Thursday, 22 June 2023

जसं पेराल तसं उगवेल

 २५ वीशी तील कविता, एक स्मार्ट, चुणचुणीत मुलगी ऑफिसमध्ये आली. जीन्सची पेन्ट आणि लूज शर्ट तिला छान दिसत होता. एरवी तिच्यातला आत्मविश्वास आज जाणवत नव्हता. ऑफिसच्या दाराशी जरा घुटमळत, आमचं लक्ष वेधायचा प्रयत्न करत उभी होती. किती वेळ अशी वाट बघत होती ठाऊक नाही, पण छायाचं लक्ष गेलं आणि तिने आत बोलवत विचारलं, “कविता, अशी दारात का उभी आहेस. ये ना आत ये. घरी सर्व ठीक आहे ना? नवर्याकडून काही निरोप? इथे ऑफिसमध्ये तर अजून काही फोन आला नाहीये. वाटलं परस्पर तुझ्याशी संपर्क साधून मिटवायचा प्रयत्न करत असेल एखादवेळेस. पण कविता, लिखापडी केल्याशिवाय परस्पर समझोता करून जाऊ नकोस.”

कविता ऑफिसमधे आली आणि टेबलापाशी घुटमळत उभी राहिली. तिच्या मनातील विचारांचा गोंधळ जाणवत होता. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण बहुदा सुरुवात कुठून करावी हे ठरत नव्हतं.

“ताई, दिपकचा फोन आला होता. तो खूप आजारी आहे. त्याचा आवाज पण खोल गेलेला, थकलेला वाटत होता. ताई, मला त्याची खूप काळजी वाटते आहे. मी त्याला बघायला जाऊन येते. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटून, सांगून जावं, म्हणून आले. मागच्या २-३ वेळेला जी चूक (तुम्हाला न सांगता, कळवता गेले) केली ती माझ्या कडून परत व्हायला नको. ताई, मी तुम्हाला कसं सांगू? माझ्या मनात त्याच्यासाठी विचित्र भावना आहेत. तो खरंच एक चांगली व्यक्ती आहे. मला तो आवडतो. पण त्याच्या मैत्रिणी म्हणू की लफडी? हे कसं deal करावं हेच मला समजत नाहीये.” बोलता-बोलता कविताच्या डोळ्यात पाणी आल.

“कविता, तुला वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो. पण तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय, एकदा कोणाकडून तरी, तुमचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र ह्यांच्या कडून त्याला नेमकं काय झालाय हे विचारून घे. तुझ्या बरोबर कोणी येणार आहे का?”

ह्यावर तिने नकारार्थी मान हलवली.

“हे बघ कविता, तू आमच्या कडे तक्रार नोंदवून वर्ष होऊन गेलं. ह्या काळात आम्ही त्याला, ‘एकदा येऊन तुझी बाजू मांडून जा’ असं सांगायला पत्र पाठविली, फोन केले. पण तो काही आला नाही. आज येतो, उद्या येतो, असं सांगत राहिला. कधी आईला बर नाहीये, तर कधी कामावरून रजा मिळत नाहीये, अशी कारणे सांगून इथे येण्याचं टाळत राहिला. त्याच्या मनात नेमकं काय आहे ते समजायला हवं. आम्ही त्याला ‘ऑफिस मधे कधी येणार आहे?’, अशी चौकशी करायला फोन करतो. त्यावरून त्याला नेमकं किती बर नाहीये ह्याचा अंदाज येईल. त्याच्याशी फोनवर बोलणं होई पर्यंत तू इथेच थांब. जायची घाई करू नकोस.”

वर्षभरा पूर्वी कविता जेंव्हा तक्रार नोंदवायला आली होती तेंव्हाचा तिचा अवतार आणि आजचं तिचं रहाणीमान ह्यात खूप फरक पडला होता. आई-वडिलां बरोबर आलेली कविता. तिला कोणाचातरी, कशाचातरी खूप राग आला होता. तिच्या मनातील रागाची, अपमानाची भावना चेहेर्यावर दिसत होती. नेहेमी प्रमाणे तिला आणि तिच्या आई-वडिलांना बसायला सांगितलं. तिने चिडूनच आमच्या कडे पाहिलं आणि म्हणाली, “ओ म्याडम, मी काही बसायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला आले नाहीये. हे माझे आई-बाबा म्हणाले म्हणून मी आले आहे. आधी एकतर कुठेही आपल्या मुलीचं लग्न लाऊन द्यायचं. ना धड मुलाची, त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. ना त्याचं शिक्षण किंवा नोकरी बघितली. अरे कमीतकमी त्याची काही लफडी आहेत का? ह्याची तरी माहिती काढायला नको होती का? घाईत लग्न उरकलं आणि माझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं. आणि आता त्यातून काही मार्ग निघतोय का हे बघायला आणि आम्हाला मुलीची किती काळजी आहे हे दाखवायला तुमच्या कडे घेऊन आलेत.”

