमध्ये रडत होती. मी बाहेरून खूप हाका मारल्या, विनवण्या केल्या. पण काही उपयोग झाला नाही. रात्रभर मी दारापाशी आशेनी बसून राहिले. सकाळी सासुनी मला 'एखाद्या अंगणात शिरलेल्या जनावराला हाकलाव तसं अंगणाबाहेर हाकलल. मी वेड्यासारखी बाजारात फिरत होते. तेंव्हा मला ह्या मावशी भेटल्या.

ताई, तुम्हीच सांगा मी काय करू? मी माझ्या मुलांशिवाय जगू शकत नाही. मला माझी मुलं हवी आहेत. ताई, मला एकदा तरी माझ्या मुलांना बघायचं आहे."

संध्याची रीतसर तक्रार नोंदवून घेतली. तिची शोर्ट स्टे होम मध्ये रहाण्याची सोय केली. महेशला पत्र पाठवून बोलावून घेतलं. तो आला नाही म्हणून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो रजा मिळत नाही. ऑफिसमध्ये खूप काम आहे अशी कारण देऊन भेटणं टाळत होता. शेवटी त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या साहेबांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी महेश ऑफिसमध्ये हजर झाला.

आला तो जरा गुश्यातच होता. "हेमाताई कोण आहेत? आणि माझी बायको कुठे आहे? जर का तिला काही झालं तर तुम्हाला सोडणार नाही."

"मिस्टर महेश, मी हेमा. काय बोलायचं ते माझ्याशी बोला. आणि ऑफिसमध्ये आहात हे विसरू नका. भाषा जरा सांभाळून वापरा." असं म्हणत मी त्याला बसायला खुणावलं.

"तर महेशराव तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी वाटतीये. हो ना? म्हणून तुम्ही तिला रात्री अपरात्री घराबाहेर काढलत, दुसऱ्या दिवशी तिला हाकलून दिलत, तिची मुलं हिसकून घेतलीत, तिला त्यांना भेटू दिलं नाही. एवढंच नाही तर १५ दिवस झाले संध्या कुठे आहे? कशी आहे? हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज पण वाटली नाही. खरंच काळजी वाटतीये का, तिने संस्थेत तुमच्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून घाबरला आहात?"

"मी कशाला घाबरू? चुका तिने करायच्या आणि आम्ही का बर घाबरायचं? रागाच्या भरात बोललो असेन. तिला अक्कल यावी म्हणून काढलं होतं घराबाहेर. पण तिला तिची जबाबदारी कळायला नको. खुशाल मुलं सोडून निघून गेली. माझ्या समोर बोलवा तिला. आई म्हणते तेच बरोबर आहे. तिला कोणाचा धाकच राहिला नाही. संध्या साली......."

"तिचं म्हणणं होतं कि तुम्ही तिच्या वडिलांकडून पैशांची मागणी करत होतात?"

"ताई, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तो आमचा घरचा मामला आहे. मी लाख मागीन हो पण तो हराम... देतोय कुठे? एवढं पण कळत नाही त्याला, तिच्या बापाला, आपली पोर तिथे नांदतीये. आपण कस शिस्तीत वागावं. पण नाही. आता येतील नाक घासत आणि विनवण्या करत,'आमचं चुकलं. माफ करा. पोरीला घरात घ्या."

काय त्याची भाषा आणि किती बोलण्यात मगरूरी! न रहावून मी म्हणाले, "महेशराव, भाषा जरा नीट वापरा. तुम्ही संस्थेच्या कार्यालयात आहात. ह्याच भान असू द्या. तुम्ही तुमच्या वागण्याचं समर्थन करताय कारण तुम्हाला अजून कायद्याची माहिती नाहीये. तुम्ही चुकीचं वागला आहात. ह्याच्या साठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तुमची नोकरी जाऊ शकते. नीट वागा. अजून वेळ गेली नाहीये. दोघांनी एकत्र बसून काही उत्तर सापडताय का, काही मधला मार्ग निघतोय का, ते बघा.

बर मग कधी बोलवू संध्याला. तुम्ही सांगाल त्या दिवशी तिला बोलवून घेते."

"म्हणजे काय संध्या तुमच्याकडे नाहीये? मग ती आहे कुठे?"

"ती सुखरूप आहे. कधी येताय ते सांगा आणि येतांना मुलांना घेऊन या."

कायदा, शिक्षा हे शब्द ऐकल्यावर महेश थोडा नरमला. एकत्र बैठकीचा दिवस ठरला. संध्या मुलांना भेटायच्या आशेनी वेळेच्या आधीच आली. महेश आला, पण मुलांना न घेता.

