Monday, 22 February 2021

 

बदला

त्या दिवशी ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. मीच सोनावणेना एक वाजताची वेळ दिली होती ते साफ विसरून गेले. माझ्या समोर बसलेल्या जोडप्यातील नवरा जळगावला एका बँकेत मेनेजर होता. महामुश्कीलीने त्याला आज एकत्र बैठकी साठी येता आल होतं. (आमच्याकडे एका पार्टीने तक्रार नोंदवल्यावर, आम्ही प्रत्येक केसमध्ये दोघांचं म्हणणं ऐकून घेतो. नंतर दोन्ही पार्टीस ना एकत्र बोलावतो. ह्यातून बरेच वेळा दोघांमधील गैरसमज दूर होतात आणि समझोता होण्याची शक्यता वाढते.) दोघांमध्ये समझोता झाला होता. फक्त दोघांकडून लिहून घेणं बाकी होतं. (समझोता झाला तर आम्ही दोघांकडून लेखी घेतो, 'ज्या कारणांनी वाद आणि भांडण झालं त्या चुका आम्ही पुन्हा करणार नाही. नीट संसार करू........) तेवढ्यात ऑफिसच्या बाहेरून जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकू आला. 'काय झालं?' असं विचारणार तेवढ्यात एक गृहस्थ, "कुठे आहेत हेमाताई? त्यांनी मला एकची वेळ दिली होती. आता दीड वाजत आला, आणि ह्या बाई सांगतायत 'थोडा वेळ थांबा. ताईच्या समोर एक केस आहे. त्यांचं झालं कि बोलतील त्या तुमच्याशी.' आम्ही असं किती वेळ थांबून राहायचं?"

"अहो सोनावणे. मी हेमा. मी तुम्हाला विनंती करते, पाच मिनिटं थांबा. ह्यांचा समझोता झाला आहे. त्यांच्याकडून लिहून घेते आणि बोलते तुमच्याशी."

माझ्या विनंतीचा उपयोग झाला.

दहा मिनिटांनी माझ्या समोर खुर्चीत बसत सोनावणेनी मुलीला सांगितलं," मंगल, जे झालं, जसं झालं, ते सगळं ताईना सविस्तर सांग. त्याच ह्यातून काहीतरी मार्ग सुचवतील. गोविंद काकांच्या मुलाचा प्रोब्लेम पण ह्यांनीच सोडवला."

माझ्या कडे बघत म्हणाले, "ताई, मी इथे थांबलो तर चालेल ना? का बाहेर थांबू? पण मी जवळ असलो तर तिला थोडा आधार वाटेल आणि ती काही सांगायची विसरली तर मी तिला मदत करू शकेन."

मी त्यांना बसण्यासाठी खुणावलं. दोघं बाप-लेक बसले.

मंगलनी अडखळत तिचा प्रोब्लेम मांडायला सुरुवात केली.

"ताई, मी माहेरची मंगल सोनावणे, नाशिकची, आणि सासरचं नाव मंगल जाधव. (सासर पुण्याचं) तीन महिन्यांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी शरद जाधव यांच्या सोबत माझं लग्न लाऊन दिलं. ताई इतकं थाटात लग्न झालं कि आमचं अक्ख गाव आणि नातेवाईक अवाक झाले. २५०० माणस पंक्तीला जेवले. लग्नात समोरून जे मागितलं ते तर दिलंच पण त्याहूनही जास्त दिलं. टीव्ही, फ्रीज, ४ कपाट, डबल बेड, १० तोळे सोनं, सगळा संसार, मला २० साड्या आणि त्याला मचिंग सर्व वस्तू. महागड्या कार्यालयात लग्न लागलं. नवरदेवाला मिरवायला घोडा. बेंड, सासरच्या सर्व मंडळींचा यथोचीत मानपान. हे बाबांना कमी वाटलं म्हणून कि काय शरद रावांच्या मागणीचा मान (नवरदेव फेरे घेताना हटून बसला) म्हणून मोटरसायकल पण द्यायचं कबूल केलं. ताई, मला कळत नाही बाबांनी त्या स्थळात नेमकं काय पाहिलं. कर्ज काढून, जमीन गहाण ठेवून लग्न लावलं. कशासाठी? १० दिवस पण संसार झाला नाही." हे सांगताना मंगलचा संताप संताप होत होता.

