Sunday 9 July 2023

नाझिया

एप्रिल मधील दुपारची वेळ. भयानक उकाडा! रस्त्यावर एक चिटपाखरू दिसत नव्हतं. मनोहर त्याच्या रोजच्या सवयीने दुकानात येऊन बसला होता. त्याचं रेडीमेड गारमेंट्सचं दुकान होतं. त्याला ठाऊक होतं की एवढ्या उन्हात आपल्या दुकानात कोणी गिऱ्हाईक येणार नाही. पण धंद्याचा एक नियम असतो. कोणी येवो अगर न येवो, दुकानदारांनी त्याच्या वेळेला दुकान उघडायला पाहिये! हि त्याच्या आजोबा-पणजोबांपासून चालत आलेली शिस्त होती. त्याच्या दुकानात काम करणारा राजू ‘शेठ, आज मी दुपारी थोडा उशिरा येईन’ असं सांगून गेला होता. थोडक्यात काय? मनोहर दुकानात एकटा होता. नुकतच जेवण झालेलं, दुपारची वेळ, त्यात कुलरची गार हवा, त्याला सुस्ती यायला लागली. तेवढ्यात त्याला एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. ‘हे कसं शक्य आहे? आपल्याला बहुतेक भास होतोय’ असं वाटून त्याने डोळे मिटून घेतले. पण हळू-हळू तो आवाज जवळ येतोय असं त्याला जाणवलं. कुतूहलानी त्यांनी दुकानाच्या बाहेर येऊन पाहिलं. रस्त्यांनी एक भिकारी जोडपं जात होतं. बाई पांगली असल्याने व्हील चेअर मधे होती. अंगात फाटके, मळकट कपडे. केस विस्कटलेले. एकूण अवतारच होता. तिचा पांगुळगाडा एक माणूस ढकलत होता. कमरेला लुंगी आणि अंगात मळका, फाटका, भोकं पडलेला बनियन. एकूण त्यांच्या पेहेरावावरून त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात येत होती. त्यांच्या मागून अंदाजे एक ६-७ वर्षांशी मुलगी, अनवाणी, अंगभर काळा बुरखा घातलेली रडत चालली होती. तापलेल्या रस्त्यावरचे चटके तिला सहन होत नव्हते. ती रडत, केविलवाण्या विनवण्या करत त्यांच्या मागे फरफटत जात होती. हे बघून मनोहरनी त्या माणसाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला, ‘ओ भैया, तुम्हारे पीछे ये लाडकी रोती हुई चल रही है. इतनी कडी धुपमे नंगे पाव चल नाही पा रही है. आप उसे उस औरतके पास बिठा क्यो नही लेते.’

मनोहरचा आवाज ऐकून तो माणूस दचकला, घाबरला आणि पांगुळगाडा जोरात ढकलत, जवळ जवळ धावतच गेला. त्या माणसाचं वागणं मनोहरला थोडं विचित्र वाटलं. पण तो दुकान सोडून त्याच्या मागे जाऊ पण शकणार नव्हता.

काही दिवसांनी मनोहरच्या दुकानासमोरून तेच जोडपं तसच जाताना त्याला दिसलं. आज दुकानात राजू असल्याने मनोहरने त्या जोडप्याचा पाठलाग करायचा ठरवला. स्कूटर काढून निघे पर्यंत ते जोडपं आणि ती मुलगी जवळच्या वस्तीत गायब झाले. शंभरहून अधिक घरं, ८-१० गल्ल्या असलेली दाट वस्ती. त्याचं नाव-गाव काही माहित नाही. त्यांच्या सारखी अजून बरीच कुटुंब असू शकतील तेंव्हा तिथे त्यांना शोधणं अवघड आहे, हे मनोहरच्या लक्ष्यात आल. मनोहर दुकानात परत आला. पण त्याला ते जोडपं, ती मुलगी, तिचं रडणं, त्यांचं तिच्याशी असंवेदनशील वागणं, सगळंच अस्वस्थ करत होतं.