त्या दिवशी काहीच बोलणी होऊ शकली नाहीत. मुलं भेटली नाहीत म्हणून संध्या रडत होती आणि महेशचं एकच म्हणणं होतं, 'नांदायला यायचं असेल तर संध्यानी लिहून द्यावं मी आज पर्यंत केलेल्या चुकांबद्दल माफी मागते. पुन्हा अशा चुका करणार नाही. केल्या तर माझा नवरा जे ठरवेल ते मान्य असेल.' लिहून दिलन तर ठीक नाहीतर मला ती नाही लागत. संध्या मुलांसाठी काहीपण लिहून द्यायला तयार होती. पण आम्हाला ते मान्य नव्हतं. ८ दिवसांनी परत भेटायचं ठरलं.

एक गोष्ट नक्की होती कि संध्याला नमवण्यासाठी महेश मुलांचा वापर करत होता आणि तिच्या भावनांशी खेळत होता. हे तिच्या लक्षात आणून देणं गरजेचं होतं. खूप कौन्सिलिंग केलं, तिला खूप समजावलं. मुलांचं वय लक्षात घेता, त्यांनी नाही दिली तरी कायद्यांनी मुलं तिच्याच ताब्यात मिळतील हा विश्वास दिला. तिला आणखीन एक माहिती दिली कि ,'आम्ही समक्ष बघून आलो. तुझी मुलं सुखरूप आहेत. तेंव्हा पुढच्या भेटीत त्यांनी मुलांना देणार नाही असं म्हणाला तर ते मान्य कर. फक्त भावनेच्या भरात वाट्टेल ते कबूल करू नकोस'.

अपेक्षे प्रमाणे महेश मुलांना न घेता आला. बोलणी फिस्कटली. महेश जायला निघाला. संध्यानी न रहावून विचारलं, "आणि मुलाचं काय?"

"मुलांचं काय? कोणती मुलं? कोणाची मुलं? मुलांना विसरा आता." असं म्हणत महेश जायला निघाला. संध्या काहीच बोलत नाही असं लक्षात आल्यावर माघारी फिरला आणि म्हणाला, "तुला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाहीये?"

संध्या शांतपणे म्हणाली,"तुम्ही असल्यावर, त्यांची आजी व आत्या असल्यावर मला त्यांची काही काळजी नाही. मुलं राहू देत तुमच्यापाशी. त्यांची काळजी घ्या."

महेशसाठी हे खूपच अनपेक्षित होतं. जाता जाता सांगून गेला,"अजून वेळ गेली नाहीये. विचार कर. ह्या बायांच्या नादी लागू नकोस. वाटलं तर फोन कर." (महेश गेला आणि संध्या मुलांची आठवण काढत खूप वेळ रडली. त्या दिवशी संध्याच्या बद्दल खूप वाईट वाटलं. पण तिच्या हिमतीच कौतुक पण वाटलं.)

महेश घरी गेला. काय घडलं आहे हे जेंव्हा त्याच्या आईच्या लक्षात आल तेंव्हा ती मुलीकडे रहायला गेली. दोन दिवसातच महेशनी फोन करून संध्याला भेटायचं आहे असं सांगितलं. आज नाही उद्या असं करत आम्ही ८ दिवस ताणल. नवव्या दिवशी तो मुलांना घेऊनच ऑफिसमध्ये आला. "ताई, काही पण करा. माझ्या संध्याला बोलवा. मला नोकरी करायची आणि मुलं सांभाळायची असं दोन्ही नाही झेपत आहे. हवं तर मी तिची माफी मागतो. काय सांगाल ते लिहून देतो. पण संध्याला घरी पाठवा."

त्याची आणि मुलांची अवस्था बघवत नव्हती. पण महेशला धडा शिकवण्यासाठी हे गरजेचं पण होतं. निरोप मिळाल्यावर संध्या लगेच आली. आधी मुलांना भेटली. महेशकडून नीट वागण्याची लेखी हमी घेतली. दर ८ दिवसांनी खुशाली कळवायला येण्याची अट घातली. मग संध्याची पाठवणी केली.

पुढे काही महिने ते खुशाली सांगायला येत होते. काही वर्षं संपर्कात होते. अजूनही अधून मधून भेटतात. सगळे खूप मजेत आहेत.

Saturday, 13 February 2021

 

गृह भेट:आजपर्यंत माझ्या कामाचा भाग म्हणून अनेक केसेस ऐकल्या, अनेक लोकांशी बोलले, अनेक प्रकारची माणस भेटली. कुसुमताई, आमच्या संस्थेच्या अध्यक्ष, आमच्यासाठी मार्गदर्शक आणि माझ्या साठी गुरु! त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील एक म्हणजे, गृह-भेटीचं महत्व. मग ते महिला हक्कच काम असो नाहीतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील काम असो! त्या नेहेमी सांगायच्या, "हेमा, गृहभेटी मुळे खरी परिस्थिती समजते. कधी कधी माणस मोकळं बोलू शकत नाहीत, त्यांचे प्रश्न मांडू शकत नाहीत, तेंव्हा गृहभेटीतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात."

