Tuesday, 16 February 2021

 

 अद्दल

"ताई, येऊ का?" असं विचारायची औपचारिकता करत जोशी काकू एका तिशीच्या आतल्या महिलेला सोबत घेऊन ऑफिसमध्ये आल्या. मालतीताई जोशी, आमच्या साठी जोशी काकू (आम्हा कार्यकर्त्यांपेक्षा २० एक वर्षांनी तरी मोठ्या असतील). ह्या आमच्या संस्थेच्या (महिला हक्क संरक्षण समिती) स्वयं घोषित कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या बघण्यात एखादी पिडीत महिला किंवा अडचणीत सापडलेली महिला आली कि त्या तिला आमच्या ऑफिसला घेऊन यायच्या. ह्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता. कधी कधी तर रिक्षा साठी पदरचे पैसे पण खर्च करायच्या आणि वर म्हणायच्या, 'तेवढीच समाज सेवा".

माझ्या समोरच्या खुर्चित बसत म्हणाल्या, "ताई, हि संध्या. आज भाजीबाजारात  भेटली. साधारण ओळखीची आहे. म्हणजे बाजारातीलच ओळख. सासरची माणस जरा विचित्र आहेत. दाखवण्या सारखा त्रास नाही, म्हणजे मारहाण वगेरे. सासू कधी ह्यांच्यात असते तर कधी नाशिकरोडला, लेकीकडे. लेकीचं लग्न झालाय. तिच्या नवऱ्याचा टुरिंगचा जॉब आहे. त्यामुळे अधून मधून तिला सोबत महणून सासू तिच्या घरी तर कधी लेक आपल्या आईकडे. मीच काय सांगत बसले आहे. मला बरीच काम आहेत. ताई, मी जाऊ? संध्या, तुला जे सांगावसं वाटेल, बोलावसं वाटेल ते मोकळेपणाने सांग. ताई ह्याच्यातून काहीतरी मार्ग नक्की काढतील."

असं म्हणत जोशी काकू उठल्या आणि त्यांची काम करायला गेल्या. जाताना संध्याला सांगून गेल्या, 'इथेच थांब. माझी काम झाली कि मी तुला न्यायला येते.'

खुर्चीत बसत संध्यानी सांगायला सुरुवात केली,"ताई, मी संध्या. माझं महेशबरोबर ६ वर्षांपूर्वी लग्न झालं. माझं माहेर नागपूर कडच. सासर इगतपुरी येथील. महेश रेल्वेत चांगल्या पोस्टवर आहे. पगार चांगला आहे. घरात सासू (हौसाबाई), नणंद (सरोज), महेश आणि मी. सुरुवातीची तीन वर्षं बरी गेली. छोट्या मोठ्या कुरबुरी होत होत्या. लग्नातील देणघेण, मानपान अशा नेहेमींच्या विषयावरून सासूबाई व इतर सर्वांची कुरकुर असायची. लागोपाठ झालेली दोन बाळंतपण आणि पहिल्या वर्षातील सणवार, ह्या मुळे त्या काळात माहेरहून कोणी ना कोणीतरी भेटायला येत होतं. (तेंव्हा गरज पण होती). येतांना काहीना काहीतरी सासरच्या लोकांसाठी आणत होते. पुढे माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्याचं येणं कमी झालं. खरं सांगायचं तर दोन्ही कडील माणस आणि त्यांच्या न संपणाऱ्या मागण्या पुरविण माझ्या वडिलांना जड जात होतं.

 पुढे सरोजचं लग्न झालं. कर्ज काढून थाटामाटात लग्न केलं. (तेंव्हा माझ्या माहेरच्यांनी मदत करावी अशी अपेक्षा होती. तसं सासूबाईनी बोलून पण दाखवलं. माझ्या वडिलांनी मदत करण्यास असमर्थ आहोत असं कळवल्यावर तो विषय तेवढ्यापुरता थांबला. पण त्याचे व्हायचे ते परिणाम झालेच.)तिचं सासर नाशिकच! तिच्या नवऱ्याची फिरतीची नोकरी. सर्वांच्या सोईसाठी आम्ही इगतपुरीहून नाशकात आलो. महेश रोज अप डाऊन करायचा. त्याच घराकडे आधीच लक्ष कमी होतं, त्यात रोजची धावपळ सुरु झाल्यावर तर बघायलाच नको. त्याचा त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता. खरं तर श्रद्धाच होती. 'ती म्हणेल ती पूर्व दिशा.'तो नेहेमी म्हणायचा, 'माझी आई आहे तोपर्यंत मला कशाचच टेन्शन नाही. बाबा गेल्यानंतर तिनेच तर आम्हाला मोठं केलं. घर संभाळल, आम्हाला शिकवलं. शी इज अ स्त्रोंग अंड ग्रेट वूमन.'

सरोजच्या लग्नानंतर घरातील वातावरण बदललं. खरं तर बिघडत गेलं. संध्याकाळी महेश घरी आला कि त्या (सासूबाई) वाकडं तोंड करून बसायच्या. माझ्याबद्दल उलटसुलट तकरारी करायच्या. अपेक्षे प्रमाणे महेश माझ्यावर वैतागायचा, मग रागवारागवी, वाद, भांडणं असा आमच्या नात्यात तणाव वाढत गेला. इतके की अलीकडे तर मारहाण पण करतो.

पहिल्या पासूनच घरात येणारा प्रत्येक पैसा सासूबाईंना द्यायचा, मग त्यांच्या परवानगीने खर्च करायचा. हि प्रथाच होती. एक दिवस रात्रीच्या जेवणात महेशच्या पानात सासुनी दोडक्याची भाजी  वाढली.(त्याला दोडकी अजिबात आवडत नाहीत, हे माहित होतं तरी.) महेश वैतागला. चिडून म्हणाला, 'इथे मी दिवसभर मरमर मरायचं, कमवायचं, आणि घरी आल्यावर व्यवस्थित जेवण पण नसावं? संध्या, आता तुला साधा माझ्या आवडीचा स्वैपाक पण जमत नाही कि काय?'

मी सांगायला सुरुवात केली, 'आईनी सांगितलं म्हणून......'

तेवढ्यात सासुनी आवाज वाढवत सांगितलं, "हीचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. मी तिला करू नको म्हणाले कि मुद्दाम करते. दोडकी आणू नको असं सांगितलं होतं. विचार तिलाच आणि जरा खडसून विचार. हि दिवसभर पुस्तकं वाचत लोळत पडते. एक काम करत नाही. कि सांगितलेलं ऐकत नाही. सगळी काम करून मी थकून जाते. आता बाजारात जाऊन भाजीपाला पण मीच आणायचा असेल तर ते पण करते. मंदिरात सुधाताई भेटल्या त्या म्हणतच होत्या ह्या शिकलेल्या मुली नवर्यांना आपलंसं करतात आणि सगळी सत्ता ताब्यात घेतात. हे बघ महेश, तू म्हणत असलास तर उद्यापासून तुझी महाराणी म्हणेल तसं."

महेशचा पारा चढत होता आणि सासूबाई आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. त्या संध्याकाळी कोणीच जेवल नाही. सगळ्याचा परिणाम म्हणून आमच्यात खूप वाद झाला. 'आमच्या घरात राहायचं तर शिस्तीत राहायचं. तुझा फालतूपणा खपवून घेणार नाही'. ह्या वाक्यांनी दिवस संपला.

असे प्रसंग वरचेवर घडू लागले. सासूबाई रोज नवीन नाटक करायच्या. वाद आणि भांडण खूप वेळा होऊ लागलं. मी अगदी वैतागून गेले होते. कळत नव्हतं, काय करावं? कोणाशी बोलावं? आई-वडिलांना त्रास द्यायला नको वाटत होता. आणि त्यांना कळवण्याची काही सोय पण नव्हती. घरात एक मोबाईल! तो हि महेशकडे.

अचानक एक दिवस आईचा फोन आला, (तो पण बद्रीनाथहून! भरत मामानी त्यांना सरप्राईज दिलं होतं. ट्रिपचा खर्च, बुकिंग सर्व त्यांनी केलं होतं. आई-बाबा खुश होते.) पण माझ्याकडच वातावरण एकदम तापल. फोन ठेवल्या क्षणी सासूची बडबड सुरु झाली. "बघितलस महेश. सरोजच्या लग्नात मदत करा म्हणालो तर ह्यांच्या कडे पैसे नव्हते आणि ट्रीपला जायला बरे पैसे आहेत. संध्याला आपल्या गळ्यात बांधली, आता स्वतः मजा करायला मोकळे. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव आणि जाब विचार. नाहीतर एक काम कर. संध्याला बोलायला सांग. तिला मागु देत त्यांच्या कडे पैसे."

आईचं ऐकून महेश मला तसं करायला सांगणार, ह्याची मला खात्री होती. मी फोनवर बोलायला नकार दिला. दोघांचा खूप अपमान झाला. महेशनी चिडून माझ्यावर हात उगारला. मागून सासूचा आवाज आला,"दे दोन चार टोले. त्याशिवाय ती सुधरणार नाही." त्या दिवशी माझ्या नवर्यानी पहिल्यांदा मला मारलं. आणि तिथून मारहाणीला सुरुवात झाली.

मी बरेच दिवस आई-वडिलांना फोन करायचं टाळल. पण शेवटी रोजच्या मारहाणीला आणि भांडणाला कंटाळून, दोन दिवसांपूर्वी वडिलांना फोन लावला. वडिलांना सासरच्या लोकांच्या पैश्याच्या मागणी विषयी सांगितलं. तिकडून वडील विचारत होते,'सर्व ठीक आहे ना? तुझ्या आवाजाला काय झालाय? असा का येतोय?काही होताय का? घरचे सगळे कसे आहेत? महेशची नोकरी व्यवस्थित चालू आहे ना? मग ते सारखे पैसे का मागतायत? अग संध्या, आम्हाला पण आमचे खर्च आहेत. त्यांना तूच का नाही सांगितलस माझ्या वडिलांना जमणार नाही असं....ते बोलतच होते. मी 'हो, नाही मध्ये उत्तरं देत होते. (मी त्यांना सांगूच शकत नव्हते की आजचा फोन टाळण्यासाठी मी मागच्या दोन महिन्यात असंख्य वेळा मार खाल्ला आहे, अपमान सहन केला आहे, मुलांना माझ्या पासून लांब केल्यावर दयेची त्यांच्या कडे भिक मागितली आहे. आणि आजपण फोन ठेवल्यावर काय होईल, ते काय करतील ह्या कल्पनेनी मन सुन्न झाल आहे.)

