Wednesday, 2 August 2023

या प्रॉब्लेममधून 'सुटका' कशी होणार?

एक दिवस अचानक सकाळी अभयचा फोन आला. “काकू, तुझी थोडी मदत हवी आहे. मदत, सल्ला, मानसिक आधार, खरं म्हणजे हे सर्वच हवं आहे. मला अर्जंटली तुला भेटायचं आहे. कुठे येऊ?”

अभय, आमच्या शेजारच्या सरोजताई, यांचा मुलगा. अगदी बालवाडी पासून बघितलेला. कॉलेजच शिक्षण होईपर्यंत संपर्कात होता. पुढे नोकरी निमित्त सरोजताई आणि मोहनराव दिल्लीला शिफ्ट झाले आणि ह्या सगळ्यांचा संपर्क तुटल्यासारखा झाला. आज अचानक अभयचा फोन आला. छान पण वाटलं आणि थोडी काळजी पण! थोडी विचारपूस केल्यावर असं समजलं की, अभय सध्या नाशिकमधे आहे, आणि एका निवासी शाळेतील व्यवस्थापनाची त्याच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या एका मावशींच्या घरी काहीतरी प्रोब्लेम झाला आहे. आणि त्यांना तातडीने मला भेटायचं आहे. ‘घरी प्रोब्लेम आहे’ ह्या माहितीवरून आधी वाटलं नवरा-बायको मधील भांडण असेल. “त्यांना महिला हक्क संरक्षण समितीच्या ऑफिस मधे दुपारी चारच्या सुमारास भेटायला घेऊन ये. आत्ता मला आधी बाल कल्याण समितीत जाण गरजेचं आहे.” असं सांगून फोन ठेवणार, तेवढ्यात अभय म्हणाला, “काकू, मावशींची संगीता १३-१४ वर्षांची आहे. आणि तिच्या संदर्भात मदत हवी आहे.” हे ऐकल्यावर मी त्यांला बाल गृहात (जेथे बाल कल्याण समिती नियमित पणे भेटते तेथे) भेटायला बोलावलं.

ठरल्या प्रमाणे अभय आला. पण त्याच्याबरोबर एक ३५-शीतला माणूस होता. अभयनी त्यांची ओळख करून दिली, “काकू, हे माधवराव. आमच्या कडे काम करणाऱ्या मंगल ताईचा नवरा. ह्यांच्या मुलीचा प्रोब्लेम आहे. तू प्लीज काहीतरी मार्ग सुचव. त्यांचंच काय आमची सगळ्यांची डोकी बंद पडली आहेत.”

माधव खाली मान घालून उभा होता. त्याच्या चेहेर्यावर टेन्शन दिसत होतं. त्याचा अवतर, सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, ह्यावरून जाणवत होतं की रात्रभर हा झोपलेला नाहीये. माधवच्या चेहेर्यावर जी काळजी दिसत होती ती तो बोलायला लागल्यावर आणखीन तीव्रतेनी जाणवली. “काय प्रोब्लम आहे तो बसा आणि शांतपणे सांगा” मी असं सांगितल्यावर, माधव रडायला लागला. आता पर्यंत स्वतःच्या भावनांना कसं तरी त्याने कंट्रोल केलं होतं. “ताई, हे काय होऊन बसलं? हे कसं झालं? आमचं हसत-खेळत कुटुंब उद्वस्त झालं. ताई, माझ्या संगीताला वाचवा. ती खूप लहान आहे. तिला काय चाललाय ते समजत नाहीये. काय झालाय, कसं झालाय ते सांगता येत नाहीये. तिला पोटात दुखून होणार्या वेदना सहन होत नाहीयेत. आज पर्यंतच्या आयुष्यात आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतील नाही. मग माझ्या संगीताच्या वाट्याला हे सगळं का?”

ह्यात मी काय आणि कशी मदत करू शकणार होते. त्यांनी मुलीला डॉक्टर कडे घेऊन जाण अपेक्षित आहे. अभय ह्यांना घेऊन माझ्या कडे का आला असेल? माझा प्रश्नार्थक चेहेरा बघून अभयच्या लक्षात आल की माधवराव जे सांगतायत आणि जसं सांगतायत त्यांनी काहीच अर्थबोध होत नाहीये. तो म्हणाला, “काकू, संगीताच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून तिला दवाखान्यात तपासायला नेलं आहे. मंगल ताई तिच्या सोबत आहेत. पण मला जेवढं समजलंय त्यावरून असं जाणवतंय की त्यांना तुझ्या सल्ल्याची गरज.....”तेवढ्यात अभयचा फोन वाजला. “हलो मंगलताई. काय? काय सांगताय काय? हे कसं शक्य आहे? तुम्ही तिथेच थांबा. मी काकूला घेऊन लगेच येतो.”