ह्याची प्रचीती अनेक वेळा आली पण संगिताला मदत करताना ते प्रकर्षाने जाणवलं. त्या दिवशीची घाबरलेली संगीता मला अजून आठवतीये. विस्कटलेले केस, अंगावरचं ब्लाउज बाहीवर फाटलेलं, साडी अंगाभोवती कशीतरी गुंडाळली होती, हातांवर चेहेऱ्यावर मारल्याच्या खुणा, एक दात पडलेला, तोंडातून रक्त येत होतं. एकूणच तिची अवस्था बघवत नव्हती. एव्हाना आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो होतो की मारहाणीच्या केस मध्ये आधी पिडीतेला सिव्हील हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनची वारी करून आणणं गरजेचं आहे. सिव्हीलमध्ये प्राथमिक उपचार करून दिले. पोलिसांत तिला नवर्याविरुद्ध तक्रार नोंदवायची नव्हती. पण तरी आम्ही तिला साहेबां समोर नेउन आणली. सर्व सोपस्कार झाल्यावर आम्ही तिला घेऊन ऑफिसला आलो. तिचं म्हणणं काय आहे? कोणी आणि का तिला एव्हढी मारहाण केली हे विचारलं.

"ताई, मी संगीता. १० वी पर्यंत गावाकडे शिकले. वडील मजुरी करायचे. मी ८ वीत असतानाच वडील कन्सरनी गेले. घरची गरिबी. आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायची. थोडे फार मिळायचे. आम्ही तीन भावंडं. मी सर्वात मोठी. आई कामावर गेली कि घरात मोठं कोणी नाही ह्याचा गावातील काही मुलांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. माझा मामा शेजारच्या गावात रहात होता. त्याला हे समजल्यावर तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. (मामाचं नुकतच लग्न झालं होतं. आम्ही मामीसोबत आहोत ह्या विचारांनी तो पण थोडा निश्चिंत झाला.) तेथे आई पण मामाच्या बरोबर शेतात मजुरीला जायला लागली. नंतरचे काही दिवस मजेत गेले. दोघांच्या कमाईत जेमतेम भागत होतं. दोन वेळा पोटभर जेवत होतो. काही काळानी मामीला मुलगा झाला. खर्च वाढला.आणि लवकरच लक्षात आल कि दोघांच्या कमाईत आता खर्च भागत नव्हता. मामा-मामी मध्ये वाद सुरु झाले. मी तेंव्हा १७ वर्षांची होते. आई आणि मामांनी माझं लग्न लावायचं ठरवलं. (तेवढंच खाणार एक माणूस कमी, हा त्यामागचा विचार असावा) सुरेश नावाच्या ३४ वर्षे वय असलेल्या, ७ वी नापास, दिसायला सामान्य आणि एका पायात थोडा प्रोब्लेम असणाऱ्या माणसाबरोबर माझं लग्न लाऊन दिलं. हौस मौज काही नाही. हा सुरेश करतो काय? रहातो कुठे? त्याच्या घरी कोण कोण आहेत मला कशा बद्दल काहीपण माहिती नव्हती. पुढे सगळाच अंधार होता. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली होती की मामाचं घर हे आता माझं घर नाही. मी जितकी तिथे कमी येईन तितकं आमच्या सगळ्यांसाठी बर असेल. घरच्या मोठ्यांना नमस्कार करून निघतानाच मी ठरवलं कि 'आज पासून माझं आयुष्य हि माझी जबाबदारी.' सुरेश नेईल तिथे जायचं आणि ठेवेल तसं राहायचं!