महेशनी हातातला फोन हिसकून घेतला. सासू मुलांना घेऊन आतल्या खोलीत गेली. मुलं मला हाका मारून रडत होती. मला काही कळायच्या आत माझ्या पाठीत एक दणका बसला. महेशनी मला हाताला धरून घराबाहेर काढल. रात्रीचे १० वाजले होते. इतक्या उशिरा मी कुठे जाऊ? कशी जाऊ? मुलं आतमध्ये रडत होती. मी बाहेरून खूप हाका मारल्या, विनवण्या केल्या. पण काही उपयोग झाला नाही. रात्रभर मी दारापाशी आशेनी बसून राहिले. सकाळी सासुनी मला 'एखाद्या अंगणात शिरलेल्या जनावराला हाकलाव तसं अंगणाबाहेर हाकलल. मी वेड्यासारखी बाजारात फिरत होते. तेंव्हा मला ह्या मावशी भेटल्या.

ताई, तुम्हीच सांगा मी काय करू? मी माझ्या मुलांशिवाय जगू शकत नाही. मला माझी मुलं हवी आहेत. ताई, मला एकदा तरी माझ्या मुलांना बघायचं आहे."

संध्याची रीतसर तक्रार नोंदवून घेतली. तिची शोर्ट स्टे होम मध्ये रहाण्याची सोय केली. महेशला पत्र पाठवून बोलावून घेतलं. तो आला नाही म्हणून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो रजा मिळत नाही. ऑफिसमध्ये खूप काम आहे अशी कारण देऊन भेटणं टाळत होता. शेवटी त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या साहेबांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी महेश ऑफिसमध्ये हजर झाला.

आला तो जरा गुश्यातच होता. "हेमाताई कोण आहेत? आणि माझी बायको कुठे आहे? जर का तिला काही झालं तर तुम्हाला सोडणार नाही."

"मिस्टर महेश, मी हेमा. काय बोलायचं ते माझ्याशी बोला. आणि ऑफिसमध्ये आहात हे विसरू नका. भाषा जरा सांभाळून वापरा." असं म्हणत मी त्याला बसायला खुणावलं.

"तर महेशराव तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी वाटतीये. हो ना? म्हणून तुम्ही तिला रात्री अपरात्री घराबाहेर काढलत, दुसऱ्या दिवशी तिला हाकलून दिलत, तिची मुलं हिसकून घेतलीत, तिला त्यांना भेटू दिलं नाही. एवढंच नाही तर १५ दिवस झाले संध्या कुठे आहे? कशी आहे? हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज पण वाटली नाही. खरंच काळजी वाटतीये का, तिने संस्थेत तुमच्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून घाबरला आहात?"

"मी कशाला घाबरू? चुका तिने करायच्या आणि आम्ही का बर घाबरायचं? रागाच्या भरात बोललो असेन. तिला अक्कल यावी म्हणून काढलं होतं घराबाहेर. पण तिला तिची जबाबदारी कळायला नको. खुशाल मुलं सोडून निघून गेली. माझ्या समोर बोलवा तिला. आई म्हणते तेच बरोबर आहे. तिला कोणाचा धाकच राहिला नाही. संध्या साली......."

"तिचं म्हणणं होतं कि तुम्ही तिच्या वडिलांकडून पैशांची मागणी करत होतात?"

"ताई, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तो आमचा घरचा मामला आहे. मी लाख मागीन हो पण तो हराम... देतोय कुठे? एवढं पण कळत नाही त्याला, तिच्या बापाला, आपली पोर तिथे नांदतीये. आपण कस शिस्तीत वागावं. पण नाही. आता येतील नाक घासत आणि विनवण्या करत,'आमचं चुकलं. माफ करा. पोरीला घरात घ्या."

काय त्याची भाषा आणि किती बोलण्यात मगरूरी! न रहावून मी म्हणाले, "महेशराव, भाषा जरा नीट वापरा. तुम्ही संस्थेच्या कार्यालयात आहात. ह्याच भान असू द्या. तुम्ही तुमच्या वागण्याचं समर्थन करताय कारण तुम्हाला अजून कायद्याची माहिती नाहीये. तुम्ही चुकीचं वागला आहात. ह्याच्या साठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तुमची नोकरी जाऊ शकते. नीट वागा. अजून वेळ गेली नाहीये. दोघांनी एकत्र बसून काही उत्तर सापडताय का, काही मधला मार्ग निघतोय का, ते बघा.

बर मग कधी बोलवू संध्याला. तुम्ही सांगाल त्या दिवशी तिला बोलवून घेते."

"म्हणजे काय संध्या तुमच्याकडे नाहीये? मग ती आहे कुठे?"

"ती सुखरूप आहे. कधी येताय ते सांगा आणि येतांना मुलांना घेऊन या."

कायदा, शिक्षा हे शब्द ऐकल्यावर महेश थोडा नरमला. एकत्र बैठकीचा दिवस ठरला. संध्या मुलांना भेटायच्या आशेनी वेळेच्या आधीच आली. महेश आला, पण मुलांना न घेता.

त्या दिवशी काहीच बोलणी होऊ शकली नाहीत. मुलं भेटली नाहीत म्हणून संध्या रडत होती आणि महेशचं एकच म्हणणं होतं, 'नांदायला यायचं असेल तर संध्यानी लिहून द्यावं मी आज पर्यंत केलेल्या चुकांबद्दल माफी मागते. पुन्हा अशा चुका करणार नाही. केल्या तर माझा नवरा जे ठरवेल ते मान्य असेल.' लिहून दिलन तर ठीक नाहीतर मला ती नाही लागत. संध्या मुलांसाठी काहीपण लिहून द्यायला तयार होती. पण आम्हाला ते मान्य नव्हतं. ८ दिवसांनी परत भेटायचं ठरलं.

एक गोष्ट नक्की होती कि संध्याला नमवण्यासाठी महेश मुलांचा वापर करत होता आणि तिच्या भावनांशी खेळत होता. हे तिच्या लक्षात आणून देणं गरजेचं होतं. खूप कौन्सिलिंग केलं, तिला खूप समजावलं. मुलांचं वय लक्षात घेता, त्यांनी नाही दिली तरी कायद्यांनी मुलं तिच्याच ताब्यात मिळतील हा विश्वास दिला. तिला आणखीन एक माहिती दिली कि ,'आम्ही समक्ष बघून आलो. तुझी मुलं सुखरूप आहेत. तेंव्हा पुढच्या भेटीत त्यांनी मुलांना देणार नाही असं म्हणाला तर ते मान्य कर. फक्त भावनेच्या भरात वाट्टेल ते कबूल करू नकोस'.

अपेक्षे प्रमाणे महेश मुलांना न घेता आला. बोलणी फिस्कटली. महेश जायला निघाला. संध्यानी न रहावून विचारलं, "आणि मुलाचं काय?"

"मुलांचं काय? कोणती मुलं? कोणाची मुलं? मुलांना विसरा आता." असं म्हणत महेश जायला निघाला. संध्या काहीच बोलत नाही असं लक्षात आल्यावर माघारी फिरला आणि म्हणाला, "तुला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाहीये?"

संध्या शांतपणे म्हणाली,"तुम्ही असल्यावर, त्यांची आजी व आत्या असल्यावर मला त्यांची काही काळजी नाही. मुलं राहू देत तुमच्यापाशी. त्यांची काळजी घ्या."

महेशसाठी हे खूपच अनपेक्षित होतं. जाता जाता सांगून गेला,"अजून वेळ गेली नाहीये. विचार कर. ह्या बायांच्या नादी लागू नकोस. वाटलं तर फोन कर." (महेश गेला आणि संध्या मुलांची आठवण काढत खूप वेळ रडली. त्या दिवशी संध्याच्या बद्दल खूप वाईट वाटलं. पण तिच्या हिमतीच कौतुक पण वाटलं.)

महेश घरी गेला. काय घडलं आहे हे जेंव्हा त्याच्या आईच्या लक्षात आल तेंव्हा ती मुलीकडे रहायला गेली. दोन दिवसातच महेशनी फोन करून संध्याला भेटायचं आहे असं सांगितलं. आज नाही उद्या असं करत आम्ही ८ दिवस ताणल. नवव्या दिवशी तो मुलांना घेऊनच ऑफिसमध्ये आला. "ताई, काही पण करा. माझ्या संध्याला बोलवा. मला नोकरी करायची आणि मुलं सांभाळायची असं दोन्ही नाही झेपत आहे. हवं तर मी तिची माफी मागतो. काय सांगाल ते लिहून देतो. पण संध्याला घरी पाठवा."

त्याची आणि मुलांची अवस्था बघवत नव्हती. पण महेशला धडा शिकवण्यासाठी हे गरजेचं पण होतं. निरोप मिळाल्यावर संध्या लगेच आली. आधी मुलांना भेटली. महेशकडून नीट वागण्याची लेखी हमी घेतली. दर ८ दिवसांनी खुशाली कळवायला येण्याची अट घातली. मग संध्याची पाठवणी केली.

पुढे काही महिने ते खुशाली सांगायला येत होते. काही वर्षं संपर्कात होते. अजूनही अधून मधून भेटतात. सगळे खूप मजेत आहेत.

Saturday, 13 February 2021

 

गृह भेट:आजपर्यंत माझ्या कामाचा भाग म्हणून अनेक केसेस ऐकल्या, अनेक लोकांशी बोलले, अनेक प्रकारची माणस भेटली. कुसुमताई, आमच्या संस्थेच्या अध्यक्ष, आमच्यासाठी मार्गदर्शक आणि माझ्या साठी गुरु! त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील एक म्हणजे, गृह-भेटीचं महत्व. मग ते महिला हक्कच काम असो नाहीतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील काम असो! त्या नेहेमी सांगायच्या, "हेमा, गृहभेटी मुळे खरी परिस्थिती समजते. कधी कधी माणस मोकळं बोलू शकत नाहीत, त्यांचे प्रश्न मांडू शकत नाहीत, तेंव्हा गृहभेटीतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात."