ह्यावर तिच्या वडिलांनी, “अग कविता बेटा, अग आम्ही तुझ्या .....”

“बाबा माझ्या भल्यासाठी केलत वगैरे नाटकं बंद करा. मला तुम्ही काही सांगू नका आणि समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या आयुष्याचा झालाय तेवढा खेळ आणि तमाशा बास झालाय. तुमचा मान राखून मी ह्या ताई ला भेटायला आले आहे. त्यांनी काही केलं तर ठीक. नाहीतर मी हे सगळं माझ्या पद्धतीने सोडविन.”

कविताच्या समोर पाणी ठेवलं आणि तिला बसून हळू आवाजात बोलायची विनंती केली.

दोन घोट पाणी प्यायली, दोन मिनिटं डोळे बंद करून बसली. थोडी शांत झाली. शांत झाल्यावर तिचा अवतार, तिचं दिसणं बदललं. आम्हाला असं जाणवलं की कविता otherwise दिसायला स्मार्ट आहे. मगाच पेक्षा बर्याच शांतपणे आपलं म्हणणं तिने मांडल.

“ताई, सॉरी. ताई, माझं शिक्षण पूर्ण झालं, तेंव्हा मी जेमतेम २१ वर्षांची होते. कॉम्प्युटर मधे डिप्लोमा केला होता. आम्ही ग्रुप मधील सर्व मैत्रिणीनी दोन वर्ष नोकरी करायची, चार पैसे कमवायचे, धम्माल करायची, मज्जा करायची असं ठरवलं होतं. मी चांगल्या मार्कांनी पास झाले आहे हे ऐकून आई-बाबांना खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्ही झक्कास पार्टी केली. नंतर दोन चार दिवस मजेत गेले. एक दिवस आईनी विचारलं, “कविता, तुझं शिक्षण झालं. आता पुढे काय करायचा विचार आहे?”

“मी आई पाशी मोकळेपणानी आम्हा मैत्रिणींचा प्लान सांगितला. तेंव्हा आई काही बोलली नाही. पण माझ्या मनातील विचार तिने बहुतेक झोपायच्या आधी बाबांना सांगितला. दुसर्या दिवशी सकाळी बाबांनी अचानक माझ्या लग्नाचा विषय आई समोर काढला. “मी काय म्हणतो सुमन, कविता आता मोठी झाली आहे. तिचं शिक्षण पण पूर्ण झालाय. तिच्या साठी योग्य स्थळ बघून यंदाच्या वर्षात तिचं लग्न उरकून टाकूया. म्हणजे टेन्शन नाही. माझ्या मामे बहिणीच्या (मंदाच्या) चुलत दिराचा मुलगा लग्नाचा आहे. माणस चांगलीच असतील. आता मामे बहिणीकडील स्थळ आहे म्हटल्यावर जास्त चौकशीची काही गरज वाटत नाही.”

ह्याला आईने पुस्ती जोडली, “आणि शिवाय नणंद बाईंच्या सासरकडील स्थळाची चौकशी केली तर त्यांना किती वाईट वाटेल? मी काय म्हणते, तुम्ही आज-उद्याकडे नणंद बाईना फोन करून बघता का?”

तेंव्हा मी माझा विरोध आणि निषेद नोंदवत म्हणाले, “आई-बाबा, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. एखाद-दोन वर्ष नोकरी करते, थोडी मजा करते, मग तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करीन.”

ह्यावर बाबा विषय संपवत म्हणाले, “नोकरी, मजा, जे काही करायचं, ते लग्नानंतर करा. संपूर्ण आयुष्य पडलंय ते सगळं करायला. आयुष्यात सर्व गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्या असतात. आणि मला आता ह्या विषयावर अधिक चर्चा नको आहे.”

मी ह्या सर्वाला विरोध करायचा, लग्न टाळायचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दिवसानंतर आमच्या घरातील चक्र वेगानी फिरू लागली. स्थळाची चौकशी केली असं भासवल, पण ती अगदी जुजबी स्वरुपाची. म्हणजे केल्याचा दिखावा. कारण दीपकचं स्थळ निश्चित करतोय असं समजल्यावर आमच्या एका हितचिंतकांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं, “सुमनताई, मी असं ऐकलं की तुम्ही तुमच्या कविताचा विवाह मंदाताईच्या दीपकशी करताय. तसं स्थळ ठीक आहे. मुलगा पण ठीक आहे. पण त्याच्या मोठ्या भावाची चार महिन्या पूर्वी फारकत झाली आणि लागलीच त्याचं दुसरं लग्न पण करून टाकलं. कारण नीटसं कळल नाही. पण मला वाटलं की तुम्हाला माहिती असावं म्हणून फोन केला.”