सुरेश मला आमच्या घरी, माझ्या हक्काच्या घरी घेऊन आला. घर म्हणजे नाशिक मधली एका  वस्तीतली झोपडी. मी त्याच्या बरोबर कुठे पण रहायला तयार होते, पण तो मला जिथे घेऊन आला ते घर नसून घाणीचं साम्राज्य पसरलेली वास्तू होती. ते पण मी एक वेळ स्वीकारलं असत. पण त्या घरात माझं जे स्वागत झालं ते मी मरे पर्यंत विसरू शकणार नाही. स्वागताला दारूची बाटली, जेवायला चकणा आणि झोपतांना भयानक अनुभव! हे मी कोणाला सांगणार होते? आईला सांगायची सोय नव्हती. तिच्यामागे खूप व्याप होते. मामा-मामीची मर्जी सांभाळून दोन मुलांना घेऊन दिवस काढायचे होते. तरी पण मी माझ्या आईची आतुरतेने वाट बघत होते. माझ्या लग्नानंतर दोन महिन्यांनी आई आणि मामा मला भेटायला आले. मी आईला लहान मुलीसारखी घट्ट मिठी मारली. मला खात्री होती, 'माझी आई आली आहे ती ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. पण तसं काही झालं नाही. आईंनी मला दूर लोटलं. ती म्हणाली," संगीता, आवर स्वतःला. तू आता लहान नाहीस. तुझं लग्न झालं आहे. अश्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच. प्रत्येक वेळेस तू मला हाक मारशील आणि मी तुला मदत करीन ह्या आशेवर राहू नकोस. मामा आम्हालाच कसतरी सांभाळतोय. त्यात तुझी ब्याद नको." हे ऐकल्यावर मला कळून चुकलं कि हे सगळं मला सहन करायचं आहे, आयुष्यभर! मी स्वतःला सांगत होते, समजावत होते. ताई, मी खरं सांगते सहन पण करत होते, पण कधी कधी माझी सहन शक्ती संपून जायची. मग मी विरोध करायचे. विरोध केला कि मारहाण! मारहाण तर माझ्या आयुष्याचा एक भागच झाली आहे. सगळ्यात एकच गोष्टं बरी आहे, आम्हाला मुल-बाल नाही. खरं सांगायचं तर मला नकोच आहे.

काल नेहेमी प्रमाणे संध्याकाळचा आणि रात्रीचा कार्यक्रम उरकला. आणखीन एक दिवस संपला. आता करूया झोपेची आराधना! तेवढ्यात सुरेशनी मला लाथ मारून उठवलं. (जेंव्हा पासून त्याच्या लक्षात आल आहे की मला कोणाचा आधार नाही. माझी चौकशी करायला कोणी येत नाही, तेंव्हा पासून तो माझ्याशी जास्त करून हातानी आणि पायानीच बोलतो. मला पण त्याची सवय झाली आहे.) आज तो दमला होता म्हणून मी त्याचे पाय दाबून द्यावेत अशी त्याची मागणी होती. ती पण रात्रीच्या दोन वाजता! मी नकार दिला म्हणून त्यांनी मला मारलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. सकाळी, मला शेजारच्या जाधव मावशींनी तुमचा पत्ता दिला. विचारत, विचारत आले."

"पण मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस. तुला माहेरचा आधार नाहीये, म्हणून त्याच्या कडे परत जाण्याची गरज नाही. सध्या तुझी संस्थेत (शोर्ट स्टे होम मध्ये) राहायची सोय करतो. तुला बर वाटलं कि काय करायचे ते ठरवू. चालेल का?"

त्यावर ती पटकन म्हणाली,"ताई, रहायची वगेरे सोय नको. घरी गेले नाही तर तो मला खूप मारेल. जाधव मावशी सांगत होत्या 'तुम्ही त्याला बोलावून समजाऊन सांगता. नाहीतर समज देता. मग सगळं ठीक होईल.' माझं पण तसच करा."

ह्यावर काय बोलणार. आम्ही तिची तक्रार नोंदवून घेतली. पुन्हा एकदा न रहावल्या मुळे तिला संस्थेचा पर्याय सुचवून बघितला, पण काही उपयोग झाला नाही. ती उठून जायला निघाली आणि भोवळ येऊन खाली बसली. आता मात्र तिचे निर्णय आपण घ्यायचे ठरवलं आणि ती थोडी सावरल्यावर तिला सांगितलं," संगीता, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू भारतीताई बरोबर संस्थेत जाणार आहेस."

तिच्यात काही बोलायचीच ताकत नव्हती, तर विरोध करण्याची शक्यताच नव्हती. रिक्षातून तिची रवानगी संस्थेत केली. आणि पहिलं काम केलं, संबंधित पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्याचं! कारण आजपर्यंतच्या अनुभवातून आम्ही शिकलो होतो कि 'सुरेश सारखे नवरे घरात बायकोचं जगणं मुश्कील करतात आणि ती कंटाळून किंवा नाईलाजाने घर सोडून गेली कि पोलीस स्टेशन मध्ये तिची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. कधी कधी तिने घरातील वस्तू चोरली असा आरोप पण करतात.'

संगीताकडे मोबाईल फोन नव्हता, तर सुरेश कडे फोन असण्याची काही शक्यता नव्हती. आमच्या संस्थेच्या नियमा प्रमाणे सुरेशला पत्राने संगीताच्या तक्रारी बद्दल कल्पना दिली.