पुन्हा काही दिवसांनी ते कुटुंब त्याच्या दुकानासमोरून जाताना त्याला दिसलं. आज हातातील सर्व काम सोडून तो त्यांच्या मागे पायीच निघाला. त्यांचा पाठलाग करत तो त्या वस्तीत पोहोचला. पण त्याला कळायच्या आत ते एका झोपडीत गायब झाले. मनोहरने आजूबाजूला चौकशी केल्यावर त्याला मिळालेली माहिती फारच विचित्र होती. तेथील काही लोकांनी सांगितलं, “ते जोडपं समोरच्या घरात रहाते. ते काय काम करतात कोणालाच माहित नाही. ही मुलगी त्यांची नसावी असं आम्हाला वाटतं. नाहीतर इतकं अमानुष पणे कोणी एवढ्याशा मुलीला कशी वागणूक देऊ शकेल? ६-७ महिन्यांपूर्वी हे लोक इथे आले. दिवसभर बाहेर असतात. रात्री-अपरात्री त्या मुलीचा रडण्याचा कधी किंचाळण्याचा आवाज येतो. बहुतेक वेळा ती एक तर घरात असते नाहीतर बुरख्यात असते. एकदाच तिला शेजारच्या काकूंनी बघितलं होतं. त्या सांगत होत्या, त्या मुलीच्या चेहेर्यावर कशानितरी मारल्यासारख्या जखमा होत्या.”

न रहावल्याने मनोहर म्हणाला, “अहो, तुमच्या समोर हे सगळं घडतंय आणि तुम्ही काहीच कसं केलं नाहीत? कमीत कमीत पोलिसांना तरी खबर करायला हवी होती. मला तर वाटतंय पोलिसात तक्रारच द्यायला हवी.”

त्यावर एक गृहस्थ म्हणाले, “आम्ही पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यांना चौकीत बोलावून घेतलं. त्या लुंगीवाल्या बाबानी पोलिसांना सांगितलं की, ‘नाझिया मनोरुग्ण आहे. ती कधीपण कोणाच्यापण अंगावर धावून जाते. आम्हाला पण तिची काळजी वाटते.’ त्या दिवशी पोलीस आमच्या वस्तीत आले. त्या झोपडीत बघितलं. त्या मुलीला एखाद्या जनावराला बांधावं तसं साखलिनी बांधून ठेवलं होतं. मी जे बघितलं ते पोलिसांना दिसलं की नाही ठाऊक नाही पण ती मुलगी ग्लानीत होती आणि तिच्या चेहेर्यावर जखमा होत्या. त्या दिवसानंतर पुढे काहीच झालं नाही. तिचं रडणं, किंचाळण अधून-मधून चालूच आहे.”

आपण त्या मुलीला काहीतरी मदत करूया ह्या विचारांनी मनोहर पोलीस स्टेशनला गेला. एका हवालदाराला ती मुलगी आणि तिच्या संदर्भातील तक्रार आठवत होती. त्यांनी मनोहर समोर साहेबांना येवून सांगितलं, ‘साहेब ती मुलगी वेडी आहे. त्या दिवशी मी पण होतो, त्यांच्या घरी गेलो तेंव्हा!”

ह्यावर चौकीतल्या वरिष्ठ साहेब म्हणाले, “हे असं असत. तुम्ही तक्रार द्यायला आलात पण सत्य काहीतरी वेगळच आहे. आमचं आहे लक्ष. आम्हाला काही वाटलं तर आम्ही एक्श्न घेऊ.” 

इथून काही मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मनोहरने त्याच्या एका वकील मित्राला फोन करून त्याचा सल्ला घेतला. वकील मित्रांनी त्याला बाल कल्याण समिती ची मदत घेण्याचा सल्ला दिला.

आणि अश्या प्रकारे नाझिया ची केस आमच्या कडे आली.

बाल कल्याण समितीला, Juvenile Justice Act अंतर्गत, काही अधिकार बहाल केले आहेत. (हे अधिकार ५ सदस्यांच्या समितीला आहेत, वैयक्तिक एका सदस्याला त्याचा उपयोग करता येत नाही.) ह्याच अधिकाराचा वापर करून, मनोहरच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही त्या पोलीस चौकीतील अधिकार्याला ह्या केस संदर्भात ती मुलगी आणि माहिती सादर करायला सांगितले. पोलिसांनी आमच्या आदेशाचे पालन करत नाझिया आणि तिच्या पालकांना (जे खरंच तिचे पालक आहेत का हे कागद पत्रांची सहानिषा करून ठरवायचं होतं) समिती समोर हजर केलं. नाझियाचा बुरखा काढला आणि समोर एक ६-७ वर्षांची, बारीकशी, घाबरलेली मुलगी दिसली. तिची अवस्था बघवत नव्हती. चेहेर्यावर आणि हाता पायांवर मारल्याच्या जखमा-काही जुन्या, काही ताज्या होत्या. अंगात फाटलेला, मळकट फ्रॉक, केस पिंजारलेले. डोक्याला कितीतरी दिवसात तेलाचा स्पर्श झाला नसावा. तिचा अवतार बघून तिला खूप दिवसात अंघोळ पण करायला मिळाली नसण्याची दाट शक्यता वाटत होती. तिने किलकिले डोळे करत चौफेर पाहिलं. सोबत आलेल्या त्या जोडप्यावर तिची नजर पडली. तिच्या चेहेर्यावर एका क्षणात भीती, वेदना, राग, तिरस्कार, असे विविध भाव दिसले आणि आम्हाला कोणाला काही कळायच्या आत ती धावत आमच्या कडे आली आणि घाबरून आमच्या खुर्चीच्या मागे लपली. तिला जवळ घेत, शांत करत आम्ही तिला सांगायचा प्रयत्न करत होतो की ‘तिला इथून कोणी कुठे पण घेऊन जाणार नाही. तिला कोणी त्रास देणार नाही.’ आम्ही तिला आश्वस्त करायचा प्रयत्न करत होतो. बहुतेक आमच्या प्रयत्नांना यश येत होतं. एखादं मुल ज्या विश्वासाने आपल्या आईकडे जाते त्याचप्रमाणे ती आम्हाला चिकटून बसली. थोड्या वेळानी तिला वाटलेली भीती कमी झाली. मग तिला संस्थेतील मावशी कडे सोपवून आम्ही आमच्या कामाला लागलो.