मी तिथेच होते. फोन स्पीकर वर होता. त्यामुळे मी ते संभाषण ऐकलं होतं. पण त्यांनी आईला काहीच फरक पडत नव्हता.

आईने हि माहिती कोणालाच कळू दिली नाही. पण बहुदा बाबांना पण तिने काही सांगितलं नाही. आणि सांगितलं जरी असेल तरी त्यांना ते फार सिरिअस वाटलं नाही.

अशा रीतीने नोकरी करायची, मैत्रिणींबरोबर धम्माल करायची स्वप्नं रंगवणारी मी, परीक्षेचा निकाल लागल्यापासून वर्ष भरात कोण्या एका दीपकची बायको होऊन संसाराला लागले. घरात आम्ही ६ माणस! मी, दीपक,त्याचा मोठा भाऊ सुरेश, सुरेशदादाची बायको राधिका आणि त्याचे आई-वडील. जो तो आपापल्या कामात असायचा. कोणी कोणाच्या मधे बोलायचं नाही, असा घरचा नियम होता. जे काही सांगायचं, सुचवायचं ते सासूबाईंना. हे पण ठीक होतं. सासरे आणि सुरेश घरचं दुकान सांभाळायचे. दीपक त्याच्या ऑफिसला जायचा. घरात आम्ही तिघी जणी असायचो. पहिले जवळ जवळ ८ महिने मजेत गेले. माझी आणि राधिकाची पण बर्यापैकी दोस्ती झाली होती. एक दिवस असंच दुपारी दोघी गप्पा मारत असताना, का कोणास ठाऊक, मी तिला विचारलं, “राधिका, सुरेश दादाची पहिली फारकत झाली हे खरं आहे का? आमच्या लग्ना आधी कोणीतरी हि माहिती आम्हाला दिली होती. ते आठवलं म्हणून सहज विचारलं.” राधीकानी होकारार्थी मान हलवली. सहाजिकच माझा पुढचा प्रश्न ‘का’ होता. तिने क्षणभर माझ्या कडे बघितलं. बहुतेक स्वतःच्या मनाशी मला हे सांगावं की नाही हे ठरवत असावी. तिने माझा हात हातात घेतला आणि दबक्या आवाजात म्हणाली, “कविता मी जे तुला सांगणार आहे ते कोणाला सांगू नकोस. तुम्ही ऐकलत ते खरं आहे. तुझ्या सुरेश दादांची पहिली फारकत झाली आणि घाईघाईने माझ्याशी लग्न केलं. का ते नीटसं समजलं नाही. पण लोक म्हणत होते की त्यांना मुल बाळ होत नव्हतं, लग्नाला २ वर्षं उलटून गेली तरी! म्हणून फारकत घेतली. माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे, इकडची माणस चांगली आहेत, शिवाय ह्यांची देण्या घेण्याची काही पण अपेक्षा नव्हती. म्हणून आई-बाबांनी मला ह्या घरात दिली. आमच्या वयात जरा जास्त अंतर आहे, पण माणस चांगली आहेत. माझं लग्न झाल्यामुळे आई-बाबांच्या डोक्यावरचा थोडा बोजा कमी झाला. ह्यातच सगळं आल.” राधिकाच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत, विषय बदलत ती म्हणाली, “चला, आजचा दुपारचा चहा मी करते.” आणि ती उठून गेली.

मी विचार करत होते, ‘पण आमच्या लग्नात तर ह्या लोकांनी खूप मागितलं-सोनं, रोख पैसे, थाटामाटात लग्न आणि लग्नाचा सर्व खर्च.’ बहुतेक मोठ्या मुलाच्या लग्नातील सर्व कसर आमच्या लग्नात भरून काढली असेल.

राधिका आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्ष होत आली पण अजून चांगली बातमी येईना, म्हणून सासूबाई जरा अस्वस्थ होत होत्या. एक दिवस राधिकाला डॉक्टर कडे नेऊन तपासून आणलं. तिच्यात काही दोष नाही असं डॉक्टरने सांगितल्यावर वाट बघणं आल. तरी सासूबाईंना बर वाटावं म्हणून राधिका डॉक्टरकडे नियमित पणे तपासायला जात होती.