न रहावल्याने सोनावणेनी मधेच बोलायला सुरुवात केली. "ताई, मी तुम्हाला सांगतो, ह्या स्थळाची माहितीच अशी आमच्यापर्यंत आली कि, ती ऐकल्यावर मी लागलीच ठरवलं 'हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही. नाही म्हणायला मंगल आणि रोहिणी (माझी बायको) मला 'स्थळाची नीट चौकशी करा' असं वारंवार सांगत होत्या. 'ती माणस इतकी लग्नाची घाई का करतायत' असं पण म्हणत होत्या. पण ताई तुम्हीच सांगा माझ्या बहिणीच्या नणंदेच्या माहितीतलं स्थळ आहे म्हंटल्यावर चौकशी मी करण ठीक दिसलं असत का? माझी मंगल एम ए, बी एड, झाली आहे. घरातील सगळी काम करते. कधी कोणाला उलटून उत्तर देणार नाही. कॉलेज आणि घर, ह्या पलीकडच जग तिला माहिती नाही. तिचा नवरा पण तिला साजेसा, तिला समजून घेईल, तिला सुखात ठेवेल असाच हवा होता. जाधव कुटुंब अगदी तसच होतं. घरात इनमिन तीन माणस. माझी मंगल,शरदराव आणि त्यांची आई. शरदराव कंपनीत नोकरीला. पाच आकडी पगार. मोठा भाऊ सैन्यात. आणि बहीण सासरी. गावाकडे ५-७ एकर शेत जमीन, मोठ्ठा बंगला, दारासमोर दोन महागड्या गाड्या आणि १५ खोल्यांची चाळ (ज्याचं भाडच काही हजार रुपये येत होतं.) आता एखाद्या बापाला आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी आणि तिच्या सुखासाठी अजून काय हवं? मागचा पुढचा विचार न करता मी स्थळाला होकार कळवला. लग्नात नाही म्हणायला थोडी घाईच झाली. लग्नाच्या तयारीला जेमतेम २ महिन्यांचा वेळ मिळाला."

त्यांच म्हणणं मधेच तोडत मंगल म्हणाली, "ताई बर झालं. वेळ कमी मिळाला. माझ्या आयुष्याचं तर वाट्टोळ झालंच आहे, पण डोक्यावरील कर्जाचा डोंगर पण वाढला असता."

"मंगल नेमकं काय झालं?"

"ताई, लग्न करून मी सासरी गेले, मोठ्या बंगल्यात जायची स्वप्नं बघत. (त्यांचे नातेवाईक आणि सगेसोयरे कार्यालयातूनच आपापल्या घरी गेले.) त्यांनी दाखविलेल्या बंगल्यात न जाता आम्ही एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात गेलो. हा काय प्रकार आहे? काही तरी गडबड आहे. 'आपण बहुतेक इथे कोणाला तरी भेटून पुढे जाणार असू,' असा विचार करत होते. तेवढ्यात माझी नणंद मला उद्देशून म्हणाली," वेलकम होम, वहिनी. अग घरात ये ना. अशी दारात काय उभी आहेस?"

'आणि तो आम्हाला दाखवलेला बंगला?'मी बिचकतच विचारलं.

'अग वेडाबाई, तो बंगला तर दादाच्या मित्राचा आहे! आमच्या घरातील प्रत्येकाच लग्न जुळवताना आम्ही तोच दाखवला आहे. त्याची दोन कारणं आहेत. हवं तर हेतू म्हण. पहिलं आलेली पार्टी इम्प्रेस होते व पुढील बोलणी आम्हाला हवी तशी होतात.(जसं तुझ्या बाबतीत झालं) आणि दुसरं 'आपलं पण असं घर असावं' हे समस्त जाधव कुटुंबियांच स्वप्नं आहे. आणि त्यासाठी आमच्याशी नातेसंबंध जोडले गेलेल्या प्रत्येक व्यक्तींनी मेहेनत करायची आहे. तेंव्हा वहिनी बाई, तूर्तास स्वैपाकघरात चला आणि कामाला लागा.'

