Monday, 29 March 2021

प्रेम???

 

सकाळी ६ वाजताच मोबाईलच्या रिंगनी जागी झाले. कोणाचा फोन असेल? असा विचार करत झोपेतच, 'हेलो' म्हणाले, तर समोरून रोहिणी ताईचा आवाज! थोडा वैतागलेला, थोडा टेन्शन असल्यासारखा. (एका शैक्षणिक संस्थेत बरोबर काम करत असल्याने माझी आणि रोहिणीची ओळख. तोंड देखलीच! अलीकडच्या काळात त्यांची मुलगी, रेवती मुळे अधून-मधून त्यांचा फोन यायचा. पण आज जवळ-जवळ चार महिन्यांनी त्यांनी संपर्क साधला होता.)

"बाई, रेवती आज पहाटे २.३० वाजता घरी आली. तिची अवस्था बघवत नव्हती. अंगा-खांद्यावर एक दागिना नाही कि पायात चपला नाहीत. बहुतेक मार खावून आली आहे. उपाशीपण होती. चहा-बिस्कीट दिले आणि रमेशला (रेवतीचा भाऊ) सांगितलं, 'सकाळ झाली कि तिला संस्थेत नेऊन सोड.' तो तिला घेऊन गेला आणि मी तुम्हाला फोन लावला. काय करावं ह्या मुलीचं काही कळत नाहीये. मागील १३ वर्षात कमी वेळा का मी तिला समजावलं असेल? अगदी जयेश बरोबर लग्न करायचं ठरवलं तेंव्हापासून! अलीकडे तो तिला देत असलेली नोकरासारखी वागणूक, पदोपदी करत असलेला अपमान, सर्व गोष्टी मला खटकतात. आता तर मार-हाण करतो. तिला खूप वेळा समजावलं 'त्याला सोड. तू त्याला सोडलस तर तुझ्यासाठी काहीतरी करता येईल.' तिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, त्याला काय करू? तुम्ही पण कमी वेळा तिला समाजावलत का? पण ती कोणाचं ऐकतच नाहीये. मी हात टेकले ह्या मुलीपुढे. मी तिला माझ्या घरात ठेवून घेऊ शकत नाही."

"अहो रोहिणीताई, असं म्हणून कसं चालेल. तुम्ही तिला समजून घेतलं नाही तर कोण घेणार? अशा प्रसंगातच मुलींना आई-वडिलांच्या आधाराची जास्त गरज असते. तुम्ही तिला असं संस्थेत नका ठेऊ. तिच्याशी बोला, तिला समजून सांगा."

मला समजत होतं कि माझा एकही शब्द त्या ऐकत नव्हत्या, त्यांना ऐकूच जात नव्हता. त्या रेवतीवर, तिच्या वागण्यावर इतक्या चिडल्या होत्या, वैतागल्या होत्या कि त्यांनी एका वाक्यात रेवतीचा विषय संपवला. "बाई, रेवतीला आणि तिच्या विचित्र स्वभावाच्या नवऱ्याला (जयेशला) समजून घ्यायची आणि माफ करायची माझी ताकत संपली. मी तिला भेटणार नाही आणि तिच्याशी बोलणार नाही."

रोहिणीताई साठी रेवतीचा विषय संपला होता.

 रेवती, गोरी,नाजूक, दिसायला सुरेख! कुण्या एके काळी हसरा चेहेरा आणि खेळकर स्वभाव होता.आज जयेशच्या कृपेनी ते सर्व भूतकाळात जमा झालं होतं. रेवती आणि जयेशचा प्रेम विवाह! १३ वर्षांपूर्वी आई-वडील, नातेवाईक ह्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन झालेला. ह्या जोडप्याचा स्वीकार करायला घरच्यांना तब्बल २ वर्षं लागली. ते सुद्धा समाजाच्या कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात भेटल्यावर तोंडदेखली विचारपूस करण्याइतपत. सासरी जयेश आणि त्याचे नातेवाईक जी वागणूक देत होते ती रेवतीने स्वीकारली होती. १३ वर्षात माहेरी एखाद दोन वेळेस येणं झालं असेल तेवढंच. एक वर्षापासून रेवतीच्या आयुष्यात प्रोब्लम वाढले. वाढले म्हणजे मला समजले. तोपर्यंत तिने जे काही सहन केलं होतं ते मला नंतर समजणार होतं.

साधारण एका वर्षा पूर्वी रेवती आणि तिचा प्रोब्लम माझ्या आयुष्यात आले. तेंव्हा जयेशनी येऊन रोहिणीच्या घरासमोर गोंधळ घातला होता. रस्त्यावर उभं राहून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या होत्या आणि धमक्या दिल्या होत्या. तेंव्हा रोहिणीने  पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हाचं कारण कमाल होतं. जयेशला कोणी तरी सांगितलं, 'रेवती खूप मुलांना आवडायची.लग्नाआधी खूप मुलं तिच्यावर लाईन मारायचे'. जयेशच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं. तो सारखा रेवतीला एकच प्रश्न विचारत होता. 'लग्ना आधी तुझं कोणाबरोबर लफडं होतं? तू मला खरं काय ते सांग.' रेवती नाही म्हणाली कि मारायचा. ती कबूल होत नाही म्हणून त्याने तिला माहेरी आणून सोडली. रोहिणीने ज्या दिवशी तक्रार केली त्या दिवशी तो अचानक तिला (रेवतीला) घ्यायला आला आणि म्हणाला, 'रेवती तुझी मजा करून झाली असेल तर चला. का अजून कोणी बाकी आहे. नवऱ्याची तर आठवण नाहीच आहे पण तुझ्या मुलांना पण विसरलीस का? मी ३ मोजायच्या आत खाली ये आणि गाडीत बैस. घरी गेल्यावर तुझ्याकडे बघतोच'. त्याचा अवतार बघून रेवती इतकी घाबरली होती कि अजून तमाशा नको म्हणून तिची आई नको म्हणत असतांना पण ती जयेश बरोबर जायला निघाली.

त्या दिवशी ती गेली ती परत-परत अपमानित होऊन, मार खाऊन माहेरी धाडली जाण्यासाठीच, जणूकाही. मागील एक वर्षात जयेशनी कमीत कमी चार वेळा हा तमाशा केला असेल. (मला ठाऊक असलेलं चार वेळा!) पहिले दोन वेळा जयेश, रेवतीला माहेरी हाकलून द्यायचा. तिला माहेरी येऊन दोन दिवस होत नाहीत, जरा घरातले तिला समजावत नाहीत तो जयेशचा फोन यायचा. जयेशनी फोन केला कि रेवती मागचापुढचा विचार न करता त्याच्या सोबत गाडीत बसून निघून जायची. दर वेळेस, रोहिणी वैतागून आणि काळजीने मला फोन करायची. आणि प्रत्येक वेळेस मी तिला म्हणायचे, 'रोहिणी, रेवती आली कि मला कळव. गेल्यावर सांगून काय उपयोग?' तिसर्यांदा जेंव्हा रेवती मार खाऊन, जयेशनी हाकलून दिलं म्हणून माहेरी आली तेंव्हा रोहिणी तिला घेऊन तडक माझ्याकडे आली. आम्ही रेवतीची रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि रोहिणीचा आग्रह होता म्हणून रेवतीला संस्थेत राहायला पाठवली. तिच्या बरोबर दोन वेळा सिटिंग झाली. प्रत्येक वेळेस तिचं एकच म्हणणं होतं, "बाई, जयेशला आणि मुलांना माझी खूप गरज आहे. तो माझ्या शिवाय राहू शकत नाही म्हणूनच मला घ्यायला येतो. माझंच काहीतरी चुकलं असेल. म्हणून तर जयेश असं वागतोय. प्रेमात खूप ताकद असते. माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मी माझ्या प्रेमानी जयेशला परत मिळवीन."

रेवती सगळ्याला हो म्हणत होती. पण तिच्या मनात काय चाललं आहे ह्याचा अंदाज येत नव्हता. तिला विचारून, तिच्याशी बोलून जयेश आणि तिची एकत्र बैठकीची तारीख ठरवली. तिला बजावून सांगितलं कि, 'लिखापढी केल्याशिवाय जयेश बरोबर जायचं नाही. लिहून घेतलं कि त्याच्यावर पण त्याचं थोड दडपण राहील, आमचं पण लक्ष राहील आणि तो इथून पुढे नीट वागेल.'