सणासुदीला दुकानात काम वाढल्या मुळे सुरेश दादा आणि सासरे यांना घरी यायला उशीर होऊ लागला. सुरेशदादाला कधी कधी रात्रीचे बारा वाजून जायला लागले. सणाचं निमित्त करून माझ्या आईनी, ‘कविताला चार दिवस माहेरी पाठवाल का?’ अशी विनंती केली. त्या रात्री दोन्ही मुलं आणि त्यांची आई ह्यांच्यात, मला माहेरी पाठविण्यावरून  बरीच चर्चा झाली. झोपायच्या आधी दिपकनी मला सांगितलं, ‘तू आठ दहा दिवस माहेरी गेलीस तरी चालेल, असं आईने सांगितले आहे.’

ठरल्याप्रमाणे मी माहेरी आले. आई-बाबा, मैत्रिणी सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. ८ दिवस कधी संपले कळलच नाही. उद्या परवा जावं लागणार. आणि जायची तर अजिबात इत्छा नव्हती. ‘ये दिल मांगे मोअर’ अशी माझी अवस्था होती. आणि काय आश्चर्य! रात्री १० च्या सुमारास दिपाकनी फोन करून कळवलं, “कविता, मला १५ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. तर आई म्हणाली, तुला हवं असेल तर रहा अजून ८-१५ दिवस माहेरी. मी परत आलो की तुला घ्यायला येईन.” हे तर मला हवं होतं त्यापेक्षा पण भारी झालं. मी भराभर मैत्रीणीना फोन केले आणि पुढच्या १५ दिवसाचं टकाटक प्लानिंग केलं.

माहेरी येऊन दीड महिना होत आला. दीपक घ्यायला येईल म्हणून वाट बघत बसले. पण त्याचा काही निरोप आला नाही. अशी किती दिवस वाट बघायची? मला पण आता माझ्या घराची, माझ्या माणसांची आठवण येऊ लागली. एक दिवस आई-बाबांना सांगून, मी सासरी एकटीने जायचं ठरवलं. मीच ‘कळवू नका’ असं आई-बाबांना बजावलं होतं. मला घरी सगळ्यांना surprise द्यायचं होतं.

मी सासरी पोहोचले आणि बेल वाजवल्यावर दिपकनी दार उघडलं. मला अचानक आलेली बघून तो चांगलाच गोंधळला. आणि त्याला घरात बघून त्याच्या पेक्षा जास्त मी! घरात येऊन चपला काढत मी त्याला विचारलं, “अरे दीपक तू गावाला गेला होतास ना? ट्रेनिंगसाठी? आणि तिथून तू मला न्यायला येणार होतास? मग अचानक प्लान का बदललास? घरात सगळे ठीक आहेत ना? आणि हे काय? घरात कोणीच दिसत नाहीये. कुठे गेलेत सगळे?”

“अग कविता, किती प्रश्न विचारतेस? इथे सर्व मजेत आहोत. आई आणि राधिका बाहेर गेल्यात. येतीलच एवढ्यात. बाबा आणि सुरेश, दुकानात. आणि मी तुझ्या समोर उभा आहे. दिसतोय ना?” त्यांनी चेष्टेनी विचारलं.

माझ्या पाठोपाठच राधिका आणि सासूबाई आल्या. घरात येता येता त्या दीपकला उद्देशून म्हणाल्या, ‘काम झालं असं वाटतंय. लवकरच सगळं ठीक होईल.’

मी आश्चर्यानी विचारलं, “कसलं काम? आणि काय ठीक होईल?”

“वारसाच”. आणि मग सावरत म्हणाल्या, “अग, दुकान, घर ह्याला वारस. प्रोपर्तीला नाव लावायचं!”

तो विषय तिथेच राहिला. आमचं रुटीन सुरु झालं. मधेच राधिकाला खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टर कडे जाऊन आल्यावर असं समजलं, राधीका प्रेग्नंट आहे. ह्या बातमीने घरात सगळ्यांना खूप आनंद झाला, जास्त करून सासूबाईंना! राधीकाचे डोहाळे, तिची काळजी, ह्या सगळ्यामुळे माझ घरातील काम खूप वाढलं. ह्या सगळ्या गोंधळात दीपक जास्त वेळ घरा बाहेर रहातोय हे माझ्या लक्षात आल नाही. हळू हळू त्याचं उशिरा येणं, मित्रांबरोबर बाहेर जाणं, पार्ट्या वाढत गेलं. मी घरातल्या कामानी इतकी दमून जात होते की कधी एकदा दिवस संपतोय असं व्हायचं.