मी हातातील काम संपवलं आणि अभयच्या गाडीतून आम्ही सगळे निघालो. लेडी डॉक्टर कुलकर्णी ह्यांच्या क्लिनिकला गेलो तर समजलं की त्यांनी संगीताला स्त्री रोग तज्ञाकडे घेऊन जाण्यास सांगितले म्हणून मंगलताई संगीताला डॉ. पाटील ह्यांच्या कडे घेऊन गेल्या आहेत. कुलकर्णी डॉक्टरांनी जे सांगितलं ते खूप विचित्र, गंभीर आणि मन सुन्न करणारं होतं. त्या म्हणाल्या, “मी संगीताला तपासलं. तिची पोट-दुखी अपचन किंवा इतर छोट्या-मोठ्या कारणांनी उद्भवलेली नाहीये. आय थिंक इट्स समथिंग सिरिअस. माझ्या कडे तिची treatment होऊ शकणार नाही.” त्यांनी माझ्या कडे बघत विचारलं,” madam, आपण संगीताच्या नातेवाईक आहात का? तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे.”

मी, माझी ओळख, बाल कल्याण समिती सदस्य अशी करून दिली आणि त्यांना खात्री दिली की माझ्या बाजूनी जी शक्य असेल ती मदत, सहकार्य मी करीन.

आम्ही पाटील डॉक्टरांकडे पोहोचलो तर बाहेरच्या बाकावर मंगलताई एकट्याच रडत बसल्या होत्या. मी शेजारी बसत, त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाले, “मंगलताई, सर्व ठीक होईल. काही काळजी करू नका.”

माझा आवाज ऐकून त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन लहान मुलीसारख्या रडल्या. काल दुपारी संगीताला  राधाबाईंनी घरी आणून सोडलं तेंव्हापासून मंगलताईच्या आयुष्यात इतक्या अनपेक्षित गोष्टी घडल्या होत्या की त्याची विचार करायची ताकत संपून गेली होती. संगीताच्या तब्येती बद्दल डॉक्टरांचं मत, केलेल्या टेस्ट, हाती आलेला रिपोर्ट, झालेला खर्च, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात आपल्या लेकीचं दुख कमी करू न शकण्यामुळे आलेली हतबलता. आणि आता पाटील डॉक्टरना वाटणारी शक्यता. सर्वाच खूप टेन्शन आल होतं. काल संगीताच्या शाळेतून तिच्या वर्ग शिक्षिकेचा फोन आला होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘संगीताची तब्येत ठीक नाहीये. मंगलताई तुम्हाला मागील तीन महिन्यात खूप वेळा हा निरोप मी दिला. पण तुम्ही काही त्याची दाखल घेतली नाहीत. संगीता, एक चुणचुणीत, खेळकर आणि हुशार मुलगी आहे, सध्या ती कशातच सहभागी होत नाही. ना खेळाच्या तासाला सहभाग घेत, ना तिचं अभ्यासाकडे लक्ष आहे. वारंवार तब्येतीच्या, पोट दुखण्याची तक्रार करत असते. मी आज तिला राधाबाई सोबत घरी पाठवते आहे. तिला प्लीज डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरचा रिपोर्ट घेऊन तुम्ही स्वतः भेटायला या. तिची काळजी घ्या.’

मंगलताई थोड्या रीलेक्स झाल्या. आता त्यांना माझ्याकडून मदतीची काय अपेक्षा आहे असं विचारावं, असं माझ्या मनात आल. तेवढ्यात पाटील डॉक्टरनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. अभय आणि मंगलनी आग्रह केला म्हणून मी आत गेले. डॉक्टरनी बोलण्यापूर्वी सर्वाना बसायला सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी तुम्हाला संगीताच्या तब्येतीबद्दल सांगायला बोलावलं आहे. मी जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी अनपेक्षित असणार आहे ह्याची मला कल्पना आहे. माझ्याकडे वेळ फार नाहीये. संगीता गरोदर आहे. सातवा महिना संपत आला आहे. तिची प्रकृती खूप नाजूक आहे. तिला ह्या वेदना सहन करण अशक्य आहे. ताबडतोब डिलिवरी करण गरजेचं आहे. मला तिच्या पालकांकडून त्या अर्थाची लेखी परवानगी हवी आहे. खरं म्हणजे तिचं वय बघता हि डिलिवरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये व्हायला हवी. पण आपल्याकडे वेळ नाहीये. मुलीचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे आहे. प्लीज मुलीच्या पालकांनी ह्या फोर्मवर सही करा.”