जयेशला फोन द्वारे एकत्र बैठकीची तारीख कळवली. बैठकीच्या आदल्या दिवशी त्याचा रेवतीला फोन आला आणि संस्थेतील कार्यकर्त्या 'जाऊ नकोस. ताईना भेटल्याशिवाय, लिखापढी केल्याशिवाय जाऊ नको,' असं सांगत असतानापण ती जयेश सोबत गेली. इतक्या घाईत कि स्वतःच सामान पण घ्यायला थांबली नाही.

त्यानंतर रेवती परत आली तेव्हा जयेशनी तिला एका कामगिरीवर पाठवली होती. यावेळी त्याने मुलं स्वतःकडे ठेऊन घेऊन रेवतीला एकटीला पाठवली होती. रेवतीच्या आईंनी आणि नातेवाईकांनी त्याच्या केलेल्या फसवणुकीबद्दल आणि अपमानाबद्दल (रेवतीच लग्नाआधी लफडं होतं असं त्याचं म्हणणं होतं, ते तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी ते लपवलं असंही त्याचं म्हणणं होतं. आणि जयेशनी केलेल्या तमाशाबद्दल रोहिणीनी केलेली पोलीस कम्प्लेंट!) त्यांनी जयेशचे पाय धरून माफी मागावी. जर का तिच्या नातेवाईकांनी जयेशच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली तर तो रेवतीला घरात घ्यायचं कि नाही ह्याचा विचार करेल. हे कोणालाच मान्य होण्यासारखं नव्हतं, पण माहेरच्या लोकांनी माफी मागितली तर आपला संसार वाचेल, ह्या वेड्या आशेवर रेवती तेपण करायला तयार झाली. ती रोज सकाळी संस्थेच्या कार्यालयातून परवानगी काढून बाहेर जायची आणि संध्याकाळी दमलेली, हरलेली परत यायची. एकटीच रडत बसायची. तिच्याशी बोलायचा, तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. रोहिणी तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलायला तयार नव्हती. तिच्यासाठी जणू, रेवती आणि तिच्या आयुष्याशी रोहिणीला काही देणघेण नव्हतं.

रेवतीला येऊन एक आठवडा झाला असेल. एक दिवस संस्थेतून रेवती सकाळी नेहेमी प्रमाणे गेली ती परत आलीच नाही. एक दिवस वाट बघितली, तिच्या आई-वडिलांकडे, नातेवाईकांकडे चौकशी केली. शेवटी पोलिसांत रीतसर मिसिंग दाखल केली. आणि दुसऱ्या दिवशी उशिरा रेवती माझ्या घरी आली. रेवतीला बघून बरं वाटलं पण तिचा हरलेला, उदास चेहेरा बघून तिची खूप काळजी वाटली. भकास चेहेर्यानी ती माझ्याकडे बघत म्हणाली, "बाई, सगळं संपलं. कोणीच जयेशची माफी मागायला तयार नाहीये. त्यांचं पण बरोबर आहे. ते तरी कशाला मागतील. संसार माझा मोडणार आहे. त्यांना कशानी काहीच फरक पडत नाही. मी जयेश आणि मुलांशिवाय नाही जगू शकत. मी माझं आयुष्य संपवायचं ठरवलं आहे. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणून भेटायला आले." मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. माझ्या आजपर्यंतच्या कामात किंवा आयुष्यात असं कधी घडलं नव्हतं कि 'आत्महत्या करायला निघालेली व्यक्ती जाण्यापूर्वी  भेटायला आली असेल'. हि परिस्थिती कशी हाताळायची मला काही सुचत नव्हतं. मनात पहिला जो विचार आला ते करून मी मोकळी झाले. मी तिला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवत वेड्यासारखी म्हणत राहिले, "रेवती, काही संपलं नाहीये. मी आहे ना. तू माझ्याकडे आली आहेस ना, आपण ह्याच्यातून मार्ग काढू. सगळं ठीक होईल. तू शांत हो, बैस, थोडं पाणी घे. दमली आहेस. दोन घास खा आणि आराम कर. आपण उद्या सकाळी बोलू."

"बाई आता मेल्यावर आरामच आराम आहे. मी मेल्यानी कोणाला काहीच फरक पडणार नाही. आई-वडील, भाऊ, नातेवाईक, सगळ्यांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. जयेश माझं तोंड बघायला तयार नाही. मला माझी मुलं भेटत नाहीत. कोणी मला घरात ये पण म्हणत नाहीत. कोणासाठी जगू?"

"माझ्यासाठी" ह्या माझ्याकडून आलेल्या उत्तरांनी ती थोडी गोंधळली, काही क्षण माझ्याकडे बघत बसली आणि अचानक मला "मावशी" म्हणत गळ्यात पडून खूप रडली. थोड्या वेळानी शांत झाली. तिच्या समोर पुढचा प्रश्न होता ती रहाणार कुठे? हा प्रश्नच माझ्या मनात आला नव्हता. कुठे म्हणजे काय माझ्या घरी! (घरातून मी करत असलेल्या कामाबद्दल माझा अभिमान तर होताच पण पूर्ण सपोर्ट होता. मुख्यतः माझ्या नवर्याचा! तो नसता तर मी एवढा मोठा निर्णय एका फटक्यात घेऊच शकले नसते. त्याचा माझ्या कामाला पूर्ण पाठींबा आहे म्हणून मी हे काम आज पर्यंत करू शकले.)

रेवती थोडी रीलेक्स झाली. ती माझ्या घरी रहायला लागली, माझ्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून. (ती माझ्या कडे आहे हे पोलिसांत कळवलं, तसच रोहिणीताईला पण कळवलं. अजून त्यांच्या मनातली नाराजी कमी झाली नव्हती. रेवती सुखरूप आहे ह्यांनी त्यांना निश्चितच बर वाटलं पण त्यांनी येऊन तिला भेटायचं टाळल.) ती आमच्या घरात छान रमली. पण जयेशचा त्रास काही कमी होत नव्हता. तो रोज दिवसातून ३-४ वेळा फोन करून तिला घाणेरड्या शिव्या द्यायचा, धमकावायचा. ती घाबरून रडत बसायची. 'रेवती त्याचा फोन घेऊ नकोस. नाहीतर त्याला खडसून जाब विचार. त्याचा फोन आला कि माझ्या कडे दे, मी बोलते.' ह्यातलं ती काहीच ऐकायला किंवा करायला तयार नव्हती. तिचं एकच म्हणणं होतं, "मावशी, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तो असा वागतोय."

शेवटी एक दिवस माझा पेशन्स संपला. मी तिला विचारलं,"रेवती, तुला कशा मुळे अशी खात्री वाटते कि त्याचं तुझ्यावर प्रेम आहे? प्रेम करणारी माणस, आपली माणस किंवा जोडीदाराला त्रास होईल असं वागत नाहीत. त्यांना मुलांचं भांडवल करून emotional blackmail करत नाही. त्याचा अपमान करत नाहीत. त्याला इजा किंवा मार-हाण करत नाहीत."

त्यावर ती म्हणाली, "आपलं ज्याच्यावर प्रेम असत त्याच्यावरच माणूस अधिकार गाजवतो. तो चुकला कि त्याला सजा देतो. आणि लाड पण तितकेच करतो. जयेश कडे मी दोन नवीन साड्या मागितल्या कि तो चार आणून द्यायचा. मला लागणाऱ्या सर्व वस्तू जयेश आणून द्यायचा. मला beauty parlour  ला सोडायला आणि घ्यायला यायचा. तो नेहेमी म्हणायचा, 'रेवती मी आहे तर तुला मैत्रिणींची आणि नातेवाईकांची गरजच काय? माझ्या प्रेमात काही खोट आहे का? तुला हवं तिथे मी घेऊन जातो. तू एकटीने कुठे जाऊ नकोस.' (नवीन साडी नेसून रेवतीला एकटीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. कधीच, कुठेच ती एकटी बाहेर जाऊ शकत नव्हती. तिला एकटीला माहेरी जायला परवानगी नव्हती. ती तिच्या आवडी प्रमाणे आणि गरजे प्रमाणे खरेदी करू शकत नव्हती. हे वागणं चुकीचं आहे असं तिला कधी वाटलं नाही.) मला आणि मुलांना, त्याचा मूड असेल तेंव्हा रात्रीची जेवणं झाल्यावर आम्हाला गाडीतून आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. (रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर, काळ्या काचा चढवून, बंद गाडीतून चक्कर!) मावशी मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची. मी केलेली घरातली सफाई, (६ खोल्यांचा मोठा बंगला होता. त्याची दिवसातून दोन वेळा) लादी पुसणं, सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं,  मी केलेला स्वैपाक, त्याच्या आई-वडिलांची सेवा, मुलांच्या मागे उठबस, त्याला तिन्हीत्रिकाळ त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवून देणं. मावशी माझ्या घरी मुलांपासून ते मोठ्यान पर्यंत प्रत्येकाची आवड वेगळी. प्रत्येक जेवणाला ३-३ भाज्या, चपाती, भाकरी असा स्वैपाक करायचा. (माझ्या शिवाय कोणाच्या हातच काहीच माझ्या घरातल्यांना आवडायचं नाही. म्हणून आमचं लग्न झाल्यावर सहा महिन्यातच घरातल्या नोकरांना सुट्टी देऊन टाकली.) घरातल्या कामात दिवस कुठे निघून जायचा कळायचंच नाही. आणि त्याचं इतकं प्रेम होतं कि रोज रात्री मी जवळ लागायचेच. (हे सांगताना ती छानशी लाजली.) मग काळजीने म्हणाली आता जयेशच कस होत असेल? तो अगदी एकटा पडला."