ह्याची प्रचीती अनेक वेळा आली पण संगिताला मदत करताना ते प्रकर्षाने जाणवलं. त्या दिवशीची घाबरलेली संगीता मला अजून आठवतीये. विस्कटलेले केस, अंगावरचं ब्लाउज बाहीवर फाटलेलं, साडी अंगाभोवती कशीतरी गुंडाळली होती, हातांवर चेहेऱ्यावर मारल्याच्या खुणा, एक दात पडलेला, तोंडातून रक्त येत होतं. एकूणच तिची अवस्था बघवत नव्हती. एव्हाना आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो होतो की मारहाणीच्या केस मध्ये आधी पिडीतेला सिव्हील हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनची वारी करून आणणं गरजेचं आहे. सिव्हीलमध्ये प्राथमिक उपचार करून दिले. पोलिसांत तिला नवर्याविरुद्ध तक्रार नोंदवायची नव्हती. पण तरी आम्ही तिला साहेबां समोर नेउन आणली. सर्व सोपस्कार झाल्यावर आम्ही तिला घेऊन ऑफिसला आलो. तिचं म्हणणं काय आहे? कोणी आणि का तिला एव्हढी मारहाण केली हे विचारलं.

"ताई, मी संगीता. १० वी पर्यंत गावाकडे शिकले. वडील मजुरी करायचे. मी ८ वीत असतानाच वडील कन्सरनी गेले. घरची गरिबी. आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायची. थोडे फार मिळायचे. आम्ही तीन भावंडं. मी सर्वात मोठी. आई कामावर गेली कि घरात मोठं कोणी नाही ह्याचा गावातील काही मुलांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. माझा मामा शेजारच्या गावात रहात होता. त्याला हे समजल्यावर तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. (मामाचं नुकतच लग्न झालं होतं. आम्ही मामीसोबत आहोत ह्या विचारांनी तो पण थोडा निश्चिंत झाला.) तेथे आई पण मामाच्या बरोबर शेतात मजुरीला जायला लागली. नंतरचे काही दिवस मजेत गेले. दोघांच्या कमाईत जेमतेम भागत होतं. दोन वेळा पोटभर जेवत होतो. काही काळानी मामीला मुलगा झाला. खर्च वाढला.आणि लवकरच लक्षात आल कि दोघांच्या कमाईत आता खर्च भागत नव्हता. मामा-मामी मध्ये वाद सुरु झाले. मी तेंव्हा १७ वर्षांची होते. आई आणि मामांनी माझं लग्न लावायचं ठरवलं. (तेवढंच खाणार एक माणूस कमी, हा त्यामागचा विचार असावा) सुरेश नावाच्या ३४ वर्षे वय असलेल्या, ७ वी नापास, दिसायला सामान्य आणि एका पायात थोडा प्रोब्लेम असणाऱ्या माणसाबरोबर माझं लग्न लाऊन दिलं. हौस मौज काही नाही. हा सुरेश करतो काय? रहातो कुठे? त्याच्या घरी कोण कोण आहेत मला कशा बद्दल काहीपण माहिती नव्हती. पुढे सगळाच अंधार होता. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली होती की मामाचं घर हे आता माझं घर नाही. मी जितकी तिथे कमी येईन तितकं आमच्या सगळ्यांसाठी बर असेल. घरच्या मोठ्यांना नमस्कार करून निघतानाच मी ठरवलं कि 'आज पासून माझं आयुष्य हि माझी जबाबदारी.' सुरेश नेईल तिथे जायचं आणि ठेवेल तसं राहायचं!

सुरेश मला आमच्या घरी, माझ्या हक्काच्या घरी घेऊन आला. घर म्हणजे नाशिक मधली एका  वस्तीतली झोपडी. मी त्याच्या बरोबर कुठे पण रहायला तयार होते, पण तो मला जिथे घेऊन आला ते घर नसून घाणीचं साम्राज्य पसरलेली वास्तू होती. ते पण मी एक वेळ स्वीकारलं असत. पण त्या घरात माझं जे स्वागत झालं ते मी मरे पर्यंत विसरू शकणार नाही. स्वागताला दारूची बाटली, जेवायला चकणा आणि झोपतांना भयानक अनुभव! हे मी कोणाला सांगणार होते? आईला सांगायची सोय नव्हती. तिच्यामागे खूप व्याप होते. मामा-मामीची मर्जी सांभाळून दोन मुलांना घेऊन दिवस काढायचे होते. तरी पण मी माझ्या आईची आतुरतेने वाट बघत होते. माझ्या लग्नानंतर दोन महिन्यांनी आई आणि मामा मला भेटायला आले. मी आईला लहान मुलीसारखी घट्ट मिठी मारली. मला खात्री होती, 'माझी आई आली आहे ती ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. पण तसं काही झालं नाही. आईंनी मला दूर लोटलं. ती म्हणाली," संगीता, आवर स्वतःला. तू आता लहान नाहीस. तुझं लग्न झालं आहे. अश्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच. प्रत्येक वेळेस तू मला हाक मारशील आणि मी तुला मदत करीन ह्या आशेवर राहू नकोस. मामा आम्हालाच कसतरी सांभाळतोय. त्यात तुझी ब्याद नको." हे ऐकल्यावर मला कळून चुकलं कि हे सगळं मला सहन करायचं आहे, आयुष्यभर! मी स्वतःला सांगत होते, समजावत होते. ताई, मी खरं सांगते सहन पण करत होते, पण कधी कधी माझी सहन शक्ती संपून जायची. मग मी विरोध करायचे. विरोध केला कि मारहाण! मारहाण तर माझ्या आयुष्याचा एक भागच झाली आहे. सगळ्यात एकच गोष्टं बरी आहे, आम्हाला मुल-बाल नाही. खरं सांगायचं तर मला नकोच आहे.

काल नेहेमी प्रमाणे संध्याकाळचा आणि रात्रीचा कार्यक्रम उरकला. आणखीन एक दिवस संपला. आता करूया झोपेची आराधना! तेवढ्यात सुरेशनी मला लाथ मारून उठवलं. (जेंव्हा पासून त्याच्या लक्षात आल आहे की मला कोणाचा आधार नाही. माझी चौकशी करायला कोणी येत नाही, तेंव्हा पासून तो माझ्याशी जास्त करून हातानी आणि पायानीच बोलतो. मला पण त्याची सवय झाली आहे.) आज तो दमला होता म्हणून मी त्याचे पाय दाबून द्यावेत अशी त्याची मागणी होती. ती पण रात्रीच्या दोन वाजता! मी नकार दिला म्हणून त्यांनी मला मारलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. सकाळी, मला शेजारच्या जाधव मावशींनी तुमचा पत्ता दिला. विचारत, विचारत आले."

"पण मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस. तुला माहेरचा आधार नाहीये, म्हणून त्याच्या कडे परत जाण्याची गरज नाही. सध्या तुझी संस्थेत (शोर्ट स्टे होम मध्ये) राहायची सोय करतो. तुला बर वाटलं कि काय करायचे ते ठरवू. चालेल का?"

त्यावर ती पटकन म्हणाली,"ताई, रहायची वगेरे सोय नको. घरी गेले नाही तर तो मला खूप मारेल. जाधव मावशी सांगत होत्या 'तुम्ही त्याला बोलावून समजाऊन सांगता. नाहीतर समज देता. मग सगळं ठीक होईल.' माझं पण तसच करा."

ह्यावर काय बोलणार. आम्ही तिची तक्रार नोंदवून घेतली. पुन्हा एकदा न रहावल्या मुळे तिला संस्थेचा पर्याय सुचवून बघितला, पण काही उपयोग झाला नाही. ती उठून जायला निघाली आणि भोवळ येऊन खाली बसली. आता मात्र तिचे निर्णय आपण घ्यायचे ठरवलं आणि ती थोडी सावरल्यावर तिला सांगितलं," संगीता, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू भारतीताई बरोबर संस्थेत जाणार आहेस."

तिच्यात काही बोलायचीच ताकत नव्हती, तर विरोध करण्याची शक्यताच नव्हती. रिक्षातून तिची रवानगी संस्थेत केली. आणि पहिलं काम केलं, संबंधित पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्याचं! कारण आजपर्यंतच्या अनुभवातून आम्ही शिकलो होतो कि 'सुरेश सारखे नवरे घरात बायकोचं जगणं मुश्कील करतात आणि ती कंटाळून किंवा नाईलाजाने घर सोडून गेली कि पोलीस स्टेशन मध्ये तिची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. कधी कधी तिने घरातील वस्तू चोरली असा आरोप पण करतात.'

संगीताकडे मोबाईल फोन नव्हता, तर सुरेश कडे फोन असण्याची काही शक्यता नव्हती. आमच्या संस्थेच्या नियमा प्रमाणे सुरेशला पत्राने संगीताच्या तक्रारी बद्दल कल्पना दिली.

सुरेश ऑफिस मधे भेटायला आला. अपेक्षे प्रमाणे त्यांनी 'संगीता कशी नालायक आहे. तिची शेजारच्या पुरुषांबरोबर लफडी आहेत. आमच्या वयात अंतर आहे. तिला मी आवडत नाही असं म्हणते. स्वैपाक नीट करत नाही. ती खूप कामचुकार आहे,' अश्या अनेक तक्रारी त्यांनी सांगितल्या.

"तिला तुम्ही का मारलंत? मारणं हा गुन्हा आहे ठाऊक नाहीये का तुम्हाला?"

"ओ म्याडम, मी संगीताचा नवरा आहे. मी तिचं काही पण करीन. ज्या कामासाठी आणलं ते करत नाही. तिला काय पोसायला आणली का? काही पण कामाची नाही. आणि तो तिचा बाप! साला माझ्या गळ्यात पोर बांधून गायब झाला. ना कधी भेटायला आला, ना जावयाचा मान राखला. आपलं टकोर सटकल कि आपण हाणतो तिला. आता कुठे आहे? गेली असेल....."

त्याच्या बोलण्यात खूप शिव्या होत्या आणि बसण्या वागण्यात गुर्मी होती. तो बहुदा दारू पिऊनच आला होता. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्याला शेवटी सांगितलं, "तुम्ही आता उठा आणि घरी जा. पुढच्या आठवड्यात दारू न पिता शुद्धीत असाल तेंव्हा या. आता निघा."

"संगीता कुठे आहे? कुठे लपवून ठेवली आहे? तुम्ही माझ्या बायकोला असं ठेऊ शकत नाही. मी तुमच्यावर केस करीन."