पाटील डॉक्टर बोलायच्या थांबल्या. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो. हे कसं शक्य आहे? १३-१४ वर्षांची शाळेत शिकणारी मुलगी आणि गरोदर. कोणाचाच आपल्या कानांवर, जे ऐकलं त्याच्यावर  विस्वास बसत नव्हता. माधवरावांनी बधीर चेहेर्यानी फोर्मवर सही केली. डॉक्टर, संगीताची आणि बाळाची सुटका करायला घाईने आत गेल्या. ह्या सगळ्या अनपेक्षित बातमीने मंगलताई बेशुद्ध झाल्या. दवाखान्यातील नर्सच्या मदतीने त्या सावरल्या खर्या पण भ्रमिष्टासारखी बडबड करायला लागल्या. “माझी संगीता गरोदर? हे कसं शक्य आहे? हे कधी झालं? कसं झालं? तिने लग्न कधी केलं? का आम्हीच करून दिलं? हे सगळं काय चाललाय? कोणीतरी मला प्लीज सांगा ना की हे खरं नाहीये. ताई तुम्ही तरी सांगा. संगीताचे बाबा हे काय होऊन बसलं? आता पोरीला काय सांगायचं? तिच्या शाळेत, तिच्या बाईना काय सांगायचं? आपली संगीता तर शाळा आणि घर ह्याच्या व्यतिरिक्त कोणा मैत्रिणीकडे काय, कुठे कधीच गेली पण नाही. मग हे कधी आणि कसं झालं?”

त्यांना वाटणारी काळजी, त्यांना पडलेले प्रश्न, हे सगळं त्यांच्या जागी योग्यच होतं. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त संगिताच देऊ शकत होती. पण ती आता ना कोणाशी बोलायच्या ना कोणाला भेटायच्या परिस्थितीत होती. मंगलच्या मनात उलटे सुलटे विचार येत होते. तिला एक क्षणभर असं पण वाटलं की दिवसभर आपण कामानिम्मित्त शाळेत असतो. तिचे वडील माल पोहोचवायला टेम्पो घेऊन दोन-दोन दिवस बाहेरगावी जातात. आम्ही दोघं घरात नसताना कोणी आपल्या मुलीला फसवलं तर नसेल ना? ती आपल्याशी कधीच काहीच कसं बोलली नाही? विचार करून करून तिचा मेंदू फुटायची वेळ आली होती. माधवराव पूर्ण वेळ भकास चेहेर्यानी आपल्या बायकोला आधार देत, तिच्या खांद्यावर हात ठेऊन बसले होते. त्यांच्या मनातील विचारांच्या गोंधळाचा काही अंदाज येत नव्हता.

तासाभरानी पाटील डॉक्टरनी निरोप दिला की संगीता आणि बाळ सुखरूप आहेत. संगीता ह्या सगळ्यामुळे खूप दमली आहे. बाकीचे (सोपस्कार) फोर्मेलीतीस नंतर करू. संगीता बरी आहे. आजचा माझा दिवसपण खूप धावपळीचा गेला होता. शिवाय तिथे थांबून मी करण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून मी तिथून निघाले. अभय मला घरी सोडायला आला. मी उतरताना तो म्हणाला, “काकू, थेंक्स. तुझ्यामुळे माझ्यासाठी गोष्टी खूप सोप्या झाल्या. तू आल्यामुळे त्या दोघांना आणि मला खूप आधार वाटला. आता पुढे कसं आणि काय करायचं. संगीताशी आणि तिच्या पालकांशी बोलायला उद्या येऊ शकशील का? तू येऊ शकलीस तर खूप बर होईल.  प्लीज जमवना.”