असंच एक दिवस दीपक बाहेर गेला आणि त्याचा फोन वाजला. तो कधीच फोन विसरत नाही. कोणाचा तरी महत्वाचा असेल, असं वाटून मी तो घेतला. मी काही बोलणार त्याच्या आधी समोरून एका महिलेचा लाडिक आवाज आला, “दिपू डार्लिंग! तू असं का करतोस? दोन दिवस झाले, ना तू भेटलास ना तुझा फोन आला.....

फोन चालू होता. ती व्यक्ती समोरून काहीतरी लाडिक आवाजात बोलत होती. मी फोन कडे वेड्यासारखी बघत होते. समोर स्क्रीनवर मोना असं नाव दिसत होतं. कोण ही मोना? तिचा दीपकशी काय संबंध? दिपाकनी कधीच कोणा मैत्रिणीचा त्याच्या बोलण्यात उल्लेख केला नव्हता. पंकज आणि सागरच्या (जे त्याचे दूरचे नातेवाईक आहेत) व्यतिरिक्त मला त्याचे कोणी मित्र माहिती नव्हते. तर मैत्रिणींचा तर प्रश्नच नाही. त्यांच्यात मैत्रीचं नातं होतं का अजून काही? मला हे कधीच कसं जाणवलं नाही? हे असं केंव्हा पासून चालू असेल? एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत होते. दीपकच्या प्रती राग, अविश्वास, अपमानित झाल्याची, फसवणूक झाल्याची भावना ह्या सर्वांचा मनात इतका गोंधळ होता की दीपक खोलीत आलेला मला समजलंच नाही. त्यांनी रागानेच माझ्या हातातून फोन घेत विचारलं, “तू माझ्या फोनला हात का लावलास? तुला एवढ पण समजत नाही की कोणाच्या पर्सनल गोष्टीना हात लाऊ नये. नोंसेन्स.”

तो गुश्यातच निघाला. मी त्याला विचारलं, “दीपक, हि मोना कोण? तिचा आणि तुझा काय संबंध?”

ह्यावर मला काही समजायच्या आत त्यांनी माझ मनगट घट्ट पकडलं आणि दरडावत म्हणाला, “कविता, बायको आहेस बायकोच्या मर्यादेत रहा. मालकीण व्हायचा विचार पण करू नकोस. हे प्रश्न आम्हाला आमच्या आईनी कधी विचारले नाहीत. तर तू कोण? लायकीत राहायचं.” आणि तो तरातरा निघून गेला.

माझ्यासाठी हे सगळं इतकं अनपेक्षित होतं की घरातील सर्व माणस आमच्या खोलीत उभी आहेत हे हि मला जाणवलं नाही. “कविता, पुरुषांशी बरोबरी करू नकोस. तो तुला काही कमी पडू देत नाहीयेना, तेवढ बघ. बाकी तो कुठे जातो, कुणाला भेटतो ह्याच्याशी तुझा काही संबंध नाही. झोप आता.” सासूबाईंच्या शब्दांनी मी भानावर आले. त्या रात्री मी खूप रडले.

आधी वाटलं आईला सांगावं. पण काय आणि कसं? तिचा विश्वास बसेल का? जवळ जवळ वर्ष झालय आमच्या लग्नाला. इतके दिवसात कशाची तक्रार नाही आणि आज अचानक मी हे असं सांगितलं तर? आणि मी हे सगळं सिद्ध तरी कसं करणार होते. दीपकने एव्हाना त्याच्या फोन बुक मधून तिचं नाव डिलीट केलं असेल किंवा मोनाच्या जागी अजून काही लिहिलं असेल. ह्या विचाराने मी गोंधळून गेले आणि सध्या काही न करण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा ह्याची वाच्यता कोणाशी केली नाही पण माझ्या पद्धतीने माहिती मिळवत होते. जी माहिती मिळत होती ती फार काही चांगली नव्हती. मोना डार्लिंग एकटी नव्हती. हे कळल्यावर दीपकच्या आणि माझ्या नात्यात अंतर पडू लागलं.

एक दिवस राधिका सोबत रुटीन चेकउप साठी मी गेले. लेडी डॉक्टरनी, “सर्व नॉर्मल आहे. तब्येतीची काळजी घ्या. पहिलीच वेळ आहे...”वगैरे नेहेमीचा सल्ला दिला.

मी सहज, उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं, “डॉक्टर, एखाद्या कपलला मुल होत नसेल तर त्यासाठी काही वेगळी treatment घ्यावी लागते का? तुमच्या कडे ती मिळू शकते का?”