बोलता-बोलता ती विचारात तिच्या जयेश कडे पोहोचली होती. ह्या सगळ्या संभाषणातून माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती कि ह्या सगळ्यातून रेवतीला बाहेर काढणं गरजेचं होतं पण काम अवघड  होतं. तिच्या अंगात खूप कला होती. ती सुंदर चित्र काढू शकत होती. डिप्लोमा पर्यंत शिक्षण झालं होतं. ह्या सगळ्याचा तिने आयुष्यात उपयोग करून घ्यायला हवा होता. पण जयेशची मनात इतकी भीती होती आणि त्याने निर्माण केलेला प्रेमाबद्दलचा खोटा पगडा होता कि ती घराबाहेर एकटी जायला घाबरायची. आज गरज होती तिच्यातला आत्मविश्वास तिला परत मिळवून देण्याची.

मग काय? रोज माझ्या बरोबर तिला घेऊन गेले. महिला हक्कचं ऑफिस असो कि शाळेचं काम असो. ह्यामुळे तिच्या नवीन ओळखी झाल्या, थोडा मोकळा विचार करायला लागली. तिचं तिलाच समजलं कि घाबरून घरात राहायची आवश्यकता नाही. (महिला हक्क संरक्षण समितीच्या ऑफिसला आल्याने तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिच्या सारख्या किंबहुना तिच्या पेक्षा वाईट परिस्थितीतून बायकांनी मार्ग काढला आहे आणि आज त्या स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगतायत. शाळेतल्या मुलांमुळे तिला तिच्या मुलांपासून लांब राहणं,अवघड असलं तरी जमू लागलं.) 

खाली मान घालून, सोशिकपणे जगणारी रेवती हळू-हळू बदलत होती. माझ्या देखत, तिच्या नकळत. एक दिवस तिने अचानक विचारलं, "मावशी, फारकत घ्यायला काय करावं लागेल?" 

"रेवती कोणाला , कोणापासून फारकत घ्यायची आहे?"

"मावशी, मीच विचार करतीये. जयेश बरोबरच्या माझ्या नात्याला काही अर्थ नाही. त्याच्यापासून फारकत घेतली कि रोजचं टेन्शन तरी कमी होईल. तो कुठे भेटेल का? मला त्रास देईल का? माझ्यावर नवरा म्हणून हक्क गाजवेल का?"

"रेवती, नुसती फारकत घेऊन हे साध्य होणार नाही. तुला मनातून खंबीर व्हायला हवं. तो समोर आला तरी न घाबरता आत्मविश्वासानी त्याला सामोर जायची तयारी हवी. आपण खूप वेळा बोलावलं, पण तो एकदा पण भेटायला आला नाही. तो सुखासुखी फारकत देईल असं मला वाटत नाही. तुला त्यासाठी वकिलामार्फत कोर्टात दावा दाखल करावा लागेल. दुसरी गोष्ट. तुझं चांगलं शिक्षण झालं आहे. कुठे तरी नोकरी शोध आणि स्वतःच्या पायावर उभी हो, स्वावलंबी हो."

ह्याचा उपयोग असा झाला कि पुढील काही दिवसांत तिने तिच्या डिप्लोमाच certificate शोधलं, मला विचारून दोन ठिकाणी अर्ज केला, आणि स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवली. कोर्टात वकिलांना भेटून फारकतीचा दावा दाखल केला.

अपेक्षेप्रमाणे जयेशनी कोर्टाच्या एकाही नोटीसला उत्तर पाठवलं नाही, किंवा तो कोर्टासमोर हजार झाला नाही. शेवटी वर्ष-दीडवर्ष नोकरी सांभाळून कोर्टात खेटे घातल्यावर (कायदेशीररीत्या दोन वर्षांपासून नवर्यापासून विभक्त असल्याच्या युक्तिवादावर) एकतर्फी फारकत मिळाली. फारकतीचा विषय काढला तेंव्हा मनानी आणि फारकत मिळाल्यावर कायदेशीररीत्या रेवती, जयेश पासून मुक्त झाली. स्वतंत्र झाली.

आज रेवती, तिच्या आई बरोबर रहाते. नोकरी करते. आणि मजेत आहे.

 

 

 

 

Sunday, 14 March 2021

 आंधळं कर्तव्य!


 त्रासलेली, कोणावरतरी किंवा कशावरतरी खूप वैतागलेली सारिका त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि माझ्या समोरची माणस उठायची वाट बघत बसली. जशी ती माणस गेली, लगेच माझ्या समोरील खुर्चीत बसत तिने विचारलं, "हेमाताई तुम्हीच ना?"

  मी होकारार्थी मान हलवल्यावर तिने भराभरा बोलायला सुरुवात केली.

  "ताई, मला फारकत हवी आहे. फारकत मिळवायला तुम्ही मला मदत कराल? आमच्या ओळखीतली शीतल, तिची फारकत तुम्हीच करून दिलीत. ताई,प्लीज, मलापण मदत करा."

  "तू आधी मला तुझी माहिती सांग. तुझं नाव काय? लग्न कधी झालं? नवरा काय करतो? सासरची माणस, नवरा व इतर नातेवाईक काही त्रास देतात का? नीट सविस्तर सांग.

दुसरं म्हणजे शीतलची फारकत झाली म्हणून तुझी होईल असं नाही. तिच्या बाबतीत फारकत घेणं एवढा एकच पर्याय होता. तुझा प्रोब्लेम समजून घेते आणि मग बघू तुझ्यासाठी काय योग्य आहे ते!"

  "ताई, मी सारिका. माझं ६ महिन्यांपूर्वी लग्न झालं. माझ्या नवऱ्याच नाव भावेश. माझं माहेर दिंडोरीचं. वडील झेड. पी. त क्लार्क आहेत. वडिलांची थोडीफार शेती आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालाय आणि माझा धाकटा भाऊ शिकतोय. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच चांगलं स्थळ आहे म्हणून आई-वडिलांनी लग्न करून दिलं. (भावेश पोस्टात नोकरी करतो. त्याच्या वडिलांची घोटी येथे थोडीफार जमीन आहे. भावेशचा मोठा भाऊ आणि त्याची फेमिली घोटीत राहून वडिलांना शेतीत मदत करतात. लग्न झाल्यावर मी आणि भावेश नाशिकला राहायला आलो.) तसे नाशिकला आम्ही दोघंच असतो. भावेशचे आई-वडील, भाऊ-भावजई, सगळी देव-माणस आहेत. आम्ही जितके दिवस एकत्र होतो तितके दिवस त्यांनी माझं खूप कौतुक केलं, जीव लावला. माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त लाड केले. सासरची सगळी माणस खूप चांगली आहेत."

  "मग सारिका, प्रोब्लेम कुठे आहे? नवरा त्रास देतो का? कामावर जात नाही? काही व्यसन आहे? बाहेर कोणाशी काही? मैत्रीण?" (मी आपले माझ्या अनुभवावर आधारित बेसिक प्रश्न विचारले)

  "नाही हो ताई. भावेशचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांना कसलंपण व्यसन नाही. अगदी सुपारी पण खात नाहीत.

  पहिला महिना मजेत गेला. रोज दहा वाजता ऑफिसला जाणार आणि सहा वाजता ऑफिस सुटलं कि घरी. त्यांचा मूड असेल त्या प्रमाणे कधी बागेत फिरायला जायचो आणि मग घरी येतानाच वाटेत भेळ-पुरी, तर कधी चायनिस, तर कधी उडप्याकडे इडली-डोसा खाऊन घरी यायचो. एक दोनदा आम्ही सिनेमा बघायला पण गेलो होतो.