सुरेश ऑफिस मधे भेटायला आला. अपेक्षे प्रमाणे त्यांनी 'संगीता कशी नालायक आहे. तिची शेजारच्या पुरुषांबरोबर लफडी आहेत. आमच्या वयात अंतर आहे. तिला मी आवडत नाही असं म्हणते. स्वैपाक नीट करत नाही. ती खूप कामचुकार आहे,' अश्या अनेक तक्रारी त्यांनी सांगितल्या.

"तिला तुम्ही का मारलंत? मारणं हा गुन्हा आहे ठाऊक नाहीये का तुम्हाला?"

"ओ म्याडम, मी संगीताचा नवरा आहे. मी तिचं काही पण करीन. ज्या कामासाठी आणलं ते करत नाही. तिला काय पोसायला आणली का? काही पण कामाची नाही. आणि तो तिचा बाप! साला माझ्या गळ्यात पोर बांधून गायब झाला. ना कधी भेटायला आला, ना जावयाचा मान राखला. आपलं टकोर सटकल कि आपण हाणतो तिला. आता कुठे आहे? गेली असेल....."

त्याच्या बोलण्यात खूप शिव्या होत्या आणि बसण्या वागण्यात गुर्मी होती. तो बहुदा दारू पिऊनच आला होता. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्याला शेवटी सांगितलं, "तुम्ही आता उठा आणि घरी जा. पुढच्या आठवड्यात दारू न पिता शुद्धीत असाल तेंव्हा या. आता निघा."

"संगीता कुठे आहे? कुठे लपवून ठेवली आहे? तुम्ही माझ्या बायकोला असं ठेऊ शकत नाही. मी तुमच्यावर केस करीन."

माझा पेशन्स संपत आला होता. मी म्हणाले, "भारती, जरा सरकारवाडा पोलीस स्टेशनला फोन लाव, साहेबांशी बोलायचं आहे." सुरेशच्या केटेगरितील लोकांना ह्याचा अर्थ चांगलाच समजतो, हे मी एव्हाना अनुभवातून शिकले होते. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुरेश एका मिनटात सरळ वागायला आणि बोलायला लागला. पुढच्या आठवड्यात मी ठरवलेल्या दिवशी येण्याचं कबूल करून तो गेला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी संगीताला पण बोलावलं होतं. दोघांची एकत्र बैठक झाली. (कबूल केल्याप्रमाणे आज सुरेश दारू न पिता आला होता) १०-१२ दिवसांच्या विश्रांतीनंतर संगीता खूपच बरी दिसत होती. महिला हक्क समिती आपल्या पाठीशी आहे ह्या विचारांनी तिला एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता, जो तिच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होता. सुरेशनी त्याची चूक कबूल केली. पुन्हा मारहाण करणार नाही, तिला घरात काही कमी पडू देणार नाही, असं लेखी आश्वासन दिल्यावर संगीता त्याच्या बरोबर समझोता करून जायला तयार झाली. दोघांनी दर ८ दिवसांनी ऑफिसमध्ये येऊन खुशाली सांगायचं कबूल केलं.

सुरेशचा स्वभाव विचित्र होता. समझोता तर झाला होता, पण सगळ्यांना संगीताची काळजी वाटत होती. मला काही चैन पडेना. समझोता करून दोनच दिवस झाले होते आणि मी अचानक त्यांच्या घरी गृहभेटीला गेले. दोघांना गप्पा मारत चहा पिताना बघून बर वाटलं. केस चांगली सोल्व झाल्याचं समाधान वाटलं. (पण हे समाधान फार काल टिकणार नव्हतं हे तेंव्हा मला माहित नव्हतं.)

ठरल्याप्रमाणे दोघं दर आठवड्याला खुशाली सांगायला येत होते. संगीता पण खुश दिसत होती. सुरेशनी आणलेली साडी कौतुकानी संगीता नेसून आली होती. महिना दोन महिने त्यांनी रिपोर्टिंग केलं. आम्हाला पण वाटलं सगळं ठीक चालू आहे. म्हणून दर आठवड्याची खुशाली दर महिन्याला येऊन सांगायचं ठरलं. त्या भेटीत पण सर्व ठीक आहे असं लक्षात आल. पुढे ३ महिने सुरेशनी कारण सांगून येण्याचं टाळल. आम्ही एक दिवस अचानक त्यांच्या घरी गेलो. सुरेश भेटला. त्यांनी सांगितलं 'संगीता बाहेर बाजारात गेली आहे. आमचं व्यवस्थित आहे.' आम्ही विश्वास ठेवला. असं दोन तीन वेळा घडलं. आम्हालापण हे चमत्कारिक वाटलं. मन सर्व ठीक असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बराच विचार केला. अखेरीस शेजारच्या जाधव मावशींची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना संगीताच्या आयुष्यात काय चाललं आहे ह्याची कल्पना होतीच. त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलं.