असं झालं माझं जाधवांच्या घरात स्वागत! स्वागता पेक्षा भयानक पुढचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध लागला कि माझा नवरा काहीच कामधंदा करत नाही. दीर सैन्यात वगेरे काही नव्हता. तो आमच्या बरोबर राहातच नव्हता. पलीकडच्या गल्लीत रहाणारी माझी नणंद आणि नंदोई २४ तास आमच्या घरातच असायचे. नणंदेच्या नवऱ्याची (शेखरची) नजर, त्याचं बघणं, माझ्याकडे बघून ओठावरून जीभ फिरवणं, अंगलट येणं, सगळंच किळसवाण होतं. त्याला बघता क्षणीच मला त्याची भीती वाटली. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ' सगळेच घरी असतात तर मग कोण कमावत? आणि हा शेखर इथेच राहणार का?' मी नवऱ्याला विचारलं तर तो म्हणाला,'अग मंगल, तो आहे म्हणून आपलं घर चालतंय. घर खर्च भागतोय. तोच तर नियमितपणे ताई आणि आई साठी काम आणतो. त्याला अजिबात दुखवू नकोस. त्याला ह्या भागात खूप मानतात. तो आपल्या घरचा जावई आहे हे कळल्यापासून वस्तीत आपला वट वाढला आहे. केबल फुकट, पैशांसाठी वाणी किंवा भाजीवाला तकादा लावत नाही. वीजेच तर बिलच येत नाही. असं समज तोच आपल्या घरातील करता आहे. त्याची मर्जी सांभाळायची. तो सांगेल ते काम करायचं.तो खुश तर आपण सगळे खुश!'

ताई, तुम्हाला सांगते, विचार करून माझं डोकं फुटायची पाळी आली. हा माणूस मला काय काम सांगेल? तो माझ्याकडून कोणत्या कामाची, सेवेची अपेक्षा करेल? तो माझ्याशी वेडवाकड वागला तर घरातले सगळे काय करतील? नवरा काय म्हणेल? शेखर ह्या दोघींसाठी काम आणतो म्हणजे काय करतो? ताई मनात प्रश्नांचा गोंधळ होता आणि सगळ्याची भीती पण वाटत होती. विचार करून डोकं बधीर झालं होतं. मी खाली मान घालून सांगतील ती घरातील सगळी काम करत होते.

मला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला आठ दिवसातच मिळाली. घरात भाजीला काही नव्हतं म्हणून मी बाजारात गेले. घरी यायला थोडा उशीर झाला. घरी आले तर समजलं शेखरचा मित्र आला आहे. सासूबाईनी सांगितलं, 'मंगल, स्वैपाक झाला कि आलेल्या पाहुण्यांसाठी चहा-पोहे कर.' मी गेले तेंव्हा आम्ही घरात तिघीच होतो. परत आले तेंव्हा नणंद आणि तो मित्र कुठे दिसत नव्हते. पण मी स्वतःला समजावलं 'मंगल तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही. चहा-पोहे कर आणि गप्प बस.'