 "मग एक दिवस सासऱ्यांनी फोन करून ह्यांना घोटीला बोलावून घेतलं. त्यांचात काय बोलणं झालं मला नाही माहित. पण तेंव्हा पासून ह्याचं वागणंच बदललं. ऑफिसच्या व्यतिरिक्त सकाळ संद्याकाळ अजून कुठेतरी काम करायला लागले. सकाळी एक कप चहा घेऊन बाहेर पडतात ते रात्री १० वाजताच घरी येतात.( मधे सकाळी १० वाजता जेवणाचा डबा घ्यायला येतात.) संध्याकाळी इतके दमलेले असतात कि जेमतेम जेवण होईपर्यंत जागे असतात. मागच्या ५ महिन्यात ना बोलणं, ना एकत्र बसणं, ना कुठे फिरायला गेलो. ताई, काय प्रोब्लेम आहे ते स्वताहून सांगत नाहीत विचारायला गेले तर चीड-चीड करतात. एवढी रात्रंदिवस मेहेनत करतात तर ते पैसे जातात कुठे. हौस-मौज तर बंदच आहे, पण घरातील वातावरण देखील बिघडत चालल आहे. त्यांना बर वाटावं म्हणून कधी व्यवस्थित तयार होऊन बसले तर ते त्यांना जाणवत पण नाही. कधी त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ केला तर त्याचं कौतुक तर नाहीच उलट वैतागून म्हणतात, 'काटकसर करायला हवी. मी इकडे चार पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय आणि तू जेवणात खीर-भजी बनवतीयेस? सगळ्यांनी माझा अंत बघायचं ठरवलं असेल तर मला तसं सांगून टाका.'

  "ताई, काय करू मला काही सुचत नाहीये. आई-बाबा म्हणतात 'एवढं सोन्यासारख सासर आहे, समजूतदार  नवरा आहे. तुलाच समजून घेता येत नाही. माणस सांभाळायला शिक. सारख्या तक्रारी सांगू नकोस. तू नीट वाग. सगळं ठीक होईल.' ताई, मला तर काहीच ठीक होताना दिसत नाहीये. मी पार कंटाळून गेले आहे. मी असा संसार नाही करू शकणार. तुम्हीच सांगा मी काय करू?"

  मनातलं बोलून मोकळ झाल्यामुळे असेल कदाचित, पण ऑफिसमध्ये आली तेंव्हा पेक्षा सारिका शांत झाली होती. तिच्या चेहेऱ्यावर हताश, हरलेला भाव होता. डोळे थोडे पाणावले होते. खाली मान घालून ती माझ्या उत्तराची वाट बघत होती.

  मी सारिकाला समजावून सांगितलं, "सारिका, प्रश्न फारकतीने सुटणार नाही. भावेशला बोलवून घेऊया. त्याचाशी मला बोलू दे. त्याची नेमकी काय अडचण आहे ती जाणून घेऊया. त्याच्या अश्या वागण्याला काहीतरी कारण असेल. मला वाटतंय बोलल्यानी प्रश्न सुटतील. सारिका तू रीतसर तुझी तक्रार नोंदव."

  सारीकानी लेखी तक्रार दिल्यावर आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे भावेशला, त्याची बाजू समजून घेण्यासाठी बोलावलं. आमचं पत्र मिळाल्या बरोबर भावेश आमच्याकडे येऊन गेला. पण तो ऑफिसमध्ये आला नाही. बाहेरून चौकशी करून निघून गेला. असं ३-४ वेळेला झालं. पुढच्या वेळेस तो दिसल्याक्षणी त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. आढेवेढे घेत तो ऑफिसमध्ये आला. आत आल्या-आल्या त्यांनी डीक्लेर केलं, "हेमाताई कोण आहेत? मी फक्त त्यांचाशीच बोलीन."

  आम्ही त्याची अट मान्य केली आणि मी त्याला बसायला खुणावलं. तो सेटल झाल्यावर त्याला सारीकानी केलेली तक्रार आणि तिचं म्हणणं थोडक्यात सांगितलं. (त्या आधी मी त्याला ३-४ वेळा बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचं कारण विचारलं. त्याचं उत्तर ऐकून फारच आश्चर्य वाटलं. आमचं पत्र मिळाल्यावर त्यांनी संस्थेची माहिती काढली. तेंव्हा त्याच्या मित्रांनी सांगितलं 'त्या लई डेंजर बायका आहेत. ऐकलं नाही तर पोलीस स्टेशन मध्ये बंद करतात.' तो ३-४ वेळा आमच्या कामाच्या पद्धतीबद्दल चौकशी करून गेला. खात्री पटल्यावरच आत येण्याचं धाडस केलं.) बराच वेळ तो काहीच बोलला नाही. त्याच्या चेरेर्यावर कसलंतरी टेन्शन आणि मागील ५ महिन्याच्या धावपळीचा थकवा दिसत होता. मी त्याला रिलेक्ष व्हायला अजून थोडा वेळ दिला. 

"भावेश, तुम्हाला कसलं तरी टेन्शन आहे. काय आहे ते मोकळं बोला. तुम्ही बोललात तर त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल."

  "ताई, सारीकानी असं करायला नको होतं. मला मान्य आहे मी तिला वेळ देऊ शकत नाही. पण तिने तुमच्या कडे येऊन तक्रार नको होती नोंदवायला. माझ्याशी एकदा बोलून तरी बघायला हवं होतं."

  "भावेश, तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. Anyway. तुम्ही आता मला सांगा नेमका काय प्रोब्लम आहे. तुम्ही इतकं काम करता, डबल ड्युवटी करता, बऱ्यापैकी कमवत असाल, तरी घरखर्चाची ओढाताण का होते? तुम्हाला कोणताही शोक नाही कि व्यसन नाही. मग इतके कष्ट करून कमवलेले पैसे जातात कुठे? त्याचं करता काय?"

  भावेशनी बोलायला तोंड उघडलं आणि गप्प झाला. बहुतेक आपली पर्सनल गोष्ट, प्रोब्लम मला कसा सांगावा त्याला कळत नसेल. किंवा सांगावा कि नाही हे ठरत नसेल.

  "बोला भावेश. काय मनात असेल ते मोकळं बोला. बोलल्यानी प्रश्न सुटू शकतात."

  भावेश दोन मिनिटं शांत बसला, एक ग्लास पाणी प्यायला आणि जे सांगायला सुरुवात केली ते संपूर्ण बोलून झाल्यावरच थांबला.

  "ताई, माझं आणि सारिकाच ६ महिन्यापूर्वी लग्न झालं. सारिका छान मुलगी आहे. तिच्याबद्दल आमची कोणाची काहीच तक्रार नाही. खरं सांगायचं तर ती आहे म्हणून मी आज आहे. मला माझे प्रोब्लम तिला सांगून तिला टेन्शन द्यायचं नाहीये, म्हणून तिला काही सांगितलं नाही.

  "पहिला महिना मजेत गेला. मग एक दिवस वडिलांनी गावी बोलवून सांगितलं कि गावाकडे एक चांगलं घर बांधावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी मी काही आर्थिक मदत करू शकतो का? म्हणजे एक रकमी त्यांच्या कडे पैसे नव्हते. ती रक्कम मी कुठून तरी देऊ शकतो का? मी सोसायटीतून कर्ज काढलं आणि त्यांना ते पैसे दिले. ताई, कधी नव्हे ते इतक्या वर्षात माझ्या वडिलांनी माझ्या कडे काहीतरी मागितलं होतं. मी त्यांना मदत करू शकलो ह्याच्यातच मी धन्य झालो. त्यांनी माझ्या साठी खूप केलं आहे. माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला. त्यांचे खूप उपकार आहेत, माझ्यावर."

  "वडिलांना गरज होती तेंव्हा तुम्ही मदत केलीत हे चांगलंच केलत. पण त्याचा तुमच्या आजच्या प्रोब्लमशी काय संबंध? तुमची धावपळ, पैशांची ओढाताण कशामुळे? सोसायटीचा हप्ता कोण भरत? तुम्ही रहाता ते घर तुमचं स्वतःच आहे कि भाड्याचं?"