माझ्या ह्या प्रश्नानी राधिकाचा चेहेरा पडला. डॉक्टर काही म्हणणार त्या आधी ती घाईघाईने उठली, “कविता, घरी खूप काम आहे. आपल्याला निघायला हवं” म्हणत केबिन च्या बाहेर गेली.

दिवस जात होते. कविताच्या delivary ची तारीख जवळ येत होती. मी माझी रोजची कामं करत होते. पण त्या दिवसाच्या फोनच्या प्रसंगानंतर सगळ्याची घडी जणू विस्कटल्या सारखी झाली होती. राधिकाला मुलगा झाला. पण मला त्याचा फारसा आनंद झाला नाही. घरातील सर्व नात्यांमधे एक अंतर येत चाललं होतं. बाळाच बारसं ठरलं. बारश्याला खूप लोक आणि नातेवाईक आले. भेटायला, बघायला, कौतुक करायला! त्यात खूप जणांची पहिली रिअक्श्न होती, ‘किती दीपक सारखा दिसतोय’. एका काकुनी तर चेष्टेनी विचारलं पण, “मंदाताई, मुलगा सुरेशचा की दिपकचा?” ह्यावर सासूबाई पटकन म्हणाल्या, “सरोजताई, तुमचा स्वभाव काही बदलत नाही. मनात आल की बाई बोलून मोकळी. अहो माझा नातू आहे तो! सुरेश आणि राधिकाचा मुलगा!”

हे सगळं ऐकून माझं मन बधीर झालं. मनात येत होतं, सणाचं निमित्त करून मला माहेरी १० दिवसांसाठी पाठवलं. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दिपकनी साधा फोन केला नाही की माझी चौकशी केली नाही. त्या दिवशी घरात शिरतानाचं सासूबाईनी उच्चारलेलं वाक्य. हे सगळं काय आहे? मला काही समजत नव्हतं. सर्व पाहुणे गेल्यावर मी सासूबाई आणि राधिकाला उद्देशून विचारलं, “हे खरं आहे का?” राधिका खाली मान घालून उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. सुरेशदादा गप्प उभे होते. सासूबाईनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी मला एक थोबाडीत मारली आणि हाताला धरून घराबाहेर काढलं. दीपक आणि सासरे बघत होते, पण काही बोलले नाही. आणि त्या दिवशी मी माहेरी आले. आई-बाबांना सर्व सांगितलं आणि ते तुमच्या कडे घेऊन आले. आता ताई तुम्हीच सांगा मी ह्या माणसा सोबत कशी राहू?”

मागील एका वर्षात, कविता ४-५ वेळा तरी सासरी जाऊन आली. हि माहिती आम्हाला तिच्या बोलण्यातून समजली होती. ह्या पलीकडे अजून किती वेळा ती गेली होती ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगितलं, ‘तुमचं भांडण, तुमच्यातील गैरसमज मिटला असेल तर आम्हाला तसं सांग म्हणजे आम्ही केस बंद करतो. आणि केसपेपरवर लिहितो- दोघांमध्ये परस्पर समझोता झाला आहे.’ ह्याला ती तयार नव्हती. तिला सगळं लेखी करून हवं होतं.

दर खेपेला जाऊन आली की तिची सासरच्या लोकांबद्दल एक वेगळी तक्रार असायची. कधी म्हणायची सासरे जीवे मारण्याची धमकी देतात, तर कधी तक्रार करायची घरातले सगळे तिला ‘निघ’ म्हणतात, घरा बाहेर काढतात. कधी म्हणायची माझ्या नवर्याला माझी गरज आहे. पण तिचा असाही आग्रह होता की सुयश हा दिपाकचा मुलगा नाहीये हे त्यांनी सिद्ध करावं. तिला नेमकं काय हवं होतं? तिची अपेक्षा काय होती? ह्याचा आम्हाला पण अंदाज येत नव्हता.

त्या दिवशी दिपकचा फोन आला. पण बोलणं नीट कळत नव्हतं. कविता थांबायला तयार नव्हती. “ताई मी जाऊन येते. दीपकला समक्ष भेटल्याशिवाय, बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.” पुढे २०-२५ दिवस कविताची काही खबरबात नाही. आम्हाला पण ह्याची सवय व्हायला लागली होती.

नंतर एक दिवस दीपक आला. अचानक. ना फोन. ना येण्याची खबर. तोंडावर मास्क होता. चेहेरा थकलेला. आवाज खोल गेलेला. त्याच्या हालचालीतून असं जाणवत होतं की त्याला बर वाटत नसावं. समोरच्या खुर्चीत बसत त्यांनी धापा टाकत बोलायला सुरुवात केली.