पोहे तयार झाल्यावर सासूबाईनी जोरात हाका मारत सांगितलं, 'उषा, चहा तयार आहे ग'. आवाज ऐकून नणंद आणि तो मित्र शेजारच्या खोलीतून बाहेर आले. त्यांचे विस्कटलेले केस आणि कपडे (तो मित्र शर्टाची बटण लावत होता आणि नणंद साडीचा पदर ठीक करत होती) बघून दाराच्या मागे काय घडलं असेल हे न कळण्या इतकी मी लहान किंवा बावळट नक्कीच नव्हते. ह्याचा अर्थ सासू आणि नणंद करत होते ते हे काम होतं तर. आणि मी पण आज ना उद्या हेच किंवा असंच काम करून संसाराला हातभार लावावा अशी माझ्या कडून अपेक्षा होती. शी.... किती किळसवाणी गोष्ट होती. मला सगळ्यांचीच भीती वाटायला लागली. कमाई चांगली झाली म्हणून घरातील सगळे खुशीत होते. माझ्या मनातलं टेन्शन किंवा गोंधळ कोणाला जाणवला पण नाही. त्या दिवशी रात्री जेवताना शेखर आणि शरद यांचं प्लानिंग सुरु झालं. शेखर म्हणत होता,' शरद, मंगलला लवकर मोकळी कर. तुझी सुहागरात वगेरे काही बाकी असेल तर उरकून घे. तिच्या साठी आपल्याकडे लई गिराईक आहेत.' आणि ह्या वाक्यावर दोघांनी एक-मेकांना टाळी दिली. ताई, मी त्या रात्री झोपूच शकले नाही."

सांगता सांगता मंगल रडायला लागली. तिच्या चेहेऱ्यावर भीती, किळस, तिला त्या दिवशी वाटलेली असहायता असे सगळे भाव दिसत होते. सोनावणेनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजुतीच्या स्वरात म्हणाले, "मंगल, बेटा. मला माफ कर. ते आता सगळं संपलं आहे. आपण हेमाताई कडे आलोय ना. त्या सगळं ठीक करतील." (मला कळत नव्हतं असा अनुभव घेऊन आलेल्या मुलीच्या आयुष्यात मी काय आणि कस ठीक करू शकणार होते?)

थोड्यावेळानी मंगल थोडी शांत झाली आणि पुढे सांगायला लागली. "दुसऱ्या दिवशी  बाहेरून काहीतरी आणायच्या निमित्तांनी मी घरातून बाहेर पडले. घरात सगळे कालच्या कमाईमुळे खुशीत होते. काहीही चौकशी न करता सासुनी २० रुपये दिले. मी घरातून बाहेर पडले आणि बाबांना फोन करून सांगितलं 'ताबडतोब घ्यायला या. मी बस स्टेन्ड पाशी आहे. मी जास्त काहीच सांगू शकत नाही. तुम्ही नाही आलात तर...."

तिथून पुढे सोनावणे बोलायला लागले,"आणि ताई, ती लहान मुलीसारखी ढसाढसा रडत होती. काय झालं असेल? ती बरी तर असेल ना? एक गोष्ट जाणवत होती कि जे काही चाललं आहे ते नक्कीच ठीक नाहीये. (हे रोहिणीला आई म्हणून जाणवलं असेल का? दोन दिवसांपासून तिचं एकच म्हणणं होतं,'मंगलला खूप भेटावसं वाटतंय. मी एकदा तिला भेटून येते. मला खूप अस्वस्थ वाटतंय. ती कशी असेल? तिची खूप काळजी वाटतीये.' असं म्हणत ती त्याच दिवशी सकाळच्या बसने पुण्याला जायला निघाली होती.)' ती आता पोहोचतच असेल' ह्या विचारांनी माझं मन थोड शांत झालं. आणि मी मंगलला म्हणालो,"मंगल बेटा, रडू नकोस. आई आजच सकाळच्या बसनी निघाली आहे. ती पोहोचतच असेल."

मंगलचा फोन ठेवला आणि लगेच रोहिणीचा फोन आला. 'मी मंगलला घेऊन घरी परत येत आहे. आल्यावर बोलू.' तुम्हाला सांगतो ताई, आमचं नशीब चांगलं, म्हणून आम्हाला आमची मुलगी सुखरूप मिळाली.