  "ताई घराचं भाडं, सोसायटीचा हप्ता, घर खर्च, सगळं भागवता भागवता मी अगदी दमून गेलोय. काही केल्या पैसे पुरतच नाहीत. मी काय करू काही समजत नाहीये." बोलता बोलता भावेशच्या डोळ्यात पाणी आल.

  "भावेश, तुम्ही वडिलांशी बोललात का, ह्या सगळ्याबद्दल? ते काय म्हणतात?"

  "ताई मी वडिलांना काहीच सांगितलं नाहीये."

  "मग मोकळं बोला वडिलांशी. तुमच्या होणाऱ्या ओढाताणीची कल्पना द्या त्यांना. सोसायटीचा हप्ता किंवा भाड्याची रक्कम, पैकी काहीपण एक भरायला ते मदत करू शकतात का? असं विचारा त्यांना."

  "ताई, मी हे वडिलांना कसं विचारू. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांच्या उपकाराची फेड मी अशी नाही करणार."

  "भावेश, तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करताय. तुमच्या वडिलांनी केलं ते त्याचं वडील म्हणून कर्तव्य होतं. त्यांच्या आजारपणात किंवा म्हातारपणी जेंव्हा त्यांना तुमची गरज असेल तेंव्हा त्यांची सेवा करून, त्यांना काय हवं नको ते बघून तुम्ही तुमचं कर्तव्य करा. हप्ता किंवा भाडं भरणे, आणि ती रक्कम तुम्हा दोघांपैकी कोणी भरावी हा व्यवहार आहे. तुम्ही कर्तव्य आणि व्यवहार ह्याचात गोंधळ करू नका. बघा विचार करून. पटलं तर वडिलांशी बोला. नाही तर तुम्ही आता ज्या पद्धतीने वागताय त्यांनी सारिका खूप वैतागलेली आहे. ती तुम्हाला सोडून गेली तर चालेल का? विचार करा. मला वाटतंय तुम्ही वडिलांशी एकदा मोकळं बोलावं."

  बहुतेक सारिका सोडून जाऊ शकेल हि शक्यताच त्याच्या मनात कधी आली नाही. तो पटकन म्हणाला, "ताई, मी सारिका शिवाय नाही राहू शकत. मी प्रयत्न करतो आणि बोलतो वडिलांशी."

  "भावेश, आणखीन एक गोष्ट करा. तुमच्या प्रोब्लम बद्दल मला जे सांगितलं ते सर्व सारीकाशी शेअर करा. त्यांनी तुमचं नातं अजून चांगलं होईल."

  ह्या सगळ्या बोलण्यानी भावेश खूपच रीलेक्स झाला. तो घरी जाऊन सारीकाशी सगळं मोकळं बोलला. (मला हे समजलं कारण दुसऱ्या दिवशी सारिकानी फोन करून सांगितलं.) पण मनाची तयारी करून वडिलांशी हा विषय बोलायला भावेशला तब्बल दोन महिने लागले.

  दोन महिन्यांनी एक दिवस भावेश आणि सारिका पेढे घेऊन ऑफिसमध्ये आले. "ताई, तुमचे खूप खूप आभार. मी वडिलांशी बोललो. त्यांना माझ्या होणाऱ्या धावपळीची कल्पना दिली आणि त्यांनाच विचारलं काय आणि कसं करायचं ते. वडील जरा वैतागूनच म्हणाले,' भावेश, तू थोडा वेडा आहेस का? ७ महिने हे असं जगत राहिलास. तुला एकदापण तुझ्या बापाशी येऊन बोलावसं वाटलं नाही? मी तरी कसा मूर्ख. मला पण कसं लक्षात नाही आल कि कर्जाचे हप्ते, घर भाडं आणि घर खर्च! तू कसं सगळं भागवत असशील? ते काही नाही. इथून पुढे कर्जाच्या हप्त्याचे पैसे मी देत जाईल. आणि आयुष्यात पुन्हा अशी चूक करू नकोस'.

  ताई, मला वाटलं त्या पेक्षा वडिलांशी बोलणं खूप सोप्पं होतं. ताई, पुन्हा तुमचे आभार, आमचा संसार वाचवल्याबद्दल!

 

 

 

 

Sunday, 7 March 2021

 समझोता

  मी आले तेंव्हा ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. विचारल्यावर समजलं, चार जॉईन्त मीटिंगस  होत्या. त्यातल्या दोन ठरवलेल्या आणि दोन त्यांच्या सोईने आलेल्या. प्रत्येक मीटिंग म्हणजे ७-८ माणस. काही मुलीकडून तर काही मुलाकडून. त्यात दोन नवीन केस नोंदवायला आलेल्या. त्या प्रत्येकी बरोबर दोघं जण, तक्रारदाराला मानसिक आधार द्यायला. अशी एकूण काय ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. आधी जास्तीची, केसच्या सोबत आलेल्या माणसाना बाहेर थांबायला सांगितलं आणि नवीन केस नोंदवायला घेतली.

  मधुकरराव, त्यांची बायको विमल आणि मुलगी स्वप्नाली माझ्या समोर येऊन बसले. बसतानाच मधुकररावानी बोलायला सुरुवात केली. "ताई, मी मधुकर. कुसुमताई आम्हाला शिकवायला होत्या. मी रचनाचा विद्यार्थी. हि माझी बायको विमल आणि मुलगी स्वप्नाली. स्वप्नालीच लग्न शेखरच्या बरोबर करून आम्ही पार फसलो. एकुलता एक मुलगा. त्यात त्याच्या वडिलांचं, तो ६ वीत असतानाच निधन झालं. तो आणि त्याची आई! बाकी घरात तिसरं कोणी नाही. लिमिटेड कुटुंब. विचार केला मुलगी सुखात राहील. पण कसलं काय. माझ्या मुलीचा नुसता छळ मांडलाय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं म्हणून खात्रीने बोलतोय. माझी मुलगी नोकरी करते. जावई पण बँकेत क्लार्क आहेत. दोघेपण दमून घरी येतात आणि घरी आल्यावर घरातील सर्व कामे माझ्या मुलीला करावी लागतात. अगदी घरात आल्यावर पहिला सर्वांसाठी चहा पासून सुरुवात होते ती रात्रीची  आवरा आवर करे पर्यंत. तिच्या सासूबाई घरात नुसत्या बसून असतात. शेखरराव पण कशाला, कुठल्या कामाला हातभार लावत नाहीत. म्हणायला सुशिक्षित कुटुंब आहे पण वागणं फार विचित्र."

  स्वप्नालिनी मधेच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण मधुकररावानी तिला गप्प करत म्हणाले, "स्वप्नाली, मी बाप आहे तुझा. तुझं भलं कशात आहे ते तुझ्यापेक्षा मला जास्त समजतं. तू हाच आगाउपणा कोर्टात केलास म्हणूनच आज आपल्याला इथे यावं लागलाय. तू जरा शांत बस."

  "मधुकरराव, हि कोर्टाची काय भानगड आहे?"

  "ताई, स्वप्नालीच्या लग्नाला सहा वर्षं झाली आहेत. तिच्या नवर्याचं आणि सासुच विचित्र वागणं बघितलं आणि ठरवलं माझी स्वप्नाली असा सासुरवास सहन करणार नाही. एका मित्राच्या सल्ल्यानी तिच्या फारकतीची केस कोर्टात टाकली. चांगली ५ वर्षं केस चालली. पाच वर्षानंतर केसचा निकाल सुनावताना कोर्टातील साहेबांनी सांगितलं, 'फारकत ना मंजूर करण्यात येत आहे. फारकत मंजूर करण्यासाठी लागणारा कोणताही मुद्दा किंवा कारण कोर्टासमोर समाधानकारक पणे मांडला नाही. फारकत ना मंजूर करत आहे.

  " आम्ही वकिलाला जाऊन विचारलं, 'आता पुढे काय करायचं? तिच्या आयुष्याची सहा वर्षं वाया गेली.' तेंव्हा त्यांच्या केबिनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने तुमच्या संस्थेची माहिती दिली. वकील पण म्हणाले, 'जाऊन बघा. कधी कधी आमच्याकडून ना सुटलेल्या केसेस त्या बायका सोडवतात.' म्हणून ताई तुमच्या कडे आलो."

  "अहो, पण कोर्टांनी फारकत ना मंजूर केली आहे. आता मी काही करू शकत नाही. आम्हाला  कोर्टापेक्षा जास्त अधिकार नाहीत. आम्ही कोर्टापेक्षा मोठे नाही. खरंच, मधुकरराव, तुम्ही सांगताय ते ऐकल्यावर मला पण असं वाटतंय कि तुमच्या मुलीनी फारकत घेऊ नये."

