आमची दुपारची जेवणाची सुट्टी झाली. रोजच्या सारखं आम्ही ऑफिसचे दार थोडं लोटून घेतलं. आम्ही जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात एक २०-२२ वर्षांची महिला/मुलगी ३ लेकरांना घेऊन आत आली. एक कडेवर आणि बाकीची दोघं असतील २ आणि ३ वर्षाची. अंगात मळकट, कळकट कपडे. कपडे म्हणण्या सारखं काही नव्हतं. खूप ठिकाणी फाटलेली साडी तिने कशीतरी स्वतःभोवती गुंडाळली (नेसली) होती. मुलं तर उघडी नागडी होती. त्या बाईची अवस्था बघवत नव्हती. शरीरावर खूप ठिकाणी मारल्याच्या जखमा, खुणा होत्या. कपाळावरची जखम ताजी होती. खोक पडली होती. त्यातून रक्त येत होतं. ती बाई इतकी बारीक, थकलेली आणि अशक्त होती, कि ती कशीतरी ऑफिसमध्ये आली आणि मटकन खाली बसली. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. आमच्या डब्यातून आधी तिला आणि तिच्या मुलांना खाऊ घातलं. चार घास पोटात गेल्यावर ती पण जरा सावरून बसली.
तिने स्वतःची माहिती
सांगण्यास सुरुवात केली. "ताई, मी शांता. घोटीच्या जवळच्या एका पाड्यावर
बालपण गेलं. घरची खूप गरिबी. आम्ही चार बहिणी, जिवंत. (गर्भापातात ३ भावंड दगावली
आणि उपासमारी मुळे दोघे जण) मी सर्वात लहानी. एकबी दिस सुखाचा म्या पाहिला नाय.
बाप मजुरीला जायाचा. चार पैके कमवायचा. त्यातील थोडे माझ्या मायला द्यायचा आणि
काहीची पिवून यायचा. जे जमेल जसं जमेल तसं चार घास माय खाऊ घालायची. आज पत्तूर अमी एक दिसबी पोटभर जेवलो नाय. मटण
बनवलं नाय म्हणून बाप मायला लय हाणायचा! मग रातच्याला जवळ घ्यायाचा. ती लय वरडायची
किंचाळायची. मग थोड्या टायमानी समद शांत व्हायाच. एक दिस माझी माय मरून गेली. बाप
आमच्या संग वेगळंच वागू लागला. एक दिस शेजारील पाड्यावरचा महादू आला. बापानी
त्याचा कडून पैका घेतलं आणि मोठीला पाठवलन त्याच्या संगती. असं मला पण त्यांनी
पैका घेऊन सखाराम संगती लगीन लाऊन पाठवून दिलं. पैका देऊन आणल्यामुळे सखाराम
माझ्या संगती हव तसं वागतो. खूप तरास देतो. दिवस रात जीव नकोसा करतो. लहान सहान
कारणावरून हाणतो.
पोटभर जेवण नाही. पोर
अंगावर पिते. दूध येत नाही. काल रातच्याला पोर भुकेने रडत होती आणि हा अंगाशी
..... मी नाही म्हणाले. त्यांनी हाणल." तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि
चेहेऱ्यावर भीती, घृणा, किळस असे सगळे भाव येऊन गेले. "मला जीव नकोसा झाला.
तीन पोरं घेऊन जाऊ कुठे. बाप मागल्या शिम्ग्यातच खपला. जीत्तेपणी त्यांनी काही
केलं नाही. आता तर मदत करायचा सवालच नाही. मला माझा नवरा समोर आला तरी घाण वाटते. तीन पोरं
घेतली आणि बसले बसमध्ये. कुठे जायाच, काय करायचं, पोरांना कुठे ठेवायचं, मला काही
बी ठाऊक नवतं. बस नाशिकला आली म्हणून आले नाशिकला. बसमधून उतरले आणि येड्यावानी
इकडे तिकडे बघत होते. सखाराम आता तरास देणार न्हाय त्यांनी बर वाटलं पण जायाच कुठे
ते ठाऊक नव्हतं. एक रिक्षावाला दादा म्हणाला,' कुठे जायचं?' म्या म्हणलं,'ठाऊक
नाय.' तो म्हणाला,' बस रिक्षात. मी तुला बराबर सोडतो.' आणि त्यांनी तुमच्या पाशी
आणून सोडलं."