ताई, ह्या सर्वातून सावरायला तिला अडीच महिने लागले.पण आता त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या कडून पैनपई वसूल करायची आहे. आमच्या मुलीचं आयुष्य उध्वस्त केलं. काय समजतात काय स्वतःला? लग्नाला भरपूर १२ लाखांच्या वर खर्च झाला असेल. आता ते वसूल कस करायचं ते तुम्ही सांगा. आपल्याला आपली मुलगी त्या घरात पाठवायचीच नाहीये. पण फारकत फुकटात पण द्यायची नाही."

मंगलच आयुष्य उध्वस्त झालं होतं. 'ती इथून पुढे कोणत्याच मुलावर विश्वास ठेऊ शकेल का किंवा लग्नाचा विचार आयुष्यात करू शकेल का?' हा प्रश्न मला भेडसावत होता आणि सोनावणेना फक्त बदला घेण्यात इंटरेस्ट होता. त्यांना मंगलच्या भावना समजत तरी होत्या का? ती मुलगी मानसिक दृष्ट्या उध्वस्त झाली होती, आणि तिच्या वडिलांच्या डोक्यात फक्त त्यांना धडा शिकवण्या पलीकडे काही येत नव्हतं. मला त्यांचा रागच आला होता. मी म्हणाले," सोनावणे, तुमच्या मुलीच आयुष्य उध्वस्त करण्यात काही अंशी तुम्ही पण जबाबदार आहात. का नाही केलीत चौकशी? अहो, बाजारातून एखादी वस्तू घ्यायची असेल तरी आपण चार ठिकाणी चौकशी करतो. इथे तर तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता."

माझं बोलणं न ऐकल्यासारखं करत सोनावणेनी विचारलं," ताई, पुढचं कस करायचं ते सांगा."

"सोनावणे, जेवणावळ, कार्यालय, मानपान अशा गोष्टींवर केलेला खर्च परत मिळणार नाही. लग्न सोहोळ्यात कायद्याला असा खर्च अपेक्षित नाही/मान्य नाही. मंगलला लग्नात दिलेल्या वस्तू (ज्याच्या खरेदी पावत्या आहेत अश्या) आणि तिला घातलेलं सोनं आणि दिलेले कपडे व इतर चीजवस्तू (जे कायद्यांनी स्त्रीधन आहे) तिला परत मागता येतील. फारकत घ्यायची असेल तर कोर्टात केस ...."

झालेला खर्च वसूल करण्यात संस्था मदत करू शकणार नाही हे लक्ष्यात आल्यावर त्यांचा माझ्याशी बोलण्यातला इंटरेस्ट संपला. त्यांनी संस्थेत तक्रार नोंदवायची नाही असं ठरवलं. ते उठून जायला लागले.जाताना ते एक वाक्य म्हणाले, "ताई, मी त्यांना सुखासुखी सोडणार नाही. मी त्यांना माझ्या पद्धतीने धडा शिकवीनच."

ह्या घटनेला दोन एक वर्षं झाली असतील. मी एक दिवस नेहेमी सारखी ऑफिसला आले तर माझ्या टेबलावर एक पेढ्याचा बॉक्स होता आणि एक पत्र.

"ताई, नमस्कार,

मंगलची फारकत झाली. तिचा दुसरा विवाह झाला. ह्या वेळेस स्थळाची कसून चौकशी केली होती. सासरी ती मजेत आहे.

जाधवांना मी त्यांना समजेल अश्या भाषेत धडा शिकवला आहे.

तुम्ही केलेल्या मदती बद्दल तुमचे मनापासून आभार.

धन्यवाद,

एम.सोनावणे.

(सोनवणेनी त्यांच्या मुलीची केस आमच्या कडे नोंदवली नाही. त्यामुळे त्यांनी कश्या पद्धतीने शरद व इतर लोकांना धडा शिकवला हे समजू शकलं नाही. कधीतरी मंगलची आठवण येते आणि तिची काळजी वाटते.)

 

 

 

1 comment:

  1. Asha kiti tari mangal samajat fasavlya jat aahe.mahila hakka sanrakshan samiti cha lakh molacha aata aahe nyay milaun denyat mangal chya wadilanni share kelele dukhach tyanna bal devun gele

    ReplyDelete