  "ताई, तुमच्याकडून काही होत नसेल तर आम्ही दुसरी कडे जातो. आम्ही खूप आशेनी आलो होतो." असं म्हणत मधुकरराव निघाले. ऑफिसमध्ये आल्यापासून त्यांच्या बायकोनी पहिल्यांदा हिम्मत करून स्वतःच मत मांडल. ती म्हणाली, "अहो, पण मी काय म्हणते. स्वप्नालीला तिची तक्रार इथे नोंदवू दे. ताई त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे जावयांना बोलवून घेतील. त्या त्यांच्या पद्धतीने बोलून बघतील. बघू त्यातून काही हाती लागतंय का? कोणास ठाऊक काहीतरी चांगलं पण घडेल."

  आणि अशा प्रकारे स्वप्नालिनी तिची तक्रार आमच्या कडे नोंदवली. शेखरला पत्र टाकून बोलावलं. तो लागलीच १० दिवसात भेटायला आला. शेखर, एक अतिशय साधा, देव भोळा माणूस! अंगात साधे कपडे,कपाळावर गंध, बोटावर पण गंध होतं, जे सुचवत होतं कि तो नुकतीच देव पूजा करून निघाला असावा. तो माझी परवानगी घेऊन समोर बसला. आणि 'तुमचं म्हणणं मांडा असं सांगितल्यावर बोलायला सुरुवात केली. (त्याला स्वप्नालीची काय तक्रार आहे ते सांगायची गरज नव्हती. त्याला बहुतेक अंदाज होता.)

  "ताई, मी शेखर. माझं आणि स्वप्नालीचा ६ वर्षांपूर्वी विवाह झाला. घरात आम्ही तीनच माणस. मी, माझी आई आणि स्वप्नाली. माझ्या वडिलांना खूप वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली. मी लहान असल्या पासून आईंनी खूप कष्टात दिवस काढले. चार घरी स्वैपाकाची काम करायची. वेळप्रसंगी लोकांनी दिलेल्या अन्नावर आम्ही जगलो आहोत. माझ्या शाळेची फी भरता यावी म्हणून माझ्या आईंनी कितीतरी वर्षात स्वतःसाठी वारभर कपडा घेतला नाही. आयुष्यात हौस-मौज तर कधी केलीच नाही. आज आता सगळं ठीक आहे तर मी हे माझं कर्तव्य समजतो कि इथून पुढच्या आयुष्यात माझ्या आईला सुखात ठेवीन. स्वप्नालीनी पण मला चांगली साथ दिली. पण तिचे वडील आले कि काय होतं ते मला अजून समजलेलं नाही. ते आमच्या घरी वेळी-अवेळी येतात. राग राग करतात. "माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही. आणि मी काही अजून बांगड्या भरल्या नाहीत. मुलीला पोसायची हिम्मत आहे.' असं म्हणतात, त्रागा करतात आणि स्वप्नालीला सोबत घेऊन जातात. त्यांचा प्रोब्लम काय आहे हेच मला समजू शकलेलं नाहीये. त्यांचं जाऊ द्या. पण मला स्वप्नालीची गम्मत वाटते. एरवी इतकी आमच्यात मिळून-मिसळून रहाणारी मुलगी, वडील आले कि तिला काय होतं काही कळत नाही. ते चल म्हणाले कि हातातलं काम टाकून त्यांच्या सोबत जाते. कधी आमची परवानगी मागत नाही कि कधी त्यांना विरोध करत नाही. ताई, लग्न हि काय रोज करायची गोष्ट आहे का? लग्न निभावण्यासाठी करायचं असत. मोडण्यासाठी नाही. मी असं नाही म्हणत कि माझं काहीच चुकत नाही. चुकतही असेल. पण प्रश्न बोलून सुटू शकतो, हे त्यांना मान्यच नाही. त्यांनी कोर्टात फारकतीचा दावा दाखल केला. कोर्टांनी र्तो ना-मंजूर केला. म्हणून ते तुमच्याकडे आले आहेत. ताई, मी कोर्टात जे सांगितलं तेच तुम्हाला पण सांगतो 'मी स्वप्नालीला फारकत देणार नाही. ती माझी बायको आहे आणि आज ना उद्या मी तिला माझ्या घरी घेऊन जाणार आहे."

  शेखरच्या बोलण्यात कुठेतरी सच्चेपणा जाणवला आणि मी दोघांची एकत्र बैठक बोलवायची ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघं आले. पण स्वप्नाली सोबत तिचे वडील पण आले. (नेहेमीप्रमाणे). मी त्यांना वेगळ्या खोलीत बसायची विंनती केली. आधी त्यांना ते मान्यच नव्हतं. पण अखेरीस कबूल झाले. मी, शेखर आणि स्वप्नाली वेगळ्या खोलीत बसलो. आमच्यात काय बोलणी चालू आहेत हे मधुकरराव ह्यांना ना कळल्यामुळे ते अस्वस्थ झाले. आमची मीटिंग जवळ जवळ दोन तास चालली. ऑफिसमधून माझ्यासाठी निरोप येत होते, "ताई, स्वप्नालीचे वडील खूप चिडले आहेत. रागानी त्यांचा चेहेरा लालबुंद झाला आहे. ताई, आम्हाला भीती वाटते आहे त्यांचं बिपी तर नाही ना शूट-अप होणार? ताई, ते कस तरीच करतायत."

  मी ऑफिसमधील कार्यकर्त्यांना सांगितलं, " बाहेर माझी गाडी आहे. काही वाटलं तर त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. पण स्वप्नाली सांगतीये त्यांना काहीच होणार नाही. ती सासरी जाईल अशी शक्यता निर्माण झाली कि ते असंच करतात. काही टेन्शन घेऊ नका."

  इकडे खोलीत आमची बोलणी चांगली चालली होती. स्वप्नालिनी पहिल्यांदा स्वतःबद्दल आणि तिला काय हवं आहे हे मांडल. स्वप्नाली सांगत होती, "ताई, मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. लहानपणी मरता-मरता वाचले होते. मी दोघांची खूप लाडकी. दोघांनी मला तळहातावरच्या फोडासारख जपलं. मी जशी शाळेत जायला लागले तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी मला एकटीला कुठे कधी जाऊ दिलं नाही. माझं लग्न करायचं पण ते खूप दिवस टाळत होते. मधेच त्यांना वाटलं घर जावई व्हायला तयार असेल, असं स्थळ पहावं. आईंनी त्याला विरोध केला तेंव्हा त्यांच्यातच खूप वाद झाला. अखेरीस महा-मुश्किलीने ते माझं लग्न लाऊन द्यायला तयार झाले. गावातच सासर-माहेर असल्याने वरचेवर भेटायला यायचे. त्या घरातली माणस माझी, ते घर माझं असं मला त्यांनी कधी वाटूच दिलं नाही. ते भेटायला आले आणि मला काम करताना बघितलं कि त्यांचा संताप व्हायचा. मला त्यांच्या सोबत घरी जाण्यासाठी आग्रह करायचे. मी जायला नकार दिला तर आत्महत्या करण्याची धमकी द्यायचे. माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूबाईंना, खूप नको-नको ते बोलायचे.ताई, मी त्त्यांच्या वागण्याला खूप कंटाळून गेले होते."

सांगताना स्वप्नाली रडायला लागली. शेखरनी तिला जवळ घेऊन शांत केलं.स्वप्नाली आणि शेखर मध्ये समझोता होण्याची चिन्ह दिसत होती. त्यांना दोघांना १० मिनिटं बोलायला वेळ देऊन मी खोलीच्या बाहेर आले. बाहेर आले तर मधुकरराव माझी वाटच बघत होते. ते जवळ जवळ माझ्यावर ओरडलेच, "ताई, तुम्ही हे असं करू शकत नाही. तुम्ही माझ्या मुलीचा असा परस्पर समझोता करू शकत नाही. जर का उद्या तिचं काही बर वाईट झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला अजून माहित नाही मी कोण आहे ते!"

  त्यांना शांत करत मी सांगत होते,"मधुकरराव, स्वप्नाली हि तुमची मुलगी आहे. हे सत्य आहे. हे कोणीच नाकारत नाहीये. पण आता तुम्ही तिचं लग्न लाऊन दिलत. आता तिच्या संसारात लुडबुड करू नका. तिला तिचा संसार सुखानी करू द्या. शेखर चांगला मुलगा आहे. तुम्ही प्लीज समजून घ्या. उद्या असं नको व्हायला कि ज्या स्वप्नाली साठी तुम्ही हि टोकाची भूमिका घेताय तीच तुमच्याशी संबंध तोडायची."