माझा पेशन्स संपत आला होता. मी म्हणाले, "भारती, जरा सरकारवाडा पोलीस स्टेशनला फोन लाव, साहेबांशी बोलायचं आहे." सुरेशच्या केटेगरितील लोकांना ह्याचा अर्थ चांगलाच समजतो, हे मी एव्हाना अनुभवातून शिकले होते. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुरेश एका मिनटात सरळ वागायला आणि बोलायला लागला. पुढच्या आठवड्यात मी ठरवलेल्या दिवशी येण्याचं कबूल करून तो गेला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी संगीताला पण बोलावलं होतं. दोघांची एकत्र बैठक झाली. (कबूल केल्याप्रमाणे आज सुरेश दारू न पिता आला होता) १०-१२ दिवसांच्या विश्रांतीनंतर संगीता खूपच बरी दिसत होती. महिला हक्क समिती आपल्या पाठीशी आहे ह्या विचारांनी तिला एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता, जो तिच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होता. सुरेशनी त्याची चूक कबूल केली. पुन्हा मारहाण करणार नाही, तिला घरात काही कमी पडू देणार नाही, असं लेखी आश्वासन दिल्यावर संगीता त्याच्या बरोबर समझोता करून जायला तयार झाली. दोघांनी दर ८ दिवसांनी ऑफिसमध्ये येऊन खुशाली सांगायचं कबूल केलं.

सुरेशचा स्वभाव विचित्र होता. समझोता तर झाला होता, पण सगळ्यांना संगीताची काळजी वाटत होती. मला काही चैन पडेना. समझोता करून दोनच दिवस झाले होते आणि मी अचानक त्यांच्या घरी गृहभेटीला गेले. दोघांना गप्पा मारत चहा पिताना बघून बर वाटलं. केस चांगली सोल्व झाल्याचं समाधान वाटलं. (पण हे समाधान फार काल टिकणार नव्हतं हे तेंव्हा मला माहित नव्हतं.)

ठरल्याप्रमाणे दोघं दर आठवड्याला खुशाली सांगायला येत होते. संगीता पण खुश दिसत होती. सुरेशनी आणलेली साडी कौतुकानी संगीता नेसून आली होती. महिना दोन महिने त्यांनी रिपोर्टिंग केलं. आम्हाला पण वाटलं सगळं ठीक चालू आहे. म्हणून दर आठवड्याची खुशाली दर महिन्याला येऊन सांगायचं ठरलं. त्या भेटीत पण सर्व ठीक आहे असं लक्षात आल. पुढे ३ महिने सुरेशनी कारण सांगून येण्याचं टाळल. आम्ही एक दिवस अचानक त्यांच्या घरी गेलो. सुरेश भेटला. त्यांनी सांगितलं 'संगीता बाहेर बाजारात गेली आहे. आमचं व्यवस्थित आहे.' आम्ही विश्वास ठेवला. असं दोन तीन वेळा घडलं. आम्हालापण हे चमत्कारिक वाटलं. मन सर्व ठीक असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बराच विचार केला. अखेरीस शेजारच्या जाधव मावशींची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना संगीताच्या आयुष्यात काय चाललं आहे ह्याची कल्पना होतीच. त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलं.

आम्ही निघालो आणि काय मनात आल मला नाही सांगता येणार. आम्ही संगीताच्या घरी परत गेलो. सुरेशला आम्ही परत येऊ असं वाटलं नसावं. आम्ही पोहोचलो तेंव्हा सुरेशनी संगीताचा हात पिरगाळला होता आणि तो म्हणत होता, "आता बोलाव तुझ्या ताईना. बघू तुला कोण वाचावतंय?"

"संगीता घाबरू नकोस. आम्ही आलोय." माझा आवाज ऐकून सुरेशचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. एका क्षणात त्यांनी तिचा हात सोडला आणि संगीता लहान मुली सारखी माझ्या कडे धावत आली.

"ताई, मला वाचवा. मला ह्या नरकातून बाहेर काढा."

आम्ही संगीताला आमच्या बरोबर घेऊन आलो. तिला सुरेश विरुध्द केस करायची नव्हती. तिला त्याचाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचा नव्हता. तिच्या इत्छेप्रमाणे तिने फारकत घेतली. आज ती एका शाळेत मदतनीस ह्या पदावर नोकरी करते आहे. तिची आई आणि भावंडं अधून-मधून भेटायला येतात.

त्या दिवशी संगीताकडे अचानक परत गेलो म्हणून खरं काय ते कळल आणि आम्ही तिला वाचवू शकलो.  

 

 

 

Tuesday, 2 February 2021

घाईत लग्न झालं असत तर?

  रोहिणी! एक वेगळच व्यक्तिमत्व! चौथी पास! दिसायला सामान्य. थोडी बावळट थोडी भोळसट. आई-वडिलांची एकुलती एक असल्यामुळे लाडावलेली. खरं सांगायचं तर अती लाडानी बिघडलेली.नटण्याची खूप आवड. आपण केलेला मेकप आपल्याला कसा दिसतोय, लोकं आपल्याला हसतायत. आपली चेष्टा करतायत. तिला ते कळत तरी नव्हतं, नाहीतर तिला त्यांनी फरक पडत नव्हता. ती स्वतावर खुश असायची. तिला बाहेर हॉटेलात खायला खूप आवडायचं!

  माझ्या आयुष्यात रोहिणी आली एक केस म्हणून! घरची परिस्थिती बेताची. वडील राम मंदिरासमोर फुलांचे वाटे विकायला बसायचे. आई दोन घरची काम करायची. ह्यातून जे उत्पन्न येईल त्यात घर खर्च आणि रोहिणीचे लाड भागायचे. भागायचे कसले आई-वडील उपाशी राहून भागवायचे. रोहिणी १८ पूर्ण झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी, त्यांच्या ऐपतीप्रमाणे गावाकडचा मुलगा पसंत केला आणि तिचं लग्न उरकून टाकलं. मुलगा, रोहित, रोहिणीच्या तुलनेत खूपच बरा होता. दिसायला ठीक होता आणि १० वी पास होता. निर्व्यसनी व कष्टाळू होता. घरची थोडीफार शेती होती. दोन मुलींच्या पाठचा एकुलता एक वारस होता. कधी कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही. गरजेला सर्वांच्या मदतीला धावून  जायचा त्यामुळे गावात सर्वांचा लाडका. ह्या स्थळात खोड काढण्यासारख काही नव्हतं. पहिल्या मुळाला रोहिणी माहेरी आली आणि तिनी तिच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. आई नी कशीतरी समजूत काढून पाठवली.

  त्या घरात रोहिणी कशीतरी सहा महिने राहिली. पहिल्या दिवाळीत आली ती परत सासरी गेलीच नाही. फारकतीशिवाय दुसरा उपाय नाही असे लक्षात आल्यावर तिची आई तिला आमच्या कडे घेऊन आली.

  "शांताबाई, तुमच्या मुलीला फारकत हवी आहे हे समजलं, पण कारण नाही समजलं." असं मी म्हणाले तर तिची आई म्हणाली, " खरं सांगू का बाई आम्हाला पण नाही समजलं. तुम्हीच विचारा आणि मला सांगा."

  रोहीणीशी बोलल्यावर असं समजलं कि,'सासरी काही त्रास नाहीये. नवरा, सासू, सासरे व इतर नातेवाईक चांगले आहेत. खूप जीव लावतात आणि कौतुक करतात. पण रोहिणी तिथे राहू शकत नाही. कारण तिथे सिनेमा बघायला सोय नाही आणि भेळपुरी मिळत नाही.' हे काही फारकतीच कारण असू शकत का? आणि कोर्टाला तरी हे कारण पटेल का? फारकत मंजूर करायला?

  आम्ही तिला खूप समजावलं पण रोहिणी काही ऐकायला तयार होईना. अखेरीस तिची आणि रोहितची समजुतीनी फारकत करून दिली.

  तर अशी हि रोहिणी! आता तिला लग्न करायचं होतं. (फारकती नंतर ती खूप वेळा ऑफिस मध्ये यायची. काही दिवसातच ती हक्कांनी येऊ लागली. आणि या अधिकारानीच तिने आम्हाला तिच्या साठी मुलगा बघायला सांगितलं.) मुलगा नाशिक मध्ये राहणारा हवा होता. शिक्षणाची, दिसण्याची अट नव्हती. तिच्या दोनच अपेक्षा होत्या, तो कमवता असला पाहिजे आणि त्यांनी तिला फिरायला आणि भेळपुरी खायला, ती म्हणेल तेंव्हा न्यायला पाहिजे. आता असा मुलगा मिळणं जरा अवघडच होतं. ती वरचेवर चौकशी करायला येत होती. आणि दर वेळेस आम्ही 'योग्य स्थळ नाही सापडत आहे. सापडलं कि सांगू' असं सांगत होतो. तिला मनातल्या मनात 'आम्ही काहीच करणार नाही' अशी बहुतेक भीती वाटत असावी, कारण अलीकडे ती हा विषय आमच्याशी बोलतांना काढतंच नव्हती. मग लक्षात आल कि स्वतःच स्वतःसाठी स्थलं बघत होती. एखाद्या स्थळाची माहिती कळाली कि ती आम्हाला येऊन सांगायची. (कारण तिचे आई-वडील तिच्या मूर्खपणाला कंटाळले होते. ते कशातच लक्ष घालायला तयार नव्हते) आम्ही जाऊन त्या मुलाची चौकशी करायचो आणि त्याला नापास करायचो. (तिने सुचवलेल्या मुलांमध्ये काही ना काही प्रोब्लेम असायचाच. तो व्यसनी तरी असायचा, कमवत तरी नसायचा, आधीची फारकत झालेली नसायची, पहिल्या बायकोला मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगून आलेला असायचा. काहीतरी प्रोब्लेम असायचा.)

  रोहिणी आमच्यावर फार वैतागली आणि शेवटी तिने हा विषय बोलणच बंद केलं. आम्हाला वाटलं लग्नाचं भूत उतरलं असावं! पण एक दिवस ती अचानक पेढे घेऊन आली. तिचं लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला. 'चार दिवसांनी लग्न आहे' असं ती लाजत सांगत होती. आम्ही सगळे अवाक!

  मी विचारलं," रोहिणी, कोण मुलगा? कुठे रहातो? करतो काय?कमावतो किती? घरी कोण कोण आहे? तुला हे स्थळ सुचवलं कोणी? तू नीट चौकशी केली आहेस का?"