शांता बोलायची थांबली. माझा
मेंदू बधीर झाला होता. मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. काय ते आयुष्य, किती सहन
करण. एक दिवस काय एक क्षण आनंदाचा नाही. मरत नाही म्हणून जगतोय म्हणायचं. मला शांता आणि तिच्या आईसाठी वाईट
वाटत होतं. कसला हा बाप. पोरं जन्माला घालायची आणि ती पोसायची अक्कल नाही. बायको
नामक बाईचा नुसत्या शरीर सुखासाठी आणि गुलामा सारखा वापर केला. लग्नाच्या नावाखाली
आपल्या पोटच्या पोरी विकल्या. त्याचं आयुष्य उधवस्त केलं. त्यांना नरकात ढकलून
आलेल्या पैशातून फक्त स्वार्थ पहिला, मजा केली. त्या क्षणाला तिच्या वडिलांबद्दल
इतका तिरस्कार आणि राग मनात होता कि ते समोर असते तर माझ्या हातून काहीतरी विपरीत घडल असत.
फोनच्या आवाजानी मी भानावर
आले. शांताची तक्रार नोंदवून घेतली. तिला झालेली मारहाण इतकी जबरदस्त होती कि
सर्वप्रथम तिला औषोध-उपचाराची गरज होती. तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी
पाठवले. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर, तिची-तिच्या मुलांसकट महिला आश्रमात
(सुरक्षित ठिकाणी) पाठवणी केली.
शांताचा बाप तर मेल्यामुळे
सुटला होता, पण सखारामला आम्ही इतक्या सहजी सोडणार नव्हतो. आम्हाला माहित होतं कि शांताचे
वडील आणि सखाराम मध्ये झालेला व्यवहार सिद्ध करणं अवघड होतं. पण शांताला झालेली
मारहाण, तिचा झालेला शारीरिक आणि लैंगिक छळ सिद्ध करता येणार होता. शांताला समझोता
करून सखाराम कडे जायचं नाहीये ह्याची खात्री पटल्यावर, तिला झालेल्या मारहाणीबद्दल
पोलिसांकडे तक्रार द्यायला सांगितलं. शांताची तक्रार आणि सिव्हील हॉस्पिटलचं
सर्टीफिकेट, ह्याच्या आधारावर साखरामवर गुन्हा दाखल झाला. पुढे ती केस कोर्टात
चालली, सखारामला शिक्षा झाली.
सखाराम विरुद्ध कोर्टात केस
उभी राहायला खूप दिवस लागले आणि ती खूप दिवस चालली. कोर्टात सादर केलेले
साक्षी-पुरावे (ह्यात माझी, त्या रिक्षा वाल्याची, बस चालकाची, डॉक्टरची, पोलीस
आणि खुद्द शांताची साक्ष झाली.) (पुराव्यासाठी तिने त्या दिवशी नेसलेली फाटकी
साडी, जिच्यावर रक्ताचे डाग होते, ती सादर करण्यात आली) आणि सिव्हीलची कागदपत्रे
ह्यांच्या आधारवर तब्बल ५ वर्षांनी त्याला शिक्षा झाली. शांताच पुनर्वसन करणं पण
सोपं नव्हतं. ती आमच्या कडे आली तेंव्हा इतकी अशक्त, परिस्थितीने गांजलेली, हरलेली
आणि टेकीस आली होती कि तिच्याशी लगेच काही बोलण्यात अर्थच नव्हता. पहिले जवळ-जवळ
दोन महिने तिला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरण्यात गेले. औषधोपचार, सकस आहार,
विश्रांती आणि भयमुक्त वातावरण, ह्या सगळ्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा ती लवकर
सावरली. संस्थेमार्फत चालविलेल्या पाळणाघरात तिच्या मुलांची सोय केली. थोडं बर
वाटायला लागल्यावर तीला काहीतरी काम हवं होतं. स्वभाव प्रेमळ, खूप कष्ट करायची
तयारी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इत्छा पण अशिक्षित आणि भोळसट. कोणाकडे
पाठवायची तर काळजी आणि जबाबदारी वाटत होती. शेवटी माहितीतल्या आणि विश्वासाच्या
घरातून तिला काम मिळवून दिली.
बापाने आणि नवऱ्याने
शांताच्या आयुष्यात सुखाचा एक क्षणही कधी आणला नाही. मात्र कष्ट करण्याची आणि
शिकण्याची तयारी असल्यामुळे शांताला काम मिळत गेली. हळूहळू ती आर्थिकदृष्ट्या
स्वतःच्या पायांवर उभी राहिली, आणि मग मात्र तिने जिद्दीने स्वतःची आणि मुलांचीही
ओंजळ सुखाने भरली.