नाझिया सोबत आलेलं जोडपं एव्हाना खूप अस्वस्थ झालं होतं. ते सारख्या आमच्या विनवण्या करत होत की, “सर, म्याडम, नाझिया हमारी बच्ची है. उसको हमारे हवाले कर दो.”

त्यावर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “नाझिया कशानी तरी खूप घाबरली आहे. तिच्या अंगावर जखमा आहेत. ती अशक्त पण वाटते आहे. तिच्यावर थोडे उपचार करायला सांगतो. तोवर तुम्ही तिचे पालक आहात हे सिद्ध करणारे कागदपत्रे घेऊन या. नाझिया तुमची मुलगी आहे हे सिद्ध झालं की तिला घेऊन जा.”

“म्याडम, इसमे सिद्ध करनेकी क्या बात है. वो हमारी बेटी है, हमारा खून है. हम आपको बता रहे है. इतना काफी नाही है क्या?”

“नाही. तेवढ पुरेसं नाहीये. तुम्ही तुमचं रेशनकार्ड- ज्यावर तिचं कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा आहे, तिचं नाव आहे. किंवा तिचा जन्माचा दाखला घेऊन या.”

“ये हम कहासे लाये. आप हमे बच्ची दे दो और बात खतम कर दो.”

अखेरीस त्यांनी मान्य केलं की योग्य कागद बघितल्याशिवाय, आमची खात्री पटल्या शिवाय नाझिया त्यांना मिळणार नाही. म्हणून ते गेले. त्या दिवशी बाकीची काम संपल्यावर आम्ही बराच वेळ विचार करत होतो-ते जोडपं खरंच ह्या मुलीचे पालक असतील का? ती एवढी कशामुळे आणि कोणाला घाबरली आहे? तिला कोणी आणि का इतकी मारहाण केली असेल? तिचं खरं नाव काय असेल? ते खरंच तिचे पालक असतील तर तिला त्यांच्या ताब्यात देताना काय काळजी घेतलेली मुलीच्या दृष्टीने बरी राहील?......

दुसर्या दिवशी बाल गृहातून निरोप आला की ते जोडपं आल आहे आणि ‘आमची मुलगी आम्हाला द्या’ असा हट्ट धरून बसले आहेत. त्यांच्या कडे अपेक्षेप्रमाणे कागदपत्रे नव्हती. ती असल्याशिवाय मुलगी ताब्यात मिळणर नाही. पण मुलीला भेटायचं असेल तर बाल कल्याण समितीच्या उपस्थितीत भेटता येईल. ते पण मुलीची इच्छा असेल तर. असा निरोप दिला.

त्यांनी संस्थेत येऊन नाझियाला भेटण्याचा प्रयत्न पण केला पण नाझिया त्यांच्या कडे जायला काय, त्यांच्या कडे बघायला किंवा त्यांच्या समोर यायला पण तयार नव्हती. सुरवातीला ती त्यांना बघितलं की घाबरून लपून बसायची. त्यांच्या प्रती तिला वाटणारी भीती, राग, तिरस्कार, हे सर्व तिच्या वागण्यातून जाणवत होतं. त्यामुळे आम्ही त्या जोडप्याची आणि नाझियाची भेट होऊ दिली नाही.