संगीताला ज्या दिवशी डिस्चार्ज मिळेल त्या दिवशी मी येण्याचं कबूल केलं. मी काय काम करते हे समजल्यावर  दुसर्या दिवशी सकाळीच मला पाटील डॉक्टरनी फोन करून बोलावून घेतलं. संगीताच्या केस मधे पुढे काय फोर्मेलीतीस कराव्या लागतील ह्या संदर्भात चर्चा करण्या साठी. आम्ही दोघींनी संगीताच्या पालकांना आणि अभयला पण त्या चर्चेत सहभागी करून घेतलं. त्यांना ह्या संदर्भातील कायदा, त्यांनी बाळाच्या संदर्भात घ्यावयाचा निर्णय, ज्या कारणांनी आणि परिस्थितीत संगीता गरोदर राहिली असावी ते बघता पोलिसांना ह्या संदर्भात रिपोर्टिंग करण्याची गरज, अश्या एक ना अनेक गोष्टींची कल्पना देण्याची आवश्यकता होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, संगिताच वय लक्षात घेता, बाळ आणि बाळाचा जन्म ह्याबद्दल संगीताशी बोलण्यात आमच्या सर्वान मधे एकवाक्यता असणं फार गरजेचं होतं.

सर्वप्रथम सर्वांनी एकमतानी ठरवलं की संगीताशी फक्त तिची आईच ह्यासंदर्भात बोलेल. त्याप्रमाणे तिने संगीताला दुसर्या दिवशी सांगितलं की, ‘तुझ्या पोटात एक गाठ झाली होती. त्याच्यामुळे तुझं पोट सारखं दुखत होतं. आता डॉक्टरनी ती गाठ काढून टाकली आहे. आता तुला बर वाटेल. महिन्या भरानी तू परत शाळेत जाऊ शकशील.’ संगीताला किती समजलं, किती पटलं, आम्हाला समजायला काही मार्ग नव्हता. पण तिने नंतर त्या संदर्भात कोणाला काहीच प्रश्न विचारला नाही.

संगीताला दवाखान्यातून घरी सोडण्यापूर्वी काही माहिती घेणं गरजेचं होतं. तसच त्या बाळाच्या संदर्भात निर्णय घेणं पण आवश्यक होतं. डिलिवरी नंतर पाच एक दिवसांनी मी संगीताला आणि तिच्या पालकांना भेटायला गेले. तेंव्हा असं समजलं की मे महिन्याच्या सुट्टीत संगीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. मामाच्या शेतात ती रोज तिच्या मामे भावंडांबरोबर जात होती. एक दिवस काही कारणांनी बाकीची मुलं घरी निघून आली आणि ती एकटीच बराच वेळ शेतात होती. जेवायची वेळ झाली तरी संगीता आली नाही म्हणून मामी बघायला गेली. संगीता एका झाडाखाली रडत बसली होती. केस विस्कटलेले, अंगातील कपडे चिखलानी माखलेले, हाता-पायाला, चेहेर्याला चिखल लागला होता. मामीनी ‘काय झालं? कसं झालं?’ विचारलं तर म्हणाली, ‘मला इथे नाही राहायचं. मला आईची आठवण येतीये. इथली माणस चांगली नाहीयेत.’

तेंव्हा मामीला वाटलं, संगीताला इकडे येऊन बरेच दिवस झाले आहेत म्हणून कंटाळली असेल. शिवाय मुलांमध्ये किरकोळ कारणांवरून होणारी भांडणं आणि तिच्या वयाची शेजारची स्नेहा पण बाहेरगावी गेली आहे. आता तिला खेळायला तिच्या वयाचं कोणी जोडीला पण नव्हतं. म्हणून मामा-मामीनी संगीताला नाशिकला पाठवून द्यायचं ठरवलं.

संगीतानी पण मामी म्हणाली तशाच अर्थाचं स्तेतमेंत दिलं. ती जे म्हणत होती की, ‘इथली माणस चांगली नाहीत’, ह्याचा असा संदर्भ असेल असं तेंव्हा कोणाच्या मनात पण आल नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली खरी, पण त्यांना पण ठाऊक होतं आणि आम्हाला पण समजत होतं की ह्यात पुढे काहीच होऊ शकणार नाही. ना ते आरोपी सापडतील, ना त्यांना शिक्षा होऊ शकेल!

अजून एक शंका मनात येत होती की संगीता सात महिन्याची गरोदर झाली तरी मंगलच्या लक्षात हि गोष्ट कशी आली नाही. त्याचं एक उत्तर असं होतं की शाळेतून घरी आल्यावर संगीता सैलसर गाऊन घालायची. त्या मुळे तिच्या शरीरात होणारे बदल मंगलताई च्या लक्षात आले नाहीत.