“ताई मी दीपक. कवितानी माझ्या बद्दल काय सांगितलाय मला ठाऊक नाही. पण मला तिची गरज आहे. मला तिने परत यायला हवं आहे. ती मनात येईल तेंव्हा येते आणि तिच्या मनाला वाटेल तितके दिवस रहाते. आली की ती बरी आणि आमची रूम बरी. सारखा हातात मोबाईल. त्या मोबाईल वर काहीतरी उपलोड करत असते. स्वतापुरता  स्वैपाक करते. कधी तिचा मूड असेल तर माझा पण नंबर लावते. घरातील सगळे तिच्या वागण्याला कंटाळले आहेत. तिला नेमकं काय हवय तेच समजत नाहीये. ती अशी का वागते? आता महिन्याभरापूर्वी मला बर वाटत नाहीये कळवायला फोन केला तर दुसर्या दिवशी madam हजर. ‘येऊ नकोस’ असं बजावलं होतं, तरी आली. ती आली की तिचा माझ्या आई-वडिलांशी वाद होतो. ती काहीतरी असं बोलते की माझे बाबा चिडतात. राग अनावर झाला की ते हात उचलतात. मुळात त्यांचा स्वभाव तापट आहे.” बोलता-बोलता त्याला (ढास लागली) खोकला येत होता.

तो पुढे काही सांगणार तेवढ्यात “दीपक तू कधी आलास आणि कसा आलास? मोटर-सायकलवरून? असा तू बेजबाबदारपणे कसं वागू शकतोस. मी उद्या तिकडे येणार आहे असं सांगितलं होतं ना?” असं विचारात कविता ऑफिसमधे आली.

कविताला बघून आमच्या सर्वांच्याच चेहेर्यावर आश्चर्य बघून ती पटकन म्हणाली, “ताई, दीपक इकडे आलाय असा मला फोन आला होता?” कोणी केला हे विचारणं व्यर्थ होतं. आम्ही तिला बाहेर थांबायला सांगून दीपक कडून पुढील माहिती घेण्यास सुरुवात केली.

“दीपक, कविताच वागणं पहिल्यापासून असंच आहे का तुमच्या आयुष्यात असं काही घडलं ज्या मुळे ती अशी , म्हणजे तुम्ही म्हणालात तशी वागू लागली आहे? कविताच असं म्हणणं आहे की तुमची अफेअर्स आहेत. आणि तिला हे जेंव्हा समजलं आणि तिने तुम्हाला त्याबद्दल विचारलं तेंव्हा तुम्ही सर्व फार विचित्र पणे रीअक्त  झालात. हे खरं आहे का? आणि बाय द वे हि ‘मोना’ कोण आहे?”

“हे पहा ताई, माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा कोणालाच अधिकार नाहीये. तुम्हाला नाही आणि तिला तर नाहीच नाही.”

तेवढ्यात दीपकला कोणाचा तरी फोन आला आणि तो घाईघाईने बाहेर गेला. तो बाहेर गेलेला बघून कवितानी आत येऊन सांगितलं, “ताई मी आज पण समझोता करून नांदायला जायला तयार आहे. त्याच्या आई-वडिलांना इथे बोलवून घ्या आणि त्यांना मान्य करायला लावा की त्यांचा मुलगा आणि त्याचं वागणं चुकलं. आणि दिपकनी दोनच गोष्टी लिहून द्याव्यात, ‘इथून पुढे तो इतर बायकांशी संबंध ठेवणार नाही आणि राधिकाच्या मुलाशी त्याच काही नातं नाही.’

दीपक आत आला. त्याचा चेहेरा दमल्यासारखा दिसत होता. त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून घोटभर पाणी प्यायल आणि डोळे मिटून बसून राहिला. ‘दीपक, बर वाटतंय का? तुम्हाला इतकं बर वाटत नव्हतं तर आज इथे कशाला आलात? इतके दिवस तुमची बाजू ऐकायला थांबलो तर अजून काही दिवस थांबलो असतो.’ त्यांनी हातानेच ठीक आहे असं सांगितलं.

बँकेतील काम उरकून तेवढ्यात ऑफिस मधील संगीता आली. दीपकची अवस्था बघून ती पटकन म्हणाली,” ह्यांना काय झालाय? आता तर बाहेर कोणाशीतरी हसून बोलत होते आणि सांगत होते, “तू काही टेन्शन घेऊ नको. मी इथे सर्व बरोबर मेनेज करतो.”