मग काय पुढील महिना दोन महिने ते दर दोन-तीन दिवसांनी येऊन आमची मुलगी द्या अशी विनंती करत राहिले, तर कधी दम दाटी करायचा प्रयत्न केला. आणि आम्ही त्यांच्या कडे कागद मागत राहिलो. हळू-हळू त्यांनी त्याचं म्हणणं बदललं. काही दिवसांनी त्या माणसानी सांगितलं, “वो हमारी बेटी नही है. वो मेरे भाईकी बेटी है.”

त्यावर भावाला घेऊन ये म्हणता क्षणी त्यांनी नवीन माहिती दिली. “भाई और भाभी अब इस दुनियामे नही रहे.”

ते कुठे आहेत? काय झालं? असे प्रश्न विचारल्यावर माहिती मिळाली की दोघंही रोड अक्सिडेंत मधे मेले. त्याचे डीटेल्स विचारले, त्यांच्या मृत्यूचा दाखला मागितला तर काही तरी उडवा उडवीची उत्तरं दिली. मग सांगितलं सिन्नरच्या घाटात झाला अक्सिडेंत. आम्ही हायवे पोलिसांमार्फत चौकशी केली तर हि माहिती चुकीची आहे असे समजले. एका बाजूला ते जोडपं विविध मार्गांनी ती मुलगी ताब्यात मिळवायचा प्रयत्न करत होतं आणि दुसर्याबाजूला आम्ही तिचे खरे पालक शोधायच्या प्रयत्नात होतो.

प्रेम, काळजी, योग्य आहार आणि संरक्षण मिळाल्यामुळे नाझियाची तब्येत सुधारत होती. तिच्या कडून तिच्या आई-वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस तिच्या कडून समजलं की ती  शाळेत जात होती. पहिलीत होती. वर्ग शिक्षिकेच नाव- पाटील बाई होतं. शाळा एका टेकडीवर होती. घरी आई-बाबा, एक भाऊ आणि एक ताई होती. आता आम्हाला सर्वांनाच तिचे खरे पालक सापडण्याची आशा वाटायला लागली. पण हि शाळा नाशिकमधे आहे कुठे? कशी शोधायची? प्रत्येक जण आपापल्यापरीने ह्या वर्णनाची शाळा शोधत होता. एव्हाना विविध कारणांनी बाल कल्याण समितीत येणारे विविध संस्थेतले कार्यकर्ते पण मदतीला धावून आले. नाशिकमधे अशी शाळा सापडली नाही. सापडली असती तरी तिथे, नाझियाचं खरं नाव माहिती नसल्याने, माहिती मिळणं अवघड होतं. एकानी सुचवलं, ‘कल्याण, भिवंडी कडे अश्या शाळा आहेत. झेड पी ची किंवा नगरपालिकेची.’ तिथे पण कार्यकर्ते पाठवून शोध घेतला पण काही हाती लागलं नाही.

नाझियाला संस्थेत दाखल होऊन तीन महिने होत आले होते. तिच्या आई-वडिलांचा कुठून, काहीही पत्ता सापडत नव्हता. आम्हा समिती सदस्यांची इतर काम चालू होती. एक दिवस एका संस्थेतील कार्यकर्त्यांनी माता मेळाव्याचे आयोजन केले आणि त्या मातांशी बोलायला मला बोलावलं. मुलांची काळजी, त्याचं संगोपन, योग्य आहार-व्यायाम ह्याची गरज, अश्या अनेक मुलांच्या संदर्भातील विषयांवर माहिती दिली. त्या सोबतच मुलांच्या सुरक्षितते बद्दल बोलताना मी नाझियाच्या नावाचा उल्लेख न करता तिच्याबद्दल आणि अश्या घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती दिली. मी बोलत असताना जमलेल्या मातांमधून एक महिला रडायला लागली आणि ती उठून सरळ माझ्यापाशी आली आणि माझा हात घट्ट धरून आशेनी म्हणाली, “ताई, कुठे आहे ती मुलगी? तिचं नाव काय आहे? कशी दिसते? वय किती आहे? ताई, मी तिला भेटू शकते का? ती माझी सोनाली असेल. मला प्लीज एकदा तिला बघू द्या.”

कार्यकर्ते पटकन पुढे आले आणि तिला सावरत म्हणाले, “त्याचं काय आहे ताई, सुमनताई ची सोनाली ९-१० महिन्यांपासून गायब आहे. बाहेर गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होती. थोड्या वेळानी सुमनताई तिला बोलवायला गेल्या तर सोनाली कुठे दिसे ना. त्यांनी शेजारी पाजारी तिला खूप शोधलं. आम्हाला कळवलं. आम्ही पण तिला खूप शोधलं. पोलीस स्टेशनला मिसिंग पण नोंदवली. पण काही उपयोग झाला नाही. आज तुम्ही त्या मुलीची माहिती दिलीत तर त्यांना वाटतंय त्यांची सोनालीच असेल. आईची वेडी आशा.”