  तेवढ्यात शेखर आणि स्वप्नाली बाहेर आले. तिला बघितल्यावर मधुकरराव अल्मोस्त धावतच तिच्या जवळ गेले, तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, "स्वप्नाली बाळ, चल. आपण आपल्या घरी जाऊ. तू कशाचं टेन्शन घेऊ नको. मी समर्थ आहे तुला सांभाळायला."

  स्वप्नालिनी त्यांचा हात झटकला आणि म्हणाली, "ताई, मी माझ्या नवर्यासोबत जायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. माझ्या वडिलांनी माझ्या घरी येऊ नये. मी माझी खुशाली तुम्हाला कळवीन, आम्ही येऊन सांगू पण कुठल्याही कारणांनी माझे वडील माझ्या कडे आलेले मला चालणार नाहीत. त्यांच्या मुळेच माझा संसार मोडणार होता. जर एवढंच मुलीचं प्रेम होतं तर माझं लग्नच लाऊन द्यायचं नाही ना त्यांनी. ताई, तुम्ही मला विचार करायला एक वेगळी दिशा दिलीत. तुमचे खूप खूप आभार!"

  दोघांमध्ये समझोता झाला आणि ते लिखापडी करून त्यांच्या घरी निघून गेले. मुलीनी वडिलांकडे वळून पण पाहिलं नाही.

  शेखर आणि स्वप्नाली अधूनमधून भेटतात. दोघंपण मजेत आहेत आणि सुखानी संसार करतायत.    

 

 

 

 

Monday, 1 March 2021

 पती परमेश्वर!

आज सुदैवानी ऑफिसमध्ये गर्दी नव्हती. बरेच दिवसांनी आम्ही थोड्या निवांत बसलो होतो. तेवढ्यात ३ माणस, दोन बाया आणि एक बाप्या ऑफिसमध्ये आले. आत आल्या आल्या त्या गृहस्थांनी माझ्या समोरच्या खुर्चीत 'बसू का' विचारलं आणि मी होकाराथी मान हलवल्यावर, बसत स्वतःची ओळख करून दिली," ताई, मी केशव! मला आमच्या गावच्या पाटील साहेबांनी तुम्हास्नी भेटाया सांगितलं."

  "हो का? पण कुठून आलात? म्हणजे कुठल्या गावचे?" मी जरा त्यांच्या सारखं बोलण्याचा प्रयत्न करत विचारलं.

  केशव नामक गृहस्तांच्या चेहेऱ्यावर आश्चर्य होतं. "अहो ताई, मी म्हणजे आम्ही पाटलांच्या गावचे. हि माझी लेक-सुमन आणि हि माझी बायको."

  "केशवराव आता मला सांगा तुम्ही दोघं कुणच्या गावचे?"

  माझा हा प्रश्न ऐकल्यावर केशवराव मस्त मोकळ हसले आणि म्हणाले, "ते सांगितलंच नाही. आम्ही ताहाराबादचे. मी आणि ह्या दोघी पाटील साहेबांच्या भावाच्या शेतात मजुरी करतो. सुमनच्या लगीनाची थोडी भानगड झाली. साहेब म्हणल ताईना भेट. म्हणून आलो."

  केशव, एक मध्यम चणीचा माणूस. अंगात मळलेल धोतर आणि फाटका सदरा. डोक्यावर टोपी. उन्हातान्हात काम करून रापलेल शरीर. आर्थिक परिस्थिती बेताची असावी.आयुष्यभर कष्टाच काम केलंय हे वेगल्यांनी सांगायची गरजच नव्हती. ५०च्या आसपास वय असाव. त्यांची पत्नी सिंधू! अंगावर जूनी, मळकट ९ वारी साडी. केस विस्कटलेले, हाताने कसेतरी मागे सारलेले. डोक्यावर पदर. (जो एक क्षणपण ती खाली पडू देत नव्हती.) अंगानी बारीक, थकलेला चेहेरा. त्या उलट त्यांची मुलगी सुमन! १९-२० वर्षांची चुणचुणीत मुलगी. गावाकडच्या शाळेत १० वीपर्यंत शिकलेली.दिसायला सावळी, पण शिक्षण आणि लहान वयात चार पैसे कमवायला लागल्यामुळे येणारा एक आत्मविश्वास. चेहेरा हसरा आणि स्वभाव मोकळा.

  दोघींना बसायला सांगितलं आणि सुमनला उद्देशून विचारलं, "सुमन, काय प्रोब्लेम आहे. मला नीट सांग. आपण त्यातून काही तरी मार्ग काढू."

  सुमननी वडिलांकडे बघितलं. त्यांनी होकार दिल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.

  "ताई, माझं मागच्या वर्षी रमेश संग लगीन झालं. ते लोक मांगी-तुंगीकडचे. मालेगावमध्ये ते  (रमेश) एका ऑफिसात काम करतात. लग्न साधेपणानी झालं. माझ्या बा कडे द्यायला काहीपण नाही, ह्याची त्यास्नी कल्पना होती. बा नी मला कष्ट करून शिकवलं. मी पण कळाया लागल्यापासून त्यांच्या संग शेतात कामाला जाते. रमेश च्या बा च पण काहीबी मागणं नव्हतं. लगीन झालं आणि मी रमेश संग गेले. तिथे मी १०-१५ दीस राहिले आणि रमेश कामासाठी बाहेरगावी गेला. दोन दिसात येतो अस सांगून गेला. पण एक महिना झाला तरी आलाच नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. घरातील शिधा संपत आला. मला काळजी वाटायला लागली. कोणाला आणि कसं कळवू. किराणा दुकानाच्या मालकाकडे फोन होता. पण माझ्या बा कडे नव्हता. (खरं सांगायचं तर लग्ना आधी घर आणि शाळा, आणि नंतर घर आणि शेत ह्या पलीकडे जगच माहिती नव्हतं. बा सांगेल तसं वागायचं. कधी का विचारलं नाही. माझी १० विची परीक्षा झाली आणि मी पूर्ण वेळ मजुरीला जायला लागले. ८-१० महिने झाले असतील. शेतातले इतर मजूर बा ला सांगाया लागले,'केशवा, तुझी पोर मोठी झाली. आता तिचं लगीन कराया हवं. गावातील समदी माणस बरी आहेत पण कोणाच्या मनात कवा काय येईल काय सांगावं.' मग माझ्या बा नी चार लोकांच्या, नातेवाईकांच्या मदतीने स्थलं शोधायला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी माझं लगीन झालं.)

  काय करू? काही समजत नव्हतं. अचानक एक दिवस गावाकडे आमच्या शेजारी रहाणारा गणपत मला भेटला. मी त्याच्या हाती गावी निरोप धाडला. माझा बा गावातली दोन-चार शहाणी माणस घेऊन माझ्या सासरी गेला. (माझे सासू-सासरे मांगी-तुंगीला रहातात). तिथे त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानी घातला. सासर्यांनी फोनवर रमेश संग बोलणं केलं आणि तो दोन दिवसांत घरी आला. 'मी अशा पद्धतीने चार लोकांना सांगितल्या मुळे त्याची बदनामी झाली' ह्या कारणांनी तो माझ्यावर नाराज झाला. आधीच तुटकपणे वागत होता. आता तर संबंध आणखीनच बिघडले. कामापुरतं बोलायचा, आता ते पण बंद झालं. घरी फारसा थांबेनासा झाला. माझ्यावर कधी हात उचलला नाही, कधी भांडण नाही. एवढंच नाही तर कधी आवाज चढवून बोलला पण नाही. त्या दिवसा नंतर मला कधी काही कमी पडू दिल नाही. पण हा असा संसार काय कामाचा? माझं लगीन झालं तवा माझी माय मला म्हणली होती,"पोरी लगीन करून सासरी चालली आहेस. माणस, नाती सांभाळ. पती हा देव मानून सेवा कर".

  "ताई, मी ते पण केलं असत. पण तो देव माझ्यापाशी थांबाया तयार नाही. मी तरी त्याला हुडकत कुठे फिरू? तरी मी त्यांची वाट बघत तिथेच सहा महिने राहिले. एक दिस बा ला कोणीतरी सांगितलं, 'केशवा, तुझा जावई वेगळ्याच मुली संग म्या पाहिला. बजारात.'