  "ताई, तू हे सगळं विचारणार हे ठाऊक होतं मला. मी पूर्ण माहिती काढली आहे. मुलगा सिन्नरला नोकरी करतो. १२०००/- कमावतो. टू बी एच के चा flat आहे. गावाकडे शेती आहे. दिसायला तर खूप भारी आहे. मला तो बसमध्ये भेटला. त्याच्या मित्रांनी ओळख करून दिली. माझं बसचं तिकीट पण त्यांनीच काढलं. आम्ही फिरायला गेलो, भेळपुरी खालली. खूप मज्जा आली. ताई, नाही म्हणूच नकोस कारण नकार देण्यासारखं स्थळच नाहीये."

  "अग रोहिणी! तू काय बोलतीयेस, तुला कळतंय तरी का? अग, कोणाचा कोण मुलगा? तुला बसमध्ये भेटतो काय? त्याची ओळख ना पाळख. आणि त्यांनी पाणीपुरी खाऊ घातली आणि फिरायला नेलं म्हणून तू त्याच्या बरोबर लग्न ठरवून आलीस? त्यांनी स्वताबद्दल सांगितलेली माहिती तपासून नको बघायला. तू जाऊन आलीस का सिन्नरला?"

  "मी गेले नाही आणि जाणार पण नाहीये. मला त्याची गरज वाटत नाही."

  "अग, तुला वाटत नसली तरी मला वाटतीये. माझ्यासाठी जाऊन ये."

  "माझ्याकडे बस भाड्यासाठी पैसे नाहीयेत."

  मी पर्स मधून पैसे काढत तिला सांगितलं,"हे घे पैसे. मला काही माहित नाही. तू उद्या सिन्नरला जाणार आहेस, त्याची चौकशी करणार आहेस आणि मला सांगणार आहेस. सिन्नरला जाऊन आल्यशिवाय मला भेटू पण नकोस आणि माझ्याशी बोलू पण नकोस. मी तुला तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ करू देणार नाही. तू सांगतेस तसा मुलगा चांगला असला तर मी तुझं लग्न लाऊन देईन."

  अनिछेनीच पण रोहिणी दुसऱ्या दिवशी सिन्नरला गेली. परत आली ती वेगळ्याच मूडमध्ये. कशानितरी चांगलीच हादरली होती. माझा हात घट्ट धरून काही क्षण माझ्याकडे बघत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते.

  "ताई, तू आज मला मोठ्या संकटातून वाचवलस. तू माझ्या भल्यासाठी सांगत होतीस आणि मला वाटत होतं तू मुद्दाम करतीयेस. तू मला पाठवलं नसतं तर मी त्याच्याशी लग्न करून किती मूर्खपणा करणार होते ह्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतोय.

  "मी पत्ता विचारत त्यांनी सांगितलेल्या इमारती पाशी गेले. मी ज्यांना पत्ता विचारला त्यांच्या चेहेऱ्यावर त्याचं नाव ऐकून आश्चर्य होतं आणि माझ्या साठी काळजी. अगदी इमारती जवळच्या नळावर चार बायका पाणी भरत होत्या त्यांना विचारलं, तेंव्हा त्या म्हणाल्या, 'पोरी, तुझं त्या माणसाकडे काय काम आहे.'

  मी माझं काम सांगितलं. जेंव्हा त्यांना कळल कि मी त्याचाशी लग्न करणार आहे तेंव्हा त्यांचातल्या एका वयस्कर काकू म्हणाल्या," हे बघ पोरी, तो चांगला माणूस नाही. तो सांगतो ते घर त्याचं नाही. तो सहा महिन्यापासून तिथे भाड्यानी रहातो. घरमालकांनी त्याला खोली खाली करायला सांगितलं आहे. त्याच्या बरोबर एक बाई रहाते. आम्ही कोणी तिला बघितली नाहीये, पण तो घरी असतो तेंव्हा त्या घरातून किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येतात. तो जाताना घराला कुलूप लावून जातो. दारं खिडक्या पक्क्या बंद करतो. त्यामुळे आतल्या व्यक्तीला कधी बघितलं नाही. लोकांनी तक्रार केली म्हणून घरमालकांनी त्याला जागा सोडायला सांगितलं. काळजी घे ग पोरी."

त्या नाही म्हणत होत्या पण इथवर आलेच आहे तर त्याचं घर बघून जाते, असा विचार करून मी जिना चढत त्याच्या दुसऱ्या मजल्यावरील flat पाशी गेले. ताई तुला सांगते त्या वेळेस मला वाटत होतं कि तुझ्यासारखं ह्या बायकांना पण माझं लग्न व्हायला नकोय.

त्याच्या घरापाशी पोहोचले आणि बघितलं तर दाराला कुलूप. मी परत यायला निघणार तेवढ्यात मला कोणीतरी कन्ह्ताय असं वाटलं. मी हाक मारली तर आतून कोणीतरी हळू आवाजात बोलल्या सारखं वाटलं. सुदैवानी एका खिडकीला थोडी फट होती. जमेल तेवढी खिडकी उघडली आणि आत बघितलं. ताई, आतमध्ये एक बाई होती. अंगावरचे कपडे फाटलेले होते. तिला खूप मारलं होतं. बहुतेक पट्ट्यांनी मारलं असावं. तिने हात वर केला त्याचावर वळ होते. ती बाई रडत होती आणि 'मला वाचवा वाचवा' असं म्हणत होती. तिला तिच्याबद्दल विचारलं तर समजलं कि ती त्या नालायक माणसाची बायको आहे. तो रोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. त्यांच्या लग्नाला तीन वर्षं झाली आहेत. ताई, मी तिला सांगितलं, आमच्या ताई तुला ह्यातून नक्की वाचवतील. ताई, तू तिला वाचवशील ना? तिला मदतीची खूप गरज आहे."

रोहिणी वाचल्याचा आनंद आणि समाधान होतंच पण आत्ता त्या मुलीचा जीव वाचवण्याची जास्त गरज होती. रोहीणीकडून त्या माणसाची सर्व माहिती घेतली आणि सिन्नर पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार कळवला. पोलिसांनी पण ताबडतोप ऐक्षन घेतली. त्या मुलीला सोडवलं, तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं आणि तिच्या नवऱ्यावर योग्य ती कारवाई केली.        

=============================================

 

 

 

 

 

 

 

 


Thursday, 28 January 2021

                                                                    माता ना तू वैरिणी 


  शालिनीच्या कुटुंबात तिचा नवरा आणि त्यांची दोन मुलं एवढेच होते. तिचे आई-वडील गावी रहात होते. मोल मजुरी करून पोट भरत होते. शालिनीचा नवरा, संदीप, सर्वगुणसंपन्न होता. तो धड कमवत नव्हता,त्यात दारू प्यायचा, जुगार खेळायचा आणि त्याला सिनेमा बघायचा आणि हॉटेलात जेवायचा भारी शोक होता. ह्या सगळ्यासाठी त्याची कमाई कमी पडायची. मग अधूनमधून पैसे कमी पडले कि शालिनीला शिवीगाळ, मारहाण करायचा. ती तरी त्याला पैसे कुठून देणार? माहेरी जायची सोय नव्हती. आई-वडिलांचं जेमतेम भागत होतं. मग काय निमुटपणे मार खायची, कधी अती झालं कि उलटून शिव्या द्यायची. तिला काम करून चार पैसे कमवायची खूप गरज होती. मुलांना दोन वेळा पोटभर जेऊ घालण्यासाठी, नवर्याचा मर चुकवण्यासाठी आणि चार दिवस सुखाचे जगण्यासाठी. तिच्या हातात कला होती. ती उत्तम शिवण शिवायची. ती काम शोधत होती आणि त्या सुमारास महिला हक्क संरक्षण समितीला गणवेश शिवायची एक मोठी ऑर्डर मिळाली होती, म्हणून आम्ही कारागीर शोधात होतो. अशी माझी आणि शालीनीची ओळख झाली.

  शिवणाच काम अडीच-तीन महिने चाललं. त्या काळात दर एक दिवसा आड शालिनी भेटायची. शांत स्वभाव, कामात चोख.कधी कशाची तक्रार नाही. कधी तिच्या बद्दल किंवा तिच्या कामाबद्दल कोणाची तक्रार नाही. काळी-सावळी, चुणचुणीत, प्रसन्न चेहेरा, मध्यम बांधा, अबोल स्वभाव आणि प्रेमळ अशी होती शालिनी. काम संपलं तरी नंतर ती भेटायला यायची. अधून मधून शिवणाच काही काम असलं तर आम्ही तिला सांगायचो. मध्ये बरेच दिवस आलीच नाही आणि आली ती 'दिवस गेले आहेत असं सांगायला'.

"ताई, मी आता एवढ्यात नाही यायची. पाच महिने झालेत. घरच करून चक्कर मारायला नाही जमायचं."

 "ते ठीक आहे. काळजी घे. पण दोन मुलांना सांभाळून स्वताच बाळंतपण स्वतःच करशील का? काही मदत लागली तर कळव. पैसे लागले तरी हक्कानी मागुन घे."

 "ताई, तुमचा लई आधार वाटतो. आठवा लागला कि आईला बोलवून घेणार आहे. ती राहील काही दिवस."

 असं सांगून शालिनी गेली ती एक वर्षांनी आली. आली तेंव्हा तिची अवस्था बघवत नव्हती. अंगावरची साडी आणि ब्लाउज फाटलेलं, चेहेऱ्यावर मारल्याच्या आणि बोच्रकारल्याच्या खुणा होत्या. ती लंगडत होती. बहुतेक पायावर फटका बसला असावा.

 "शालिनी, अग काय हि अवस्था. काय झालं काय? कसं झालं? कोणी केलं? मला नीट सविस्तर सांग", असं म्हणत तिला हाताला धरून खुर्चीत बसवलं. घोटभर पाणी प्यायल्यावर शालिनी सांगायला लागली.