आम्ही सुमनताईला दुसर्या दिवशी बाल गृहात लागणारी कागदपत्र घेऊन यायला सांगितलं. माझी पण वेडी आशाच असेल, सुमनताई खरंच सोनाली उर्फ नाझियाची आई असेल तर आई-मुलीच्या भेटीला आणखीन एक दिवसाचा विलंब नको.

आम्ही बोलावलं त्याच्या आधी तासभर सुमनताई संस्थेच्या कार्यालयात येऊन वाट बघत होत्या. थोड्या वेळानी सोनाली उर्फ नाझिया चे वडील बाकीच्या दोन्ही मुलांना घेऊन पोहोचले. आम्ही गेल्यावर नियमाप्रमाणे त्यांनी सादर केलेले कागदपत्र बघितली. जवळ जवळ आम्हा सर्वांची खात्री पटली होती की समोर बसलेलं जोडपं हेच नाझिया चे खरे आई-वडील आहेत. सोनालीला बोलावलं. ती कार्यालयात आली. आणि ज्या पद्धतीने सोनाली धावत सुमनताई कडे गेली आणि आई म्हणत तिच्या गळ्यात पडून, तिला घट्ट मिठी मारून रडली. आणि सोनालीला बघता क्षणी जो आनंद त्या कुटुंबाच्या चेहेर्यावर बघितला, त्यानंतर आम्हाला आणखीन पुराव्याची गरज नव्हती. बाकीच्या फोर्मेलीती पूर्ण केल्या आणि सोनालीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं.

सोनालीच्या पालकांचा शोध चालू होता तेंव्हा दुसरी कडे पोलीस त्यांचं काम करत होते. मिळालेली माहिती, मनोहरने दिलेली तक्रार ह्याच्या आधारे त्यांनी त्या जोडप्याविरुद्ध मुलीचं अपहरण केल्या बद्दल केस दाखल केली. पुढे ती केस कोर्टात चालली. वास्तविक बघता सोनालीच्या आई-वडिलांचा शोध लागला आणि सोनालीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिल्यावर बाल कल्याण समिती म्हणून आमची जबाबदारी संपत होती. पण मागील ३-४ महिन्यांच्या कालावधीत मनोहरचं कारणा-कारणांनी बाल कल्याण समितीत खूप वेळा येणं झालं. आम्हाला नाझिया उर्फ सोनालीच्या केस मधे पुढे काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच आणि मनोहर पण दर खेपेला केस संदर्भातील नवीन घडामोडींची माहिती देत राहिला. त्याच्या कडूनच आम्हाला समजलं की केस कोर्टात सुनावणीला आली तेंव्हा मनोहर फिर्यादी ह्या नात्याने एकटा हजर होता. पण ते भिकारी जोडप्याला आधार द्यायला, मदत करायला २०-२५ माणस होती. एवढंच नाही तर त्यांच्या बाजूनी युक्तिवाद करायला एक चांगला क्रिमिनल लोयेर उपस्थित होता. हे ऐकल्यावर आम्ही पण गोंधळून गेलो. हि माणस होती तरी कोण? ते खरंच भिकारी होते का आणखीन काही? त्यांच्या मागे त्यांना आधार देणारे, मदत करणारे कोण होते? त्यांच्या मागे कोणाचं पाठबळ होतं? जितका विचार करत होतो तितका विचारांचा गोंधळ वाढत होता. खालच्या कोर्टात त्यांना शिक्षा झाली. त्यांनी उच्च न्यायालयात अपील केलं, इथपर्यंत माहिती आम्हाला मिळाली. पुढे काय झालं ते समजलं नाही.

पुनःपुन्हा सोनालीची ह्या सगळ्यातून सुखरूप सुटका झाली आणि ती होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मनोहर बद्दल खूप अभिमान आणि आदर वाटत होता आणि आहे. खरंच समाजात, आपल्या अवती भवती अश्या किती गोष्टी, घटना घडत असतात. आपण त्या बघतो, कधी वाईट वाटतं, कधी हळहळतो. पण पुढाकार घेऊन करत काहीच नाही. ना ते थांबवण्याचा प्रयत्न करत, ना कोणाच्या निदर्शनास आणून देत. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही.

No comments:

Post a Comment