हे ऐकून दिपकचा चेहेरा बघण्यासारखा झाला. तो तावातावाने उठला आणि बाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ कविता पण गेली. त्याला खरंच बर वाटत नाहीये का तो नाटक करतोय. का तो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळतोय, हे ठरवणं अवघड होतं.

थोड्यावेळानी बाहेरून जोरजोरात भांडण्याचा आवाज आला. बाहेर दीपकच्या मागे बाइकवर बसून जायचा प्रयत्न कविता करत होती. आणि दीपक हे होऊ देत नव्हता. कविताला ढकलून दीपक निघून गेला. कविता आत आली. तिच्या मागे तिचे आई-वडील आले. ती शांतपणे समोर बसत म्हणाली, “ताई, माझ्या लक्षात आलाय, हि माणस सुधरणार नाहीत, बदलणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात एका बाईची, तिच्या भावनांची काही किंमत नाही. तिला दोन वेळा गिळायला मिळालं, चार दागिने दिले, गरजेपेक्षा जास्त कपडा दिला की आणखीन तिच्यासाठी काही करण्याची गरज नाही. तिने ह्याच उपकारांच्या ओझ्याखाली आयुष्यभर त्यांची सेवा करावी, त्यांची नाटकं बघत,सहन करावीत हि त्यांची आणि समाजाची अपेक्षा आहे. मला कळून चुकलाय हा माझा प्रोब्लेम आहे. मी तो माझ्या पद्धतीने सोडविन. ताई, तुम्ही मला हिम्मत दिलीत. वेळोवेळी माझं म्हणणं ऐकून घेतलत, त्याबद्दल मी तुमची ऋणी राहीन. इथून पुढे कधी मदत लागली तर कराल ना? माझी केस बंद नका करू. कधी काय होईल हे मला पण माहित नाहीये.”

असं सांगून ती आमच्या ऑफिसमधून गेली. पुढे महिन्याभरानी तिच्या आईकडून समजलं की कविता, त्या दिवशी दीपकच्या पाठोपाठ सासरी गेली. १५ दिवस राहिली. कालपरवा ती बेग घेऊन पुन्हा कुठे तरी गेली आहे. आम्ही तिला ‘कुठे जातेस? कधी येणार? असं विचारणं बंद केलं आहे. तुम्हाला तिची खुशाली समजली तर प्लीज कळवाल का? अशी विनंती केली.

ह्यानंतर साधारण तीन महिन्यानी एक दिवस दिपकचा अचानक फोन आला, “ताई, मला तुमची मदत हवी आहे. मला कविताच वागणं समजत नाहीये. तक्रार करावी असं ती वागत नाहीये पण ती जे वागते आहे त्याचा मला त्रास होतोय. तीन महिने छान मजेत राहिली. कसला तरी हिशोब करत होती. काल अचानक कपाटातील तिचे दागिने आणि काही रोख घेऊन ती गेली. कुठे माहिती नाही. पोलीस स्टेशनला खबर करायला गेलो तर समजलं की ती जातानाच पोलीस स्टेशनमधे, सोबत घेतलेल्या वस्तूंची नोंद करून, माहेरी जात आहे असं सांगून गेली आहे. पोलिसांनी सांगितलं, ‘अहो ती तिच्या वस्तू घेऊन गेली आहे. त्याची नोंद घेता येईल. तक्रार नाही.’

काल तिचा फोन आला होता. म्हणाली, “काळजी करू नकोस. मी ८ दिवसात परत येईन. आई-वडिलांनी मला घातलेलं सोनं आणि लग्नात केलेला खर्च परत करायला हवा, असं मला वाटतं. आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघत त्यांनी, त्यांना न परवडणारा हा खर्च केला होता. आपल्या लग्नाचं काय झालाय आणि चाललाय हे तुला चांगलच माहित आहे.”  मी तिला विचारलं, “कविता, तू असं का वागतेस? तू कुठे जातेस?”

तर म्हणाली, “माझ्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायची कोणालाच परवानगी नाही. अगदी तुला पण नाही. काळजी करू नकोस. मी माझी वेळ झाली की परत येईन.”

दिपक फोन ठेवण्यापूर्वी एक वाक्य म्हणाला, ‘ताई, कविता अशी नव्हती. ती अशी का वागते आहे मला काही समजत नाहीये. तिचा बाहेर कोणी मित्र नाही ह्याची मला खात्री आहे. कधी कधी तिचं वागणं बघून मनात वाटतं, ती कशाचा तरी बदला तर घेत नसेल ना? पण कशाचा आणि का?’

‘जसं पेराल तसं उगवेल’ हे दीपकच्या बाबतीत घडत होतं!

No comments:

Post a Comment