आता शेवटचा प्रश्न होता तो म्हणजे त्या बाळाचा! खरं म्हणजे ह्या सगळ्यात त्या बाळाचा काहीच दोष नव्हता. कोणाच्या तरी चुकीच्या वागण्याची शिक्षा ते आयुष्यभर भोगणार होतं. संगीताला तर त्याच्या अस्तित्वाची कल्पना पण नव्हती. मंगलला ते नजरेसमोर पण नको होतं. तिने एका वाक्यात तिच्या बाजूनी विषय संपवला, “ताई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. तुम्ही त्याला मंदिरात ठेवा नाहीतर नदीत सोडा. त्या जीवाचं तुम्ही काहीपण करा. आमची संगीता ह्या सगळ्यातून सही सलामत सुटली हेच  आमच्यावर देवाचे खूप खूप उपकार.”

मागील चार पाच दिवसात भोवताली घडणाऱ्या सर्व घटनांचा त्रयस्त व्यक्ती प्रमाणे साक्षीदार असणार्या  माधवरावांना बाळाच्या संदर्भात काहीतरी मत होतं. ते म्हणाले, “ताई, मंगल म्हणतीये ते बरोबर आहे. ह्या बाळाचा आणि आमचा काही संबंध नाही. खरं म्हणजे संबंध असणं किंवा त्याचा विचार येणं पण आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे. पण कोणाच्या तरी चुकीच्या वागण्याची शिक्षा ह्या निष्पाप जीवानी आयुष्यभर का भोगायची? आम्ही सर्व विसरायचा प्रयत्न करून नव्यानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू. पण ह्या छोट्याशा जीवाचं काय? ह्या बाळाला कोणी पालक मिळू शकतील का? ते कसे शोधता येतील? तुम्ही त्यासाठी आम्हाला काही मदत करू शकाल का?”

मी होकारार्थी मान हलवली आणि त्यांना सांगितलं की, “संगीता नाबालिक आहे. तिच्या पालक ह्या नात्यांनी तुम्ही त्या बाळा वरील हक्क अर्ज करून सोडू शकता. अशी बालक दत्तक देण्यासाठी मुक्त घोषित करून त्यांच्या साठी योग्य पालक शोधता येतात.

जादू केल्यासारखं माधवरावांच्या चेहेर्यावर एक वेगळाच भाव दिसला, जणू काही त्यांच्या मनावरील एक मोठ्ठ ओझं उतरलं असावं. “ताई, तुमचे खूप खूप आभार! आम्हाला केलेल्या मदतीबद्दल, दिलेल्या मानसिक आधाराबद्दल! पण सर्वात जास्त मी तुमचा ऋणी राहीन ती तुम्ही आत्ता दिलेल्या माहिती बद्दल. ताई, तुम्हाला तर माहितीच आहे की मी टेम्पो चालवतो. माल पोहोचविण्यासाठी दोन दोन दिवस बाहेरगावी असतो. मी असंच एक दिवस माल पोहोच करून घरी येत होतो. रात्रीची वेळ होती. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. मला पुढे थोड्या अंतरावर एक गाडी दिसली. मनात हायसं झालं. त्या लोकांची सोबत होईल अश्या विचारांनी मी माझ्या गाडीचा वेग वाढवला. माझ्या गाडीचा वेग वाढला की ते पण वेग वाढवत होते. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आल की त्यांना मी खूप जवळ जायला नको आहे. एक ठराविक अंतर ठेऊन मी त्यांच्या सोबतीने प्रवास करत होतो. अचानक त्या गाडीतून एक गाठोडं पडलं. खरं म्हणजे ते पडलं नव्हतं तर गाडीतील लोकांनी फेकलं होतं. कुतुहला पोटी मी त्या गाठोड्यात काय आहे ते बघायला उतरलो. गाठोड्यात एक ८-१० दिवसाचं मृत अर्भक होतं. ते बघून मला इतका धक्का बसला की मी खूप वेळ तिथे त्याच्या कडे बघत बसलो. किती वेळ झाला असेल मला नाही सांगता येणार. मागून येणाऱ्या मोहन आणि संतोशनी मला सावरलं आणि घरी आणून सोडलं. त्या दिवसापासून आज पर्यंत माझी त्या रस्त्यावरून जाण्याची हिम्मत झाली नाही. त्या दिवसापासून मला एक प्रश्न भेडसावत होता, एखाद्या बाळाचा जन्म त्याच्या मातेला नको असलेल्या परिस्थितीत झाला तर त्याचं तिने काय करावं? ह्याचं उत्तर मला आज तुमच्या कडून मिळालं. ताई पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!”               

No comments:

Post a Comment