आम्ही निघालो आणि काय मनात आल मला नाही सांगता येणार. आम्ही संगीताच्या घरी परत गेलो. सुरेशला आम्ही परत येऊ असं वाटलं नसावं. आम्ही पोहोचलो तेंव्हा सुरेशनी संगीताचा हात पिरगाळला होता आणि तो म्हणत होता, "आता बोलाव तुझ्या ताईना. बघू तुला कोण वाचावतंय?"

"संगीता घाबरू नकोस. आम्ही आलोय." माझा आवाज ऐकून सुरेशचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. एका क्षणात त्यांनी तिचा हात सोडला आणि संगीता लहान मुली सारखी माझ्या कडे धावत आली.

"ताई, मला वाचवा. मला ह्या नरकातून बाहेर काढा."

आम्ही संगीताला आमच्या बरोबर घेऊन आलो. तिला सुरेश विरुध्द केस करायची नव्हती. तिला त्याचाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचा नव्हता. तिच्या इत्छेप्रमाणे तिने फारकत घेतली. आज ती एका शाळेत मदतनीस ह्या पदावर नोकरी करते आहे. तिची आई आणि भावंडं अधून-मधून भेटायला येतात.

त्या दिवशी संगीताकडे अचानक परत गेलो म्हणून खरं काय ते कळल आणि आम्ही तिला वाचवू शकलो.  

 

 

 

Tuesday, 2 February 2021

घाईत लग्न झालं असत तर?

  रोहिणी! एक वेगळच व्यक्तिमत्व! चौथी पास! दिसायला सामान्य. थोडी बावळट थोडी भोळसट. आई-वडिलांची एकुलती एक असल्यामुळे लाडावलेली. खरं सांगायचं तर अती लाडानी बिघडलेली.नटण्याची खूप आवड. आपण केलेला मेकप आपल्याला कसा दिसतोय, लोकं आपल्याला हसतायत. आपली चेष्टा करतायत. तिला ते कळत तरी नव्हतं, नाहीतर तिला त्यांनी फरक पडत नव्हता. ती स्वतावर खुश असायची. तिला बाहेर हॉटेलात खायला खूप आवडायचं!

  माझ्या आयुष्यात रोहिणी आली एक केस म्हणून! घरची परिस्थिती बेताची. वडील राम मंदिरासमोर फुलांचे वाटे विकायला बसायचे. आई दोन घरची काम करायची. ह्यातून जे उत्पन्न येईल त्यात घर खर्च आणि रोहिणीचे लाड भागायचे. भागायचे कसले आई-वडील उपाशी राहून भागवायचे. रोहिणी १८ पूर्ण झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी, त्यांच्या ऐपतीप्रमाणे गावाकडचा मुलगा पसंत केला आणि तिचं लग्न उरकून टाकलं. मुलगा, रोहित, रोहिणीच्या तुलनेत खूपच बरा होता. दिसायला ठीक होता आणि १० वी पास होता. निर्व्यसनी व कष्टाळू होता. घरची थोडीफार शेती होती. दोन मुलींच्या पाठचा एकुलता एक वारस होता. कधी कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही. गरजेला सर्वांच्या मदतीला धावून  जायचा त्यामुळे गावात सर्वांचा लाडका. ह्या स्थळात खोड काढण्यासारख काही नव्हतं. पहिल्या मुळाला रोहिणी माहेरी आली आणि तिनी तिच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. आई नी कशीतरी समजूत काढून पाठवली.

  त्या घरात रोहिणी कशीतरी सहा महिने राहिली. पहिल्या दिवाळीत आली ती परत सासरी गेलीच नाही. फारकतीशिवाय दुसरा उपाय नाही असे लक्षात आल्यावर तिची आई तिला आमच्या कडे घेऊन आली.

  "शांताबाई, तुमच्या मुलीला फारकत हवी आहे हे समजलं, पण कारण नाही समजलं." असं मी म्हणाले तर तिची आई म्हणाली, " खरं सांगू का बाई आम्हाला पण नाही समजलं. तुम्हीच विचारा आणि मला सांगा."

  रोहीणीशी बोलल्यावर असं समजलं कि,'सासरी काही त्रास नाहीये. नवरा, सासू, सासरे व इतर नातेवाईक चांगले आहेत. खूप जीव लावतात आणि कौतुक करतात. पण रोहिणी तिथे राहू शकत नाही. कारण तिथे सिनेमा बघायला सोय नाही आणि भेळपुरी मिळत नाही.' हे काही फारकतीच कारण असू शकत का? आणि कोर्टाला तरी हे कारण पटेल का? फारकत मंजूर करायला?