  "ताई, मी ठरल्या प्रमाणे माझ्या आईला मदतीसाठी बोलावून घेतली. तिने माझी चांगलीच मदत केली. डीलीवरीच्या गडबडीत माझ्या लक्षात आल नाही. नवव्या महिन्या पासून ते बाळ तीन महिन्यांचं होईपर्यंत त्या दोघांनी मला किचनमध्ये झोपायला लावलं. (खरं म्हणजे शालिनीच दीड खोलीचं घर आहे. १०*१५ मध्ये सर्व) कारण सांगितलं, 'मला विश्रांती मिळावी म्हणून.' मी पण मुर्खासारखा त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी बाळाला घेऊन आतमध्ये, मुलं शेजारी आत्याकडे आणि हि दोघं मजा मारायची. हे असं किती दिवस चालत होतं मला माहित नाही. एक दिवस मुलांनी घरी झोपण्यासाठी हट्ट केला. तेंव्हा माझा नवरा त्यांच्यावर खूप भडकला आणि मारून, रागावून त्यांना त्यांच्या आत्याकडे पाठवलं. मला हे थोडं विचित्र वाटलं. मला झोप लागेना. सगळं सामसूम झाल्यावर बाहेरच्या खोलीत येऊन बघितलं. ताई, शप्पत घेऊन सांगते, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझी आई आणि माझा नवरा एक-मेकांच्या मिठीत होते. तो किळसवाना प्रकार बघून मी ओरडले. दोघं दचकून उठले. कावरे बावरे झाले. त्यांची चोरी पकडली गेली होती. मी 'हे सगळं बापाला सांगीन असा दम दिला. काही दिवस ठीक गेले. आई माझ्या पाशी राहिली आणि नवरा (दोन गल्ल्या पलीकडे) त्याच्या बहिणीकडे गेला. काही दिवसांनी समजलं कि नणंद बरेच दिवसांपासून गावाला गेली आहे आणि ह्या दोघांचं त्या घरात भेटणं चालू आहे. हे समजल्यावर मला काय करावं काही सुचेना. मी माझ्या बापाला फोन करून बोलावून घेतलं. माझा बाप आला. मी काय चाललं आहे हे त्याच्या कानावर घातलं आणि त्याला विनंती केली, 'तुझी बायको तू गावाला वापस घेऊन जा.'

  बाप म्हणाला," हि कुठली रीत. तुला हवं तेंव्हा माझी बायको इकडे बोलावलीस. तुझा बाप तिकडे एकटा, बिन बाईचा कसा जगेल ह्याचा विचार केलास का? माझं तिकडे सुंदरा संग छान चाललं आहे. मला हि आता नाही लागत. तू गोंधळ घातला आहेस तूच निस्तर." असं म्हणून बाप गावी निघून गेला.

  आता ह्या दोघांना कोणाचीच भीती राहिली नाही. ते राजरोज पणे नवरा-बायको सारखे राहू लागले. माझी मोलकरीण करून टाकली. माझी आईच त्याची रखेल झाली आणि त्या नात्यांनी मालकीण. खूप दिवसांनी माझ्या आईंनी दूर लोटलं म्हणून जाम दारू पिऊन माझा नवरा रात्री माझ्या पाशी आला. मी त्याला जवळ जेऊ दिल नाही. त्याला खूप राग आला. ताई, त्यांनी मला खूप मारलं. आणि ती थेरडी नुसती गम्मत बघत बसली होती. ताई, तुम्ही काहीतरी करा. मला हि बाई आणि हा माणूस माझ्या घरात नको."

  (हे ऐकल्यावर काही क्षण माझं डोकं बंद पडलं.) मी शालीनीची तक्रार नोंदवून घेतली. तिच्या आईला आणि नवऱ्याला, तसेच तिच्या वडिलांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यांना ते काय चुका करत होते ह्याची जाणीव करून दिली. (शालीनीची आई, वडील आणि तिचा नवरा ह्यांनी नव्यानी निर्माण केलेली नाती हि कायद्याच्या दृष्टीनी गुन्हा आहे, ज्याच्यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते. हे कळल्यावर शालिनीचे आई-वडील गावी निघून गेले. नाईलाजाने संदीपनी शालिनी बरोबर राहणं कबूल केलं.) तेवढ्यापुरते सगळे आपापल्या घरी गेले. त्या गल्लीत खूप बदनामी झाल्यामुळे शिलीनिनी तिचं बिऱ्हाड दुसऱ्या वस्तीत हलवलं. शिलीनीला तिच्या ह्या नवीन घरात नवऱ्याला घ्यायची किंवा त्याच्या बरोबर संसार करायची अजिबात इत्छा नव्हती. पण नवर्यानी माफी मागितली, काम करायची आणि मुलांचा सांभाळ करायची खात्री दिली. शालिनीला पण कोणाचा आधार नव्हता. ती पण समझोता करायला तयार झाली. (त्या प्रमाणे त्यांनी सहा महिने कमवून तिला पैसे आणून दिले. मगच समझोता झाला.)

  ह्या गोष्टीला सहा महिने झाले असतील. मागील सहा महिन्यात आम्ही नियमित गृह भेटीला जात होतो. सर्व ठीक चालल होतं. शालिनी कष्ट करून कमवत होती. नवर्याचा अधून मधून त्रास सहन करत होती. कसेतरी दिवस जगत होती. हे सगळं ती मुलांसाठी सहन करत होती. (आम्ही तिला संस्थेत, मुलांना घेऊन, रहातेस का? असं विचारलं होतं. त्यासाठी ती तयार नव्हती.)

  एक दिवस तिच्या शेजारच्या काशीबाई सांगत आल्या,' म्याडम, ती शालिनी तुमच्या कडे यायची ना, तिच्या नवर्यानी काल रात्री तिचा खून केला. काल ती नेहेमीसारखे कपडे शिवत होती. तिचा नवरा उशिरा घरी आला. आल्यावर पैशावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही सोडवायला जाणार तेवढ्यात जोरात किंचाळण्याचा आवाज आला. जाऊन बघितलं तर शालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मोठा मुलगा (रमेश) म्हणत होता,' बापानी आईला कात्रीनी भोसकल. आणि बाप पळून गेला'. रात्रीच पोलीस आले होते. तुम्ही तिच्याकडे नेहेमी येत होतात म्हणून सांगायला आले.'

  हे धक्कादायक होतं. तो मूर्खपणा करेल हे अपेक्षित होतं पण असं काही करेल असं कधी वाटलं नाही. प्रत्येक वेळेस भेटलो कि आम्ही शालिनीला 'त्याचा नाद सोड. मुलांना घेऊन वेगळी रहा. तुझी दुसरी कडे सोय करतो' असं समजवून सांगत होतो. पण काही उपयोग झाला नाही. तिचं एकच म्हणणं होतं, 'ताई, माझे आई-वडील तर माझ्यासाठी मेले, पण उद्या माझं काही बर वाईट झालं तर मुलांना जवळ करणारा बाप तरी असेल.' आम्हाला तिची काळजी वाटायची. आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन केसची माहिती सांगून, गरज पडली तर मदत करण्याबद्दल विनंती केली होती.

  बातमी कळल्याबरोबर आम्ही निघालो. शालिनीच्या घरी भकास वातावरण होतं. शिजवलेलं अन्न इकडे तिकडे (इतस्ततः) पसरलं होतं. मुलं एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. शेजारच्या बायका त्यांची जमेल तशी काळजी घेत होत्या. कशाची काही गरज असेल तर कळवा असं त्या बायकांना सांगितलं आणि मुलांसाठी नेलेला खाऊ त्यांच्या कडे देऊन निघालो आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं होतं. आमच्या कडील कागदपत्रे, केस फाईल ची प्रत (जी तपासकार्यात किंवा चार्जशीट तयार करण्यासाठी कामास येईल असं त्यांना वाटलं ती सर्व) पोलिसांना देऊन आलो. शालिनीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमच्या बाजूनी पूर्ण सहकार्य केलं.

  पुढे शालिनीच्या नवऱ्याला अटक झाली. त्याचावर खूनाचा गुन्हा दाखल झाला. केस कोर्टात चालली. संस्थेनी सादर केलेली माहिती, त्या केसमध्ये आम्ही केलेले प्रयत्न आणि वेळोवेळी केलेल्या नोंदींचा खूप उपयोग झाला. सर्वात महत्वाची साक्ष झाली रमेशची. ७ वर्षांच्या रमेशनी कोर्टात न घाबरता साक्ष दिली. साक्षीत त्यांनी आई-वडिलांमध्ये झालेलं भांडण, वडिलांनी नेहेमीप्रमाणे दारूसाठी पैसे मागितले, आईंनी त्यांचं जेवण वाढलं, 'पैसे दे, पैसे दे' म्हणत वडील आईला मारायला लागले. त्यांनी आईला कात्रीनी मारलं. सर्व घटना सविस्तर सांगितल्या. संदीपनी शालिनीचा खून केल्याचं, सादर झालेल्या पुराव्यातून सिद्ध झालं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. जगण्यासाठी धडपडणारी शालिनी गेली! सुटली! आई मेली, बाप तुरुंगात, मुलं पोरकी झाली! ह्याला जबाबदार कोण? शालिनी स्वतः? कि तिचे बेजबाबदार आई,वडील आणि नवरा? का नीती मुल्या बद्दल आग्रही असण्यासाठी शिकवणारा समाज?

Sunday, 3 January 2021

लातोंके भूत बातोंसे नही मानते

 कोणीतरी खरंच म्हंटले आहे, सोळावं वरीस धोक्याचं! हा धोका खूप कारणांनी उदभवू शकतो. त्यात दिसायला सुंदर असेल तर त बघायलाच नको. कविताच्या आयुष्यात तिच्या वयानी आणि सौन्दार्यानी फार प्रश्न निर्माण केले. दिसायला सुरेख, अभ्यासात हुशार कविता कोणाच्या अध्यात ना मध्यात. ती बरी, तिचा अभ्यास बरा आणि कॉलेज व क्लासचं रुटीन बर. १०वित शाळेत पहिली आली होती. यंदा १२ वीत बोर्डात येईल अशी तिच्या आई-वडील व शिक्षकांना खात्री होती. तिची आई, आशाताई आमच्या पंचवटीतल्या एका गटात सभासद होत्या. दर महिन्याला मीटिंग मधून त्या कविता आणि तिच्या अभ्यासाचं निमित्त करून लवकर निघून जायच्या. अलीकडे तर दोन महिन्यांपासून त्या गटाचे पैसे जमा करायला किंवा मिटींगला येत नव्हत्या. गटप्रमुख मीनाताईनी चौकशी केली तेंव्हा समजलं कि 'त्या घरीच असतात कारण कविता घरीच असते. कविताचे क्लास, कॉलेज सगळं बंद करून कविता दीड महिन्यापासून घरीच बसून आहे. ती खूप घाबरली आहे. तिला कोणीतरी मुलगा रस्त्यात गाठून खूप त्रास देतो. तो तिचा पाठलाग करतो. तिची छेड काढतो. तो तिला सारखी लग्नाची मागणी घालतो, फोनवर धमक्या देतो.'