परत माझा बा हातातलं काम सोडून माझ्या सासरी गेला. रमेशच्या बा नी त्याला फोन लावला. एकदा म्हणला 'लागत नाही, मग म्हणला उचलत नाही.' बा नी त्यास्नी इचारलं, 'जावई कुठे आहेत? सा महिने झालं माझी पोर तिकडे एकलीच रहाते.'

ह्यावर रमेशच बा म्हणालं,"केशवा, माझा पोरगा नोकरी करतो. त्याला कामावर जावं लागतं. घरला बसून कसं चालेल? सूनबाईला काही कमी पडत नाही ना? शिधा, कपडा समद देतो ना?'

"त्यांनी काय? हे समद तर माझ्या घरला पण होतं. रमेशनी तिच्या संग रहाया नको का? दादला हाय नव तिचा?" माझ्या बा च्या ह्या सवालावर त्यांच्या कडे काहीबी सांगाया नव्हत. बा तिथून माझ्या कडे आला आणि मला त्याच्या संग घरला घेऊन आला. मी माझ्या मायला विचारलं,"आय, लगीन करून मिळालेला देव दुसर्याच भक्ताकडे गेला, का आणखीन कुठे काही कळे ना. तर म्या काय करायचं?"

  बा नी माहिती खरी का खोटी हे बघितलं आणि मग जावयाला भेटाया गेला. (त्याचा, रमेशचा आत्ताचा पत्ता माझ्या सासर्याला माहित होता.) रमेशनी उडवा-उडवीची उत्तरं दिली. त्याच्या संग एक बाई रहाते आहे पण तो कबूल करत नाही कि ती त्याची बायको आहे. तो सांगतो घरातली बाई त्याची आतेबहीण आहे. ताई, ह्या अशा जगण्याला काय अर्थ आहे. हा असा कधी संसार असतो का? मी रमेशची बायको म्हणून नाही जगू शकत. मला मोकळ व्हायचं आहे."

  मी केशव कडे बघितलं. त्यांनी पण होकारार्थी मान हलवत सांगितलं, "ताई, आम्हास्नी आमची पोर मोकळी करायाची हाये."

  सुमन कडून तक्रार अर्ज लिहून घेतला आणि रीतसर कारवाई सुरु केली. अपेक्षेप्रमाणे रमेशनी आमच्या पत्रांची किंवा निरोपांची दखल घेतली नाही. पोलीस मिटींगला तो काहीतरी कारणाने गैरहजर राहिला. (बहुतेक वेळा आमचं पत्र मिळालं कि किंवा फोनवर निरोप मिळाला की, समोरची पार्टी त्यांचं  म्हणणं मांडायला आमच्या ऑफिसला येतात. पण काही केसेस मधे ते येत नाहीत. अशा लोकांना आम्ही पोलीस मिटींगला बोलावतो. दर महिन्याला पोलिसांच्या सहकार्यांनी अशी मीटिंग बोलावली जाते.) शेवटी सुमनला कोर्टात फारकतीचा दावा दाखल करायला सांगितलं.

  वकिलांनी नेहेमीचे प्रश्न विचारले. "फारकत का हवी आहे? नवरा मारहाण करतो का? पैशांची मागणी करतो का? उपाशी ठेवणं? सासुरवास असा काही प्रोब्लेम आहे का?"

  ह्या सगळ्याला सुमन कडून नकारार्थी उत्तर आल्यावर वकिलाचे पुढचे प्रश्न सुरु झाले. "तो शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही किंवा असमर्थ आहे का? त्याचं इतर कुठल्या बाई सोबत विवाह बाह्य संबंध आहेत का?"

  सुमन लगेच म्हणाली, "त्याचं एका बाई सोबत लफडं आहे."

  वकील पुढे म्हणाले, "मग ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला, म्हणजे तुला पुरावे गोळा करावे लागतील. त्यांना ह्या संबंधातून मुल-बाळ झालं असेल तर त्याचा जन्माचा दाखला. किंवा त्यांचा एक-मेकांना माळा घालतानाचा फोटो, असा काहीतरी ठोस पुरावा हवा."

  सुमन म्हणाली, "मुल-बाळ असण्याची शक्यता नाही पण त्याचं लगीन झालं आहे ह्याचं काही सापडतं का ते मी बघते."

  ("कोर्टात दावा दाखल वकील करतो. पण त्याला लागणारे कागदपत्र, पुरावे हे आपण गोळा करून द्यावे लागतात. तो ह्यातलं काहीपण करणार नाही." ह्याची सुमनला कल्पना दिली होती.)

  सुमन कामाला लागली. पुरावा शोधणं एवढं एकच ध्येय तिच्या आयुष्याचं असल्या सारखी! हे काम सोपं नाही ह्याची तिला पण कल्पना होती. वडिलांकडून तिनी रमेशचा पत्ता घेतला. (शेत मजुरी करणारा, अशिक्षित होता केशव पण तो ज्या पद्धतीने सुमनला खंबीरपणे साथ देत होता ते बघून मला त्याचं खूप कौतुक वाटलं.) पत्ता विचारत-विचारत ती रमेश रहात होता त्या सोसायटीत पोहोचली. बाहेरून चौकशी केली तेंव्हा तिला माहिती मिळाली की, 'रमेशच लग्न झालं आहे आणि त्याच्या बायकोचं नाव संगिता आहे.' आता कोर्टात लागणारा पुरावा कसा मिळवायचा, ह्या विवंचनेत ती होती. २-३ वेळा वेग-वेगळ्या वेळेला तिने त्या घराबाहेर चक्कर मारली. तिच्या लक्षात आल की रमेश सकाळी १०.३० वाजता ऑफिसला जातो तो संध्याकाळी ६ वाजता येतो. दुसऱ्या दिवशी ती दुपारी ४ वाजता रमेशच्या घरी गेली. दारावरची बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे संगीतानी दार उघडलं.

  संगीताला बघून सुमननी सुरुवात केली," तू संगीता ना? संगीता वहिनी? किती गोड दिसतीयेस. अग तू मला ओळखत नाहीस. मी रमेशची आतेबहीण, सीमा. तुमच्या लग्नाला मी येऊ शकले नाही. अग आत तरी बोलावशील की नाही."

  "सॉरी, मी पण कशी वेनधळी. या ना सीमाताई, आत या ना." असं म्हणत ती सुमनला आग्रहाने घरात घेऊन गेली. कौतुकानी लग्नाच्या फोटोचा अल्बम दाखवत ती म्हणाली,"तुम्ही फोटो बघा. मी चहा टाकते."

  संगीता आत गेली. फोटोचा अल्बम बघताना तिच्या मनात एक विचार आला. हे फोटो वकिलाना चालू शकतील का? पुरावा म्हणून? तिच्या हातात विचार करत बसायला फार वेळ नव्हता. तिने अल्बम मधले तिला हवे असलेले दोन फोटो काढून घेतले आणि पर्स मधे ठेवले. तेवढ्यात संगीता चहा घेऊन आली तेंव्हा सुमन कौतुकानी फोटो बघत होती. चहा घेतला. १०१/- रुपयांचा आहेर केला आणि सुमन निघाली.

  सुमननी आणलेले फोटो कोर्टात रमेशच दुसरं लग्न सिद्ध करायला उपयोगी पडले. वर्षभरात तिच्या केसचा निकाल लागला. रमेशला शिक्षा झाली. सुमनला फारकत मिळाली. सुमनला न्याय मिळाला. पण हसरी, मोकळा स्वभाव असलेली सुमन पार बदलून गेली. ती जेंव्हा हे सांगायला आली तेंव्हा तिच्या चेहेऱ्यावर कोणताच भाव नव्हता.

  मी तिला जेंव्हा विचारलं,"सुमन, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस?"

  तेंव्हा ती शांतपणे म्हणाली," माझ्या माय-बापानी माझं लग्न करून मला एका देवाची सेवा करायला पाठवलं. पण त्या देवाला वेगळ्याच भक्ताची भक्ती भावली. मागील २-२.५ वर्षात माझ्याकडे पाठ ना फिरवणारा देव मला सापडला आहे. मी त्याची सेवा करायचं ठरवलं आहे."

  सुमननी ज्या शिताफिनी संगीताच्या नकळत तिच्या घरातून तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध पुरावा मिळवला, त्यांनी सुमनच्या बुद्धीची चुणूक दिसली. तिला शिक्षणाची संधी मिळाली असती तर?

  काही दिवसांनी निरोप आला सुमन महानुभाव पंथात गेली.