  आम्ही तिला खूप समजावलं पण रोहिणी काही ऐकायला तयार होईना. अखेरीस तिची आणि रोहितची समजुतीनी फारकत करून दिली.

  तर अशी हि रोहिणी! आता तिला लग्न करायचं होतं. (फारकती नंतर ती खूप वेळा ऑफिस मध्ये यायची. काही दिवसातच ती हक्कांनी येऊ लागली. आणि या अधिकारानीच तिने आम्हाला तिच्या साठी मुलगा बघायला सांगितलं.) मुलगा नाशिक मध्ये राहणारा हवा होता. शिक्षणाची, दिसण्याची अट नव्हती. तिच्या दोनच अपेक्षा होत्या, तो कमवता असला पाहिजे आणि त्यांनी तिला फिरायला आणि भेळपुरी खायला, ती म्हणेल तेंव्हा न्यायला पाहिजे. आता असा मुलगा मिळणं जरा अवघडच होतं. ती वरचेवर चौकशी करायला येत होती. आणि दर वेळेस आम्ही 'योग्य स्थळ नाही सापडत आहे. सापडलं कि सांगू' असं सांगत होतो. तिला मनातल्या मनात 'आम्ही काहीच करणार नाही' अशी बहुतेक भीती वाटत असावी, कारण अलीकडे ती हा विषय आमच्याशी बोलतांना काढतंच नव्हती. मग लक्षात आल कि स्वतःच स्वतःसाठी स्थलं बघत होती. एखाद्या स्थळाची माहिती कळाली कि ती आम्हाला येऊन सांगायची. (कारण तिचे आई-वडील तिच्या मूर्खपणाला कंटाळले होते. ते कशातच लक्ष घालायला तयार नव्हते) आम्ही जाऊन त्या मुलाची चौकशी करायचो आणि त्याला नापास करायचो. (तिने सुचवलेल्या मुलांमध्ये काही ना काही प्रोब्लेम असायचाच. तो व्यसनी तरी असायचा, कमवत तरी नसायचा, आधीची फारकत झालेली नसायची, पहिल्या बायकोला मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगून आलेला असायचा. काहीतरी प्रोब्लेम असायचा.)

  रोहिणी आमच्यावर फार वैतागली आणि शेवटी तिने हा विषय बोलणच बंद केलं. आम्हाला वाटलं लग्नाचं भूत उतरलं असावं! पण एक दिवस ती अचानक पेढे घेऊन आली. तिचं लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला. 'चार दिवसांनी लग्न आहे' असं ती लाजत सांगत होती. आम्ही सगळे अवाक!

  मी विचारलं," रोहिणी, कोण मुलगा? कुठे रहातो? करतो काय?कमावतो किती? घरी कोण कोण आहे? तुला हे स्थळ सुचवलं कोणी? तू नीट चौकशी केली आहेस का?"

  "ताई, तू हे सगळं विचारणार हे ठाऊक होतं मला. मी पूर्ण माहिती काढली आहे. मुलगा सिन्नरला नोकरी करतो. १२०००/- कमावतो. टू बी एच के चा flat आहे. गावाकडे शेती आहे. दिसायला तर खूप भारी आहे. मला तो बसमध्ये भेटला. त्याच्या मित्रांनी ओळख करून दिली. माझं बसचं तिकीट पण त्यांनीच काढलं. आम्ही फिरायला गेलो, भेळपुरी खालली. खूप मज्जा आली. ताई, नाही म्हणूच नकोस कारण नकार देण्यासारखं स्थळच नाहीये."

  "अग रोहिणी! तू काय बोलतीयेस, तुला कळतंय तरी का? अग, कोणाचा कोण मुलगा? तुला बसमध्ये भेटतो काय? त्याची ओळख ना पाळख. आणि त्यांनी पाणीपुरी खाऊ घातली आणि फिरायला नेलं म्हणून तू त्याच्या बरोबर लग्न ठरवून आलीस? त्यांनी स्वताबद्दल सांगितलेली माहिती तपासून नको बघायला. तू जाऊन आलीस का सिन्नरला?"

  "मी गेले नाही आणि जाणार पण नाहीये. मला त्याची गरज वाटत नाही."

  "अग, तुला वाटत नसली तरी मला वाटतीये. माझ्यासाठी जाऊन ये."

  "माझ्याकडे बस भाड्यासाठी पैसे नाहीयेत."