हे ऐकल्यावर मीनाताई आणि बचत गटातील दोघी तिघी जणी आशाताई ना भेटायला त्यांच्या घरी गेल्या. दोन खोल्यांचं आशाताईंचं घर. बाहेरच्या खोलीतील पलंगावर एका कोपर्यात कविता बसली होती. ती खूप घाबरलेली होती. तिची आईपण घाबरली होती पण तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होती. दोघी समोर असलेल्या मोबईलकडे भूत बघितल्या सारखं बघत होत्या. मीनाताई काही बोलणार तेवढ्यात फोनची रिंग वाजली. कविता भीतीनी थरथर कापू लागली आणि आशाच्या पण चेहेऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. दोघींपैकी कोणीच फोन उचलला नाही. वाजून बंद झाला. असं ३ वेळा झाल्यावर मीनाताई म्हणाल्या, "अग कविता, तुझा फोन वाजतोय. कोणाचा आहे बघ."

"मावशी फोन त्याचाच असेल."

"त्याचा म्हणजे कोणाचा?"

"त्या मुलाचा."

"तो मुलगा म्हणजे कोण? मला समजेल असं सांगशील."

ह्यावर आशानी सुरुवात केली," मीनाताई, काही दिवसांपासून एक मुलगा आमच्या कविताला त्रास देतोय. ओळख वाढवायचा प्रयत्न करतोय. तिचा रस्ता अडवतो. बोलायचं प्रयत्न करतोय. ती काहीच प्रतिसाद देत नाही तर त्यांनी तिचा हात धरला. ती खूप घाबरली. तो तिच्या मागे धावत, ओरडत 'मेरी मधुबाला, मै तुमसे प्यार करता हुं. मुझसे शादी करो. ना काहोगी तो देख लेना.' आमच्या घरा पर्यंत आला. आम्हाला खूप भीती वाटतीये. तिचे बाबा म्हणाले,'तिला बाहेर पाठवायलाच नको. तिचं कॉलेज, क्लास बंद करून टाकू.' तीला बाहेर पाठवणं बंद केलं तर त्यांनी तिचा मोबाईल नंबर शोधून काढला. तो सारखा तिला फोन करतो. भेटायला बोलावतो. धमक्या देतो. काय करावं आम्हाला तर काही कळतच नाहीये."

"अहो तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केलीत?" ह्या मीनाताईनी विचारलेल्या प्रश्नाला आशाताई उत्तर देणार तेवढ्यात परत फोन वाजला.

"कविता फोन घे. स्पीकरवर तक." असं म्हणत मीनाताई कविताच्या शेजारी तिला धीर द्यायला बसल्या.

कवितानी घाबरत फोन घेतला आणि स्पीकरवर टाकला. तिकडून एका मुलाचा आवाज आला,"हाय मेरी जान, मेरी रानी, कैसी हो. मेरा फोन क्यू नही उठाती? तू मुझे बहोत सताती है. याद रख शादीके बाद मै सबका गीन गीन के हिसाब लुंगा. अब और ना तडपा. फटाफट तेरी लालवाली ड्रेस पेहेनके मुझे मिलने आजा."

मीनाताई खाणा खुणा करून कविताला विचारायला सांगत होत्या,'कधी आणि कुठे भेटायचं?'

कवितानी 'कब और कहा?' विचारल्यावर तिकडून विजय मिळवल्याच्या आवाजात तो मुलगा म्हणाला," मधुबाला, मुझे तेरी यही अदा बहोत पसंद है. मुझे यकीन था कि तुमभी मुझसे प्यार करती हो. इतने दिन इतना भाव क्यू खा रही थी? ये सब हिसाब मै शादीके बाद करुंगा. अब सून. दिंडोरी रोडपे एक बिल्डिंगका काम चल रहा है. वहापे आज छुट्टी है. वहीपे मुझे ४ बजे आके मिल. बाय. आय लव यु."

कविता भीतीने थरथर कापत होती. 'मीनाताई मला वाचवा. तो माझा जीव घेईल.' असं म्हणत रडत होती.

"कविता, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझा तुझ्या मावशीवर भरोसा आहे ना? ठरल्याप्रमाणे तू ४ वाजता त्याला भेटायला जा. बाकीचं मी बघून घेईन." असं म्हणत मीनाताई उठल्या. त्यांनी पटापट गटातील बायकांना फोन केले आणि परत बोलावून घेतलं.

 गटातील सर्व १५ जणी तयारीनिशी त्या बांधकाम चालू असलेल्या इमारतीपाशी चारच्या सुमारास पोहोचल्या. तिथे गेल्यावर त्यांना जे दिसलं ते चीड निर्माण करणार दृश्य होतं. अर्धवट बांधकाम झालेल्या भिंतीला टेकून कविता उभी होती. तिच्या समोर एक मुलगा उभा होता. त्याचा एका हातात साखळी असलेली कि चेन होती जी तो फिरवत होता. दुसरा हात कविताच्या मागच्या भिंतीवर होता. त्याच्या अंगात केशरी रंगाचा सदरा आणि मातकट रंगाची पतलून होती. गळ्यात भडक रंगाचा मफलर आणि तोंड विड्यामुळे रंगलेलं. दिसन्यावरून मुलगा मवाली वाटत होता. घाबरलेली कविता, आक्रसून खाली मान घालून उभी होती. आणि तो मुलगा विजय मिळवल्याच्या आविर्भावात तिच्या अजून जवळ सरकत होता. तो पुढे काही हालचाल करणार तेवढ्यात मीनाताईनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"अरे बाबा, तुला दिसत नाहीये का? ती मुलगी घाबरली आहे. कशानी तरी. तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू तिला का त्रास देतोयस?"

त्यांनी चमकून मागे वळून पाहिलं आणि तुच्छतेने म्हणाला," ए बाई. तेरेको दिखता नाही क्या. एक लडका एक लडकीसे बात कर रहा है. वो भी प्यारकी. काहेको कबाबमे हड्डी बनते हो. जाओ." आणि कविताकडे वळून म्हणाला," मधुबाला, तू हा कर दे. बाकी मै सब सम्हालुंगा."

"अरे बाबा तिचं नाव मधुबाला नाहीये. कविता आहे. तिचं तुझ्यावर प्रेम नाही. तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. तिला खूप शिकायचं आहे. डॉक्टर व्हायचं आहे. तू तिचा नाद सोड आणि तुझ्या घरी जा."

"मधुबाला, मेरेको पेहेले तो बोलनेका ना, कि तुमको डॉक्टर बनना है. मै तुमको सिखायेगा. तू फिकर मत कर. तू सिर्फ शादीके लिये हा बोल दे."

मीनाताई ना ह्या मुलाच्या बेजबाबदार वागण्याचा राग येत होता आणि त्रास पण होत होता. "तू कोण आहेस आणि स्वतःला काय समजतोस. तुझं नाव काय आहे आणि राहतोस कुठे? आणि तुझे वडील काय काम करतात? त्यांना तुझी हि थेरं ठाऊक आहेत का? तू बऱ्या बोलांनी जा नाहीतर पोलिसांत तुझ्या विरुद्ध तक्रार करते."

पोलीस, तक्रार असे शब्द ऐकल्यावर तो कवितापासून थोडा बाजूला सरकला. त्यांनी मीनाताईना उद्देशून म्हणाला,"मी कोण आहे?  कुठला आहे? माझे वडील काय करतात? माझी डिटेल मध्ये माहिती घेताय, काय तुमची पोरगी खपवायचा विचार आहे कि काय?"

हे ऐकून मीनाताई इतक्या चिडल्या कि त्यांनी त्या मुलाच्या एक मुस्कटात लगावली. त्या म्हणाल्या,"बायानो, लातोंके भूत बातोंसे नही मानते. ह्याला असा धडा शिकवूया कि पुन्हा कुठल्या मुलीकडे नजर वर करून बघायची हिम्मत करणार नाही." सर्व बायकांनी त्याला धरून चांगलाच हाणला.

कविताला घेऊन घरी परत जाताना पोलीस चौकीत घडलेल्या घटनेची नोंद केली. पोलिसांनी पण त्याला त्यांच्या पद्धतीने समाज दिली.

अपेक्षे प्रमाणे दीपक (तो मुलगा) सुधारला. त्यांनी परत कवितालाच काय कुठल्याच मुलीला कधी त्रास दिला नाही. कविता शिकून पुढे डेनटिस्ट झाली.

Thursday, 17 December 2020

(पुन्हा एकदा) शून्यातून संसार...

कोरोना आणि त्या मुळे निर्माण झालेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. स्थलांतरित मजूर आणि त्यांचे होणारे हाल, ह्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आपण रोज बातम्या वाचल्याच आहेत.ह्या मजुरांचा नाईलाज म्हणून ते गावी परत गेले. तिथे गेल्यावर घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं का आणि केल तर कस केलं ह्या बद्दल खूप काही माहिती मिळाली नाही. पण ३५ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असं जोडपं आल, जे घरची आणि गावाकडच्या लोकांची खूप आठवण आली म्हणून नाशिक सोडून उत्तर प्रदेशला गेले. गावी गेल्यावरचे त्यांचे अनुभव फारच गंमतशीर होते.

१९८८-८९ ची घटना आहे. माझी मुलगी लहान होती आणि संस्थेचं काम नव्यानं सुरु झालं होतं. माझी खूप धावपळ होत होती. घरात मदतीला म्हणून एक मदतनीस आणायची ठरलं. त्या दिवसांत आधाराश्रमात गरीब, निराधार मुली व महिलांना आधार देऊन, त्यांची रहाण्याची सोय केली जायची. त्या वेळी नाना उपाध्ये आणि सुधाताई फडके हे दोघं आश्रमाच बहुतांशी काम बघायचे. (दोघे आमच्या चांगल्या परिचयाचे होते. अगदी घरच्या सारखे संबंध होते) त्यानी शोभाला आमच्या घरी पाठवून दिलं. १८-१९ वर्षांची शोभा चुणचुणीत होती. सर्व कामांमध्ये उत्साहानी मदत करायची. माझ्या लेकीसोबत तर तिची चांगलीच गट्टी जमली होती. बघता बघता शोभा आमच्या घरातील एक सदस्य बनली. मी पण नकळत तिच्यावर खूप अवलंबून राहू  लागले. माझ्याकडे येऊन तिला चारेक वर्ष झाली असतील. एक दिवस अचानक ती लाजत लाजत म्हणाली, "ताई, मला लग्न करावस वाटतंय.मला वाटतंय माझा पण नवरा असावा (भाऊ सारखा, समजूतदार). आमचं घर असेल, मुलं असतील. ताई, होईल का ग माझं लग्न? कोण माझ्यासाठी स्थळ बघेल, कोण माझ्यासाठी बोलणी करेल. माझा बाप असं वागला नसता तर, आज माझी आई जिवंत असती." नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. 'ताई मी तुला आई म्हणू का?' असं विचारत लहान मुलासारखी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडायला लागली. बराच वेळ ती रडत होती आणि मी तिला थोपटत होते. जेंव्हा ती शांत झाली तेंव्हा आमच्यातलं नातं बदललेलं होतं. मला एक २२ वर्षाची मुलगी मिळाली होती. प्रेमळ, जीव लावणारी आणि नातं जपणारी. आम्ही पुढाकार घेऊन, आश्रमातील लोकांच्या मदतीने तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.

शोभाच ते वाक्य 'तर माझी आई जिवंत असती' मला अस्वस्थ करत होतं. शोभाच्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी सुधाताईना विचारायचं ठरवलं. कारण समजल्यावर त्या माहिती सांगायला तयार झाल्या. शोभाचा भूतकाळ ऐकून मन सुन्न झालं. तिच्यासाठी फार वाईट वाटलं. 'शोभा ६-७ वर्षांची असतांना तिच्या वडिलांनी शोभाच्या आईचा चाकूने भोसकून खून केला. ह्या साठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कोणीच नातेवाईक शोभाचा स्वीकार करायला तयार होईनात म्हणून तिला संस्थेत दाखल केलं. तुरुंगात असतांना शोभाचे वडील पण मेले. ना कोणी तिचा स्वीकार केला ना कोणी तिला कधी संस्थेत भेटायला आल. आता तर शोभा अगदीच एकटी झाली. सगळ्यानाच ती नकोशी होती. माझ्याकडे येईपर्यंत ती अशीच एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत शिफ्ट केली जात होती.

सुधाताई आणि उपाध्ये काकांनी पुढाकार घेऊन शोभा साठी दोन स्थळ बघितली. लग्नानंतर नाशिक सोडावं लागेल ह्या भीतीने तिने संगमनेरच्या स्थळाला नकार दिला. दुसर स्थळ होतं रामशरणचं. रामशरण यु पी कडील भैया होता. कामासाठी नाशिक मध्ये आला होता. भाड्याच्या गाड्यावर दारोदार भाजीपाला विकायचा. कमाई बरी होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि आश्रमातील कर्मचारी, संस्थेतील मुलं व आमचा काही मित्र परिवाराच्या साक्षीने शोभा आणि रामशरण चा विवाह संपन्न झाला. दोघांचा संसार आनंदात सुरु झाला. अधून मधून दोघं भेटायला यायचे. पहिल्या तीन वर्षात शोभला दोन मुलं झाली, मोठी मुलगी आणि नंतरचा मुलगा. मुलगा, कालीचरण, सहा महिन्याचा असेल. एक दिवस दोघं मुलांना घेऊन भेटायला आले होते, तेंव्हा रामशरण नी ते गावी जात असल्याचं सांगितलं. तो म्हणाला," माताजी हम शोभा और बच्चोको लेकर गाव जा रहे है. यहा का सब बेचके जा रहे है. मांका बहोत बार फोन आये. कालीचरणको देखनेका उनका बहुत मन करता है. हम भी २० सालसे यही पर है. हमेभी गावकी, खेतोंकी बहुत याद आती है. अब कब मिलना होगा पता नाही. तुम लोगोंकी बहुत याद आएगी."

मुलांच्या हातात खाऊ, शोभाला साडी आणि रामशरण कडे थोडे पैसे देऊन पाठवणी केली. दोघंही अशिक्षित असल्यामुळे पुढे काही त्यांची खबरबात कळलीच नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, 'नो न्यू इज गुड न्यूज'.

शोभाला जाऊन चार महिने पण झाले नव्हते. एक दिवस पहाटे साडे चार वाजता दारावरील बेल वाजली. दार उघडलं तर समोर शोभा आणि रामशरण, हातात सामान आणि दोन्ही मुलांना घेऊन उभे. मी काही विचारायच्या आत शोभा गळ्यात पडून रडायला लागली. मला बघून रामशरणच्या पण चेहेरयावरील ताण कमी झाला. सगळ्यांना भूक लागली होती आणि प्रवासानी दमले पण होते. थोडाफार खाऊन सगळे झोपले.

उठल्यावर शोभा लगबगीने कामाला लागली. सकाळची सगळी काम आवरून झाल्यावर गावी काय झालं ते तिने सविस्तर सांगितलं.

"आई, इथून आम्ही गावी पोहोचलो. आम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंना रामचरण आणि नातवंड भेटल्यामुळे त्या खुश होत्या. मला भाषेची थोडी अडचण होत होती. पण हळू हळू त्यांना माझं आणि मला त्यांचं म्हणणं समजू लागलं होतं. पहिले दोन महिने मजेत गेले. सगळ्यांनी आमचे आणि मुलांचे खूप लाड केले. लवकरच रामचरण त्यांच्या भावा बरोबर शेतात जाऊ लागले. रामशरणनी  मी नाही म्हणत असतांना इथून नेलेले सर्व पैसे वडिलांच्या कडे देऊन टाकले. त्यामुळे ते पण खुश होते. आम्हाला जाऊन तीन महिने झाले. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सासूबाईनी विषय काढला. 'आपको आके बहोत दिन हो गये. वापस जाना है ना? कबकी टिकट निकालनेको बोले?'

हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. रामशरणनी आईला विचारलं,"अम्मा, कहा जाये? हम तो वहाका सब बेचके गाव आये है. आप लोगोंके साथ रेहेने. बच्चे यही इस्कुलमें पधेंगे. वहा नासिकमें अब हमारा कुछभी नही है."

"तुम आनेसे पहले हमसे पूछा क्या, आये क्या करके. यहा हम आपको, आपके परिवारको क्यों सम्हाले? मुफ्तकी रोटी कोन और क्यू खिलावेगा?"

"मुफ्तकी काहे. शोभा घरके काममे हात बटावे है, हम खेतोमे काम करत है. और पूछना क्या है? घर हमारा, गाव हमारा, जमीन हमारी, आप सब हमारे. मन हुंवा हम आ गये."

"तुम यहा नही रेह सकते. जल्दीसे अपना सामान उठावो और निकलो."

"हम भी देखते है हमें कौन निकालता है."

आणि मग काय त्या रात्रीनंतर सगळं चित्रच पालटल. रोज वाद आणि भांडणं व्हायला लागली. घरात कोणी कशाला हात लाऊ देईना. आम्ही जमिनीत हिस्सा मागणार अशी त्यांना भीती वाटत होती. रोज दिवसातून चार चार वेळा सासू विचारायची,'कधी जाताय, केंव्हा जाणार?'

रामशरणनी एक दिवस वडिलांकडून 'दिलेले पैसे परत मागितले.' तो म्हणाला," मैने आपको दिये थे वो पैसे मुझे दे दो. मै, मेरे परिवारको लेकर चला जाऊंगा. मेरे पास जो भी था वो मैने आपको दे दिया. अब मेरे पास कुच्छभी नही है."

हे ऐकल्यावर सासरे खूप संतापले. आम्हाला खूप शिव्या दिल्या. रामशरण ला मारायला धावले. घरातील वातावरण अजूनच बिघडलं. आम्हाला पोटभर जेवण पण देणं बंद केलं. उपाशीपोटी मुलं रडत झोपायची. मी रामशरणला म्हणाले, 'आपण नाशिकला आईकडे जाऊया. ती आपल्याला मदत करेल.'

ट्रेनची तिकीट काढायला पण पैसे नव्हते. मुलांची अवस्था बघवत नव्हती. मला काय करावं कळेना. मला आई तुझी फार आठवण आली. त्या दिवशी मी खूप रडले. तू कालीचरणला दिलेली चौघडी काढायला बेग उघडली आणि माझी परतीच्या प्रवासाची सोय झाली. मला तू लग्नात दिलेले चांदीचे पैंजण दिसले. मी लागलीच रामशरणला ते दिले. त्यांनी त्या पैशातून तिकीट काढली. म्हणून आम्ही तुझ्या कडे सुखरूप येऊ शकलो. (जेंव्हा सासूला समजलं कि माझ्या कडे चांदीचे पैंजण आहेत तेंव्हा तिने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. अजून मी काय लपवलं आहे हे पाहण्या साठी बेगेतून सामान बाहेर काढलं. जेंव्हा काहीच मिळालं नाही तेंव्हा चिडून तिने माझी एक साडी फाडली. एवढंच नाही तर दोन चांगल्या साड्या स्वताच्या कपाटात ठेऊन दिल्या.) माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये. तिथले शेवटचे दिवस आठवले तरी अंगावर काटायेतो.

आई, आता आम्ही तुझ्याकडे आलोय. रामशरण म्हणतोय आपण आपला भाजी विकायचा धंदा सुरु करू. त्याला जोडीला फळ पण ठेऊ. आई तू आम्हाला थोडी मदत करशील का?"

२-४ दिवस ते सगळे माझ्या कडे राहिले.मी त्यांना आर्थिक मदत करायची ठरवलं. रामशरणच्या आधीच्या ओळखी होत्याच. त्याला काम सुरु करायला आणि भाड्याची खोली मिळवायला वेळ लागला नाही.

 दोघांनी दोन लेकरांसह शून्यातून संसार सुरु केला. रामशरणनी खूप मेहनत केली. शोभानी पण चांगली साथ दिली. (गावाकडून कामानिमित्त आलेल्या लोकांना ती जेवणाचे डबे द्यायला लागली. पुढे राहत्या घराच्या शेजारची खोली घेऊन ह्या लोकांना पोटभाडेकरू म्हणून ठेऊन चार पैसे कमवायला लागली. रहात घर विकत घेतलं, (कर्ज काढून.) मला शेवट भेटली त्याला पण १५ वर्षं झाली. तेंव्हा तिची मुलं शिकत होती. तीन खोल्यांचं घर त्यांच्या नावावर होतं. दोघं मजेत संसार करत होते.