  मी पर्स मधून पैसे काढत तिला सांगितलं,"हे घे पैसे. मला काही माहित नाही. तू उद्या सिन्नरला जाणार आहेस, त्याची चौकशी करणार आहेस आणि मला सांगणार आहेस. सिन्नरला जाऊन आल्यशिवाय मला भेटू पण नकोस आणि माझ्याशी बोलू पण नकोस. मी तुला तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ करू देणार नाही. तू सांगतेस तसा मुलगा चांगला असला तर मी तुझं लग्न लाऊन देईन."

  अनिछेनीच पण रोहिणी दुसऱ्या दिवशी सिन्नरला गेली. परत आली ती वेगळ्याच मूडमध्ये. कशानितरी चांगलीच हादरली होती. माझा हात घट्ट धरून काही क्षण माझ्याकडे बघत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते.

  "ताई, तू आज मला मोठ्या संकटातून वाचवलस. तू माझ्या भल्यासाठी सांगत होतीस आणि मला वाटत होतं तू मुद्दाम करतीयेस. तू मला पाठवलं नसतं तर मी त्याच्याशी लग्न करून किती मूर्खपणा करणार होते ह्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतोय.

  "मी पत्ता विचारत त्यांनी सांगितलेल्या इमारती पाशी गेले. मी ज्यांना पत्ता विचारला त्यांच्या चेहेऱ्यावर त्याचं नाव ऐकून आश्चर्य होतं आणि माझ्या साठी काळजी. अगदी इमारती जवळच्या नळावर चार बायका पाणी भरत होत्या त्यांना विचारलं, तेंव्हा त्या म्हणाल्या, 'पोरी, तुझं त्या माणसाकडे काय काम आहे.'

  मी माझं काम सांगितलं. जेंव्हा त्यांना कळल कि मी त्याचाशी लग्न करणार आहे तेंव्हा त्यांचातल्या एका वयस्कर काकू म्हणाल्या," हे बघ पोरी, तो चांगला माणूस नाही. तो सांगतो ते घर त्याचं नाही. तो सहा महिन्यापासून तिथे भाड्यानी रहातो. घरमालकांनी त्याला खोली खाली करायला सांगितलं आहे. त्याच्या बरोबर एक बाई रहाते. आम्ही कोणी तिला बघितली नाहीये, पण तो घरी असतो तेंव्हा त्या घरातून किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येतात. तो जाताना घराला कुलूप लावून जातो. दारं खिडक्या पक्क्या बंद करतो. त्यामुळे आतल्या व्यक्तीला कधी बघितलं नाही. लोकांनी तक्रार केली म्हणून घरमालकांनी त्याला जागा सोडायला सांगितलं. काळजी घे ग पोरी."

त्या नाही म्हणत होत्या पण इथवर आलेच आहे तर त्याचं घर बघून जाते, असा विचार करून मी जिना चढत त्याच्या दुसऱ्या मजल्यावरील flat पाशी गेले. ताई तुला सांगते त्या वेळेस मला वाटत होतं कि तुझ्यासारखं ह्या बायकांना पण माझं लग्न व्हायला नकोय.

त्याच्या घरापाशी पोहोचले आणि बघितलं तर दाराला कुलूप. मी परत यायला निघणार तेवढ्यात मला कोणीतरी कन्ह्ताय असं वाटलं. मी हाक मारली तर आतून कोणीतरी हळू आवाजात बोलल्या सारखं वाटलं. सुदैवानी एका खिडकीला थोडी फट होती. जमेल तेवढी खिडकी उघडली आणि आत बघितलं. ताई, आतमध्ये एक बाई होती. अंगावरचे कपडे फाटलेले होते. तिला खूप मारलं होतं. बहुतेक पट्ट्यांनी मारलं असावं. तिने हात वर केला त्याचावर वळ होते. ती बाई रडत होती आणि 'मला वाचवा वाचवा' असं म्हणत होती. तिला तिच्याबद्दल विचारलं तर समजलं कि ती त्या नालायक माणसाची बायको आहे. तो रोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. त्यांच्या लग्नाला तीन वर्षं झाली आहेत. ताई, मी तिला सांगितलं, आमच्या ताई तुला ह्यातून नक्की वाचवतील. ताई, तू तिला वाचवशील ना? तिला मदतीची खूप गरज आहे."

रोहिणी वाचल्याचा आनंद आणि समाधान होतंच पण आत्ता त्या मुलीचा जीव वाचवण्याची जास्त गरज होती. रोहीणीकडून त्या माणसाची सर्व माहिती घेतली आणि सिन्नर पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार कळवला. पोलिसांनी पण ताबडतोप ऐक्षन घेतली. त्या मुलीला सोडवलं, तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं आणि तिच्या नवऱ्यावर योग्य ती कारवाई केली.        

=============================================